भक्तिगीत

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा
मन माझे केशवा का बा न घे

सांग पंढरीराया काय करु यांसी
का रूप ध्यानासी न ये तुझे

किर्तनी बैसता निद्रे नागविले
मन माझे गुंतले विषयसुखा

हरिदास गर्जती हरिनामाच्या किर्ती
नये माझ्या चित्ती नामा म्हणे

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

त्या फुलांच्या गंधकोषी

त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का ?
त्या प्रकाशी तारकांच्या, ओतिसू तू तेज का ?
त्या नभाच्या नीलरंगी, होउनीया गीत का
गात वायूच्या स्वराने, सांग तू आहेस का ?

मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का ?
वादळाच्या सागराचे घोर ते तू रुप का ?
जीवनी या वर्षणारा, तू कृपेचा मेघ का ?
आसमंती नाचणारी, तू वीजेची रेघ का ?

जीवनी संजीवनी तू माउलीचे दुग्ध का ?
कष्टणाया बांधवांच्या रंगसी नेत्रात का ?
मूर्त तू मानव्य का रे ? बालकाचे हास्य का ?
या इथे अन त्या तिथे रे, सांग तू आहेस का ?

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

तुझे गीत गाण्यासाठी

तिन्ही लोक आनंदाने भरुन गाउ दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावूं दे रे ॥ धृ ॥

शुभ्र तुरे माळून आल्या, निळ्या निळ्या लाटा
रानफुले लेवुन सजल्या, या हिरव्या वाटा
या सुंदर यात्रेसाठी, मला जाउ दे रे ॥ १ ॥

मोर केशराचे झुलती पहाटेस दारी
झर्‍यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी
सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहु दे रे ॥ २ ॥

शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे
तुझे प्रेम घेउन येती गंधधुंद वारे
चांदण्यात आनंदाच्या मला न्हाउ दे रे ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

तुझ्या कांतिसम रक्तपताका

तुझ्या कांतिसम रक्तपताका, पूर्वदिशी फडकती
अरुण उगवला प्रभात झाली, ऊठ महागणपति ॥ ध्रु ॥

सूर्याआधी दर्शन घ्यावे, तुझे मूषकध्वजा
शुभद सुमंगल सर्वाआधी तुझी पाद्यपूजा
छेडिनि वीणा जागवते तुज, सरस्वती भगवती ॥ १ ॥

आवडती तुज म्हणुन आणिली रक्तवर्ण कमळे
पाचुमण्यांच्या किरणासम हि हिरवी दुर्वादळे
उभ्या ठाकल्या चवदा विद्या घेउनिया आरती ॥ २ ॥

शूर्पकर्णका, ऊठ गजमुखा, उठी रे मोरेश्वरा
तिन्ही जगांचा तूंच नियंता, विश्वासी आसरा
तूझ्या दर्शना अधीर देवा, हर, ब्रम्हा, श्रीपती ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

कबीराचे विणतो शेले

कबीराचे विणतो शेले
कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम
भाबड्या या भक्तासाठी
देव करी काम ||धॄ||

एक एकतारी हाती, भक्त गाई गीत
एक एक धागा जोडी जानकीचा नाथ
राजा घनःश्याम
कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम ||१||

दास रामनामी रंगे, राम होइ दास
एक एक धागा गुंते, रूप ये पटांस
राजा घनःश्याम
कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम ||२||

विणून सर्व झाला शेला, पूर्ण होइ काम
ठाई ठाई शेल्यावरती, दिसे रामनाम
गुप्त होई राम
कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम ||३||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

सावळ्या विठ्ठला

सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले
विसरून गेले देहभान ||

गोजिरे हे रूप पाहुनिया डोळा
दाटला उमाळा अंतरी माझ्या
तुकयाचा भाव पाहूनी नि:संग
तारिले अभंग तूच देवा ||

जगी कितिकांना तारिलेस देवा
स्वीकारी ही सेवा आता माझी
कृपा कटाक्षाचे पाजवी अमृत
ठेव शिरी हात पांडुरंगा ||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

केशवा माधवा

केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा ||

तुझ्या सारखा तूच देवा
तुला कुणाचा नाही हेवा
वेळोवेळी संकटातुनी तारिसी मानवा ||

वेडा होऊनी भक्तीसाठी
गोप गड्यांसह यमुनाकाठी
नंदाघरच्या गाई हाकीशी गोकुळी यादवा ||

वीर धनुर्धर पार्थासाठी
चक्र सुदर्शन घेऊनी हाती
रथ हाकुनिया पांडवांचा पळविशी कौरवा ||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

भावभोळ्या भक्तीची मी एकतारी

भावभोळ्या भक्तिची ही एकतारी
भावनांचा तू भुकेला रे मुरारी ॥ ध्रु ॥

काजळी रात्रीस होसी तूंच तारा
वादळी नौकेस होसी तू किनारा
मी तशी आले, तुझ्या ही आज दारी ॥ १ ॥

भाबडी दासी जनी गातांच गाणी
दाटुनी आले तुझ्या डोळ्यांत पाणी
भक्तीचा वेडा असा तू चक्रधारी ॥ २ ॥

शापिलेली ती अहिल्या मुक्त केली
आणि कुब्जा स्पर्श होतां दिव्य झाली
वैभवाचा साज नाही, मी भिकारी ॥ ३ ॥

अंतरीची हाक वेडी घालते रे
वाट काट्यांची अशी मी चालते रे
जाणिसी माझी व्यथा ही, तूच सारी ॥ ४ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

तुज मागतो मी आता

तुज मागतो मी आता
मागतो आता, तुज मागतो मी आता
मागतो आता, मज द्यावे एकदंता
तुज मागतो मी आता ||धृ||

तुझे ठायी माझी भक्ती
विरुढावी गणपती
तुझे ठायी ज्याची प्रीती
त्याची घडावी संगती ||१||

धरणीधरा ऐसे द्यावे
सर्वाहूती लीन व्हावे
तुज शरण, शरण, शरण
आलो पतीत मी जाण ||२||

तुझा अपराधी मी खरा
आहे इक्षूचापधरा
माझी येऊ दे करुणा
तुज लागी गजानना ||३||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

दर्पणि बघते मी गोपाळा

दर्पणि बघते मी गोपाळा
साज सुगंधी करु कशाला ? ॥ ध्र ॥

कोमल माझ्या प्रतिबिंबातुन
बिंब तयाचे बघते न्याहळुन
नेत्रफुलांची होता पखरण
फुलवेणी ही घालु कशाला ? ॥ १ ॥

स्वैर अजानू पाठीवरती
श्यामल कुरळे कुंतल रुळती
सुंदरतेला मिळता मुक्ती
मोहबंधंनी बांधु कशाला ? ॥ २ ॥

भरतां चिंतन नयनी अंजन
गोविंदाचे घडता दर्शन
भक्तीचे हे बांधुन पैंजण
लोकरंजनी नाचु कशाला ? ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: