पाचसहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पंजाबी घरामध्ये मी रुळायला लागले होते. बोलीभाषा म्हणून पंजाबी बर्यापैकी समजायला लागली होती. लग्नांमध्ये आणि पार्ट्यांमध्ये ऐकलेलं पंजाबी पॉपसंगीत चांगलंच ओळखीचं झालं होतं. घरी सगळ्यांच्या सूफी गाण्याच्या वेडामुळे बरीच जुनी पंजाबी गाणी आणि लोकगीतंसुद्धा ऐकायला मिळत होती.
पंजाबी साहित्याबद्दल, विशेषतः काव्याबद्दल, मात्र फारसं काही माहीत नव्हतं. तसंही मी गद्यात रमणारी, कवितांच्या वाटेला न जाणारी. त्यामुळे कुणी पंजाबी कवींची नावं विचारली असती, तर मला अमृता प्रीतम याशिवाय दुसरं कुठलंही नाव चटकन आठवलं नसतं. त्या दिवसांत आमच्या घरी रोज रात्री मैफली जमायच्या. जुनी पंजाबी लोकगीतं, सूफी गाणी ऐकली जायची. या सगळ्यांमधून, पंजाबी अभिजात कवी मानल्या गेलेल्या बुल्ले शाह, शाह हुसेन इत्यादींची नावं मला नुकतीच माहीत होऊ लागली होती. अशातच, एका रात्री सगळे एकत्र जमले असताना, नवर्याने आम्हांला युट्यूबवर एका पंजाबी कवीची मुलाखत दाखवली. माझ्याव्यतिरिक्त बाकी सगळ्यांनाच हा कवी माहीत होता. `शिवकुमार बटालवी' या नावाशी ही माझी पहिली ओळख. ती मुलाखत आणि मुलाखतीच्या शेवटी शिवनं गायलेली (हो गायलेलीच.. शिव कविता वाचायचा नाही तर गायचा..) 'की पुछदें हों हाल फकिरांदा' ही कविता ऐकली आणि मी या कवीच्या प्रेमातच पडले.
सुरेल आवाजाचा हा देखणा कवी खूप लवकर, वयाच्या पस्तिसाव्या वर्षीच या जगातून निघून गेला. इनमीन पस्तीस वर्षांचं आयुष्य! त्यांतली दहाएक वर्षं याने कविता लिहिल्या असतील. पण या इतक्याशा कालावधीत, शिवनं पंजाबी काव्यजगतावर राज्य केलं होतं. शिवचा पहिला कवितासंग्रह 'पिडां दा परागा' (दु:खाचं गाठोडं) १९६० साली प्रसिद्ध झाला. अवघ्या दहापंधरा वर्षांच्या कारकिर्दीत शिवकुमार बटालवीचे तेरा कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. त्याच्या `लुणा' या काव्यनाटकास १९६७ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. वयाच्या एकतिसाव्या वर्षी हा पुरस्कार मिळालेला बटालवी हा सर्वांत लहान कवी आहे. शिवकुमार बटालवीला त्याच्या उत्कट प्रेमकविता आणि विरहगीतांमुळे 'बिरहां दा सरताज' म्हणून पंजाबी काव्यजगतात गौरवलं जातं.
शिवचा जन्म १९३६ सालचा. पाकिस्तानातल्या सियालकोट जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातला. त्याचे वडील तहसीलखात्यात तहसीलदार होते. फाळणीनंतर, शिवच्या वयाच्या अकराव्या वर्षी, त्याचे कुटुंब पंजाबातल्या गुरदासपूर जिल्ह्यातल्या बटाला या गावी स्थायिक झाले. १९५३ साली मॅट्रिक झाल्यानंतर शिवनं एफ.एससी.साठी बटालामधल्या कॉलेजात प्रवेश घेतला. पण पदवी पूर्ण न करता त्यानं नंतर कलाशाखेत प्रवेश घेतला. दुसर्या वर्षानंतर मात्र इथंही मन न लागल्यानं त्यानं सिव्हिल इंजिनीअरिंगच्या डिप्लोमाला बैदनाथ येथे प्रवेश घेतला.
असं म्हणतात की, इथेच एका जत्रेत, त्यानं मैना नावाच्या मुलीला बघितलं आणि तो तिच्या प्रेमात पडला. काही दिवसांनी तिची माहिती काढून तिला भेटायला तो बैदनाथला गेल्यावर ती एका दुर्धर आजारानं अचानक मृत्यू पावल्याचं त्याला कळलं. याच काळात शिवनं कविता लिहायला सुरुवात केली होती. त्याच्या या पहिल्या असफल प्रेमानंतर त्याची इतरही बरीच प्रेमप्रकरणं चर्चिली गेली. त्याच्या काही टीकाकारांच्या म्हणण्यानुसार, शिवकुमार बटालवी या विरहाच्या दु:खातून कधीच बाहेर येऊ शकला नाही आणि हेच असफल प्रेमाचं दु:ख त्यानं त्याच्या कवितेत मांडलं.
शिवनं त्याच्या साहित्यिक कारकिर्दीतल्या बहुतांशी गाजलेल्या रचना कॉलेज सोडल्यानंतरच्या दशकात रचल्या. स्वतःमधील कवीचा शोध लागल्यानंतर त्यानं काव्यलेखनालाच आपल्या आयुष्याचं ध्येय बनवलं होतं. या काळात त्यानं हिंदी, उर्दू, इंग्रजी आणि पंजाबी साहित्याचा अभ्यास केला. त्याच्या समकालीन साहित्यिकांशी त्याची मैत्री झाली. याच काळात पंजाबातील काव्यजगतात त्याचं नाव गाजायला लागलं होतं. शिवच्या आयुष्यातील हा कालावधी, त्याच्या कवितेप्रमाणेच, त्याच्या भटक्या जीवनशैलीमुळेही वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. ही भटकी जीवनशैली शिव आणि त्याच्या वडिलांमधील अंतर वाढवत गेली. शिवच्या वडिलांनी त्याला आपल्या जागी पटवारी म्हणून नोकरी लावून दिली होती. मात्र या नोकरीकडे दुर्लक्ष करून, शिव भटकंती करत, मुशायरे गाजवत, कविता लिहीत फिरताना बहुतेक रात्री घराबाहेर, मित्रांच्या घरी घालवायचा. या काळात चरितार्थासाठी तो काव्यवाचनातून मिळणार्या तुटपुंज्या मोबदल्यावर अवलंबून होता.
१९६६नंतर मात्र स्टेट बँकेत कारकुनाची नोकरी, लग्न, मुलंबाळं असं करत त्यानं सामान्य आयुष्य जगायचा प्रयत्न केला. लग्नानंतर लवकरच शिव बटालामधून बदली होऊन चंदीगढला राहायला गेला. सर्वसामान्यांसारखं १० ते ५ नोकरी करत राहणं शिवच्या स्वभावातच नव्हतं. खरंतर स्टेट बँकेतल्या चंदीगढमधील नोकरीच्या काळात तो बँकेत आठवड्यातून फारतर एखाद्या वेळी जाई. शिव चंदीगढला आला त्या दिवशीच त्याला मोहन भंडारी, भगवंत सिंग, भूषण ध्यानपुरी आणि इतर काही कविमित्र चंदीगढच्या सेक्टर २२च्या एका कोपर्यावर भेटले आणि तिथेच त्यांचा गप्पांचा अड्डा सुरू झाला. या अड्ड्याला शिवनं 'रायटर्स कॉर्नर' असं नाव दिलं. चंदीगढच्या वास्तव्यात त्याचं पिणंही वाढलं होतं. बर्याचदा शिव सकाळीच सेक्टर २२मधल्या त्याच्या आवडत्या दारूच्या दुकानात जाई आणि तिथेच लिखाणाला आणि मैफलीला सुरुवात करे. ही मैफल अख्खा दिवस चाले. संध्याकाळी शिव रायटर्स कॉर्नरवर त्याच्या साहित्यिक मित्रांना इथे भेटे. जवळपास वीस-पंचवीस साहित्यिक त्या काळी संध्याकाळी या रायटर्स कॉर्नरवर भेटत आणि गप्पांच्या, काव्यसंगीताच्या मैफली भरवत.
चंदीगढमधील या चार वर्षांच्या काळात शिवला सुरवातीला खूप लोकप्रियता मिळाली. या कालावधीत शिव पंजाबी साहित्यात लोकप्रियतेच्या शिखरावर पोचला होता. याच दरम्यान त्याच्या टीकाकारांचा आवाजही वाढायला लागला. टीकाकारांच्या मते, शिवच्या कवितेत दिसणारं दु:ख उथळ आहे. त्याच्या कवितेत फक्त विरहाची आणि प्रणयाची भावना आहे आणि समाजाशी त्याला काहीही देणघेणं नाही, अशा आशयाची टीका त्याच्यावर पंजाबी साहित्यजगतातून वारंवार होत राहिली. या टीकेचा शिवच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम व्हायला लागला होता. त्याच्या कवितेतून दिसणारी वेदना त्याच्या सामाजिक वावरामध्ये इतके दिवस दिसून येत नव्हती. उलट शिव मैफली जमवण्याच्या त्याच्या गुणामुळे मित्रांना प्रिय होता. परंतु नंतर मात्र त्याच्या कवितेतली वेदना, दु:ख तो उघडपणे बोलायला लागला. आपल्या मृत्यूबद्दल त्यानं बर्याच कविता लिहिल्या या काळात. नशा आणि पिणं यातर रोजच्याच गोष्टी झाल्या होत्या. याच दरम्यान एकदा त्यानं त्याच्या एका कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेत टीकाकारांना उद्देशून `मेरे निंदक' नावाचा लेख लिहिला होता.
पंजाबी कलाजगतात पूर्वापार कविता गाण्याची परंपरा आहे. सूफी संगीत हे त्याचे द्योतक आहे. वारीस शाह, बाबा बुल्ले शाह, शाह हुसेन या कवींच्या कविता व शायरी लोकांपर्यंत संगीताच्या माध्यमातूनच पोचली. या सगळ्या अभिजात कवींनंतर पंजाबात सर्वांत जास्त गायला गेलेला आणि ऐकला गेलेला कोणी कवी असेल तर तो म्हणजे शिव. शिवकुमारच्या कारकिर्दीमध्ये पंजाबात नक्षलवादी चळवळीला सुरवात झाली होती. पाशसारखे अनेक समकालीन कवी त्या चळवळीमध्ये गुंतलेले होते. पाश, अमृता प्रीतम, मोहन सिंग, सुरजीत आदी कवींच्या कवितांत सामाजिक आशय असे. त्याविरुद्ध शिवच्या कविता म्हणजे प्रेमकाव्य आणि विरहगीत. शिवकुमार बटालवीचे टीकाकार त्याच्यावर तो फक्त प्रेमकाव्य आणि विरहगीत यांमध्येच रमत असल्याची टीका करतात. अनेकांच्या मते शिवकुमार बटालवीला इतकी प्रसिद्धी मि़ळण्याचे कारण, तो स्वतः सुरेल आवाजात आपल्या कविता गायचा हे आहे. शिवची कविता उथळ असून, नुसतीच विरहगीतं लिहूनही शिवकुमार सामान्य जनतेत प्रसिद्ध झाला; याचं कारण त्याच्या आवाजातला दर्द आणि जनमानसात निर्माण झालेली त्याची रोमँटिक प्रतिमा हे आहे, असं त्याचे टीकाकार म्हणत.
पंजाबी सूफी गीतांनी पंजाबी कवितेमध्ये 'किस्सा' हा एक नवा काव्यप्रकार सुरू केला. हीर-रांझा, सोहणी-महिवाल, मिर्झा साहिबां, पुरण भगत इत्यादी किस्से (काव्यप्रकार) पंजाबी साहित्यात प्रसिद्ध आहेत. या किश्शांना लोकगीतांमध्ये स्थान मिळालं आहे. पूर्वापार चालत आलेले किस्से लोकगीतांच्या फॉर्ममध्येच लिहिले गेले. शिवकुमारने मात्र एका जुन्या किश्शाला काव्यनाट्याच्या रूपात लोकांपुढे आणले. शृंगार, विरह आणि करुण रसाचा उपयोग करून त्यानं हे नाट्य लिहिलं. हा काव्यप्रकार पंजाबी साहित्यात मॉर्डन पंजाबी किस्सा म्हणून आता ओळखला जातो. कदरयारनं लिहिलेल्या पुरण भगतच्या कहाणीला शिवनं लुणाच्या नजरेनं लिहून एका वेगळ्याच स्तरावर पोहोचवलं.
कदरयारच्या पुरण भगत कहाणीनुसार, पुरण हा संत, एका राजाचा मुलगा आहे. लहानपणीच शिक्षणासाठी तो बाहेर गेलेला असताना त्याचे वडिल लुणा नावाच्या एका खालच्या जातीतल्या अतिशय सुंदर मुलीशी दुसरं लग्न करतात. जेव्हा पुरण परत येतो, तेव्हा लुणा त्याच्या प्रेमात पडते. पण ज्यावेळी पुरण तिला नकार देतो, त्यावेळी ती पुरणवर तिच्याशी अतिप्रसंग केल्याचा खोटा आरोप करून राजाकडून शिक्षा देववते. पुरण मेल्यानंतर त्याच्या शरीराला त्याचे गुरू परत जिवंत करतात. पुढे पुरण मोठा संत होतो व त्याला भेटायला आलेल्या लुणाला माफ करतो.
कदरयारच्या किश्शात पुरण नायक आहे आणि लुणाला खलनायिकेच्या रूपात दाखवलं आहे. शिवनं मात्र लुणाला नायिका दाखवून तिच्या भूमिकेतून काव्य लिहिलं. शिवच्या काव्यामध्ये शिवनं भारतीय स्त्रीची असहायता लुणाच्या माध्यमातून दाखवली आहे. खालच्या जातीतल्या या गरीब मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या वडिलांच्या वयाच्या राजाशी लग्न करावं लागलं. ती पुरणवर प्रेम करत होती. मात्र राजाला ही गोष्ट आवडली नाही आणि त्यानं तिच्या आणि पुरणच्या संबंधांवर संशय घेऊन पुरणला मारले. स्वतःला लुणाच्या जागी कल्पून तिचं दु:ख, विरह आणि असहायता शिवनं त्याच्या मास्टरपीस मानल्या गेलेल्या काव्यातून दाखवली. याच काव्यासाठी त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता.
शिवच्या बर्याच कवितांमधून त्याच्यावर असलेला शाह हुसेन, बुल्ले शाह यांचा प्रभाव दिसतो. पंजाबी अभिजात काव्याची नस पकडून, त्या काव्याला एका नव्या मुक्कामी पोहोचवायचं काम शिवच्या कवितेनं केलं आहे. शिवची कविता ही वारीस शाह, बुल्ले शाह यांच्या सूफी काव्यपरंपरेतीलच पुढची पायरी होती. शिवच्या बर्याच कविता जुन्या कवितांप्रमाणे आईला उद्देशून लिहिलेल्या आहेत. स्वतःच्या आतलं दु:ख जे आईशिवाय कदाचित दुसरं कोणी समजू शकणार नाही, ते शिव आपल्या कवितेतून आईला सांगतो.
'माये नी माये, मेरे गीतां दे नैनों विच बिरहोंदी रदक पावे
आधी आधी रातई उठ रोन मोये मित्रांनू, मायें सानू नींद ना पावे'
(आई माझ्या कवितेच्या डोळ्यांमध्ये विरहाची `कुस' सलतेय
माझ्या मृत प्रेमासाठी मी अर्ध्या रात्री उठून रडतोय, आई मला झोप लागत नाही)
किंवा 'माये नी माये मै इक शिकरा यार बनाया' या कवितेत शिव आपल्या प्रेयसीला एका अतिसुंदर शिकरा नावाच्या पक्ष्याची उपमा देतोय. त्या पक्ष्याच्या सौंदर्याचं वर्णन करून पुढे तो म्हणतो की, त्याला चुरी (कुस्करलेली चपाती) दिली तर तो (शिकरा) खात नव्हता, म्हणून मी त्याला माझ्या हृदयाचं मांस खायला दिलं. पण पुढे मात्र त्यानं एक अशी भरारी घेतली की तो पक्षी परत आलाच नाही.
शिवचे टीकाकार म्हणतात त्याप्रमाणे त्यानं थोड्याफार लोकप्रिय कविता किंवा काही ठरावीक विषयांवरच्याच कविता लिहिल्या असं नाही. जरी त्याला विरह आणि प्रणय कवितांचा राजा मानलं जात असलं, तरी त्यानं अनेक वेगवेगळ्या शैलींमध्ये, विविध विषयांवरच्या कविता लिहिल्या. त्याच्या सुरुवातीच्या कवितांमध्ये असफल प्रेम, विरहाचं दु:ख हे विषय दिसतात. परंतु नंतरनंतर त्याच्या कवितांमध्ये वेगवेगळ्या भावनांचा आविष्कार आढळतो. 'माये नी माये मै इक शिकरा यार बनाया' लिहिणारा शिवकुमार 'की पुछदे ओ हाल फकिरांदा'सारखी किंवा 'ए मेरा गीत किसे ना गाणा'सारखी कवितासुद्धा लिहितो.
ए मेरा गीत किसे ना गाणा या कवितेत तो लिहितो -
ये मेरा गीत किसे ना गाणा
ये मेरा गीत मै आपे गाके
पल के ही मर जाणा
ये मेरा गीत धरत तों मैला
सूरज जेड पुराना
कोट जनम तो पया असाहूं
इस दा बोल हंडांणा
शिवच्या कवितेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती फक्त पुस्तकांपुरतीच सीमित राहिली नाही. शिवच्या कविता अनेक पंजाबी गायकांनी गायल्या. आशा सिंग मस्ताना, सुरिंदर कौर, महेंद्र सिंग, जगजित सिंग, चित्रा सिंग, गुलाम अली, नुसरत फतेह अली खां यांच्यापासून ते नव्या हंस राज हंसपर्यंत बर्याच गायकांनी आपापल्या शैलीत शिवची कविता गायली. इतक्या गायकांनी ती गायली आहेत की, त्याच्या काही कवितांना बरेच जण लोकगीत समजतात. आपल्या सगळ्यांना माहीत असलेलं 'लव्ह आज कल'मधलं 'आज दिन चढया तेरे रंग वर्गा' हे गाणंसुद्धा शिवच्या कवितेवरून स्फुरलेलं आहे.
खरंतर पंजाबी वाचता येत नसल्यानं मी शिवच्या कविता फक्त ऐकल्यात. कधी त्याच्या आवाजातल्या, तर कधी इतर गायकांच्या आवाजात. त्याच्या कविता मला समजतात, भावतात पण त्यांचं भाषांतर करायला गेले की त्यातला अर्थच हरवून जातो. भाषेच्या माझ्या मर्यादेमुळे त्याच्या हजारो कवितांपैकी कदाचित मी फारतर पन्नासएक कविता ऐकल्या असतील. पण तरीही या कवीनं मला वेड लावलं. जितकं त्याच्याबद्दल, त्याच्या कवितेबद्दल मी घरातल्या जुन्याजाणत्यांकडून ऐकलं, पुस्तकांमधून वाचलं, तितकं त्याचं मोठेपण कळत गेलं. शिवची शब्दसंपदा खूप मोठी होती म्हणतात. त्याच्या कवितांमध्ये खेड्यातले जुनेजुने सुरेख शब्द येतात, त्याचबरोबर शहरांतली भाषापण येते. माझ्यासारख्या पंजाबी नसलेल्या व्यक्तीला हे सगळं भाषासौंदर्य टिपणं अवघड जातं.
या माझ्या आवडत्या पंजाबी कवीबद्दल लिहिताना अमृता प्रीतम म्हणते - 'शिव कुमार बटालवी हा नव्या पंजाबी साहित्यातला एकमेव कवी आहे ज्यानं कविता गायली आणि नंतर फीनिक्स पक्ष्याप्रमाणे स्वतःच्या आगीमध्येच तो जळून गेला.'
संदर्भसूची -
[१] ये मेरा गीत किसे ना गाणा - मैनु विदा करो - प्रकाशन: लाहोर बुक शॉप, लुधियाना
[२] माये नी माये, मै इक शिकरा यार बनाया, आटे दियां चिडियाँ: प्रकाशन : लोकसाहित्य प्रकाशन, अमृतसर
[३] माये नी माये, मेरे गीतों दे नैणां विच, शिवकुमार: संपूर्ण काव्य संग्रह, लाहोर बुक शॉप लुधियाना
वरील तिन्ही कविता, साहित्य अकादमीतर्फे १९९३साली प्रकाशित झालेल्या आणि अमृता प्रीतम यांनी निवडलेल्या शिवकुमार बटालवीच्या निवडक कवितांच्या कवितासंग्रहात, 'बिरहां दा सुलतान'मध्ये आहेत.
प्रतिसाद
सुरेख लिहिलयस अल्पना
सुरेख लिहिलयस अल्पना
वा ! सुरेख जमलाय ग लेख.
वा ! सुरेख जमलाय ग लेख. नेमक्या आणि नेटक्या शब्दात शिवकुमारांची ओळख करुन दिलियेस. आवड्ली ओळख.
आणि आता इथेच थांबू नकोस. लिहीत जा बायो. पंजाबी साहित्यातले हे मास्टर पीस आम्हालाही कळू देत.
सुरेख ओळख करुन दिलीस
सुरेख ओळख करुन दिलीस शिवकुमारांची.
किती छान लिहीलयस अल्पना. ओळख
किती छान लिहीलयस अल्पना. ओळख आवडली.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
एका वेगळ्या भाषेतल्या कविची ओळख आवडली.
खूप आवडला लेख. अगदी मनापासून
खूप आवडला लेख. अगदी मनापासून लिहिलाय.
भारी लिहिलंय. आवडलं.
भारी लिहिलंय. आवडलं.
मातृभाषेव्यतिरिक्त अजून एक वेगळी भाषा आत्मसात करून वर त्या भाषेतल्या साहित्याचा रसास्वादही घेता येणं हे सोपं काम नाही. त्यासाठी तुला _/\_
बिरहां दा सरताजबद्दल किती
बिरहां दा सरताजबद्दल किती आत्मियतने लिहीलय .आपकाभी जवाब नहीं। त्याच्या कविता बाबत कुतूहल चाळवल गेलय. ...अनुवादाच्या प्रतिक्षेत.
'माये नी माये, मेरे गीतां दे
'माये नी माये, मेरे गीतां दे नैनों विच बिरहोंदी रदक पावे
आधी आधी रातई उठ रोन मोये मित्रांनू, मायें सानू नींद ना पावे'
ही माझी फार आवडती कविता आहे. नुसरत फतेह अली खान यांनी ती गायली देखील फार सुंदर आहे.
लेख खूप छान झाला आहे. अगदी मनापासून लिहिला आहे. शिवकुमार यांची इतकी चांगली ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!
धन्यवाद!!
धन्यवाद!!
मला कधी कवितेवर काही लिहिता येईल यावर माझाच कधी विश्वास बसला नसता. :)
शिवकुमारच्या कविता त्याच्या आवाजात युट्युबवर काही जणांनी अपलोड केल्या आहेत.
सुरेख ओळख!
सुरेख ओळख!
आज वाचायला मिळाले हे. फारच
आज वाचायला मिळाले हे. फारच सुंदर
आज वाचायला मिळाले हे. फारच
आज वाचायला मिळाले हे. फारच सुंदर