जीवन त्यांना कळले हो

जीवन त्यांना कळले हो
मीपण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो
जळापरी मन निर्मळ ज्याचे गेले तेथे मिळले हो
चराचराचे होऊन जीवन स्नेहासम पाजळले हो॥
सिंधूसम हृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो
आपत्काली अन्‌ दीनावर घन होऊनी जे वळले हो॥
दुरित जयाच्या दर्शनमात्रे मोहित होऊनी जळले हो
पुण्य जयाच्या उजवाडाने फुलले अन्‌ परिमळले हो॥
आत्मदळाने नक्षत्राचे वैभव ज्यानी तुळिले हो
सायासाविण ब्रह्म सनातन घरीच ज्या आढळले हो॥
उरीच ज्या आढळले हो जीव त्यांना कळले हो

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

जाईन विचारित रानफुला

जाईन विचारित रानफुला,
भेटेल तिथे गं सजण मला ॥ ध्रु ॥

भग्न शिवालय परिसर निर्जन
पळसतरूंचे दाट पुढे बन
तरूवेली करतिल गर्द झुला ॥ १ ॥

उंच पुकारिल मोर काननी
निळ्या ढगातुन भरेल पाणी
लहरेल विजेची सोनसळा ॥ २ ॥

वाहत येइल पूर अनावर
बुडतिल वाटा आणि जुने घर
जाइल बुडुन हा प्राण खुळा ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

जिवलगा, राहिले दूर घर माझे

जिवलगा, राहिले रे दूर घर माझे
पाउल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे ॥ ध्रु ॥

किर्र बोलते घनवनराई, सांज सभोती दाटून येई
सुखसुमनांची सरली माया, पाचोळा वाजे ॥ १ ॥

गांव मागचा मागे पडला. पायतळी पथ तिमिरी बुडला
ही घटकेची सूटे सराई, मिटले दरवाजे ॥ २ ॥

निराधार मी, मी वनवासी, घेशिल केंव्हा मज हृदयासी
तूंच एकला नाथ, अनाथा, महिमा तव गाजे ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

जेंव्हा तिची नि माझी

जेंव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली
झाली फूले कळ्यांची, झाडे भरात आली ॥ ध्रु ॥

दूरांतल्या दिव्यांचे मणिहार मांडलेले
पाण्यात चांदण्याचे आभाळ सांडलेले
कैफ़ात काजव्यांची, अन पालखी निघाली ॥ १ ॥

केसांतल्या जुईचा तिमिरास गंध होता
श्वासातल्या लयीचा आवेग अंध होता
वेड्या समर्पणाची वेडी मिठी मिळाली ॥ २ ॥

नव्हतेच शब्द तेव्हां, मौनात अर्थ सारे
स्पर्शात चंद्र होता, स्पर्शात लाख तारे
ओथंबला फुलानी, अवकाश भोवताली ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

जय जय महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रावी ते कावेरी, भारत भाग्याच्या रेषा
निळे निळे आकाश झाकते या पावन देशा ॥ ध्रु ॥

तुंग हिमालय, विंध्य अरवली, सह्याद्री निलगिरी
उत्तर दक्षिण वारे पाउस, वर्षविती भूवरी
रेवा वरदा, कृष्णा कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी, मातीच्या घागरी
भीष्मथडीच्या तट्टाना या यमुनेचे पाणी पाजा ॥ १ ॥

भीति न आम्हा, तूझी मुळीही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला, जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ॥ २ ॥

गलमुच्छे पिळदार मिशीवर, उभे राहते लिंबू
चघळित पाने पिकली करितो, दो ओठांचा चंबू
मर्द मराठा गडी ओढतो, थंडीची गुडगुडी
ठसक्याची लावणी तशी ही, ठसकदार गुलछडी
रंगरंगेला रगेल मोठा करितो रणमौजा ॥ ३ ॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
निढळाच्या घामाने भिजला, दारिद्र्याच्या उन्हांत भिजला
देशगौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ॥ ४ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

जगत मी आलो असा की

जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही
एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही

जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे
सोंग पण फसव्या जिण्याचे मी कधी शिकलोच नाही

वाटले मज गुणगुणावे ओठ पण झाले तिर्‍हाइत
सुचत गेली रोज गीते मी मला सुचलोच नाही

कैकदा कैफात माझ्या मी वीजांचे घोट प्यालो
हाय! पण तरीही प्रकाशा मी कधी पटलोच नाही

संपल्यावर खेळ माझा आंधळ्या कोशिंबिरीचा
लोक मज दिसले अचानक मी मला दिसलोच नाही

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

जोहार मायबाप जोहार

जोहार मायबाप जोहार
तुमच्या महाराचा मी महार

बहु भुकेला झालो
तुमच्या उष्ट्यासाठी आलो

बहु केली आस
तुमच्या दासाचा मी दास

चोखा म्हणे पाटी
आणिली तुमच्या उष्ट्यासाठी

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

जगी ज्यास कोणी नाही

जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे
निराधार आभाळाचा तोच भार साहे ||

बाळ सोडुनी ते दिधले कुंतीने जळात
घरी राधिकेच्या परि ते वाढले सुखात
कर्णराज म्हणूनी त्याचे नाव अमर आहे ||

भक्त बाळ प्रल्हादाला छळिले पित्याने
नारसिंहे रुपे त्याले रक्षिले प्रभुने
अलौकिक त्याची मुर्ती अजून विश्व पाहे ||

साधुसंत कबीराला त्या छळिती लोक सारे
पांडुरंग रक्षी त्याला प्राशुनी निखारे
आसवेच त्यांची झाली दुग्ध रूप दोहे ||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

जिथे सागरा धरणी मिळते

जिथे सागरा धरणी मिळते
तिथे तुझी मी वाट पहाते ||

डोंगर दरीचे सोडून घर ते
पल्लव पाचूचे तोडून नाते
हर्षाचा जल्लोष करुनि जेथे
प्रीत नदीशी एकरूप ते ||

वेचित वाळूत शंख शिंपले
रम्य बाल्य ते जिथे खेळले
खेळाचा उल्हास रंगात येऊनी
धुंदित यौवन जिथे डोलते ||

बघुनि नभीची चंद्रकोर ती
सागर हृदयी उर्मी उठते
सुखदु:खाची जेथे सारखी
प्रीत जीवना ओढ लागते ||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: