"रोहन, वाढलंय रे सगळं, चल ये लौकर जेवायला. पण आधी हात धू स्वच्छ... अगदी नीट साबणाने धुऊन मगच ये हं ... "
"आईऽऽ कसलं लागलंय बघ गुडघ्याला!"
"अरे, असं कसं झालं? चल, पहिलं अँटिसेप्टिक क्रीम लावूया त्याला .."
हे असे संवाद आपल्या इतके परिचयाचे आहेत की, यात काय विशेष, असेच कोणालाही वाटेल. याचे कारण आहे स्वच्छता आणि जंतुसंसर्गाबाबत आपल्यामध्ये निर्माण झालेली सजगता. मात्र ही सजगता अगदी सुरुवातीच्या काळात डॉक्टर वा सर्जन मंडळींमध्येही नव्हती. ही मंडळी आपले हातदेखील धूत नसत, ग्लोव्ह्ज् वापरणे तर लांबच राहिले! कारण जंतुसंसर्गाबाबत सर्वसामान्यांना तर माहिती नव्हतीच, पण डॉक्टरलोकही त्याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ होते.
हे सगळे सांगतोय ते १८००च्या उत्तरार्धातले, म्हणजे सुमारे दीडशे वर्षांपूर्वीचे. लढाईमध्ये जखमी झालेल्या कोणाचे हात-पाय कापून काढावे (अँप्यूट) लागायचे त्यावेळच्या युरोपमधील शस्त्रक्रियांची गोष्ट. कोणताही रुग्ण या शस्त्रक्रियेला जाम घाबरायचाच - कारण सरळच होते - जगण्याची शक्यता ही होती-नव्हती अशीच. जगला तर जगला, नाहीतर सरळ वरतीच जायची तयारी ठेवावी लागायची.
शस्त्रक्रियेचा इतिहास पाहिला, तर ढोबळमानाने सुरुवातीला तीत तीन मोठे अडथळे होते -
१] रक्तस्रावावर नियंत्रण - संपूर्ण शरीरभर रक्तवाहिन्यांचे जाळे असल्याने शस्त्रक्रिया करताना जरा कुठे मोठी रक्तवाहिनी तुटली, की अतिरिक्त रक्तस्राव होऊन रुग्ण दगावयाचा.
२] वेदनेवर नियंत्रण - भूल देण्याचे (अॅनेस्थेशिया) तंत्र विकसित झाले नसल्याने शस्त्रक्रिया चालू असताना रुग्णाला प्रचंड वेदना सहन करायला लागायच्या. काही वेळा दारू पाजून रुग्णाला बेशुद्ध करीत असत.
३] जंतुसंसर्गावर नियंत्रण - शस्त्रक्रिया यशस्वी झाली तरी त्यानंतर जखमांतून जंतुसंसर्ग (इन्फेक्शन) व्हायचा. याला वॉर्ड फीवर म्हणत असत.
१५५२मध्ये डॉ. अॅम्ब्रोज पारे या फ्रेंच डॉक्टराने तुटलेल्या अथवा कापल्या गेलेल्या रक्तवाहिन्यांची टोके एका विशिष्ट धाग्याने (लिगेचर - ligatures) बांधायला सुरुवात केली, ज्यामुळे अतिरिक्त रक्तस्राव थांबवता येऊ लागला. भूल देण्याचे (अॅनेस्थेशिया) तंत्र हे साधारणतः १८५०च्या आसपास विकसित होऊ लागले होते. यामुळे वेदनारहित शस्त्रक्रिया सुरू झाल्या, तसेच सर्जन्स्ना आवश्यक दुरुस्तीसाठी पुरेसा वेळही मिळू लागला. (१८४६ साली जेव्हा भूल देऊन पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली, तेव्हा ती पाहण्यासाठी डॉ. जोसेफ लिस्टर तिथे आवर्जून उपस्थित होता - हा एक योगायोगच!) मात्र जंतुसंसर्गावर नियंत्रण आणणे अजूनही कोणाला शक्य झाले नव्हते.
या जंतुसंसर्गावर नियंत्रण आणण्याचे अतिशय महत्त्वाचे योगदान डॉ. जोसेफ लिस्टर यांनी दिले. शस्त्रक्रिया सुखरूप होण्याचे कारण ठरले डॉ. जोसेफ लिस्टर यांचे असेप्टिक सर्जरी हे तंत्र. असेप्टिक सर्जरीचा जनक असा त्यांचा यथोचित गौरव आजही केला जातो. इथे एक लक्षात घ्यायला हवे की, प्रतिजैविकांचा (अॅण्टिबायोटिक्स्चा) शोध हा १९२८मध्ये लागला. तोपर्यंत शस्त्रक्रियेचे रुग्ण जंतुसंसर्गामुळे निर्माण होणार्या अनंत हालअपेष्टांना कसे काय तोंड देत होते, ते त्यांचे त्यांनाच माहीत!
जोसेफ लिस्टरचा जन्म ५ एप्रिल, १८२७ला अप्टन, एसेक्स, इंग्लंड इथे, एका क्वेकर कुटुंबात झाला. लिस्टर कुटुंब चांगले धनाढ्य होते. उंची मद्याचे व्यापारी असणारे जोसेफचे वडील एक हौशी शास्त्रज्ञ होते. सूक्ष्मदर्शकाला लागणार्या भिंगातील त्रुटी कमी करुन दाखवल्याबद्दल त्यांना सुप्रसिद्ध रॉयल सोसायटीचे सभासदत्वही मिळाले होते.
लहानगा जोसेफ हर्टफोर्डशायर व लंडन येथील क्वेकर शाळेत शिकला. या शाळांचे वैशिष्ट्य असे की, तिथे शास्त्र विषयांवर भर दिला जात असे. १८४७मध्ये जोसेफने युनिव्हर्सिटी ऑफ लंडनची 'बॅचलर ऑफ आर्टस्'ची पदवी प्राप्त केली. त्याच सुमारास त्याला देवीचा (स्मॉल पॉक्स्) संसर्ग झाला होता. त्यातून पूर्ण बरा झाल्यावर तो वैद्यकीय शाखेचा विद्यार्थी म्हणून युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये दाखल झाला. १८५०मध्ये जोसेफला बॅचलर ऑफ मेडिसिन अॅण्ऑफ्बॅचलर ऑफ सर्जरी ही पदवी मिळाली व तो डॉक्टर झाला. त्याने दाखवलेल्या विशेष प्रावीण्याकरता त्याला दोन सुवर्णपदकेही मिळाली. दोनच वर्षांत, १८५२मध्ये डॉ. जोसेफ एफ. आर. सी. एस.ची (फेलो ऑफ द रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स्) परीक्षा उत्तीर्ण झाला आणि वर्षभरात, म्हणजे १८५३ साली डॉ. जोसेफ एडिन्बरोला रवाना झाला. कारण तसेच खास होते. प्रो. जेम्स साईम (Syme) या सर्जरीतील नामवंत शिक्षकाचे मार्गदर्शन लाभावे, म्हणून आधी चार आठवड्याकरता गेलेला डॉ. लिस्टर मग डॉ. साईमचा साहाय्यक म्हणून एडिन्बरोलाच राहिला. तीन वर्षांनी जोसेफने प्रो. साईमच्या अॅग्नेस या मुलीबरोबर लग्न केले. या जोडप्याला अपत्यप्राप्ती झाली नाही. पण अॅग्नेसने डॉ. जोसेफला त्याच्या संशोधनकार्यात अनेकप्रकारे मदत केली.
त्वचा तसेच डोळ्यांतील स्नायूंचे कार्य याविषयीच्या संशोधनात सुरुवातीला डॉ. जोसेफ मग्न होता. तसेच, रक्त गोठण्याच्या (blood coagulation) प्रक्रियेबाबतही तो संशोधन करीत होता. जंतुसंसर्गाच्या प्रथमावस्थेच्या काळात रक्तवाहिन्यांचे कार्य काय असते, याबाबत डॉ. जोसेफ संशोधन करीत होता. या संशोधनकार्यामुळे त्याला रॉयल सोसायटीचे सभासदत्व प्राप्त झाले. दिवसभराचे हॉस्पिटलमधील काम संपवल्यावर रात्री उशिरापर्यंत डॉ. जोसेफचे हे संशोधनाचे काम चालू असे. एडिन्बरोच्या ज्या हॉस्पिटलामध्ये डॉ. जोसेफ काम करीत असे तिथे शस्त्रक्रियेचे सुमारे ५०% रुग्ण दगावत असत. युरोपमध्येतर हे रुग्ण दगावण्याचे प्रमाण सुमारे ८०% होते. जखमेतून अचानक होणारा जंतुसंसर्ग याला कारणीभूत आहे, असे समजून सगळेच सर्जन हे प्रमाण मान्य करीत असत. मात्र डॉ. जोसेफला हे मान्य नव्हते. हा जंतुसंसर्ग रोखण्यासाठी त्याने संशोधन सुरू केले.
डॉ. जोसेफचे एक निरीक्षण होते की, सिंपल फ्रॅक्चर्स (साधे अस्थिभंग) असणारे रुग्ण नीट बरे होत, कारण त्यांना जखमा होत नव्हत्या. मात्र कंपाउंड फ्रॅक्चर्स (गुंतागुंतीचे अस्थिभंग) असणार्या रुग्णांमध्ये त्वचा फाटून तिथे जखमा होत व अशा जखमा पुढे चिघळत जाऊन त्यांतून जंतुसंसर्ग होत असे. हा जंतुसंसर्ग बाहेरूनच होत होता हे लिस्टरने ओळखले होते, पण नेमके काय घडत होते हे त्याला कळत नव्हते.
लिस्टरला स्वच्छतेचे महत्त्व वाटत असल्याने तो शस्त्रक्रियेच्या आधी स्वतःचे हात स्वच्छ धुऊन, स्वच्छ कपडे घालूनच शस्त्रक्रिया करत असे. रुग्णसेवेत अतिशय नावाजलेल्या फ्लोरेन्स नाईटिंगेलने अशा स्वच्छतेची शिफारस त्यापूर्वी केलेली होती आणि त्याचे महत्त्वही लिस्टर ओळखून होता. मात्र हे स्वच्छतापालन त्याकाळचे सर्व सर्जन्स् करीत नव्हते. उलट, आधीच्या शस्त्रक्रियेतील रक्त उडालेले कपडे घालून एखादी नवीन शस्त्रक्रिया करण्यात ते मोठेपणा (स्टेटस सिंबल) मानत असत.
१८६०मध्ये ग्लाझ्गो येथे प्रोफेसर ऑफ सर्जरी म्हणून लिस्टरची नियुक्ती झाली. तिथे एक क्रांतिकारक शोधनिबंध त्याच्या मित्राकडून त्याला वाचायला मिळाला. हा शोधनिबंध लिहिला होता विख्यात फ्रेंच केमिस्ट डॉ. लुई पाश्चरने. खरं म्हणजे हा शोधनिबंध वैद्यकीय क्षेत्राशी अजिबात संबंधित नव्हता. दारू तयार होताना काहीतरी चुकीचे घडायचे (faulty fermentation) व दारू बिघडायची, यासंबंधी हा शोधनिबंध होता. याला हवेतून येणारे जंतू कारणीभूत आहेत, हे डॉ. लुई पाश्चरने सप्रमाण सिद्ध केले होते. त्या काळात या शोधनिबंधाने मोठीच खळबळ उडवून दिली. कारण या शोधनिबंधाद्वारे 'स्पाँटेनिअस जनरेशन ऑफ लाईफ' ही त्याकाळातील सुप्रसिद्ध विचारधारा पूर्णपणे मोडीत निघाली. या विचारधारेनुसार निर्जीव वस्तूंपासून जीवितनिर्मिती होते असे त्याकाळच्या काही लोकांचे मत होते. (आजमितीला हे कोणी वाचले तर प्रचंड हास्यास्पद वाटेल असा तो प्रकार होता - पण कुठलाही नवा विचार कितीही तर्कशुद्ध असला तरी समाजात, विद्वानांमध्ये तो लगेच मान्यता पावत नाही हेच खरे!) डॉ. लुई पाश्चरने मात्र जीवित वस्तूंपासूनच जीवनिर्मिती होते, हे सिद्ध करुन दाखवले. डॉ. लुई पाश्चरने सूक्ष्मजंतूंचे महत्त्व, त्यांची विविध क्षेत्रांतील कामगिरी ओळखली होती. तोपर्यंत कोणीच त्यांची इतकी दखल घेतली नव्हती. सूक्ष्मजीवांचा सर्वव्यापी (ऑम्नीप्रेझेन्स) गुण डॉ. लुई पाश्चरने सर्वप्रथम जगाला दाखवून दिला.
डॉ. लिस्टरची महानता यात आहे की, सूक्ष्मजीवांच्या या सर्वव्यापी गुणाचे मोल त्याने शस्त्रक्रियेसाठी व शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णासाठी अतिशय महत्त्वाचे आहे, हे जाणले. शस्त्रक्रियेदरम्यान व नंतरच्या काळात 'जंतू संसर्ग टाळणे हे एक मुख्य ध्येय असले पाहिजे' यासाठी डॉ. लिस्टरने सर्वतोपरी प्रयत्न केले. हे प्रयत्न पुढील सर्व असेप्टिक सर्जरीला पायाभूत ठरले.
डॉ. लुई पाश्चरने दारू खराब करणारे जंतू टाळण्यासाठी विशिष्ट फिल्टर्स् व उष्णता यांचा वापर केला होता. मात्र जिवंत माणसासाठी ही साधने निरुपयोगी आहेत हे जाणून कार्बॉलिक अॅसिडचा (फेनॉल) वापर डॉ. जोसेफने केला. कारण हे कार्बॉलिक अॅसिड सांडपाण्याच्या प्रक्रियेकरता वापरतात, तसेच जनावरांच्या शरीरावरील परोपजीवी (पॅरासाईट्स्) घालवण्याकरता वापरतात, हे डॉ. जोसेफला माहिती होते.
१८६५च्या सुरुवातीला डॉ. लिस्टरने कार्बॉलिक अॅसिडचा वापर -
१] शस्त्रक्रियेआधी हात धुण्यासाठी
२] शस्त्रक्रियेची साधने साफ करण्यासाठी व
३] शस्त्रक्रियेनंतर जी बँडेजेस् वापरतात ती जंतूविरहित करण्यासाठी सुरू केला.
हवेतील जंतू (air borne germs) मारण्यासाठीही शस्त्रक्रियागारात (ऑपरेशन थिएटर) कार्बॉलिक अॅसिड फवारण्यास त्याने सुरुवात केली. साधारणतः दीड वर्षाच्या कालावधीत त्याने कार्बॉलिक अॅसिडचा वापर करण्याच्या पद्धतीत बरीच सुधारणा केली. परिणामी शस्त्रक्रियेचे जवळपास सर्व रुग्ण जंतूसंसर्गातून मुक्त होऊ लागले. आता त्याच्याकडे शोधनिबंध प्रकाशित करण्यासाठी पुरेसा माहितीसाठा जमा झाला होता. १८६७मध्ये सुप्रसिद्ध 'द लान्सेट'मध्ये त्याने हा शोधनिबंध प्रकाशित केला.
१८६९च्या आसपास डॉ. लिस्टर एडिन्बरोला क्लिनिकल सर्जरीचा प्रोफेसर म्हणून रुजू झाला. ही जागा त्याच्या आधी त्याचे सासरे प्रो. साईम यांनी सुमारे तीस वर्षे विभूषित केली होती. असेप्टिक सर्जरीची रुजवात डॉ. लिस्टरने तिथेही केली आणि पुन्हा एकदा त्याला अतिशय देदीप्यमान यश मिळाले. गमतीचा भाग असा की, या असेप्टिक सर्जरीचा वापर इतर सर्जन्स्नी फारच हळूहळू स्वीकारला. एखादे नवे तंत्र शिकण्यामागे (व आत्मसात करण्यामागेही) सर्वसामान्यांची जी एक उदासीनता दिसून येते, ती इथेही होती. काही डॉक्टरांना या नव्या कल्पनेकडे लक्ष द्यायची इच्छा नव्हती. तर काहींना ही जर्म थेअरीच मान्य नव्हती. त्याचबरोबर हेदेखील खरे होते की, कार्बॉलिक अॅसिडचा अतिवापर इतका झाला की त्यामुळे सर्जन्स्च्या हातांवर डाग पडू लागले, बोटे बधीर होऊ लागली, त्यांची नखे तुटू लागली व त्या कार्बॉलिक अॅसिडच्या फवार्यामुळे फुफ्फुसांवर ताण येऊ लागला. अर्थातच ही सुरुवात होती. पुढे पुढे कार्बॉलिक अॅसिडला पर्याय म्हणून अनेक गोष्टी सुचवण्यात आल्या व हा दोष दूर करण्यात आला. तसेच इतर सर्जन्स्नी लिस्टरची पद्धती अयोग्यरीत्या वापरायला सुरुवात केली, ज्यामुळे त्यांना जे काही साधावयाचे होते, तेच त्यांना साधता आले नाही. डॉ. लिस्टरची पद्धत क्लिष्ट होतीच व हा सुरुवातीचा काळ असल्याने डॉ. लिस्टर सतत त्याच्या पद्धतीत सुधारणा करत होता. डॉ. लिस्टरची पद्धत टाळण्याचे अजून एक कारण होते ते म्हणजे शस्त्रक्रियेचा वाढता खर्च!
मात्र डॉ. लिस्टरने त्याच्या विरोधकांना काहीही दोष दिला नाही, वा त्यांच्यावर तो रागावलाही नाही. डॉ. लिस्टर अतिशय सह्रदय होता. रुग्णांच्या वेदना, दु:खे कशी कमी होतील यासाठी त्याची इतकी धडपड होती की, तो अगदी आपल्या मुन्नाभाईसारखा[१] त्याच्या रुग्णांबरोबर भावनिक नाते जोडत असे.
डॉ. लिस्टरची पद्धती रुजायला सुमारे बारा वर्षे इतका मोठा काळ लागला. डेन्मार्कमधील आणि जर्मनीतील सर्जन्स्नी या असेप्टिक तत्त्वांचा वापर सर्वांत आधी व योग्य तर्हेने केला. त्यात त्यांना अतिशय चकित करणारे असे यश लाभले. उदाहरणार्थ, शस्त्रक्रियेनंतर होणार्या जंतुसंसर्गामुळे होणार्या मृत्यूचे प्रमाण म्युनिख येथे ८०%वरून पार शून्यावर आले. १८७५च्या सुमारास डॉ. लिस्टरची पद्धती युरोपात बर्यापैकी मान्यता पावली होती. मात्र खुद्द इंग्लंडमधील सर्जन्स् डॉ. लिस्टरची पद्धती समजून घेऊ शकले नाहीत. मात्र १८७७ साली डॉ. लिस्टरची 'प्रोफेसर ऑफ सर्जरी' म्हणून लंडनमधील किंग्ज् कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेमणूक झाल्यानंतर इंग्लिश सर्जन्स्नी ती पद्धती हळूहळू स्वीकारायला सुरुवात केली.
साधारणतः १८७९च्या सुमारास डॉ. लिस्टरची अँटिसेप्टिक सर्जरी जगन्मान्य झाली.
इकडे डॉ. लिस्टरदेखील या असेप्टिक तत्त्वाचा वापर करुन शस्त्रक्रियेमध्ये नवनवीन सुधारणा करण्यात मग्न होता. उदाहरणार्थ, १८७७मध्ये स्टरलाईज्ड (निर्जंतुक) चांदीच्या तारेने तुटलेली हाडे जोडून ती तार तशीच शरीरात ठेवली तरी अपायकारक ठरते, हे त्याने दाखवून दिले. १८८०च्या सुमारास निर्जंतुक केलेल्या 'कॅटगट'ने त्याने शरीरांतर्गत टाके घालायला सुरुवात केली. हे टाके आतल्या आत आपोआप विरघळत असत. (त्याआधी हे टाके रेशमाच्या धाग्याने घातले जात व मग हे रेशीम ओढून बाहेर काढले जाई - ज्याचे दुष्परिणामच जास्त होते.)
१८८३ साली व्हिक्टोरिया राणीने डॉ. लिस्टरना 'सर' या पदवीने सन्मानित केले.
१८९७ साली डॉ. लिस्टरला लॉर्ड ही पदवी प्रदान केली गेली.
१९०२ साली डॉ. लिस्टरला ऑर्डर ऑफ मेरिट हा सन्मान मिळाला.
१८९१च्या सुमारास ब्रिटिश इन्स्टिट्यूट ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनची उभारणी सुरू झाली. त्यात डॉ. लिस्टरचे योगदान होतेच. १९०३पासून हीच संस्था डॉ. लिस्टरच्या सन्मानाप्रीत्यर्थ 'लि'स्टर इन्स्टिट्यूट' म्हणून ओळखली जाऊ लागली.
१० फेब्रुवारी, १९१२ या दिवशी डॉ. लिस्टरने वाल्मर, केंट, इंग्लंड येथे जगाचा निरोप घेतला. जसजसा काळ लोटला तसतशी शस्त्रक्रियेची साधने व पद्धती बदलत गेल्य, पण डॉ. लिस्टरने जे असेप्टिक, तत्त्व तत्त्व, ते या सगळ्या सुधारणांसाठी एक पायाभूत तत्त्व ठरले.
डॉ. लिस्टर व डॉ. पाश्चर हे एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यांना एकमेकांबद्दल आदरही होता. या असेप्टिक तत्त्वासाख्या क्रांतिकारी कामगिरीमागे डॉ. पाश्चरचे जे अनमोल शोधकार्य होते, त्याचा डॉ. लिस्टरला कधीही विसर पडला नाही. फेब्रुवारी, १८७४मध्ये डॉ. पाश्चरला त्याने एक पत्र लिहिले. यात त्याने डॉ. पाश्चरचे मनापासून आभार मानले होते व असेप्टिकची मूलभूत तत्त्वे समजावून दिल्याबद्दल डॉ. पाश्चरची वाखाणणी केली होती. जेव्हा डॉ. पाश्चरचा त्याच्या सत्तरीत वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींकडून जाहीर सत्कार करण्यात आला, तेव्हा डॉ. लिस्टरकडे पाहत पाश्चर म्हणाला, "आता सारा भविष्यकाळ याच्या हातात आहे. मानवी दु:खे दूर करण्यासाठी त्याने जे काही योगदान दिलेले आहे त्याला तोड नाही."
१९व्या शतकातील एक अतिशय महान व्यक्तिमत्त्व असा डॉ. लिस्टरचा गौरवपूर्ण उल्लेख अजूनही केला जातो.
लेखकाचे निवेदन - लेखात अनेक ठिकाणी इंग्रजी शब्दांचा नाईलाजाने वापर करावा लागत आहे याकरता दिलगीर आहे. कारण हेच शब्द आपल्या नित्य वापरातले झाले आहेत.
तळटीप -
[१] हिंदी चित्रपट - मुन्नाभाई एम्. बी. बी. एस्.
संदर्भसूची -
लेखात उल्लेख आलेल्या महत्त्वाच्या संदर्भांसंबंधित संकेतस्थळे -
[१] http://en.wikipedia.org/
[२] https://answersingenesis.org/creation-scientists/joseph-lister-father-of...
[३] http://www3.bc.sympatico.ca/st_simons/cr9801.htm
चित्रांचे तपशील -
चित्र क्र. १: डॉ. जोसेफ लिस्टर, स्रोत - पॉप्युलर सायन्स वीकली (व्हॉल्यूम ८०), १९१२, प्रताधिकारमुक्त.
चित्र क्र. २: डॉ. जोसेफ लिस्टर © Wellcome Library, London, http://wellcomeimages.org Copyrighted work available under Creative Commons Attribution only licence CC BY 4.0
चित्र क्र. ३: केन्सिंग्टन, लंडन येथील जोसेफ लिस्टरचा पुतळा. © Matt Brown from London, England (Jenner Uploaded by Snowmanradio) [CC-BY-2.0 (http://creativecommons.org/licenses/by/2.0)], via Wikimedia Commons
अवांतर माहिती -
[१] आपल्या नित्याच्या वापरातले बँडएड (जॉन्सन अँड जॉन्सन) बनवण्यामागे डॉ. लिस्टरचीच मूलभूत प्रेरणा होती.
[२] १९२८च्या सुमारास लिस्टरीन या माऊथवॉशची केलेली जाहिरात - Nothing exceeds halitosis (bad breath) as a social offense. Nothing equals Listerine as a remedy. डॉ. लिस्टरच्या नावावरूनच हे लिस्टरीन माउथवॉश हे नाव देण्यात आले.
[३] microorganisms - any organism too small to be viewed by the naked eye, as bacteria, protozoa, some fungi and algae.
[४] सूक्ष्मजीव = जंतू = बॅक्टेरिया
[५] antiseptic - free from or cleaned of germs and other microorganisms.
Antiseptics are antimicrobial substances that are applied to living tissue/skin to reduce the possibility of infection, sepsis, or putrefaction. Antiseptics are generally distinguished from antibiotics by the latter's ability to be transported through the lymphatic system to destroy bacteria within the body, and from disinfectants, which destroy microorganisms found on non-living objects.
[६] aseptic - free from contamination caused by harmful bacteria, viruses, or other microorganisms; surgically sterile or sterilized.
- (of surgical practice) aiming at the complete exclusion of harmful micro-organisms.
[७] infection - जंतुसंसर्ग
[८] sterilized - निर्जंतुक केलेले
[९] carbolic acid - Also called carbolic acid, hydroxybenzene, oxybenzene, phenylic acid. A white, crystalline, water-soluble, poisonous mass, C6H5OH, obtained from coal tar, or a hydroxyl derivative of benzene: used chiefly as a disinfectant, as an antiseptic, and in organic synthesis.
प्रतिसाद
सहजसोप्या भाषेत सुंदर
सहजसोप्या भाषेत सुंदर लिहिले आहे. आजकाल शस्त्रक्रिया इतक्या वेदनारहित झाल्या आहेत कि त्याकाळी रुग्णांनी कसे सहन केले असेल याची कल्पनाही करवत नाही. अर्थात सर्व श्रेय या संशोधकांनाच.
सुरेख.
सुरेख.
खूप रंजक माहिती. छान आहे लेख!
खूप रंजक माहिती. छान आहे लेख!
शशांकराव,
शशांकराव,
अतिशय अभ्यासपूर्ण रोचक लेख ! आपले अधिक कौतुक आहे कारण खरे म्हणजे हा लेख एखाद्या डॉक्टरांने अथवा वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीने लिहावा इतका माहितीपूर्ण झाला आहे. खूपच वाचन आणि अभ्यास करावा लागला असेल ! पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन !
वा, मस्त. नेहमीसारखे सहज,
वा, मस्त. नेहमीसारखे सहज, रोचक आणि माहितीपूर्ण
छन ,महितिपुर्ण सह्ज सुलभ
छन ,महितिपुर्ण सह्ज सुलभ भाषेतिल लेख आवडला.नुकतच डॉक्टर वि.ना.श्रीखंडे यांच ...आणि दोन हात वाचल त्यात डॉक्टर लिस्टरबद्दल माहिती वाचली होती.लीस्टर आणि पाश्चरच्या पूर्वी सेमेलवीस नावाच्या हंगेरियन स्त्रीरोग तज्ञाने जंतू संसार्गावर विचार केला होता. त्यांनी डॉक्टरांनी स्वच्छ हातांनी स्त्रियांची तपासणी करावी म्हटलं या विधानावरही सहकार्यानी गदारोळ केला.त्याच्यावर बहिषकार घातला,त्याला वेड्यात काढल.त्याचा म्रुत्यु वेड्याच्या इस्पितळात झाला.नन्तर त्याच स्मारक झाल.डॉक्टर श्रीखंडे म्हणतात.आपल म्हणण ठणकाउन सांगण्यासाठी लीस्टरसारख प्रभावी व्यक्तिमत्व लागत.दुर्दैवाने ते सेमेलविसकडे नव्हत.तुमचा लेख वाचून हे सर्व आठवल.
फार मस्त आणि रोचक लेख
फार मस्त आणि रोचक लेख
अप्रतिम आणि अप्रतिमच !
अप्रतिम आणि अप्रतिमच !
फारच सुंदर!
फारच सुंदर!
अतिशय सुंदर माहीती,
अतिशय सुंदर माहीती,