दृष्टी

"बाळ म्हणे!" ती रागानं स्वत:शीच पुटपुटली. मी आता मोठी आहे. स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायला समर्थ आहे; तरी सगळे अजून मला लहानच समजतात! आणि हे बुवा, हे पण मला काही कारण नसताना 'बाळ' म्हणाले! म्हणे यांना दिव्यदृष्टी आहे, म्हणे यांना भूत भविष्य चांगलं समजतं; पण यांना माहीत तरी आहे का की मी तळ्याकडे कशासाठी चालले आहे ते?

borderpng.png

चै

त्रातली एक कलती दुपार. गावाबाहेरच्या तळ्याकाठी, दाट झाडीमध्ये असलेल्या उंबराच्या झाडाखाली बुवा बसले होते. डोळे मिटलेले. डोक्यात काहितरी चिंतन चाललेलं. मंदसा वारा वाहत होता. साळुंक्या मंजूळ बोलत होत्या. पक्षी मातीत काहीबाही टिपत होते. अशा वेळी आपल्याला कोणी पाहत तर नाही ना, याचा अंदाज घेत, लपत छपत ती तळ्याकडे निघाली होती. बरोबर उंबराच्या झाडासमोरून जात असताना ती एका दगडाला अडखळली; तिच्या अंगठ्याला ठेच लागली आणि ती वेदनेने एकदम कळवळली. बुवांनी डोळे उघडले. तिचा रक्ताळलेला अंगठा पाहताच त्यांचा जीव कासावीस झाला आणि ते म्हणाले, "जपून चाल गं बाळ!"

drushtee_0.jpgतशीच भळभळणारी जखम घेऊन ती पुढे चालायला लागली. "बाळ म्हणे!" ती रागानं स्वत:शीच पुटपुटली. मी आता मोठी आहे. स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायला समर्थ आहे; तरी सगळे अजून मला लहानच समजतात! आणि हे बुवा, हे पण मला काही कारण नसताना 'बाळ' म्हणाले! म्हणे यांना दिव्यदृष्टी आहे, म्हणे यांना भूत भविष्य चांगलं समजतं; पण यांना माहीत तरी आहे का की मी तळ्याकडे कशासाठी चालले आहे ते?

या विचारांच्या तंद्रीत चालत-चालत ती तळ्याच्या पार दुसर्‍या टोकाला असलेल्या त्यांच्या खुणेच्या जागी पोचली. तो तिची वाटच पाहत होता. अधीर, उत्सुक, तिला उशीर झाल्यामुळं थोडासा काळजीत, थोडासा त्रासलेला. आज त्याला नक्कीच तिला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं. या सार्‍या गोष्टी तिनं त्याच्यापासून काही पावलं दूर असतानाच एक दृष्टीक्षेपात ओळखल्या. त्याला पाहून तिचा जीव आनंदानं, प्रेमानं भरून आला. पण तसं चेहर्‍यावर न दाखवता ती त्याच्या जवळ गेली.

"किती उशीर?" काहीसं रागावून त्यानं विचारलं.

"हो! झाला उशीर. घरी आणि बाहेर कोणाला समजू नये याची काळजी घेत, लपत-छपत इकडं यायचं म्हणजे काही सोपं काम नाही!"

त्याचं लक्ष तिच्या रक्ताने भरलेल्या अंगठ्याकडे गेलं.

"काय झालं पायाला?"

"काही नाही!"

त्यानं कमरेचा रुमाल काढला, हातानंच मधोमध फाडला आणि खाली बसून तो तिची जखम साफ करू लागला.

"कोणी तुला पाहिलं तर नाही ना?"

"नाही. फक्त तळ्याजवळ ते बुवा डोळे मिटून बसले होते, त्यांनी क्षणभर पाहिलं."

"ते बुवा बिचारे फार चांगले आहेत! आजूबाजूच्या चार गावांमध्ये फिरतात, पण स्वत:हून कधीच कोणाशी बोलत नाहीत. ना कोणाच्या अध्यात ना मध्यात! कधी कुठल्या देवळात पण जात नाहीत. गावाबाहेरची एखादी शांत, निसर्गरम्य जागा बघतात आणि तिथंच चिंतन, नामस्मरण करत बसतात."

"पुरे झालं हं बुवांचं कौतुक! काहीही कारण नसताना मला ’बाळ’ म्हणाले ते!"

"तरीच पारा चढलाय इतका! काय चुकलं त्यांचं? अजूनही बाळच आहेस तू! कुक्कुलं बाळ!" तो चेष्टेच्या सुरात म्हणाला.

"आता मात्र खरंच पुरे हं! तुला चांगलं माहित आहे की कोणी लहान मुलीसारखं वागवलं की मला किती राग येतो ते! मी लहान असते तर माझ्या कर्मठ आणि तापट बाबांची आणि जाच करणार्‍या सावत्र आईची कधीही परवानगी मिळणार नाही हे माहीत असूनही, पुढच्या धोक्याची पूर्ण कल्पना असताना तुझ्यावर प्रेम नसतं केलं!" शेवटचं वाक्य बोलताना ती स्वत:शीच थोडीशी लाजली.

"अगं हो, अगं हो! मी तर फक्त चेष्टा करत होतो." तिची जखम पूर्ण साफ करून तो उठला.

"माझी चेष्टा करण्यासाठी मला इथं बोलावलंस का?" खोट्या रागानं ती त्याला म्हणाली.

"नाही!" तो एकदम गंभीर झाला. "मी तुला हे सांगण्यासाठी बोलावलंय की माझं या गावातलं काम संपलंय. आजच मी आणि सेनापती बोललो. आता मी हे गाव सोडून जायला पूर्ण रिकामा आहे."

"म्हणजे?" तो पुढं काय बोलणार याची पूर्ण कल्पना असूनही तिनं विचारलं.

"आपण दोघंही हे गाव सोडून जाऊयात. उद्याच. "दोन्ही हातांनी तिचे खांदे पकडत, तिच्या डोळ्यांत बघत तो म्हणाला.

"उद्या? असं अचानक?" हा क्षण कधीतरी येणार हे तिला माहीत होतं. पण तो असा एकदम समोर उभा ठाकला तशी ती गडबडली, गोंधळली.

"अचानक? आपण याबद्दल आधी कधी बोललो नव्हतो? या गावात, या प्रांतात आपल्या नात्याचा स्वीकार कधीच होणार नाही. आपल्याला बाहेर, दूरदेशी जाऊनच नव्यानं एकत्र आयुष्य सुरु करावं लागेल . . . कोणाकडून कसलाही अडथळा येवू नये म्हणून आपण आपलं प्रेम, आपल्या भेटीगाठी कसोशीनं गुप्त ठेवायचा प्रयत्न नाही केला?"

ती त्याच्याकडे पाहत होती. चेहर्‍यावरचा सच्चेपणा, डोळ्यांतली चमक . . . पाहताक्षणीच पूर्ण विश्वास टाकावा असं काहीतरी त्याच्या चेहर्‍यात होतं. म्हणूनच तर ती त्याच्या प्रेमात पडली होती.

ती काही बोलली नाही, तसा तो म्हणाला, "उद्या पहाटे आकाशात शुक्राची चांदणी उगवायच्या सुमारास मी तुझ्या घरापाशी येईन. तू हळूच मागच्या दरवाज्याने बाहेर नीघ. आपण लगेच घोड्यावरून निघालो तर सूर्य उगवायच्या आत बरेच दूर गेलेलो असू."

ती तशीच त्याच्याकडे पाहत राहिली, तसा त्यानं तिचा चेहरा ओंजळीत घेतला, "माझ्यावर विश्वास नाही का तुझा?"

नजर खाली वळवत ती हळूच म्हणाली, "विश्वास नसता तर माझं घर सोडून, कोणाला काही कल्पना न देता मी तुझ्याबरोबर तू नेशील तिकडे यायला तयार झाले असते का?"

"मी तुला काही असाच पळवून नाही नेणार आहे", तिच्या केसांतून हलकेच हात फिरवत तो म्हणाला, "त्याआधी मी तुझ्याशी लग्न करणार आहे."

ती एकदम चमकली, "लग्न? केव्हा? कुठं?"

"आज, आत्ता, इथं."

"इथं? आत्ता? पण ना कुठलं मंदिर, ना कोणी पंडित..."

"या गावातलं कुठलं मंदिर आणि कुठला पंडित आपलं लग्न लावून द्यायला तयार होईल? तू राजपुरोहिताची मुलगी, मी सैन्यातला साधा शिलेदार. आपण लग्न करतोय म्हटल्यावर तुझे वडील तुला घरात आणि मला तुरुंगात डांबायची व्यवस्था करतील. शिवाय, आपल्या लग्नाला देवाब्राह्मणांच्या आशीर्वादाची आणि मंत्रविधींची काय गरज? निसर्गाच्या साक्षीनंच आपलं नातं फुललं नाही का? हे सरोवर, ही झाडं, हे पक्षी, प्राणी . . . हेच आत्तापर्यंत आपल्या प्रेमाचे साक्षीदार झाले नाहीत का? मग त्यांच्याच समोर आपण या पवित्र बंधनाचा स्वीकार करुया ना?"

ती शांत राहिली तसा त्यानं कमरेचा खंजीर काढला. क्षणार्धात त्याच्या उजव्या अंगठ्यावर रक्ताची एक लालभडक रेघ उभी राहिली. त्या रक्तानं त्यानं हलकेच तिचा मळवट भरला. तिचे डोळे पाण्यानं डबडबले.

"ए वेडाबाई, रडतेस काय?" तिचा चेहरा पुन्हा ओंजळीत घेऊन तो हसत म्हणाला, "आता तर आपण कायमचे एकत्र होऊ! आता प्रतीक्षा संपली, खरे सुखाचे दिवस सुरू झाले!"

रडता-रडताच ती त्याला बिलगली. फुलांचा प्रसन्न सुगंध बरोबर घेऊन वार्‍याचा एक झोत आला. झाडांची पानं सळसळली. तळ्याच्या शांत पाण्यात हळुवार लहरी उठल्या. पलीकडच्या तीरावरून मोराने सुरेल हाक दिली.

मनानं पूर्णत: एकरूप झालेले ते दोन जीव एकमेकांच्या बाहूपाशात तसेच कितीतरी क्षण उभे राहिले.

मघाशी गेली त्यानंतर दोनच घटकांनंतर पुन्हा ती त्याच उंबराच्या झाडासमोरुन गावात परत चालली होती. तिच्या मनात आनंद, उत्कंठा, थोडंसं दडपण यांचं मिश्रण होतं, चेहर्‍यावर न लोपणारं हसू होतं. झाडाखाली बुवा अजूनही डोळे मिटून ध्यानस्थ बसले होते. तिला काय वाटलं कोणास ठाऊक; चालता-चालताच तिनं एक हात हृदयाला लावून बुवांना ओझरता नमस्कार केला.

"बाई, सुखानं संसार कर." डोळे मिटूनच बुवांनी भरल्या गळ्याने आशीर्वाद दिला.

- anamik