दिवस आणि (नसलेली?) रात्र

HDA2014_diwasraatra_0.jpgदिवस आपला वाटत असतो … वाटत असतो फक्त
दिवस उठतो, आवरत सुटतो
कुशीत निजली पहाट ढकलून
डोळ्यांमधलं स्वप्न विसळून
चूळ भरतो, भरल्यासारखी
अर्धी चव, उरल्यासारखी
त्याच चवीत चहा मिसळून
खून, दरोडे, बलात्कार पचवून
“अजीर्ण झालंय ब्वा” पुटपुटतो
दिवस उठतो, धावत सुटतो … धावत सुटतो फक्त
दिवस आपला वाटत असतो … वाटत असतो फक्त


मोरीत जातो, नागडा होतो
एकच क्षण उघडा होतो
नाही नाही मान हलवत
अंगावरून साबण फिरवत
दिवस मोह धुवून टाकतो
धार्मिक होतो, भजनं म्हणतो
बाहेर येतो, कपाट खणतो
त्यातल्या त्यात कपडे निवडून
आरशात येतो, स्वत:लाच लपवून
“उशीर झाला रे” पुटपुटतो
दिवस निघतो, धावत सुटतो .. धावत सुटतो फक्त
दिवस आपला वाटत असतो .. वाटत असतो फक्त


दिवस मग कुठे जातो काही काही कळतच नाही
ट्रेन, बस, रिक्षा, कार
क्षणभर दिसतो, क्षणात फरार
रस्ता, ऑफिस, हॉटेल, टपरी
कधी साहेब, कधी छपरी
दिवस असतो ओळखीचा पण दिवस ओळखू येतच नाही
दिवस कुण्णा कुण्णालाही इतकं जवळ घेतच नाही
मिठीत आला म्हणेस्तोवर
दिठीवाटे सहज निसटतो!
दिवस जवळीक भासवत असतो … भासवत असतो फक्त
दिवस आपला वाटत असतो … वाटत असतो फक्त


लोक म्हणतात कातरवेळी
…जातो एका दर्याकाठी
लाटांमधेच सूर मारतो
… एका हळव्या थेंबासाठी


दिवस इतर कोणासाठी इतका व्याकुळ होतच नाही
दिवस तिच्या डोळ्यांत बुडून काठावरती येतच नाही
त्याच्यापासून सुरू होऊन, तिच्यापाशीच संपते गोष्ट
दिवस ’तिचाच’ असतो … ’आपला’ वाटत असतो फक्त
related1: 

HDA2014_blackseparator.jpg

HDA2014_rangoLee3.jpg

HDA2014_blackseparator.jpg
वैभव जोशी
HDA_14_VaibhavJoshi.jpg

HDA2014_blackseparator.jpg

प्रतिसाद

वैभव, नेहमीप्रमाणेच सुरेख कविता :-)

आवडली. :)

सुरेख !

जबरदस्त ! सलाम !

छान.... ओघवती.

सुरेख :)

वॉव, मस्तच ...

अर्रे! जबरदस्त! नेहमीप्रमाणेच!