कंठातच रुतल्या ताना

कंठातच रुतल्या ताना, कुठें ग बाई कान्हा
कुणितरी जा, जा, जा, घेउनि या मोहना ॥ ध्रु ॥

कदंब फांद्यावरी बांधिला, पुष्पपल्लवगंधित झोला
कसा झुलावा परि हा निश्चल, कुंजविहारीविना ॥ १ ॥

थांबे सळसळ जशि वृक्षांची, कुजबुज सरली झणि पक्षांची
ओळखीचे स्वर कानि न येता, थबके ही यमुना ॥ २ ॥

मुरलीधर तो नसतां जवळी, सप्तस्वरांची मैफल कुठली
रासक्रिडेची स्वप्ने विरली, एका कृष्णाविना ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

कधी बहर कधी शिशिर

कधी बहर, कधी शिशिर परंतू, दोन्ही एक बहाणे
डोळ्यामधले आसू पुसती, ओठावरले गाणे ॥ १ ॥

बहर धुंद वेलीवर यावा, हळुच लाजरा पक्षी गावा
आणि अचानक गळुन पडावी, विखरुन सगळी पाने ॥ २ ॥

कातरवेळी मिठी जुळावी, पहाट कधि झाली न कळावी
भिन्न दिशांना झुरत फिरावे, नंतर दोन दिवाणे ॥ ३ ॥

हळुच फुलांच्या बिलगुनि गाली, नाजुक गाणी कुणी गायिली
आता उरली आर्त विराणी, सूरच केविलवाणे ॥ ४ ॥

जुळली हृदये, सूरहि जुळले, तूझे नि माझे गीत तरळले
कातरवेळी व्याकुळ डोळे, स्मरुन आता जाणे ॥ ५ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

कबीराचे विणतो शेले

कबीराचे विणतो शेले
कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम
भाबड्या या भक्तासाठी
देव करी काम ||धॄ||

एक एकतारी हाती, भक्त गाई गीत
एक एक धागा जोडी जानकीचा नाथ
राजा घनःश्याम
कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम ||१||

दास रामनामी रंगे, राम होइ दास
एक एक धागा गुंते, रूप ये पटांस
राजा घनःश्याम
कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम ||२||

विणून सर्व झाला शेला, पूर्ण होइ काम
ठाई ठाई शेल्यावरती, दिसे रामनाम
गुप्त होई राम
कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम ||३||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

कठीण कठीण

कठीण कठीण कठीण किती
पुरुष हृदय बाई
स्त्री जातिप्रति झटता
अंत कळत नाही

हृदयाचा सुंदरसा
गोफ गुंफिती
पदर पदर परी शेवटी
सुटत सुट्त जाई

रंगुनी रंगात मधुर
मधुर बोलति
हसत हसत फसवुनि
ह्रिदबंध तोडिती

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

केशवा माधवा

केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा ||

तुझ्या सारखा तूच देवा
तुला कुणाचा नाही हेवा
वेळोवेळी संकटातुनी तारिसी मानवा ||

वेडा होऊनी भक्तीसाठी
गोप गड्यांसह यमुनाकाठी
नंदाघरच्या गाई हाकीशी गोकुळी यादवा ||

वीर धनुर्धर पार्थासाठी
चक्र सुदर्शन घेऊनी हाती
रथ हाकुनिया पांडवांचा पळविशी कौरवा ||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

कशी करू स्वागता

कशी करू स्वागता
एकांताचा आरंभ कैसा
असते कशी सांगता ||

कशी हसू मी कैसी बोलू
किती गतीने कैसी चालू
धीटपणाने मीठी घालू का
कवळू तुजला सांग ||

फुलते कळी की फुलवी वारा
चंद्र हसवी की हसवी तारा
कुठले आधी कुठले नंतर
येईना सांगता ||

कुणी न पुढती कुणी न पाठी
घरात आहे मीच एकटी
प्रथम दर्शनी बोलायाचा
भाव तरी कोणता ||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

केतकीच्या वनी तिथे नाचला गं मोर

केतकीच्या वनी तिथे नाचला गं मोर
गहिवरला मेघ नभी सोडला गं घीर ||

पापणीत साचले अंतरात रंगले
प्रेमगीत माझिया मनामनात धुंदले
ओठावरी भिजला गं आसावला सूर ||

भावपुर्ण रात्रीच्या अंतरंगी डोलले
धुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले
डोळियात पाहिले रे कौमुदीत नाचले
स्वप्नरंग स्वप्नीच्या सुरासुरात थांबले
झाडावरी दिसला गं भारला चकोर ||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

काटा रुते कुणाला

काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी
मज फूलही रुतावे, हा दैवयोग आहे!
रुते कुणाला...

सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची?
चिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे
रुते कुणाला...

काही करू पहातो, रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही विपरित होत आहे
रुते कुणाला...

हा स्नेह, वंचना ती, काहीच आकळेना
आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे
रुते कुणाला...

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

काल पाहिले मी स्वप्न गडे

काल पाहिले मी स्वप्न गडे
नयनी मोहरली गं आशा
बाळ चिमुकले खुदकन हसले
मी ही हसले, हसली आशा

भाग्यवतीचे भाग्य उजळले
कुणीतरी गं मला छेडिले
आणि लाजले, हळूच वदले
रंग सावळा तो कृष्ण गडे

इवली जिवणी इवले डोळे
भुरुभुरु उडती केसही कुरळे
रुणुझुणु रुणुझुणु वाजती वाळे
स्वप्नी ऐकते तो नाद गडे

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

कोन्यात झोपली सतार ( जोगिया )

कोन्यांत झोपली सतार, सरला रंग,
पसरली पैंजणें सैल टाकुनी अंग,
दुमडला गालिचा, तक्के खुकले खालीं
तबकांत राहिले देठ, लवंगा, सालीं.

झुंबरीं निळ्या दीपांत ताठली वीज
कां तुला कंचनी, अजुनी नाहीं नीज?
थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठीं
तें डावलुनी तूं दार दडपिलें पाठी.

हळुवार नखलिशी पुनः मुलायम पान,
निरखिसी कुसर वर कलती करुनि मान
गुणगुणसि काय तें? - गौर नितळ तव कंठी -
स्वरवेल थरथरे, फूल उमलतें ओठी.

साधतां विड्याचा घाट उमटली तान,
वर लवंग ठसतां होसि कशी बेभान?
चित्रांत रेखितां चित्र बोलले ऐने,
"कां नीर लोचनीं आज तुझ्या गे मैने?"

त्या अधरफुलांचे ओले मृदुल पराग-
हालले, साधला भावस्वरांचा योग,
घमघमे, जोगिया दंवांत भिजुनी गातां
पाण्यांत तरंगे अभंग वेडी गाथा.

"मी देह विकुनियां मागुन घेतें मोल,
जगवितें प्राण हे ओपुनिया 'अनमोल',
रक्तांत रुजविल्या भांगेच्या मीं बागा,
ना पवित्र देहीं तिळाएवढी जागा.

शोधीत एकदां घटकेचा विश्राम
भांगेंत पेरुनी तुळस परतला श्याम,
सांवळा तरुण तो खराच ग वनमाली
लावितें पान.... तों निघून गेला खालीं.

अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव,
पुसलेहि नाहिं मीं मंगल त्याचें नांव;
बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी
'मम प्रीती आहे जडली तुजवर राणी !'

नीतिचा उघडला खुला जिथें व्यापार
बावळा तिथें हा इष्कां गणितो प्यार ;
हांसून म्हणाल्ये, 'दाम वाढवा थोडा...
या पुन्हां, पान घ्या...', निघून गेला वेडा!

राहिलें चुन्याचें बोट, थांबला हात,
जाणिली नाही मी थोर तयाची प्रीत,
पुन:पुन्हां धुंडितें अंतर आतां त्याला
तो कशास येइल भलत्या व्यापाराला?

तो हाच दिवस हो, हीच तिथी, ही रात
ही अशीच होत्यें बसलें परि रतिक्लांत,
वळुनी न पाहतां, कापित अंधाराला
तो तारा तुटतो - तसा खालती गेला.

हा विडा घडवुनी करितें त्याचें ध्यान,
त्या खुळ्या प्रीतिचा खुळाच हा सन्मान;
ही तिथी पाळितें व्रतस्थ राहुनि अंगे
वर्षांत एकदा असा 'जोगिया' रंगे."

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: