कविता गेली खड्ड्यात...!

HDA2014_greenheader.jpg

अशी कशी ही माझी आई! अशी कशी ही माझी आई!
पहावे तेव्हा मागेमागे करते, दिवसात दहा कामे सांगते,
‘नाही’ म्हणायची सोय नसते, कपाळावर तिच्या आठी असते.
हे खा, ते खा, कटकट करते, डब्यात नेमकी पोळी-भाजी देते,
भजी, वडे कधीतरीच करते, पिझ्झाच्या ‘पि’लाच डोळे वटारते.
सारखे शिस्तीचे धडे शिकवते, खोलीतला पसारा आवरायला लावते,
स्वतः रविवारी सोफ्यात रेलून, पेपर वाचत टी.व्ही. बघते!!
अशी कशी बरं माझी आई! अशी कशी बरं माझी आई!
कपाट माझं आवरून ठेवते, हरवलेली वस्तू शोधून देते,
पेपरमधला छानसा लेख, शेजारी बसवून वाचून दाखवते.
पाय दुखले की चेपून देते, ताप आला की मऊ भात देते,
कंटाळा आला की जवळ येऊन, केसातून हात फिरवत राहते.
इतकी मोठी झाले मी, तरी खिडकीतून मला टाटा करते,
परतायला उशीर झाला की, एकटीच काळजी करत बसते.
अशी कशी बरं माझी आई! अशी कशी बरं माझी आई!
माझं एकच ऐकशील का आई? नको म्हणूस, "होऊ कशी उतराई",
तुझ्यामुळे मी या जगात आले, आई!
तुझ्यामुळे मी या जगात आले, आई!



व्हॉट द फ... सॉरी! पण ही काय कविता आहे?? कविता अशी असते?? कुठल्याही मीटरमध्ये बसत नाहीये! आणि या कवितेला गौडा टीचरनं अख्ख्या क्लाससमोर किती प्रेज केलं! या असल्या कवितेला? आय मीन, काहीतरी लेव्हल हवी ना? टेक्स्ट आहे हे चक्क! नुसतं एंटर मारून, लाईन्स् तोडून, प्रिंटआउट काढलं, की झाली त्याची कविता? नाही, टेक्स्ट नाही, ते काय म्हणते गौडा टीचर? अं..ऽऽ गद्य! की पद्य? माझा सुपरगोंधळ होतो. शार्दूलचा रूल लावतो, एक मिनिट, ‘ज्याची...पटापट...पढ़ाई...होते...ते...पद्य आणि जे...गिव्हअप...मारायला...लावतं...ते...गद्य!’ प-प, ग-ग! बेस्ट! माझी पद्याची पढ़ाई कधीच पटापट होत नाही, पण जस्ट फॉर द सेक ऑफ द रूल, मी हे लक्षात ठेवलंय! (शार्दूलसुद्धा क्रॅकच आहे जरा...!)

टीचरनं दहा-दहा जणांचे ग्रूप्स् केले. त्यांतल्या दोघांनी कविता लिहायच्या, तिघांनी पोस्टर्स करायची, चौघांनी क्लाससाठी क्विझ तयार करायचं आणि एकानं या सगळ्यांना को-ऑर्डिनेट करायचं अशी असाइनमेंट होती. असे एकूण चार ग्रूप्स्, प्लस आठ जण उरत होते. त्यांना टीचरनं टू इंटु फोरमध्ये डिव्हाइड केलं. तर आमच्या ग्रूपमध्ये कवितेसाठी मी आणि जिग्ना सिलेक्ट झालो. कविता करायच्या विचारानं माझी टोटल गळपटली होती. शार्दूल पोस्टर ग्रूपमध्ये होता, त्यामुळे ऐश होती त्याची. पण कवितेसाठी त्यानंच मला विषय सुचवला. मी म्हणालो त्याला, "आपण टास्कस्‌ बदलून घेऊ. तू कविता रिसाइट कर, मी पोस्टर करतो." तर त्याला याचं वनएटी डिग्रीजमधे "नाही!" मला डाऊट आहे की, जिग्नामुळे त्यानं असं केलं.

"तुमाला पायजे तो विषय निवडा, इट शुड बी क्लोज टु योर हार्ट", असं गौडा टीचर म्हणाली होती. पण म्हणून आईवर कविता करतात का?? अगदीच ओल्ड फॅशन्ड मराठी मूव्ही कॅटेगरी! पण ही जिग्ना पहिल्या बेंचवर बसून टीचरच्या प्रत्येक प्रश्नाला मी-मी करून उत्तरं देते ना..त्यामुळे ती टीचरची फेव्ह! मग आम्हांला कोण विचारतंय? पोलटूगिरी सगळी! तिला तरी दुसरं काय सुचणार म्हणा! तिची आई जॉब करत नाही, दिवसभर घरीच असते. नो वंडर की कविता करतानाही तिला आईच दिसली समोर. आय डाऊट, की हे जिग्नानं स्वतः लिहिलेलं आहे, की आईकडून लिहून घेतलं आहे?

आम्ही ‘मदर नेचर’ या विषयावरची इतकी ऑसम कविता लिहिली... ती फ्री-हॅण्ड असेल, त्यात असं आई-उतराई टाईप्स मॅचिंग नसेल, पण त्यातून आम्ही जी फाईट मारली, जो मेसेज दिला, तो कितीतरी महत्त्वाचा आहे. त्याकडे लक्ष दिलं नाही, तर ही जिग्ना उतराई व्हायला जिवंत तरी राहील का?
उतराई होतात म्हणजे काय करतात?...हॅड नो आयडिया. म्हणून मी संजनाला त्याचा अर्थ विचारला. (संजना म्हणजेही क्रॅकच, पण वेगळ्या कॅटेगरीतली!) तिनं जिग्नाची कविता नीट ऐकलेलीच नव्हती. पण तिला उतराईचा अर्थ माहिती होता! तिनं मला तो सांगितला. सांगताना बरंच काही बडबडली ती. त्यातलं एकच वाक्य माझ्या लक्षात आहे की, "यूएसमधली माणसं मराठीत बोलणारी असती, तर थँक्सगिव्हिंगच्या दिवशी या शब्दाविना त्यांचं घोडं सारखं अडलं असतं!"
संजना पण एकदम चमको मराठी बोलते हां! घोडं अडलं अँड ऑल! भारी वाटतं एकदम!
बट इन दॅट केस, मी संजनाचा उतराई आहे. कारण माझ्या कवितेच्या एकदोन क्रिटिकल ठिकाणी तिनं मला मदत केली आहे.

शार्दूलनं विषय सुचवल्यावर त्यादिवशी घरी जाताना माझ्या डोक्यात कवितेचेच विचार सुरू होते. खरं ना, मदर नेचर, ग्लोबल वॉर्मिंग, पोल्युशन हे सगळे इतके घिसेपिटे टॉपिक्स झालेले आहेत; डोकं पकलं आहे आता त्यानं... आत्ता या क्षणी, विदाउट प्रिपरेशन, मी यांपैकी कशावरही शॉर्ट नोट, लॉन्ग नोट, पानभर आन्सर, एसे, काय म्हणाल ते लिहून देईन. सहावीपासून रटतोय...तेच ते शब्द इकडेतिकडे फिरवून लिहायचे, नॉट अ बिग डील! पण कविता म्हणजे वेगळंच! तरी एकदोन दिवसांत माझ्या मनात एक व्हर्जन तयार झालं. ते इंग्लिशमध्ये होतं, नंतर मी त्याचं मराठी केलं. इंग्लिशच वाचायला ऑसम वाटत होतं, पण असाईनमेंट होती मराठीची..सो, हॅड टु डु इट धिस वे! गौडा टीचर सांगत असते, "मराटीच्या अब्यासाच्या वेळी मराटीतूनच विचार केला पायजे." व्हॉट द हेल! आम्ही मराठीतून विचार करू नाहीतर चिनी भाषेत करू...आन्सरपेपरमध्ये मराठी उमटलं म्हणजे झालं ना! पेपरमध्ये आमचे मार्क उग्गाच, फुक्कटचे कट करताना टीचर स्वतःतरी ‘मराटी’त विचार करत असेल का?

ते जाऊ दे! स्टेशन नको बदलायला. तर, माझी कविता - व्हर्जन1.0 मी शार्दूलला दाखवली...

नकोत अटॅक पृथ्वीवर, नकोत अटॅक जीवनावर
तिचा त्रास कमी करा, आठवा तिचे जुने दिवस
तिला सोबत घेऊन चला, सोडा तुमची सारी हवस
इतरांना मदत करा, स्वतःला यशस्वी करा
तिच्या चिंता कमी करा, स्वतःचं आयुष्य सुधारा
प्राणी-पक्षी आहेत खरे हकदार तिचे
तेच लढतील युद्ध जीवनाचे
मिटतील त्यांच्या पाऊलखुणा, ओसाडता तिथे माजे
नकोत अटॅक पृथ्वीवर, नकोत अटॅक जीवनावर

शार्दूलनं कविता वाचली. पहिल्या एकदोन लाईन्समध्येच त्याच्या चेहर्‍यावर स्क्रीनसेव्हर आला. शेवटची ओळ वाचून त्या स्क्रीनसेव्हरसकट त्यानं माझ्याकडे पाहिलं आणि आपले हात कागदासकट "काय आहे हे?" अशा अर्थानं थ्रो केले.

"अरे यार, अटॅकचं मराठी सिनोनिम नाही आठवलं मला पटकन. हवसचं पण... तिथे लिहूया ना मराठी शब्द!" मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला.
" सिनोनिम गेलं खड्ड्यात..."
".........."
"ही कविता आहे? कविता अशी लिहितात? आणि ओसाडता काय असतं??"
"मला इतकंच येतं."
"हे रिसाइट केलंस, तर आपली फ्रेंडशिप संपली!"
"संपली, तर संपली. गो टु हेल! मी तुझ्या जागी असतो, तर आपल्या बेस्ट फ्रेंडला मदत केली असती."

मला खरंच राग आला होता शार्दूलचा. पुढचा एक अख्खा पिरियड बोललो नाही त्याच्याशी. पण रिसेसमध्ये त्याच्या डब्यात अंडाभुर्जी बघितली आणि माफ कर दिया उसको!

मग सुरू झालं आमचं ‘मिशन कविता इम्प्रॉव्ह’! शार्दूलनं एकेक लाईन घेऊन पोस्टमॉर्टेम केलं. माझी भरपूर व्हर्बल धुलाई केली. आणि तीनचार दिवसांत कविता - व्हर्जन 2.0 तयार झाली. (थेट 2.0 नाही बनलं. आधी 1.1, मग 1.1.1, त्यापुढे 1.2, मग 1.4 ... 1.3चा कागद आम्हीच फाडून टाकला. त्यामुळे ते आमच्याकडे नाहीये आता.)

तर ती झाली अशी -

नकोत हल्ले सृष्टीवर, नकोत हल्ले आयुष्यावर
(साला! अटॅकसाठी ‘हल्ला’ हा शब्द आठवलाच नाही मला!)
करा वेदना कमी तिच्या, आठवा तिचे जुने दिवस
सोबतीने चला तिच्या, ____________
(इथे ‘दिवस’शी र्‍हाइम होणारं ‘हवस’ऐवजी दुसरं काही सुचतच नव्हतं.)
एकमेकांना साह्य करा, एकमेकांना सफल करा
('इतरांना मदत करा, स्वतःला यशस्वी करा' ही मी लिहिलेली लाईन म्हणजे टोटल मतलबीपणा वाटतो - अकॉर्डिंग टु शार्दूल. एकमेकांना, म्हणजे माणसांनी प्राण्यांना आणि प्राण्यांनी माणसांना, गिव्ह अँड टेक - हे पण अकॉर्डिंग टु शार्दूलच!)
चिंता तिच्या दूर करा, अन् भविष्य आपलेच सुधारा
नाहीतर...
हकदार जे सृष्टीचे, लढतील युद्ध आयुष्याचे
मिटतील त्यांच्या पाऊलखुणा, _______ तिथे माजे
(‘ओसाडता’ऐवजी काय? यावर आम्ही दोन व्हर्जन्स घालवली.)
नकोत हल्ले सृष्टीवर, नकोत हल्ले आयुष्यावर



HDA2014_kavita.jpg तर, परवापर्यंत इतकं झालेलं होतं. काल सकाळी आम्ही दोघं ठरवून लवकर शाळेत आलो, कविता फायनल करायला. कारण आज प्रेझेंटेशन! लायब्ररीत निघालो होतो, इतक्यात संजना भेटली. ती खो-खोच्या टीममध्ये आहे. त्यांची प्रॅक्टिस होती. म्हणून तीपण लवकर आली होती. मला काय वाटलं काय माहीत, मी तिला व्हर्जन 1.4 दाखवलं आणि फिल इन द ब्लँक्स करण्याची रिक्वेस्ट केली. तीही तयार झाली लगेच. सो स्वीट ऑफ हर! आम्ही तिघंही लायब्ररीत जाऊन बसलो. प्रेअर सुरू व्हायला अजून अर्धापाऊण तास होता. तेवढ्यात काही जमलं नसतं, तर आज परत लवकर यायचं ठरवलं होतं.

पण संजना इज ग्रेट! आम्हांला जिथे जिथे अडलं होतं, तिथलं वॉक-थ्रूच तिनं आम्हांला दिलं. पहिलं म्हणजे ‘दिवस-हवस’च्या जोडीला तिनं बाद करून टाकलं. ‘जुने दिवस’च्या जागी काहीतरी वेगळं लिहा म्हणाली. मग आम्ही आठवायला लागलो...जुने दिवस म्हणजे काल, परवा, लास्ट वीक, लास्ट इअर, पास्ट-पास्ट टेन्स! भूतकाळ!

करा वेदना कमी तिच्या, आठवा तिचा भूतकाळ
पुढली लाईन संजनाला ऑलमोस्ट लगेच आली - सोबतीने चला तिच्या, नका बनू तिचा काळ

ते ऐकून मी आणि शार्दूल हँग झालो! तिचा ऑसमनेस कळत होता, तरीही!
"नका बनू तिला काळ म्हणजे??" मी विचारलं.
"तिला नाही, मॅड, तिचा काळ! म्हणजे, फॉर एक्झाम्पल, ब्राझील-जर्मनी सेमीला जर्मनीची टीम ब्राझीलसाठी अ‍ॅज इफ काळ बनून आली होती!"
"ओ! गॉट इट! म्हणजे उद्या ही कविता रिसाइट करून आपण जिग्नाचा काळ बनायचं! झोपवायचं तिला..पार साफ!"
"व्हाय जिग्ना? तिनं काय केलंय?" या शार्दूलबद्द्ल मला भरपूर डाउट्स आहेत! शार्दूल आणि जिग्ना या मॅटरमधे मला जरा सिरियसली लक्ष घालायला हवंय.

नेक्स्ट, स्विच टू ओसाडता. संजना म्हणाली, "प्राण्यांच्या पाऊलखुणा एकदम मिटणार नाहीत. ते ग्रॅज्युअली होणार."
करेक्ट! मग आम्ही नेचरमध्ये असं काय ग्रॅज्युअली होतं, जे निगेटिव्हिटीकडे जातं ते आठवायला लागलो.

- सनसेट : यावर मी काट मारली.

- हिरवं गवत टर्निंग टु वाळकं गवत : यावर शार्दूलनं काट मारली.

- ड्रॉट : यावर संजनानं काट मारली. ("हे खूप जास्त ग्रॅज्युअली होतं. इतका स्लो-स्पीडही नकोय!" असं म्हणाली. प्रत्येक गोष्टीचं तिच्याकडे नीट अँड क्लिअरकट एक्स्प्लनेशन असतं.)

- फुल मून टू क्रीसेंट मून : हे मात्र संजनानं ओके केलं. ("याचा स्पीड पर्फेक्ट आहे!") तिनं केलं म्हणून शार्दूलनं पण केलं. त्या दोघांनी केलं मग मी कोण काट मारणारा? मीपण ओके केलं.

क्रीसेंट मूनला मराठीत काय म्हणतात ते आम्हांला पटकन आठवेचना. (प्रेअरला फक्त पंधरा मिनिटं राहिली होती, त्यामुळेही असेल.) इतक्यात शार्दूलच्या ऑफिस-असिस्टंटनं त्याच्या मेंदूत दिवा लावला - "संजना, एका अन्युअल-डेला तुम्ही एक डान्स केला होतात. जिग्ना सेंटरला होती," डाउट्स, डाउट्स, सिरीयस डाउट्स! "...तू एकदम लास्ट लाइनमध्ये होतीस. रिमेंबर? समथिंग समथिंग कोळ्याची पोर...त्या लाइनमध्ये आहे तो शब्द!"
संजनानं डोळे मिटून घेऊन ते गाणं आठवलं. पुटपुटत दोनतीन वेळा म्हणून बघितलं. "चंद्रकोर!" ती एकदम मोठ्यानं म्हणाली. तिचा आवाज ऐकून लायब्ररी-मॅमचा चेहरा फुल मूनसारखा डेस्कच्या आडून बाहेर आला. तिनं आमच्या दिशेला बघत "श्श!" केलं.
"चंद्राचे कमी कमी होणारे आकार. शेवटी उरते चंद्रकोर. कमी कमी होणारे आकार - घटते आकार! घटते आकार चंद्रकोरीचे!"
फायनली, ओसाडता शब्दाला रिप्लेसमेंट मिळाली.

हकदार जे सृष्टीचे, लढतील युद्ध आयुष्याचे
मिटतील त्यांच्या पाऊलखुणा, घटते आकार चंद्रकोरीचे

पण आता पाऊलखुणांची लाइन एकदम ऑड वाटायला लागली. मग शार्दूलनं क्लू दिला. "पाऊलखुणा म्हणजे काय? त्यांच्या प्रेझेन्सच्या खुणा. त्या चंद्रकोरीसारख्या कमी कमी होत जाणार. प्रेझेन्स मीन्स देअर एक्झिस्टन्स." आणि आम्ही दोघं एकदमच संजनाकडे बघायला लागलो, ‘एक्झिस्टन्सला मराठीत काय म्हणतात’ या ऑब्विअस प्रश्नासकट.
तिनं पुन्हा डोळे मिटले आणि टेबलवर इंडेक्स फिंगर आपटत, खालचा ओठ दाताखाली दाबून ती आठवायला लागली. तिनं डोळे उघडेपर्यंत आम्ही बाकी काहीही करणार नव्हतोच!
"अ-स्ति-त्व!" जरा वेळानं ती म्हणाली. तिच्या चेहर्‍यावर फीलिंग ब्लेस्डचा इमोटिकॉन होता.
"ओके. अस्तित्व. अस्तित्वाच्या खुणा."
"अस्तित्वाच्या खुणा त्यांच्या, घटते आकार चंद्रकोरीचे..." येस्स! येस्स! येस्स! शेवटची ओळ मला आली होती. नाहीतर इतका वेळ मी नुसता आळीपाळीनं त्या दोघांकडे बघत बसलो होतो.
फायनली, आमची कविता रेडी झालेली होती. थँक्स टू संजना, ऑफकोर्स! शी इज जीनियस!

नकोत हल्ले आयुष्यावर,
नकोत हल्ले सृष्टीवर
करा वेदना कमी तिच्या, आठवा तिचा भूतकाळ
सोबतीने चला तिच्या, नका बनू तिचा काळ
एकमेकांना साह्य करा, एकमेकांना सफल करा
चिंता तिच्या दूर करा, अन् भविष्य आपलेच सुधारा
नाहीतर...
हकदार जे सृष्टीचे, लढतील युद्ध आयुष्याचे
अस्तित्वाच्या खुणा त्यांच्या, घटते आकार चंद्रकोरीचे
म्हणूनच...
नकोत हल्ले आयुष्यावर,
नकोत हल्ले सृष्टीवर
नकोत हल्ले आयुष्यावर,
नकोत हल्ले सृष्टीवर

आणि या कवितेचं साधं मेन्शन पण नाही केलं गौडा टीचरनं! व्हॉट द हेल! म्हणजे आमची इतकी मेहनत वाया! असाइनमेंटचे म्हणून मार्क्स मिळतील, नो डाऊट. पण तरी...?

पण शाळा सुटतानाची प्रेअर चालू असताना आउट ऑफ नोव्हेअर, शार्दूलच्या डोक्यातून एक सुसाट आयडिया निघाली. प्रेअर संपताच त्यानं मला सांगितली - "एक ब्लॉग सुरू करायचा, ब्लॉगस्पॉटवर आणि तिथे ही कविता पब्लिश करायची. पुढेही तिथे असंच काय काय पोस्ट करत राहायचं. असाईनमेंट्स् म्हणून करू ते, सुचेल तसं." त्यानं ब्लॉगचं नावही सुचवलंय - `3-Aces'!
संजनाही ओके म्हणाली याला, पण वर्डप्रेस इज बेटर दॅन ब्लॉगस्पॉट असं तिचं मत.
मला तर वाटतंय की, सरळ फेसबुक पेजच सुरू करावं.
ब्लॉगस्पॉट, वर्डप्रेस नाहीतर फेसबुक पेज - जे काही असेल ते, त्याचं नाव 3-Aces हे नक्की! 3 S's - शार्दूल, संजना आणि... ओ! सॉरी! मी सुमीत, नाम तो सुना होगा!

HDA2014_greenheader.jpg
related1: 

HDA2014_greenseparator.jpg
HDA2014_raangoLee2.jpg

HDA2014_greenseparator.jpg

HDA2014_greenseparator.jpg
प्रीति छत्रे
HDA_14_PreetiChhatre.jpg
प्रीति छत्रे यांनी संगणक शास्त्रात पदवी प्राप्त केली असून त्या ठाणे येथे राहतात. त्या जवळपास गेली सात वर्षे मायबोलीच्या सभासद आहेत. त्या लेखन, संपादन, अनुवाद या क्षेत्रांत स्वतंत्ररीत्या काम (फ्रीलान्सिंग) करतात. आजवर वर्तमानपत्रांत, विविध दिवाळीअंकांत आणि नियतकालिकांत त्यांच्या काही कथा, ललितलेख प्रकाशित झाले आहेत. एक अनुवादित कादंबरी प्रकाशित झाली आहे. त्यांच्या दोन कथांना पुरस्कार मिळाले आहेत.

HDA2014_greenseparator.jpg

प्रतिसाद

लले, मस्त लिहिलं आहेस :-) वाचनही छान.

लले चांगली जमलेय

किती तो स्ट्रगल नव्हे प्र प्र प्रयास :खोख::
मस्त जमलय!!!

मस्त लिहिलं आहे ललिता !! :हाहा:
ह्यातला किती टक्के तुझ्या किशोरवयातला स्वानुभव? ;)

मस्तच!!!

मस्त. काही काही पंचेस खास प्रौढांसाठी वाटले.

मस्त आहे. कल्पना आणि अभिव्यक्ती दोन्हीही अतिशय आवडले.

कथेचं वाचन इंग्रजीतून विचार करून मराठीत लिहिणार्‍या मुलाचे वाटायला हवे होते का? गौडा मॅडमचं वेगळं मराठी वाचनातून पोचतंय. शार्दूलचं अस्खलित का काय तसलं मराठी कळतंय. पण सुमीतचं वाचन त्याच्या मराठीला साजेसं वाटलं नाही. तसंच सुरुवातीचं कवितेचं वाचन सुमीतच्या वेडावणार्‍या आवाजात हवं असं वाटलं.

मस्त.
चेहर्‍यावर इमोटीकॉन :हाहा: