दिवाळीची धम्माल!!!

dhamaal_border1.jpg

HDA2014_Diwali.JPG मित्रमैत्रिणींनो, 'दिवाळी म्हणजे काय?' असं तुम्हांला कोणी विचारलं तर तुम्ही काय सांगाल? अंहं, उत्तर देण्याची गरज नाही. उत्तरं तयार आहेत, फक्त लपलेली आहेत. तुम्ही एकच काम करायचं, खालील वाक्यांमध्ये असलेली दिवाळीतली सगळी गंमतजंमत शोधून काढायची. तयार?

उदाहरणार्थ पहिलं कोडं सोडवून दाखवलं आहे.

१. गावाबाहेर पडल्यावर दोन रस्ते लागले - एक जात होता वाळीवरे गावाकडे तर दुसरा जात होता गुळीवरे गावाकडे. शेवटी गूगल मॅपचा आधार घेऊन उजवीकडच्या रस्त्यावर कार वळवून आदि वाळीवरे गावाच्या दिशेने निघाला. - उत्तर : दिवाळी.

आलं ना लक्षात? आता बाकीची तुम्ही सोडवायची आहेत बरं का!

२. रणजीत क्लासमधून घरी आला. दाराचा आवाज ऐकून आई आतूनच ओरडून म्हणाली, "आता आधी जेवून घे आणि मगच मित्रांबरोबर गावभर भटक, रंज्या!"

३. अरीफ टाके घालत बसला होता. शिवून झाल्यावर त्याने तो शर्ट धुवायला टाकला.

४. त्या नवीन मॉलमधल्या चकचकीत दुकानांतून ठेवलेले छानछान दागिने बघून सोनालीला डूल घ्यावेसे वाटू लागले.

५. दामूअण्णांच्या बेडपाशी येत डॉक्टरांनी विचारलं, "काय दामूअण्णा, कसं वाटतंय आता?"
"आता वाटताय तसां बरां. गोळी टायमावर घेतली कां तब्येत बरी असतां."

६. अक्का आता म्हातार्‍या झाल्या होत्या पण त्या आपली सर्व कामं स्वतःच करत असत.

७. "किती त्या चिमण्यांची चिवचिव! डाळे घाल त्यांना खायला." आजी म्हणाली.

८. शूरवीर तानाजीने कोंडाण्यावर किल्लेदार उदयभानशी लढून गड जिंकला.

९. परीक्षेचा अभ्यासच नाही केला आणि मग शेवटी व्हायचं तेच झालं. आर्यन परीक्षेत नापास झाला.

१०. आका आणि मोना गप्पा मारत मारत भटकताना त्या पडक्या, अंधार्‍या बंगल्याजवळ जाऊन पोहचल्या. मोनानं सहज नजर टाकली अन् ती दचकलीच. "आका, शSSSSSS, कंदील घेऊन कोणीतरी उभं आहे बघ आत." ती म्हणाली.

११. "नक्की कोणता रसेल हवाय तुम्हांला लायब्ररीतून? बर्ट्राण्ड? अना, 'रसेल बर्ट्राण्ड' असं लिहिलेल्या कप्प्यातील त्याचं आत्मकथनाचं पुस्तक घेऊन ये जरा." दुकानदार काकांनी अनाला सांगितलं.

१२. "अन् ते लांबवर दिसतंय ना? ते आमचं गाव - बनफुल." बाजीराव पाहुण्यांना आपलं गाव दाखवत म्हणाला.

१३. "ताई, अहो चांगली धारदार सुरी आहे ही. भाज्या कशा सपासपा कापल्या जातील. तुम्ही एकदा चिरून तर पाहा." दुकानदार म्हणाला. पण प्रियाला ते पटलंच नाही. "ही सुरी घेऊन कोणी वांगी चिरो अथवा कांदे चिरो." टेचात ती बाहेर पडली.

१४. "जमिनीलाच म्हणतात भुई. चक्रम कुठला! इतकंही माहीत नाही?" जाई नीलेशला म्हणाली.

१५. अंजू-मंजू दोघीही अगदी तल्लीनतेनं टीव्हीवर सिनेमा बघत होत्या. त्यामुळे दार उघडून आई कधी आत आली ते त्यांना कळलंही नाही. आई अचानक त्यांच्यासमोर येऊन उभी राहिलेली पाहताच त्या दचकल्याच!

१६. "वा, वा! तुमच्या शेतातले टोमॅटो किती तजेलदार दिसत आहेत." सदूभाऊ विजय पाटलांना म्हणाले.
"बरं का भाऊ, बी जर उत्तम प्रतीची वापरली तर पीकही तसंच उत्तम येणारच." पाटलांनी सांगितलं.

१७. हा एकदम स्पेशल हं. प्रत्येक ओळीत उत्तराचं एकेक अक्षर विशिष्ट क्रमात आहे.

faTaake_painting2.jpg

शंभर एके शंभर
एकटाच राहिला नंबर
नंबर लिहिला पाटीवर
दप्तर, पाटी पाठीवर
घेऊन पळे घराकडे
सोडवा हे सोप्पे कोडे!
faTaake_painting2.jpg

HDA2014_answers_1.jpg

dhamaal_border1.jpg
related1: 


HDA2014_kandil1.jpg

मामी
HDA2014_mami
मामी या मुंबईला राहतात. सध्या त्या पूर्णवेळ गृहिणी असून वाचन, थोडेफार लेखन आणि भरपूर भटकंती हे छंद जोपासतात. मामी गेली चार वर्षं मायबोली सदस्या आहेत. यांचे लेखन 'स्वान्त:सुखाय' असते असे त्या आवर्जून सांगतात. त्यांनी आतापर्यंत हलकेफुलके, नर्मविनोदी लेखन केले आहे. गूढकथा, रहस्यकथा, विज्ञानकथा वाचनाची आवड असल्याने या पठडीतीलही काही कथा लिहिल्या आहेत.


ओमियोपॅथिक चिकित्सा
सहन होत नाही आणि सांगताना बोंबलावं लागतं...आम्ही व्याधीच नव्हे, तर व्यक्ती बरे करतो. न ऐकणारे नवरे, सतत ऐकवणाऱ्या बायका, सीरियलमध्ये सोडून यावे असे सासूसासरे अशा सर्व व्यक्तींसाठी ओम चिकित्सा. अनाहत नादाची स्पंदने नादिष्ट पण जीवश्च लोकांचे आयुष्य सुधारतील. त्वरित संपर्क साधा - omatroam@rediff.com

प्रतिसाद

मामी, मस्तच ग :-)

मस्त आहे हे! :)

हे तर लयी भारीये. लहान, थोर, सान, किशोर सगळेच एंजॉय करतील!!

लय भारी आहे हे !!!!!!!!

मस्त

तुसी ग्रेट हो :)
जाम आवडलंय

मस्त आयडियाची कल्पना...