इसे रिश्ते का कोई नाम न दो

सहनशक्तीच्या पलिकडलं होतं सगळंच. एक माणून म्हणून, एक बाई म्हणून, एक आई म्हणून, सर्व जागी मी कमीच पडले होते. आयुष्याचा गोषवारा मांडला तर नशिबात आलेल्या दु:खातच जगण्याची धन्यता मानली मी, कधी त्याविरुद्ध आवाज उठवला नाही. मग काय हक्क होता मला आजही दु:खी होण्याचा?

borderpng.png

"तू

माझ्याकडे रहायला चल" कॉफीचे घुटके घेताना तो अचानक म्हणाला.

हवेतून अचानक बाण येऊन आपल्यावर आपटावा असं झालं मला. ते वाक्य, त्याचा अर्थ झिरपला, तसे नकळत माझे डोळे विस्फारले गेले. मी बघतच बसले त्याच्याकडे.

"अगं बघतेस काय अशी? खरंच म्हणतोय मी," तो खरंच सहजपणे म्हणत होता.
"अशी कशी येऊ शकते मी? तेही रहायलाच चक्क? छे! काहीतरीच!"
"काहीतरीच काय? पाहुणी म्हणून जात नाहीस का कोणाकडे? तशी ये. हवापालटाला. एकटीच असतेस इथे. मीही एकटाच असतो. एकमेकांना कंपनी देऊ, गप्पा मारू, जमेल तितकं खाऊ पिऊ."
"अच्छा! तसं."
"नाहीतर मग कसं?" माझ्या सुस्कार्‍यामागचे गर्भित अर्थ समजून तो हसला. थोडा गंभीर होऊन म्हणाला, "हे बघ सुलु, खरंच काय हरकत आहे? मी एकटा सडाफटिंग माणूस. तूही तशी एकटीच की. दिवसचे दिवस एकटीने रहायला कंटाळा येत नाही? दोघांच्या तब्येती ठीक आहेत, आपण मित्र आहोत एकमेकांचे. आलीस माझ्याकडे रहायला तर काय होईल?"
"अरे, लोक काय म्हणतील? काय हक्काने, नात्याने येऊ तुझ्याकडे? असं रहायलाच थेट?"
"हांऽऽऽ. लोक काय म्हणतील??? बरोबर. आला समेचा प्रश्न. आपण लहान आहोत का आता सुलु? आपल्या एकटेपणावर आपण उपाय शोधला, तर लोकांना काय त्रास असावा? इथे दिवसरात्र एकटी असतेस. किती लोक येतात तुझी चौकशी करायला? आणि माझ्याकडे आलीस की लगेच येतील का? आले, तर सांग, हो आहे हा माझा मित्र. त्याने बोलावले म्हणून राहतेय त्याच्याकडे. आपण कम्पॅनियन म्हणून नाही राहू शकत एकत्र? लगेच वाकडेतिरके अर्थ का काढायचे? लोकांनी आणि तूही!" तो अंमळ रागावल्यासारखा झाला.
"अरे, हे इतकं अचानक विचारत आहेस तू. मला विचार करायला तरी वेळ दे. मी एकटी असले तरी एकटी नाही. लोक जाऊदे, पण मला दोन मुलं आहेत, त्यांचा तरी विचार करावा लागेलच ना मला. आणि तुझ्या मनात काय आहे नक्की? आठ-दहा दिवसापुरतंच, की . . ."
"मी इतका विचार केलेलाच नाही खरंतर. माझ्या डोक्यात सहज आलं, मला ते ठीक वाटलं, म्हणून तुला विचारलं. You will be most welcome to my house Sulu. मला ही कल्पनाच आवडली खूप. दोन mature adults असे का नाही राहू शकत? आणि आपण एकमेकांना आता तीसेक वर्ष तरी ओळखत असू. मी तुझा कायम आदर केला आहे, करत राहीन. एक सुरूवात म्हणून तरी राहून बघू. पुढचं पुढे. आणि काळजी करू नकोस. स्वयंपाक, घराची साफसफाई सगळ्याला नोकर आहेत. तुला येऊन फक्त ती दुसरी बेडरूम आहे, ती राहती करायची आहे, आणि माझ्याशी एक मित्र म्हणून गप्पा मारायच्या आहेत." मिस्किलपणा करत त्याने बर्‍याच गोष्टी सांगून टाकल्या.

**********

नक्की कशामुळे झपाटले गेले, की मनाने बंडच करायचं ठरवलं माहित नाही, पण हिय्या करून आलेच मी मुकुंदाकडे रहायला. अगदी बॅग वगैरे घेऊन. आयुष्यभर मन मारलं, दुसरे काय म्हणतील ह्याचा विचार केला. पण आज आले ते माझ्यासाठी. त्याच्या आवाजातलं आर्जव, त्याच्या भावनेतला सच्चेपणा आणि मुख्य म्हणजे माझ्या मनाने दिलेला कौल, ह्या सगळ्याचा विचार करून. मी काय नात्याने इथे येत होते, मला काय अभिप्रेत होतं, मुकुंदाला काय अपेक्षित होतं. कशाचंच ओझं न बाळगता मी फक्त उठून आले. बस्स.

ispyarkonamnado_new.jpg खूप खूप वर्षांनी आले मुकुंदाकडे. खूप जुनी बांधणी असलेली बिल्डिंग होती ती, तीन मजली. एका मजल्यावर समोरासमोर दोन बिर्‍हाडं. मुकुंदाने दार उघडलं आणि काहीही समजायच्या आत पायात काहीतरी वळवळलं! मी किंचाळलेच. क्षणात भान आलं, तर पायात एक कुत्रा! मुकुंदा त्याच्याशी बोलायलाही लागला होता. तो भुंकत, शेपूट हलवत माझ्याकडे येत होता, आणि हा त्याला थोपवत होता.

"तुला सांगायचंच राहिलं, ह्याच्याबद्दल. हा भाऊ! घाबरू नकोस. हात पुढे कर तुझा, तो फक्त वास घेईल. हांऽऽऽ. हळू. भावा, तिला घाबरवू नकोस रे. आपली गेस्ट आहे ती, ओके? ओके भाव्या? हां झालं ना आता? जा आता, आम्हाला आत तरी येऊदे. जा रे, भाऊ! ज्जा! गो!"

त्याच्या सगळ्या स्वगताची मला खूपच गंमत वाटली. कुत्र्याचं नाव भाऊ? तिथेच मला हसू यायला लागलं! शिवाय त्याला 'भावा', ’भाव्या’, ’भावड्या’ काहीही म्हणत होता. तोही ऐकत होता आणि त्याचं. ’ज्जा’ अशी कडक ऑर्डर आल्यावर खरंच कोपर्‍यात जाऊन बसला बिचारा. भाऊ!

आम्ही आत आलो. घरातला ठळक फरक, म्हणजे समोरच्याच भिंतीवर असलेले त्याच्या आई-वडिलांचे फोटो. घरात नजर फिरवली, आणि लख्खपणे आमचेच जुने दिवस आठवले. आमचे संसारी दिवस. ह्यांनी सांगायचे आणि मी ऐकायचे दिवस. कष्टाने ते विचार मागे टाकले. मुकुंदाचं घर नीट आठवत नव्हतं. तोच आमच्याकडे यायचा. इथे एक-दोनदाच आले असेन. एकदा सगळे मित्र जमले होते तेव्हा आणि एकदा असंच फिरायला आलो होतो तेव्हा. छान प्रशस्त हॉल होता. त्याला लागूनच स्वयंपाकघर. त्याला बाल्कनी. अजून दोन बाल्कन्या दोन बेडरूम्सना लागून. बेडरूम्स समोरासमोर होत्या, एकमेकींपासून लांब-लांब. हॉलच्या दोन टोकांना दोन. नकळत मी एक नि:श्वास टाकला. घरात भरपूर उजेड होता. बाहेर फारशी रहदारी नव्हती. खूप शांत वाटत होतं. बाहेर. आत.

मुकुंदाने कॉफी पुढ्यात ठेवली. मी एकदम चमकले. तो हसला फक्त.

"बस आरामात. भावड्याबद्दल सांगायचं राहिलंच. माझा दोस्त आहे तो, पाच-सहा वर्ष झाली असतील. एकदम चांगला आहे. तू खूप घाबरली नाहीस, हे बरं झालं, तूही त्याच्याशी मैत्री करून टाक. एकदम मस्त आहे तो. आता घराबद्दल, कबूल! फार काही ग्रेट नाहीये माझं घर. बाई साफ करते, म्हणून इतकं तरी स्वच्छ आहे. खरंतर मी फारसं लक्ष देत नाही." त्याने डोळे मिचकावले. मुकुंदाचे डोळे फारच बोलके होते, अजूनही. मला आत्ता कळत होतं! नकळत मीही हसले.
"छान आहे तुझा भाऊ आणि घरही. आपुलकी आहे त्यांच्यात, तुझ्यासारखीच."

अजून एक स्मित. वातावरण फारसं काही न बोलताच ऊबदार झालं.

**********

रात्री आठाचा सुमार असेल, माझं सामान ज्या बेडरूममध्ये ठेवलं होतं, मी तिथे नुसतीच बसून होते. ही तर खरं जेवायची वेळ. पण इथे स्वयंपाकाची काय सोय होती? केलेला होता का? नसेल तर मी केलेला चालला असता का? मुकुंदा त्याच्या खोलीत कधीच गडप झाला होता. शेवटी धीर करून उठले. हॉल, स्वयंपाकघर- दोन्हीकडे अंधार होता. कसंसच झालं. थोडीफार खाटखुट करून मी आधी दिवे लावले. स्वयंपाकघरात ओट्यावर कोपर्‍यात भांडी झाकून ठेवली होती. गार आमटी, वाडगाभर भाजी, तीन पोळ्या. हे जेवतो हा? माझ्यासारखंच? मला नवल वाटलं. सासूबाई, हे, मुलं, चाललं असतं का त्यांना असं? रोज रात्री गरम ताजा स्वयंपाक करत होते अगदी परवापरवापर्यंत. तोही सर्वांच्या चवीढवीचा. तेव्हा खरा कंटाळा, वैताग यायचा. आज मात्र कीव आली, स्वत:चीच. आज स्वातंत्र्य आहे, तर आज गार अन्नही गोड लागत होतं, तेव्हा ते ताजं अन्नही घशाखाली उतरायचं नाही.

"हां, आज जेवायला बाहेर जाऊया. मगाशी सांगायला विसरलो." तो अचानक माझ्यामागे प्रकट होत म्हणाला.
"मी करू का काहीतरी? लगेच बाहेर नको जायला." इथपर्यंत तर आले होते, पण सर्रासपणे बाहेर फिरायला नको वाटलं मला.

मुकुंदाला समजलंच. तो हसला.

"बरं. पण काही जास्त नको करूस. बाईला तुझं सांगायचं विसरलो, त्यामुळे थोडं काहीतरी असेलच." मुकुंदाच्या ’सांगायला विसरलो’ची सवय करून घ्यायला हवी होती.

"मुकुंदा, मी पस्तीस-चाळीस वर्ष संसार केलाय." मी हळूच म्हणाले आणि त्याने मान डोलावली.
"सॉरी मॅडम. आमची माघार"
"भाऊ काय खातो रात्री?" मुलांची सवय होती. कुत्र्याची नाही.
"अरे, साधा भोळा आहे बिचारा माझ्यासारखाच. काही नाटकं नाहीत बघ. दूध फक्त. पोळी देऊन बघ, मूड असेल तर खातो."

कोशिंबीर केली आणि मुगडाळीची खिचडी. जोडीला सकाळचंच. भाऊने दूध घेतलं फक्त. मला त्याच्याबद्दल खूप आपुलकी वाटायला लागली होती. निमूटपणे बसून होता. वास्तविक त्याच्या आणि मुकुंदाच्या घरात मी पाहुणी. मी अशी माझी खोली, स्वयंपाकघर, हॉल इथे बिनदिक्कत वावरत होते, वस्तूंना हात लावत होते. तो डोळे मोठे करून बघत होता सगळीकडे, पण भुंकला वगैरे नाही. दुधाची ताटली त्याच्यासमोर ठेवली, तशी थोडी शेपूटही हलवली. मी धीर करून त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, तेही चाललं वाटतं. मुकुंदा पूर्ण वेळ त्याच्या खोलीत होता. काय करत होता, विचारायचं धाडस मी नाही केलं, आणि खरंतर घरात कोणीतरी आहे, तरी घर शांत, समाधानी आहे हेच मला नवीन होतं आणि ते हवंहवंसंही वाटत होतं. पण स्वयंपाक झाला, तसं मी त्याच्या खोलीत डोकावले, बाहेरूनच. दारातच स्टडी टेबल होतं, तिथे तो पुस्तक वाचत बसला होता. माझी चाहूल लागताच त्याने वर पाहिलं.

"काय गं? ये ना."
"नाही, जेवण झालंय."
"हां, झालं का? चलाऽ. आज तू आलीस आणि लगेच काम करायला लागलं तुला. उद्या बाईला सांग तूच काय आणि किती करायचं ते."

आम्ही बोलता बोलता टेबलापाशी आलो. वाढून घेतलं.

"सकाळी मी आणि भाऊ जातो फिरायला. शार्प सहाला. तूही येशील का? थोडं मागे गेलं की टेकडी आहे, तिथे. भावड्या मस्त उड्याबिड्या मारतो तिथे, पळतो आणि मलाही पळवतो."
"अं, नको लगेच फिरायला."
"तू काय कोंडून ठेवणारेस की काय स्वत:ला? आज हॉटेल नको, उद्या टेकडी नको. चल, तू माझी पाहुणी आहेस. सांगू आपण लोकांना." तो समजूतीने म्हणाला.
"अं, मी विचार करून सांगते."
"बऽऽरं."

बाईने केलेली आमटी, भाजी चांगलीच तिखट होती आणि मी केलेली खिचडी अगदीच फिकी. हा इतका तिखट खातो ह्या वयात? मला आश्चर्य वाटलं. मुकुंदा काहीच बोलला नाही, पण आमटी ठेवून त्याने खिचडी आणि पोळी-कोशिंबीरच खाल्ली. मी मनातच काय ते समजले. बाईंना एकतर हा काही सांगत नसणार, किंवा सांगूनही त्या ऐकत नसणार.

"आपल्याकडे एक बाई येते- सुमनबाई- त्या केर, फरशी, धुणं, भांडी करतात- ह्या साडेसातला येतात. आणि स्वयंपाकाला गीताबाई. त्याही आठार्यंत येतात. त्या मला यादी देतात दर आठवड्याला भाजीची आणि महिन्याला किराण्याची. नॉनव्हेज खातेस का गं तू? झक्कास झणझणीत करतात. मी करवून घेतो त्यांच्याकडून रविवारी. रविवारी संध्याकाळी मात्र त्यांना सुट्टी. आता तू इथे आहेस तोवर तरी ह्या बायकांचं बघ. म्हणजे, तू काही करू नकोस, फक्त देखरेख कर. मला तर पार गुंडाळून ठेवलंय त्यांनी." तो हसतहसत म्हणाला.

मी नवलाने बघत राहिले त्याच्याकडे. किती सहजपणे तो त्याच्या घराची सूत्रं माझ्या हवाली करत होता. मी तर पाहुणी होते. अजूनतरी.

**********

मला दिलेल्या खोलीतला पलंग खिडकीला लागून होता. बाहेर सुरेख चांदणं पसरलं होतं. खोलीत निळसर प्रकाश देणारा नाईटलँप होता. मी अर्थातच विचार करत पडले होते. आयुष्याचा, आजच्या दिवसाचा. ’मी एक साधी सामान्य संसारी बाई. ह्यांनी मला लौकिकाने सुखी ठेवले आणि मी त्यांना. सासुरवास भरपूर. ह्यांच्यातही तेच गुण. मारहाण नाही, पण सतत मानसिक छळ, तिरकं बोलणं, करवादणं . . . मनाला येईल तसं जगणं आणि त्याच्या पूर्ततेसाठी बायकोचा वापर. ’घरात त्यासाठीच ठेवलंय तुला’ हे वाक्य स्वयंपाक, येणाजाणार्‍याचं अगत्य, मुलांच्या आजारपणापासून सासूबाईंच्या, ह्यांच्या आजारपणाची सर्व उस्तवारीसाठी ऐकलेलं. माझा स्वभाव त्यामुळे फक्त आज्ञाधारक झालेला. आपल्या मनाचं काही करणं ठाऊकच नाही. ह्यांच्यानंतर मुलांनीही तोच कित्ता गिरवला. मोठा ह्याच शहरात, वेगळा राहणारा. धाकटा, परगावी. आई एकटी आहे, पण तिचं ओझं झालेलं. तिच्याकडे यायचं ते त्यांना वेळ झाला की. तिच्या हातचं काही खावंसं वाटलं, तर किंवा काही काम असेल तर. अजून गंभीर आजारी पडले नाही, पण ह्यांच्यासारखं दवाखान्यात राहायची वेळ आली तर- तेव्हा तरी येतील का विचारपूस करायला? बापरे, आज चुकून दोघांपैकी फोन केला असेल तर, किंवा येऊन गेलं असेल तर? मोबाईलवर तरी नाही आला फोन. घरच्या नंबरवर आला असेल तर? मी नाहीये म्हटल्यावर काय वाटलं असेल त्यांना? काळजी वाटली असेल का आईची? निदान क्षणभर तरी? काय पोतेरं झालं होतं आयुष्याचं? दिसायला उत्तम स्थिती असली, तर आतून किती खिळखिळी झाली आहे मी! कशाचीच शाश्वती नाही? मुलांच्या वागण्याचीही?’

माझ्याही नकळत माझे डोळे पाझरायला लागले. नेहेमीसारखेच.

माझी चुळबुळ जाणवून की काय, पण अचानक भाऊ आला आत. आधी अर्थातच दचकले. पण नंतर त्याला ’ये रे’ म्हटले, तशी आला जवळ. ह्याचेही डोळे एकदम मोठे आणि बोलके होते; त्याच्या ’भावा’सारखेच! नकळत मी त्याच्याकडे पाहून हसले. माझ्याकडे एकवार बघून तो पलंगाच्या पायाशीच पसरला.

कसले ऋणानुबंध होते हे? मुकुंदा आणि हे मित्र. बस, इतकीच माझी-ह्याची ओळख. मुकुंदा अतिशय उत्साही, सर्वच बाबतीत. आणि थोडा एककल्लीही. त्याच्या वडिलांचा कसलातरी कारखाना होता. लवकरच कंपनी सोडून त्याने तिथेच काम करायला सुरूवात केली. ते त्याच्यासाठी सोयीचंही होतं, कारण हा स्वभावाने मस्त मौला. कधी दिवसचे दिवस पुस्तकंच वाचत बसावं, संशोधन करावं, कधी वेगवेगळे प्रदेश हिंडावे, चवीनं खावं, वेगवेगळ्या भाषा शिकाव्या अशा गोष्टी त्याला आवडत. त्यापायी कधीकधी तो अचानक गायब होई. मन मात्र एकदम साफ. प्रकट झाला की दिलखुलास गप्पा. ह्यांचं ह्याच्याशी बर्‍यापैकी जमायचं. ह्यांनाही कदाचित एरवीच्या गढूळ आयुष्यात मुकुंदासारख्या निर्मळ स्फटिकाचा सहवास हवाहवासा वाटत असेल. तो येई, तेव्हा मी नेहेमीप्रमाणे पार्श्वभूमीला राहून त्यांचं खाणं, जेवण वगैरे करत असे. पण ह्यांच्या अनेक मित्रांपैकी मुकुंदाच असा एक होता, जो आवर्जून माझी, मुलांची चौकशी करत असे.

आणि आज. कोणत्या भरवशावर मी इथे आले होते? चक्क माझ्या जगातून बाहेर पडून इथे एका परपुरुषाच्या घरातच थेट? वयाच्या साठीत हे असं भलतंच धाडस. पण हे सगळंच किती निर्मळ, शुद्ध होतं. किती सहजपणे मुकुंदाने त्याच्या घरात मला आसरा दिला होता. ह्या वयात जितकी एकांताची गरज असते, तितकीच सोबतीचीही हे त्याने कसे अचूक जाणले होते. आणि काहीही अपेक्षा नाही वर. नुसती रहा. गप्पा मार. हे असंही असतं जगात?

विचारांच्या आवर्तातच डोळा लागला.

**********

सकाळी जाग आली ती भाऊच्या भुंकण्यानेच. दचकून जागी झाले. उठूनच बसले खाडकन! भाऊ आपला पलंगाशेजारी उभा राहून मला उठवत होता, आणि मुकुंदा खोलीच्या दारात!

"उठलीस का? भावड्याला शांतता म्हणून नाही बघ! मी म्हणत होतो त्याला, ओरडू नकोस, आपल्या पाहुण्याबाईंना झोपू दे जरा. ऐकत नाही बघ अजिबात. झोपमोड झाली का? बरं, उठलीच आहेस, तर ये चहा प्यायला."

मला काही समजेपर्यंत भराभर बोलून ते दोघे गेलेही होते! मला मिनिटभर तर सावरायलाच लागलं. तोवर परत भाऊ हजर! मी आवरते की नाही हे पहायला! मला आता त्याची मजा वाटायला लागली. लहान मुलं असतात तसंच चाललं होतं त्याचं. त्याच्या मनासारखं होईस्तोपर्यंत तो शांत बसणार्‍यातला दिसत नव्हता!

साडेपाच वाजले होते. माझी उठायची रोजचीच वेळ. मी भराभर आवरून स्वयंपाकघरात आले. बशीने झाकून कप ठेवला होता, शेजारी बिस्किटं. मुकुंदा डोळे मिटून चहा पीत होता. माझी चाहूल लागताच म्हणाला,

"ये ये. इतका फक्कड चहा झालाय! घे गरम गरम. आहे का गरम बघ, की करून देऊ?"

मला परत रडायला येणार असं वाटायला लागलं! कष्टाने स्वत:वर ताबा मिळवत मी म्हणाले,

"नको, हा बरोबर आहे."

मुकुंदाने परत डोळे मिटून चहा प्यायला सुरूवात केली. मी त्याच्या चेहर्‍याकडे पहात राहिले. ह्याला मी ओळखत होतेही आणि नव्हतेही.

"वा! मस्त झालं चहापान. बरं, येतेस ना तू फिरायला मग? चल लवकर. भावड्या बघ कसा एक्साईट झालाय. ही त्याची आवडती वेळ आहे."

अजूनही मन तयार होत नव्हतं.

"तुम्ही या ना जाऊन, मी आत्ताच तर उठले. मला आवरायला वेळ लागेल जरा."
"बरं."
"कधीपर्यंत याल?"
"आम्ही येतो की सात-साडेसातपर्यंत. भावड्या काय, रिकामा सोडला तर दिवसभरही उंडारेल. मलाच नाही पळवत त्याच्यामागे आता!" मुकुंदाने प्रेमाने भाऊला टप्पल मारली. दोघेही गेले. घर एकदम शांत झालं.

बाहेर उजाडत होतं.

**********

काय करावं बरं आता? मला सुचलंच नाही पटकन. एरवी माझ्या घरी मी ह्याचवेळी उठत होते. केर, पाणी भरणे, स्वत:चं आवरणं ह्यात वेळ जात होता. इथे काय करावं नक्की? काय केलं तर मुकुंदाला चालेल किंवा चालणार नाही? मी पटकन मला दिलेल्या खोलीत आले. ही तरी नक्कीच आवरून ठेवावी. आणि बाहेरचीही. आणि स्वयंपाकघरही. मुकुंदाच्या खोलीत मात्र डोकावण्याचं धाडस होईना. कसलातरी प्रचंड संकोच वाटत होता. विचार झटकून मी कामाला लागले. ते सोपं होतं. भाऊची बाहेरची जागा पाहिली. साधं पोतं होतं बिचार्‍याचं आणि दोन ताटल्या ठेवल्या होत्या शेजारी. मला अपराधी वाटलं अगदी. मी काल येऊन इथे गाद्याबिद्यांवर झोपतेय आणि हा बिचारा पोत्यावर! बाहेरच्या खोलीत मधला टीपॉय, शेल्फ, कपाटं असं सगळंच कागद, पुस्तकं, वर्तमानपत्र ह्यांनी भरलेलं होतं. जुनीच होती सगळी. कशाला गोळा करून ठेवला होता पसारा कोण जाणे! कपाटाखाली धूळ होती, कोपर्‍यात जळमटं होती. काय काम करत होती बाई आणि मुकुंदाचं किती लक्ष होतं दिसतच होतं! स्वयंपाकघराची अवस्था काही वाईट नव्हती, पण विस्कळित झालं होतं सगळं. कुठेही काहीही होतं.

मी मनातल्या मनातच सगळं आवरलं. मी कालच आले होते इथे, कशाकशाला हात लावणार? ’बायकांची धाव स्वयंपाकघरापर्यंत! काय ते इथेच रमा. बाहेर येऊन बुद्धीची सालपटं काढू नका सगळ्यांसमोर!’ अवचित ह्यांची वाक्य कानात ऐकू आली आणि अवसानच गेलं! किती वर्ष अजून ते ओरखडे दुखणार होते? इतके जुने झाले तरी घाव करायची ताकद त्यांच्यात अजूनही होती. आणि मी तेव्हाइतकीच असहाय!

**********

सात वाजताच हे दोघं आले. गॅलरीतून दिसले येताना.

"लवकर आलात?"
"हं. भावड्याला तुझी आठवण येत होती बहुतेक. थोडं फिरलो आणि परतच यायला निघाला."

भाऊ पायात होताच. खाली बसून मी त्याच्या अंगावरून हळूच हात फिरवला. तसा तो लाडात येऊन एकदम अंगावर आला. मी एकदम हेलपाटले. कोणतंच प्रेम सोसायची सवय नव्हती!

"ए भावड्या, अरे हळू. काय अंगावर उड्या मारतोस? जा तुझ्या जागेवर जाऊन बस. सुलक्षणाबाई, परत चहा पिणार का? मघासारखाच फक्कड?"
"मी करते."
"अगं मी करतो रोजच."
"मला करू दे." माझा आवाज जवळजवळ अगतिक.
"बऽऽरं. त्या डब्यात पाव असेल. भाऊही चहा ब्रेड खाईल. नाश्ता गीताबाई करतील. येतीलच आता. "
"अगंबाई, त्यांना काय सांगशील? मी कोण आहे?" माझा स्वर धसकलेला.
"त्यांना कशाला काय सांगायला हवंय? माझं घर आहे. त्यांना विचारून लोक येत नाहीत इथे!" मुकुंदा जरा रागावलाच.

पण तसं नसतं ते. कामवाल्यांना सर्व चौकशा असतात आणि त्यांचं निरसन तिथल्या तिथेच झालेलं बरं असतं. अर्थात, हे मुकुंदाला समजावण्यात अर्थ नव्हता.

"बरोबर आहे तुझं. तरीपण त्यांना सांगताना, मी तुझ्या लांबच्या नात्यातली आहे असं सांग आणि दोनचार दिवस माझ्या काही कामासाठी आलेय असंच सांगू आपण." मी जरा ठासूनच सांगितलं.
"का? नातेवाईक कशाला? माझी मैत्रिण आहेस असं सांगितलं तर?"

मी घाबरूनच त्याच्याकडे पाहिलं. तो हलकं हसत बघत होता माझ्याकडे. मी डोळे मिटून घेतले.

**********

सुमनबाई आणि नंतर येणारी गीता ही मुलगी. मी फारशी त्यांच्या वाटेला गेलेच नाही. लांबच राहिले. उगाच एकातून एक निघत बसतं मग. त्या बघत होत्या माझ्याकडे, पण मी मुद्दामच लक्ष दिलं नाही. गीताला तेवढ्या वाढीव दोन पोळ्या करायला सांगितल्या आणि स्वयंपाक कमी तिखट. तिची एकूण पद्धत बघता तिला दोन गोष्टी सांगायचा मोह होत होता, पण निकराने तो आवरून मी तिथून बाहेरच पडले. माझं आवरलं, कपडे वगैरे धुवून टाकले. भाऊ फिरून आल्यानंतर खाऊन पडला होता, मुकुंदा त्याच्या खोलीत गुडुप होता, आवरत असावा तोही. दहापर्यंत त्या दोघी गेल्याही. मी बाहेरच्या खोलीत पेपर वाचत बसले. इतक्यात मुकुंदाही आला बाहेर.

"हं. आता मी माझा दिनक्रम सांगतो तुला. तो सांगायचा राहिलाच, नाही का! मी आठवड्यातून तीन दिवस इथल्या कॉलेजमध्ये जातो शिकवायला. साधारण चार तास मोडतात माझे त्यात. आज आणि परवा मी मोकळा असतो, पण आपली फॅक्टरी आहे, तिथे मारतो चक्कर. जवळच्या गावात काही प्रकल्प चालू आहेत तिथे जाऊन येतो, काही मदत करतो थोडी. हे सगळं दिवसा. संध्याकाळी आपण घरी. मी आणि भाऊ. आणि आता तू."

असं काही ऐकलं, की मला एकदम गुदमरल्यासारखं व्हायचं. इतका आपलेपणा कसा दाखवतोय का? मी पाहुणी आहे फक्त. पाहुणी. मला उगाचच अशा बोलण्यातून वेगळ्या छटा दिसत होत्या का आत्तापर्यंत न दिसलेल्या? ह्या बोलण्याला काही अर्थ होता खरंच? की थट्टा करायची सवयच होती त्याला?

"तू इथे फक्त आराम करायचास. माझ्या खोलीत चिकार पुस्तकं आहेत. गाण्यांच्या, सिनेमांच्या सीडी आहेत. गाणी ऐक, सिनेमे पहा. भाऊलाही सोबत मिळेल. कंटाळतो बिचारा मी नसताना. तू त्याच्याशी गप्पा मार. अगदीच कंटाळा आला, तर स्वयंपाकघरात लुडबुड कर. भाऊ तसं शक्यतो काहीही खातो." डोळे मिचकावत आता मुकुंदा मोठ्यानं हसला. मलाही हसू फुटलं. लगेच शेपटी हलवत भाऊही उठून आला आमच्यात.

"परवा तूही चल माझ्याबरोबर. छान आहे तो परिसर. लहान उद्योजक आहेत, त्यांना काही सल्ले हवे असतात ते देतो. दिवसभराची ट्रिप झाल्यासारखं होईल. माझी इन्डिका आहे, त्याने जाऊ, काय?"

मी एकदम घाबरले. फिरायला? असं राजरोस?

"नाही. नको. मी कशाला? मला काही कळत नाही त्यातलं." मी झटकून टाकायचा प्रयत्न केला.

"किती दिवस घाबरून राहणार आहेस घरात? तिथेही तशीच होतीस, म्हणून तुला मुद्दाम आणलं ना इथे. Have a life सुलु! काय प्रॉब्लेम आहे तुला? तुझ्यावर काहीही जबाबदारी नाही, तू कोणालाही बांधील नाहीस, मग का असं कोंडून ठेवलं आहेस स्वत:ला? आतून, बाहेरून बंद वाटतेस मला तू. मोकळी हो! कम ऑन! ते काही नाही, तू यायचंस माझ्याबरोबर. उद्या सकाळपासून रोज फिरायला आणि परवा थेरगावलाही. आणि नंतरही मी जिथे जिथे म्हणेन तिथेही." तो थोडा उत्तेजित झाला बोलता बोलता.

मी नुसतीच खिळून बसले होते एका जागी. त्याचा आग्रह एकाच वेळी हवाहवासाही वाटत होता आणि नकोही वाटत होता. असं हक्काने मला जगायला शिकवलंच नव्हतं कोणी. मला जमलं असतं का? माझी योग्यता होती का तेवढी?

"किती वर्ष बघतोय मी तुला सुलु! पहिल्यांना सुरेश तुला घेऊन आला होता, तेव्हाच तुझा प्रसन्न निष्पाप चेहरा मला फार आवडला होता. नंतर तुझा स्वभावही तसाच आहे हे कळत गेलं आणि एक अनामिक बंधाने तुझ्याशी बांधलो गेलो मी, कायमचाच! सुर्‍या तुझ्यावर करत असलेला अन्यायही मला दिसत होता. अक्षरश: माकडाच्या हाती रत्न गवसलं होतं! पण तू त्याची बायको होतीस सुलु. तू दुसर्‍या कोणाचीतरी बायको होतीस! नंतर जेव्हा जेव्हा मी तुला भेटलो, तुझा दिवसागणिक बदललेला चेहरा, तुझी गेलेली रया, तू सोसत असलेले वाग्बाण मला स्पष्टपणे दिसत होते. असं वाटायचं की तुला गदागदा हलवावं, आणि सांगावं की इतकं सोसू नकोस. जरा ठाम राहून सुर्‍याला वठणीवर आण. सुर्‍याला मी काही बोलू शकत नव्हतो, पण मी त्याला चांगलाच ओळखत होतो. तुझ्या संसारानं केलेली तुझी दुर्दशा मला सहन व्हायची नाही. शेवटी, तू आणि तुझं नशीब म्हणून मी तुमच्या, तुझ्या आयुष्याच्या बाहेरच पडलो. खूप फिरलो, खूप काम केलं, माझ्याही आयुष्यात दोन जणी येऊन गेल्या. म्हणलीस, तर अगदी मनासारखं जगलो. पण आई जेव्हा जेव्हा लग्नाबाबत छेडायची, तेव्हा तेव्हा तुझाच चेहरा डोळ्यापुढे यायचा. एक कळ उठायची. मग तो विषय टाळायचो."

बोलता बोलता खोलीत एक शांतता पसरली.

मला सगळं समजायला, शोषून घ्यायला वेळच लागला. मुकुंदासारख्या अत्यंत बुद्धिमान, स्कॉलर माणसाला माझ्यासारख्या सामान्य बाईबद्दल इतकं काही वाटत होतं? इतकं की त्याने स्वत:च्या लग्नाचा विषय टाळावा? हे विलक्षण होतं काहीतरी. अविश्वसनीय असं. एका क्षणात मला एकेक मागचे अर्थ लागायला लागले. त्याने कायमच मला केलेली मदत, दाखवलेला सहृदयपणा, आत्ताही स्वत:च्या घरात मला आसरा देणं, खुल्या मनाने माझं स्वागत करणं. पण वयाच्या ह्या वळणावर हे किती अवघड होतं हे त्याला समजत नव्हतं का? मी मनाच्या आंदोलनांमध्ये अगतिक झाले अगदी!

"दोन वर्षापूर्वी सुर्‍या गेला आणि खरं सांगायचं तर मला आनंदच झाला, तुझ्यासाठी. तुझी सुटका झालीये सुलु. मोकळा श्वास घे आता भरभरून. आयुष्याने आपल्याला एक नवं दान दिलं आहे! मी तर एकटाच होतो. पण आता तूही विनापाश आहेस. आयुष्यभर दबून राहिलीस. आता तरी मनासारखं जग. मला मनापासून तुझ्यासाठी काहीतरी करायचंय. तुझ्यात एक ऊर्जा आहे, माहिते तुला? तुझ्या स्वभावातला मृदूपणा मला आश्वासक वाटतो, मला प्रेरणा देतो तुझ्यासाठी काही करण्याची. एकच दिवस तू इथे आहेस, पण घराला एक ऊब आलीये, ती जाणवतेय ना तुला? सुलु! तू एक अनमोल रत्न आहेस खरंच, पण त्याची तुला जाणिव नाहीये. माझी मनापासूनची इच्छा आहे, की तू आता शांतपणे सुखी जीवन जगावंस. आपण दोघांनी मिळून एक आयुष्य जगूया! लोक काय म्हणतील ह्याची मला फिकीर नाही, हे म्हातारपणातलं थेरही नाही. मी अगदी मनापासून सांगतोय सुलु. लगेच झुगारून देऊ नकोस, विचार कर, निर्भय हो आणि विचार कर!"

त्याच्या बोलण्यातला आवेग सहन न होऊन मी तीरासारखी उठून माझ्या खोलीत गेले आणि पलंगावर बसून हमसाहमशी रडायला लागले. दुसरं केलंच काय होतं मी आयुष्यात? लग्न झाल्यापासून हे, सासूबाई आणि नंतर मुलं. दुबळी होते मी, अत्यंत दुबळी. सासूबाई, ह्यांच्यापुढे तर होतेच, पण दुर्दैवानं मुलांनाही घडवू नाही शकले नीट. तेही बापाचाच वारसा घेऊन आले दोघे. तुसडे, अबोल, एकलकोंडे. वडिल आणि आजीचं बघून तेही तसेच शिकले. माझा उपयोग फक्त कामासाठी. एका शब्दाने प्रेम नाही की कौतुक नाही. नंतर त्याचं वैषम्यही वाटेनासं झालं. सवयच झाली. ह्यांनी सांगावं, ते आपण करावं, मुलं म्हणतील ते ऐकावं, बस्स. मलाही काही स्वत्व आहे? आवडीनिवडी आहेत? साधा टीव्हीही मी माझ्या आवडीने नाही पाहिला. आणि मुकुंदा काय म्हणायला लागला हे? Live a life! कधी रे? हौसेमौजेचे, आवडीनिवडीचे दिवस सरले कधीच. मन म्हणजे काळी पाटी झाली आहे, जिच्यावर आता काहीही उमटत नाही! जोडीदाराबरोबर काही वाटून घ्यायचं असतं, आनंद-दु:ख सांगूनबोलून मोकळे करायचे असतात, एकमेकांना आदर देत हळूवार प्रेम करायचं असतं. कधी वाचलं होतं हे, की सिनेमात पाहिलं होतं एखाद्या? पण आता जमेल का हे खरंच? मन बंड करून कधी उठलंच नाही. आता जमेल का त्याला? कामवाल्या बाईलाही बिचकून असलेली मी, असे सगळे बंध झुगारून देऊन मला वाटेल तसं जगू शकते का खरंच?

इतक्यात भाऊ आत आला आणि माझं लक्ष वेधून घेण्यासाठी भुंकला. मी वर पाहिलं. मुकुंदाही दारात उभा होता. माझ्या अवताराकडे बघत तो म्हणाला, "सुलु, सॉरी. अजून दु:खी होऊ नकोस, प्लीज.पण आता भाऊला भूक लागली आहे. त्याला जरा पोळी दे."

इतकंच म्हणून तो उलटा वळून गेलाही.

मला नवल वाटलं. भाऊला रोज पोळी कोण देत होतं? मी तर कालच आले होते. त्यातली गोम कळायला मला एक सेकंद लागला. मोठा श्वास घेत मीही बाहेर आले. मगाचचा ताण नाहीसा झाला होता.

**********

"ये ना आत, इकडे. कोणती पुस्तकं वाचायला आवडतात तुला? ही बघ, इथे इंग्रजी, मराठी सर्व पुस्तकं आहेत. ही पाहिलीस, ही तर दादांची पुस्तकं आहेत चक्क! एकदम दुर्मिळ. त्यात मला वाटतं गीतारहस्यही आहे." असं तो म्हणेपर्यंत त्या कपाटातून दोन पुस्तकं ठप्पकन खाली पडली! आणि ही म्हणे दुर्मिळ पुस्तकं! मला हसू आलं, मुकुंदाचा चेहरा पाहण्यालायक झाला होता.

"हां, थोडं आवरायला झालंय हे सगळंच." त्याने लगेच सावरून घेतलं. "तर ही पुस्तकं आणि हो, लायब्ररीही लावली आहे. तिथेही उत्तम पुस्तकं मिळतात, नवी, जुनी. पुस्तकं वाचायला आवडतं ना? नसेल तर, तिथे मासिकंबिसिकंही आहेत. आणि इथे सिनेम्याच्या सीडी. मला आपल्यावेळचे सिनेमे जास्त आवडतात. त्यामुळे ते आहेत आणि खूपसे इंग्लिशही आहेत. काही परदेशी भाषातलेही आहेत. तू ना फ्रेंच शिक. इतकी सुंदर भाषा आहे. आणि ही इथे मला लागणारी पुस्तकं वगैरे. तू आता माझ्यावर दया दाखवून ते कपाट आवरशील, नाही का? पण इथे हात नको लावूस प्लीज. मी सर्व खुणेने नीट ठेवलेलं असतं आणि मला ते सापडतंही बरोब्बर. आणि कम्प्यूटरवर थोडी धूळ असली तरी चालते, लगेच झटकायला जाऊ नकोस ती."

मी गंमतीनं नुसतं ऐकत होते. किती उत्साहाने तो बोलत होता सगळं. हे कर, ते नको. इतकं हक्कानं? प्रथमच ह्या हक्काच्या भावनेचा आपल्याला काही काच होत नाहीये हेही मला जाणवत होतं.

