हात घसरतो आहे

अल्याड डोंगर पल्याड खाई, डचमळतो मी मधात आहे
रुतेचना ही नखे कुठेही, सदा घसरतोच हात आहे

कुटाळकीच्या समोर सज्जन समाज सारा हरून गेला
तसाच मीही क्रमाक्रमाने सदैव खातोच मात आहे

बरेच काही लिहून गेलो, कुठे दखल घेतलीय माझी?
जरी तयांनी जरा खरडले, तुफान चर्चा जगात आहे

खुशाल करती टवाळखोरी बघून कोणास पाठमोरा
समोर येता मुखावरी मुख हसून हॅलो प्रघात आहे

किती शहाणे, किती दयाळू, घडीव आहेत राज्यकर्ते
विरोधकांनो बघा जरासे हवेवरी का जकात आहे?

’अभय’ पुन्हा तू नकोच देऊ, तुझे असूदे तुझेच पाशी
मुळीच नाही गरज कुणाला समस्तजन हे सुखात आहे

- गंगाधर मुटे