संपादकीय

HDA2014_transaparent.gif

नमस्कार,

सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

हितगुज दिवाळी अंक - २०१४ आपल्यासमोर सादर करताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे. त्याचबरोबरीने हा अंक आपल्या कसोटीस उतरेल की नाही, अशी धाकधूक मनांत आहे.

आजच्या युगात जगाच्या कानाकोपर्‍यांत पसरलेले मराठीभाषक आपल्या अनुभवविश्वांना वेगवेगळ्या मराठी संकेतस्थळांवरून मांडत आहेत. आंतरजालावरील अतिशय कमी खर्चात उपलब्ध सुविधांमुळे टीव्हीस्टुडिओच्या वा रेडिओ स्टेशनच्या मदतीविना, कमीत कमी तांत्रिक सामग्री वापरून दृक्‌श्राव्य कलांना सादरकर्ते प्रेक्षक-श्रोत्यांपर्यंत पोहोचवू शकत आहेत. ब्लॉग, फेसबुक अथवा मायबोलीसारख्या संकेतस्थळांवरून शब्द डिजिटल स्वरूपात विनाविलंब वाचकापर्यंत पोहोचत आहेतच! बदलणार्‍या हौशी मराठी कलाजगताची ही आश्वासक झलक एका बाजूला दिसत आहे, तर दुसर्‍या बाजूला परंपरागत मराठीपणाच्या व्याख्येत फारसे न होणारे बदलही तितकेच अभेद्य आहेत. 'मराठी' म्हटले की गणपती, 'मराठी' म्हटले की शिवराय आणि 'मराठी' म्हटले की दिवाळी अंक!

आंतरजालावर मायबोलीवर व मायबोलीसारख्या इतर संकेतस्थळांवर प्रकाशित होणारे साहित्य आणि इतर कलाप्रकार हे एका प्रकारे वर्षभर उपलब्ध असलेले दिवाळी अंकच नाहीत का? असे असताना दिवाळी अंकासारख्या उपक्रमातून नक्की काय साध्य करायचे आहे? का केवळ परंपरा आहे म्हणून ती जोपासायची इतकाच या उपक्रमाचा हेतू आहे?

या प्रश्नांची उत्तरे शोधताना लक्षात आले की, दिवाळी अंकासारख्या उपक्रमात लेखकांना विशिष्ट विषय देऊन त्यावरील लेखांचे संकलन एके ठिकाणी एकत्र प्रकाशित करता येते. संकलनामुळे विषयांच्या विविध बाजूंची वाचकांना जाणीव होते, माहिती मिळते. ललितलेखन तसेच कथा-कविता सादर करणार्‍यांना दिवाळी अंकाच्या वाचनासाठी अधीर वाचकवर्ग मिळतो. याव्यतिरिक्त मायबोलीवरील सभासदांच्या गुणकौशल्यांची जोड मिळाल्याने अंकाच्या रूपात व मांडणीत तांत्रिक तसेच कलात्मकदृष्ट्या नवनवीन प्रयोग करून कलाकार व आस्वादक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करता येतो.

या अंकाचे संपादन, मांडणी, सजावट, रेखाटने, ध्वनिमुद्रण, मुद्रितशोधन व 'कलानिर्मिती' मायबोलीच्या सदस्यांनी आपले दैनंदिन व्यवसाय व व्यवधाने सांभाळून केले आहे. पूर्वप्रकाशित साहित्य प्रकाशित न करण्याचे धोरण यावर्षीच्या अंकातदेखील कसोशीने पाळले आहे. नवनिर्मितीचा आनंद कर्ता व भोक्ता अशा दोघांनाही मिळावा या दृष्टीने हे दोन्ही मुद्दे महत्त्वाचे आहेत. पूर्वप्रकाशित तसेच सदस्य नसलेल्या व्यावसायिक लेखक, कवी, पत्रकार यांच्या साहित्यकृतींचा मोह टाळल्याने मायबोली.कॉमच्या सदस्यांना कलासादरीकरणासाठी हक्काचे व्यासपीठ व नवनिर्मितीची प्रेरणा नक्कीच मिळत असावी. मायबोली.कॉमवर लेखनास सुरुवात करून आज व्यावसायिक तसेच प्रस्थापित छापील दिवाळी अंकात लिहू लागलेल्या लेखक व कवींची वाढती संख्या मायबोलीच्या या धोरणाचे यश अधोरेखित करते.

हा अंक जुळवताना प्रकर्षाने हे जाणवत गेले की, हितगुज दिवाळी अंकाच्या चौदा वर्षांच्या प्रवासात प्रत्येक संपादक मंडळाने अंकाच्या संकल्पनेमध्ये भर घातलेली आहे. चौदा वर्षांपूर्वी डिजिटल रूपात दिवाळी अंक प्रकाशित करणे हा क्रांतिकारी विचार पहिल्या संपादक मंडळाने रुजवला. पुढल्या चौदा वर्षांत आंतरजालात आणि संगणक तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल घडले. केवळ अमेरिकेत वा युरोपमध्ये उपलब्ध असलेली वेगवान आंतरजाल-जोडणी भारतातल्या छोट्याछोट्या गावांतदेखील आता मिळते आहे. आंतरजालावर येण्यासाठी आता संगणकाची गरज राहिलेली नाही. मोबाइल फोन, टॅब्लेट्स् आणि मोबाईलचा सिग्नल आपल्याला दिवसरात्र जगाशी जोडलेले ठेवतो आहे. युनिकोडच्या, दृपलच्या साहाय्याने मायबोलीच्या तंत्रज्ञानात आमूलाग्र सुधारणा झाली आहे. युट्यूबवर, क्लाऊडवर डिजिटल साठवण, विविध संकेतस्थळांवरील कन्टेन्ट लेखांत सहज उपलब्ध करून देण्याची सुविधा यांमुळे लेखांत शब्दांबरोबरच आवाज, चित्र व अ‍ॅनिमेशन सहज वापरता येऊ लागले आहे.

या सर्व बदलांच्या बरोबरीने हितगुज दिवाळी अंकाची रुपरेषादेखील बदलली आहे. गेल्या काही अंकात शब्दरूपी साहित्याबरोबरच नृत्य, विणकाम, पाककृती, संगीतादी दृक्‌श्राव्य कला सादर झाल्या. या वर्षीच्या अंकात यापुढे एक पाऊल जाऊन आम्ही डिजिटल माध्यमाच्या शक्तींचा शक्य तितका उपयोग करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यावर्षीच्या अंकात कथा-कविता वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचादेखील अनुभव तुम्ही घेऊ शकाल. मजकूर लक्षवेधी करण्याच्या दृष्टीने अंकाच्या जाहिरातींमध्ये, तसेच अंकातील काही सदरांत अ‍ॅनिमेशन तंत्राचा उपयोग केला आहे. त्याचबरोबरीने शब्दकोडी, अवांतर माहिती, मेन(ड)केचे सल्ले यांसारखी छापील अंकांची खास वैशिष्ट्ये डिजिटल अंकात समाविष्ट केली आहेत.

अंक वाचनीय करण्यास केवळ तंत्रज्ञानाची व संसाधनांची उपलब्धता पुरेशी नाही, याचा आम्हांला विसर पडला नाही. लघुकथा व कविता हे मराठी साहित्यजगताचे अविभाज्य घटक अंकात घ्यायचे, हे गृहीत धरले होते. किशोरवयीन (साधारण नऊ ते सोळा हा वयोगट) मुलांसाठी मराठीमधून फारच कमी कसदार साहित्यनिर्मिती होते. आजच्या युगातील किशोरांना वाचायला आवडेल, त्यांच्या अनुभवविश्वाशी जोडता येईल, असे साहित्य 'किशोरविश्व' सदरात घेण्याचे ठरवले. मायबोलीवरील सिद्धहस्त तसेच नवे लेखक या उपक्रमांत आपल्या साहित्यकृती सादर करतील, याची आम्हांला खात्री होती. मेंडकेचे सल्ले, हास्यटपरी अशा उपक्रमांतून अधिकाधिक सदस्यांना अंकात थेट सहभागी करवून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. काही उपक्रमांना भरघोस साथ मिळाली, तर काहींना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

'विचारमंथन' या विभागात विषय निवडताना मायबोलीसदस्यांच्या विविध क्षेत्रांतील अनुभवांचा फायदा करून घ्यावा, असा प्रमुख विचार पुढे आला. क्षेत्रांच्या वैविध्याने दडपून जाऊन विषयांवर मर्यादा घातली तर अनेक सदस्यांना भाग घेता येत नाही; याउलट विषयांची व्याप्ती फारच जास्त ठेवली, तर अंकातील लेखांचे संकलन पसरट होते. चर्चेतून असे लक्षात आले की, आयुष्याच्या प्रयोजनाचे आणि जगण्याच्या प्रक्रियेचे कुतूहल हे कमी-अधिक प्रमाणांत प्रत्येक मनुष्याला असते. या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रवास हा आपल्या रोजच्या आयुष्यात घडणार्‍या 'सामान्य घटना' ते 'देशव्यापी चळवळी' यांमधील एक समान धागा आहे. आदिमानवापासून आजच्या अतिप्रगत मनुष्यापर्यंत हे कुतूहल आणि शोध, दोन्ही टिकून आहेत.

अग्नी माणसाळवता येणे, हा मनुष्याच्या उत्क्रांतीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणता येइल. या शक्तीमुळे आपल्याला निसर्गातून मिळणार्‍या अन्नाची चव बदलण्याची शक्ती प्राप्त झाली. जे आहे तसे न खाता दोन किंवा अधिक गोष्टी एकत्र करून माणसाला 'जेवण' रांधता येऊ लागले. त्या 'रांधण्यावर' स्थळ-काळानुसार उपलब्ध घटकांची मर्यादा होती. पण मानवाचे वास्तव्य जगभरच्या भूप्रदेशात असल्याने ही मर्यादाच खाद्यसंस्कृतीच्या वैविध्याची नांदी ठरली. जाणिवेची व्यामिश्रता जसजशी वाढत गेली, तसतशी केवळ भित्तिचित्रांनी आणि आरडाओरडी करून भावना दुसर्‍यांपर्यंत पोहोचवणे अशक्य होऊ लागले. आवाजावरचे सूक्ष्म नियंत्रण, शब्द आणि शब्दसमूहांचे नियम यांच्या एकत्रीकरणाने आपल्याला भाषा प्राप्त झाली. भाषेचे काम केवळ उपयुक्त सूचना संक्रमित करणे इतकेच न राहता तीतून विविध कलांकृतींची निर्मिती होऊ लागली. जेवण, पेहराव, भाषा यांच्या वेगवेगळ्या प्रांतातल्या स्वतंत्र वाढीतून एकमेकांपासून अनेक बाबतीत भिन्न असलेल्या संस्कृतींची वाढ झाली. संस्कृतींअंतर्गत व आंतरसांस्कृतिक संघर्षातून चांगल्या व वाईट 'सामाजिक चळवळींचा' जन्म झाला. चळवळींना जोड मिळाली शास्त्र-तंत्रज्ञानाच्या प्रगतीची आणि संवाद साधण्यासाठी उपलब्ध असलेल्या भाषेच्या शक्तीची. काही चळवळींनी समाजाचा समूळ विनाश केला, तर काहींनी हजारो-लाखो लोकांची आयुष्ये झळाळून टाकली! क्रांतिकारी शोधांमुळे होणारी प्रगती, त्यातून निर्माण होणारे सांस्कृतिक वैविध्य, या विविधतेतून जन्मणार्‍या सामूहिक चळवळी आणि क्रांतिकारी शोधांच्या मिळालेल्या मदतीमुळे होणारे या चळवळींचे दूरगामी परिणाम, हे चक्र चिरंतन चालू आहे आणि राहील.

अन्न, संवाद, बदल आणि चळवळ या मनुष्याच्या समाजजीवनाच्या प्राथमिक गुणवैशिष्ट्यांवर आधारित लेख हे यंदाच्या दिवाळी अंकाचे खास वैशिष्ट्य! वरकरणी सुट्या भासणार्‍या या लेखांची व संवादांची गुंफण आपल्या रोजच्या आयुष्याच्या सर्व अंगांना स्पर्श करेल. एकविसावे शतक हे संस्कृतींच्या संघर्षाचे शतक असेल, अशी धारणा जगातील बहुसंख्य विचारवंतांमध्ये व जनतेमध्ये मूळ धरत असताना संस्कृतींच्या वैविध्यातील सौंदर्य व त्याखाली वाहणारा मनुष्याच्या उत्क्रांतीच्या इतिहासाचा समान धागा जर आम्हांला वाचकांपर्यंत पोहोचवता आला, तर या अंकाच्या प्रकाशनात योगदान दिलेल्या प्रत्येकाच्या श्रमाचे सार्थक झाले, असे नक्कीच म्हणता येइल.

केवळ संपादक मंडळाच्या प्रयत्नांनी अंक प्रकाशित करणे अशक्यप्राय आहे. अंकास प्रदर्शनीय करण्यासाठी रेखाटन, ध्वनिमुद्रण, मुद्रितशोधन, अंकाची मांडणी अशा महत्त्वाच्या कामांमध्ये अनेक स्वयंसेवकांनी आपल्या व्यग्र दिनचर्येतून वेळ काढून योगदान दिले. मायबोली प्रशासक तसेच मायबोली बाहेरील व्यक्तींचीही साथ आम्हांस मिळाली. 'श्रेयनामावली'स भेट देऊन या सर्वांच्या प्रयत्नांने कौतुक तुम्ही कराल, याची आम्हांला खात्री आहे.

आपले प्रतिसाद या अंकातील सर्व कलाकारांना पुढील कामासाठी उत्तेजन देतील, तसेच पुढल्या वर्षीच्या दिवाळी अंकास अधिक उत्तम बनविण्यात मदत करतील.

शुभ दीपावली!

संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक २०१४

HDA2014_transparentpaNatee.gif
HDA2014_transparentpaNatee.gif
HDA2014_transparentpaNatee.gif
HDA2014_transparentpaNatee.gif
HDA2014_transparentpaNatee.gif
HDA2014_transparentpaNatee.gif
HDA2014_transparentpaNatee.gif
HDA2014_transparentpaNatee.gif
HDA2014_transparentpaNatee.gif
HDA2014_transparentpaNatee.gif
HDA2014_transparentpaNatee.gif
HDA2014_transparentpaNatee.gif
related1: 


HDA2014_HDA2014_maayboli.jpg
HDA2014_HDA2014_hitaguj.jpg
HDA2014_diwali1.jpg
HDA2014_utsav_0.jpg
HDA2014_HDA2014_parampara.jpg
HDA2014_sanskrutee.jpg
HDA2014_pratibha_0.jpg
HDA2014_sahitya_0.png
HDA2014_HDA2014_gyaanajotee.jpg

प्रतिसाद

मुखपृष्ठ फारच शोभिवंत दिसते आहे. लेखनकलाकारी आणि मागे फिकट कोयरीपटाने उठाव आणला आहे. मन प्रसन्न झाले.

मला संपूर्ण लेख न दिसता टिपण दिसत आहे.या २०१४ हितगुज दिवाळी अंकाचे तंत्र आमच्या मोबाईलशी कट्टी करते आहे वाटतं.

संपादकीय आवडलं.

या पानावरचं रेखाटन आणि मांडणी सुंदर आहे.

संपादकीय आणि सजावट आवडली . शुभेच्छा !

सुंदर... अंकासाठी मेहनत घेतलेल्या सर्वांचे आभार :)

सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा :) :)

संपादकीय फारच छान .. :)

संपादकीय अतिशय आवडले.

संपादकीय अत्यंत विस्क्ळीत आणि विचार करण्याजोगे काहीच न देणारे आहे. संपादकीयाचा बराच भाग मंडळाची चर्चा यावर फुकट गेला आहे. "बदलणार्‍या हौशी मराठी कलाजगताची ही आश्वासक झलक एका बाजूला दिसत आहे, तर दुसर्‍या बाजूला परंपरागत मराठीपणाच्या व्याख्येत फारसे न होणारे बदलही तितकेच अभेद्य आहेत." या वाक्यातल्या दोन भागांचा एकमेकांशी नीट सांधा जुळत नाही. शिवाय "शब्द डिजिटल स्वरूपात" याचा अर्थ काल आणि आज विचार करुनही समजला नाही म्हणून शेवटी प्रतिक्रिया द्यायचे ठरवले. शब्द कसे डिजिटल स्वरूपात असतात? ते डिजिटल 'माध्यमातून' वाचकांपर्यंत पोहोचतात. त्यांचे स्वरूप डिजिटल नसते. शब्दांना अर्थ असतो, भाषा असते, त्यांचे स्वरूप्च म्हणायचे झाले तर फार तर ते ज्या भाषेतील असतील त्या भाषेची लिपी हे त्यांचे स्फ्व्रूप म्हणता येईल असे मला वाटले.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेब डिझाईनचा वाचकाच्या दृष्टीने एक खूप मोलाचा मुद्दा म्हणजे पानाच्या रिअल एस्टेटचे योग्य नियोजन जे या अंकात अगदी पात धुडकावून लावले आहे - अगदी संपादकीयाचे पानही यातून सुटलेले नाही.

हा प्रतिसाद सुपूर्द करण्यापुर्वी सवयीने 'प्रतिसाद तपासा' वर टिचकी मारली आणि आश्चर्याचा आणखी मोठा धक्का बसला! त्या पानावर प्रतिसाद दिसतो, काही बदल करायचा असेल तर खाली वेगळ्या जागेत तो करताही येतो.... पण!!! त्या बदल करण्याच्या चौकोनात देवनागरीत कसे लिहायचे???? आणि जोडीला त्या पानाची मांडणी मूळ पानापेक्षा निराळीच आहे तो वेगळाच मुद्दा आहे.

दिवाळी अंकावर बरीच वर्षे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात काम केलेले असल्यामुळे या सगळ्या गोष्टी सहज टाळण्यासारख्या आहेत याची कल्पना असल्यामुळे जास्तच वाईट वाटते आहे.

प्रतिसाद तपासण्याची विचित्र सोय वापरता-वापरता वरती काही चुका राहून गेल्या आहेत हे पुनः वाचताना लक्षात आले त्याबद्दल क्षमस्व.

"व्यग्र दिनचर्येतून" की व्यस्त दिनचर्येतून?

संपादकीय छान आणी डीटेल .. :)

संपादकीय छान आणि मुद्देसुद लिहिले आहे.

>>> आजच्या युगात जगाच्या कानाकोपर्‍यांत पसरलेले मराठीभाषक आपल्या अनुभवविश्वांना वेगवेगळ्या मराठी संकेतस्थळांवरून मांडत आहेत. आंतरजालावरील अतिशय कमी खर्चात उपलब्ध सुविधांमुळे टीव्हीस्टुडिओच्या वा रेडिओ स्टेशनच्या मदतीविना, कमीत कमी तांत्रिक सामग्री वापरून दृक्‌श्राव्य कलांना सादरकर्ते प्रेक्षक-श्रोत्यांपर्यंत पोहोचवू शकत आहेत. >>>> या वाक्यांमधे 'अनुभवविश्वांना' आणि 'कलांना' ही शब्दांची रुपे योग्य आहेत का? मराठीत अशी वाक्यरचना करत नाहीत. त्याऐवजी हा परिच्छेद असा असायला हवा :

आजच्या युगात जगाच्या कानाकोपर्‍यांत पसरलेले मराठीभाषक आपापली अनुभवविश्वं वेगवेगळ्या मराठी संकेतस्थळांवरून मांडत आहेत. आंतरजालावरील अतिशय कमी खर्चात उपलब्ध सुविधांमुळे टीव्हीस्टुडिओच्या वा रेडिओ स्टेशनच्या मदतीविना, कमीत कमी तांत्रिक सामग्री वापरून दृक्‌श्राव्य कला सादरकर्ते प्रेक्षक-श्रोत्यांपर्यंत पोहोचवू शकत आहेत.

असे मला वाटते.

संपादकीय वाचले आवडले ! आता हळूहळू इतर वाचतो