पप्पा सांगा कुणाचे....

पप्पा सांगा कुणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे
मम्मी सांगा कुणाची? मम्मी माझ्या पप्पांची IIधृII

इवल्या इवल्या घरट्यात
चिमणा चिमणी राहतात
चिमणाचिमणी अन भवती
चिमणी पिले ही चिवचिवती
पप्पा सांगा कुणाचे......II१II

आभाळ झेलती पंखांवरी
पप्पांना घरटे प्रिय भारी
चोचित चोचिने घास द्यावा
पिलांचा हळूच पापा घ्यावा
पप्पा सांगा कुणाचे...... II२II

पंखांशी पंख हे जुळताना
चोचित चोच ही मिळताना
हासती, नाचते घर सारे
हासती छप्पर भिंती दारे
पप्पा सांगा कुणाचे...... II३II

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

पाऊस कधीचा पडतो

पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली, दु:खाच्या मंद सुराने.

डोळ्यात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती
रक्ताचा उडला पारा, या नितळ उतरणीवरती.

पेटून कशी उजळेना, ही शुभ्र फुलांची ज्वाला
ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला.

संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा.

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

प्रिये पहा

प्रिये पहा, रात्रीचा समय सरुनि
येत उष:काल हा ॥ ध्रु ॥

थंडगार वात सुटत, दीपतेज मंद होत
दिग्वदने स्वच्छ करित, अरूण पसरि निज महा ॥ १ ॥

पक्षी मधुर शब्द करिति, गुंजारव मधुप वरिति
विरलपर्ण शाखि होति, विकसन ये जलरुहा ॥ २ ॥

सुखदु:खा विसरुनिया, गेले जे विश्व लया
स्थिति निज ती सेवाया, उठले की तेचि अहा ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

पाखरा जा

पाखरा जा दूर देशी
सांग माझा निरोप माझ्या साजणा

चैत्राचे चांदणे मला आज बोलावे
बोलण्यात त्याचिया भान पार मालवे
मी आज एकली साथ ना कुणाची
म्हणूनिच लाडक्या जा सांग ना, पाखरा जा

मैनेचे बोलणे मला आज आठवे
आठवात होई ग मन फार हळवे
प्रित आज हसली साथ ना मनाची
म्हणूनिच लाडक्या जा सांग ना, पाखरा जा

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

पाचोळे

काय कुणासी देऊ, कुणाचे घेऊ ?
वणवण भटके वनांतले, पाचोळे आम्ही वादळातले ॥ ध्रु ॥

कधी भरारी अथांग गगनी, न कळे केव्हा येतो अवनी
मोहपाश ना आम्हा कुणाचा, स्वैर आम्ही अपुले ॥ १ ॥

तरलो त्या प्रक्षुब्ध सागरी, आणि उतरलो दरी कपारी
वसुंधरेचे रुप अनामिक, तेहि दुरुन देखिले ॥ २ ॥

इतके असुनी अमुचे काही, वैर कुणाशी कसले नाही
कसेही असो, आम्ही मानतो, जीवन अमुचे भले ॥ ३ ॥

कुठे आमुची असते वसती, आस्थेने ना कोणी पुसती
अंध खलाशापरी आमुचे, जीवन नौकेतले. ॥ ४ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

परिकथेतील राजकुमारा

परीकथेतील राजकुमारा, स्वप्नी माझ्या येशील का ?
भाव दाटले मनी अनामिक, साद तयाना देशील का ॥ ध्रु ॥

या डॊळ्यांचे गूढ इशारे, शब्दावाचुन जाणुन सारे
राणी अपुली मला म्हणोनी, तुझियासंगे नेशील का ॥ १ ॥

मूर्त मनोरम मनी रेखिली, दिवसारात्री नित्य देखिली
त्या रुपाची साक्ष जिवाला, प्रत्याक्षातुन देशिल का ॥ २ ॥

लाजुन डोळे लवविन खाली, नवख्या गाली येईल लाली
फ़ूलापरी ही तनू कापरी, हृदयापाशी घेशील का ॥ ३ ॥

लाजबावरी मिटुन पापणी, साठवीन ते चित्र लोचनी
नवरंगी त्या चित्रामधले, स्वप्नच माझे होशिल का ॥ ४ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

पोटापुरता पसा पाहिजे

पोटापुरता पसा पाहिजे, नको पिकाया पोळी
देणार्‍याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी ॥ ध्रु ॥

हवाच तितुका पाडी पाउस देवा, वेळोवेळी
चोचीपुरता देवो दाणा, मायमाउली काळी
एका वितीच्या भूकेस पुरते, तळहाताची थाळी ॥ १ ॥

महालमाड्या नकोत नाथा, माथ्यावर दे छाया
गरजेपुरती देई वसने, जतन कराया काया
गोठवणारा नको कडाका, नको उन्हाची होळी ॥ २ ॥

सोसे तितुके देई, याहुन हट्ट नसे गा माझा
सौख्य देइ वा दु:ख ईश्वरा, रंक करी वा राजा
अपुरेपणाही नलगे, नलगे पस्तावाची पाळी ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

पंख हवे मज पोलादाचे

पंख हवे मज पोलादाचे
शूर लढाऊ जटायूचे

सीतेपरी जो हरण करोनी
असहाय अबला नेईल कोणी
काळझेप ती तिथे घालूनी
शील रक्षण्या स्त्रीजातीचे
पंख हवे मज पोलादाचे

नीजजननीला मुक्त कराया
गरूड मागता अमृत देवा
तुच्छे हासता इन्द्र तेधवा
वज्र तोडण्या त्या इन्द्राचे
पंख हवे मज पोलादाचे

गर्भपिलांना सागर गिळता
क्रोधे उठली पक्षीण टिटवी
जळा Pएटवी सागर आटवी
अगस्थ्याच्या सामर्थ्याचे
पंख हवे मज पोलादाचे

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

पाखरा गीत नको गाऊ

पाखरा गीत नको गाऊ
कातरवेळी आतूर जीवा वेध नको लावू...

शब्दाहून तव सूर बोलके
कानी येता काळीज चरके
विहराचे हे मुके हुंदके
सांग कशी साहू, गीत नको गाऊ...

रात्रंदिन जो जवळ असावा
आज कुठे तो प्राण विसावा
त्या प्रीतिच्या फसव्या गावा
नको पुन्हा नेऊ, गीत नको गाऊ...

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: