जेव्हा शवपेट्या नाचू लागतात......

बार्बेडोस!

वेस्ट इंडीज द्वीपसमूहातील हा एक छोटासा बेटवजा देश. जेमतेम २१ मैल लांब आणि १४ मैल रुंद असलेलं हे बेट उत्तर अटलांटिक महासागराच्या पश्चिम भागात विनवर्ड बेटं आणि कॅरेबियन समुद्राच्या पूर्वेला सुमारे १०० मैलांवर आहे. क्रिकेटच्या दुनियेत 'केन्सिंग्टन ओव्हल' हे ब्रिजटाऊनमधील मैदान सुप्रसिद्ध आहे. 'थ्री डब्ल्यूज' या नावाने ओळखले जाणारे फ्रँक वॉरेल, क्लाईड वॉलकॉट आणि एव्हर्टन वीक्स, सर्वश्रेष्ठ ऑलराऊंडर गॅरी सोबर्स, गॉर्डन ग्रिनीज आणि जगभरातील बॅट्समनना धडकी भरवणारे वेस हॉल, चार्ली ग्रिफिथ, माल्कम मार्शल आणि 'बिग बर्ड' जोएल गार्नर हे सर्व जण बार्बेडोसचेच!

'बर्म्युडा ट्रायँगल' या गूढ प्रदेशाला लागून असल्याने बार्बेडोसमधील ब्रिजटाऊन बंदरात बर्म्युडा ट्रायँगलमध्ये गायब झालेल्या अनेक बोटींची नोंद आहे. यांपैकी सर्वात प्रसिद्ध म्हणजे 'यूएस्एस् सायक्लॉप्स'. अमेरिकन नौदलाचं हे जहाज बार्बेडोसहून ४ मार्च १९१८ रोजी बाल्टीमोरच्या दिशेने निघाल्यावर ३०६ खलाशी आणि नौसैनिकांसह कोणताही मागमूस न ठेवता बर्म्युडा ट्रायँगलमध्ये गडप झालं!

बार्बेडोसवरील ऑइस्टीन्स, क्राईस्टचर्च या भागात एक चर्च आहे. या चर्चच्या मागील दफनभूमीत एक स्वतंत्र तळघर आहे. बारा फूट लांब आणि सहा फूट रुंदीचं हे तळघर दगडांतून कोरून काढलेलं आहे. तळघराच्या भिंती आणि वरचं छत हे दोन फुटांपेक्षा जास्त जाडीच्या दगडांचं बनलेलं आहे. व्हॉल्ट्मध्ये शिरणारं प्रवेशद्वार सुमारे हजार पौंडांच्या जड शिळेने बंद केलेलं होतं. ही शिळा उचलण्यासाठी किमान आठ ते दहा माणसे आणि बांबूची तरफ लागत असे.

2014HDA_ShavapeTyanachulagtat_ChristParishChurch.jpg
क्राईस्टचर्च पॅरिश

जेम्स इलियटने या तळघराची उभारणी केली होती. १४ मे १७९२ रोजी इलियटची पत्नी एलिझाबेथ हिचा मृत्यू झाल्यावर तिचं इथे दफन करण्यात आलं.

काही वर्षांनी या व्हॉल्टची मालकी वॉरलॉर्ड कुटुंबाकडे आली. वॉरलॉर्ड कुटुंबातील मिसेस थॉमसिना गॉडर्ड हिचा १८०७मध्ये मृत्यू झाल्यावर तिची शवपेटी ठेवण्यासाठी व्हॉल्ट उघडण्यात आला.

... आणि व्हॉल्टने आपली पहिली चुणूक दाखवली!

एलिझाबेथ इलियटची शवपेटी व्हॉल्टमधून गायब झालेली होती!
तिच्या शवपेटीचा कुठेही मागमूस नव्हता!

हा प्रकार पाहून सर्वजण बुचकळ्यात पडले. सरकारी अधिकार्‍यांनी बरीच चौकशी केली, परंतु ती निष्फळच ठरली.

या व्हॉल्टची मालकी पुढे चेज कुटुंबियांकडे आली. तेव्हापासून हा व्हॉल्ट 'चेज व्हॉल्ट' याच नावाने ओळखला जाऊ लागला.

२२ जानेवारी १८०८ रोजी चेज कुटुंबातील दोन वर्षांच्या मेरी अ‍ॅन चेजचा मृत्यू झाला. तिची शवपेटी ठेवण्यासाठी व्हॉल्ट उघडण्यात आला. आणखी चार वर्षांनी तिची मोठी बहीण डॉर्कस चेज मरण पावली. आपल्या बापाच्या त्रासाला कंटाळून, अन्नपाणी वर्ज्य करून तिने मृत्यूला कवटाळलं होतं अशी तेव्हा वदंता होती. ६ जुलै १८१२ रोजी डॉर्कसची शवपेटी चेज व्हॉल्टमध्ये ठेवण्यात आली.

डॉर्कसचा बाप कर्नल थॉमस चेजबद्दल कोणीही चांगलं बोलत नव्हतं. तो अत्यंत क्रूर आणि हडेलहप्पी माणूस होता. डॉर्कसच्या मृत्यूनंतरतर जवळपास सर्वांनीच त्याला वाळीत टाकलं होतं. हा ताण असह्य झाल्याने महिन्याभरातच त्याने आत्महत्या केली.

पुन्हा एकदा चेज व्हॉल्ट उघडण्यात आला. प्रवेशद्वारावरील प्रचंड शिळा बाजूला केल्यावर निग्रो गुलाम आत उतरले. आतल्या अंधाराला डोळे सरावल्यावर दिसलेलं दृश्य पाहून सर्वजण मोठमोठ्याने ओरडत धावतच बाहेर आले...

क्राईस्टचर्चचा धर्मगुरू रेव्हरन्ड थॉमर्स ऑर्डरसन याने कामगारांच्या भीतीचं कारण जाणून घेण्यासाठी व्हॉल्टमध्ये प्रवेश केला आणि तिथला प्रकार पाहून आश्चर्याने थक्क झाला...

मेरी अ‍ॅन चेजची शवपेटी वेगळ्याच कोपर्‍यात 'खाली डोकं वर पाय' अशा अवस्थेत चक्क उभी होती!
डॉर्कसची शवपेटी भिरकावून दिल्याप्रमाणे एका टोकाला उलटी पडलेली होती. थॉमसिना गॉडर्डची शवपेटी भिंतीवर रेलून ठेवलेल्या अवस्थेत होती!

हा अकल्पित प्रकार पाहून रेव्हरन्ड ऑर्डरसन व्हॉल्टच्या बाहेर आला आणि त्याने त्या निग्रो मजुरांना फैलावर घेण्यास सुरूवात केली.

"या वास्तूचं पावित्र्य कोणी भंग केलं? तुमच्यापैकी कोणी हा उद्योग केला आहे?"

भीतीने थरथरत असलेल्या बिचार्‍या निग्रोंवर रेव्हरन्ड ऑर्डरसनने बरीच आगपा़खड केली, परंतु आपल्याला यातील काहीही माहीत नाही असं सर्वांनी शपथपूर्वक सांगितलं. व्हॉल्टची त्यांना अशी काही दहशत बसली होती, की कितीही प्रलोभनं दाखवली, कठोर शिक्षा देण्याची धमकी दिली तरी आत पाऊल टाकण्यास त्यांनी साफ नकार दिला.

रेव्हरन्ड ऑर्डरसन आणि इतरांनी व्हॉल्टमध्ये शिरुन बारकाईने पाहणी केली. एकही शवपेटी उघडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला दिसत नव्हता. मुळात पाचशे पौंडांची शिळा उचलण्यास कमीतकमी आठ-दहा माणसं लागत होती. एकट्यादुकट्या माणसाला हे काम निव्वळ अशक्य होतं. शिवाय चोरी करण्यासारखं व्हॉल्टमध्ये काही नव्हतंच.

अखेर मेरी चेज, डॉर्कस चेज आणि गॉडर्ड यांच्या शवपेट्या नीट शेजारी-शेजारी मांडून ठेवण्यात आल्या. थॉमस चेजची २४० पौंड वजनाची शिशापासून बनलेली शवपेटीही आत ठेवण्यात आली आणि व्हॉल्ट बंद करण्यात आला. रेव्हरन्ड ऑर्डरसनने शवपेट्या ठेवलेल्या जागा आणि व्हॉल्टचं रेखाचित्रं काढून घेतलं होतं.

HDA2014_blackseparator.jpg

चार वर्षांनी, १८१६मध्ये ११ वर्षांचा सॅम्युएल चार्ल्स एम्स मरण पावला. त्याची शवपेटी ठेवण्यासाठी २५ सप्टेंबरला व्हॉल्ट उघडल्यावरही पुन्हा पूर्वीचाच प्रकार झालेला दृष्टीस पडला!

थॉमस चेजची २४० पौंड वजनाची अवजड शवपेटी हलवण्यासही पाच-सहा माणसे लागत होती, ती शवपेटी एका कोपर्‍यात फेकली गेली होती!
मेरी आणि डॉर्कस चेज यांच्या शवपेट्याही वेड्यावाकड्या पसरलेल्या होत्या.
मिसेस गॉडर्डची लाकडी शवपेटी मात्र आपल्या जागेवरुन तसूभरही हलल्याचं दिसत नव्हतं!

त्यावेळी गुलामांच्या बंडांचं पेव फुटलं होतं. अशाच एका बंडात सॅम्युएलच्या वडिलांचा - सॅम्युएल सीनियर यांचा खून पडला होता. त्यांचं प्रेत दुसरीकडे तात्पुरतं पुरण्यात आलं होतं. बंडाचा जोर ओसरल्यावर ५२ दिवसांनी त्यांना चेज व्हॉल्टमध्ये पुरण्यासाठी आणण्यात आलं.

यावेळी व्हॉल्ट उघडण्यापूर्वी बारकाईने तपासणी करण्यात आली. व्हॉल्टमध्ये बाहेरून शिरण्यास एखादी चोरवाट आहे का याचा शोध घेण्यात आला. मात्र तशी कोणतीही चोरवाट आढळली नाही. व्हॉल्टमध्ये बाहेरुन पाणी झिरपण्याच्या शक्यतेचाही शोध घेण्यात आला, परंतु त्यातूनही काही निष्पन्न झालं नाही.

व्हॉल्ट उघडल्यावर अपेक्षेप्रमाणे शवपेट्यांची इतस्ततः हालचाल झालेली नजरेस पडली.

थॉमस चेजची जड शवपेटी वेगळ्याच ठिकाणी फेकली गेली होती!
सॅम्युएल चार्ल्स एम्स आणि मेरी चेजच्या शवपेट्या उलट्यापालट्या झालेल्या होत्या.
डॉर्कस चेजची शवपेटी मिसेस गॉडर्डच्या शवपेटीवर रेलून ठेवल्यासारखी पडली होती.
मिसेस गॉडर्डची शवपेटी जागेवरून हलली नव्हती, परंतु त्या लाकडी शवपेटीची एक बाजू निखळली होती आणि आतून मिसेस गॉडर्डचा सापळा डोकावत होता!

यावेळी गुलामांच्या बंडाचा जोर असल्याने त्यांच्यावरच संशय व्यक्त करण्यात आला, परंतु हे एकट्यादुकट्या गुलामाचं काम असणं अशक्यच होतं. व्हॉल्टमध्ये कोणतीही लुटालूट करण्याचा प्रयत्न करण्यात आला नव्हता!

हा काहीतरी वेगळाच प्रकार असावा अशी तिथल्या गोर्‍या अधिकारी वर्गाला शंका येऊ लागली. यावेळी व्हॉल्ट बंद करण्यापूर्वी गव्हर्नर लॉर्ड कंबरमिअर, रेव्हरन्ड ऑर्डरसन आणि एक मॅजिस्ट्रेट यांनी व्हॉल्टची कसून पाहणी केली. व्हॉल्टमधे उतरुन आत येण्यास एखादी चोरवाट आहे का याचा शोध घेण्यात आला. व्हॉल्टमध्ये कुठे पाणी झिरपण्याची शक्यता आहे का याची पुन्हा तपासणी करण्यात आली, परंतु कोणतीही चोरवाट आढळून आली नाही. व्हॉल्ट पूर्णत: जलाभेद्य होता.

मिसेस गॉडर्डची शवपेटी तारांनी गुंडाळण्यात आली. व्हॉल्ट बंद करण्यात आला. व्हॉल्ट बंद करणार्‍या अवजड शिळेभोवतीच्या फटीत सिमेंट भरण्यात आले. गव्हर्नर लॉर्ड कंबरमिअरने व्हॉल्टवर आपलं सील ठोकलं.

एव्हाना चेज व्हॉल्टमधील घटनांबद्दल इतकी उलटसुलट माहिती पसरली होती, की चेज कुटुंबात पुढचा मृत्यू कधी होतो आणि व्हॉल्ट उघडला जातो अशी विचित्र उत्सुकता अनेकांना लागून राहीली होती. मात्र त्यासाठी फार काळ वाट पाहवी लागली नाही! चेज कुटुंबातील थॉमसिना क्लर्क १८१९मध्ये मरण पावली.

१७ जुलै १८१९ या दिवशी लॉर्ड कंबरमिअर, रेव्हरन्ड ऑर्डरसन यांच्यासह कित्येक लोक व्हॉल्टजवळ आले. लॉर्ड कंबरमिअरने व्हॉल्टची तपासणी केली. त्याने लावलेलं सील तोडण्याचा कोणताही प्रयत्न झालेला दिसत नव्हता. व्हॉल्ट बंद करणार्‍या शिळेभोवतीचं सिमेंटही तसंच शाबूत होतं. बारकाईने सर्व गोष्टींची पाहणी केल्यावर व्हॉल्ट उघडण्याचा हुकूम देण्यात आला.

बांबूची तरफ, दोरखंड यांच्या साहाय्याने आठ-दहा माणसांनी ती शिळा हलवण्यास सुरुवात केली, परंतु कित्येक तास प्रयत्न करून ती शिळा तसूभरही हलेना! कोणतीतरी अज्ञात शक्ती व्हॉल्टच्या आतून प्रतिकार करत होती जणू!!! अथक प्रयत्नांती ती शिळा दूर करण्यास मजूरांना यश आलं.

व्हॉल्टच्या आतली परिस्थिती अपेक्षेप्रमाणेच होती.

थॉमस चेजची अवजड शवपेटी - जी हलवण्यास कमीतकमी पाच-सहा माणसे लागत असत, उभीच्या उभी व्हॉल्टच्या दारावर अडकली होती!
सॅम्युएल एम्स, मेरी आणि डॉर्कस चेजच्या शवपेट्या इतस्ततः फेकल्या गेल्या होत्या.
सॅम्युएल सीनियरची शवपेटी एका कोपर्‍यात उभी होती!
मिसेस गॉडर्डची लाकडी शवपेटी मात्रं आपल्या जागेवरुन हलली नव्हती!

सर्व शवपेट्या बाहेर काढण्यात आल्या. एकही शवपेटी उघडण्याचा अथवा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचं आढळून येत नव्हतं. संपूर्ण व्हॉल्टची आतून-बाहेरून कसून तपासणी करण्यात आली. व्हॉल्टच्या दगडी जमीनतून आत येण्याचा एखादा गुप्त मार्ग आहे का तसेच पाणी झिरपण्यासाठी एखादी फट आहे का याचीही बारकाईने पाहणी करण्यात आली, परंतु काही आढळून आलं नाही.

लॉर्ड कंबरमिअर शाही घोडदळातील निष्णात अधिकारी होता. त्याने शास्त्रोक्त पद्धतीने व्हॉल्टचा बंदोबस्त करण्याचा निश्चय केला.

व्हॉल्टच्या दगडी जमिनीवर पांढरी पावडर पसरण्यात आली. प्रत्येक शवपेटीचं मोजमाप घेण्यात आलं. व्हॉल्टचा एक नकाशा तयार करुन प्रत्येक शवपेटी ठेवलेल्या जागेची त्यात नोंद करण्यात आली. व्हॉल्ट बंद केल्यावर शिळेभोवतीच्या फटीत पुन्हा सिमेंट ओतण्यात आलं. सिमेंट वाळण्यापूर्वी लॉर्ड कंबरमिअरने आपली गव्हर्नरची अधिकारमुद्रा त्यावर उमटवली. उपस्थित असलेल्या अधिकार्‍यांनीही आपापल्या मुद्रा सिमेंटवर उमटवून घेतल्या. अनेक लोकांनीही आपापल्या खुणा केल्या. व्हॉल्टवर २४ तास पहारा ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली.

चेज व्हॉल्टमधील घटनांचा इतका गवगवा झाला होता, की बार्बेडोसमध्ये येणार्‍या जहाजांवरील खलाशीही उत्सुकतेने व्हॉल्ट कधी उघडला जातो याची चौकशी करू लागले होते. व्हॉल्ट उघडण्यासाठी चेज कुटुंबात कधी मृत्यू होतो याची सर्वजण वाट पाहत होते जणू!

आठ महिन्यांत लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर गव्हर्नर कंबरमिअर आणि इतर अधिकार्‍यांनी व्हॉल्ट उघडून पाहण्याचा निर्णय घेतला!

गव्हर्नर कंबरमिअर, रेव्हरन्ड ऑर्डरसन, इतर अधिकारी आणि शेकडो लोक व्हॉल्टपाशी जमले. सिमेंटवर उमटवलेल्या सर्व अधिकारमुद्रा सुरक्षित असल्याची खात्री करण्यात आली. नंतर सिमेंट काढून बांबू आणि दोरखंडांच्या साहाय्याने व्हॉल्टवरील अवजड शिळा दूर करण्यात आली.

कंबरमिअर आणि त्याच्या सहकार्‍यांनी आत जाऊन पाहणी केली असता पूर्वीप्रमाणेच शवपेट्यांची हालचाल झाल्याचं दिसून आलं!

थॉमस चेजची शवपेटी एका कोपर्‍यात उभी होती!
त्याच्या बरोबर समोर डॉर्कस चेजची शवपेटी खाली डोकं वर पाय अश्या अवस्थेत उभी होती!
मेरी चेजची शवपेटी सॅम्युएल एम्सच्या शवपेटीवर अर्थवट टेकलेल्या अवस्थेत होती.
थॉमसिना क्लार्क आणि सॅम्युएल सीनियर यांच्या शवपेट्या एकमेकांशी काटकोन करुन पडल्या होत्या.
मिसेस गॉडर्डच्या चिरविश्रांतीत मात्र तसूभरही व्यत्यय आलेला नव्हता!

व्हॉल्टच्या जमिनीवर पसरलेल्या पावडरवर एकही ठसा आढळून आला नाही!

गव्हर्नर कंबरमिअरने चेज व्हॉल्टपुढे हात टेकले! त्याने सर्व शवपेट्या व्हॉल्टमधून बाहेर काढून इतरत्र दफन करण्याची आज्ञा केली.

चेज व्हॉल्ट तसाच उघडा ठेवण्यात आला!
गेल्या १९० वर्षांत तिथे कोणाचंही दफन करण्यात आलेलं नाही!

आजही बार्बेडोसमधील क्राईस्ट चर्चच्या परिसरात चेज व्हॉल्ट तसाच उघडा आहे!

HDA2014_blackseparator.jpg

चेज व्हॉल्टमधील घटनांचं स्पष्टीकरण देण्याचा अनेकांनी प्रयत्न केला.

यांपैकी पुढे आलेला एक तर्क म्हणजे व्हॉल्टमध्ये झिरपलेल्या पाण्यामुळे शवपेट्या हलत असाव्यात. परंतु व्हॉल्ट जलाभेद्य असल्याचं अनेकदा सिद्ध झालं होतं. पाणी झिरपलं असतंच तर सर्वप्रथम मिसेस गॉडर्डची लाकडी शवपेटी हलली असती. परंतु अगदी सुरवातीला १८१२चा अपवाद वगळता ती एकदाही जागेवरुन हलली नव्हती. तसंच व्हॉल्टमध्ये पाणी घुसलं असतंच तर जमिनीवर पसरलेली पावडर धुऊन जायला हवी होती, पण तसं घडलं नव्हतं.

भूगर्भातील हालचालींमुळे किंवा भूकंपामुळे शवपेट्या हलल्या असाव्यात असाही तर्क मांडण्यात आला. परंतु त्याच दफनभूमीतील दुसर्‍या एकाही व्हॉल्टमधील एकही शवपेटी त्या कालावधीत आपल्या जागेवरुन हललेली आढळून आली नव्हती.

मानवी हस्तक्षेपाची शक्यताही जवळपास नव्हतीच. व्हॉल्ट बंद करणारी शिळा उचलण्यासाठी कमीत कमी आठ-दहा माणसं आणि बांबू, दोरखंड असं साहित्य लागत होतं. त्याचप्रमाणे आत शिरण्यास कोणतीही चोरवाट नव्हती. आतील पावडरीवर कोणाच्याही पावलांचा ठसा आढळून आला नाही.

शेरलॉक होम्सचे जनक सर ऑर्थर कॉनन डॉयल यांनी एक निराळाच तर्क मांडला. त्यांच्या तर्कानुसार या सर्व घटनांमागे डॉर्कस चेज आणि थॉमस चेज यांच्या आत्मांचा हात होता! डॉर्कस आणि थॉमस या दोघांनी आत्महत्या केल्याने त्यांचे आत्मे अत्रुप्तावस्थेत व्हॉल्टमध्ये अडकले होते आणि हा सर्व उत्पात घडवून आणत होते. आपल्या तर्काचं स्पष्टीकरण देताना शवपेट्या हलण्याच्या प्रकाराला डॉर्कसची शवपेटी व्हॉल्टमध्ये ठेवल्यानंतरच सुरुवात झाली याकडे त्यांनी लक्षं वेधलं.

.....परंतु एलिझाबेथ इलियटची शवपेटी गायब होण्याचं कारण कोणीही सांगू शकलं नाही!

HDA2014_blackseparator.jpg

lord-combermere-ghost-250.jpg

लॉर्ड कंबरमिअरच्या बाबतीत पुढे आणखीनच विलक्षण घटना घडल्याची नोंद सापडते.

१८९१मध्ये लॉर्ड कंबरमिअरचा घोडागाडीने धडक दिल्याने मृत्यू झाला. कंबरमिअरचं दफन सुरू असतानाच चार मैल अंतरावरील कंबरमिअर अ‍ॅबी लायब्ररीत सिबेल कॉर्बेट फोटो काढत होता. फोटो धुवून पाहील्यावर त्याला आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला.

लायब्ररीतील खुर्चीमध्ये बसलेली लॉर्ड कंबरमिअरची धुरकट प्रतिमा फोटोत स्पष्ट दिसत होती!

वेशभूषा आणि आकृतीची उंची यांच्यावरुन कुटुंबियांनी तो लॉर्ड कंबरमिअरच असल्याचं खात्रीपूर्वक सांगितलं! कॉर्बेट फोटो काढत असताना घरातील यच्चयावत कुटुंबीय आणि नोकरचाकर दफनभूमीत होते! त्यांच्याकडून घराची किल्ली घेऊनच कॉर्बेट फोटो काढण्यासाठी घरात प्रवेशला होता!संदर्भ :
डेव्हील्स ट्रायँगल - रिचर्ड वायनर
बर्म्युडा ट्रायँगल - चार्ल्स बार्लीत्झ
विकीपिडिया
इंटरनेटवरील अनेक ब्लॉग्ज आणि संस्थळे.

छायाचित्रे :
चित्र क्र. १ -http://en.wikipedia.org/wiki/Chase_Vault#mediaviewer/File:Christchurchpa...
चित्र क्र. २ - छायाचित्रकार सायबेल कॉर्बेट (Sybell Corbet), १८९१.

dhamaal_border1.jpg
related1: 

HDA2014_blackseparator.jpg
paNatyaa1

HDA2014_blackseparator.jpg
स्पार्टाकस
HDA_14_boy.jpg

HDA2014_blackseparator.jpg
HDA2014_bundel.png
HDA2014_blackseparator.jpg

प्रतिसाद

बाप रे!

:)
खास स्पार्टाकस टचच लिखाण
वर वर भित भित वाचल्याने नक्की प्रतिक्रिया देता येणार नाही.
दिवसाढवळ्या पुन्हा एकदा वाचून पाहीन :)