देह देवाचे मंदिर

देह देवाचे मंदिर
आत आत्मा परमेश्वर

जशी ऊसात हो, साखर
तसा देहात हो, ईश्वर
जसे दुधामध्ये लोणी
तसा देही चक्रपाणी

देव देहात देहात
का हो जाता देवळात
तुका सांगे मूढ जना
देहि देव का पाहिना

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

तेथे कर माझे जुळती

तेथे कर माझे जुळती, दिव्यत्वाची जेथ प्रचीती ॥ ध्रु ॥

हृन्मंदिरी संसृतिशरस्वागत, हसतचि करिती कुटूंब हितरत
गृहस्थ जे हरि उरात रिझवत, सदनी फ़ुलबागा रचिती ॥ १ ॥

ज्या प्रबला निज भावबलाने, करिती सदने हरिहरभुवने
देव-पतिना वाहुनि सुमने, पाजुनि केशव वाढविती ॥ २ ॥

गाळुनिया भाळींचे मोती, हरीकृपेचे मळे उगविती
जलदांपरि येउनिया जाती, जग ज्यांची न करी गणती ॥ ३ ॥

शिरी कुणाच्या कुवचनवॄष्टी, वरिती कुणी अव्याहत लाठी
धरती कुणी घाणीची पाटी, जे नरवर इतरांसाठी ॥ ४ ॥

यज्ञी ज्यानी देउनि निजशीर, घडिले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहनभूमिवर, नाही चिरा नाही पणती ॥ ५ ॥

स्मिते जयांची चैतन्यफुले, शब्द जयांचे नव दीपकळे
कृतीत ज्यांच्या भविष्य उजळे, प्रेम विवेकी जे खुलती ॥ ६ ॥

जिथे विपत्ति जाळी, उजळी, निसर्ग लीला निळी काजळी
कथुनि कायसे काळिज निखळी, एकाची सगळी वसती ॥ ७ ॥

मध्यरात्री नभघुमटाखाली, शांतिशिरी तम चवर्‍या ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी, एकांती डोळे भरती ॥ ८ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

औंदा लगीन करायचं

दाटु लागली उरात चोळी, कुठवर आता जपायचं
औंदा लगीन करायचं, बाई, औंदा लगीन करायचं ॥ ध्रू ॥

रस्त्यानं जाताना बघत्यात किती, गालातल्या गालात हसत्यात किती
पदर सारखा ढळतोय गं, किती तयाला आवरायचं ॥ १ ॥

मनांत ठसतोय कुणी तरी, उरांत होतय कसंतरी
झोप रातिला येइना मुळी, सपनात कुणीतरी बघायचं ॥ २ ॥

धक्का मारत्यात रस्त्यामधी, खळखळ होतिया मनामधी
मनासारखा हवा गडी, कुठवर बाई थांबायचं ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

दे मला गे चंद्रिके

दे मला गे चंद्रिके, प्रीती तुझी
रानहरिणी, दे गडे भीती तुझी ॥ ध्रु ॥

मोहगंधा पारिजाता रे सख्या
हासशी कोमेजता रीती तुझी ॥ १ ॥

रे कळंका छेदिता तुज जीवनी
सुस्वरे जन भारिते गीती तुझी ॥ २ ॥

सोशितोसी झीज कैसी चंदना
अपकारिता उपकार ही नीती तुझी ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

दैव जाणिले कुणी

दैव जाणिले कुणी, हो दैव जाणिले कुणी
लवांकुशाचा हलवी पाळणा, वनी वाल्मिकी मुनी ॥ ध्रु ॥

मृग सोन्याचा जगी असंभव, तरीही त्याला भुलले राघव
श्रीरामाला चकवुन गेल्या, शक्ति मायाविनी ॥ १ ॥

आपदमस्तक विशुद्ध सीता, पतिव्रता ती मूर्त देवता
पतितपावने तिला त्यागिली, तशात ती गर्भिणी ॥ २ ॥

राजपुत्र ते नॄपति उद्याचे, शिशुपण त्यांचे दीनपणाचे
रत्नकंदुकाजागी हाती मातीची खेळणी ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

दिसलीस तू

दिसलीस तू, फुलले ऋतू
उजळीत आशा, हसलीस तू ॥ ध्रु ॥

उरले न आसू, विरल्या व्यथाही
सुख होउनीया, आलीस तू ॥ १ ॥

जाळीत होते, मज चांदणे हे
ते अमृताचे, केलेस तू ॥ २ ॥

मौनातुनी ये, गाणे दिवाणे
त्याचा अनामी, स्वरभास तू ॥ ३ ॥

जन्मांत लाभे, क्षण एकदा हा
ते भाग्य माझे, झालीस तू ॥ ४ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

देश हा देव असे माझा

देश हा देव असे माझा
अशी घडावी माझ्याहातून तेजोमय पूजा

चंदन व्हावा देहच केवळ
भाव फुलांची करुनि ओंजळ
प्राणज्योतीने ओवाळीन मी देवांचा राजा

धन्य अशा या समर्पणाने
या जन्माचे होईल सोने
मर्द मावळ्या रक्ताची मी मर्दानी तनुजा

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

दिस चार झाले मन पांखरु होऊन

दिस चार झाले मन, हो, पांखरु होऊन
पान पान आर्त आणि झाड बांवरून

सांजवेळी जेव्हा येई आठव आठव
दूर कुठे मंदिरात होई घंटारव
उभा अंगावर राही काटा सरसरून

नकळत आठवणी जसे विसरले
वाटेवर इथे तसे ठसे उमटले
दूर वेडेपिसे सूर सनई भरून

झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा
आता जरी आला इथे ऋतु वसंताचा
ऋतु हा सुखाचा इथला गेला ओसरून

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

दिल्या घेतल्या वचनांची

दिल्या घेतल्या वचनांची, शपथ तुला आहे
मनांतल्या मोरपिसाची, शपथ तुला आहे ॥ ध्रु ॥

बकुळीच्या झाडाखाली, निळ्या चांदण्यांत
ह्रुदयाची ओळख पटली, सुगंधी क्षणांत
त्या सगळ्या बकुळफुलांची, शपथ तुला आहे ॥ १ ॥

शुभ्र फुले रेखित रचिला, चांद तू जुईचा
म्हणालीस, " चंद्रोत्सव हा, सावळ्या भुईचा"
फुलांतल्या त्या चंद्राची, शपथ तुला आहे ॥ २ ॥

भुरभुरता पाउस होता, सोनिया उन्हांत
गवतातुंन चालत होतो, मोहुनी मनांत
चुकलेल्या त्या वाटेची, शपथ तुला आहे ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

दर्पणि बघते मी गोपाळा

दर्पणि बघते मी गोपाळा
साज सुगंधी करु कशाला ? ॥ ध्र ॥

कोमल माझ्या प्रतिबिंबातुन
बिंब तयाचे बघते न्याहळुन
नेत्रफुलांची होता पखरण
फुलवेणी ही घालु कशाला ? ॥ १ ॥

स्वैर अजानू पाठीवरती
श्यामल कुरळे कुंतल रुळती
सुंदरतेला मिळता मुक्ती
मोहबंधंनी बांधु कशाला ? ॥ २ ॥

भरतां चिंतन नयनी अंजन
गोविंदाचे घडता दर्शन
भक्तीचे हे बांधुन पैंजण
लोकरंजनी नाचु कशाला ? ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: