related1:
दिवाळी म्हटले की सोबत फराळ आणि फटाके हे हवेतच! सुतळी, लवंगी, सुरसुरी अशा रंजक नावांचे फटाके कोणाला आवडणार नाहीत? त्यात आजकाल हवेत विविध आकारांत रोषणाई करणार्या दारुकामाचीही भर पडली आहे. खरेतर फटाके फोडून दिवाळी साजरी करण्याची परंपरा अनेक शतकांपासून अस्तित्वात आहे. आज आपण जे दारुकाम अथवा 'फायरवर्क' बघतो, त्याच्या जवळपास जाणारे दारुकाम खुद्द श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत कसे होत असे याची एक झलक -
- तावदानी रोषणाई - काचेच्या कमानी करून व त्यांस आरसे लावून जे दारुकाम होत असे ते म्हणजे तावदानी रोषणाई.
- आकाशमंडळतारांगण - दारुकामाची उंच झाडे तयार करून त्यातून आकाशातील तार्यांप्रमाणे नानारंगाचे तारे उडवण्यात येत.
- चादरी दारुकाम - तप्तसुवर्णाप्रमाणे लाल व पिवळ्या रंगांच्या फुलांची झाडे तयार करत.
- नारळीझाडे - उंच झाडे तयार करून त्यांतून तोफांप्रमाणे व बंदुकांप्रमाणे आवाज निघत असत.
- प्रभाचमक - प्रातःकाळी सूर्योदयाच्या वेळी प्रभा चमकते, तसा देखावा यात पाहायला मिळे.
- कैरीची झाडे - यातून रंगीबेरंगी धुरांचे लोट निघत.
- बादलगर्ज - या दारुकामाचा मेघगर्जनेप्रमाणे आवाज होई.
याशिवाय बाण, पाणकोंबडी, हातनळे, कोठ्याचे नळे, फुलबाज्या, महताफा वगैरे दारुकामाचे अनेक प्रकार अस्तित्वात होते.