अभंग

हाचि नेम आता

हाचि नेम आता न फिरे माघारी
बैसले शेजारी गोविंदाचे

घररिधी झाले पट्टराणी बळे
वरिले सावळे परब्रह्म

बळियाचा अंग संग जाला आता
नाही भय चिंता तुका म्हणे

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

आता तरी पुढे हाच उपदेश

आता तरी पुढे हाच उपदेश
नका करू नाश आयुष्याचा ॥धृ॥
सकळाच्या पाया माझे दंडवत
आपुलाले चित्त शुद्ध करा ॥१॥
हित ते करावे देवाचे चिंतन
करुनिया मन शुद्ध भावे ॥२॥
तुका म्हणे हित होय ती व्यापार
करा काय फार शिकवावे॥३॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ

हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ
तेणे मायाजाळ तुटतील
आणिक नका पडू गाबाळाचे भरी
तेथे आहे थोरी नागवण
भावे तुळसी दळ पाणी जोडा हात
म्हणावे पतीत वेळोवेळा
तुका म्हणे हा तव कृपेचा सागर
नामासाठी पार पाववील

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

ॐकार स्वरूपा

ॐकार स्वरूपा, सद्गुरू समर्था
अनाथाच्या नाथा, तुज नमो
तुज नमो, तुज नमो, तुज नमो ॥१॥

नमो मायबापा, गुरुकृपाघना
तोडी या बंधना मायामोहा
मोहोजाळ माझे कोण नीरशील
तुजविण दयाळा सद्गुरुराया ॥२॥

सद्गुरुराया माझा आनंदसागर
त्रैलोक्या आधार गुरुराव
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश
ज्यापुढे उदास चंद्र-रवि
रवि, शशी, अग्नि, नेणती ज्या रूपा
स्वयंप्रकाशरूपा नेणे वेद ॥३॥

एका जनार्दनी, गुरू परब्रम्ह
तयाचे पैनाम सदामुखी ॥४॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

ॐ नमोजी आद्या

ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥

देवा तूंचि गणेशु । सकळमति प्रकाशु ॥
म्हणे निवृत्ति दासु । अवधारिजो जी ॥२॥

अकार चरण युगुल । उकार उदर विशाल ॥
मकार महामंडल । मस्तकाकारें ॥३॥

हे तिन्ही एकवटले । तेथें शब्द्ब्रम्ह कवळलें ॥
ते मियां श्रीगुरुकृपें नमिलें । आदिबीज ॥४॥

आतां अभिनव वाग्विलासिनी । जे चातुर्यार्थ कलाकामिनी ॥
ते श्रीशारदा विश्वमोहिनी । नमिली मीयां ॥५॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

ॐकार प्रधान रूप गणेशाचे

ॐकार प्रधान रूप गणेशाचे
हे तीन्ही देवांचे जन्म स्थान ||

अकार तो ब्रम्हा उकार तो विष्णु
मकार महेश जाणियेला ||

ऐसे तीन्ही देव देखोनी उत्पन्न
तो हा गजानन मायबाप ||

तुका म्हणे ऐसी आहे वेद वाणी
पहावी पुराणी व्यासाचिया ||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

खेळ मांडीयेला

खेळ मांडीयेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे ।
क्रोध अभिमान गेला पावटणी, एकएका लागतील पायी रे ॥१॥

नाचती आनंद कल्लोळा पवित्र गाणे वनमाळी रे ।
कळी कामावरी घातली काम एक एकाहुनी बळी रे ॥२॥

गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा रे ।
टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव, अनुपम्य सुखसोहळा रे ॥३॥

लुब्धली नादी लागली समाधी मुढजन नारी लोका रे ।
पंडीत ज्ञानी योगी महनुभव एकची सिद्ध साधका रे ॥४॥

वर्ण अभिमान विसरली याती, एकेका लोटांगणी जाती रे ।
निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर सुटती रे ॥५॥

होतो जयजयकार गर्जत अंबर, मातले हे वैष्णव वीर रे ।
तुका म्हणे सोपी केली पायवाट, उतरावया भवसागर रे ॥६॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: