हंग्री इन हंगेरी

HDA2014_darkblueheader


यो एतवाज्यात : Jó étvágyat : Enjoy your meal



बादाच्योनी, एगेर, तोकाई.. काही लक्षात येत नाहीये? मग पालिंका, उनिकुम? अरे, अजूनही नाही का आलं लक्षात? लेचो, हालास्ले किंवा लँगोश, पालाचिंता, कुर्तशकॉलाच? काहीच पत्ता लागत नाहिये ना? बरं, गुयाश तरी? काय म्हणता? नाव ऐकल्यासारखं वाटतंय? बरोब्बर ओळखलंत! यालाच इंग्रजीत गुलाश म्हणतात. गुलाश कम्युनिझम... हंगेरी...!

2014HDA_Hungary_1.JPG
एगेर किल्ल्यावरून दिसणारा शहराचा मध्यवर्ती भाग

मध्य युरोपातला हा एक छोटासा देश! बुडापेश्ट हे राजधानीचं शहर सोडल्यास हंगेरीबद्दल हंगेरीबाहेरील लोकांना फारशी माहिती नसते. (बुडापेस्ट नव्हे बुडापेश्ट - हंगेरियन भाषा जशी लिहितात तशीच बोलतात. आपल्या मराठीसारखंच. 's' म्हणजे 'श' आणि 'sz' म्हणजे 'स'.) जगाला उत्तमोत्तम गणितज्ञ देणारा हा देश युरोपात तसा एकांडा शिलेदार आहे. यांची भाषा म्हणजे मॉज्यॉरोर्शाग. ही बाकी सर्व युरोपियन भाषांपेक्षा अगदी वेगळी आहे. फिनिश भाषा तिची लांबची बहीण आहे, पण ती पाच-सहाशे वर्षांपूर्वीच वेगळी झालेली आहे. मॉज्यॉर वंशाचे हे लोकसुद्धा इतर युरोपियनांबरोबर फारसे मिसळलेले नाहीत. धारदार नाक, सडपातळ पण काटक बांधा आणि बाई असेल तर विशीतली आहे की पन्नाशीतली ते ओळखता आलं नाही तर 'हंगेरियन दिसतेय' म्हणून दडपून सांगायला हरकत नाही. यांच्या सवयीसुद्धा जगावेगळ्या आहेत. हंगेरीत बसमध्ये सर्व सिटा रिकाम्या असल्या तरी त्यावर न बसता उभे राहून लोक प्रवास करतील. किंवा खचाखच गर्दी असलेल्या ट्रेनच्या डब्यामध्ये खिडकीजवळच्या सीटवर पिशवी ठेवून बाजूच्या सीटवर बसून शांतपणे पुस्तक वाचणारी म्हातारी तुम्हाला फक्त हंगेरीतच दिसेल.

'A Country Full of Aliens : A Briton in Hungary' (अ कन्ट्री फुल ऑफ एलिअन्स : अ ब्रिटन इन हंगेरी) या नर्मविनोदी पुस्तकात कॉलिन स्वाट्रिजनं हंगेरीचं फार सुंदर चित्र रंगवलं आहे. हंगेरी जाणून घ्यायचा असेल तर प्रथम हंगेरीत जा, काही महिने राहा आणि मग हे पुस्तक वाचा!

तर या आगळ्यावेगळ्या लोकांच्या खाण्याच्या सवयीपण बाकी युरोपापेक्षा हटके आहेत. युरोपात, विशेषतः पश्चिम युरोपात कधी कोणाला हौसेने मिरच्या खाताना बघितलं आहे का? म्हणजे आपल्याकडे असतात तशा लवंगी किंवा बारक्या मिरच्या नव्हेत, जरा ढब्बू मिरच्या. त्यांना हंगेरियन लोक 'पाप्रिका' म्हणतात. सकाळी नाश्त्याला, धारदार सुरीने इंच-दोन इंच जाडीच्या कोल्बासचे (kolbász सॉसेज) काप करुन, जोडीला या मिर्च्या खाणारे हंगेरियन तुम्हांला फॅक्टरी किंवा ऑफिसच्या कॅफेटेरियात हमखास दिसतील.

