शब्दात भावनांना
शब्दात भावनांना, बांधायचे कशाला
जे उमजले मनांना, बोलायचे कशाला
झाली फुले कळ्यांची, हे सांगतो सुगंध
बोलावल्याविनाही येतोच की मिलिंद
शब्दाविनाच सार्या फुलतात पुष्पमाला
शब्दात भावनांना, बांधायचे कशाला
शब्दाविनाच येथे, गातात गोड पक्षी
खुलवी नभास साऱ्या रेखीव मेघनक्षी
हर्षात गात वारा वाहे सुखावलेला
शब्दात भावनांना, बांधायचे कशाला
शब्दाविनाच सारी किमया मनी घडावी
शब्दाविना मनेही अपसूक ती जुळावी
जुळतात सूर तेव्हा बोलायचे कशाला
शब्दात भावनांना, बांधायचे कशाला