चार भिंतींना अताशा घर म्हणावे लागते!

कोणते नाते कुणाशी?... आठवावे लागते!
चार भिंतींना अताशा घर म्हणावे लागते!

माणसे न्याहाळताना आरश्याला कैकदा....
'चेहरा की मुखवटा' हे पारखावे लागते!

फक्त पाढे घोकुनी, सुटते कुठे अवघड-गणित?
दु:ख-दु:खाने, सुखासाठी गुणावे लागते!

खुंटते काही कुणाचे सांग का कोणा विना?
श्वास येतो, श्वास जातो अन् जगावे लागते!

यंत्रवत् उरले जरी नाते तुझ्या- माझ्यातले...
बोलण्याचे तंत्र दोघांना जपावे लागते!

सद-विचारांची कितीही मंथने केली तरी...
सूर ना जुळता स्वतःशी गुण-गुणावे लागते!

सात फेरे मारल्याने प्रेम का जडते 'प्रिया'?
योग्य साथी लाभण्या 'युग-युग' झुरावे लागते!

-सुप्रिया (जोशी) जाधव