2014HDA_Hung_collage3.jpg
कोल्बास, हंगेरियन सॉसेजेस्

मिरच्या आवडणार्‍या हंगेरियनांचं जेवण त्यामुळे बाकी युरोपियन खाण्याच्या तुलनेत चांगलंच तिखट असतं. हंगेरीत दोन प्रकारच्या मिरच्या वापरतात. तिखट मिरच्या आणि रंगाला लाल पण तुलनेने कमी तिखट पण स्वाद असलेल्या मिरच्या. हंगेरियन रेस्टॉरन्टमध्ये किंवा घरात जेवणाच्या टेबलवर लाल मिरचीपूड असायलाच हवी. सहसा ही कमी तिखट मिरच्यांची पूड असते. पदार्थ तयार करताना मात्र बर्‍याचदा त्यात तिखट मिर्चीपूड घालतात. अर्थात 'तिखट', 'मिरच्या', 'मिरचीपूड' असे शब्द असले तरी भारतातल्यासारखा तिखटपणा नसतो हंगेरियन जेवणाला. त्याचं एक कारण म्हणजे आपल्याकडच्या बारीक मिरच्यांएवढ्या या हंगेरियन मिरच्या तिखट नसतात. दुसरं कारण म्हणजे जेवण तयार करताना खडा मसाला वा मसालापूड नाही वापरत.

Fertöd Paprika 4
विकायला ठेवलेल्या सुक्या मिरच्यांच्या माळा

दुपारच्या जेवणात बर्‍याचदा सूप असतं. उन्हाळ्यात जेव्हा चेर्‍या भरपूर उपलब्ध असतात, तेव्हा आंबट (साअर) चेरीचं थंड सूप [१] हंगेरियन आवडीनं खातात. हालास्ले (halászlé) सूप हे भरपूर लाल मिरचीपूड घालून केलेलं माश्याचं कालवणच असतं ( hal = मासा). बरेचदा जेवण म्हणून फक्त हे हालास्ले सूप ब्रेडबरोबर खाल्लं जातं. माशांचं डोकं, काटे, कल्ले असे बेचव भाग पाण्यात मीठ, कांदे, हिरव्या मिरच्या वगैरेंबरोबर बराच वेळ उकळून ब्रॉथ तयार करतात. मग तेलात कांदा परतून त्यात लाल मिरचीपूड घालतात. त्यानंतर यात (आधी करून ठेवलेला) ब्रॉथ व पाणी घालून रटरट उकळतात. मग त्यात इतर मसाले (काळी मिरी, टोमॅटो इत्यादी) आणि शेवटी माशाचे मोठाले पसरट तुकडे (बरेचदा डोकं आणि शेपटीसकट अख्खा मासा) घालून शिजवतात.

उन्हाळ्यात बालाटोन तळ्याच्या बाजूला वसलेल्या गावात तळ्याकाठी, विशेषतः जिथे वाळू असलेले किनारे आहेत, तिथे हजारोंच्या संख्येने हंगेरियन लोक पोहायला, उन्हात शेकायला येऊन पडलेले असतात. संध्याकाळ झाली की मग ते तळ्याकाठच्या लाकडी खोपटेवजा रेस्टॉरन्टमध्ये थंड बीअर आणि हे माश्याचं सूप खात बसलेले दिसतात.

2014HDA_Hungary_2.JPG
वरून तेयफॉल घातलेल्या तळलेल्या माश्याची डिश

या सूप वा स्ट्यूसारख्या सिंगल डिश मीलचं मूळ हंगेरीच्या शेतकरी परंपरेत आहे. जुन्या काळात शेतकरी वा मेंढपाळ, गुराखी हे लोक शेतात, रानात कायम फिरतीवर असत. बोग्राचमध्ये (पारंपरिक हंगेरियन पातेलं) [२] मांस, बटाटे, भाज्या आणि पास्ते घालून ते घट्ट सुपासारखं शिजवत. हे बोग्राच आजसुद्धा वापरलं जातं, विशेषतः जेव्हा घराबाहेर उघड्यावर गुयाश तयार करतात. एक तिकाटणं (tripod) जमिनीवर घट्ट उभं करतात आणि त्याला हे बोग्राच टांगतात. मग त्याच्याखाली लाकडं पेटवून त्यावर गुयाश शिजवतात.

फझेलेक (főzelék) म्हणजे बटाटे, कोबी, मटार, गाजर, पालक, बीन्स अश्या अनेक भाजीपाल्यांचं तेयफॉल घालून शिजवलेलं दाटसर सूप. फझेलेक सूपपेक्षा घट्ट पण स्ट्यूपेक्षा पातळ असतं. मटार, बीन्स वगैरे साठवता येत असल्यानं हिवाळ्यातदेखील फझेलेक बनवता येतं.

Paprikas krumpli in bogracs
गुयाश बनवताना



2014HDA_Hung_collage2.jpg
विविध हंगेरियन पदार्थ

हंगेरीतला सगळ्यात प्रसिद्ध पदार्थ गुयाश (gulyás) हा एक प्रकारचा स्ट्यू, म्हणजे रस्सा आहे. हंगेरियन भाषेत ly हा एक स्वतंत्र उच्चार आहे. तो साधारण 'इय' सारखा होतो. गुइयाश किंवा गुयाश. हंगेरीबाहेरच्या लोकांनी त्याचं गुलाश केलं. गुयाश म्हणजे काऊबॉय किंवा हंगेरीतले गुराखी. या गुराख्यांचं हे जेवण 'गुयाश' नावानेच पुढे प्रसिद्ध झालं. मूळ कृतीनुसार गुयाश गायीचं मांस (बीफ) वापरून तयार करतात, पण आता गायीबरोबरच डुकराचं मांसही (पोर्क) वापरलं जातं. गुयाशमध्ये, तसंच इतर अनेक हंगेरियन पदार्थांत भरपूर भाज्या वापरल्या जातात. गुयाशमध्ये लाल गाजर, पांढरं गाजर, पार्स्ली, सेलरी आणि बटाटे घालतात. गुयाश करण्यासाठी भरपूर, म्हणजे जेवढं बीफ वापरायचं असेल त्याच्या जवळपास एक तृतियांश वजनाचे कांदे बारीक कापून तेलावर गुलाबी होईपर्यंत परततात. आजच्या काळात वनस्पतिजन्य तेल, बहुतकरून सूर्यफुलांच्या बियांचं तेल स्वयंपाकासाठी वापरलं जातं. मात्र आत्ताआत्तापर्यंत तेलाच्या ऐवजी सगळ्या पदार्थांत डुकराची चरबी (लार्ड) वापरली जायची. मग या परतलेल्या कांद्यात लाल मिरचीपूड घालून अजून थोडावेळ परतात. ही कमी तिखट मिरच्यांची पूड असते. तेलात परतलेल्या कांद्यात मिरचीपूड घालून आणखी थोडं परतलं तर मिरचीचा स्वाद जास्त खुलून येतो असं एकोणिसाव्या शतकात हंगेरियन लोकांना उमजलं. तेव्हापासून बहुतेक सगळ्या हंगेरियन पदार्थांत तेलात परतलेला कांदा आणि मिरचीपुडीचं मिश्रण बेस म्हणून वापरलं जातं. गुयाश तयार करताना मग आंच आणखी वाढवून या मिश्रणात बीफचे (किंवा पोर्कचे) तुकडे घालतात आणि या तुकड्यांचा रंग थोडासा तपकिरी होईस्तोवर ते 'जाळतात'. या तुकड्यांना एक खास जळका वास येतो जो गुयाशची खासियत आहे. मग मीठ आणि पाणी घालून बराच वेळ हे बीफ शिजवलं जातं. ते शिजत आलं की त्यात तमालपत्र, लसूण, थाइम असे मसाले आणि गाजर, सेलेरी, बटाटे वगैरे भाज्या घालून त्या शिजू देतात. बटाट्यामुळे गुयाश दाट होतं.

Gulyas080
गरमागरम गुयाश

बटाटे पिकवायला आणि साठवायला सोपे असल्यानं, तसंच हिवाळा संपेपर्यंत टिकत असल्यानं जेवणाचा अविभाज्य भाग झाले. तसंच बटाट्यानं पोट भरतं, त्यामुळे बटाटा गरिबांसाठी फार सोयीचं खाणं ठरलं. बटाट्यांपासून तयार केलेले खूप पदार्थ हंगेरीत प्रसिद्ध आहेत. पाप्रिकाश क्रुम्प्ली (paprikás krumpli) म्हणजे बटाट्याचं गुयाशच. यात गायीच्या मांसाऐवजी भरपूर बटाटे घातलेले असतात. बाकी कांदा, मिरचीपूड, टोमॅटो, मसाले वगैरे गुयाशप्रमाणेच. कृतीदेखील गुयाशसारखीच. पाप्रिकाश क्रुम्प्लीबरोबर सॉसेज किंवा बेकन खातात.

हंगेरियन जेवणाची अजून एक खासियत म्हणजे तेयफॉलचा (tejföl) भरपूर वापर. तेयफॉल म्हणजे साअर क्रीम. इतर युरोपियन पदार्थांमध्ये क्रीम किंवा साअर क्रीम हे वरून घेतलं जातं. मात्र हंगेरियन स्वयंपाकात पदार्थ शिजत असतानाच त्यात तेयफॉल घालतात. त्यामुळे पदार्थ मलईदार आणि दाट होतात व त्यांना एक खास स्वाद येतो.

हंगेरीचे काही खास पास्ते आहेत, उदाहरणार्थ तॉर्‍होन्य[३] (tarhonya - ny हे हंगेरियन भाषेतलं अजून एक मुळाक्षर. gy, ty, ny, sz, dz, dzs ही हंगेरियन लिपीतील काही विचित्र मुळाक्षरं), किंवा नोकेड्‌लि[४]. तार्‍होन्य तयार करायला गव्हाचं पीठ आणि अंडी एकत्र मळून त्या गोळ्याच्या पोळ्या लाटतात. मग त्या पोळ्या वाळवतात आणि कडकडीत वाळल्यावर हातानं त्याचे तुकडे करतात. नोकेड् लि बर्‍याचदा ताजं तयार करून वापरतात. तेलात परतलेला कांदा, मिरचीपूड, टोमॅटो वगैरे हंगेरियन मालमसाल्यात हे हंगेरियन पास्ते आणि बीन्स किंवा साअरक्राउत (आंबवलेला कोबी)[५] किंवा सॉसेजेस असं काहीही घालून शिजवलं की ऐंशी टक्के हंगेरियन पदार्थ तयार होतात.

Hungarian Honey Cake (Mézes krémes)
चुक्रास्दात मिळणार्‍या सुंदर पेस्ट्र्या

हंगेरीत तुम्हांला रेल्वे स्टेशन, बस स्टेशन, शहरातील मध्यवर्ती भाग, कारखाने-ऑफिसेसच्या इमारतींच्या प्रवेशद्वारांजवळ, पेक्शेग (pékség) असं पाटीवर मोठ्या अक्षरांत लिहिलेली दुकानं दिसतील. पेक्शेग म्हणजे बेकरी. या बेकर्‍यांमधून ताजे, गरम आणि अतिशय चवदार असे विविध प्रकारचे ब्रेडतर मिळतातच, पण त्याचबरोबरीने पोगाचा, काकाओश, पेरेच, झेम्ले, किफ्लि (pogácsa, kakaós, csiga, perec, zsemle, kifli) अश्या खास हंगेरियन बेक्ड् पेस्ट्र्या मिळतात. तेयफॉल, बटाटे, पोर्क, चीज असे वेगवेगळे घटक या पेस्ट्र्यांमधून भरलेले असतात. कडक ब्लॅक कॉफीबरोबर या बेक्ड् पेस्ट्र्या खाल्ल्या की ऑफिसला जायला माणूस तयार. केक, गोड पेस्ट्र्या ज्या बेकरीत विकतात त्यांना चुक्रास्दा म्हणतात. जगभरात ऑस्ट्रियन पेस्ट्र्या आणि केक प्रसिद्ध आहेत, परंतु त्याच तोडीच्या हंगेरियन पेस्ट्र्या मात्र लोकांना फारशा माहिती नसतात. कदाचित पोलादी पडद्यामागे उमेदीची चाळीस-पंचेचाळीस वर्षं घालवल्याचा परिणाम असेल. क्रीम, चॉकोलेट, बदामाची पेस्ट (मार्सिपान) अश्या गोडखाऊंच्या आवडीच्या पदार्थांपासून तयार केलेल्या नाजूक पेस्ट्र्या आणि केक या चुक्रास्दांच्या बाहेर फूटपाथवर मांडलेल्या टेबलखुर्च्यांवर बसून निवांतपणे खाता येतात!

वाइन म्हटलं की बहुसंख्य जनतेला फ्रान्स आठवतो. थोड्या अजून जाणकार माणसाला इटली, स्वित्झर्लंड किंवा अमेरिकेत कॅलिफोर्निया वा चिलीसारख्या देशातली वाइन माहिती असते. मात्र हंगेरियन वाइन म्हटलं तर कित्येकजण म्हणतील, 'हंगेरियन वाइन? कधी ऐकलं नाही बुवा!'. हंगेरीत फार उत्तम दर्जाची वाइन तयार केली जाते. साम्यवादी राजवटीच्या ४०-४५ वर्षांत वाइननिर्मितीच्या परंपरेला थोडा धक्का बसला. मात्र साम्यवादाच्या अस्तानंतर, गेल्या २५ वर्षांत, हंगेरियन वाइन बनवण्याच्या परंपरांनी पुन्हा उचल खाल्ली आहे. द्राक्षबागांचे मालक, वाइनरीजचे मालक पारंपरिक पद्धतीनं द्राक्षे पिकवणं, खुडणं आणि त्यांची वाइन बनवणं या प्रयत्नात आहेत. तोकाय (Tokaj) हे स्लोवाकिया-युक्रेन-हंगेरी सीमेजवळचं ईशान्येकडचं एक छोटं गाव. तसं तोकायला खास काही नाही. तोकाय आणि आजूबाजूच्या गावांतून बनवली जाणारी फिकी गोड 'तोकायी' वाइन (Tokaji sweet white wine)[६] मात्र सुप्रसिद्ध आहे. तोकायीची वाइन बहुतकरून फुर्मिन्ट जातीच्या द्राक्षांपासून बनवलेली असते. 'तोकायी आसु वाइन'मध्ये आसु नावाच्या एक प्रकारच्या बेरिज्‌चा लगदा मिसळतात. त्यामुळे आसु वाइनला विशिष्ट गोडसर वास आणि स्वाद येतो. हंगेरीच्या कुठल्याही वाइनच्या दुकानात वा सुपरमार्केटमध्ये किमान एक कपाट तरी पिवळ्या आणि थोडी लालसर झाक असलेल्या तोकायी वाइनच्या बाटल्यांनी भरलेलं दिसेल.

Tokaj wijn
तोकायी वाइन

एगेर हे उत्तरेकडचं एक शहर. इथली 'एग्री बिकावेर' म्हणजेच 'बुल्स् ब्लड वाइन' प्रसिध्द आहे. नावावरून दचकून जाऊ नका! सोळाव्या शतकात एग्री वार (एगेरचा किल्ला) इथे आक्रमक तुर्की सैन्य आणि हंगेरियन सैन्यात घनघोर लढाई झाली. संख्येनं खूप कमी असूनदेखील हंगेरियन सैन्यानं अतिशय शौर्यानं तुर्की सैन्याला तोंड दिलं आणि शेवटी तुर्की सैन्यानं माघार घेतली. हंगेरियन सैनिक पीत असत त्या एग्री वाइनमध्ये बैलाचं रक्त मिसळलेलं असे व ते त्यांच्या शौर्याला कारणीभूत होतं अशी एक (दंत)कथा आहे. त्यावरून 'बुल्स् ब्लड वाइन' या नावाचा उगम झाला असावा. रक्तासारख्या लालभडक रंगाच्या या वाइनची चव करकरीत पण जिभेवर रेंगाळणारी असते.

2014HDA_Hung_collage1.jpg
द्राक्षबाग आणि वाइन बनवताना

बालाटोन हे हंगेरीच्या साधारण मध्यभागी असलेलं मोठं तळं. दुधी भोपळ्याच्या आकाराच्या या तळ्याच्या काठाची लांबी २०० किलोमीटरपेक्षा जास्त आहे. साहजिकच बालाटोनच्या खोर्‍यातल्या अनेक गावांतून, विशेषतः जिथे डोंगराळ भाग आहे अश्या ठिकाणी द्राक्षं पिकवली जातात आणि प्रत्येक ठिकाणची स्वतःची खास वाइन तयार केली जाते. मला स्वतःला बादाच्योनी या छोट्या गावातली फिकी गोडसर वाइन खूप आवडते.

Sopron barack 07
पालिंका

४०% पेक्षा जास्त अल्कोहोल असलेली 'पालिंका'[७] हंगेरियन लोकांची अतिशय लाडकी. कुणाच्या घरी गेलात तर यजमान प्रेमाने शॉट ग्लासमध्ये पालिंका नक्की देतील. त्यातून जर पालिंका स्वतः करवून घेतली असेल तर मग काय थाट! पूर्णपणे फळांपासून बनवलेल्या आणि फक्त हंगेरीतच गाळलेल्या ब्रँडीला पालिंका म्हणता येतं (जसं फक्त स्कॉटलंडमध्येच बनवली असेल तर स्कॉच, बाकी ठिकाणची ती प्रीमिअम विस्की!). अ‍ॅप्रिकॉट, पेअर आणि प्लम या तीन फळांपासून तयार केलेल्या पालिंका अधिक प्रसिद्ध आहेत. अनेक लोक घरात चालत आलेल्या पारंपरिक कृतीनुसार फळं आणि इतर 'सिक्रेट' गोष्टी घालून लगदा तयार करतात. मग हा लगदा, आपल्याकडे पिठाची चक्की असते तशा हंगेरीतल्या गावागावात असलेल्या 'दारू गाळायच्या भट्टीवाल्या'कडे देऊन घरासाठी पालिंका करवून घेतली जाते. ४५%-५०% कडक पालिंकाचे दोन-तीन घोट रिचवले की डोकं अगदी हलकं होऊन जातं! अर्थात एवढी कडक असली तरी ज्या फळापासून केली आहे त्या फळाचा स्वाद यात पूर्णपणे मुरलेला असतो आणि एक कडू-गोड स्वाद जिभेवर राहतो.

हंगेरीतल्या कुठल्याही शहराच्या वा गावाच्या मध्यभागी एक जुना भाग असतोच, जिथे दोनतीन वेगवेगळ्या ख्रिश्चन पंथांची चर्चेस्, जुन्या इमारती, पाखाड्या आणि मध्यभागी एक तरी मोठा चौक असतोच असतो. या चौकात वर्षभर वेगवेगळ्या जत्रा आणि डिसेंबर महिन्यात नाताळाचा बाजार भरतो. या जत्रा-बाजारामध्ये लँपशेड्स् ते कुंड्या अश्या मातीच्या विविध वस्तू विकणारे कुंभार, हत्यारं विकणारे लोहार, लाकडी चमचे, डाव, झारे विकणारे सुतार, चामड्याचे हातमोजे, टोप्या विकणारे चांभार, अतिशय तलम सुती स्कार्व्ज् विकणारा एखादा विणकार असे हंगेरीतले बारा बलुतेदार दिसतात. साहजिकच खाण्यपिण्याची भरपूर दुकानं लागतात. लँगोश (lángos) हा एक ब्रेडपॅटिससारखा तेलात तळलेला सपाट ब्रेड आणि त्यावर तेयफॉल घातलेला पदार्थ आवडीने खाल्ला जातो. फक्त तो खाल्ल्यावर पोटात किती उष्मांक (कॅलरीज्) गेले याने फार अपराधी भावना येते. मग 'आता एवढं तेलकट खाल्लंच आहे तर थोडं गोडपण खाऊया' म्हणून आपण कुर्तशकॉलाच (kürtőskalács)[८] नावाचा खास मध्ययुरोपियन पदार्थ खायला जातो. कुर्तशकॉलाच बनविण्यासाठी यीस्ट घालून फुगवलेल्या कणकेचा गोळा एका चांगल्या जाड लाकडी लाटण्यावर गुंडाळतात, त्यावर साखर भुरभुरवतात आणि मग ब्रशने लोणी फासतात. मग हे लाटणं गरमगरम कोळशाच्या धगीवर भाजायला ठेवतात. खरपूस भाजलेले कुर्तशकॉलाचचे तुकडे खातखात बाकी जत्रेत हिंडता येतं.

Kürtőskalács Budapest 2008
कुर्तशकॉलॉच भाजताना

या जत्रेतून वाइन तसेच पालिंकाचे ठेले (स्टॉल्स्) असतात. त्यात्या भागातली वाइन वा पालिंका इथे पेल्याच्या मापाने प्यायला विकत मिळते आणि आवडली तर बाटली विकत घेता येते. काही ठिकाणी खास वाइनची जत्रा असते. ख्रिसमस मार्केट लागतं तोवर थंडी चांगलीच बोचायला लागलेली असते. तर थंडीत थोडं गरम व्हायला या मार्केटमध्ये जागोजागी फोराल्त बोर म्हणजे गरम वाइनचे ठेले लागतात. लाल किंवा फिकी वाइन, दालचिनीच्या काड्या आणि खास पारंपरिक मसाले असे एकत्र गरम केले जातात. वाइन उडून जाणार नाही अशा बेतानं हे मिश्रण उकळलं जातं. हाडं गोठवणार्‍या थंडीत गरम वाइनचे घुटके घेत फिरण्याची मजा काही औरच आहे.

Budapest Christmas Market (8228481472)
बुडापेश्टमधील नाताळचा बाजार

युरोपमधला कुठलाच देश 'एकला चॉलो रे' संस्कृतीचा नाही. सगळ्या छोट्याछोट्या देशांनी एकमेकांच्या खाण्या-पिण्यावर चांगलाच प्रभाव पाडलेला आहे. स्लोवाकिया, रोमानिया, ऑस्ट्रिया या सर्व शेजारी राष्ट्रांत कुर्तशकॉलाच विविध नावांनी ओळखला जातो आणि हंगेरीइतक्याच आवडीने खाल्ला जातो. तीच परिस्थिती आहे फोराल्त बोर म्हणजे गरम वाइनची. जर्मनी-नेदरलँडपासून सगळीकडे ख्रिसमसच्या सुमारास गरम वाइन मिळते. तेव्हा हंगेरीतल्या कित्येक पदार्थांचं मूळ हे कदाचित इतर युरोपियन देशांच्या पदार्थांत असेल. तरीही लाल मिरच्या, गुयाश, चेरीचं सूप, पालिंका अश्या खास हंगेरियन पदार्थांच्या रूपानं हंगेरीनं आपलं वेगळेपण आजही जपून ठेवलं आहे.

विशेष आभार - या लेखासाठी बुडापेश्टस्थित झोल्टन गॉयदाचींचे बहुमूल्य साहाय्य मिळाले आहे.

HDA2014_separator_blue.jpg

संदर्भसूची -
[१] आंबट चेरीचं सूप, http://en.wikipedia.org/wiki/Sour_cherry_soup
[२] बोग्राच, http://en.wikipedia.org/wiki/Cauldron
[३] तार्‍होन्य http://en.wikipedia.org/wiki/Egg_barley
[४] नोकेड् लि, http://en.wikipedia.org/wiki/Sp%C3%A4tzle
[५] साअरक्राउत http://en.wikipedia.org/wiki/Sauerkraut
[६] तोकायी वाइन, http://en.wikipedia.org/wiki/Tokaji
[७] पालिंका, http://en.wikipedia.org/wiki/P%C3%A1linka
[८] कुर्तशकॉलाच, http://en.wikipedia.org/wiki/K%C3%BCrt%C5%91skal%C3%A1cs
[९] फोराल्त बोर, http://en.wikipedia.org/wiki/Mulled_wine

चित्रांचे तपशील -
चित्र क्र. १: एगेर किल्ल्यावरून दिसणारा शहराचा मध्यवर्ती भाग, © शंतनू बेडेकर
चित्र क्र. २: कोल्बास, © झोल्टन गॉयदाची (Zoltan Gajdatsy)
चित्र क्र. ३: विकायला ठेवलेल्या सुक्या मिरच्यांचा माळा, By Zairon (Own work) [CC-BY-SA-3.0 (http://creativecommons.org/licenses/by-sa/3.0)], via Wikimedia Commons
चित्र क्र. ४: वरून तेयफॉल घातलेला तळलेल्या माश्याची डिश, © शंतनू बेडेकर
चित्र क्र. ५: गुयाश बनवताना, By Tivadar (Own work) [Public domain], via Wikimedia Commons
चित्र क्र. ६: विविध हंगेरियन पदार्थ, © झोल्टन गॉयदाची (Zoltan Gajdatsy)
चित्र क्र. ७: गरमागरम गुयाश, By Lily15 (Hungarian Wikipedia) [GFDL (http://www.gnu.org/copyleft/fdl.html), CC-BY-SA-3.0 (http://creativecommons.org/licenses/by-sa/3.0/) or CC-BY-SA-2.5 (http://creativecommons.org/licenses/by-sa/2.5)], via Wikimedia Commons
चित्र क्र. ८: चुक्रास्दात मिळणार्‍या सुंदर पेस्ट्र्या By octopusHat [CC-BY-SA-2.0 (http://creativecommons.org/licenses/by-sa/2.0)], via Wikimedia Commons
चित्र क्र. ९: द्राक्षबाग आणि वाइन बनवताना, © यानोश किश (Janos Kis)
चित्र क्र. १०: तोकायी वाइन, By Peter van Mourik [GFDL (http://www.gnu.org/copyleft/fdl.html) or CC-BY-SA-3.0-2.5-2.0-1.0 (http://creativecommons.org/licenses/by-sa/3.0)], via Wikimedia Commons
चित्र क्रम. १०: पालिंका, By Peter van Mourik [GFDL (http://www.gnu.org/copyleft/fdl.html) or CC-BY-SA-3.0-2.5-2.0-1.0 (http://creativecommons.org/licenses/by-sa/3.0)], via Wikimedia Commons
चित्र क्र. ११: कुर्तशकॉलॉच भाजताना, By Cha già José from Vienna, Austria (DSC_1969 Uploaded by Einstein2) [CC-BY-SA-2.0 (http://creativecommons.org/licenses/by-sa/2.0)], via Wikimedia Commons
चित्र क्र. १२: बुडापेश्टमधील नाताळचा बाजार, By Top Budapest (Budapest Christmas Market Uploaded by Einstein2) [CC-BY-2.0 (http://creativecommons.org/licenses/by/2.0)], via Wikimedia Commons


HDA2014_khaadtasanskRuteefooter_1.gif
related1: 

HDA2014_separator_blue.jpg

HDA2014_flaghungary.jpg

HDA2014_separator_blue.jpg
टण्या
HDA14_ShantanuBedekar.jpg
शंतनू बेडेकर हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गेल्या दहा वर्षांपासून नोकरी करतात. वाचन, चित्रपट बघणे आणि भटकंती हे त्यांचे आवडते छंद आहेत. यापुर्वी मायबोली.कॉमवर त्यांनी काही लघुकथा लिहिल्या आहेत.

HDA2014_separator_blue.jpg
HDA2014_maharashtra.png
HDA2014_separator_blue.jpg

प्रतिसाद

अरे वा, तीन तीन लेख.. छानच.

खूप मस्त लेख. हा लेख वाचून लगेच एक खाद्ययात्रा करावी हंगेरीची असे वाटून गेले.

लेख सह्हीच आहे. रूनी म्हणाली तसं लगेच हंगेरीला जाऊन हे पदार्थ चाखावेसे वाटत आहेत. फोटो मस्त आणि शीर्षकही आवडले.

छान आहे लेख .. हंगरी ला जायची संधी मिळाली तरी सेव्हरी पदार्थ किती ट्राय करता येतील कोण जाणे ( मीट खाण्याबद्दल बरेच नखरे असल्यामुळे) पण वरचा पेस्ट्री चा फोटो बघून एकदा तरी ह्या चुक्रास्दा (?) मध्ये जायला मिळावं असं वाटत आहे .. कुर्तशकॉलॉच ही एकदम इंटरेस्टींग .. वाईन्स् आणि पालिंका बद्दलची माहितीही छान .. पालिंका कॉकटेल्स् मध्येही वापरतात का?

तू ज्या कोल्बास सॉसेज् बद्दल लिहीलं आहेस तसं एक किल्बासा (http://en.wikipedia.org/wiki/Kielbasa) हे नाव बघितलंय मी इकडे अमेरिकेतल्या फूड शोज् मध्ये .. कोल्बास हे त्या फॅमिलीतलंच एक भावंडं असावं ..

सर्व प्रतिसादकांचे आभार!

सशल, मी स्वतः मांसाहार बंद केल्यावर हंगेरीस गेलो. त्यामुळे तिथल्या सामिष जेवणाचा मी स्वतः आस्वाद घेतलेला नाही. चिकन/लँबचे हंगेरियन पदार्थ तुलनेने कमी मिळतील. बहुतेक सर्व पदार्थ पोर्क (चोंका) व बीफ घातलेले असतात. मात्र हंगेरीत शाकाहारी पदार्थ बर्‍यापैकी मिळतात, चुक्राझ्दा/पेक्शेगमध्ये बेकरी आयटेम मस्त मिळतात. रस्त्यावर बटाट्याचे तळलेले विविध पदार्थ, लँगोशसारखे पिझ्झासदृश पदार्थही मुबलक. हंगेरीला भेट द्यायची असेल तर ऑगस्ट/सप्टेंबरात (जेव्हा उन्हाळ्याच्या जत्रा लागलेल्या असतात) किंवा मग ख्रिसमसच्या आसपास भेट द्या असे मी सुचवेन.