ललित

तारांकित

ज्ञानोबांनी लावलेलं मराठीचं रोप कधीच गगनाला जाऊन भिडलं. खाली खोल पाताळात पाय रोवून उभं राहिलं. सार्‍या विश्वाला आपल्या कवेत घेतलं. मराठीचा हा सळसळणारा पिंपळ अनेकांना सृजनाचं लेणं देऊन गेला. तुकाराम-रामदासांपासून ते रघुनाथ-वामनपंडितांपर्यंत, केशवसुतांपासून ते मर्ढेकरांपर्यंत, राम गणेश गडकर्‍यांपासून ते तेंडुलकरांपर्यंत अनेकांवर या सोन्याच्या पिंपळानं सावली धरली.

त्र्यंबकरायानं 'धन्य धन्य हे मराठी | हे ब्रह्मविद्येची कसवटी |' हा घोष केला, त्यालाही आता शतकं उलटली. दरम्यान अनेकांनी मराठीचा दिमाख वाढवला. लेखक, कवी, नाटककार, कलावंत या सार्‍यांनी आपल्या मायबोलीच्या कीर्तीत भर घातली. आणि यात अग्रस्थानी होते ते दिवाळी अंक. मराठी साहित्यातील एक अभिमानास्पद परंपरा म्हणजे दिवाळी अंक. दीपांकांना यंदा शंभर वर्षं पूर्ण होत आहेत. आपल्या 'मायबोली'नंही नुकतंच एक तप पुरं केलं. या निमित्तानं मराठीतील दर्जेदार साहित्याचं वाचन साहित्य - नाट्य - चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांनी केलं आहे.
******
श्री. बा. सी. मर्ढेकर यांच्या कवितांचं डॉ. श्रीराम लागू यांनी केलेलं वाचन

श्री. बा. भ. बोरकर यांच्या कवितांचं श्रीमती सुनीता देशपांडे यांनी केलेलं वाचन

श्री. मंगेश पाडगावकर यांनी केलेलं त्यांच्या निवडक कवितांचं वाचन

श्री. ना. धों महानोर यांनी केलेलं त्यांच्या निवडक कवितांचं वाचन

श्री. द. मा. मिरासदार यांचे कथाकथन

श्री. आरती प्रभू यांच्या कवितांचं श्री. विक्रम गोखले यांनी केलेलं वाचन

श्री. दिलीप प्रभावळकर यांनी त्यांच्या 'सुह्रद' या लेखाचं केलेलं वाचन

डॉ. अरुणा ढेरे यांनी सांगितलेल्या डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या आठवणी

श्री. सुधीर मोघे यांनी केलेलं त्यांच्या निवडक कवितांचं वाचन

श्रीमती सुनीता देशपांडे यांनी श्री. जी. ए. कुलकर्णी यांना लिहिलेल्या एका पत्राचं श्रीमती शुभांगी गोखले यांनी केलेलं वाचन

श्रीमती शांता शेळके व श्री. मिलिंद बोकील यांच्या कथांचं सोनाली कुलकर्णी यांनी केलेलं वाचन

श्री. जी. ए. कुलकर्णी यांच्या 'बखर बिम्मची' या पुस्तकातील निवडक भागाचं अमृता सुभाष यांनी केलेलं वाचन

श्रीमती दुर्गाबाई भागवत यांच्या 'ऋतुचक्र'तील 'सोनेरी आश्विन' या भागाचं केतकी थत्ते यांनी केलेलं वाचन
******

मराठीतील दर्जेदार साहित्याची नवीन पिढीला ओळख व्हावी, मराठी कला व साहित्यक्षेत्रात आपला अमिट ठसा उमटवणार्‍या दिग्गजांच्या आवाजात हे साहित्य या शतकमहोत्सवी वर्षात आपल्यापर्यंत पोहोचावे, हा या अभिवाचनांमागील हेतू आहे. हे सारे लेखक व कलावंत महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहेत. त्यांच्या अफाट कर्तृत्वाची जाण ठेवून आपल्या मायबोलीचं संवर्धन करणं, हे आपलं कर्तव्य आहे. आणि एक तप पूर्ण करणारी आपली 'मायबोली' ते नक्कीच पार पाडेल.

डॉ. श्रीराम लागू, श्रीमती सुनीता देशपांडे, श्री. मंगेश पाडगावकर, श्री. ना. धों. महानोर, श्री. द. मा. मिरासदार, श्री. विक्रम गोखले, श्री. दिलीप प्रभावळकर, डॉ. अरुणा ढेरे, श्री. सुधीर मोघे, श्रीमती दीपा लागू, श्रीमती शुभांगी गोखले, सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, केतकी थत्ते यांनी या ध्वनिमुद्रणासाठी मोलाचं सहकार्य केलं. केवळ मराठी भाषेवरील प्रेमामुळे या सर्व दिग्गज कवी-कलावंतांनी अतिशय उत्साहानं, वेळात वेळ काढून ही ध्वनिमुद्रणं केली, याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. या अभिवाचनांसाठी परवानगी दिल्याबद्दल पु. ल. देशपांडे फाऊंडेशन, श्रीमती सुनीता देशपांडे, डॉ. सुचेता लोकरे, श्री. मोहन वाघ, श्री. मिलिंद बोकील, श्री. मोहन भागवत, श्री. निवृत्ती खानोलकर, श्री. केशव गोपाळ शिरसेकर, श्री. आप्पा परचुरे, श्री. राघव मर्ढेकर, श्री. संजय भागवत, सौ. सुजाता देशमुख, श्री. अनिल मेहता, मौज प्रकाशन गृह, राजहंस प्रकाशन, मेहता पब्लिशिंग हाऊस, परचुरे प्रकाशन गृह यांचे आभार. तसंच ध्वनिमुद्रणासाठी मदत केल्याबद्दल पूना म्युझिक सोसायटी, पाथफाईंडर, पुणे, अदिती अय्यर, श्री. विकास अमृते, श्रीमती रेखा जाखडे, सौ. सारिका ठक्कर, श्री. अमित वर्तक, सरिता-विनायक आठवले, श्रद्धा द्रविड यांना धन्यवाद.

या विभागासाठी रेखाचित्र काढून दिल्याबद्दल संकल्प द्रविड यांना धन्यवाद.

चिन्मय दामले यांनी सर्व मान्यवरांकडून, प्रकाशकांकडून परवानगी घेणे, ध्वनिमुद्रण करणे, ध्वनिमुद्रणावर योग्य ते संस्कार करणे, या विभागासाठी लेखन करणे आणि सर्व मान्यवरांची छायाचित्र मिळवणे आदी सोपस्कार पार पाडले.

याच विभागामध्ये श्री. द. मा. मिरासदार यांच्याकडून दीपक ठाकरे यांनी ध्वनिमुद्रण मिळवले.

(या अभिवाचनांत समाविष्ट केलेल्या सर्व साहित्याचे सर्व हक्क संबंधितांकडे सुरक्षित.)

लेखन प्रकार: 

मनमुराद


--मग मी स्वत:ला सुरांवरती झोकून दिलं
आणि त्या स्वप्निल प्रदेशात माझी पावलं
पंख लागल्यासारखी भिरभिरली..
ओळख लागत नसलेल्या
अनोळखी पाहुण्यासारखी
घरगुती हक्कानं वस्तीला आली..

--एका पिसाला पकडताना
दुसरंही पीस हाती लागावं,
आणि ते बघताच मन हरखावं
तशी मग मी शब्दांची कास धरली..
सारं काही चुकलं तरी,
"असू दे गो माझी बाय ती"
म्हणणार्‍या शब्दांची माया
मी नि:शंक पांघरली..

--मग कधी मला आभाळभर
मनमोरांचे रंगपिसारे दिसले,
रंगांच्या पावसात उन्हं रंगीत हसली,
आणि उदयाइतकाच अस्तही रमणीय करणार्‍या
पानगळीलाही खुबसूरत बनवणार्‍या
रंगांच्या जादूला,
माझा लवून कुर्निसात घडला..

(नेहमीची चढण चढतानाही
कधी लागत होती धाप,
कधी वळणा वळणात
अडकत होते श्वास,
वाटत होतं हा प्रवास चालणार
फक्त पाठीवरती ओझी घेऊन..
हे चालणं निभवायचंय
खालमानेने,न बोलून)

--म्हणून मग मी..
मग मी..

- Hems

लेखन प्रकार: 

मन कूकर कूकर...

मन कूकर कूकर
खदखदत रहाते
जरा जरा वेळ जाता
शिट्टी वाजत रहाते

मन स्कूटर स्कूटर
वेड्यावाणीच वागते
सुरु होण्यासाठी याला
लाथ मारावी लागते!

मन फोन समजावा
याला डेड म्हणू नये
जावे बोलत स्वत:शी
एकट्याने कण्हू नये

मन गरगर पंखा
स्वत: भोवती फिरते
तरी कसे कोण जाणे
वारे डोक्यात शिरते

मन फ्रीजर फ्रीजर
आत आत गोठलेले
थेंब कुठल्या क्षणांचे
कुठे कुठे दाटलेले

मन भरलेला माठ
त्यात स्वप्ने काठोकाठ
मागे स्वप्नांच्या धावता
दु:खे येती पाठोपाठ

मन अडकली टेप
तेच तेच बरळते
जुन्यापान्याच सुरांना
पुन्हा पुन्हा उगाळते

मन वायर वायर
वर रबरच आहे
आत पितळ जिवाचे
त्यात सौदामिनी वाहे

मन बटण दिव्याचे
कधी चालू कधी बंद
मन उजेड दिव्याचा
कधी तीव्र कधी मंद

मन कपबशी साधी
आहे भासाने भरली
आप-पर भाव जाता
मोहमायाच सरली...

- प्रसाद शिरगांवकर

लेखन प्रकार: 

मायेची सय

बसले होते अशीच..
आभाळाचे पसरलेले असंख्य तुकडे गोळा करून,
प्रत्येक तुकडा वेगळा, अस्तित्वहीन..

गेल्या वर्षी श्रावणात वेचलेल्या पागोळ्या होत्या ओच्यात,
त्यांचं चांदणं ओवायचं होतं..

पण मनात होती अनामिक भीती..
पागोळ्या सांडल्या तर?
आभाळाच्या विजोड चिंध्या झाल्या तर?

मग कुठून तरी आली मौनरवे हजारोंनी,
डोळ्यांत तरळली तुझी स्निग्ध नजर..
घेऊन आली माझी चिऊ-काऊची स्वप्ने..

आणि आई! क्षणाक्षणाला थरथरणारी पानं शांत झाली.
दरवळली जाई जुईची वेल..
क्षणात आभाळ चमकू लागलं,
चांदण्यांचा कशिदा खुलून आला,
मायेची सय मनाच्या डोहातून तरंगत गेली..

आई, तू जन्मोजन्मींची कुबेर..
निळ्या रंगाच्या चंद्राला, रात्रभर गोष्ट सांगून जोजवणारी जादुगार..

माझ्या टिपरीला रंग द्यायला,
पिवळ्याधम्म शेवंतीतून ओवी ओवायला,
सागरगोट्याच्या काचेतून समुद्र पहायला,
माझं इवलंसं आभाळ समृद्ध करायला,
अशीच येशील ना?

- chinnu

लेखन प्रकार: 

काही बिघडत नाही (गझल)

ती अजून रुसते बिसते - पण काही बिघडत नाही!
ह्रदयात जरासे तुटते.. पण काही बिघडत नाही!

अंदाजे मोजत असतो दुःखांची संख्या आता
बेरीज जराशी चुकते, पण काही बिघडत नाही!

सगळ्यांची सगळ्यांसोबत ओळख इतकी झाली की
सगळ्यांना सगळे कळते - पण काही बिघडत नाही!

कानावर येते की तो अवतार वगैरे घेतो
ही खात्री बित्री नसते, पण काही बिघडत नाही!

अत्यंत काळजीपूर्वक आयुष्य फाडल्यावरही
एखादी कविता उरते.. पण काही बिघडत नाही..

आता कळते की तेव्हा जे बिघडत गेले ते ते
बहुदा घडलेही नव्हते! पण काही बिघडत नाही..

- वैभव जोशी

लेखन प्रकार: 

नेमस्त

धरतीवर उमटत गेल्या अलवार उन्हांच्या ओळी
तो शहारला नेमाने ही कविता सुचतेवेळी

नित्यागत उमलत गेली हळुवार कल्पना त्याची
सवयीचा सुगंध आला होताच फुले शब्दांची

नेमस्त हरखला तोही द्याया ना उरले काही
नेमस्त चरकला फिरुनी .."ही शेवटची तर नाही?"

रे छळू नका रे त्याला का नवे न काही स्फुरते
एखाद्या आयुष्याला एखादी कविता पुरते..

- वैभव जोशी

लेखन प्रकार: 

ती..

मी पळत राहतो तिच्या मागून
रणरणत्या उन्हात,
ठेचकाळत, रक्ताळत,
दगड-धोंड्यांतून वाट काढत
( ती पुढे अन मी मागे )
थकून जरा थांबतो क्षणभर,
तीही थांबते
तिच्या माझ्यातील अंतर मात्र,
क्षणाक्षणाला लांबते
मी जीव तोडून पुन्हा,
तसाच पळत राहतो ... जास्त वेगात..
वाटेत येणार सारं
धुळीत उडवून लावत
ती खरी की मी खरा?
का हा सारा भास मात्र?
तिचे पाय जमिनीवर तसेच घट्ट,
आणि माझा तरीही तिला पकडण्याचा हट्ट!
कलणार्‍या दिवसाचं बोट धरून
तीच मला सोडून जाते
उरतो फक्त..
आत मुरत जाणारा,
थंडगार एकांत!
विरत जाणार्‍या माझ्या अस्तित्वाला
वाकुल्या दाखवत..
ती खुशाल विरघळून जाते..
खोल खोल अंधारात,
अन चुकचुकणारे रातकिडे
मला पोखरत जातात...

- pama

लेखन प्रकार: 

आपण सारे नापास ....

शिक्षणा-नोकर्‍यांची क्लिष्ट गणिते
आणि पगारा-खर्चाचे किचकट ताळेबंद
सोडवत रहातो आपण...
निरर्थक नात्यांचे निबंध लिहित आणि
मानापमानाच्या वाक्यांची
संदर्भांसहित स्पष्टीकरणे देत राहतो आपण....
जुनेपाने इतिहासजमा कुलवृतांत
आणि गैरलागू सनसनावळी घोकत रहातो....
आणि बदलीच्या ठिकाणी वणवण फिरत
नावडता भुगोल शिकत रहातो....
सोडवत रहातो कसलीकसली प्रमेयं
आणि न जुळणार्‍या सिद्धता
काढत रहातो मैत्रीची वर्गमुळं
प्रेमाची घनमुळं आणि नात्यांची क्षेत्रफळं.
चुकूनमाकून एकत्र आलेल्या माणसांचे
काढून बघतो लसावि-मसावि
आणि नेहमी वाकड्यातच शिरणार्‍या
आकड्यांनी भरुन टाकतो पानेच्या पाने.
लिटमस पेपर सारखे
कसल्या कसल्या द्रावणात बुडवून घेत
आपल्याच मनाचे रंग बदलत रहातो आपण.
आधीच मारुन ठेवलेल्या बेडकासारख्या
एखाद्या 'घटने'चे डिसेक्शन करुन
ठराविक छापाची निरिक्षणे नोंदवतो
आणि हमखास मार्क मिळवुन देणारे
'अमीबा' रंगवतो.
आवडतं हिंदी सोडून
न झेपणारं संस्कृत घेणार्‍या मुलासारखं
न झेपणारं बरंच काही काही घेत रहातो आपण
आवडणारं बरंच काही सोडून....
गिरवत जातो चाकोरीतली मुळाक्षरं
स्वच्छंदी चित्रं खोडून....

परिक्षेला बसल्याच्या आविर्भावातच
सोडवत जातो जीवन.

बँकबॅलन्स्, शेअर्स, बढत्या आणि
पेन्शनफंडाच्या जिवावर
स्वत:च स्वत:ला पास ठरवत
जेव्हा आपण उभे रहातो चित्रगुप्तासमोर
त्याच्या डोळ्याला डोळा भिडवून....
तेव्हा तो हसतो आणि
म्हणतो आपल्याला चिडवून....
"बोर्डातच आला असतास की रे गड्या!
तेव्हढा तो ढिगाने लाल रेघा पडलेला
'समाधाना'चा पेपर घ्यायचा होतास की रे
दुसर्‍या कुणाकडनं तरी सोडवून.... "

- स्वरुप कुलकर्णी

लेखन प्रकार: 

अपूर्ण....

नुसताच बसलो होतो मी
बराच वेळ हातात कागद-पेन घेऊन...
सुचतच नव्हते काही
मनाच्या आकाशात कधी पाऊस कधी ऊन...
शेवटी कंटाळून बाजूला ठेवून दिले कागद-पेन
आणि सरळ आठवायला घेतले तुला
तुझ हसणं आठवलं
तसे टपटपले दोन-चार शब्द कागदावर
तुझ चिडणं आठवलं
तश्या उमटून गेल्या दोन-चार ओळी
मलाही मग आला उत्साह
आठवत गेलो तुला खूप खूप...
तसे तरंगत आले चुकार शब्द
आणि बसले शहाण्यासारखे
एकेका ओळीत गुपचूप...
मग मी आठवल्या त्या कातरवेळा
ती संकेतस्थळं आणि ती चांदरात...
तसे लाजले शब्द थोडे आणि त्यांनी
लपेटले स्वत:ला वृत्त, लयी आणि यमकांत...
कागद भरुन गेला पार...
छान कविता होत होती तयार...
आता शेवटच राहिला होता फक्त
बाकी सगळं जमलं होतं मस्त
अन मला कुठुनसं आठवलं
आपलं झालेलं भांडण
तुझ्यासारखेच रुसून बसले मग शब्द
परत थोडा मागे गेलो
जुनं-जुनं आठवू लागलो
हाताला लागले काही निसटणारे क्षण
लिहिलंही मी कागदावर काहीबाही
पण ते माझं मलाच पटलं नाही...
जसं आपलं भांडण
कधी कध्धीच मिटलं नाही...
माझं मीच मग समजावलं मला
कधी कधी असं होतं
राहते एखादी कविता 'अपूर्ण'च
जसं राहून गेलंय आपलं नातं
जसं... राहून गेलंय आपलं नातं!

-स्वरुप कुलकर्णी

लेखन प्रकार: 

अजूनही भेटेन कदाचित...

आधी भेटत आलो आपण, तेव्हा भेटच खरी झाली नसावी बहुधा
एकदा खरंच भेटायच्याच उद्देशाने ये.. अजूनही भेटेन कदाचित

पुन्हा पुन्हा का दाखवतेस त्याच त्या जुन्या जखमांचं भांडवल
ओल्या घावांचे व्याज जेवढे माझे, तुझी मुद्दलही नसेल कदाचित

नव्हताच फोडला टाहो कधी, उफ्फ सुद्धा कधी केलेच नाही
तुझ्या केवळ हुंदक्यामुळेच गर्दी जमा झाली असेल कदाचित

तेव्हाही कावेबाज हसत नव्हतो, आजही अश्रू नितळच आहेत
अता मात्र आतला आरसा, हरेकासाठी कंबर कसेल कदाचित

वेगळेपणा नव्हता गं तुझ्यातल्या तुझ्यात, माझ्यातल्या तुझ्यात
तुला तुझी आताची नवीन ओळख तुझ्यामध्ये दिसेल कदाचित

तुझिया मनात चालला असेल तोच तो विचारांचा काफिला पुन्हा
शांतपणे डोकाव.. एखादा माझा विचार ओळखीचे हसेल कदाचित !

- माणिक जोशी

लेखन प्रकार: