कितीही प्रयत्न केला तरी माझ्या स्टेटस अपडेटला, माझ्या फोटोंना फेसबुकावर लाइक्स् मिळत नाहीत, याचा मला खूपच न्यूनगंड आला आहे. लाइक्स् वाढवण्यासाठी काय करू?
अरेरे ! तुम्हीसुद्धा या प्रश्नाच्या जाळ्यात अडकलातच का? अभिनेत्यांपासून नेत्यांपर्यंत आणि खायच्या सिरिअलपासून ते बघायच्या सिरिअल्स्पर्यंत सगळेच या व्याधीनं ग्रस्त आहेत. लाइक्स् वाढवण्यासाठी काय करू? डराव!तुम्हांला सांगते, इंद्राच्या दरबारातही सगळ्यांत जास्त लाइक्स् कोणत्या अप्सरेला मिळतात, यावर त्या अप्सरेचा, एआरपी म्हणजेच ‘अप्सरा रतिनैपुण्य पसंतीगुण’ अवलंबून असे. या एआरपीच्या नादातच तर… डराव… असो. सांगायचा मुद्दा हा की, तुमची वेदना मला परिचित आहे. खरंतर… तुम्हांला कदाचित हे वाचून आनंद होईल की, अखिल सजीवांची हीच आद्य वेदना आहे.… माय ब्रह्मी! लवकरच ही सगळ्या बेडकांचीही आद्य वेदना असणार आहे…… डराव!!
तर लाइक्स् वाढवण्यासाठी काय करायचं? सतराशे सहासष्ठ कहाण्या एकशे अठ्ठेचाळीस शब्दांत संपावायच्या या काळात हे काही उपाय. खरं सांगायचं तर माझ्या रसिक वाचकांनी हे उपाय सुचवले आहेत, ते करून बघा…
रिया म्हणतात, “पन्नासेक डुप्लिकेट आयडी काढा आणि स्वतःच लाइक्स् आणि कमेंट्स् करायला सुरुवात करा. पन्नासच्या वर लाइक्स् मिळालेला फोटो दिसला की लाज वाटून लोक लाइक्स् देतातच.”
तर अमित एक डिव्हाईन उपाय सांगतात तो असा - “नियमित पहाटे उठून 'लाइक'बॉय साबणाने अंघोळ करून लॅपटॉपवर फेसबुकाची खिडकी उघडून तीसमोर 'ओम र्हिम क्लिम फेसबुकाय लाइक्सवृद्धी नमः' हा मंत्र १०८ वेळा म्हणा.”
आता या तंत्रानं वा सांगितलेल्या मंत्रानं जर फरक पडला नाही, तर आमचे अजून एक वाचक असामी यांनी मारलेला डायलॉग “Facebook is for old people. Cool people do not use Facebook any more” हा समोरच्याला ऐकवायला विसरू नका! तसंही मराठी बोलताना साहेबाच्या भाषेत काहीतरी तात्त्विक ऐकवणं हे अस्सल मराठीपणाचं लक्षण आहे आणि म्हणूनच याला मात्र भरपूर लाईक्स् मिळतील…
तर वाचकहो, आठवलं म्हणून एक गोष्ट शेअर करते आहे. जर तुम्हांला स्वर्गातल्या गॉसिपमध्ये इंटरेस्ट असेल, तर माझं ‘एक स्वर्गीय डबके’ हे आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालं आहे. मायबोलीच्या खरेदीविभागात माझी स्वाक्षरी असलेल्या प्रती पाच टक्के सवलतीत मिळतील. ते जरूर विकत घ्या आणि हो, त्याला फेसबुकावर लाइक करायला विसरू नका! ड्राव!
अंघोळ करणे म्हणजे पाण्याचा अपव्यय करणे, असे मला वाटते. वाढत्या जागतिक लोकसंख्येमुळे भविष्यातील पाणीटंचाईवर उपाय काय? काही पर्याय सुचवाल का?
माय माय ब्रह्मी! हिमालयावर डोकं ठेवून विश्वाची चिंता करणारी तुमच्यासारखी माणसं बघितली की, माझ्या स्वार्थी फिफ्थ अव्हेन्यू, लुई व्हिताँ यांच्या आशेवर धावणार्या मनाला पुण्याचा लकवा बसतो. अंघोळ केल्यानं लोकसंख्या वाढते आणि लोकसंख्या वाढली तर अंघोळ करता येणार नाही आणि अंघोळ नाही केली तर लोकसंख्या न वाढून समस्त मानवजातच नामशेष होईल की काय, या भीतीनं तुम्ही आत्ताच उपाय शोधत आहात. मोकळा नळ टू यू! माय फ्रेंड, मोकळा नळ टू यू. इतक्या मोठ्या व्यामिश्र प्रश्नाचं उत्तर देणं माझ्या आवाक्याबाहेरचं आहे. जीएंच्या शब्दात बोलायचे तरी माझी मेंडकेची उडीही उत्तरापर्यंत पोहोचेपर्यंत म्हातारी होऊन जाईल. वेट अ मिनिट … मला राहून राहून असं का वाटतंय की, मला जे समजलं आहे, ते खरंतर मला अजिबात समजलेलं नाही आणि जे न समजलेलं आहे, तेच खरंतर तुम्ही विचारलं आहे… ड्राव !! ब्लेम इट ऑन हँगोव्हर.
पण अंघोळ हा पाण्याचा अपव्यय आहे? वाह! डराव! कसं बोल्लात! द्या ट्टाळी! अहो, मलाही अंघोळ करणं म्हणजे पाण्याचा अपव्यय वाटतो. पण माझं कसंय किनै, माझ्याकरता ही सोय आपोआपच झालीये. मी माझ्या दुसर्या रूपात असते ना, त्यावेळी पाण्यात चिक्कार डुबक्या मारते. पण तुमच्याकरता काही उपाय आहेत माझ्याकडे.
एक म्हणजे मायबोलीवर ववि असतो ना, त्यात नाव नोंदवत जा दरवर्षी! अगदी हसतखेळत अंघोळीची खात्री. अधेमधे कधी अंघोळीची अनावर हौस दाटून आलीच, तर मायबोलीवरच्या काव्यपाणपोईवर जा. चार-दोन शिंतोडे नक्कीच अंगावर पडतील. त्यातूनच तुम्हांलाही कधी कविता सुचली, तर मग काय गटांगळ्या खाता येतील. त्यातूनही अगदीच 'सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही' अशा लेव्हलची अंघोळीची तहान लागली, तर कोणा तयारीच्या आयडीशी वाद उकरून काढा. तो तुमचा जो काही 'पाण'उतारा करेल, त्यात तुमच्या अख्ख्या खानदानाची अंघोळ होईल. सल्ला मागितल्याबद्दल ड्रांवड्रांवड्रांवड्रांव. ड्रांवड्रांवड्रांव! ड्रांवड्रांव ड्रांवड्रांवड्रांवड्रांव ड्रांवड्रांव ड्रांवड्रांव ड्रांवड्रांवड्रांव! *
त.टि. * तेवढ्यात मेंडकेची बेडूक बनण्याची घटिका आली आणि ती त्या रूपात गेली. त्यामुळे सल्ल्याच्या शेवटच्या भागाचे भाषांतर देत आहोत - धन्यवाद. अरेच्चा! माझ्या अंघोळीची वेळ झाली वाटतं! [मामी]
(मेंडका) सॉरी हं, उत्तरे देताना अचानक मेटामॉर्फ झाले, म्हणून मला पूर्ण कल्पना नाही की, दिलेली उत्तरं तुमच्या प्रश्नाचीच आहेत का ते! पण जर तसं नसेल, तर दोन दिवसांत मला या उत्तरांसकट काँटॅक्ट करा. मी त्या उत्तरांना साजेसे प्रश्नही पाठवीन… माझी रिटर्न पॉलिसी खूपच लिनियंट आहे!
मला चार मुलांनी मागणी घातली आहे. आता मी 'सुंदर करून सोडणार' क्रीमचा वापर थांबवला तर चालेल का?
सर्वांत पहिल्यांदा तुमचं अभिनंदन…म्हणजे ही मागणी पार्टनर / जोडीदारासंदर्भात आहे, असं गृहीत धरून बरं का! आपण कुणालातरी हवे आहोत… काय सुखावणारी भावना असते नाही? ड्राव!. मी तुम्हांला सांगते, मी होपलेस रोमँटिक आहे. आता रोमान्स्बद्दल मराठीत काही लिहायचं म्हणजे त्या नाजूक भावनेला तेलाच्या घाण्याला जुंपण्यासारखे आहे. प्रेयसी, प्रियकर, प्रणयरम्य, कामोत्सुक, कटाक्ष, रास, जुलमी डोळे…या असल्या काटेदार शब्दांत इतकी नाजूक भावना कशी मांडायची? पण म्हणतात ना, भाषेत काय आहे? साध ‘डराव’ही कधी काळजाच्या आरपार जाईल सांगता येत नाही…
तर काय प्रश्न होता? हां, ‘सुंदर करून सोडणार’ क्रीम…तुम्हांला यावरची माझी उत्तरं इतरत्र वाचायला मिळतीलच, पण इथे देत आहे माझ्या वाचकांकडून आलेले निवडक सल्ले. बघा उपयोग होतोय का ते…
अर्निका या बहुतेक ट्रक ड्रायव्हर असाव्यात. त्या म्हणतात - ‘अतिघाई संकटात नेई. माल डिलिव्हर (सासरी घरपोच) झाल्याशिवाय क्रीमचा वापर लगेच थांबवू नये.’
शंभु शिकारीच्या चाहत्या असलेल्या ड्रिमगर्ल लिहितात - ‘क्रीम सोडायच्या आधी त्यांनीच सोडलं तर??? हातातोंडाशी आलेलं भक्ष्य असं सहज सटकू द्यायचं नसतं!! लक्ष लक्ष्यावर हवं कायम!!’
तर विश्वाची चिंता करणारे बागुलबुवा लिहितात - असं कसं, असं कसं ? उतायचं नाही, मातायचं नाही, घेतला वसा टाकायचा नाही. तू 'सुंदर करूनच सोडणार' क्रीमचा वापर थांबवू नकोसच, पण त्या चार मुलांनाही ते क्रीम वापरायला लाव. शिवाय त्या चारही जणांना मागणी घालणार्या प्रत्येक मुलीलाही हे क्रीम सजेस्ट करायची अट ठेव तुझ्या स्वयंवरात. शेवटी या जगात येऊन आपण काय मिळवलं, याचं उत्तर देताना 'हे जग मी सुंदर करून सोडलं' असं सांगता आलं पाहिजे हो तुला!
वेट अ मिनिट, वेट अ मिनिट ….हा तुमचा आयडी आहे? ड्राव!! एकही मुलगी ढुंकून बघत नाही, म्हणून सल्ला मागायला आलात, तेव्हा हे क्रीम रोज एकदा लावा म्हटलं होतं; तर तुम्ही ते इतकं लावलं की, मुली सोडा, चार मुलांनी तुम्हांला मागणी घालण्याची वेळ आली. तेव्हा क्रीम लावणं काही दिवस ताबडतोब बंद करा. अर्थात तुम्हांला हेच हवं असेल तर गोष्ट वेगळी! [फारेंड]
असो. माझी नवी कॉस्मेटिका लाइन मी लाँच केली आहे ती तुमच्यासारख्या लोकांसाठीच. जरूर वापरून पाहा. वात्स्यायनानं दिलेल्या काही महत्त्वाच्या सल्ल्यांवर आधारित ते क्रीम आहे. मराठी संकेतस्थळावरून हे क्रीम विकण्यासाठी प्राथमिक बोलणी चालू आहेत…पण मदनबाणाऐवजी मराठीबाणा जपणार्यांशी बोलणं किती अवघड असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता…पण पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन.
तटी. - प्रशासनानं नजरेस आणून दिल्याप्रमाणे ‘एकही मुलगी’वाला प्रश्न विचारणारा आयडी व तुमचा आयडी यांत एका टिंबाचा फरक आहे. तसंच हे दोघं एकमेकांचे ड्युप्लिकेट आयडी नाहीत…त्यामुळे मी तुम्हांला दिलेल्या उत्तराबद्दल जाहीर क्षमा मागते.
आमच्या यांना हे (म्हणजे पांचट जोक) सांगायची भलतीच ही (म्हणजे सवय) लागली आहे. त्यांची ही (म्हणजे सवय, हो) कशी सोडवू?
ड्रावय्या! तुम्ही एकदम स्वर्गातील सध्याच्या बहुचर्चित व संवेदनशील ह्याच्या ह्यालाच हात घातलात की! विषयाच्या गाभ्याला हो. परवाच एका स्टिंग ऑपरेशनमध्ये चित्रगुप्तानं कबूल केलं की, मानवजातीच्या सुरुवातीपासून, मेलेल्यांत सरासरी चाळीस टक्के पुरुष हे, ते ऐकवणार्या विनोदाला कंटाळून, त्यांच्या बायकांनी मारले होते व जवळजवळ चाळीस टक्के बायकांनी नवर्याच्या बाष्कळ विनोदांना कंटाळून आत्महत्या केली होती. पुढे तो हेसुद्धा म्हणाला की, इंद्राला पांचट जोक्स सांगायची सवय आहे. जर इंद्री व इंद्र दोघे मर्त्य असते, तर कोणी जीव घेतला असता व कोणी दिला असता हे बघायला त्याला मजा आली असती. सध्या त्यांच्या व्हर्चुअल मरण्यावर जोरदार बेटिंग चालू आहे.
असो! तर हे काही उपाय माझ्या वंडरफुल वाचकांकडून आलेले.
मंदार हा उपाय सुचवतात - ‘जितके हे (म्हणजे पांचट जोक) सांगाल, मोजून तितके हे (म्हणजे दिवस) हिला (म्हणजे माझ्या आईला) आपल्या घरी राहायला बोलावीन, अशी धमकी देउन पहा!’
तर गोष्टीगावाचे हा सल्ला देतात - ‘त्यांची ही (सवय) सोडवण्यासाठी त्यांना हा (म्हणजे दारूचा खंबा) आणून देत चला. एकदा ही (दारू) चढली की माणूस फक्त खरं बोलतो म्हणे!’
तर बाकी अनेक वाचकांचं असं मत आहे की, तुम्ही तुमच्या ह्यांना दररोज हे, म्हणजे पांचट जोक, ऐकवायला सुरुवात करा.
सुपरमॅन होण्यासाठी मी कुठल्या दुकानात खरेदी करू?
कुठल्या दु:खानं सुचतो हा प्रश्न अपुरेमॅनपण वाटे तुजला? आधी म्हणणार होते की, आजच्या जीवनशैलीत प्रत्येकालाच सगळंच सुपर असावंसं वाटतं. पार्टनर सुपर, जॉब सुपर, गाडी सुपर, साइझ सुपर, रंग सुपर, देह सुपर सगळं सुपर. या सुपर असण्याच्या चढाओढीत नैसर्गिक मॅनपण अपुरं वाटू लागणं मी समजू शकते…ड्राव! पण मग विचार केला की, स्वर्गात काय वेगळं आहे आणि होतं? तिथेही सुपरदेव, सुपरदेवी आहेतच की! मला पण नव्हतं का सुपरमेनका बनायचं? पण बघा मेख अशी आहे की, हे 'सुपर'पण दुकानात विकत मिळू शकतं, हा कहानी में ट्विस्ट आहे. आता दुकानात सगळंच मिळतं. सारं जग बाजार आणि सगळ्यांचा बाजार. मग सुपर होणं हे कुठल्यातरी दुकानात विकत मिळणार, ही तुमची खात्री व प्रश्न किती योग्य आहे… ब्रह्मी माय ब्रह्मी! मीही कुठल्या गल्लीत वाट चुकले…
ड्रांह! तुम्हांला सुपरमॅन होण्यासाठी आध्यात्मिक सल्ले नको आहेत, प्रापंचिक सल्ले हवे आहेत. सॉरी हां, आज माझा चक्रम-योगा दिवस आहे. त्यामुळे भवसागरात गटांगळ्या खाणार्या माझ्या काही चाहत्यांना या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी सांगितले होते. त्यांतली ही निवडक (यांतील विचारांशी व भाषेशी मी सहमत आहे असं अजिबात नाही.)
आमचे गामा पैलवान सुचवतात ‘वेगवेगळ्या वयांच्या, आकारांच्या आणि वजनांच्या जमतील तितक्या बायका घेऊन बायकांचे जिन्नस विकणाऱ्या दुकानात जा. आणि एकही वस्तू खरेदी न करता सर्वांना बाहेर आणा. तुम्ही आपोआप सुपरम्यान ठराल.’ भुवया उंचावू नका आणि हा सल्ला अमलात आणताना हे लॉजिक एका पैलवानाचे आहे हे अजिबातच विसरू नका.
अजून एक वाचक स्पार्टाकस म्हणतात - ‘रजनीकांतच्या लाँड्रीत! त्याचा परिसस्पर्श लाभलेला कपडा चढवल्यावर एकाच वेळी सुपरमॅन, स्पायडरमॅन आणि ही-मॅन होऊ शकता.’
हर वाक्य के दो तरह के अर्थ होते है ! यावर विश्वास असणारे वाचक अवतार म्हणतात, ’चावट आहात!....औषधाच्या!!‘ तर दिनेश इनसन्टली विचारतात, ‘बाई, मॅन का व्हावेसे वाटतेय आता?’
तर वत्सा, मथितार्थ असा की, प्रत्येकाच्या ‘सुपर’च्या व ‘मॅन’च्या व्याख्या वेगळ्या असू शकतात. त्यामुळे वापराल तो कोणताही सल्ला हा त्या बाह्यवस्त्रावरून घालायच्या अंतर्वस्त्रासारखाच असावा…वापरल्यानं वा न वापरल्यानं तो वापरणार्या खर्या मॅनमध्ये काहीच फरक पडत नाही…शुभं भवतु!
मुंबईकर, पुणेकर वा इतर गावांतले बेडूक कसे ओळखायचे? तुला कुठल्या गावाचे बेडूक जास्त राजबिंडे वाटतात?
पुलंना जाऊन आता झाली चौदाएक वर्षं…असे 'स्मार्ट अलेक'छाप प्रश्न विचारायचेच असतील तर जरा काहीतरी ओरिजिनल विचारायचं. एखादा माणूस साधासा झब्बा लेंगा सुटाच्या ऐटीत वागवू शकतो. पण नाइलाजानं असं म्हणावंसं वाटतंय की, तुम्ही घातलेला सूटही लंगोटीच्या आविर्भावात मिरवताय! असो… मी असले प्रश्न एंटरटेन करत नाही, पण पुन्हा माझ्या वाचकांनी पाठवलेली त्यांची उत्तरंतरी छापावीत, असा जोरकस हट्ट धरल्यानं काही निवडक 'स्मार्ट अलेक'छाप उत्तरं देत आहे.
असामी म्हणतात, ‘जे ओंडक्यावर बसून सारखे डरांवडरांव करत असतात ते पुणेकर. जे ओंडका पकडायला धावत असतात ते मुंबईकर. बाकी उरलेले सगळे इतर गावांतले. तुला कुठल्या गावातले बेडूक जास्त राजबिंडे वाटतात? माझा क्रश ओंडक्यावर आहे.’ ओंडक्याने क्रश झालेले बेडूक पाहिले होते … पण माझा क्रश ओंडक्यावर? खी खी खी…ओंडक्याचे आडनाव खान, रोशन किंवा देओल असेल काय… असो !
मंदार म्हणतात - ’दुपारच्या वेळी बेडकासमोर साप सोडावा. त्याला बघून बेडूक पलीकडच्या प्लॅटफॉर्मला फास्ट लोकल लागल्याप्रमाणे पळाल्यास मुंबईकर. "अबे, एकदा आमचा वडाभात खाउन तर पहा, परत बेडकाला तोंड लावणार नाहीस", असं सापाला म्हणाल्यास नागपूरकर, अन् "दुपारी चारनंतर या ओ!!!" असं सापावरच वस्सकन ओरडल्यास पुणेकर! राजबिंडे मला देशस्थ बेडूक वाटतात. कोकणस्थ बेडूक असतात घारे-गोरे, पण कोकणात सापही खूप असल्यामुळे सतत धास्तावलेले दिसतात.’ (पुन्हा एकदा नमूद करते, वाचकांच्या प्रतिक्रियेशी वा त्यातील भाषेशी मी सहमत असेनच, असे नाही.)
याच लाइनीतील अजून एक उत्तर पाठवलंय दयाघना ह्यांनी; ‘१९८२ सालापासून जे बेडूक डराव लेले वाटतात ते मुंबईकर बेडूक आणि त्यांच्या या सवयीला सराव लेले बेडूक पुणेकर. मला या दोन्ही गावांपेक्षा सोलापूरचे सो काव लेले बेडूक जास्त राजबिंडे वाटतात’ (हटकेश्वर हटकेश्वर! सोलापूर राजबिंडे सिरिअसली? असोच!)
तटी. - आपला व्यासंग किती दांडगा आहे, आपलं वैचारिक पॅकेज काय आहे, तुम्ही नेमाडे नेमाने वाचता का वपु, का जीएंच्या साहित्याशिवाय तुमचं ते हे हलत नाही…हे म्हणजे पान...तर ते मिरवायचं हे ठिकाण नाही.
बायकोच्या 'मी या ड्रेसमध्ये कशी दिसते' या प्रश्नाचे तिचा विश्वास बसेल असे उत्तर कोणते?
पहिल्यांदा हे लक्षात घ्या की, यामागे सेल्फ-इमेजचा मोठ्ठा खड्डा आहे. केसापासून ते नखापर्यंत आणि चार पौंडापासून ते चार ग्रॅम वजनापर्यंत अनेक ट्रॅप या प्रश्नाला आहेत. अनवधानाने कुठल्यातरी दुखर्या नसेवर पाय द्याल आणि पहिल्या डेटपासून ते कालच्या नको असलेल्या मित्राच्या ग्रेट-भेटपर्यंत 'हर एक चीज का चुन चुन के' हिसाब मांडण्यात येईल. 'पण मला तसं म्हणायचं नव्हतं' या तुमच्या वाक्याचे किती अर्थ निघू शकतात, हे पाहिल्यावर तुम्हांला कृष्णाने अर्जुनाला दाखवलेल्या विश्वरूपाची अनुभूती होईल, याची खात्रीच बाळगा. या विषयावर अजून काही बोलण्याआधी माझे जे वाचक या दिव्यातून गेले आहेत, त्यांच्या अनुभवाचे हे काही बोल.
महागुरु म्हणतात, "शेजारणीपेक्षा या ड्रेसमध्ये तूच सुंदर दिसतेस, असे सांगा. तिचा विश्वास नक्की बसेल, कारण शेजारणीकडे तुम्ही बघत असता, याबद्दल तिला खात्री आहे."
हे जरी सोपं उत्तर वाटलं, तरी यानंतर होणार्या तिसर्या महायुद्धाला तयार रहा. यानंतर बायको तुमच्या 'बघण्या'वरून तुमचं जे न बघवणारं माकड करेल, त्याने तुम्हांला तुमचे स्वत:चेच डोळे काढून सागरगोटे खेळावेसे वाटले, तर मला नवल वाटणार नाही! डराव !
माझे अजून एक वाचक बागुलबुवा म्हणतात, "बायको आणि विश्वास या एकाच नाण्याच्या दोन भिन्न बाजू असतात. अनुभवी नवरे या व अशा इतर अनेक प्रश्नांना सोयिस्कर बगल देतात. जीव वाचवण्याचा तेवढा एकच मार्ग असतो त्यांना. असा काही प्रश्न विचारला की, माहेरची माणसं व त्यांचे गुण, साड्यांचे सेल, दागिन्यांची नवीन डिझाईन्स्, शेजारणीविषयी गॉसिप असल्या कुठल्याही गल्लीबोळातून यशस्वी पळ काढावा."
बागुलबुवांनी हातोडा अगदी खिळ्याच्या डोक्यात मारला आहे. तुम्हांला तुमची स्वत:ची पळवाट शोधायची आहे. ते जमत नसेल तर जरा कळ काढा… लवकरच मी सडेतोड डॉट कॉम लाँच करत आहे. ज्यावर तुम्ही तुमच्या फोटोपासून ते तुम्हाला पडलेल्या प्रश्नापर्यंत काहीही टाकू शकाल व त्यावर तुम्हांला इतर मेंबर सडेतोड, पण पटलीच पाहिजेत, अशी उत्तरं देतील. तुमच्या बायकोला माझ्या साइटची लाइफमेंबर करा आणि या प्रश्नापासून कायमची मुक्ती मिळवा. (याचे बेटा व्हर्जन म्हणून मायबोलीवर काही विशिष्ट धागे आम्ही चालू केले आहेत.)
मी जेमतेम साठी गाठलेला एक तरुण आहे. गल्लीतल्या टारगट मुलांनी मला आजोबा न म्हणता 'काका' किंवा 'दादा' म्हणावे, यासाठी मी काय करू?
ब्राह्मी, माय ब्राह्मी! ही मनुष्यजात अशी वय-बाधित दृष्टिकोन घेऊन कशी जगते, हे अजूनही मला कळत नाही. अमर्त्य असल्यानं असेल कदाचित. सबघोडेबाराटका असं का बरं नाही या प्रजातीत? वयाने मोठा म्हणून मान द्या, उठून बसा, पाया पडा, उलटं बोलू नका..! नुसतं वयच वाढले आहे ना? मग? ड्राह! पण मग मेंडकाबाई, थोड्याफार फरकानं आयुष्यंही सारखीच ना यांची!! म्हणून 'यशस्वी-अयशस्वी'च्या यांच्या व्याख्यांचे संदर्भ एकाचे दुसर्याला लावता येतात. त्यातूनही नुसतं जगणं हेच अवघड असताना, रोगापासून अपघातापर्यंत कशानेही मारलं जाणं इतकं सोपं असताना मोठं वय गाठणं हेच एक मोठं यशाचं कारण होऊ शकतं की…
ड्राहया ! प्रश्नाने वेगळ्याच तंद्रीत नेलं मला… काका किंवा दादा म्हटल्याने वयात काही फरक पडणार आहे का? पांढरे होणारे केस (राहिले असतील तर), हळूहळू थकणारं शरीर हे बदलणार आहे का? आयुष्याचा घेतलेला अनुभव शिंग मोडून वासरात शिरल्याने जाणार आहे का? मग? आजोबा हा वयाने खूप मोठा दादाच असतो, नाही का? किंवा असंही म्हणता येईल की, दादा हा वयाने जरा लहान आजोबा असतो… जाऊदे! शब्दखेळ पुरे झाला… नेहमीसारखी माझ्या वाचकांच्या भूतलीय उत्तरांतून निवडक उत्तरं ऐकवते…
एकदम साधासा उपाय स्नेहश्री सुचवतात, "नाव बदला. स्वत:चं नाव दादा किंवा काका ठेवा."
हे मस्त आहे, नाही का? म्हणजे जरी टारगट कार्ट्यांनी दादा-आजोबा आणि काका-आजोबा म्हणायला सुरुवात केली, तरी त्यांनी तुम्हांला दादा किंवा काका म्हणावं, ही तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल!
या सल्ल्यानंतर हा महागुरुंचा सल्ला वापरून बघा - "काका/दादाबद्दल माहिती नाही, पण त्यांच्या मातोश्रींकडून राखी बांधून घ्या, म्हणजे तुमचा मामा होईल."
म्हणजे दादा-काकाबरोबर बोनसमध्ये टारगट गँग तुमचा मामाही बनवतील.
आणि याने समाधान नाही झालं व अगदी सर्वांनीच दादा म्हणावं, असं वाटत असेल, तर मोकळं धरण मिळतंय का बघा…
मला माझ्या गर्लफ्रेंडबरोबर ब्रेकअप करायचं आहे, पण मला खूपच भीती वाटते आहे. मी माझ्या आईला सोबत घेऊन जाऊ का?
ड्राइग्गं! मला किती भरून आले आहे म्हणून काय सांगू? मला या मेंडकेच्या रूपात रडताही येत नाही. रडले आहे की नुसतंच पाणी आहे, हे कधीकधी मलाच समजत नाही. एका स्त्रीपासून रक्षण करण्यासाठी दुसर्या स्त्रीला बरोबर नेणारा पुरुष पाहिला की, मला स्वर्गात आलेल्या व व्यक्तिस्वातंत्र्याचा आग्रह धरणार्या ललनांची किटी-पार्टी आठवते… स्वर्गातील समस्त देवी-अप्सरा या पार्टीला हजेरी लावायच्या... पुरुषांनी बायकांसाठी म्हणून बनवलेल्या पृथ्वीवरच्या मालिकांच्या चोरून आणलेल्या सीडी बघताना संतापानं काळ्यानिळ्या झाल्यावर उतारा म्हणून त्या अमाप चढाओढीने रंगीतपेयप्राशन करायच्या… किती मिस करते मी त्या पार्ट्यांना.. काय सांगू?!
तर ब्रेकअप करायचं आहे. कारण नाही विचारत.. कारण भोगतात बिचारे खूप काही! म्हणजे होतोच बायकांचा छळ वगैरे, पण नात्यात मुकाट्याने अन्याय सहन करणारे पुरुषही काही कमी नाहीत. तुमच्या या पुरुषप्रधान समाजात उघडपणे बोलूही शकत नाहीत. पुरुषत्वाची खिल्ली उडेल या भीतीने मग सहन करत राहतात… असो.
माझे एक वाचक फारेंड यांचे हे विचार उपयोगी ठरतील. त्यांच्या मते फार डेंजर उपाय आहे हा, कारण -
१. आईला गर्लफ्रेंड आवडली नाही, तर 'कसल्या मुलींबरोबर फिरत असतोस, कोणास ठाऊक!' हे ऐकावे लागेल. वर पुन्हा लांबच्या नात्यातील किंवा ओळखीच्या तुम्हांला न आवडणार्या एखाद्या मुलीशी लग्न करण्याबद्दल सल्ला मिळेल.
२. गर्लफ्रेंडला आई किंवा/व आईला गर्लफ्रेंड आवडली तर ब्रेकअप आणखी अवघड होऊन बसेल. हा प्रश्न विचारण्यावरूनच तुम्ही चक्रम आहात याबाबत दोघींचे एकमत होणे सहज शक्य आहे, हे लक्षात येते. याला सुधारायला आपणच योग्य आहोत, असे दोघी समजल्या तर प्रश्न आणखी बिकट होईल.
त्याच्याही पुढे एक पाऊल टाकत महागुरु सुचवतात - "आईला नेमके कुठे कुठे घेऊन जाता? त्यापेक्षा अँब्यूलन्सला घेऊन जा ... मार खाल्ल्यानंतर लवकर उपचार तरी मिळतील."
एकंदरीत काय तर भवानी समोर नेता काली, प्रियकरा तुझी घटका भरत आली! ऑल द बेस्ट!
माझा नवरा घरात चौकड्यांची लुंगी आणि जाळीची रंगीत बनियन घालून बसतो. त्याने गुलझारसारखा पांढराशुभ्र झब्बा घालावा यासाठी काय करू?
पहिल्यांदा मला हे सांगा, तुम्ही रोज घरात काय घालून बसता? वेट, लेट मी गेस … तो टीपिकल गाऊन, करेक्ट? अहो, मग आपली पायरी बघून तरी अपेक्षा ठेवायच्या ना? आता असे इमॅजिन करा की, त्याने गुलझार छाप झब्बा घातला आहे. आता मुळातले त्याचे गबाळे ध्यान बदलणार आहे का?
पण माझी अशी खात्री आहे की, तुमच्या नवर्याने कधीही संपूर्ण शरीर दिसेल असा आरसाच पाहिलेला नसावा! तसं असेल तर या वागण्यामागे एक शास्त्रीय कारण असू शकते. ते जाणण्यासाठी तुमच्या नवर्याला मिरर टेस्ट देऊन बघा. ही टेस्ट १९७०मध्ये गोर्डोन गोलूप ज्यु.ने प्राण्यांच्या स्वत्वाच्या जाणिवा जागृत आहेत का नाहीत, हे पाहण्यासाठी केली. तो स्वत:ला लुंगीबाज भोकेरी बनियानवाला समजत असेल, तर आरशात तो त्याच रूपात स्वत:ला ओळखेल. झब्बावाल्या माणसावर तो हल्ला करेल…
तर तुमच्या वाट्याला असे स्वत:ला न जाणणारे वानर आले असेल, तर त्याला झब्बा फक्त जबरदस्तीने दोरी बांधूनच घालता येईल आणि तो घातल्यावर त्याच्यापेक्षा तुम्ही त्याच्या शेजारी जास्त कारुण्यप्रद दिसाल, असं मला राहून राहून वाटतं आहे. असो … ही माझ्या चाहत्यांची तुमच्या प्रश्नाला काही इरसाल उत्तरं -
अर्निका सुचवतात - त्याला सांगा की उद्यापासून तुम्ही गुलझारसारखा पांढराशुभ्र झब्बा घाला नाहीतर तुम्ही जे कपडे घालाल तेच मीपण घालणार.
तर दयानंद हा अनुभव शेअर करतात - मी किनै, दैनिक संध्यानंद आणि पुण्यनगरी वाचायचे. मग उभे शब्द लुंगीवर (नवरा लुंगीच्या आत असताना) आणि आडवे बनियनच्या जाळीतून पेन आत घालून लिहायचे. नवरा खूप चिडायचा, पण मी भोळसट चेहरा करून "काय करू, चौकड्याची लुंगी आणि जाळीचं बनियन पाहीलं की मला राहवतच नाही" असं सांगायचे. एकदा तो वैतागून म्हणाला, "अगं माझे आई, तू कशावर लिहीत नाहीस ते सांग". मी म्हणाले, "पांढराशुभ्र झब्बा गुलझारसारखा असला की माझा मूडच जातो बै ! ". त्याच दिवशी त्याने चोवीस झब्बे आणले.
आणि अवतार म्हणतात, "नवरा बदला. ते जास्त सोपे असेल!"
भांडी घासूनघासून माझे हात दगड झाले आहेत. बायकोने अनेक साबण बदलून दिले, पण फरक पडला नाही. आता काय करू?
हे असे काफ़काएस्क प्रश्न आले की, मला कसंसंच होतं. घरची जबाबदारी उचलता उचलता एके दिवशी अचानक दगड होऊ लागलेल्या माणसाची गोष्ट मला आठवत राहते. हे दगडपण आधी नाकारत, मग सहन करत, मग स्वीकारत शेवटी स्वत:च्या घरच्या बागेत पुतळा म्हणून उभं राहणं आणि शेवटी घरच्याच कुत्र्याने येऊन… मी ती कथा कधी पूर्ण वाचूही शकले नाही. असे प्रश्न आले की, ते बिटल्सचं ‘ऑल दीज लोनली पिपल, व्हेअर डू दे ऑल कम फ़्रॉम” हे गाणं डोक्यात वाजत राहतं.
तर तुमचे हात दगड झाले आहेत आणि बायकोने भांडी घासायला गडी न ठेवता, मशिन न आणता नवीन साबण आणून दिला आहे. एलिमेंटरी, माय डिअर! माझे बरेच वाचक म्हणतात आधी बायको बदलून बघा… तरी पण इतकी ड्रास्टिक स्टेप घेण्याआधी माझ्या इतर वाचकांचे काही वेगळे सल्ले ध्यानात घेऊ या!
स्नेहश्री सोशिक बहु सल्ला देतात - काही करू नका. मी तुम्हांला उपाय सांगणार. तो तुम्ही करणार. तुमचे हात मऊ होणार. नंतर परत रोज भांडी घासणार. परत हात दगडासारखे कडक होणार. परत येथे येऊन उपाय विचारणार. त्यापेक्षा आहे ते बरे आहेत की! पैसेही वाचतील तुमचे.
तर विजय आंग्रे 'एका दगडात दोन पक्षी' या मौलिक विचारातून सल्ला देताहेत - हात दगड झालेच आहेत ना? मग टेन्शन कशाला? मसाला मिक्सरमध्ये वाटण्याऐवजी हाताने कुटायला चालू कर. तेवढाच कामात चेंज!
आणि कुठलाही ग्लास फुल्ल भरलेलाच दिसणार्या कविन म्हणतात - चला सेलिब्रेट करा की! आता तुमचे हात तुमच्या मेंदूला मॅचिंग झालेत.
मला विचारलंत तर ‘घेता घेता घेणार्याने देणार्याचे हातच घ्यावे’ ही ओळ ध्यानात असू द्या.
'पिपात मेले ओल्या उंदीर' या ठिकाणी उंदराऐवजी बेडूक असते तर नक्की काय घडले असते?
आज मला माझ्या एका वाचकाच्या छोटुकलीने तिने माझी काढलेली ही दोन ड्रॉइंग्ज् पाठवली. किती क्यूट ना! आणि बरोबर एक पत्र लिहिलं आहे, तेच वाचून दाखवते, “मेंडकामावशी, तू कशी आहेस? मला तू खूप आवडतेस. आईलाही तू खूप आवडतेस… बाबांचं माहीत नाही. आई म्हणते, ते आधी तुझ्यासारखेच बेडुक होते. म्हणून मग मी त्यांना बाबाबेडुक म्हणते. मावशी तुला माझी ड्रॉइंग्ज् आवडली का? असतील तर तुझ्या घरी फ्रिजवर लावशील का?”
प्रिय छोटुकले, मला तुझी ड्रॉइंग्ज् खूपच आवडली आणि माझ्या घरी मी त्यांना माझ्या टेबलावर समोर लावून ठेवले आहे. तुला लवकरच माझ्याकडून छोटीशी गिफ्ट मिळणार आहे.
हा प्रश्न विचारणार्या स्मार्ट अलेक वाचकांनो... तुम्ही सुधारणार नाहीच ना? असो. मी काहीही न बोलता या प्रश्नावर इतर वाचकांनी सुचवलेली उत्तरं इथे देत आहे -
अश्विनी के म्हणतात - "पिपात फुदकती ओल्या बेडूक" अशी रचना होऊन पुढे-----"गर्वाला मग मत्सरी डोळे, काचेचे अन्; फ़सवे पोळे, ओठावरती जमले, कूपमंडुकी, कूपमंडुकी! काठावरती काठ लागले; पिपात बेडूक न्हाले!न्हाले" -------असे झाले असते.
सीमा२७६ यांचं असंच म्हणणं आहे की, काही नाही, बेडुक मेले नसते. त्यापुढे जाऊन अरुंधती म्हणतात - ओल्या पिपात बेडूक कशाला मरतील? बेडकांसाठी तर तो रोमँटिक गेट-अवे असेल! व्हॉट अ क्यूट थॉट!
तर महागुरु हे आमचे नेहमीचे वाचक डार्क ह्युमराने म्हणतात - बेडुकउड्या झाल्या असत्या. बेडकाने पाण्यात आणि ते पाहून पिंपमालकाच्या कुटुंबीयांनी पिंपाबाहेर.