भौतिकशास्त्रज्ञ उंच इमारतीवरून दगड टाकून, रसायनशास्त्रज्ञ अॅसिड्स् आणि बेसेस मिसळून, जीवशास्त्रज्ञ गांडुळांची चिरफाड करून अनेक प्रयोग करू शकतात. खगोलशास्त्रज्ञ मात्र केवळ बघ्याची भूमिका घेऊ शकतात. जे काही प्रकाशकण जसे काही जमवता येतील, त्यावर आधारित भाकितं करत गुजराण करायची, असा हा व्यवसाय. याला जोड असते ती सक्षम तंत्रज्ञांची - मोठी दुर्बीण कशी बनवायची; अनेक छोटेछोटे वक्र आरसे वापरून अंधुकांतल्या अंधुक अशा एखाद्या स्रोताचा एकाचवेळी निर्माण झालेला प्रकाश कसा जमवायचा; रेडिओ तरंगलांबीच्या अधिकाधिक विद्युतचुंबकीय लहरी कशा जमवायच्या वगैरेसारखे प्रश्न ते सोडवत असतात.
अर्थात दुर्बिणी अगदीच अलीकडच्या, जेमतेम चारशे वर्षं जुन्या. मानवाची आकाशाबद्दलची ओढ अनादी काळापासूनची. बदलाकडे आणि विविधतेकडे सगळेच आकृष्ट होतात. लालसर / निळसर तारे, भरकटणारे ग्रह, कलेकलेने वाढणारा चंद्र, अवचित येणारा धूमकेतू, अचानक देदीप्यमान बनून क्षणात भस्म होणारी एखादी उल्का. मानवानं त्यांना देव वा दानवदेखील बनवून टाकलं. पण काही लोक गणितं मांडून त्यांची नियमितता, त्यांना कदाचित लागू होतील असे नियमपण तपासत होते.
मानवाचं स्थान खास आणि त्यामुळे मानवाचा वास असलेल्या ग्रहाचंही. खरंतर सुरुवातीला पृथ्वीचा, आणि कदाचित सूर्याचा, इतर ग्रहांशी संबंध लावलाच गेला नसणार. मग सूर्याचं घड्याळसुद्धा एकाच दिवसाचं, म्हणून सूर्यचंद्रासकट सगळं आकाश पृथ्वीभोवती फिरतं हे ठरलं.
दुसर्या शतकात टॉलमीने (Claudius Ptolemy, 90-168) आधी प्रचलित असलेल्या धारणांना योग्य बैठक दिली. ग्रहांची वक्रगती दाखवण्यासाठी आजकाल मिळणाऱ्या स्पायरोग्राफ या खेळण्यातल्यासारखी चक्रं त्याने वापरली (आकृती १). ग्रहाची कक्षा एक वर्तुळ नसून ती एका चक्रावर फिरणारं छोटं चक्र अशी असे, या विचारांमध्ये हजारांहून अधिक वर्षं काही फरक पडला नाही. (चित्र विकिपेडीयावरून साभार)
सोळाव्या शतकात युरोपात ब्राहेनं (Tycho Brahe, 1546-1601) दाखवलं की पृथ्वी जरी विश्वाच्या केंद्रस्थानी असली आणि सूर्य पृथ्वीभोवती फिरत असला, तरी इतर ग्रह मात्र सूर्याभोवती फिरतात (आकृती २). याच्या कितीतरी आधीच वार्षिक बदलांचा संबंध ऋतूंशी लावला गेला होता. सूर्यचंद्रांच्या ग्रहणांचं गणितही मांडून झालं होतं. माणसाच्या दैनंदिन तसेच संपूर्ण आयुष्यातील घडणार्या घटनांवर या ग्रहांचा कसा प्रभाव असतो हे सांगून काही लोक मोकळे झाले होते. भारतात यज्ञवेदी बनवण्याचं गणित आणि भविष्य वर्तवणं यातच अनेकांनी आपलं आयुष्य वेचलं. पण इतर काही मात्र बधले नव्हते. (चित्र विकिपेडीयावरून साभार).
नीलकंठ सोमयाजीनं (Nilakantha Somayaji, 1444-1544) ब्राहेच्या आधीच त्याच्याहीपेक्षा सरस (पण तशीच) पद्धत योजली होती. कोपरनिकस (Nicolaus Copernicus, 1473-1543) सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात असं नि:संदिग्धपणे म्हणणारा पहिला होता. हा अतिशय महत्त्वाचा बदल होता. पुढचे महत्त्वाचे बदल घडले ते गॅलिलीओ (Galileo Galilei, 1564-1642) आणि केपलर (Johannes Kepler, 1571-1630) यांच्या काळात. लीपरशेनं (Hans Lippershey 1570-1619) दुर्बिणीचा शोध १६०८मध्ये लावला आणि गॅलिलीओनं १६०९मध्ये दुर्बीण पहिल्यांदा आकाशाकडे वळवून एक नवं दालन (केवळ?) उघडलं. गॅलिलीओनं चंद्रविवरांच्या, गुरूच्या उपग्रहांच्या अणि शुक्राच्या कलांच्या केलेल्या काटेकोर सचित्र नोंदी अतिशय महत्त्वाच्या ठरल्या. कला असतात तेव्हा शुक्र मोठा दिसतो (कारण तो पृथ्वीला जवळ असतो) आणि पूर्ण दिसतो तेव्हा दूर असतो. हे टॉलमीच्या पद्धतीत बसत नव्हतं. तसंच गुरूचे उपग्रह पृथ्वीभोवती न फिरता चक्क गुरूभोवती फिरत होते. त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय? 'मूल कोणाकडे जातं यावरून आई ओळखायची' असं सांगणाऱ्या तेनालीरामला हे वाटेल किंवा हुशार असलात तर तुम्हांलाही. पुस्तकी ज्ञानानं परिपूर्ण धर्मांध लोकांना ते पटण्यासारखं नव्हतं. गॅलिलीओला अर्थातच त्यामुळे बराच त्रास सहन करावा लागला.
ब्राहेचं, 'पृथ्वी केंद्रस्थानी आहे' असं म्हणणं जरी चुकीचं असलं तरी त्यानं ठेवलेल्या नोंदी अतिशय महत्त्वाच्या होत्या. त्यांचा वापर करून केप्लरनं ग्रहांच्या कक्षांचे तीन नियम प्रतिपादित केले. जर एखादं नियमाप्रमाणे केलेलं भाकीत खरं ठरलं तरच विज्ञानात त्या नियमाचं महत्त्व. १६३१मध्ये शुक्र सूर्यबिंबावरून सरकत जाईल (२०१२मध्ये झालेल्या व्हीनस ट्रान्झिटप्रमाणे) असा दावा केप्लरनं केला. आणि अहो आश्चर्यम्! झालंही तसंच! यामुळे पृथ्वीला केंद्रस्थानी मानणारे अडचणीत आले. पण वैज्ञानिकांच्या दृष्टीनं दोन विरोधी प्रमेयांपैकी एक चुकीचं ठरणं एक प्रकारे कौलच असतो, प्रगतीची नांदी असते.
यानंतरचा उल्लेखनीय महाभाग होता न्यूटन (Issac Newton, 1642-1727). ही एक वल्ली होती. बायबलचे नियम प्रमाण मानून अनेक भलतेसलते प्रयोग करण्यात त्याचा बहुतांश वेळ जाई. पण उरलेल्या वेळात कॅल्क्युलस आणि गुरुत्वाकर्षणाच्या नियमांवर त्यानं अमूल्य काम केलं. आपल्यापर्यंत ते पोचवण्याचं बरचसं श्रेय हॅलीलाही (Edmond Halley, 1656-1742) द्यायला हवं. धूमकेतूंच्या कक्षा मांडता आल्या तर केप्लरचे नियम सिद्ध करता येतील, हे त्याच्या लक्षात आलं. न्यूटननं तशा कक्षांची गणितं सोडवली होती. हॅली त्याला भेटायला गेला तेव्हा त्याला ती सापडेनात, म्हणून त्यानं ती पुन्हा सोडवली. त्याच्याशी संबंधित इतर अनेक गोष्टींची भर घालून हॅलीच्या खर्चानं प्रिन्सिपिका (Philosophiæ Naturalis Principia Mathematica) हा ग्रंथ प्रकाशित केला. हॅलीनं धूमकेतूंवर शनीमुळे आणि गुरूमुळे होणारा गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव गणितात समाविष्ट करून दाखवलं की, १६८०मध्ये आणि १६८२मध्ये दिसलेला धूमकेतू एकच होता. एवढंच नाही, तर तोच आधी १५३१मध्ये वगैरेही दिसला होता. नंतर ख्रिस्तपूर्व २४०पर्यंत हॅलीच्या धूमकेतूच्या नोंदी सापडल्या आहेत. अनेकदा अशा घटना जनमानसात एखाद्या विषयाची रुची निर्माण करायला कारणीभूत ठरतात.
मार्क ट्वेनचा (Mark Twain, 1835-1910) जन्म झाला त्या वर्षी हॅलीचा धूमकेतू दिसला होता. १९०९मध्ये त्यानं लिहिलं की, तो हॅलीबरोबर आला आणि त्याच्याच बरोबर या जगातून जाणार. झालंही तसंच. त्या काळात पंचाहत्तर वर्षांचं आयुष्य थोडंथोडकं नव्हतं. आता हॅलीच्या धूमकेतूचं दर्शन दोनदा होणं जास्त शक्य आहे. १९८६मध्ये, हॅलीच्या पुढच्या भेटीत, इंग्लंडच्या टपालखात्यानं त्यावर आधारित एक सुंदर तिकीट काढलं. भारताच्याही टपालखात्यानं १९८५मध्ये हॅलीच्या धूमकेतूवर एक तिकीट काढलं होतं. माझा खगोलशास्त्राचा अभ्यासही थोडाफार १९८६मधील हॅलीच्या धूमकेतूच्या नांदीनेच झाला. वडिलांनी प्रेमानं घेऊन दिलेल्या दोन इंची दुर्बिणीने (हा दुर्बिणीच्या भिंगाचा व्यास) कापसाच्या बोळ्यासारखा धूसरसा दिसला आणि अनेकांना दाखवता आला. ते वर्ष हॅलीदर्शनासाठी अतिशय वाईट होतं. पृथ्वी आणि धूमकेतू नेमके सूर्याच्या विरुद्ध बाजूंना होते.
गॅलिलीओच्या दुर्बीण आकाशाकडे वळवण्याच्या घटनेमुळे अवकाशाच्या अभ्यासात आमूलाग्र बदल घडून आला. जास्त प्रकाशकण एकत्र करणं शक्य झालं. आपल्या डोळ्यांनी सेकंदाच्या पंचविसाव्या भागात जितके प्रकाशकण गोळा होतील, तेवढेच आपण ‘साठवू’ शकतो. दुर्बिणींनाही प्रकाशकण साठवणं अजून अवगत नव्हतं. पण त्यांच्या भिंगांचा व्यास मोठा असल्यानं जास्त कण गोळा होऊन आधीपेक्षा दूरवरचे किंवा अंधुक स्रोत दिसू शकत. चांदीच्या क्षारांचा उपयोग फोटो काढण्यात एकोणिसाव्या शतकात होऊ लागला. त्या शतकाच्या शेवटी खगोलशास्त्रात चांदीच्या क्षारांचा पातळ पापुद्रा असलेल्या काचेच्या प्लेट्स्चा, कायमस्वरुपी आकाशचित्र बनवण्याकरता उपयोग होऊ लागला. कॅलटेकच्या (कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) पालोमार वेधशाळेतून आकाशाच्या उत्तर गोलार्धाचे दोन नकाशे या तंत्रानं बनवले गेले. प्लेट्स्वर पडणाऱ्या फक्त दोन टक्के प्रकाशाची नोंद होईल इतकीच त्या क्षारांची ग्रहणशक्ती होती, पण तीही अभ्यासकांकरता एक पर्वणीच होती.
जास्त प्रकाशकण गोळा करायला मोठमोठ्या दुर्बिणी बनवणं सुरु झालं. पालोमारची पाच मीटर व्यास असलेली १९४८ साली बनलेली हेल दुर्बीण अजूनही अनेक प्रयोगांमध्ये महत्त्वाचा भाग बजावत असते. पाच मी. व्यास म्हणजे डोळ्याच्या साधारण पाचशे पट, म्हणजे डोळ्याच्या क्षेत्रफळाच्या ५०० x ५०० = २,५०,००० पट इतके जास्त क्षेत्रफळ. त्यात पुन्हा आपले डोळे सेकंदाच्या पंचविसाव्या भागात मिळणारेच प्रकाशकण गोळा करु शकतात. ही दुर्बीण मात्र अर्धा तास, एक तास प्रकाशकण गोळा करू शकते. म्हणजे २,५०,००० x २५ x ३,६०० = २२.५ अब्जपट प्रकाशकण. म्हणजे डोळ्यांनी दिसू शकतात त्यापेक्षा कितीतरी अंधुक स्रोत या दुर्बिणींनी दिसू शकतात. सुरुवात फक्त भटकणारे ग्रह, चंद्रकोर यांच्या ध्यासापासून झाली आणि पाहतापाहता आपण विश्वात दूरवर आणि खोलवर वेध घेऊ लागलो. विविध प्रकारचे तारे, तारकापुंज, दीर्घिका, पल्सार, क्वेसार, कृष्णविवरं अशी एकेक रहस्य उलगडत होती.
वैज्ञानिक यशाचा एक मापदंड असतो प्रकाशित केले गेलेले प्रबंध. प्रत्येक दुर्बिणीचा वापर करून लिहिलेले प्रबंध घेतले आणि त्या आकड्याला त्या दुर्बिणीच्या आरशाच्या क्षेत्रफळाने भाग दिल्यास त्या दुर्बिणीचे फलमान कळते. हा आकडा पालोमारच्या हेल दुर्बिणीसाठी सगळ्यांत मोठा होता. पण आकार म्हणजेच सर्व काही नाही. नव्या दुर्बिणी फोटोग्राफिक प्लेट्स्ऐवजी अद्ययावत चार्ज कपल्ड डिव्हायसेस् (सीसीडी, CCD) वापरत. ते एक महत्त्वाचं पाऊल होतं. अवकाशात स्थित हबल दुर्बिणीने हेलला मागे टाकलं, कारण प्रकाशकण पृथ्वीच्या वातावरणात विखुरले न जाता जमा करता आले, तर ती चित्रं जास्त अचूक असतात. या दुर्बिणीचं नाव पॅसॅडेनातील माऊंट विल्सन वेधशाळेतून निरीक्षणं करून विश्वप्रसरणाचा दावा करणाऱ्या हबलच्या नावावरून (Edwin Hubble, 1889-1953) ठेवलं होतं. त्यानं दीर्घिकांच्या दूर जाण्याचा जो वेग मोजला तो चुकीचा होता, पण तंत्र योग्य होतं. स्लोन दुर्बीण पृथ्वीवरूनच, पर्यायानं वातावरणातून, आकाशाचा वेध घेणारी. तरी आकाशाच्या बऱ्याच जास्त भागाचे सर्वेक्षण केल्यानं त्या दुर्बिणीने हबललाही मागे टाकलं. अर्थात प्रत्येक दुर्बिणीची कोणतीतरी खासीयत असते ज्यायोगे त्या निरीक्षणांकरता तीच दुर्बीण सर्वांत उपयोगी असते.
आता आपण जे अंधुक / दूरवरचे स्रोत पाहू शकतो, त्यावरून असं लक्षात आलं की, यामध्ये बरेच असे असतात ज्यांची तेजस्विता (luminosity) बदलत असते. ‘अॅस्ट्रॉनॉमिकल' हे विशेषण अनेकदा मोठ्या अंतराकरता किंवा मोठ्या कालावधीसाठी वापरलं जातं. या खगोलीय स्रोतांमधील बदलही आपल्या आयुष्याच्या मानानं प्रदीर्घ असतात. पण अनेक (हजारो, लाखो, कोट्यवधी) स्रोतांचा अभ्यास केला की संख्याशास्त्राच्या आधारे ठोकताळे बांधता येतात. मग त्या अनुषंगानं अजून निरीक्षणं करुन ते आडाखे पक्के करायचे आणि विश्वाबद्दलची आपली समज योग्य त्याप्रमाणे बदलवायची.
वातावरणाबाहेर जाणं, आणि सीसीडी वापरणं यांव्यतिरीक्त इतर दोन बदल संबंधित खगोलशास्त्रासाठी असामान्य ठरले: (१) डेटा साठवण्याची क्षमता वाढली. बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्सच्या कावलूरमधील दूर्बिणीतून मी पहिली निरीक्षणं केली तेव्हा डेटा एकशेपन्नास मेगाबाईट क्षमतेच्या ९-ट्रॅक मॅग्नेटिक टेप्सवर साठवावा लागे. आता माझ्या लॅपटॉपवर त्यापेक्षा सहा हजारपट डेटा मावतो, आणि मोठे सर्व्हे गिगा आणि टेराबाईटच नाही, तर पेटा आणि एक्साबाईटमध्ये डेटा गोळा करतात. यातील प्रत्येक युनिट अगोदरपेक्षा हजारपटीने मोठं. या सुधारणांमुळे डेटाचे पुन:पुन्हा विश्लेषण करुन वेगवेगळ्या प्रकारची मीमांसा शक्य आहे. (२) इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळणाची झालेली प्रगती. यामुळे डेटा घेऊन झाला की संगणकाच्या डिस्कवर पटकन लिहून पुढील निरीक्षण लगोलग घेणं शक्य आहे. यासाठी दुर्बीण दुसऱ्या दिशेला वळवायची असल्यास तेही चटकन करणं शक्य आहे. डेटाचं पृथक्करण लवकर होऊ शकतं आणि पृथ्वीच्या एका भागातून लगोलग दुसरीकडे माहिती कळवून वेगवेगळ्या दुर्बिणी एकत्रितपणे काम करू शकतात.
या बदलांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये विशिष्टकालिक आढावे / निरीक्षणं घेणं (सिनॉप्टिक सर्व्हेज्, Synoptic Surveys) शक्य झाले आहेत. आकाशाच्या मोठ्या भागाची पुनःपुन्हा निरीक्षणं घ्यायची आणि काही तासांमध्ये किंवा मिनिटांमध्ये बदलणारे स्रोत आहेत का, हे शोधून काढायचं. यांना सरसकटपणे ‘ट्रान्झियन्ट’ (transient) असं म्हटलं जातं - अस्थायी किंवा अल्पजीवी. माझं संशोधन याच क्षेत्रातलं आहे. यात महास्फोटाद्वारे मृत्यू पावणारे तारे असतात, प्रचंड ऊर्जेचे गॅमा-रे स्फोट असतात, जोडताऱ्याचे वस्तुमान चोरून प्रखर बनणारे तारेसुद्धा असतात. अशा विविध अनित्य स्रोतांचा एक तक्ता आकृती क्र. ३मध्ये आहे. आम्हांला निरीक्षणं झाल्या झाल्या लगेच त्यांत असलेले हे अनित्य स्रोत शोधून महाजालावर त्यांची माहिती टाकायची असते. अनेक लोक आमच्या स्ट्रीमकडे लक्ष ठेवून असतात. त्यांच्या क्षेत्रातील अचिर स्रोत निदर्शनास आल्यास ते लगेच अजून निरीक्षणं मिळवू शकतात. या एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या संशोधनामुळे विश्वाबद्दलच्या आपल्या माहितीत वेगानं भर पडते आहे. त्याचवेळी आपल्याला माहीत करुन घेण्यासारखं अजून किती जास्त आहे ते ही लक्षात येतं.
हे सर्व का करायचं, हा प्रश्न कधीकधी विचारला जातो. आपण कुठून आलो, का आलो, अजून कुठे सजीवसृष्टी असेल का असे प्रश्न अर्थातच याच्या मुळाशी असतात. त्याशिवाय अनेकदा तंत्रज्ञान विकसित होण्यासाठी त्याची खास मागणी असावी लागते. अनेकदा वैज्ञानिक क्षेत्राच्या अशा टोकाच्या मागण्या असतात. खगोलशास्त्रीय सर्वेक्षणांबद्दल बोलायचं झाल्यास २०२०च्या सुमारास चिलेमधे होऊ घातलेला लार्ज सिनॉप्टिक सर्व्हे टेलेस्कोप (LSST) दररोज एक कोटी ट्रान्झियन्ट्स् शोधणार आहे आणि या सर्वांच्या निरीक्षणांनतर एका मिनिटात पृथक्करण व्हायला हवं असं डिझाईन होऊ घातलं आहे. तिसरी एक महत्त्वाची गोष्ट सिनॉप्टिक सर्वेजमुळे गेल्या काही वर्षांमध्ये शक्य झाली आहे. कॅटॅलीना स्काय सर्व्हे (CSS) लघुग्रह शोधण्यासाठी अस्तित्वात आला. गुरू-मंगळादरम्यानचे ‘मेन-बेल्ट’ लघुग्रहच नाही, तर पृथ्वीला धोका पोचवू शकतील असे एनईओ - निअर अर्थ ऑब्जेक्ट्स्सुद्धा (NEO - Near Earth Objects). सप्टेंबर २०१४च्या पहिल्या आठवड्यात असा एक लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेला. तो सीएसएसने (CSS) काही दिवस आधी शोधला होता. तेवढ्या वेळात फार काही करणं कदाचित शक्य झालं नसतं. पण जसजशी लघुग्रहांची यादी पूर्णत्वाकडे जाईल आणि अवकाश तंत्रज्ञानात प्रगती होईल, तसं ते संकट टाळणं जास्त शक्य होईल.
खगोलीय बदलांच्या या ध्यासामुळे आपल्याला संपूर्ण विश्वाच्या रचनेबद्दल कळत आहे, त्याचप्रमाणे आपल्याच सूर्यमालेबद्दलही अधिकाधिक माहिती होते आहे. अलीकडेच रोझेटा यान एका धूमकेतूजवळ पोचलं आहे आणि त्यावर उतरायची तयारी सुरू झाली आहे, व्हॉएजरनं सूर्यमाला काही महिन्यांपूर्वी ओलांडली; केप्लर उपग्रहानं इतर ताऱ्यांभोवती फिरणारे हजारो ग्रह शोधले; गाया (Gaia) उपग्रहानं अलीकडेच आपल्या दीर्घिकेतील एक अब्ज ताऱ्यांची स्थानं अचूक मोजण्याची मोहीम सुरू केली आणि हा लेख तुमच्या हातात पडेपर्यंत भारताच्या मॉम - मार्स ऑरबिटर मिशननं (MOM - Mars Orbiter Mission) मंगळाभोवती प्रदक्षिणा सुरू केल्या असतील. या सध्या चालू असलेल्या सर्व शोधमोहिमांमधून मिळणार्या माहिती व इतर शोधांद्वारे आपली मते, गृहीतके आणि कल्पना सतत तपासत राहूया आणि त्यांना अद्ययावत ठेवूया.
संदर्भ-
विकिपीडियावरील लेख -
Tycho Brahe : http://en.wikipedia.org/wiki/Tycho_Brahe
Nicolaus Copernicus : http://en.wikipedia.org/wiki/Nicolaus_Copernicus
Galileo Galilei : http://en.wikipedia.org/wiki/Galileo_Galilei
Edmond Halley : http://en.wikipedia.org/wiki/Edmond_Halley
Edwin Hubble : http://en.wikipedia.org/wiki/Edwin_Hubble
Johannes Kepler : http://en.wikipedia.org/wiki/Johannes_Kepler
Hans Lippershey : http://en.wikipedia.org/wiki/Hans_Lippershey
Issac Newton : http://en.wikipedia.org/wiki/Isaac_Newton
Claudius Ptolemy : http://en.wikipedia.org/wiki/Ptolemy
Nilakantha Somayaji : http://en.wikipedia.org/wiki/Nilakantha_Somayaji
Mark Twain : http://en.wikipedia.org/wiki/Mark_Twain
लेखात उल्लेख आलेल्या महत्त्वाच्या संदर्भांसंबंधित संकेतस्थळे -
CSS: http://www.lpl.arizona.edu/css/
Gaia: http://sci.esa.int/gaia/
Kepler: http://kepler.nasa.gov/
LSST: http://www.lsst.org/lsst/
MOM: http://www.isro.org/pslv-c25/mission.aspx
Rosetta: http://sci.esa.int/rosetta/
Voyager: http://voyager.jpl.nasa.gov/
आकृत्यांचे तपशील -
आकृती क्र. १ : By Fastfission, via Wikimedia Commons, http://en.wikipedia.org/wiki/Deferent_and_epicycle#mediaviewer/File:Ptol...
आकृती क्र. २ : By Fastfission, via Wikimedia Commons, http://en.wikipedia.org/wiki/Tycho_Brahe#mediaviewer/File:Tychonian_syst...
आकृती क्र. ३ : Updated version of Fig. 1 from Eyer and Mowlavi, 2008, JPhCS, 118, 1, 012010 (arXiv:0712.3797), © Laurent Eyer
प्रतिसाद
सुंदर लेख! नीलकंठ सोमयाजी
सुंदर लेख! नीलकंठ सोमयाजी बद्दल काहीच माहिती याआधी नव्हती.
जोडताऱ्याचे वस्तुमान चोरून प्रखर बनणारे तारे हे काही तासांत किंवा मिनिटांमध्ये बदलू शकतात हे माहिती नव्हते. सर्वसाधारणपणे तार्याच्या वस्तुमानाच्या किती पट वस्तुमान चोरल्यानंतर तेजस्वितेमध्ये लक्षणीय फरक पडेल, ह्याचे (अंतराच्या प्रमाणात) काही ठोकताळे असतात काय? तसेच, स्रोत निदर्शनास आल्यावर त्याचा उगम कशामुळे आहे हे कसे कळते?
रच्याकने, आकृती ३ टाकायची राहिली आहे की काय? (हॅलीच्या धूमकेतूवर आधारित काढलेले टपाल तिकीट)
@भास्कराचार्य,
@भास्कराचार्य, प्रताधिकारमूक्त टपालतिकीटाचे चित्र मिळू शकले नाही त्यामुळे ते काढावे लागले. परंतू क्रमांकांमध्ये योग्य ते बदल करायचे राहून गेले. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. योग्य ते बदल केले आहेत.
> जोडताऱ्याचे वस्तुमान चोरून
> जोडताऱ्याचे वस्तुमान चोरून प्रखर बनणारे तारे हे काही तासांत किंवा मिनिटांमध्ये बदलू शकतात हे माहिती नव्हते.
वस्तुमान साठत जाऊन मगच तसं होतं.
> सर्वसाधारणपणे तार्याच्या वस्तुमानाच्या किती पट वस्तुमान चोरल्यानंतर तेजस्वितेमध्ये लक्षणीय फरक पडेल, ह्याचे (अंतराच्या प्रमाणात) काही ठोकताळे असतात काय?
हो, आणि तार्याच्या जातीप्रमाणे यात फरक पडणार.
> तसेच, स्रोत निदर्शनास आल्यावर त्याचा उगम कशामुळे आहे हे कसे कळते?
योग्य उगम शोधणे हाच मुळात एक महत्वाचा प्रोजेक्ट असतो. पुरेशी आणि योग्य प्रकारची निरिक्षणं झाल्यास ते कळणं शक्य होतं.
मस्त लेख! आता एकदा नुसती
मस्त लेख! आता एकदा नुसती बेसिक खगोलशास्त्रातील दुर्बीण कशी असते ते सोप्या भाषेत मायबोलीवर लेख रुपाने लिहावंस ही विनंती.
अश्विनी के +१
अश्विनी के +१