अरे संसार संसार

अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके
तव्हां मियते भाकर ॥ १ ॥

अरे संसार संसार
खोटा कधी म्हनू नही
राउळाच्या कयसाले
लोटा कधी म्हनू नही ॥ २ ॥

अरे संसार संसार
नही रडनं कुढनं
येड्या गयांतला हार
म्हनू नको रे लोढनं ॥ ३ ॥

अरे संसार संसार
खीरा येलावरचा तोड
एका तोंडामधी कडू
बाकी अवघा लागे गोड ॥ ४ ॥

अरे संसार संसार
म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल
मधी गॊडंब्याचा ठेवा ॥ ५ ॥

देखा संसार संसार
शेंग वरतून काटे
अरे वरतून काटे
मधी चिकने सागरगोटे ॥ ६ ॥

ऐका संसार संसार
दोन जीवांचा विचार
देतो दु:खाले होकार
अन सुखाले नकार ॥ ७ ॥

देखा संसार संसार
दोन्ही जीवांचा सुधार
कधी नगद उधार
सुखादु:खाचा बेपार ॥ ८ ॥

अरे संसार संसार
असा मोठा जादूगर
माझ्या जीवाचा मैतर
त्याच्यावरती मदार ॥ ९ ॥

अरे संसार संसार
आधी देवाचा ईसार
माझ्या दैवाचा जोजार
मग जीवाचा आधार ॥ १० ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

अजुनी रुसुनी आहे

अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ, की पापणी हले ना ॥ ध्रु ॥

मी हास सांगताच, रडताही तू हसावे
ते आज का नसावे, समजावणी पटेना
धरिला असा अबोला, की बोल बोलवेना ॥ १ ॥

का भावली मिठाची, अश्रूत होत आहे
विरणार सागरी ह्या, जाणून दूर राहे ?
चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना
मिटवील अंतराला, ऐसी मिठी जुटे ना ॥ २ ॥

की गूढ काहि डाव, वरचा न हा तरंग
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ?
रुसवा असा कसा हा, ज्या आपुले कळेना ?
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

अत्तराचा फाया

अत्तराचा फ़ाया तुम्ही, मला आणा राया ॥ ध्रु ॥

विरहाचे ऊन बाई
देह तापवून जाई
धरा तुम्ही माझ्यावरी, चंदनाची छाया ॥ १ ॥

नाही आग, नाही धग
परी होई तगमग
विस्तवाशिवाय पेटे, कापराची काया ॥ २ ॥

सुगंधाने झाले धुंद
जीव झाला ग बेबंद
देहभान मी विसरावे, अशी करा माया ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

अर्थशून्य भासे मज हा

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा
धर्म, न्याय, नीती सारा खेळ कल्पनेचा ||

द्यास एक हृदयी धरुनी स्वप्नं रंगवावे
वीज त्यावरी पडुनी शिल्प कोसळावे
सर्वनाश एकच दिसतो नियम हा जगाचा ||

दैव ज्यास लाभे त्याला लाभ वैभवाचा
दैवकोप येता भाळी सर्वनाश त्याचा
वाहणे प्रवाहावरती धर्म एक याचा ||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

अपुरे माझे स्वप्न राहिले

अपुरे माझे स्वप्न राहिले
का नयनांनो जागे केले?

ओळख तुमची सांगुन स्वारी
आली होती माझ्या दारी
कोण हवे हो म्हणता त्यांना
दटावून मज घरात नेले

बोलत बसता वगळून मजला
गुपीत चोरटे ऐकू कशाला?
जाण्याचे ते करुनी बहाणा
गुपचुप माझ्या मनात लपले

नीज सुखाची तुम्हां लागली
मंद पाऊली स्वारी आली
गोड खळीने चहाडी केली
अधरांसी नच बोलू दिले

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

अखेरचे येतिल माझ्या

अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतिल केल्या, केली पण प्रीती

इथे सुरु होण्याआधी संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते डोळ्यांतिल पाणी
जखम उरी होते ज्यांच्या तेच गीत गाती

सर्व बंध तोडुनि जेव्हा नदी धुंद धावे
मीलन वा मरण पुढे हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती

गंध दूर ज्याचा आणिक जवळ मात्र काटे
असे फूल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे
तरी गंध धुंडित धावे जीव तुझ्यासाठी

आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी
गूज अंतरीचे कथिले तुला या स्वरांनी
डोळ्यांतुन माझ्यासाठी लाव दोन ज्योती

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

अजुन नाही जागी राधा

अजुन नाही जागी राधा
अजुन नाही जागे गोकुळ
अशा अवेळी पैलतिरावर
आज घुमे का पावा मंजुळ ॥ १ ॥

मावळतीवर चंद्र केशरी,
पहाटवारा भवती भणभण
अर्ध्या पाण्यामधे उभी ती
तिथेच टाकून आपुले तनमन ॥ २ ॥

विश्वच अवघे ओठा लावुन
कुब्जा प्याली तो मुरलीरव
डॊळ्यामधले थेंब सुखाचे
हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: