खरी ओळख

HDA2014_label.jpgकिती सहज लेबलं लावत असतो
आपणच आपल्या मुलांना!

साधं खोडरबर किंवा पट्टी हरवते शाळेत
‘सारख्या कशा गोष्टी हरवतात तुझ्या?
वेंधळ्या...’
चिकटवून देतो आपण लेबल

कधी सांडतं त्याच्या हातून पाणी
किंवा फुटतो हातातून निसटून कप
‘किती सांडतोस, किती कप फोडतोस…
धांदरट…'
चिकटवून देतो आपण लेबल

कधी आठवत नाही त्याला
आपण सांगितलेली कामं
किंवा नादात रमून स्वतःच्या भलतंच करतो काही
‘असं कसं आठवत नाही तुला?
विसरभोळा…'
चिकटवून देतो आपण लेबल

अन कधी त्यानं मनापासून सांगितलेलं
एखादं निरागस सत्य पटलं नाही आपल्याला
‘खरं सांग नक्की काय झालं ते, फसवतोस का?
खोटारडया…'
चिकटवून देतो आपण लेबल

चुकून लागतो त्याचा पाय
जमिनीवर ठेवलेल्या कुठल्या मौल्यवान वस्तूला
‘दिसत नाही का तुला?
आंधळ्या…'

अन् आपण मारलेली हाक त्याने ऐकलीच नाही
किंवा ऐकून 'ओ' दिली नाही
‘ऐकू येत नाही का रे
बहिऱ्या…'

साध्या साध्या गोष्टी
किरकोळ किरकोळ घटनांमध्ये
वेंधळा, धांदरट, विसरभोळा,
खोटारडा, आंधळा, बहिरा, मुका
रागीट, रडका, शेंबडा,
हट्टी, बेजबाबदार, मूर्ख
अशी शेकडो लेबलं
आपल्या पोरांवर
आपणच चिकटवत बसतो

या लेबलांचे व्रण
पोरगं आयुष्यभर
हृदयावर कोरून ठेवून जगत बसतं
यातलं कुठलंच लेबल
ही आपली खरी ओळख नाही
हे कधीच समजून न घेता...

related1: 

HDA2014_blackseparator.jpg

HDA2014_rangolee12.jpg

HDA2014_blackseparator.jpg


प्रसाद शिरगांवकर
HDA_14_PrasadShirgaonkar.jpg

प्रसाद शिरगांवकर हे १९९८पासून मायबोलीकर आहेत. त्यांच्या लिखाणाची सुरुवात मायबोलीवर आणि मायबोलीमुळेच झाली. मायबोलीच्या अनेक दिवाळी अंक व गणेशोत्सवांमध्ये त्यांनी लेखन केले आहे. काव्य, कथा आणि ललितलेखनामध्ये त्यांना विशेष रुची आहे. साधं- सोपं डॉट कॉम (sadha-sopa.com) ही त्यांची स्वतःची कवितांची वेबसाईट २००६मध्ये प्रकाशित झाली आहे. 'आनंदाचं गांव' हा स्वनिर्मित कविता, गझलांचा कार्यक्रम ते २००२पासून सादर करतात व त्याचे पुणे, मुंबई व लंडन येथे अनेक प्रयोग संपन्न झाले आहेत.

HDA2014_blackseparator.jpg

प्रतिसाद

प्रसाद, सुरेख कविता. अगदी त्या छोट्या मुलाच्या मनावर होणार्‍या परिणामांच प्रतिबिंबच शेवटच्या कडव्यात येतं.

आवडली. म्हणजे खरं तर वाईट वाटलं. लहानपणी लागलेली ही ’लेबलं’ खूपजणांच्या मनात न्यूनगंड निर्माण करतात हेच खरं.

सहजसुंदर कविता - सर्व पालकांनी जरुर वाचावी व स्वतः तशी काळजी घ्यायला भाग पाडावी अशी कविता.

लहान मुलांच्या मनाचा इतका तरल विचार फारच थोडे करु जाणे.

आवडली. म्हणजे खरं तर वाईट वाटलं. लहानपणी लागलेली ही ’लेबलं’ खूपजणांच्या मनात न्यूनगंड निर्माण करतात हेच खरं.>>>>> +१११

आवडली :) . अजून एक मुद्दा म्हणजे आंधळ्या वगैरे म्हणताना त्या त्या व्यंगाचं जबरदस्त आव्हान घेऊन जगणाऱ्या जिवांबद्दलची निर्दय असंवेदनशीलता आपण किती सहज जाहीर करत असतो !

सहीच

आशय चांगला वाटला.

आवडली :) . अजून एक मुद्दा म्हणजे आंधळ्या वगैरे म्हणताना त्या त्या व्यंगाचं जबरदस्त आव्हान घेऊन जगणाऱ्या जिवांबद्दलची निर्दय असंवेदनशीलता आपण किती सहज जाहीर करत असतो !>>+१

विचार करायला लावणारी

ह्म्म्म्म....

छान