गिरिराज किराडू : समकालीन हिंदी कवितेचा एक प्रगल्भ चेहरा

HDA2014_darkblueheader

अद्याप चाळिशीही न गाठलेली एक भारतीय प्रतिभा सर्वांगाने बहरते आहे. तिला कसलीच घाई नसावी. तशी ही मूलत: कविप्रतिभा आहे, पण अजून एकही कवितासंग्रह प्रकाशित करायला कवीला कदाचित सवड मिळाली नसावी.

या प्रतिभावंताचं नाव आहे गिरिराज किराडू.

राजस्थानमध्ये १९७५ साली जन्मलेल्या गिरिराज यांच्या लेखणीचा आवाका मोठा आहे. ही प्रतिभा अगदी तरुण आणि समकालीन आहे. भारतीयच नव्हे, तर विश्वसाहित्यातील आधुनिकतेचा उद्घोष त्यांच्या शैलीत सरमिसळलेला आहे, पण त्यांचा कल आहे निरनिराळ्या हिंदी, द्वैभाषिक(हिंदी-इंग्रजी) आणि बहुभाषिकही (हे नेटवर! एक वेगळाच प्रयोग!) - साहित्यिक पत्रिका-नियतकालिकांच्या संपादनाकडे (यातील काही पत्रिकांचे ते संस्थापक-संपादक आहेत); हिंदी, इंग्रजी आणि राजस्थानी कादंबऱ्या-कवितांचे अनुवाद आणि हो, समीक्षालेखन याकडेच!

तरीही मूलतः ही कविप्रतिभाच, निरनिराळ्या रूपांत प्रकटणारी, म्हणून या सर्व कार्यक्षेत्रांबद्दल बोलण्याऐवजी आपण त्यांच्या कवितांचा परिचय करून घेऊया. या कवितांचा संग्रह अद्याप प्रकाशित झाला नाही असं मघाशीच म्हटलं, पण विविध संकलनांमधून त्या संग्रहित मात्र झालेल्या आहेत.
सर्वप्रथम , ‘इसी तरह होगा’ या कवितेतलं त्यांचं हे या देशाच्या स्थितिप्रियतेवरील विडंबनात्मक भाष्य. यातील सुरुवातीच्या काही ओळी वानगीदाखल –

‘इसी तरह होगा’ से शुरू या ख़त्म होने वाले
दस वाक्य हम इतने हुनर से लिख सकते थे कि हमने तय पाया
हमारे साथ कुछ नहीं या सब कुछ इसी तरह होगा

‘हे असंच चालायचं ‘ हे महावाक्य एकदा हाडीमाशी खिळलं की काय होतं हे कवीच्या नजरेतून पाहताना एक दचकवणारी मॅजिकल रिअ‍ॅलिटी कवितेच्या पुढल्या ओळींमधून अंगावर येते. वस्तू, ज्या उपयोग-उपभोगासाठी आहेत, त्या येथे आम्ही एकमेकांवर दगडांप्रमाणे भिरकावत आहोत आणि जे जिवंत नाहीत त्यांच्या तसबिरींना फुलांप्रमाणे वाहात आहोत..

गिरिराज यांच्या कवितेतला अवकाश आपल्याला इथूनच परिचयाचा व्हायला लागतो. एखाद्या अमूर्तचित्रात अधांतरी तरंगणाऱ्या वस्तू आपण कित्येकदा पाहिल्या असतील, इथे कवितेच्या अवकाशात त्या एक तर भिरकावल्या जात आहेत किंवा अधांतरी लटकलेल्या मृतांच्या फोटोजवळ निमूट पडून आहेत. हा जगण्याचा, कृतिशीलतेचा, वस्तूंच्या प्रयोजनाचा विपर्यास आहे कारण ‘हे असंच चालायचं‘ हेच आपलं ब्रीद आहे. बदल, संघर्ष नाकारण्याची ती एक रीत आहे.

गिरिराज यांची जाणीव एकाच भूप्रदेशाशी संलग्न नाही. ती विस्तारलेली आहे तिथपर्यंत, जिथे स्थळकाळाच्याही पटापलीकडे कल्पनांचा आणि प्रतिमांचा एक अवकाश अवतरलेला आहे, जो कवीला फार मानवतो, तिथेच तो कोणते तरी सत्य शोधत भरकटत असतो. वैश्विक साहित्यातील व्यक्तिरेखा पुस्तकाच्या पानांतून उठून आपल्या मनात राहायला येत असतातच. गिरिराज त्यांचा अत्यंत उत्कटतेने विचार करत राहातात. त्यांची समीक्षाही त्यामुळे खूपदा आस्वादकाच्या अंगाने अभिजात साहित्य-महाकाव्यातील व्यक्तिरेखांचे चिंतन करत असते; याचा खरे तर वेगळा परामर्ष घ्यावा लागेल. आता या लेखात वाचूया अजून एक कविता. यात कवीने 'मादाम बोवारी' या वाङ्मयीन व्यक्तिरेखेच्या पतीच्या भूमिकेत प्रवेश केला आहे. तिच्या शरीरात विष पसरण्याचा शेवटचा क्षण जवळ आलाय, ती नवऱ्याची क्षमा मागतेय एका उद्ध्वस्त होत गेलेल्या सहजीवनासाठी; आणि त्या भूमिकेत शिरलेले गिरिराजही तिची उलट क्षमा मागत आहेत...

काही ओळी -

क्षमा करो प्रिये, मैं इस कथा से अभी विदा नहीं ले सकता
तुम्हारा अंतिम संस्कार मेरा अंतिम संस्कार नहीं है
मैं तुम्हारा समाधिलेख नहीं हूँ...

उद्ध्वस्त असेल, पण उत्कट जीवन भोगून आणि त्याची सजाही स्वत:ला कसल्याशा धैर्याने देऊन ही मनस्विनी तर विझून जाते आहे, पण तिचा नवरा मात्र मागे जिवंत राहणार आहे, त्याची कथा अजून संपलेली नाही, त्याला जीवनाचा पाळीव प्राणी होऊन तिची कथा आणि कबर, दोन्ही सांभाळत बसायचं आहे! त्याची दु:खांतिका प्रदीर्घ आणि कंटाळवाणी आहे. तिची पुन:पुन्हा क्षमा मागताना कुठेतरी या शोकांतिकेची जबाबदारी आपल्यावरही येते एवढे मात्र तो अधोरेखित करतो.

‘डॉन किखोते के रचयिता पिअरे मेनार्ड‘ या कवितेत कवीने पिअरे मेनार्ड – शतशतकातली अद्भुत साहित्यकृती स्वत: जगू पाहणारा एक लेखक, त्याच्या मनातील द्वंद्व साकारलं आहे -

पियरे मेनार्ड एक किताब लिखना चाहता है
पर पहली मुश्किल तो यही कि वो ख़ुद कोई नहीं
उसकी जीवनी तो शायद है कोई जीवन नहीं
दूसरी यह कि वह एक लिखी हुई किताब को किसी नये तरीके से नहीं लिखना चाहता
ऐसा तो सभी लेखक करते ही हैं
वह शताब्दियों में हज़ारों-लाखों के पढ़ी हुई किताब को शब्द दर शब्द वैसे ही लिखना चाहता है...

ही संपूर्ण कविताच एक भूलभुलैया आहे, प्रतिभेच्या जगातला एक चक्रव्यूह आहे.

शेक्सपिअरच्या मॅकबेथपासून फणीश्वरनाथ रेणू यांच्या ‘तीसरी कसम’मधल्या हिरामनपर्यंत अनेक पात्रे गिरिराज यांच्या मनोविश्वात आणि कवितेत इतस्तत: फिरत असतात.

‘’हिरामन तीन कसमें खाता है
फिर किसी कहानी का सुपात्र नहीं बनूँगा
फिर किसी कहानीकार को अपने बारे में नहीं लिखने दूँगा

फिर किसी कहानी में अपना ही पार्ट नहीं करूँगा –‘’

या कवितेच्या शेवटच्या दोन ओळी, ज्या इथे दिलेल्या नाहीत, नाट्यमयरीत्या फणीश्वरदास रेणू यांच्याच काल्पनिक प्रतिवादाने संपतात.

चक्रावून टाकणे हे गिरिराज यांच्या कवितेचं एक वैशिष्ट्य आहे याची जाणीव पुन्हा होते.

‘अधांतर’ हा गिरिराज यांचा आवडता विषय, पुन:पुन्हा प्रकटणारा, त्यांच्या कवितेची भावभूमी अधांतरात आहे असं एक विचित्र विधान करावंसं वाटतं आहे. ‘इस पूरी संरचना से बाहर‘ या कवितेतल्या या काही ओळी. गिरिराज म्हणतात –

जिन्हें हमने ठीक अपने सिर पर मँडराते देखा था
वे कोई पैराशूट खोलकर नीचे गिरते हुए उन्हीं घोंसलों से टकरायेंगे
ऐसा सोचकर हम हवा में ताबड़तोड़ हो रही फायरिंग के नीचे से होकर
पृथ्वी पर गिर रहे एक रूपक और पृथ्वी के बीच
अपनी हथेली ऐसे रख देंगे
जैसे सुबह और शाम के बीच एक दोपहर
यह हमें मालूम नहीं था।

या मांडणीमध्ये कवी आकाशात भिरभिरणाऱ्या, जमिनीवर झेपावू पाहणाऱ्या आकाशस्थ अस्तित्वांपासून अधांतरातील आपलं प्रेमाचं घरटं - जे विस्कटलं, तर त्याच्या काड्याकाटक्यांत गुंतलेलं त्याचं आकाशच विखरून जाईल, बचावू पाहत आहे. या अवघडलेल्या आशयात नेमकं काय आहे? युद्धग्रस्त वर्तमान?आध्यात्मिक अर्थाने त्रिशंकूसारखी अवस्था? एक निरंतर पोकळी मात्र नक्कीच जाणवते आहे जिथे कवी आपले अंत्यसंस्कार करवू इच्छितो!

शेवटी कविता इथे संपते -

इस पूरी संरचना से बाहर
यहाँ कहता हूँ
मेरा अंतिम संस्कार आकाश में करना।’

'आप ख़ुशकिस्मत हैं' हीसुद्धा अशीच एक कविता, परिचयाच्या शून्याकडे परतणारी.

आप ख़ुशकिस्मत हैं कि चीख़ सकेंगे
जब पूरा संसार किसी उलझे हुए उड़नखटोले से लटक कर
किसी और आकाशगंगा में बसने के लिए
फ़रार होने की कोशिश कर रहा होगा

खरी तक्रार अशी आहे की ही पोकळीत मारलेली उडी कुठेच संपणार नाही हे कवीला माहिती आहे..

कविता भी एक असफल छलांग है
और मैं ख़फ़ा हूँ इससे भी

गिरिराज यांच्या कविता आकाराने लहान, मुक्तच्छन्दी आहेत. बहुतांशी गद्यसदृश आहेत. त्यांचे बलस्थान अभिव्यक्तीतील कमनीय आकृतिबंधात सामावलेले नाही तर प्रतिमांच्या वैचित्र्यात व विविधतेत, त्यांतून व्यक्त होणाऱ्या आशयात आहे.

गिरिराज यांच्या ‘अभिव्यक्त’, ‘कोलंबस’ या कविता विरामचिन्हविरहित आहेत. तशाही त्यांच्या अनेक कविता लांबचलांब ओळींच्या, विरामचिन्हं नसलेल्या किंवा फारच कमी असलेल्या किंवा ती विरामचिन्हं ओळखीच्या टप्प्यावर न येणाऱ्या - अशा आहेत. एकूणच ओळखीच्या जगाची अनोळख पटवणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे.

भाषेची मोडतोड करून आशय शोधण्याचं एक कारण असू शकतं, शब्दांच्या आधारे जगण्याचा अर्थ लावण्याच्या प्रक्रियेतच उद्भवणारे अनर्थ.

या ‘अभिव्यक्त’ कवितेतील काही ओळी –

इतना रहता था मैं मनुष्योंके बीच
फिर भी कबीर का अर्थ घनानंद मीरा का अर्थ महादेवी नहीं था
मेरी सारी गफ़लत उन के बारे में थी जो मनुष्य नहीं थे
मैं उन दिनों की बात कर रहा हूँ जब मेरा अर्थ तुम हो जातीं अगर मैं अपना अर्थ रह गया होता

या आणि अशा अनेक कविता थांबून वाचताना सकृतदर्शनी विक्षिप्त वाटणाऱ्या विधानांमध्ये एक खोल वेदना, एक वेगळी आकलनरीती समजत जाते. गद्यप्राय वाटणाऱ्या या कवितेतलं काव्य-रसायन सवयीचं आणि आवडीचंही होत जातं.

क्रौर्य. जगण्यात सतत भेटतं. आपणही एक पक्षकार असतो क्रौर्याचे. या कवितेतल्या मुंग्यांसारखे. कवितेतून कसं सामोरं जावं सर्वंकष क्रौर्याला? कोमलतेने? गिरिराज लिहितात-

सबसे छोटी उंगली जितना छोटा एक शव
इस दृश्य को तुम्हारी आँखों के आगे से इतनी तेजी से हटा लेना है
कि उस छोटे से शव को कुतरती चींटियाँ भी अखबार के टुकड़े में लिपट जा गिरें नीचे गली में
इनको कुछ पता नहीं चलता क्या खा रही हैं
– अब आँगन में कोई शव नहीं –

या भावविश्वात प्रेमाची अभिव्यक्ती कशी आहे मग? गिरिराज यांची प्रेमाची भाषा संवाद साधू पहाणारी पण एकटेपणाने व्याप्त आहे. या काळाचं ते मुख्य वैशिष्ट्य आहेच. पण गिरिराज मागेही जातात. रिल्के यांच्या एका रचनेवरून प्रेरित होऊन ते लिहितात-

और ठीक इसी छवि में मैंने तुम्हे पाया है सदैव--आईने के भीतर,
बहुत भीतर जहाँ तुम स्वयं को रखती हो--इस संसार से दूर, बहुत दूर
फ़िर क्यूं आई हो ऐसे अपने आप को मिथ्या करते हुए...

प्रेयसीची शांत मंद्र प्रतिमा, आरशाने आपल्या आत्म्यात खोल जपलेली, लपवलेली, अप्राप्य. म्हणून तिचं प्रत्यक्ष समोर येणं हेच मिथ्या आहे. आरशात दिसू न शकलेला एक थकवा त्या प्रतिमेच्या पंखात आहे. प्रेम वास्तवात येताना असं हरत, हरवत जातं.

प्रेमकविता ही अशी असते? गिरिराज प्रेमाचा आत्मा शोधताना आसक्तीच्या पलीकडे जातात म्हणून त्यांना कधी प्रियकर होता येतं, तर कधी प्रेयसी.

आता हे प्रेयसीच्या परिप्रेक्ष्यातून प्रियकराचं रितेपण. त्याचा रिकामा खिसा. त्याची भौतिकच नव्हे तर आत्मिकही दिवाळखोरी, त्यातून त्याला लागलेली शांत झोप. पण त्यातून तिला मिळालेलं पूर्ण अपयशही. तिची हार.

‘तीन प्रेमकविता‘ या कवितेतून -

मेरी उंगलियाँ देख रहीं थीं एक जेब भी कितनी वीरान हो सकती है
वह सोया हुआ था मुझे यकीन था मैं पकडी नही जा सकती
जेबमें हाथ डालते हुए सोचा था वहाँ कुछ सिक्के कुछ नोट होंगे
शायद पर्स फोन कुछ कागज कॉर्ड
पर वह एक बिल्कूल वीरान जेब थी...

सर्वात शेवटी, कवी असणं ही एक जोखीम. अगदी तुकारामांपासून अद्यतन काळापर्यंत कशीकशी निभावलेली अस्सल कवींनी. म्हणून शेवटचे हे शब्द , या कवित्व-परिचयाचा समारोप.

लिखकर सब कुछ से बिछड़ने से थक गया हूँ
अपना मरना बार-बार लिखकर मरने तक से बिछड़ गया हूँ

हिंदी कवितेच्या विशाल मुख्यप्रवाहात राजकीय, सामाजिक संवेदना गेल्या काही दशकांमध्ये प्रभावी होत गेल्या आहेत. पण गिरिराज यांच्या कवितेत त्या अवतरतात तेव्हा त्यांचं स्वरूप पूर्णपणे बदललेलं असतं. एका अंत:स्तरावर प्रतिमांचा कल्लोळ होऊन त्या उमटतात.

अशोक कुमार पांडे आपल्या ‘हिन्दी कविता के दो दशक– चेहरे, मुखौटे और चश्मे ‘ या लेखात या परिस्थितीवर भाष्य करताना म्हणतात, 'नब्बे के दशक के बाद ये प्रवृतियाँ विस्तार भी लेती हैं और कविता की नागरिकता के विस्तृत होने के साथ-साथ कुछ और नई प्रवृतियाँ साफ़ दिखाई देने लगती हैं. सोवियत संघ के विघटन का ‘हैंग़ ओवर’ कमजोर पडता है, बाज़ार का मनुष्यविरोधी रूप साफ़ सामने आने लगता है, सामाजिक न्याय की विसंगतियाँ दिखती हैं और संपदा की लूट के साथ-साथ सरकारों का जो क्रूर और दमनकारी चेहरा दिखाई देता है वह कवियों को अपने तरीके से प्रभावित करता है.‘’

इंटरनेटच्या माध्यमातून पुढे आलेल्या नव-प्रतिभांच्या मोठ्या यादीत अशोककुमार पांडे यांनी या लेखात पुढे गिरिराज किराडू यांचा उल्लेख केला आहे.

गिरिराज यांच्या विपुल कवितांपैकी काहींचा हा संक्षिप्त आढावा.

या लेखाच्या सुरुवातीला उल्लेखिल्याप्रमाणे त्यांचं स्फुट ललित तसंच समीक्षात्मकही भरपूर लेखन आहे. कथाही आहेत. गद्य-पद्य अनुवाद तसेच भावानुवाद किंवा एखाद्या ललितकृतीवरून प्रेरित होऊन केलेलं लिखाण आहे. बहुवचन, पूर्वाग्रह, आलोचना, तद्भव इत्यादी अनेक मासिका–नियतकालिकांमधून ते आलेलं आहे. प्रतिलिपी द्वैभाषिकाचे ते संस्थापक संपादक आहेत. राजस्थान साहित्य अकादमीच्या पत्रिकेचे सहायक संपादक आहेत. ‘उदाहरण’ या स्वायत्त व्यासपीठाचे संस्थापक आहेत.

या सर्वाची पूर्वपीठिका त्यांच्या कवितेतच आहे. हीच कवी-वृत्ती घेऊन त्यांनी गद्य व समीक्षालेखन केलं आहे त्यामुळे कवितेच्या परिचयात त्यांच्या लेखनसृष्टीचा समग्र परिचय बीजरूपाने सामावला आहे.

एका तरुण कवी-लेखकाचा हा सशक्त आवाका नक्कीच थक्क करणारा आहे. त्याची सकसता, बहुप्रसवता स्तिमित करणारी आहे. हिंदी साहित्याचा हा चेहरा तरुण तर आहेच आणि खूप प्रगल्भही आहे.

HDA2014_separator_blue.jpg

या लेखात कविता वापरू देण्यास श्री. गिरिराज किराडू यांनी परवानगी दिल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. या सर्व कवितांचे प्रताधिकार संबंधितांकडे स्वाधीन.

HDA2014_book_stand.jpg
related1: 
HDA2014_separator_blue.jpg

HDA2014_rangolee4.jpg

HDA2014_separator_blue.jpg
भारती बिर्जे डिग्गीकर
HDA_14_BharatiBirjeDiggikar.jpg
भारती बिर्जे डिग्गीकर यांचा 'मध्यान्ह' हा पहिला कवितासंग्रह मौज प्रकाशनाकडून २००६मध्ये प्रकाशित झाला व 'चंद्रस्वप्न एकले ' या ध्वनिफितीसाठी २००५मध्ये त्यांना झी मराठीकडून (तेव्हाचा अल्फा गौरव) सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार मिळाला आहे. त्याआधी त्यांनी 'अभिरुची' मासिकाच्या संपादनात कै.पुरुषोत्तम आत्माराम चित्रे यांना अनेक वर्षे सहकार्य केले व 'अभिरुची'मधूनच त्यांच्या सुरुवातीच्या बऱ्याच कविता प्रकाशित झाल्या. यावर्षी मे २०१४मध्ये त्यांचे 'रस-सिंधू' हे मायबोलीवर प्रकाशित केलेल्या विविध रसग्रहणपर लेखांचं ई-पुस्तक ई-साहित्य प्रतिष्ठानकडून प्रकाशित झाले आहे.

HDA2014_separator_blue.jpg
HDA2014_nepal.png
HDA2014_separator_blue.jpg

प्रतिसाद

वा ! सुंदर आणि नेट्क्या शब्दात परिचय करून दिला आहेस . या कवीची ओळख नव्हतीच . पण आता नक्की वाचल जाईल यांच साहित्य . धन्यवाद भारतीताई :)

अतिशय अभ्यासपूर्ण लेख ..भारतीताईंनी अगदी मार्मिक ,समर्पक शब्दात गिरीराज यांच्या कवितेचा अर्थपदर उलगडवत सोलीव गाभाच वाचकांकडे सोपवला आहे.
अरूण कोल्हटकरांची भिजकी वही आठवली.