ललित

औषधाने मी बरा होत नाही (गझल)

औषधाने मी बरा होत नाही
शब्द वैद्याचा खरा होत नाही

नित्य जळते काळीज विस्तवाचे
-की कुणीही सोयरा होत नाही

किती रिचवू मी वीष जीवनाचे?
अता धावा! शंकरा!..होत नाही!

असे नाही की, कैकयीच दु:खी
सुखी ती ही मंथरा होत नाही

स्वप्न त्यांना स्पर्धेत बक्षिसाचे
पूर्ण ज्यांचा अंतरा होत नाही

कधी स्मरले तुज मागल्या घडीला?
स्मरण त्याचे, ईश्वरा, होत नाही

एकदा का हे मर्मबंध तुटले,
पुन्हा त्याचा मोगरा होत नाही

-मानस६

लेखन प्रकार: 

शब्दस्फटिक

अहेतुक रेघोट्यांची
अभावितपणे होतात अक्षरे..
कुठल्याशा अगोचर वेळी
अक्षरांमधून घडतात शब्दस्फटिक,
त्या शब्दस्फटिकांची उतरंड रचून
अनिमिषपणे मी पाहत राहतो...

शोधत राहतो
एखादा ओळखीचा चेहरा..
दिसलाच जर तो कधी तर
त्या चेहर्‍यावरचा ओळखीचा केवळ आभासही.... पुरतो मला;

स्फटिकांच्या लक्ष कलांवरून
दशदिशांत लहरत जाणार्‍या
नाचर्‍या इंद्रधनुषी रंगांनी
माझ्या नावचं अदृष्ट आभाळ
क्षणभर साकारण्यासाठी....

- paragkan

लेखन प्रकार: 

चंद्र-तारे खूप झाले...!

चंद्र-तारे खूप झाले,
आता कोसळलेल्या उल्कांवर लिही
पाने-फुले नेहमीचीच,
आता उन्मळलेल्या मुळांवर लिही

प्रेमभंग नित्याचा,
आता रोजच्या विनयभंगावर लिही
'तुलसी-महात्म्य' पुरे,
आता बाटवलेल्या गंगांवर लिही

हिरवा मळा छानच,
आता काटेरी कुंपणावर लिही
भाटगिरी सोड आता,
राजाच्या माजोरेपणावर लिही

'माझे', 'मी', खूप आता,
आतल्या 'कमी'पणावर लिही
आणि सिरीयल्सचा आत्मा असलेल्या,
छद्मीपणावर लिही

जीवघेणे कटाक्ष बस,
रोजच्या 'जीव देण्यावर' लिही
अन हुंडा घे‌उनही 'सावित्रीचा'
जीव घेण्यावर लिही

'कर्माचे ओझे' जाणतो,
अता पुस्तकांच्या ओझ्यावर लिही
आणि सौभाग्य लेणे विस्कटणार्‍या,
कर्जाच्या बोज्यावर लिही

हिरवा‌ईचे वर्णन वाचले,
'न वाचणार्‍या' वनरा‌ईवर लिही
आपण स्वत:लाच लोटतोय ना वेड्या;
त्या भयाण खा‌ईवर लिही

-मानस६

लेखन प्रकार: 

अलविदा

अलविदा

आता ती वेळ आलीये !

उशालगतच्या टेबल लँपपाशी ठेवलेला तुझा जीवनदायी फोटो,
तुझ्या कॉफी कपवरचा लिपस्टिकचा अजून जपलेला पुसट ठसा,
कित्येक बेधडक साहसी सुखांचा सोबती : खोलीतला शान्देलिएर,
आणि त्याच्या रिमझिम प्रकाशातून झरणार्‍या असंख्य स्मृति-शलाका,
मडोनाचे गहिरे बलाड्स थेट ह्रदयात पोचवणारा गिफ्टेड वॉकमन..
.. हे सगळंच सोडण्याची.

वेगळ्या वाटांची अनवट स्वप्ने रुजवली आपण एकमेकांत याच खोलीत,
तेव्हापासूनचे हे सारे सोबती !

परिस्थितीने तुझे नास्तित्व, माझ्यासाठी
अधिकाधिक अर्थपूर्ण एकटे करणारे सारेच...धागे-दोरे..

शांततेचा हा विब्रातो घुमतो आहे अगदी आतून आज..

कुणी सांगावे,
कदाचित तुझ्या-माझ्या तुटल्या तारांचे त्याच खोलीतले अँटिक गिटार
वाजू लागेल मी नसताना.. तुलाही ऐकू येइल हाच सूर..

अहंभावाचा सारा लखलखाट मालवून तू निजशील त्याच शान्देलिएरखाली
तेव्हा.... चालू लागशील तू माझ्या मागे तुझ्या परतण्याची वाट पाहत, तुझ्याही नकळत

- samurai

लेखन प्रकार: 

रे ही सर पावसाची !

रे ही सर पावसाची
भेट जणू साजणाची !

सांज फुलारून आली
बाग जशी काळजाची
रे ही सर पावसाची !

वेशीवरुनी जराशी
रुणझुणू घुंगराची
रे ही सर पावसाची !

वेढा घालुनी तनूला
धुंद मिठी गारव्याची
रे ही सर पावसाची !

सुखस्वप्ने वेचण्याला
आली बघ उंबर्‍याशी
रे ही सर पावसाची !

माझी भरण्यास ओटी
होइ हळद-कुंकवाची
रे ही सर पावसाची !

- सुमती वानखेडे

लेखन प्रकार: