सागरा प्राण तळमळला

ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला ॥ धॄ ॥

भूमातेच्या चरणतला तुज धुता, मी नित्य पाहिला होता
मज वदलासी, अन्य देशि चल जाउ, सृष्टिची विविधता पाहू
तइ जननीह्द विरहशंकितही झाले, परि तुवा वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पॄष्ठी वाहीन, त्वरित या परत आणिन
विश्वसलो या तव वचनी मी, जगदनुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्ति उद्धरणी मी, येईन त्वरे कथुनि सोडले तिजला ॥ १ ॥

शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहुं यापुढती, दशदिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृ़क्षवत्सलता रे, नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बालगुलाबहि आता रे. फुलबाग मला हाय पारखा झाला ॥ २ ॥

नभी नक्षत्रे बहुत एक प्रिय प्यारा, मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परि मज भारी, आइची झोपडी प्यारी
तिजविण नको राज्य, मज प्रिय साचा, वनवास तिचा जरि वनीचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे, बहु जिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे, तदविरहाची शपथ घालितो तुजला ॥ ३ ॥

या फेनमिषे हंससि निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते, भिउनी का आंग्लभूमीते
मम मातेला अबल म्हणुनि फसवीसी, मज विवासनाते देशी
तरी आंग्लभुमि भयभीता रे, अबला न माझि ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला ॥ ४ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

विकत घेतला श्याम

नाही खर्चिली कवडीदमडि, नाही वेचला दाम
बाइ, मी विकत घेतला श्याम ॥ ध्रु ॥

कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी
जन्मभरीच्या श्वासाइतुके मोजियले हरिनाम ॥ १ ॥

बाळ गुराखी यमुनेवरचा, गुलाम काळा संताघरचा
हाच तुक्याचा विठ्ठ्ल आणि दासाचा श्रीराम ॥ २ ॥

जितके मालक, तितकी नावे, ह्रूदये तितकी, याची गावे
कुणी न ओळखी तरीही, याला दीन, अनाथ, अनाम ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

निळासावळा नाथ

निळासावळा नाथ, तशी ही
निळीसावळी रात
कोडे पडते तुला शोधिता
कृष्णा अंधारात ॥ ध्रु ॥

तुडवुनि वन धुंडुनि नंदनवन
शोधुनि आले अवघे त्रिभुवन
एक न उरले गोपींचे घर
हाकेच्या टप्प्यात ॥ १ ॥

नील जली यमुनेच्या साची
होडि सोडिली मी देहाची
गवसलाच ना परि तू कान्हा
लाटांच्या रासात ॥ २ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

नाच रे मोरा ......

नाच रे मोरा अंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच.... IIधृII

ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच....
नाच रे मोरा नाच.... II१II

झरझर धार झरली रे, झाडांची भिजली इरली रे
पावसात न्हाऊं, काहीतरी गाऊ
करून पुकारा नाच....
नाच रे मोरा नाच.... II२II

थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत खेळ खेळू दोघात
निळ्या सौंगड्या (सवंगड्या) नाच....
नाच रे मोरा नाच.... II३II

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

नरवर कृष्णासमान

नरवर कृष्णासमान
घेतसे जन्मा
भाग्य उदेले
शिकवी सुकर्मा

बहुत नृपति ते
आले गेले
परि मनाला
यदुवर हा
झाला मंत्र महान

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: