वेडांत मराठे वीर दौडले सात

वेडांत मराठे वीर दौडले सात ॥ ध्रु ॥

"श्रुति धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता
रण सोडुनि सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खर्‍या लाजतिल आता
भर दिवसा आम्हा दिसू लागली रात " ॥ १ ॥

ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील
"माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लाविता जात " ॥ २ ॥

वर भिवई चढली दात दाबती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यात उठे काहूर ओलवे काठ
म्यानातुनि उसळे तलवारीची पात ॥ ३ ॥

"जरी काल दाविली प्रभु गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरीशिबिरात
तव मानकरी हा घेउनि शीर करांत " ॥ ४ ॥

ते फिरता बाजुस डोळे किंचित ओले
सरदार सहा सरसावुनि उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
ढग जात धुळीचे दूर क्षणी क्षितिजांत ॥ ५ ॥

आश्चर्यमुग्ध टाकून मागुति सेना
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमाना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात ॥ ६ ॥

खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्त्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव हे मानी
खग सात जळाले अभिमानी, वणव्यात ॥ ७ ॥

दगडांवर दिसतील अजुनि तेथल्या टांचा
ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्ताचा
क्षितिजावर दिसतो अजुनि मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणी वायावर गातं ॥ ८ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

देळ झाली भर माध्यान्ह

वेळ झाली भर माध्यान्ह
माथ्यावर तळपे ऊन
नको जाऊ कोमेजुन, माझ्या प्रीतिच्या फुला

तप्त दिशा झाल्या चारी
भाजतसे सृष्टी सारी
कसा तरी जीव धरी, माझ्या प्रीतिच्या फुला

वाहतात वारे जळते
पोळतात फुलत्या तनुते
चित्त इथे मम हळहळते, माझ्या प्रीतिच्या फुला

माझी छाया माझ्याखाली
तुजसाठी आंसावली
कशी करू तुज सावली, माझ्या प्रीतिच्या फुला

दाटे दोन्ही डोळां पाणी
आटे नयनांतच सुकोनि
कसे घालु तुज आणुनि, माझ्या प्रीतिच्या फुला

मृगजळाच्या तरंगात
नभाच्या निळ्या रंगात
चल रंगू सारंगात, माझ्या प्रीतिच्या फुला

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

विटेवरी ठेला माझा विठ्ठल सवळा

विटेवरी ठेला माझा विठ्ठल सवळा
युगे अठ्ठावीस दाटे भक्तिचा उमाळा॥धृ॥
मूर्तीमंत देव नांदे क्षेत्र पंढरीसी
चंद्रभागे तटी ठेवी उभय कर कटिसी
सुशोभती रूळल्या गळा वैजयंती माळा ॥१॥
मेघ दयेचा होऊनी आषाढी कार्तिकी
आलिंगनी अवघा होई देह हा सार्थकी
नयन सौख्य विश्वंभर उभ्या या विश्वाला ॥२॥
कुशल चिंतुनी भक्ताचे पुसे समाचार
भक्ता लागी देई सदा आशेचा आधार
काठोकाठ साठलेला संतरी जिव्हाळा ॥३॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

वादलवारं सुटलं गो

वादलवारं सुटलं गो, वार्‍य़ान तुफान उठलं गो
भिरभिर वार्‍य़ात, पावसाच्या मार्‍य़ात
सजनानं होडीला पाण्यात लोटलं ॥ धॄ ॥

गडगड ढगात बिजली करी, फडफड शिडात, धडधड उरी
एकलि मी आज घरी बाय, संगतिला माज्या कुनी नाय
सळसळ माडात, खोपीच्या कुडात, जागनार्‍य़ा डोल्यात सपान मिटलं ॥ १ ॥

सरसर चालली होडीची नाळ, दूरवर उठली फेसाची माळ
कमरेत जरा वाकूनिया, पान्यामंदी जालं फेकुनिया
नाखवा माजा, दर्याचा राजा, लाखाचं धन त्यानं जाल्यात लुटलं ॥ २ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

वद जाउं कुणाला शरण

वद जाउं कुणाला शरण.
करिल जो हरण संकटाचे
मी धरिन चरण त्याचे ॥ ध्रु ॥

बहु आप्त बंधु बांधवा,
प्राथिले कथुनि दु:ख मनिंचे
ते होय विफल साचे ॥ १ ॥

मम तात जननि मात्र ती
बघुनि कष्टती हाल ईचे
न चलेचि काहि त्यांचे ॥ २ ॥

जे कर जोडुनि मजपुढे
नाचले थवे यादवांचे
प्रतिकूल होति साचे ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

वेदमंत्रांहून आम्हां वन्द्य 'वंदे मातरम्'

वेदमंत्रांहून आम्हां वन्द्य 'वंदे मातरम्'

माउलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती
त्यांत लाखो वीर देती जीवितांच्या आहुती
आहुतींनी सिद्ध केला मंत्र 'वंदे मातरम्'

याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले
शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतिवादी झुंजले
शस्त्रहीनां एक लाभे शस्त्र 'वंदे मातरम्'

निर्मिला हा मंत्र ज्यांनी, आचरीला झुंजुनी
ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाऊनी
गा तयांच्या आरतीचे गीत 'वंदे मातरम्'

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

विसरशील तू सारे

हे हात असे जुळलेले
हे नेत्र असे खिळलेले
विसरशील तू सारे

हे सांध्यरंग विरतील
तारका नभी झुरतील
हे उदास होतील वारे

मधुगंध धुंद उडताना
तिमिरात चंद्र बुडताना
मी स्मरेन सर्व इशारे

तू जिथे कुठे असशील
स्वप्नात मला दिसशील
तुज कळेल पण हे का रे?

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

विसरशील खास मला

विसरशील खास मला दृष्टिआड होता
वचनें ही गोड गोड देशि जरी आता

दृष्टिआड झाल्यावर सृष्टिही निराळी
व्यवसायही विविध, विविध विषय भोवताली
गुंतता तयात कुठे वचन आठवीता?

स्वैर तू विहंग अंबरात विहरणारा
वशही वशीकरण तुला सहज जादुगारा
लाभशील माझा मज केवि जसा होता

अंतरीची आग तुला जाणवू कशाने
बोलवे न वेदनाच वचन दु:ख नेणे
यापरता दृष्टिआड होऊ नको नाथा

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

वा-याने हलते रान

वाऱ्याने हलते रान, तुझे सुनसान, हृदय गहिवरले
गाईचे डोळे, करूण उभे की, सांज निळाईतले

डोळ्यात शीण, हातात वीण, देहात फुलांच्या वेगी
अंधार चुकावा म्हणून, निघे बैरागी

वाळूत पाय, सजतेस काय, लाटांध समुद्राकाठी
चरणात हरवला गंध, तुझ्या की ओठी

शून्यात गरगरे झाड, तशी ओढाळ, दिव्यांची नगरी
वक्षात तिथीचा चांद, तुझा की वैरी

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

वाट इथे स्वप्नातिल

वाट इथे स्वप्नातिल संपली जणू
थांबवितो धारांनी सावळा घनू, ग बाई

आजूबाजूच्या पानांनी, वेढली ही निळाई
चिंतनात बैसली ग, मंत्रमुग्ध राई
फुलूनिया आली गडे, बावरी तनू

दऱ्यांतुनी आनंदला, पाणओघ नाचरा
आसमंत भारीतो ग, गानसूर हासरा
माथ्यावरी दिसले ग, इंद्राचे धनू

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: