संवाद - मीरा बडवे

HDA2014_darkblueheader

निवांत अंध मुक्त विकासालय
सर्व्हे नं. ३३/१, प्लॉट नं. ७५
विद्यानगर, पुणे - ४११०३२

HDA2014_team_nivant_16.jpg

विश्रांतवाडी ओलांडून पुढे विमानतळाच्या दिशेनं गेलं की विद्यानगर हा भाग लागतो. या विद्यानगरात 'निवांत' नावाचा एक बंगला आहे. कोणे एके काळी फक्त बडवे कुटुंबाचं हे घर होतं. आनंद, मीरा आणि उमा बडवे इथे राहायचे. मग एके दिवशी या घरानं आपली दारं उघडली, डोळ्यांनी ज्यांना दिसत नाही, अशांसाठी. या घरातल्या माणसांची मनं फार मोठी. त्यांचं कुटुंब दरवर्षी विस्तारतच गेलं. अजूनही विस्तारतं आहे. त्यामुळे असेल कदाचित, पण हे घर कायम आशावादानं भारलेलं असतं. आनंदी आणि उत्फुल्ल असं हे घर. रोजच्या लढाया हसतमुखानं लढणारं.

आपल्याला अंधशाळा माहीत असतात. प्रत्येक जिल्ह्यात अशा शाळा आहेत. तिथे दहावीपर्यंत मुलं शिकतात. पण पुढे काय? शाळा संपली की शिक्षण संपलं. अंध व्यक्ती अठरा वर्षांची झाली की समाजकल्याण खात्याच्या कायद्यानुसार त्यांना स्वतंत्र जगायला बाहेरच्या जगात सोडून दिलं जातं. अनुत्पादक घटक असा त्यांच्यावर शिक्का बसला असल्यानं अनेकांच्या कुटुंबांनी आणि समाजानं त्यांना अगोदरच नाकारलेलं असतं. शिक्षण घ्यायची, चांगलं जगण्याची इच्छा असली तरी पर्याय संपलेले असतात. दुर्बल, हरलेले हे जीव मग भीक मागतात किंवा वाममार्गाला लागतात. मीराताई बडव्यांच्या घरानं या अंधांना आपलंसं केलं. या मुलांमध्ये जिद्द होती, ज्ञानलालसा होती. प्रचंड ऊर्जा होती. मीराताईंच्या 'निवांत'नं त्यांना हात दिला आणि एका फार मोठ्या लढ्याला सुरुवात झाली. हा लढा होता अनुत्पादक समजल्या जाणार्‍या, समाजाला नकोशा वाटणार्‍या अंध व्यक्तींना स्वत:च्या पायावर उभं करण्याचा, त्यांना समाजात ताठ मानेनं जगता यावं यासाठीचा.

'निवांत अंध मुक्त विकासालय' ही लौकिकार्थानं एक संस्था असली, तरी हजारो मुलांसाठी ते हक्काचं घर आहे. हे घर दहावीनंतर अंधशाळेतून बाहेर पडणार्‍या मुलांना सक्षम बनवण्यासाठी झटतं. त्यांना अकरावीपासून पुढचं शिक्षण घेण्यास मदत करतं. 'निवांत'ची १९९६ साली स्थापना झाली, तेव्हा दहावीनंतरच्या अभ्यासक्रमाचं एकही अक्षर ब्रेलमध्ये उपलब्ध नव्हतं. डोळसांनी आखलेल्या अभ्यासक्रमात अंधांसाठी शैक्षणिक सुविधा नव्हत्या. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या अंध विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी झटणार्‍या 'निवांत'मध्ये मग ब्रेलमध्ये शैक्षणिक पुस्तकं लिहायला सुरुवात झाली. अडीचशे-तीनशे पुस्तकं चक्क हातानं लिहिली गेली. मग ब्रेल प्रिंटर आले. दहावीनंतरच्या सर्व अभ्यासक्रमांची आणि अनेक साहित्यिकांची पुस्तकं आज इथल्या लायब्ररीत उपलब्ध आहेत. भारतभरातल्या शाळांना, ग्रंथालयांना इथून विनामूल्य पुस्तकं पुरवली जातात.

गेल्या सतरा वर्षांचा इथला निकाल शंभर टक्के आहे. लौकिकार्थानं आईवडील नसलेली, गवंड्यांची, धुणंभांडी करणार्‍या आयांची, रिक्शाचालकांची 'निवांत'मध्ये राहणारी अंध मुलं मेरिटलिस्टमध्ये येतात. गेली सतरा वर्षं इथला निकाल शंभर टक्के आहे. इथली काही मुलं पीएच.डी.पर्यंत शिकली आहेत. काहींनी एम.फिल केलं आहे. कला, वाणिज्य, लॉ, कॉम्प्यूटर सायन्स, लायब्ररी सायन्स, परदेशी भाषा, एम.एस.डब्ल्यू, बेकरी-कन्फेक्शनरी अशा विविध शाखांचं शिक्षण ही मुलं घेतात. या मुलांची 'टेकव्हिजन' नावाची स्वत:ची सॉफ्टवेअर कंपनी आहे. भारतीय आणि अमेरिकी कंपन्यांची प्रोजेक्ट्‌स्‌ ही मुलं हाताळतात. इथली मुलं भेटकार्डं, कागदी फुलं बनवून, त्यांची विक्री करून स्वत:ची फी भरतात, मेसचा खर्च भागवतात. 'निवांत'च्या कुटुंबातली दोन हजारांहून अधिक मुलं आज दरमहा ८,००० ते ८०,००० रुपये कमवतात. आपली सामाजिक जबाबदारी ही मुलं विसरलेले नाहीत. कमाईतला एक टक्का ते इतर समाजसेवी संस्थांना देतात. 'निवांत'च्या कमावत्या विद्यार्थ्यांचा 'सो कॅन वी' क्लब आपल्या कुटुंबातल्या इतर मुलांचा शैक्षणिक खर्च उचलतो.

ही मुलं अप्रतिम चवीची चॉकलेटं बनवतात, त्यांची विक्री करून आपलं शिक्षण सुरू ठेवतात. ही मुलं शामक दावर यांच्या नृत्य अकादमीत पाश्चात्त्य नृत्याचं आणि शमाताई भाट्यांकडे शास्त्रीय नृत्याचे धडे घेतात. इथल्या मुली ज्युदो शिकतात आणि भल्याभल्यांना लोळवण्याची धमक अंगी बाळगतात. दोरीवरच्या मल्लखांबाची लीलया प्रात्यक्षिकं करतात, कपाळावर काचेचा ग्लास, त्यात जळती मेणबत्ती ठेवून जलदीपासनं करतात, वेगवेगळी वाद्यं वाजवतात, कविता लिहितात, गातात, ट्रेकिंगला जातात, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळतात, पक्ष्यांशी गप्पा मारतात.

असं हे घर. 'निवांत' याचं नाव. 'निवांत अंध मुक्त विकासालय ही संस्था मीरा बडवे यांनी स्थापन केली; या संस्थेत मुलांना दहावीनंतर शिक्षण घेता यावं, त्यांना स्वत:च्या पायावर उभं राहता यावं यासाठी प्रयत्न केले जातात; मीरा बडवे यांना बाया कर्वे पुरस्कारासह अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत', अशा पुस्तकी ओळखीपेक्षा खूप काही अधिक असलेलं हे घर.

या घरातल्या आईशी, मीराताईंशी, मारलेल्या या गप्पा वाचण्याआधी एक महत्त्वाचं. या घरातली माणसं रोज लढत असतात. गेली सतरा-अठरा वर्षं त्यांचा लढा सुरू आहे. या मुलाखतीच्या प्रस्तावनेत आणि मुलाखतीतही 'निवांत'च्या यशोगाथेचं, इथल्या मुलांच्या स्वयंपूर्णतेचं, त्यांच्यातल्या जबाबदार नागरिकाचं वर्णन प्रामुख्यानं आहे. पण 'निवांत'च्या कथेची ही फक्त एक बाजू आहे. दुसरी आणि महत्त्वाची बाजू आहे ती अविरत आणि प्रचंड संघर्षाची. आपल्या कल्पनेपलीकडचा हा संघर्ष आहे. जगण्यासाठीची, शिक्षण मिळवण्यासाठीची ही लढाई अनेक पातळ्यांवर रोज लढली जाते. 'निवांत' कायम हसतमुख असतं, म्हणून असेल कदाचित, पण ही लढाई कधी लोकांसमोर फारशी येत नाही. या मुलाखतीतही ही लढाई क्वचितच दिसेल. कष्टांचे, मनस्तापांचे, अपमानांचे, अवहेलनांचे उल्लेख या गप्पांमध्ये फारसे नाहीत.

'निवांत'च्या यशोगाथा सभोवतालच्या तिमिराला भेदून सर्वांना जगण्याचं बळ, जिद्द आणि निकोप दृष्टी देतील, असा विश्वास वाटतो.

HDA2014_team_nivant_1.jpg



'निवांत'चा जन्म कसा झाला?

माझा नवरा, आनंद, दरवर्षी स्वत:च्या वाढदिवसाला पुण्यातल्या अंधशाळेला देणगी द्यायचा. रक्तदान करायचा. एका वर्षी मी सहजच आनंदला म्हटलं, "तू अंधशाळेत देणगी द्यायला जाणार आहेस ना? मीही येते यावेळी तुझ्याबरोबर". आनंद आणि मी अंधशाळेत गेलो. मी शाळा निरखत उभी होते. इतक्यात एक लहानगा मला येऊन बिलगला. त्या चिमण्याची घट्ट मिठी मला आजही आठवते, कारण ती मिठी मला आईपण देऊन गेली. जेमतेम अडीच-तीन वर्षांचा असावा तो. या अफाट जगात आईवडिलांनी एकटं सोडलेल्या त्याला दिसत काहीच नव्हतं. शाळेत इतकी मुलं असूनही एकटाच. माझ्या डोळ्यांतून पाण्याची धार लागली. 'निवांत'चा जन्म या घटनेतून झाला.

अंधशाळेच्या त्या भेटीआधी मी माझी स्वत:ची ओळख शोधत होते. माझी मुलगी उमा त्यावेळी नववीत होती. ती मला सतत म्हणायची, "ममा, तू तुझं सगळं आयुष्य इतरांचं करण्यात, घराची काळजी घेण्यात घालवलंस. करिअर सोडून घरी राहिलीस. आतातरी तू तुझं जग निर्माण कर. मी, बाबा आपापल्या व्यापात असतो. किती दिवस तू घरात अडकून पडणार आहेस?" माझ्या तेरा-चौदा वर्षांच्या मुलीचं बोलणं मला विचारात पाडणारं होतं. मी आनंदला म्हटलं, आता एखाद्या कॉलेजात इंग्रजी शिकवावं म्हणते. उमाच्या जन्माआधीही मी शिक्षणक्षेत्रातच होते. माझा नोकरीचा विचार अगदी पक्का झाला, आणि अंधशाळेच्या त्या भेटीनं सारंच बदलून टाकलं.

त्या दिवशी अंधशाळेतून बाहेर पडल्यावर मी आनंदला म्हटलं, "मी कॉलेजची नोकरी स्वीकारत नाही. त्यापेक्षा मी या शाळेतल्या मुलांसाठी काही करू का?" आनंदला या मुलांबद्दल प्रचंड आस्था होती. त्याला अंधशाळेसाठी खूप काही करावंसं वाटे, पण त्याच्या व्यवसायामुळे त्याला त्यासाठी वेळ देणं शक्य नव्हतं. मी हे काम करणार म्हटल्यावर तो खूशच झाला. त्याला जे करायचं होतं, ते आता मी करणार होते. 'निवांत'च्या कामात त्यानं अनेकदा माझ्यापेक्षाही झोकून देऊन काम केलं, त्या मागची पार्श्वभूमी ही आहे. आनंदचा आणि माझा अलिखित करारच झाला - त्यानं पैसे कमवायचे आणि मी ते सर्व ब्रेल पुस्तकं तयार करण्यासाठी, अंध मुलांना सोयी पुरवण्यासाठी, त्यांच्यासाठी पांढर्‍या काठ्या, ब्रेल स्लेट्‌स्‌ घेण्यासाठी खर्च करायचे.

पण 'निवांत' सुरू करण्याआधी तुम्ही एका अंधशाळेत 'रीडर' म्हणून जात होतात ना?

हो, मी एका अंधशाळेत तीन वर्षं इंग्रजी शिकवायला जात होते. अंधशाळांची व्यवस्था नक्की कशी असते, तिथलं कामकाज कसं चालतं, मुलांच्या खर्‍या गरजा कुठला, या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी मला ही मोठ्ठी प्रयोगशाळाच मिळाली होती. त्यामुळे आजच्या 'निवांत'ची कथा तिथे सुरू होते, असं म्हटलं तरी चालेल.

सहावी ते दहावीच्या मुलांना मी शिकवायचे. त्या मुलांशी माझी छान मैत्री जमली होती. तिथे मला लक्षात आलं की, त्या मुलांना खरं म्हणजे माझी शाळेत गरजच नव्हती. त्यांना माझी गरज भासणार होती ते शाळेबाहेर पडल्यावर. त्या शाळेत मी 'रीडर' होते. 'रीडर' म्हणजे वाचक. माझं काम मुलांना पुस्तक वाचून दाखवणं. पण वाचून दाखवणं म्हणजे शिकवणं का? नाही. फक्त कोणीतरी वाचलेलं ऐकून ती मुलं शिकतील कसं? ऐकून लक्षात राहिलेलं जे काही थोडकं असेल, त्यातून त्यांना जगण्याचं कौशल्य कसं मिळेल? शाळेबाहेर पडल्यावर जगण्यासाठी माझ्या वाचनाचा शून्य उपयोग होता त्यांना. बरं, 'कौशल्य' म्हणून जे काही या मुलांना शिकवलं जात होतं, त्याचा खरोखर उपयोग होतो का, हा विचारही केला जात नव्हता. खडू तयार करणं, खुर्च्या विणणं यांचा आजच्या जगात काय उपयोग आहे? आपण काय करायचं नाही, हे मला तिथे कळलं.

त्या व्यवस्थेत राहून मुलांना सक्षम बनवणं कठीण होतं. मी पर्फेक्शनिस्ट आहे. मुलांना ठोकूनठोकून घडवण्यावर माझा विश्वास आहे. ती चुकत असतील, तर मी त्यांचा कान धरते. त्यांना सरळ करते. पण शाळेतल्या मुलांवर मी प्रयोग करू शकत नव्हते. शाळेच्या व्यवस्थेची चौकट तसूभरसुद्धा हटवण्याची मला परवानगी नव्हती. एक मात्र खरं की, तिथले शिक्षक, कर्मचारी त्यांच्या परीनं जीव ओतून काम करत होते, अजूनही करतात. पण चार-सहा वर्षांच्या अंध विद्यार्थ्यांना दैनंदिन क्रिया करायला शिकवणं, जसं टॉयलेट ट्रेनिंग, हेच खूप कठीण आहे. मुलांना अभ्यासक्रमातल्या गोष्टी शिकवणं हे खूप पुढचं.

त्या तीन वर्षांत माझी दमछाक झाली. पण एक मोठा फायदा असा झाला की, माझा अहंकार विरघळला. समोरच्याशी जमवून घेण्यातली गंमत अन्‌ खुमारी कळली. शाळेतल्या माझ्या अंधमित्रांनी जगण्यातला रोजचा संघर्ष सोसण्याचं मला बळ दिलं. नवनवी शैक्षणिक उपकरणं बनवण्याचं कसब मी तिथे आत्मसात केलं. कसल्याही कामाची लाज बाळगायची नाही, हे मी तिथे शिकले. शाळेतल्या मुलांनी मला ब्रेल लिपी शिकवली होती. खूप क्षमाशील वृत्तीनं त्यांनी मला शिकवलं.

या विद्यार्थ्यांचं दहावीनंतर काय, हा प्रश्न मला छळायचा. त्यामुळे 'निवांत' सुरू करताना आपण कोणासाठी आणि काय काम करायचं, याचा फारसा विचार करावा लागला नाही.

HDA2014_team_nivant_17.JPG

दरवर्षी 'निवांत'ला दीडदोनशे मुलं येतात. संस्थेत प्रवेशाचे निकष काय?

'निवांत' ही शाळा नाही. हे कॉलेजही नाही. इथे येण्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागत नाही. इथे प्रवेशपरीक्षा किंवा फी नाही. प्रवेशासाठी निकष कुठले? तर, विद्यार्थी दहावी झालेला असावा, तो गरजवंत असावा. त्याला शिकण्याची पुरेपूर इच्छा असावी. हवे ते कष्ट उपसून आयुष्यात काहीतरी भरभक्कम करून दाखवण्याची जिद्द त्याच्या ठायी असली पाहिजे. शिवाय विद्यार्थी निर्व्यसनी असावा. महाराष्ट्रभरातून विद्यार्थी 'निवांत'मध्ये येतात आणि हे विद्यार्थी 'निवांत'शी जोडण्याचं काम इथून बाहेर पडलेले विद्यार्थीच करतात. अकरावीतले विद्यार्थी दहावीच्या नव्या बॅचच्या विद्यार्थ्यांना 'निवांत'बद्दल खूप माहिती देतात. दहावीच्या परीक्षेनंतर पुण्यातल्या चारही अंधशाळांमधले विद्यार्थी-विद्यार्थिनी आपापल्या ज्युनियरांना घेऊन येतात. अंधशाळांचे मुख्याध्यापक आणि संचालकही विद्यार्थ्यांना 'निवांत'बद्दल माहिती देतात आणि बस भरभरून विद्यार्थी आमच्याकडे पाठवतात.

मनानं उभारी घेतली नाही, जिद्द नसेल तर दहावीनंतर आपण कसं दिशाहीन होऊ शकतो, बाहेरच्या जगात आपण कसं वागायला हवं, सरकारी किंवा खाजगी होस्टेलांमध्ये प्रवेश कसा मिळवायचा, त्यांना 'निवांत'चा फायदा कसा झाला, वेगवेगळ्या करिअरांमध्ये काय आव्हानं असतात इत्यादी गोष्टींबद्दल सीनिअर विद्यार्थी आपले अनुभव सांगतात. संस्थेत पहिल्यांदाच येणार्‍या विद्यार्थ्यांची आर्थिक-कौटुंबिक-सामाजिक परिस्थिती, त्यांच्या आवडीनिवडी, इच्छाआकांक्षा यांबद्दल मी त्यांच्याशी चर्चा करते, नोंदी घेते. ज्यांना परतायला घर आहे, ज्यांच्या गावात योग्य अशा शैक्षणिक सुविधा आहेत, त्या मुलांना मी त्यांच्या कुटुंबीयांबरोबर राहूनच शिकण्याचा सल्ला देते. जिथली रोपं तिथेच उत्तम रुजतात. पुण्यात खाण्याराहण्याचे जरा हालच होतात. ज्या मुलांना घरचं पाठबळ नाही, त्यांना 'निवांत'तर्फे आश्वासन दिलं जातं की, पैसे नाहीत, कुटुंब नाही म्हणून त्यांनी स्वत:ला निराधार समजू नये; 'निवांत' हे त्यांचं नवं घर, नवं कुटुंब असणार आहे; इथे त्यांना शिक्षण मिळेल. पैसे नाहीत, परवडत नाही, म्हणून कोणीही शिक्षण बंद करायचं नाही, हे मी प्रत्येकाला निक्षून सांगते. मुलांनी त्यांच्या इच्छांनुसार अभ्यासक्रम कसा निवडावा, याचं मी मार्गदर्शन करते. ज्या अभ्यासक्रमांनंतर नोकरी मिळणार असेल, अशा अभ्यासक्रमांचा प्राधान्यानं विचार करा, हे मी त्यांना सांगते. 'निवांत'ची नवी बॅच दरवर्षी अशाप्रकारे तयार होते.

ही मुलं दहावीच्या निकालाआधीच 'निवांत'मध्ये येतात का?

बाहेरगावची मुलं, इंग्रजी माध्यम नव्यानं घेणारी मुलं आणि पुण्यातली उत्साही मुलं उन्हाळ्याच्या सुट्टीतच 'निवांत'मध्ये येतात. त्यांची शब्दसंपदा वाढवणं, त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रांत, (उदाहरणार्थ, ज्युदो, नृत्य, चित्रकला, चॉकलेट तयार करणे) प्रशिक्षण देणं, असं या सुट्टीत चालतं. दहावीचा निकाल लागण्याआधीच 'निवांत' हे या मुलांचं घर बनतं. मुलं इथे छान रुळतात. आपल्याला दिसत नाही, या जगात आपलं कोणी नाही, यांमुळे त्यांनी वाईट वाटून घेणं थांबतं.

या मुलांच्या राहण्याची सोय तुम्ही कशी करता?

तो एक मोठा प्रश्न आहे. पुण्यात अंधांसाठीच्या वसतिगृहांची मोठी कमतरता आहे. काही मुलं खोल्या भाड्यानं घेऊन राहतात. एकदोन खाजगी वसतिगृहं आहेत, तिथे काही मुलंमुली राहतात. काही मुलींना आम्ही फ्लॅट भाड्यानं घेऊन दिले आहेत. पण माझ्या मुलांकडे जगण्याची स्किल्स्‌ असतात. पुण्यासारख्या शहरात मुलं, मुली एकेकटेही राहतात आणि त्यांचं काहीही अडत नाही.

जगण्याचं स्किल म्हणजे काय?

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकानं आपली प्रत्येक गोष्ट स्वत: करणं, म्हणजे जगण्याचं स्किल आत्मसात करणं. मी सांगते माझ्या मुलांना, "तुम्ही महिन्याला दोन लाख रुपये कमवा किंवा वीस हजार रुपये कमवा, तुम्हांला तुमचा दिनक्रम स्वतंत्रपणे जगता यायलाच हवा. तुम्हांला डोळे नसले तरी हात आहेत आणि पाय आहेत. मग रडारड कशासाठी? तुम्हांला जर सामान्य माणसाचे सगळे हक्क हवे असतील, तर तुम्ही आधी सामान्य होऊन दाखवा." माझ्या मुलींनाही मी सगळं शिकवलं आहे. बाहेरच्या जगात त्या आत्मविश्वासानं वावरतात आणि उकडीचे मोदक, पुरणपोळ्या, अळूची भाजी हे पदार्थही सहज करू शकतात. कोणाला दुखलंखुपलं, कोणी आजारी असलं, तर इथे स्वयंपाक करून त्या डबा घेऊन जातात त्याच्यासाठी आणि पुण्यात राहून दिवसभराची नोकरीही करतात. पाणी उकळण्यापासून, चहा करण्यापासून मी शिकवायला सुरुवात करते. मी स्वत: शिकवते स्वयंपाकघरात उभी राहून. पण गंमत म्हणजे, मी एका बॅचला शिकवल्यावर मला पुन्हा तितकेच श्रम घेऊन शिकवायला लागलं नाही. ज्ञान अगदी सहज नंतर आलेल्या मुलींपर्यंत झिरपलं. 'निवांत'मध्ये स्वत:ची कामं स्वत:च करावी लागतात. गरज नसताना कोणीही तुमच्या मदतीला येत नाही. मुलं धाडधाड जिना उतरतात, ओट्याशी स्वयंपाक करतात. त्यांच्या चेहर्‍याकडे बघितलं तरच कळेल की, या मुलांना दिसत नाही म्हणून. माझी मुलं कोणाच्याही आधाराशिवाय उभी राहावी, हीच माझी इच्छा असते.

कोणाच्याही आधाराशिवाय उभं राहणं, हे जमण्यासाठी परिश्रम लागतात. मुलांना मी बँकेची कामं करायला शिकवते. 'निवांत'मध्ये तयार होणार्‍या वस्तूंची विक्री, त्यासाठी आणि रोज लागणार्‍या वस्तूंची खरेदी हे सगळं मुलंच करतात. 'आम्हांला अमूक करता येत नाही', हे त्यांच्या तोंडून कधीच निघायला नको, अशी माझी इच्छा असते. मुलांना चित्रकला, नृत्य, ज्युदो, स्केटिंग, कराटे असं सगळं शिकवण्याचा माझा प्रयत्न असतो. चांगल्यातले चांगले शिक्षक त्यासाठी आम्ही शोधतो.

जगण्याचं स्किल म्हणजे इतरांच्या मदतीला धावून जाणं, कुणाच्याही कसल्याही कमतरतेला, वेगळ्या वर्तणुकीला न हसणं. ही मुलं मतिमंदांना, तृतीयपंथीयांना हसायची. हे अजाणता व्हायचं अर्थात. एकदा अशी क्रूर चेष्टा माझ्या कानी आल्यावर मी मग त्यांना विचारलं, "तुम्हांला कोणी अंध म्हणून चिडवलेलं आवडतं का? तुम्ही अंध म्हणून जन्मलात यात तुमची चूक आहे का?" मुलं माना डोलवत 'नाही' म्हणाली. मी मग त्यांना तृतीयपंथीयांबद्दल, मतिमंदांबद्दल समजवून सांगितलं. बेळगावला एका कारखान्यात शेकडो तृतीयपंथीय काम करतात. त्यांच्याबद्दल मी मुलांना सांगितलं. त्यांना माझं म्हणणं पटलं.

या घटनेनंतर मी मुलांना 'प्रसन्न ऑटिझम् सेंटर'ला घेऊन गेले. पद्मजा गोडबोले या तिथल्या संस्थापिका-संचालिका. त्यांनी मुलांना स्वमग्नतेबद्दल माहिती दिली. मुलांनी पूर्ण संस्था पाहिली. तिथून आम्ही 'कमलिनी कुटी भवन'ला गेलो. स्किझोफ्रेनियाबद्दल तिथे मुलांना माहिती मिळाली.

माझी मुलं सहृदय, सहिष्णू असणं, मला महत्त्वाचं वाटतं. स्किझोफ्रेनिक, मतिमंद, स्वमग्न, तृतीयपंथीय, अपंग अशा जगातल्या सर्वांना सन्मानानं जगण्याचा समान हक्क आहे, हे 'निवांत'नं मान्य केलं आहे. माझ्या मते हेही जगण्याचं एक स्किल आहे.

HDA2014_team_nivant_2.JPG

'निवांत'चे सुरुवातीचे दिवस कसे होते?

'निवांत'मध्ये मुलं यायला लागली, अभ्यासाच्या निमित्तानं दिवसभर राहायला लागली, तेव्हा लक्षात आलं की, सगळ्यांत पहिले लक्ष द्यायला हवं मुलांच्या स्वच्छतेकडे. टॉयलेट वापरायचं कसं, ते स्वच्छ कसं ठेवायचं हे त्यांना माहीत नव्हतं. त्यांचे कपडे अस्वच्छ असत, नाक गळकं असे. मी साबण, तेल, टूथपेस्ट, टूथब्रश असं सारं घरात आणून ठेवी. ज्या मुलांना आईवडील नाहीत, त्यांच्यासाठी कपडे शिवणं, हे एक महत्त्वाचं काम होतं. सुरुवातीला कोणी दिलेले जुने कपडे मी त्यांना द्यायचे, पण ते धड मापाचे नसत. ऑल्टरेशनचा खर्चच जास्त होई. मग मी जुने कपडे घेणं बंद केलं. प्रत्येकासाठी नवे कपडे शिवून घेतले.

सुरुवातीच्या दिवसांत मुलांना वेळेचं महत्त्व समजावणं, ही एक कठीण गोष्ट होती. चुकूनही वेळ पाळायची नाहीत ही मुलं. उशिरा येणं, उशिरा जाणं ही त्यांची सवयच होती. कुठल्या कामाला किती वेळ द्यायचा याचं भान त्यांना नसे. काही मोजकी मुलं फार लाडावलेली होती. कोणी भरवल्याशिवाय ती जेवतही नसत. अशा एकेक समस्यांतून मार्ग काढत, मुलांना शिस्त लावण्यात थोडा वेळ गेला, पण मुलं शिकली. मी जे काम करते, त्याचा मूलभाव मातृत्व हा आहे. शिक्षण देणं, नोकरीसाठी मदत करणं हे दुय्यम. त्यांची आई बनून त्यांना शिस्त लावणं, हे माझं काम आहे. रोज सकाळी दात घासले पाहिजेत, केसांत उवा नकोत, कपड्यांवर डाग नकोत हे मी सतत सांगते. मुलांना मी विचारते की, "तुम्ही कॉलेजला जाणारी मुलं आहात, इतर विद्यार्थी नीटनेटके येतात कॉलेजला, मग तुम्ही का असे बेंगरुळ?" टेलरचं मोठ्ठ्ं बिल मी दर महिन्याला भरते. माझी मुलं कॉलेजात उत्तम कपड्यांतच जातात. मुलांना आता पूर्वीसारखं सतत स्वच्छतेवरून बोलावं लागत नाही. नवीन येणार्‍या बॅचला आधीच्या वर्गातली मुलं अगोदरच शिस्तीबद्दल, स्वच्छतेबद्दल सांगतात.

सिद्धार्थ गायकवाड हा 'निवांत'मध्ये आलेला पहिला विद्यार्थी. त्याच्याबद्दल सांगाल?

सिद्धार्थला शाळेत उशिरा घातलं गेलं. त्याला तिथे सोडून त्याचे घरचे गेले, ते त्याला न्यायला पुन्हा कधी आलेच नाहीत. नववीत असताना तो अठरा वर्षांचा झाला आणि कायद्यानुसार रस्त्यावर आला. बंडगार्डन रस्त्यावरच्या फूटपाथवर तो राहत होता. उपाशी असला तरी पुढे शिकण्याची त्याची इच्छा होती. माझ्याकडे आल्यावर त्याला आधी मी खाऊपिऊ घातलं. त्याची शाळा पुन्हा सुरू केली. दहावीत त्याला एका अनाथाश्रमात ठेवलं. पन्नास टक्के मिळवून तो उत्तीर्ण झाला. मग पुढचं शिक्षण त्यानं विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वसतिगृहात राहून पूर्ण केलं. 'निवांत'च्या कॅम्पस इंटरव्ह्यूमधून त्याला नोकरी लागली. आज सिद्धार्थ आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहे. संसारात सुखी आहे. त्याचाच मित्र शेटीबा. संपूर्ण दृष्टिहीन. दहावीनंतर तो 'निवांत'ला येऊ लागला. महाविद्यालयीन शिक्षण त्यानं पूर्ण केलं आणि चांगली नोकरीही मिळवली. त्याची बायकोही अंध आहे, त्यांना एक गोड मुलगी आहे.

सिद्धार्थ आणि शेटीबा यांच्यासारखेच आहेत सगळे 'निवांत'मध्ये. कुलदीप रावलनं राज्यशास्त्रात एम.ए. केलं आहे. संगीत विशारद आहे तो. आमची लायब्ररी सांभाळणारी वृषाली पानसरे एम.लिब. झाली, मग पुढे एम.फिल. केलं. आता पीएच.डी करते आहे. ती बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी करते. तिचं लग्न झालं आहे मुलांना 'निवांत'मध्ये संगणकप्रशिक्षण देणार्‍या बसवराज संतीकरशी. बसवराज तत्त्वज्ञान या विषयात बारावीला ९५% गुण मिळवून बोर्डात पहिला आला होता. तो सध्या स्टेट बँक ऑफ इंडियात प्रोबेशनरी ऑफिसरच्या पदावर नोकरीला आहे. दोघांनीही 'निवांत'जवळच घर घेतलं आहे. दिवसभर नोकरी करून दोघंही संध्याकाळी 'निवांत'मध्ये येऊन आपापल्या जबाबदार्‍या सांभाळतात. संध्या मुरकुटेनं चॉकलेट विभाग सांभाळतासांभाळता बीसीए केलं. आता एमसीए करते आहे. मैथिली चव्हाण मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र हे विषय घेऊन पदवीधर झाली. सध्या जपानी भाषा शिकते आणि कोंढव्यातल्या एका कंपनीत नोकरी करते. 'निवांत'ची मुलं शिक्षक आहेत, वकील आहेत, संगणकक्षेत्रात आहेत, बँकेत आहेत, कारखान्यांमध्ये काम करतात, 'सह्याद्री'सारख्या रुग्णालयात लिफ्ट ऑपरेटर म्हणून काम करतात. दोन हजार अंध मुलं आज अशी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत.

HDA2014_team_nivant_3.jpg

'निवांत' सुरू झालं, तेव्हा मुलांच्या अभ्यासाचा प्रश्न अधिक बिकट होता का?

'निवांत' सुरू झाल्यानंतरच्या काळात अभ्यासाचे लढे जगावेगळे होते. पुस्तकं नाहीत, कॅसेट्‌स्‌ नाहीत. विषय मुळातच समजलेले नाहीत, साध्यासोप्या मराठी शब्दांचे अर्थही ठाऊक नाहीत, अशा अनेकांना शिक्षणापासून दूर न होऊ देण्याचं काम मला करायचं होतं. पण मला ब्रेल येत होतं, त्यामुळे माझ्या अन्‌ मुलांमध्ये जवळीक निर्माण होऊ शकली.

तुम्ही रोज दहा-बारा तास 'निवांत'मध्ये शिकवता. कला-वाणिज्य शाखांतले बहुतेक सगळे विषय शिकवता. ही शक्ती कुठून मिळते तुम्हांला?

शक्ती कुठून येते, ते काही मला माहीत नाही. पण अगदी सुरुवातीपासूनच इथल्या मुलांना मी शिकवत आले आहे. 'निवांत'च्या आधी मी शिक्षणक्षेत्रातच असल्यानं मला वेगळा अनुभव मिळवण्यासाठी काही करावं लागलं नाही. पण अंध मुलांना शिकवणं वेगळं आहे, हेही खरं. कुणीही यावं आणि या मुलांना शिकवून जावं, असं घडणं शक्य नाही. या मुलांना त्यांच्या वेगानं शिकवावं लागतं. त्यांच्या अडचणी समजून घ्यायला लागतात.

मुलं अकरावीत इथे येतात तेव्हा अनेकांची शब्दसंपदा तोकडी असते. ती दहावी-बारावीपर्यंत मराठी माध्यमात शिकलेली असतात. त्यांची नाळ इंग्रजी भाषेशी जुळलेली नसते. विषयांचा पाया पक्का नसतो. तिथपासून माझ्या शिकवण्याला सुरुवात होते. मी मुलांसाठी शब्दकोश तयार केला आहे. ब्रेलमध्ये. त्यांना वापरता येईल असा सुटसुटीत. मुलं शब्दांपासून सुरू करतात आणि स्वतंत्रपणे मोठी वाक्यं तयार करण्यापर्यंत प्रगती लगेच करतात. पण यासाठी खूप वेळ मात्र द्यावा लागतो.

कॉलेजात या मुलांना इतका वेळ देऊन शिकवणं प्राध्यापकांना शक्य नसतं. जेमतेम ४५ मिनिटांचा एक वर्ग असतो. इतक्या मोठ्या वर्गात फक्त अंध मुलांना वेगळं कसं शिकवता येईल? मुलांना फळा दिसत नसतो. डोळस विद्यार्थ्यांना जशी अनेक पुस्तकं उपलब्ध असतात, तशी अंध विद्यार्थ्यांना नसतात. दिसत नसल्यामुळे अनेक संकल्पना समजणं कठीण. उदाहरणार्थ, एक्स अ‍ॅक्सिस आणि वाय अ‍ॅक्सिस ही संकल्पना मुलांना दोन हातांचा काटकोन करून शिकवली, तरच कळते. वर्गात हे कसं शक्य आहे? किंवा 'रो' आणि 'कॉलम' हे मुलांना नुसतं ऐकून कसं कळेल? मी मग मुलांच्या हातात कागद देते आणि त्यांना कागदाच्या उभा-आडव्या घड्या घालायला सांगते. मग त्यांना 'रो' - 'कॉलम'ची संकल्पना समजते. मुलांना शिकवण्यासाठी अशी अनेक शैक्षणिक साधनं मला शोधावी लागली. मानसशास्त्रात एक घंटाकृती वितरण-वक्र शिकवावा लागतो. मी देवघरातली घंटा उचलली. कागदावर एक बोट आणि दुसरं बोट त्या घंटेवर फिरवून मी प्रत्येकाला प्रसामान्य वितरण-वक्र दाखवला. डी.एन.ए.ची रचना दाखवण्यासाठी स्वयंपाकघरातून सांडशी उचलली, तिच्यामध्ये बोटांनी पट्ट्या लावल्या आणि रंगमणी समजावले. मानसशास्त्रामध्ये संपूर्ण मज्जासंस्था अभ्यासली जाते. आता चेतापेशीबद्दल कसं शिकवायचं? पुन्हा हाताचाच वापर केला. हाताची बोटं ताणून तळवा ताठ करून पसरायला सांगायचा. बोटांनीच त्याच्यातल्या बारीक वृक्षिका दाखवायच्या. चित्र दुसर्‍या हाताच्या बोटांनी स्पर्श करून समजावून सांगायचं. तळव्याच्या मध्यावर पेशिकेंद्रक दाखवायचं. हाताची मधली जाड नस म्हणजे अक्षतंतू. टर्मिनल बटन्स् आणि सीमापुच्छ बारीक धागा घेऊन तयार करता येतात.

मानसशास्त्रातला एक किचकट भाग म्हणजे मानसशास्त्रज्ञ आणि त्यांची कार्यं पाठ करायची, त्यांचे सिद्धांत समजून घ्यायचे. मुलांना हे शिकणं कंटाळवाणं वाटे. मग मी एक गंमत केली. प्रत्येक मुलाला एकेका मानसशास्त्रज्ञाची भूमिका दिली. स्पिअरमन, थॉर्नडाइक, थर्स्टन, गिलफोर्ड, कोह, बीने, वेल्शर, फ्रॉइड हे जणू मुलांचे शत्रू होते. पण आता एकेक मानसशास्त्रज्ञ पुढे येऊन आपापलं कार्य, सिद्धांत समजवून सांगू लागला आणि मुलांना विषय समजला. अंतस्रावी ग्रंथी आणि त्यांचं कार्यही मुलं असंच शिकली.

शरीरशास्त्र हा विषय मानसशास्त्राच्या आणि डी.एड.च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे आमच्याकडे बरेच परिश्रम घेऊन आम्ही शरीरशास्त्र शिकण्यासाठी प्रयोगशाळा तयार केली आहे. भरपूर प्रतिकृती आहेत आमच्याकडे. रिडर्स डायजेस्टचं एक 'युवर बॉडी' नावाचं पुस्तक होतं. हे पुस्तक वापरून आणि डॉक्टर-मित्रांच्या मदतीनं मी शरीरशास्त्र शिकले आणि जमेल तसं मुलांनाही शिकवलं. डॉ. सुचेता मंगरूळकर यांनी अनेक रविवार येऊन मुलांना हा विषय शिकवला. डॉ. मीना प्रभु त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमितानं 'निवांत'ला आल्या होत्या. आमच्या मुलांचं शरीरशास्त्र या विषयाचं ज्ञान पाहून त्या चकित झाल्या. 'फर्स्ट इयर मेडिसिनच्या विद्यार्थ्यांइतकं ज्ञान तुमच्या मुलांना आहे', असं प्रशस्तिपत्र त्यांनी आम्हांला दिलं आणि लगोलग याबद्दल एक मोठा लेख लोकसत्तेत लिहिला.

अंध विद्यार्थ्यांना विज्ञानाची भूक असते, ही गोष्ट सुदैवानं मला लवकर कळली. ही भूक शमवणं गरजेचं होतं. डॉ. अरविंद गुप्तांनी विज्ञानप्रयोगांचं एक पुस्तक दिलं होतं, ते फार उपयोगी पडलं. त्यातले स्थापत्यशास्त्रातले, हवेच्या दाबाबद्दलचे प्रयोग कमी खर्चात मुलांना विज्ञान समजवून सांगतात. पुष्पाताई देशपांड्यांच्या 'विज्ञान वाहिनी'नंही आम्हांला मदत केली. २००९ सालापासून दर संक्रांतीला आम्ही 'निवांत'मध्ये विज्ञानदिन साजरा करतो.

HDA2014_team_nivant_5.JPG

तुम्ही कुठले विषय मुलांना शिकवता?

मानसशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भाषा, इतिहास, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, संख्याशास्त्र, लायब्ररी सायन्स, लॉ, कॉस्टिंग, सेक्रेटेरियल प्रॅक्टिस, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आणि बी.एडचे आणि डी.एडचे सगळे विषय मी शिकवते. अकरावीच्या पुढच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि इंग्रजी व मराठी या दोन्ही माध्यमांतून मी शिकवते. कॉलेजनंतर किंवा कॉलेजला जायच्या आधी मुलं 'निवांत'ला येतात आणि आमचा वर्ग भरतो. कधी वर्गात एकच विद्यार्थी असतो, कधी खोली विद्यार्थ्यांनी ओसंडून वाहत असते. काही मुलं बहि:स्थ परीक्षार्थी म्हणून नाव नोंदवतात. त्यांचा सगळाच अभ्यास मी करून घेते.

हे विषय मुलांना शिकवायचे म्हणून मी शिकून घेतले. संगणकाच्या हार्डवेअरबद्दल शिकून घेतलं. मुलांना शरीरशास्त्र शिकवायचं म्हणून रोज प्रतिकृती आणि पुस्तकं हातात घेऊन बसले. नंतर दररोज कोथरूडला डॉ. सुचेता मंगरूळकरांकडे जाऊन बारकाव्यांसहित शरीरशास्त्र शिकून घेतलं. लायब्ररी सायन्स मी हा विषय शिकवणार्‍या प्राध्यापकांकडून शिकले. कॉस्टिंग शिकून घेतलं.

लायब्ररी सायन्सचे विषय तुम्ही वृषालीताईला शिकवायचं म्हणून शिकलात ना?

हो, वृषाली पानसरे बारावीनंतर 'निवांत'ला आली. बी.ए.च्या पहिल्या वर्षापासूनचं सगळं शिक्षण बहि:स्थ विद्यार्थिनी म्हणून करायचं तिनं ठरवलं होतं. तिनं राज्यशास्त्रात फर्स्ट क्लास मिळवला. मग तिनं, आनंदनं आणि मी ठरवलं की, तिनं लायब्ररी सायन्सला प्रवेश घ्यायचा. बरीच खटपट करून, विनवण्या करून तिला टिळक महाराष्ट्र विद्यापीठात प्रवेश मिळाला. ही तिथली लायब्ररी सायन्स हा विषय घेणारी पहिली आणि एकमेव अंध विद्यार्थिनी, तिला शिकवण्याची जबाबदारी माझ्यावर आली. मी मग रोज 'टिमवि'त जाऊन लायब्ररी सायन्स शिकले आणि वृषालीला शिकवलं.

बी.लिब.नंतर तिला करायचं होतं एम.लिब. ते संपूर्ण वर्षं तिच्याबरोबर शिकताना आणि तिला शिकवताना मला श्वास घ्यायला फुरसत मिळाली नाही. हायर सेकंड क्लास मिळवून तिनं इतिहास रचला. पण एवढ्यावरच न थांबता तिनं एम.फिल केलं आणि आतातर ती पीएच.डी करते आहे. जगभरातल्या ब्रेल लायब्रर्‍यांची स्थिती, विविध देशांतल्या अंध विद्यार्थ्यांना मिळणार्‍या सुविधा, भारतातली स्थिती, पुण्यातल्या अंधांसाठीच्या सोयी यांचा अभ्यास करून अंधांचं जगणं सुखकर कसं करता येईल, याचा ती अभ्यास करते आहे.

HDA2014_team_nivant_4.JPG

तुम्ही मघाशी ब्रेल लिपीचा उल्लेख केला. ब्रेल लिपी शिकण्याचा अनुभव कसा होता?

ब्रेल शिकणं ही प्रक्रिया सुरुवातीला मला अत्यंत अवघड वाटायची. ही लिपी शिकताना माझे अतोनात हाल झाले. मग हळूहळू लिहिणं जमू लागलं, पण वाचन वैताग द्यायचं. ब्रेल कॉन्ट्रॅक्शननं मला खूप दमवलं. ब्रेल कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय? पटापट लिहिता यावं म्हणून डोळस माणसं शॉर्टहॅण्ड वापरतात. ब्रेल लिखाण फार लांबलचक असतं. लिहायला खूप वेळ लागतो. मुलांना वर्गात डोळस मुलांच्या बरोबरीनं लिहिता यावं, म्हणून ब्रेल कॉन्ट्रॅक्शन शिकवलं जातं. खरंतर कॉन्ट्रॅक्शन मुलांनी नीट शिकून घेतलं तर खूप फायद्याचं आहे.

मी अशा काही अंधशाळा बघितल्या आहेत, जिथे शिक्षकांनाच ब्रेल नीट वाचता येत नाही.

दुर्दैवी आहे हे. मुलांना जगण्यासाठी सक्षम करणं हे शिक्षकाचं काम आहे. जर शिक्षकच सक्षम नसेल, तर कसं होणार? शिक्षकांना ब्रेल आलंच पाहिजे. जर शिक्षक मुलांमध्ये ब्रेलची आवड निर्माण करू शकला नाही, तर पुढच्या आयुष्यात विद्यार्थी तग कसा धरू शकतील?

HDA2014_team_nivant_6.JPG

उच्चशिक्षणासाठी ब्रेल लिपीतली पुस्तकं उपलब्ध करून देणं हे युगप्रवर्तक म्हणता येईल असं काम 'निवांत'नं केलं. त्याची सुरुवात कशी झाली?

आमच्या डी.एड.च्या पहिल्या बॅचमध्ये सुधीर शेंडे नावाचा विद्यार्थी होता. ब्रेलमध्ये आपण पुस्तकं लिहावीत, ही कल्पना त्याची. तो आणि मी तासन्‌तास हातानं पुस्तकं लिहीत बसायचो. सुरुवात रंजना फडके यांच्या 'स्पंदन' या काव्यसंग्रहानं झाली. मग संदीप खरेचं 'मौनाची भाषांतरे' ब्रेलमध्ये केलं. नंतर अनेकांनी ब्रेलमध्ये पुस्तकं लिहायला देणग्या दिल्या आणि मुलांनी ब्रेल पुस्तकं लिहून हजारो रुपये कमावले, स्वत:चं शिक्षण पूर्ण केलं. सुधा मूर्ती, मीना प्रभु, नारायण सुर्वे, विंदा करंदीकर अशा अनेक साहित्यिकांची पुस्तकं आम्ही ब्रेलमध्ये लिहिली. विंदा, नारायण सुर्वे 'निवांत'मध्ये आपल्या ब्रेलमधल्या काव्यसंग्रहांच्या प्रकाशनासाठी आले. उद्या सकाळी पुस्तकाचं प्रकाशन करायचं आहे, हे कळल्यावर एका रात्रीत आम्ही पुस्तकाची प्रकाशनासाठी आवृत्ती हातानं लिहून तयार केली आहे. आज वेगवेगळ्या भाषांमधली, वेगवेगळ्या विषयांवरची चार हजार ब्रेल पुस्तकं आमच्या लायब्ररीत आहेत.

सोलापूरचा संजय बैरागी एम.ए., बी. एड. झाला होता. त्यानं नेट-सेट परीक्षाही उत्तीर्ण केली होती, पण अंधत्वामुळे त्याच्यावर अन्याय होत होता. त्याला आमच्या लायब्ररीतली व्यक्तिमत्त्व विकासावरची पुस्तकं वाचायला दिली. 'व्यक्तिमत्त्व संजीवनी' नावाचं पुस्तक पैसे खर्च करून केवळ त्याच्यासाठी तयार करून घेतलं. ते पुस्तक हाती घेताना त्याच्या डोळ्यांत पाणी होतं. असे अनेक अनुभव पुढे येत गेले. ब्रेल साहित्य उपलब्ध होणं हे किती गरजेचं आहे, हे अशा प्रसंगांवरून मला कळलं. आज महाराष्ट्रातली सतरा ग्रंथालयं 'निवांत'नं उभी केली आहेत. आम्ही कुठलंही पुस्तक ब्रेलमध्ये केलं की, या ग्रंथालयांना एक प्रत पाठवली जातेच.

अकरावीनंतरच्या अभ्यासक्रमाचं एकही पुस्तक ब्रेलमध्ये उपलब्ध नव्हतं आणि तुम्ही ही पुस्तकं उपलब्ध करून दिली.

दहावीपर्यंतची ब्रेलमधली पुस्तकं 'नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड', म्हणजे 'नॅब' पुरवत होती. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात 'नॅब' ही पुस्तकं अतिशय कमी किमतीत उपलब्ध करून देत होती. पण हे काम खरंच अफाट होतं. त्यामुळे दहावीनंतरची पुस्तकं उपलब्ध करून देणं त्यांच्या आवाक्याबाहेरचं होतं. खूप विनवण्या करून पुस्तकं छापायची ठरवली, तरी पुण्याला 'टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट'मध्ये किंवा 'नॅब'मध्ये एकदम शंभर प्रती छापून मिळायच्या. त्याचा खर्च अनेकदा लाखांच्या घरात जायचा. एकदा या शंभर प्रती संपल्या, की पुढच्या प्रती कोणी देणगीदार मिळाला तरच काढल्या जायच्या. त्यांची अडचण खरी असली, तरी माझ्याकडेही गरीब, अनाथ मुलं होती. त्यांना शिकण्याची जबरदस्त इच्छा होती, पण पुस्तकांशिवाय त्यांना शिकवणं मलाही शक्य नव्हतं. कॅसेट्‌स्‌ वापरणं हा पर्याय आता तितकासा योग्य वाटत नव्हता.

एमपीथ्री प्लेअर उपलब्ध नव्हते, तेव्हा आम्ही कॅसेट्‌स्‌ वापरत होतो. पण या वापरातही अनेक अडचणी होत्या. अभ्यासक्रम बदलला की त्या कॅसेट्‌स्‌चा उपयोग शून्य. अक्षरश: रद्दीत विकाव्या लागायच्या त्या. अत्यंत मेहनतीनं तयार केलेल्या कॅसेट्‌स्‌ फेकाव्या लागतात, तेव्हा काळजात कळ उठते. अजूनही खेड्यापाड्यांत अशा कॅसेट्‌स्‌चा वापर सुरू आहे. हा वापर अतिशय खर्चिक आणि किचकट आहे. तर, या कॅसेट्‌स्‌ तयार करणं कटकटीची होतं. बाहेरून कॅसेट रेकॉर्ड करून आणणं खिशाला परवडणारं नव्हतं, म्हणून 'निवांत'लाच आम्ही ते काम करायचो. कधी आवाज नीट ध्वनिमुद्रित होत नसे, कधी टेप तुटे, कधी कॅसेट अडकून बसे. बरं, प्रत्येक वर्षासाठी खूप कॅसेट्‌स्‌ लागत. फक्त बारावीच्या अभ्यासक्रमाच्या ५१ कॅसेट्‌स्‌ होत्या. पण आमच्यासमोर दुसरा मार्गही नव्हता. बारा वर्षांत आम्ही अकरावीपासून ते एम.ए. - बी. एड. - डी. एड.पर्यंतच्या अभ्यासक्रमांच्या कॅसेट्‌स्‌ तयार केल्या. एका कॅसेटची किंमत वीस-पंचवीस रुपये असायची. एका विद्यार्थ्याला कॅसेट्‌स्‌ द्यायच्या झाल्या तर दोन-अडीच हजार रुपये कमीत कमी लागत. मुलं कसेबसे पैसे जमा करत. पण या कॅसेट्‌स्‌ ऐकायच्या कशा आणि कुठे? त्यात भारनियम. उन्हाळ्यातच परीक्षा. दिवे गेले की अभ्यास कसा करणार? इथे दोन वेळच्या जेवणाला पैसा नाही, आणि त्यात हा जास्तीचा खर्च. मग मुलांनी शिक्षण सोडलं तर त्यांचा काय दोष? पण या कॅसेट्‌स्‌ वापरूनच माझी अनेक मुलं शिकली, नोकरीला लागली.

समाज काय करतो, सरकार अंधांसाठी काहीच का करत नाही, अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपणच उठावं आणि कामाला लागावं, हे मी ठरवलं होतं. पुस्तकं मिळणं हा अंध विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्क होता. सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणेच त्यांनाही पाठ्यपुस्तकं, नोट्‌स्‌, मार्गदर्शिका, संदर्भग्रंथ यांची गरज असते. हातानं किती आणि कधी लिहीत बसणार? सगळी शक्ती त्यातच खर्ची पडायची. एकंदर निराशाजनक परिस्थिती होती. अशावेळी रोटरी क्लबच्या मंदार गर्दे या अध्यक्षांनी मला ब्रेल-प्रिंटर (एम्बॉसर) मिळवून देण्याची तयारी दाखवली. मी आनंदानं नाचायचेच फक्त बाकी होते. आमचे अर्ज अमेरिकेला गेले. मधल्या काळात हस्तलिखितं आणि 'टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट'ची पुस्तकं एकत्र करून रोटरी क्लब ऑफ वेस्टएंडनं आम्हांला लायब्ररी उभी करून दिली होती. दीडेक वर्ष वाट पाहायला लावून एकदाचं एम्बॉसर 'निवांत'ला आलं.

या एम्बॉसरवर इंग्रजी पुस्तकं छापणं तसं कठीण नव्हतं. आमच्याकडे 'विन ब्रेल' नावाचं सॉफ्टवेअर होतं. त्याच्या मदतीनं एका क्लिकवर संपूर्ण वर्ड फाईल ब्रेलमध्ये रूपांतरित व्हायला लागली. जे पान पाठपोट लिहायला आणि प्रुफं तपासायला चाळीस मिनिटं लागायची, तसंच चुका दुरुस्त करायला अजून वीस मिनिटं लागायची, तेच काम आता अर्ध्या मिनिटात होत होतं. चुकाही नव्हत्या. पण मराठीची समस्या अजूनही तशीच होती. ब्रेल येणारी व्यक्तीच फक्त टाईप करू शके. त्यावर उतारा अनेक दिवसांनी मिळाला. मॉड्युलर इन्फोटेकच्या कन्व्हर्टरच्या रूपानं. रोटरी क्लबच्या सदस्यांनी लगेच आम्हांला हे सॉफ्टवेअर भेट म्हणून दिलं. मराठी पुस्तकंही आता छापता येऊ लागली. पण एक मोठी गडबड होती. देवनागरी लिहिताना वेगवेगळे फॉण्ट्‌स्‌ वापरले जातात. त्यांचं 'ओसीआर' (ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन) नीट होत नव्हतं. 'ओसीआर' म्हणजे आपण फोटोकॉपी काढतो तसलाच प्रकार. चित्र समजून सारं पान वाचलं जातं. संगणकाला चित्रावरून इंग्रजी वाचता येतं, पण अजून मराठी वाचता येत नाही. प्रकाशकाच्या कृपेनं जर आम्हांला श्रीलिपीमध्ये पुस्तकाची प्रत मिळाली, तर आम्ही ते पुस्तक छापू शकतो. नाहीतर आजही पुस्तक आम्हांला आधी श्रीलिपीमध्ये लिहून घ्यावं लागतं. एक पान टाईप करण्याचे पन्नास रुपये द्यावे लागतात. साधारण दीडशे पानी पुस्तक छापायचा खर्च पाच-सहा हजार रुपये होतो.

अर्थशास्त्र, संख्याशास्त्र, गणित अशा विषयांची पुस्तकं छापताना वेगळीच समस्या असते. एम्बॉसर वापरून तक्ते छापता येत नाहीत. ते मग वेगळे छापावे लागतात. गणितातली सूत्रं, चिन्हं हेदेखील छापता येत नाहीत. ती वेगळ्या प्रकारे लिहावी लागतात. उदाहरणार्थ, '+' चिन्हासाठी 'पी एल यू एस' असं लिहावं लागतं. अशा एकेक अडचणी असतात. त्यामुळे नवं पुस्तक बाईंड होऊन माझ्या हातात आलं की मला विलक्षण आनंद होतो. मी या पुस्तक छापण्याला 'डिफिकल्ट डिलीव्हरी' म्हणते.

HDA2014_team_nivant_7.JPG

तुम्ही एवढे कष्ट घेतले म्हणूनच एम्बॉसरमुळे तुम्ही कितीतरी मुलांपर्यंत पोहोचू शकलात.

आमच्याकडे एम्बॉसर आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पुस्तकांच्या गरजा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू शकलो. एम्बॉसरबद्दल कळल्यावर मुलं नोट्‌स्‌, पुस्तकं घेऊन येऊ लागली. इतिहास, अर्थशास्त्र, मराठी, तत्त्वज्ञान, पर्यावरणशास्त्र अशा म्हणशील त्या विषयाची पुस्तकं आम्ही ब्रेलमध्ये आणली. डी.एड.च्या, बी.एड.च्या विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा झाला. अभ्यासक्रमही धड छापलेला नसताना आम्ही प्रचंड मेहनतीनं वह्या गोळा केल्या, पुस्तकं जमवली. पैसे देऊन ती श्रीलिपीत लिहून घेतली आणि ब्रेलमध्ये छापली. डी.एड.ची पुस्तकं ब्रेलमध्ये येणं ही अनेकांच्या दृष्टीनं क्रांतिकारक घटना होती. मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण अशा सगळ्या भागांतून सतत या पुस्तकांना मागणी असते. 'मॅडम, एफवायबीएचं हिस्ट्री ब्रेलमध्ये द्या ना करून प्लीज', 'मॅडम, या डोळस मित्रानं हातानं लिहिलेल्या नोट्‌स्‌ आहेत, ब्रेलमध्ये देता का करून?' अशा विनंत्या अजूनही ऐकू येतात. आजवर मी किती इंग्रजी आणि मराठी पुस्तकं छापली याला गणती नाही. वाईट याचं वाटतं की, आपण वंचित आहोत, याचा या मुलांना पत्ताच नव्हता. पुस्तकं न मिळणं, हे वास्तव त्यांनी स्वीकारलं होतं.

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पुस्तकं छापण्याची सुविधा फक्त आमच्या संस्थेतल्या मुलांसाठी नाही. महाराष्ट्रभरातली मुलं आमच्याकडून पुस्तकं नेतात. आम्ही त्यांना सांगतो की, तुमच्या कॉलेजातून पत्र आणा आणि मग आम्ही तुम्हांला पुस्तकं देतो. काही मुलांनी त्यांना आम्ही दिलेले एमपीथ्री प्लेअर विकून टाकले, असंही क्वचित झालं आहे, आणि मग पुन्हा आमच्याकडे आले ते प्लेअर मागायला. अशा काही घटना आमच्या लक्षात आल्यावर आता आम्ही कॉलेजांना सांगितलं आहे की, तुम्ही मुलांना पत्र द्या, आम्ही लगेच त्यांना पुस्तकं देऊ. ही पुस्तकं नंतर तुम्ही आम्हांला न विचारता तुमच्याकडे शिकत असलेल्या इतर अंध विद्यार्थ्यांना दिली तरी चालेल, असंही आम्ही सांगतो. आठ-दहा वर्षांनंतर पुस्तकं खराब झाली की, त्यांना नवी पुस्तकं आमच्याकडून दिली जातात. ही सगळी पुस्तकं विनामूल्य दिली जातात.

पण शालेय अभ्यासक्रमांची पुस्तकं छापताना अजूनही अडचणी आहेत ना?

नक्कीच आहेत. एसएससी आणि एचएससी बोर्डानं आम्हांला बदललेल्या अभ्यासक्रमांची पुस्तकं थोडी आधी उपलब्ध करून द्यावीत, अशी माझी अनेक वर्षांची मागणी आहे. मुळात डोळस पुस्तकं बाजारातच उशिरा येतात. मग त्या पुस्तकांमधला मजकूर टाईप करून आम्हांला ब्रेलमध्ये ती छापावी लागतात. हे सगळं करण्यात बराच वेळ जातो. डोळस मुलांना वर्षाच्या सुरुवातीला पुस्तकं मिळतात, अंध मुलांना पुस्तकं मिळेपर्यंत शैक्षणिक वर्ष संपत आलेलं असतं. हा कसला सामाजिक न्याय? म्हणून मी बोर्डाला विनंती केली होती की, तुम्ही एक कन्व्हर्टर विकत घ्या, तुमच्याकडे प्रत्येक पुस्तकाची सॉफ्टकॉपी असते, तिचा वापर करून ते पुस्तक ब्रेलमध्ये रूपांतरित करा आणि हे सगळं ऑनलाईन उपलब्ध करून द्या, म्हणजे आमचं काम सोपं होईल, आम्ही लगेच पुस्तकं छापून मुलांना ती वेळेत देऊ शकू. पण अजूनही आमची विनंती मान्य केली गेलेली नाही.

खरं म्हणजे ब्रेलमधली पुस्तकं सरकारनं उपलब्ध करून द्यायला हवीत.

हो, पण सरकार अंधांसाठी ब्रेलमधली पुस्तकं तयार करत नाही. सरकार ती जबाबदारी स्वयंसेवी संस्थांवर सोपवून मोकळं झालं आहे. मग आमच्यासारख्या संस्था हे काम जर करत असतील, तर आम्हांला सरकारनं मदत करायला नको का? एक गंमत सांगते, मी जेव्हा आमची ब्रेल लायब्ररी रजिस्टर करायला गेले, तेव्हा मला सांगण्यात आलं की, ब्रेल लायब्ररी रजिस्टर करण्यासाठी मुळात 'ब्रेल लायब्ररी' अशी श्रेणीच अस्तित्वात नव्हती. आता व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी कोणाची? सरकारची. मग हे काम त्यांनी करायला नको का? पण सरकार काही करेल, याची वाट बघत बसलो तर आजचा चंद्र मावळणार नाही आणि उद्याचा सूर्यही उगवणार नाही. जे करायचं ते आपणच केलं पाहिजे. ठरवलं तर आपण स्वर्ग रचू शकतो. त्यामुळे चांगल्या स्वयंसेवी संस्था सरकारी मदतीची वाट बघत बसत नाहीत.

HDA2014_team_nivant_8.JPG

तंत्रज्ञानानं काही गोष्टी किती सोप्या केल्या आहेत...त्यामुळे अंधांचं आयुष्य सुखकर होण्यास मदत झाली, असं तुम्हांला वाटतं का?

तंत्रज्ञानानं अंधांचं आयुष्य सुखकर केलं, हे खरं आहे. ब्रेलच्या वापराशिवाय ही मुलं शिकूच शकत नाही. अगदी उच्चशिक्षण घेतानासुद्धा ब्रेल हवंच. पण नंतर ही मुलं संगणकाचा वापर करायला शिकतात. 'जॉज' या प्रणालीच्या मदतीनं संगणकावर कमांड ऐकून ही मुलं अगदी सहज संगणक वापरतात, इंटरनेट वापरतात. स्काइप आणि जीटॉक वापरतात. 'विन ब्रेल' या सॉफ्टवेअरच्या मदतीनं जर्मन भाषा ब्रेलमध्ये लिहिता येते. त्यामुळे आमचा शिवाजी लोंढे मॅक्सम्यूल्लर इन्स्टिट्यूटच्या जर्मन भाषेच्या सगळ्या परीक्षांमध्ये उत्तम मार्कांनी उत्तीर्ण होऊ शकला. दुसर्‍या वर्षीतर ९० टक्के गुण मिळवून तो पहिला आला. त्यानं इंग्रजी साहित्यात एम.ए. केलं आहे आणि अ‍ॅक्सेंच्युअर कंपनीत तो टेक्निकल ट्रान्स्लेटर म्हणून नोकरी करतो. 'निवांत'मध्ये मुलांना इंग्रजी शिकवतो.

एका बाबतीत तंत्रज्ञानानं आम्हांला मदत करावी, असं मला फार वाटतं. अंध मुलांना संगणकावर टायपिंग नीट जमलं, तर ती स्वत:चे पेपर स्वत: लिहू शकतील. लेखनिकाची गरज भासणार नाही. हल्ली डोळस मुलं अगदी लहान असल्यापासून संगणक वापरायला शिकतात. अंध मुलांनाही लहानपणापासून संगणक हाताळता आला तर बर्‍याच गोष्टी सोप्या होतील. मुख्य प्रश्न सुटेल तो लेखनिकाचा. लेखनिकामुळे त्यांच्या ज्ञानाचं योग्य मूल्यमापन होत नाही. म्हणून तंत्रज्ञान वापरून त्यांनी लिहिलेलं तुम्हांला जर वाचता आलं, तर उत्तम. शिवाय योग्य लेखनिक न मिळणं, ही खूप मोठी समस्या आहे आमच्यासाठी. अगदी सहज, चांगले लेखनिक मिळाले, असं आजवर एकदाही घडलेलं नाही. आतातर असं झालं आहे की, फर्गसन, वाडिया या महाविद्यालयांमध्ये शंभर-दीडशे अंध मुलं शिकतात. कुठून आणायचे लेखनिक त्यांच्यासाठी? लेखनिक म्हणून काम करायला अनेक विद्यार्थी तयार असतातही. पण त्यांनाही त्यांचा अभ्यास असतो, परीक्षा असतात. त्यामुळे याबाबतीत तंत्रज्ञानाची मदत मिळाली, तर फार बरं होईल.

HDA2014_team_nivant_9.JPG

'निवांत'च्या मुलांनी 'टेकव्हिजन' ही कंपनी सुरू केली. त्यांनी करून दाखवलेलं काम खरंच अफाट आहे. त्याबद्दल सांगाल का?

'निवांत'मध्ये कोणीही पाहुणा आला की, आमचा नितीन त्यांना सांगायचा - 'मला सॉफ्टवेअर डेव्हलपर व्हायचं आहे'. सगळा वेळ तो संगणकावर खेळताना दिसे. तो संगणकावर जे काही करायचा, ते पाहून लोकांना अचंबा वाटायचा. संगणक हा त्याचा श्वास होता. त्यानं स्वत:च्या प्रयत्नांनी प्रोग्रॅमिंग लॅंग्वेजेस्‌वर प्रभुत्व मिळवलं होतं. सिद्धांत हा त्याचा जीवलग मित्र. 'रेटायनल पिगमेंटोसा'मुळे दृष्टी गमावलेला सिद्धांत घरच्यांच्या भक्कम पाठबळावर एमसीएम झाला. हे दोघं संगणक-वेडे लढतलढत अनेक गोष्टी शिकले होते. संध्या, संघपाल, विकास बीसीए करतकरत नितीन-सिद्धांतकडून खूप शिकले, स्वत:ही प्रयत्न करत राहिले आणि बीसीएला विद्यापीठात पहिल्या तिनांतही आले. पण मग प्रश्न असा पडला की, यांच्या ज्ञानाचा उपयोग काय? यांचं भविष्य काय? सिद्धांत उत्तम फ्रेंच बोलायचा, इंग्रजीवर त्याचं अफाट प्रभुत्व होतं, पण प्रत्येकवेळी नोकरीसाठीच्या मुलाखतींमध्ये शेवटच्या फेरीत त्याच्या दृष्टिहीनतेमुळे तो नाकारला जायचा. खूप प्रयत्नांनंतर एका सॉफ्टवेअर कंपनीत त्याला नोकरी मिळाली खरी, पण तिथे त्याला दिलेलं काम त्याच्या ज्ञानापुढे, हुशारीपुढे अगदीच किरकोळ होतं.

तेव्हा या मुलांनी स्वत:ची एक सॉफ्टवेअर कंपनी सुरू करावी, अशी कल्पना आनंदच्या डोक्यात आली. योगायोगानं त्याचवेळी सारंग कुलकर्णी - आनंदच्या बहिणीचा मुलगा - अमेरिकेहून भारतात परतला. सारंग 'बोर्डवॉक' नावाच्या एका अमेरिकी कंपनीचा संस्थापक-सदस्य असू्न, या कंपनीचं काम तो भारतात राहून पाहतो. तो सहज 'निवांत'ला आला असताना त्यानं या मुलांना संगणकावर काम करताना पाहिलं. या मुलांमध्ये जबरदस्त क्षमता आहे, हे त्याला लगेच कळलं. या मुलांच्या बौद्धिक क्षमतांचा पूर्ण वापर करायचा, तर त्यांना त्यांच्या योग्यतेचं काम दिलं पाहिजे, असं त्याला वाटलं आणि त्यानं आपल्या कंपनीतर्फे या मुलांना एक प्रोजेक्ट मिळवून दिलं.

'बोर्डवॉक' कंपनीचा एक 'प्रोजेक्ट डेमो' करून देण्याचं काम या मुलांना मिळालं होतं. डेमो म्हणजे फक्त व्हिडिओ किंवा फ्लॅश प्रेझेंटेशन नव्हतं. त्या प्रॉडक्टचं कोडिंग समजून घेऊन त्यानुसार बिझनेस प्रोसेसमधली तीन टेम्प्लेटं तयार करून द्यायची, असं कामाचं स्वरूप होतं. त्यासाठी व्हीबीए, एसक्यूएल सर्व्हर व जावा सर्व्हलेट यांचा वापर करायचा होता. मुलांनी पूर्ण मेहनत घेऊन से‍ल्स्‌ फोरकास्टिंग, बजेट प्लॅनिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट अशी तीन टेम्प्लेटं बनवली. ही टेम्प्लेटं दिसायलाही देखणी होती. पाचजणांच्या ग्रुपात तिघांना अजिबातच दिसत नसलं, तरी संघपालच्या आणि संध्याच्या अंशत: दृष्टी असण्याचा रंगसंगती व बाह्यरूप ठरवायला खूप उपयोग झाला. 'बोर्डवॉक'च्या संकेतस्थळावर या टेम्प्लेटांना स्थान मिळालं.

HDA2014_team_nivant_10.jpg

'बोर्डवॉक' कंपनीला मुलांच्या अंधत्वाबद्दल माहीत होतं का?

नाही, अजिबात नाही. अमेरिकेतले 'बोर्डवॉक'चे जे सीईओ आहेत, त्यांना या मुलांच्या अंध असण्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. 'निवांत'च्या कामानं एक गोष्ट आम्हांला शिकवली आहे की, जगातल्या व्यावसायिक स्पर्धेत टिकून राहायचं असेल, तर अंध म्हणून कुठलीही सवलत मागणं गैर आहे. माझ्या मुलांना प्रत्येक क्षेत्रात डोळसांबरोबर काम करून त्यांच्याइतकंच, किंवा त्यांच्यापेक्षा जास्त कौशल्य दाखवणं गरजेचं आहे. त्यांच्या हातून होणारं काम उत्तमच असलं पाहिजे. कामाचा दर्जा सुधारायचा असेल, तर त्यासाठी लागणार्‍या प्रशिक्षणावर हवा तेवढा खर्च करायला 'निवांत'ची कायम तयारी असते.

'बोर्डवॉक'चे अमेरिकेतले सीईओ श्री. अ‍ॅण्ड्र्यू डंकन भारतात आले होते, तेव्हा सारंग त्यांना आवर्जून 'निवांत'ला घेऊन आला. मुलं संगणकाकडे तोंड करून डेमो देत होती, त्यांची पाठ पाहुण्यांकडे होती. तोपर्यंत श्री. डंकन यांना ठाऊकच नव्हतं की, ही मुलं दृष्टिहीन आहेत. मुलांचे चेहरे पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. त्यांच्याबरोबर आलेल्या सहकार्‍यांनी आणि त्यांनी मुलांना मग खूप प्रश्न विचारले, त्यांच्या ज्ञानाची चाचणी घेतली. मुलांनी एकही चूक न करता प्रत्येक प्रश्नाची बरोब्बर उत्तरं दिली, प्रात्यक्षिकं करून दाखवली. श्री. डंकन यांचं एक वाक्य ऐकून मला भरून आलं. ते म्हणाले, "'बोर्डवॉक'च्या सगळ्या कर्मचार्‍यांना 'टेकव्हिजन'ला घेऊन या, सॉफ्टवेअर रायटिंग कसं मन लावून करायचं, हे सगळ्यांना कळेल." जाताजाता त्यांनी मला विचारलं, "हा प्रोजेक्ट संपला, आता काम पुढे कसं सुरू ठेवणार?" मी हसत म्हटलं, "बिल गेटस्‌ मला मदत करतील, दुसरं अजून कोण मला फंडिंग करणार?" त्यावेळी ते म्हणाले, "दुसरं कोणी कशाला हवं? मी या मुलांना कायम काम देत राहीन." त्यांनी प्रोजेक्टचे पाच हजार डॉलर आधीच दिले होते. आता प्रोजेक्ट चालू ठेवत दरमहा दोन हजार डॉलर मुलांना मिळतात. यांतलेच थोडे पैसे वाचवून मुलांनी त्यांचं प्रशिक्षण सुरू ठेवलं आहे. मध्यंतरी ही मुलं शिकागोला जाऊन आली. दोन आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी त्यांच्या कामाबद्दल पेपर वाचले. आता त्यांच्या कंपनीत त्यांच्या हाताखाली काम करणार्‍यांना उत्तम पगारही मिळतो.

त्यावेळी श्री. डंकन अमेरिकेला परतले ते अतिशय भरावून. त्यांनी ताबडतोब बोनस म्हणून मुलांना दोन हजार डॉलर पाठवले होते. शिवाय एक खास प्रशस्तिपत्र फ्रेम करून मुलांना पाठवलं. हे प्रशस्तिपत्र हाती धरल्यावर आनंदचा अभिमानानं फुलून आलेला चेहरा अजून माझ्या डोळ्यांसमोर आहे.

मुळात 'टेकव्हिजन' हे आनंदकाकांचं स्वप्न होतं ना?

हो, 'टेकव्हिजन' हे आनंदचं स्वप्न होतं. मला तो एकदा म्हणाला होता, "मीरा, या मुलांची स्वत:ची अत्यंत प्रोफेशनली चाललेली कंपनी पाहणं हे माझं स्वप्न आहे. या कंपनीचे मालक ही मुलं स्वत: असतील. ही पाच मुलं म्हणजे संस्थापक-सदस्य; सिद्धांत सीईओ असेल. शे-दीडशे व्यक्ती, ज्यांत दृष्टिहीन जास्तीत जास्त असतील, या कंपनीत काम करतील." 'बोर्डवॉक'चं प्रोजेक्ट मुलांना मिळावं म्हणून त्यानं अफाट धडपड केली. तो दिवसरात्र फक्त याच प्रोजेक्टबद्दल बोलायचा. मुलांना गाडीत घालून अनेकदा सारंगबरोबर मीटिंगला घेऊन जायचा. मुलांच्या काही शंका असतील, तर त्या क्षेत्रातला तज्ज्ञ गाठून मुलांची त्यांच्याशी भेट घडवायचा. मुलांनी लिहिलेल्या ईमेली तपासायचा. दिवसरात्र लॅपटॉपवर बसून, न बोलता मुलांच्या प्रोजेक्टवर लक्ष ठेवून असायचा. मुलं आणि त्यांचे आनंदकाका कित्येक रात्री झोपले नाहीत. एकदा तर आनंदच्या डोळ्यांतून रक्तासारखं लालभडक पाणी वाहायला लागलं जागरणांमुळे.

HDA2014_team_nivant_11.JPG

'टेकव्हिजन'सारखी 'निवांत'ची दुसरी यशोगाथा म्हणजे इथली चॉकलेट फॅक्टरी. तिची सुरुवात कशी झाली?

नीता मुंद्रा ही माझी मैत्रीण. तिला माझ्या कामाबद्दल अर्थातच माहीत होतं. 'निवांत'मधल्या मुली तिला माहीत होत्या. नीलिमा देसाई या माझ्या डॉक्टर मैत्रिणीनं प्रौढ मतिमंदांसाठी 'नवक्षितिज' नावाची एक संस्था स्थापन केली आहे. या संस्थेत नीतानं चॉकलेट मेकिंगचं शिबिर घेतलं होतं आणि त्यामुळे 'नवक्षितिज'ला अर्थार्जनाचं एक नवं साधन मिळालं होतं. असंच एक शिबिर नीतानं 'निवांत'मध्ये घ्यावं, अशी मी तिला विनंती केली आणि तिनं ती लगेच मान्यही केली.

या शिबिराचा अनुभव फार छान होता. ती यायच्या आधी आम्ही सगळी तयारी करून ठेवली होती. फ्रिज पूर्ण रिकामा करून स्वच्छ पुसून घेतला. तिनं आधीच चॉकलेटच्या रेसिप्या वाचायला दिल्या होत्या, त्यांचं आम्ही ब्रेलमध्ये रूपांतर करून ठेवलं. मुलांना खूप उत्सुकता होती चॉकलेटं करायला शिकायची. डबल बॉयलरवर चॉकलेटचा बेस कसा करायचा इथपासून ते मोल्ड्‌स्‌मध्ये चॉकलेट घालणं, त्याला चांद्या लावून रॅप करणं आणि पिशवीत भरणं असं सगळं नीतानं प्रत्येकाला वैयक्तिकरीत्या शिकवलं. तिनं प्रत्येकाला एक पिशवीभरून चॉकलेटं दिली. आयुष्यात इतकी चॉकलेटं 'निवांत'च्या मुलांना कधीही कुणी दिली नव्हती. मुलं अक्षरश: भरावून गेली. तिनं नंतर पुन्हा अशी तीन शिबिरं घेतली. दरवेळी येताना ती भरपूर चॉकलेटं घेऊन यायची.

मग मी मुलांना म्हटलं की, मी तुम्हांला चॉकलेट बनवण्याचं सामान देते, हवी तेवढी चॉकलेटं बनवा आणि खा. सहा महिने मुलांनी उदंड चॉकलेटं केली आणि खाल्ली. एक दिवस एक मैत्रीण 'निवांत'ला मुलांना खाऊ द्यायला आली होती. ती म्हणाली, मीराताई, मला चॉकलेटं विकत हवीत. मी म्हटलं, तशीच घेऊन जा. तर ती म्हणाली, नाही, मला एक किलो चॉकलेटं विकतच हवी. आमचा चॉकलेट-विक्रीचा प्रवास तिथून सुरू झाला. सलीम आणि निशांत तेव्हा बेकरीचा कोर्स करत होते. त्यांना मी किलो-दोन किलो चॉकलेटं बनवायला सांगितली. इन्फोसिसमध्ये आम्ही ब्रेल-कार्डांच्या विक्रीसाठी गेलो होतो. तिथे एका बरणीत चॉकलेटं ठेवली. दहा मिनिटांत सगळी संपली. तिथले कर्मचारी म्हणाले, तुम्ही चॉकलेट बनवण्याचं ट्रेनिंग द्या मुलांना, आम्ही नक्की विकत घेऊ.

मग आम्हांला एका वाढदिवसाच्या पार्टीसाठी चार हजार रुपयांची ऑर्डर मिळाली. या ऑर्डरीनं मुलांच्या चॉकलेट फॅक्टरीची सुरुवात झाली. सल्लू-निशू त्यांना जमतील तशी चॉकलेटं बनवायचे. मुलांच्या डोक्यावर टोप्या आल्या, अंगावर एप्रन आले. मुलांना ऑर्डरी मिळत गेल्या. पण मग लक्षात आलं की, या चॉकलेटांवर चरे होते, त्यांच्यावर चकाकी नव्हती. हे काही ठीक नव्हतं. एक दिवस चॉकलेट बनवणारी मुलं, नीता, आनंद, मी एकत्र बसलो आणि कारणांचा शोध घेतला. मुलं चॉकलेटं डब्यात भरताना एकमेकांवर आपटत होती, म्हणून त्यांच्यावर चरे होते. नीतानं मुलांना चॉकलेटं नाजूकपणे डब्यात कशी भरायची, हे शिकवलं. त्यांच्यावर चकाकी यावी, चॉकलेट नीट विरघळावं, त्यांच्यावर बोटांचे ठसे उमटू नयेत म्हणून योग्य ती तंत्रं शिकवली. पुढे मग काजू - बदाम घालून, वेगवेगळ्या स्वादांची, आकारांची चॉकलेटं आम्ही तयार करत गेलो. व्हॅलेन्टाईन्स्‌ डेला बदामाच्या आकाराची चॉकलेटं असतात. गणपतीच्या वेळी चॉकलेटचे मोदक असतात. चॉकलेटच्या फुलांचा बुके असतो.

चॉकलेटांचं पॅकिंग उत्तम व्हावं, यासाठी मी अनेक डिझाइनं तयार केली. तासन्‌तास बसून ती मुलांना शिकवली. चॉकलेट कागदात रॅप कसं करायचं, हे शिकताना-शिकवताना आम्ही कंचे वापरायचो. खूप मेहनतीनं मुलं हे सगळं शिकली. आज चॉकलेटांच्या चवीबरोबरच मुलांनी केलेल्या पॅकिंगचंही भरघोस कौतुक होतं. आता मुलं तव्हेरा गाडी घेऊन मुंबईला जातात आणि बाजार हिंडून तिथून उत्तम माल घेऊन येतात. आजवर एका पैचाही हिशेब माझ्या मुलांनी चुकवलेला नाही. चॉकलेट फॅक्टरी चालवणं हा 'निवांत'च्या मुलांचा सर्वांत मोठा फंडरेझर आहे. पण यातून मिळालेल्या उत्पन्नाचा एक टक्का ही मुलं इतर गरजवंतांना द्यायला विसरत नाहीत.

HDA2014_team_nivant_12.jpg

इथल्या चॉकलेटांचा दर्जा खरंच उत्तम आहे. वरच्या मजल्यावर असलेल्या फॅक्टरीतही कमालीची स्वच्छता पाळली जाते.

ज्या वस्तू मुलं विकणार असतील, त्या अतिशय सुंदर, नेटक्या, उत्तम डिझाइनच्या असल्या पाहिजेत, यावर माझा कटाक्ष असतो. कुठेही डाग, घाण लागलेले नकोत. काहीही अस्वच्छ नको. यात चुकलात तर 'निवांत'मध्ये क्षमा नाही. तुम्ही अंध असलात तरी या बाबतीत तुम्हांला सवलत मिळणार नाही. बाजारात एखादी वस्तू दीर्घकाळ का विकली जाते? कारण ती उत्तम असते, ती वस्तू तयार करताना गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड केली जात नाही. दयेपोटी ग्राहक एकदाच वस्तू विकत घेईल, पण दर्जा चांगला नसेल तर पुन्हा त्या वस्तूच्या वाटेला जाणार नाही. मी मुलांना नेहमी सांगते की, "आजच्या जगात तुम्हांला टिकून राहायचं असेल, तर स्पर्धेला पर्याय नाही. तुम्हांला दर्जेदार काम करावंच लागेल. डोळसांच्या बरोबरीनं किंवा त्यांच्यापेक्षाही अधिक उत्तम काम तुम्हांला करून दाखवावंच लागेल." आमची मुलं जेव्हा 'निवांत'च्या इतर मुलांना प्रशिक्षण देतात, तेव्हा त्यांनाही डोळस प्रशिक्षकांइतकंच मानधन दिलं जातं. या कामातून मिळणार्‍या पैशातून मुलं स्वत:ची हजारो रुपयांची फी, मेसचं बिल असे खर्च भागवतात.

'सो कॅन वी' या 'निवांत'च्या मुलांच्या क्लबाबद्दल सांगाल का?

हा क्लब 'निवांत'मधून बाहेर पडलेल्या मुलांचा आहे. आजवर इथल्या साधारण दोन हजार मुलांना नोकर्‍या मिळाल्या आहेत. त्यांच्या ऐपतीप्रमाणे दरमहा मुलं काही रक्कम बाजूला काढून ठेवतात. मग अडीअडचणीच्या वेळी लागेल तशी मदत या क्लबाद्वारे दिली जाते. आत्ता गेल्या महिन्यात इथल्या एका मुलीच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. 'निवांत'च्या मुलांनी त्यासाठी चार लाख रुपये उभे केले. जगवलं त्यांनी तिला. मुलं मला सांगून जातात, 'आम्हांला सांगा कोणाला पैशांची गरज असेल तर', नाहीतर इथे देवाजवळ पैसे ठेवून जातात. माझी सगळी मुलं मला 'निवांत'साठी पैसे आणून देतात. आमच्या सुनीता पवारला मागे उत्तम नोकरी मिळाली. तिनं हिंदीत एम.ए. करून नंतर बी.एड केलं. नोकरी मिळाल्यावर पहिल्या महिन्याच्या शेवटी ती 'निवांत'ला आली, आणि माझ्या हातात सात हजार रुपये ठेवले. म्हणाली, "आता मला नोकरी लागली आहे, 'निवांत'च्या एका विद्यार्थ्याचा खर्च आता मी करू शकेन". किती छान आहे हे! माझी दोन हजार मुलं आज त्यांच्यासारख्याच अंध व्यक्तींची काळजी घेतात.

HDA2014_team_nivant_13.jpg

अंध व्यक्तींच्या भावजीवनाकडे कायमच दुर्लक्ष केलं जातं, असं मला वाटतं. याबद्दल तुमचं निरीक्षण काय आहे?

अंध व्यक्तींची रोजच्या जगण्याची लढाईच इतकी कठीण असते की, आपल्याला जोडीदार हवा, हे लक्षात येईपर्यंत उशीर झालेला असतो. त्यांना शारीरिक गरजांची जाण नसते, असं अजिबात नाही, पण ही गरज अर्धवट कळलेली असते. अगदी स्पष्ट सांगायचं तर, शैशवातली वादळं आपल्या आयुष्यात येतात, तशी ती या मुलांच्या आयुष्यातही येतात. मात्र थोडासा फरक आहे. अंध विद्यार्थी शाळेत राहतात, तेव्हा एकमेकांच्या फार जवळ असतात. स्पर्शाचीच भाषा एकमेकांना कळते. ते सतत एकमेकांची साखळी करूनच चालतात. मुलामुलींमध्ये मनमोकळा संवाद होऊ शकत नाही, कारण त्यांच्या शाळा वेगवेगळ्या असतात. मग कधी समलिंगी - तात्पुरतं आकर्षण पूर्ण होतं. मुलामुलींना एकमेकांशी खूप बोलायचं असतं. स्नेहसंमेलनं, एकत्र कार्यक्रम यांच्या निमित्तानं भेटणं होतं. चोरून भेटतानाही ब्रेल-प्रेमपत्र, फोन नंबर दिले-घेतले जातात. शाळेच्या रेक्टरना गंडवून मुलंमुली तासन्‌तास गप्पा मारतात. कॉलेजमध्ये गेल्यावर वेगळ्याच आकर्षणानं भारावून जातात. काही पळूनही जातात, लग्न करतात.

अंध व्यक्तींच्या लैंगिक शिक्षण देणं आवश्यक आहे, असं तुम्हांला वाटतं का?

या मुलांचे लैंगिकतेबद्दल अनेक समज-गैरसमज असतात. कुतूहलही अर्थातच असतं. 'निवांत'मध्ये सुरुवातीपासूनच एक अनुभवलं की, या मुलांशी लैंगिक प्रश्नांबद्दल मनमोकळी चर्चा करणं अत्यंत गरजेचं आहे. शरीरशास्त्र शिकवताना, लैंगिक विपथनं (मानसशास्त्र) शिकवताना खूप मोकळेपणानं चर्चा केल्यावर जाणवलं की, या मुलांमधलं कुतूहल शमवण्यासाठी लैंगिक शिक्षणाची शिबिरं घ्यायला हवीत; या विषयावर मुलामुलींनी एकत्र बसून चर्चा करायला हवी आहे.

'निवातं'नं आयोजित केलेल्या लैंगिक शिक्षणाच्या मेळाव्यात अनेक गुंते सुटत गेले. अज्ञानामुळे आणि अनभिज्ञतेमुळे घडणार्‍या चुकांचं प्रमाण कमी होत गेलं, एकमेकांना फसवणं आणि फसवून घेणंही कमी झालं. मुलामुलींमध्ये शुद्ध, सुंदर मैत्री असू शकते, हेसुद्धा त्यांना कळलं. शारीरिक स्पर्शापलीकडे मनाचं एक नातं असू शकतं, हे त्यांना समजलं. मुलंमुली अजूनही एकमेकांच्या प्रेमात पडतात. निसर्गनियमच आहे तो. पण हे नातं गंभीरपणे पेलण्याकडे, या नात्याची खोली जाणून घेण्याकडे कल खूप वाढला आहे.

'माणूस' म्हणून गरज भागवण्यासाठी केलेल्या तडजोडीत प्रवाहपतितांची संख्या कमी करायची, तर त्यांना 'माणूस' म्हणूनच वागवलं पाहिजे. लैंगिकतेबद्दलही सर्वसामान्य माणसांसारखीच माहिती करून घेण्याचा अंधांचा अधिकार आपण समजून घ्यायलाच हवा. 'उमलत्या कळ्या', 'निरामय कामजीवन' अशी पुस्तकं मुलांना 'निवांत'च्या लायब्ररीत वाचायला मिळतात. सुरुवातीला मुलं चोरून वाचायची. अशावेळी ही पुस्तकं मोकळेपणानं वाचायला दिली की, त्यांचा गुदमरलेला श्वास मुक्त होतो.

अंध व्यक्तींच्या, विशेषत: मुलींच्या, लग्नांबाबत अनेक समस्या असतात.

अंध मुलींच्या लग्नांबाबत समस्या असतातच. मुलगा जन्मांध, अंशतः अंध असो किंवा पूर्ण अंध, अनेकदा त्याला डोळस बायको मिळते. मुलगी मात्र पूर्ण अंध असली काय, किंवा दृष्टिदोषासह जगत असली काय, तिची फार कुचंबणा होते. देखण्या मुलींचीही लग्नं होत नाहीत. आईवडील जात-धर्म-वंश-पंथ या चौकटीतच पूर्ण अडकलेले असतात. आपल्या अंध मुलीलाही भावना असतील, हे त्यांच्या लक्षातच येत नाही. मुलीला अंधत्वामुळे मिळणार्‍या सुविधा लाटण्याकडे काहींचा कल असतो. त्यांची मुलगी पदवीधर झाली रे झाली, की त्यांची अपेक्षा असते त्यांच्या मुलीनं त्यांना पैसे द्यावेत. घरातल्या इतर मुलामुलींची लग्नं ते करून देतात, पण कमावणार्‍या अंध मुलीच्या लग्नाचा विचारही होत नाही. तिनं आपल्याला सांभाळावं, अशी त्यांची अपेक्षा असते. या आणि अशा समस्यांमुळे खरंतर अंध मुलगी बाहेर आधार शोधत राहते, क्वचित वाहवत जाते, फसवली जाते. लैंगिक गरजा अपूर्ण राहणार असतील, तर समलिंगी- संबंध किंवा चुकीच्या मार्गाचा अवलंब या घटना टाळता येणार नाहीत.

'निवांत'मध्ये अनेक लग्नं झाली आहेत. इथेच लग्नं जुळली ही. मी काही या लग्नांच्या विरुद्ध नव्हते आणि नाही. उलट त्यांना त्यांच्या मनासारखे जोडीदार मिळणं, हे माझ्यासाठी आनंददायक आहे. समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर राखायचा, नात्यांचं गांभीर्य जपायचं हे मी मुलांना सारखं बजावत असते. माझी मुलं डेटिंग करतात, एकमेकांना जाणून घेतात आणि लग्नाचा निर्णय फार विचारपूर्वक घेतात. 'निवांत'मध्ये ओळख होऊन लग्न झालेली अनेक जोडपी आहेत. कित्येकांना आता मुलंही झाली आहेत. उगाच वाह्यातपणा करणारेही काही असतात. पण तेही टाळता येणं फारसं शक्य नसतं. शेवटी काय, तुमचं आमचं सेम असतं!

अनेक अंधशाळांमधली मुलं बेशिस्त असतात, असं मी तिथल्या शिक्षकांकडून ऐकलं आहे.

हो, हे खरं आहे. 'मी अंध आहे, म्हणून समाजानं माझी जबाबदारी घ्यावी', असं अनेकांना वाटतं. याला एक दुसरी, दु:खद बाजू आहे. समाजानं आपलं पालनपोषण करावं, असं वाटणार्‍यांना मुळात घरच नसतं. त्यांना आईवडिलांचं प्रेम मिळालेलं नसतं. जिथे आईच माहीत नाही, तिथे तिनं शिस्त लावायचा प्रश्नच येत नाही. आईवडिलांनाही दोष देता येत नाही, कारण त्यांचं आयुष्यही धुळीनं भरलेलं असतं. बर्‍याचशा मुलांचे पालक हे दारिद्र्यरेषेखाली जगणारे असतात. आईला जर रोज सकाळी उठून कामावर जावं लागत असेल, तर ती आपल्या अंध मुलीचा सांभाळ कसा करू शकेल? आईचाही अस्तित्वाचाच लढा आहे. तिच्याही आयुष्यात तिला पदोपदी तडजोडी कराव्या लागतात. अशावेळी अंध मुलगी जन्माला आली की, 'हिला मारून टाकलेलं बरं...', असा विचार आईच्या मनात येतो. मुलगी मोठी झाल्यावर मग तिचा उपयोग काय? आईवडिलांनी वाममार्गाला लावलेल्या अंध मुलींच्या कथा मला माहीत आहेत.

माझ्याकडे आलेल्या अनेक मुली मला सांगतात की, 'आम्ही रात्री कल्पनेतल्या आईच्या कुशीत झोपतो.' त्या आल्या की, मला मिठी मारून तासन्‌तास उभ्या राहतात. त्यांना माझ्यापासून दूर करणं कठीण असतं, जायचं नसतं त्यांना मला सोडून कुठे. त्यांना आईच्या मायेची ऊब हवी असते. आईनं मारावं, खूप रागवावं या इच्छाही पूर्ण झालेल्या नसतात त्यांच्या. त्यांच्या हातून चुका झाल्या की मी त्यांना रागवते. तेवढ्यापुरतं त्यांना वाईट वाटतं, पण दुसर्‍या दिवशी त्याच प्रेमानं त्या 'निवांत'ला येतात. इथे कुणीतरी आपली वाट पाहत आहे, हे त्यांना माहीत असतं. आपल्या आईला नसेल आपल्याबद्दल प्रेम, पण या बाईला आपण चांगलं वागावं, असं वाटतं, हे मुलं लक्षात ठेवतात. माझा अनुभव असा की, मी ज्या मुलांना खूप रागवले, वळण लावायचा प्रयत्न केला, ती मुलं माझ्यावर जास्त प्रेम करायला लागली.

तर ते असो. आपण अंध मुलांच्या शिस्तीबद्दल बोलत होतो. काही अंध मुलं उद्धट, आक्रमक असतात, कारण एकतर त्यांना अजिबात काही मिळालेलं नसतं, किंवा मग खूप काही मिळालेलं असतं. श्रीमंत घरांमधली अंध मुलं अतिशय सुरक्षित वातावरणात वाढलेली आणि म्हणून शामळू असतात, असं माझं निरीक्षण आहे. त्यांनाही घराबाहेर जगता येत नाही. म्हणून पालकांना शिस्त, प्रेम, काळजी यांचा सुवर्णमध्य गाठता यायला हवा. आपल्या अंध मुलांची डोळस व्यक्तीप्रमाणे दिनचर्या असेल, याची त्यांनी काळजी घ्यायला हवी. रोजची आवरासावर, अभ्यास, नोकरी, स्वयंपाक करणं हे सारं सांभाळताना वेळेचं भान ठेवणं, सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे त्यांना वावरू आणि वागू देणं खूप महत्त्वाचं आहे. पालकांनी मुलांच्या हातात पाण्याचा ग्लास आणून दिला आणि त्यांना सकाळसंध्याकाळ भरवलं, तर ते परावलंबी होणारच. मग या मुलांच्या भविष्याचं काय? पालक नसल्यावर ही मुलं काय करतील? काही मुलांचे आईवडील चांगले असतात. मी समजावून सांगितलेलं ते ऐकतात. आत्ता अशा पालकांचं अस्तित्व हळूहळू जाणवायला लागलं आहे. आधीच्या पालकांबद्दल न बोललेलंच बरं.

एखादी गोष्ट 'मिळणं' आणि 'न मिळणं' यांमुळे किती फरक पडतो, नाही?

एकदा एका सॉफ्टवेअर कंपनीतून फोन आला, "मीरामॅम, आमच्या कर्मचार्‍यांनी 'निवांत'च्या मुलांच्या इच्छा पूर्ण करायचं ठरवलं आहे, त्यांची विशलिस्ट पाठवा". बूट, चपला, मेकअप बॉक्स्‌, हॅवरसॅक्स्‌, गळ्यातलं, कानातलं, अंगठ्या, खेळातली कार, बाहुली, दोन जीबीचं पेन ड्राईव्ह असं सारं यादीत अवतीर्ण झालं. मी खिन्नपणे, सुन्नपणे त्या यादीकडे बघत राहिले. या मुलांना कोणी जुने किंवा घरातल्या मृत व्यक्तीचे कपडे दिले होते, कोणी नवीन कपडे दिले होते. पण त्यांना त्यांच्या आवडीचं काहीच मिळालं नव्हतं. किती वेगवेगळ्या इच्छा असतात माणसाला? अगदी टिकल्यासुद्धा मागितल्या होत्या काही मुलींनी. 'निवांत'च्या सुरुवातीच्या दिवसांत एकदा आनंदनं मुलांना त्यांची विशलिस्ट तयार करायला सांगितली होती. मुलांनी त्यावेळी जीवनावश्यक वस्तू फक्त मागितल्या होत्या. काहींनी औषधंही मागितली. आनंद त्यांना म्हणाला, "अरे, हे तर तुम्हांला मी देईनच रे! दुसरं काहीतरी मागा ना!" दुसरं काहीतरी आवडणारं मागता येतं, हेच मुलांना कळलं नव्हतं.

मुळात हक्काचं असलेलं शिक्षणच नाकारलं गेल्यावर इतर काही हवं असणं दुय्यम होत असेल.

आमच्या दिव्यांशू गणात्रानं प्रचंड लढा देऊन मानसशास्त्रात एम.ए. करून सुवर्णपदक मिळवलं. पण त्याला मुळात प्रवेश मिळावा म्हणून मला, त्याच्या कुटुंबीयांना झगडावं लागलं. मी कुठे कुठे पुरी पडणार? भाषांतराचा डिप्लोमा असो, नृत्यशाळेत अ‍ॅडमिशन असो, कॉम्प्यूटर सायन्सचा कोर्स असो किंवा इतर कुठलाही अभ्यासक्रम - प्रवेशासाठी लढा ठरलेलाच आहे. प्रवेश मिळाल्यावर मुलं जेव्हा वर्गात पहिली येतात किंवा डोळस मुलं त्यांच्या पेपरमधून कॉपी करायचा प्रयत्न करतात, तेव्हा मग त्यांना नाकारणार्‍यांचे डोळे उघडतात. प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी असा लढा देणं खूप त्रासाचं आहे. हा अन्याय कधी संपेल, कोण जाणे!

HDA2014_team_nivant_14.jpg

समाजाची अंधांच्या बाबतीत वागणूक कशी असावी, असं तुम्हांला वाटतं? अंधांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावं, यासाठी दोघांचीही वागणूक कशी असावी?

विंदा करंदीकरांचं एक वाक्य कायम माझ्या स्मरणात असतं - 'ज्याला बुद्धी आहे तो अंध नाही, ज्याला बुद्धी असूनही तो ती वापरत नाही तोच खरंतर...' पण समाजात 'अंध' आणि 'डोळस' या दोन शब्दांचे वेगळे अर्थ आहेत. कोणालाही अंध-अपंग म्हणवून घ्यायला, जगायला आवडत नसतं. समाजानं अंधांना भीक देण्याऐवजी त्यांना शैक्षणिक साधनं पुरवावीत. डोक्याला विचार आणि हाताला काम मिळालं, तर तेही समाजाचा उत्पादक घटक होतील. अंधांना मदत करावी, पण त्या मदतीमुळे ते दुर्बल होऊ नयेत. अनेकदा अतिरिक्त मदतीमुळे अंधांच्या मनात विनाकारण न्यूनत्वाची किंवा श्रेष्ठत्वाची भावना निर्माण होते. अंध व्यक्तींची कोणी 'सेवा' करू नये. त्यांना नोकरी द्यायची असेल, तर ती त्यांची पूर्ण क्षमता तपासूनच द्यावी. अंधत्वामुळे कोणीही कोणाला सवलत देऊ नये, सवलत घेऊ नये. अंधांना अनेकदा देणगीच्या स्वरूपात महागडी साधनं मिळतात. त्यांना या वस्तूंची किंमत कळायला हवी. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही जर अंध व्यक्तींना पैसे देत असाल, तर त्या पैशाचा वापर कसा होतो, याकडे लक्ष द्यायला हवं. पैसे दिले, दान दिलं आणि काम संपलं, असं होत नाही. त्या व्यक्तीशी तुम्ही बोला, तिला शक्य असल्यास तुमच्या घरी बोलवा. समाजाच्या मुख्य धारेत त्यांना आणायचं असेल, तर त्यांना माणूस म्हणून वागवलं पाहिजे. आपण प्रत्येकानं निदान एका अंध-अपंग व्यक्तीला माणूस म्हणून बरोबरीनं वागवलं, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना सहकार्य केलं, तर 'अपंगत्व' किंवा 'अंधत्व' या समस्या म्हणून गणल्या जातील, असं मला वाटत नाही.

शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्क आहे. अंधांना शिक्षण नाकारणं हा सामाजिक न्याय नव्हे. त्यांना सर्वसामान्य शाळांमध्ये सहज प्रवेश मिळावा. त्यांना ब्रेल शिकवणं, मोबिलिटी शिकवणं यांसाठी विशेष प्रशिक्षकांची सोय असावी. त्यांना महाविद्यालयांनी प्रवेश नाकारू नये. अंध व्यक्तींच्या क्षमतांबाबत ग्रामीण भागांत जागृती होणं अत्यावश्यक आहे. अंधश्रद्धा आणि अंधविश्वास यांमुळे अंधांचं जगणं कठीण होऊन बसतं. त्यांचं अस्तित्व म्हणजे गेल्या जन्मीचं पाप, अशी समजूत असते.

इतक्या अडचणींतून मार्ग काढत तुमचा प्रवास सुरू आहे. इतकं झोकून देऊन काम करणं तुम्हांला कसं जमलं?

आजही अडचणी तशाच आहेत. फक्त त्यांच्याकडे पाहण्याची माझी 'नजर' बदलली आहे. ब्रेल शिकायच्या आधी मी अंधाराशी जुळवून घ्यायचा खूप प्रयत्न करायचे. रस्त्यानं चालताना, घरात वावरताना मी डोळे मिटून चालायचे. माझ्या मुलांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी मी त्यांचं जग अनुभवत होते. गंमत सांगते, चालताना मी रस्त्याच्या मध्यात आलेले असायचे, कधीकधी खड्ड्यांच्या तोंडाशी उभी असायचे आणि मला दरदरून घाम फुटलेला असायचा. घरात मी बेडरूमच्या दाराऐवजी चाचपडत स्विचबोर्डाकडे वळायचे. आपल्याला, डोळस माणसांना, जगातले अनंत धोके माहीत असतात आणि म्हणून अंधाराशी मैत्री करणं अवघड जातं. माझ्या प्रयोगांमुळे मला अंधाराचं आणि माझ्या मुलांचं जग जवळचं वाटायला लागलं. त्यांच्या जगात शिरूनच त्यांचे प्रश्न सोडवता येतात, ही जाण आली. या क्षेत्रात काम करायचं, तर काठावर उभं राहून पोहायला शिकवणं कुचकामी आहे, प्रत्यक्ष पाण्यातच पडलं पाहिजे. हा मी मांडलेला प्रपंच आहे. त्यात समरसून काम करणं, झोकून देऊन काम करणं याला दुसरा पर्यायच नव्हता.

आज 'निवांत'बद्दल विचार करताना काय वाटतं?

'निवांत'च्या मुलांना आयुष्यात संघर्षाशिवाय खरंतर काहीच मिळालेलं नाही अन्‌ संघर्ष करण्याशिवाय त्यांना दुसरं काही करता येत नाही. जगण्याचा संघर्ष, शिकण्याचा संघर्ष, लेखनिक मिळवणं, नोकरी मिळवणं, घर मिळवणं...एकही गोष्ट संघर्षाशिवाय नाही. त्यांना 'निवांत'मध्ये सन्मानानं जगणं शिकता आलं, सन्मानानं जगता आलं. मला त्यांच्या करिअरबद्दलच्या आशाआकांक्षा लक्षात घेता आल्या. वाईट एका गोष्टीचं वाटतं, कधी त्यांच्या छोट्याछोट्या इच्छांचा स्वतंत्रपणे विचारच करता आला नाही.

'निवांत' सुरू केलं, तेव्हा 'मी कोण?' हा प्रश्न मला पडला होता. आजही मी या प्रश्नाचं उत्तर शोधते आहे. पण आता वाटतं, कशाला वर्षांची, दिवसांची गणितं मांडायची? अजून खूप काम बाकी आहे. अस्तित्वाचे मूलभूत प्रश्न समजले आहेत. या प्रश्नांना आत्ताशी कुठे मी हात घातला आहे. अजून खूप वाट चालायची आहे. गेल्या सतरा-अठरा वर्षांत खूप मुलं माझ्या आयुष्यात येऊन गेली. मला बरंच काही शिकवून गेली. 'निवांत'चं अंधांना परिपूर्ण जगण्यासाठी मदत करायला पाहिलेलं स्वप्न कधीच विरणार नाही, याची काळजी ही माझी मुलं घेतात.

'निवांत' हे आता त्यांचं घर आहे. या घरावर त्यांचा हक्क आहे. मुलं घरभर काम करत असतात. दरवाजाला कधीच कुलूप नसतं. त्यांच्या स्कॉलरशिपच्या, नोकरीच्या अर्जांवर पर्मनंट पत्ता आहे -

निवांत अंध मुक्त विकासालय
सर्व्हे नं. ३३/१, प्लॉट नं. ७५
विद्यानगर, पुणे - ४११०३२

HDA2014_team_nivant_15.JPG



HDA2014_separator_blue.jpg

चित्रांचे तपशील -
चित्र क्र. १ - निवांत अंध मुक्त विकासालय, पुणे, © निवांत अंध मुक्त विकासालय, पुणे.
चित्र क्र. २ - श्रीमती मीरा बडवे, © निवांत अंध मुक्त विकासालय, पुणे.
चित्र क्र. ३ - २०११ सालची बारावी यशस्वीपणे उत्तीर्ण केलेली बॅच, © निवांत अंध मुक्त विकासालय, पुणे.
चित्र क्र. ४ - 'सुनों गौर से दुनियावालों, © निवांत अंध मुक्त विकासालय, पुणे.
चित्र क्र. ५ - टाटा याझाकी कंपनीत काम करताना श्री. शेटीबा, © निवांत अंध मुक्त विकासालय, पुणे.
चित्र क्र. ६ - मानवी शरीरशास्त्र समजवून सांगताना एक विद्यार्थिनी, शेजारी मीराताई, © निवांत अंध मुक्त विकासालय, पुणे.
चित्र क्र. ७ - मीराताईंचा 'निवांत'मधला वर्ग, © निवांत अंध मुक्त विकासालय, पुणे.
चित्र क्र. ८ - आपल्या ब्रेलमधल्या काव्यसंग्रहांच्या प्रकाशनसमारंभासाठी 'निवांत'मध्ये आलेले श्री. विंदा व सौ. सुमा करंदीकर, © निवांत अंध मुक्त विकासालय, पुणे.
चित्र क्र. ९ - 'निवांत'मधली ब्रेल लायब्ररी, © निवांत अंध मुक्त विकासालय, पुणे.
चित्र क्र. १० - अकरावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवताना श्री. शिवाजी लोंढे, © निवांत अंध मुक्त विकासालय, पुणे.
चित्र क्र. ११ - 'निवांत'मधला संगणक प्रशिक्षण वर्ग, © निवांत अंध मुक्त विकासालय, पुणे.
चित्र क्र. १२ - 'बोर्डवॉक' कंपनीकडून 'टेकव्हिजन'ला मिळालेलं प्रशस्तिपत्र, © निवांत अंध मुक्त विकासालय, पुणे.
चित्र क्र. १३ - चॉकलेटचा ताजमहाल, © निवांत अंध मुक्त विकासालय, पुणे.
चित्र क्र. १४ - 'निवांत'मधली चॉकलेट फॅक्टरी आणि चॉकलेटं, © निवांत अंध मुक्त विकासालय, पुणे.
चित्र क्र. १५ - 'निवांत'मधलं रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण, © निवांत अंध मुक्त विकासालय, पुणे.
चित्र क्र. १६ - ज्युदोची प्रात्यक्षिकं, दोरीवरचा मल्लखांब आणि स्केटिंगमध्ये बक्षीस मिळवलेले मारुती व सलीम, © निवांत अंध मुक्त विकासालय, पुणे.
चित्र क्र. १७ - टीम निवांत, © निवांत अंध मुक्त विकासालय, पुणे

Team-niviant.jpg

'निवांत अंध मुक्त विकासालया'चा संपूर्ण प्रवास मीराताईंनी 'टीम निवांत' या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे. प्रत्येकानं वाचावंच असं हे पुस्तक आहे. हे पुस्तक मायबोलीच्या खरेदी विभागात उपलब्ध आहे

HDA2014_darkbluefooter.jpg
related1: 

HDA2014_separator_blue.jpg

HDA2014_kandil1.jpg

HDA2014_separator_blue.jpg
चिन्मय दामले
HDA2014_silhouette_boy.jpg

HDA2014_separator_blue.jpg

HDA2014_NuggetThai.jpg
HDA2014_separator_blue.jpg

प्रतिसाद

प्रतिसादाला शब्द नाहीत!

लाँग लिव्ह मीराताई अँड टीम निवांत!

सुंदर मुलाखत..!
हॅटस ऑफ टु मीराताई!

खरच, हॅट्स ऑफ टू मीराताई आणि टीम. प्रत्येक वाक्यातून त्यांचि धडपड, तळमळ जाणव्ते आहे. निवांतच्या मुलांचही खूप कौतुक..

शब्दांपलीकडे. मीराताईंबद्द आणि तेथे शिकलेल्या आणि शिकणार्‍या मुलांबद्दल कौतुक, अभिमान वाटतोच पण मनापासून सलाम. मुलाखत छान झाली आहेच. पण चिनूक्स ह्यांची ओळख करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

+१

निःशब्द. कुठेही तडजोड/ चालवून घेण्याची मनोवृत्ती नाहीच, एक व्यक्ती एका जन्मात काय काय क्षेत्र explore करू शकते, खरे आई-बाप आहेत ते या सर्व परिवाराचे. ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद चिन्मय.

अतिशय सुंदर झाला आहे संवाद. धन्य आहेत मीरा ताई.

अतिषय सुंदर मुलाखत

सौ. मीराताई व श्री. आनंदराव - केवळ ग्रेट ...
तुमच्या कार्याला सलामच ....
निवांतच्या मुलांचेही अपरंपार कौतुक - किती जिद्दी असावे याचे साक्षात उदाहरण.
श्री चिनूक्स यांना मनापासून धन्यवाद.

मुलाखत आवडली.

आपण उपेक्षित आहोत, अशी भावना घालवून टाकणं हे खूप महत्त्वाचं आहे, मीराताई असा मुळापासून प्रयत्न करतात हे फारच आवडलं.

हा दिवाळी संवाद हा दिवाळी अंकाचा हायलाइट आहे माझ्यामते. फारच सुरेख झाली आहे मुलाखत. निवांत च्या टीमचं काम खरतर "निवांत" या नावाच्या विरुद्धार्थी आहे. सतत नवनव्या गोष्टींमध्ये व्यग्र असणार ही टीम. एका अवचित झालेल्या अंधशाळेच्या भेटीमुळे इतकं मोठं कार्य उभं राहिलं आणी चालू आहे हे खरोखर अमेझिंग आहे.

काय बोलू? मीराताईंचं कार्य असामान्यांच्याही पलिकडे काही असेल तर ते आहे. एक व्यक्ती स्वतःच्या समर्पणाने अनेकांची आयुष्य उजळवून टाकते..हेच खरं चक्रवाढ व्याज मिळवत जगणं. दिव्यत्वाची जेथ प्रचिति तेथे कर माझे जुळती _/\_

नेहमीप्रमाणेच सुंदर मुलाखत!
इतकं मोठं काम करत आहेत मीराताई... शब्दच नाहीत. एक वेगळीच ऊर्जा मिळतेय मुलाखत वाचल्यावर.

चिनूक्स, तुझी नेहमीच कमाल वाटते. किती किती लोकांना ओळखतोस, तुझ्या सशक्त लेखणीतून त्यांच्याशी आमची भेट घडवतोस.. ग्रेट आहेस!