राईत

HDA2014_raai.jpg
दुपारच्या डहाळीवरून
उन्हाचा पिवळा लख्ख पक्षी उतरला
आमराईत कवडसा होऊन
बावचळून सरसरत वर गेली खार
काळ्या पाषाणआडोशाने
सळसळत गेली
एक भेदरट चाहूल
पुन्हा राईत निश्चेष्ट शांतता...


मला आठवली
ती कडेलाच फेकून दिलेली सायकल
तो ठिपक्याठिपक्यांचा मॅक्सी
लाल मातीत घोळसलेला
पायात उरलेली एकच चप्पल
पाठीस टोचणारे खडे
एक कडाडून चावलेला मुंगळा
ज्याचा खूप वेळानंतर जाणवलेला डंखठणका
आणि तो प्रखर कवडसा
दोघांच्या जुळल्या देहओंजळीत खेळणारा
भोवतालचा आसमंत तेव्हा
जाणवूनही न जाणवलेला


पण आज इतक्या वर्षानंतर
पुन्हा इथे आल्यानंतर
किती स्पष्ट दिसली ती रेघोट्यावाली खार
वळसे घेत गेलेली भित्री चाहूल
राईकाळजात चर्र वाजलेला पाचोळा
आणि... कवडशाचा स्तब्ध पक्षी
माझ्या ओंजळफटीतून हतबलपणे निसटत
मातीत मिसळलेला
related1: 

HDA2014_blackseparator.jpg

HDA2014_rangolee12.jpg

HDA2014_blackseparator.jpg
माणिक वांगडे
ManikWangaDe.jpg
माणिक वांगडे या व्यवसायाने फाईन आर्टिस्ट असून सध्या मुंबईत वास्तव्यास असतात. ठाणे येथे झालेल्या अखिल भारतीय ८४व्या मराठी साहित्य संमेलनात त्यांनी भाग घेतला होता. निमंत्रित काव्यवाचनामध्ये त्यांना संधी मिळाली असून कै. शंकर वैद्य यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाल्याचे त्या सांगतात. २००८नंतर त्यांच्या कविता रती, साहित्य, मौज या नियतकालिकांत प्रसिद्ध झाल्या आहेत.

HDA2014_blackseparator.jpg

प्रतिसाद

काही काही शब्द हे दोन शब्दांचे बनले आहेत पण बनलेल्या नव्या शब्दाला वेगळीच ऐट आहे. उदा. पाषाणआडोसा, डंखठणका, देहओंजळ, राईकाळीज, ओंजळफट.

वाह!
कविता खूप आवडली माणिकताई. शब्दांबद्दल केश्वीशी सहमत.
चित्रही खूप छान आहे, राईकाळजात घेऊन जाणारं..

वा ! मस्त कविता.

खूप सुंदर काव्यानुभव.चित्रदर्शी.

सुसंधी दिल्याबद्दल संपादकांचे आधी आभार मानते.
के. अश्र्विनींनी काढलेल्या सुरंगी चित्राबद्दल तसेच
अगदी डोळस प्रतिक्रिया दिलीय त्याबद्दलही धन्यवाद.. चिन्नू, जाई तुमचीही उत्स्फूर्त दाद आवडली. कवितेचवाचनही धीरगंभीर आवाजातल नेटक झालय .भारतीताई , तुमची दाद कवितेला मिळाली ... मन आनंदझुल्यावर स्वार झालय ,पून्हा धन्यवाद..

सॉरी , माझ्या कवितेसाठी चित्र काढणारी 'अश्र्विनी.के' अस म्हणायला हवे ना?..

कविता आणि त्याला अगदी साजेसं हिरवंगार चित्र खूप छान आहे.

राइ कवितेतली आणि चित्रतलिही आवडली

आशय, विषय छान मांडलाय.
----------------------------------------------------------------------
जोडशब्दांबाबत माझे वैम. (जे पूर्ण चुकीचेही असू शकेल) :
क्वचित एखादा जोडशब्द ठीक वाटतो.
प्रमाण अधिक झाल्यास कृत्रिमता जाणवते.
वैम. कृगैन.

छानच ...

आशिका,शोभना शशांकजी आणि उल्हासजी प्रतिसादांसाठी अनेक धन्यवाद .
उल्हासजी आपल्या मताचा मी आदर करते पण मला या रचनेत अशीच शब्दयोजना करायची होती ..
दुरून हळुहळू येणारी एखादी लाट एकदम अंगावर येत भिजवून जाते असा अनुभव द्यायचा होता .
तो वेग काही ठिकाणी अखंड ठेवायचा होता म्हणुन जोडशब्द जरा जास्त.

कविता सुंदर आणि चित्रंही तितकंच सुंदर

धन्यवाद रिया

ठीक...

योग,धन्यवाद.