**********

सकाळी हवा चांगलीच गार होती, पण प्रसन्न गारवा होता, बोचरा नाही. मुकुंदा जिथे राहतो, ती हवाही ऊबदार झाली असणार . . . माझ्या मनात उगाचच एक चुकार विचार येऊन गेला . . . आज हिय्या करून मीही सकाळी ह्यांच्याबरोबर फिरायला बाहेर पडले होते. पण भाऊ कधीच लांब गेला होता आणि त्याच्यामागे मुकुंदाही. मी आपली रमतगमत चालले होते. खूप मोकळं, आनंदी वाटत होतं. थोड्या अंतरावर मला मुकुंदा कोणाशीतरी बोलताना दिसला. मी त्याच्यापर्यंत पोचले.

"सुलु, हे कॅप्टन गुप्ता. ह्यांची डॉली आणि आपल्या भावड्याची चांगली दोस्ती आहे हां . . ." हसत हसत तो म्हणाला. गुप्ताही हसले.
"आपको अच्छे लगते है डॉग्ज? हमारी मिसेस तो अभीभी दूरही रहती है! But Bhau is a fantastic dog!"

मला प्रश्न विचारताना ह्यांनी त्यांच्या बायकोचा उल्लेख का केला? मी उगाचच अस्वस्थ झाले. मुकुंदाने ताबडतोब त्यांना स्पष्टीकरण द्यावं असं मला वाटलं, पण त्याचा चेहरा अगदी नॉर्मल होता. त्याला कळलंच नव्हतं, की कळूनही न कळल्यासारखं करत होता, कोण जाणे!

"हां, भाऊ बहुत अच्छा डॉग है. मैं तो दो दिनोंसेही उसको जानती हूँ, लेकिन अच्छी दोस्ती हुई है." मी माझ्या परीने सांगून टाकलं . . .
"अच्छा अच्छा. ठीक है. मिलते है" असं म्हणते गुप्ता निघाले.
"ते काय समजले असतील? माझी ओळख का नाही करून दिलीस त्यांच्याशी?" मी घुश्शातच त्याला विचारलं.
"काही समजले नसतील. आणि समजू देत काय हवं ते. मला इतके लोक भेटतात रोज, सगळ्यांना काय सांगायचं? हातात पाटी धरूनच फिरावं लागेल" त्याने उडवून लावलं.
"म्हणूनच मी यायला नको म्हणत होते!"
"सुलु!" इतकंच म्हणत मान हलवत तो पुढे निघून गेला.

मला चुटपुट लागून राहिली. तो म्हणत होता त्यात तथ्य होतंच. पण मलाच मनातून अपराधी वाटत होतं. मला नक्की इथे आवडत होतं की नाही? काल मुकुंदाने त्याचं मन मोकळं केलं. त्याने मला ’पाहुणी’ म्हणून काही दिवसांसाठी आणलं नव्हतं. त्याची इच्छा मी कायमच इथे रहावं, त्याच्यासोबत अशी होती. मी ठाम राहिले असते, तर त्याने लग्नही केलं असतं माझ्याशी. पण माझाच काय दृष्टीकोन होता ह्या सगळ्याबाबत? हो, मनातून मुकुंदाने मोकळ्या मनाने मला त्याच्या जगात सामावून घेणं, माझं दुखावलेलं मन जोडायचा केलेला प्रयत्न, मला देऊ केलेलं नवीन आयुष्य हे सगळं मला हवंहवंसं वाटत होतंच. पण चाळीस वर्षाचा संसार, त्यायोगे जोडली गेलेली माणसं, खुद्द माझी मुलं हे सगळं एका फटक्यात सोडून देण्याइतकी मी सक्षमही नव्हते आणि खंबीरही. लोक सहजपणे एखादा शेरा मारणार. तो हसतमुखाने झेलून सोडून देता यायला हवा. मुकुंदाला ते सहज जमत होतं. माझ्यासारख्या दिवाभीताला कसं जमलं असतं? मग इथे राहणं ह्याला अर्थ काय? म्हणजे मुकुंदा म्हणतो त्याला मूक संमतीच नाही का? तसं असेल, तर गुप्तांच्या साध्या वाक्यावर संशय घ्यायला नको. स्वत:च्या निर्णयावर ठाम रहायला हवं!

पुन्हा एकदा द्वंद्वात अडकले मी. कोणताही एक निर्णय घेणं आणि तो समर्थपणे निभावणं ह्याला किती मोठ्या मानसिक बळाची आवश्यकता असते हे आता समजत होतं.

**********

मनात आंदोलनं चालू होती, तरी पुढचा दिवसही आधी ठरवल्याप्रमाणेच घालवायचा इतपत निर्णय तरी घेतला मी. मुकुंदाबरोबर फॅक्टरीत गेले नाही तर तो फारच नाराज झाला असता. शिवाय, काल रात्री मी नवीन आयुष्याचा कानोसा तरी घेऊया असं ठरवलं होतं. एक मात्र होतं, की लोकांकडे दुर्लक्ष करून जगणं मला जमण्यासारखं नव्हतं. त्यांना सामोरं जाण्याचंच बळ गोळा करावं लागणार होतं. एका गुप्तांना भेटून तातडीने तो निर्णय खोडण्यापेक्षा, अजून चार जणांना सामोरे जाऊन नक्की कौल घेऊ आपल्या मनाचा असं ठरवलं.

आज भाऊही सोबत होता. मुकुंदाचा चेहरा एक वेगळीच चमक दाखवत होता, खूप उत्साही दिसत होता. गीताकडून मीच पुढाकार घेऊन पराठे करून घेतले होते. एरवी मुकुंदा फॅक्टरीतच खायचा म्हणे. आज मी हा पर्याय सुचवल्यावर लगेच पसंत पडला त्याला. ’आधी का नाही सुचलं काय माहित’ असं म्हणाला फक्त! आणि हसला. तो हसला की त्याच्या चेह‍रा दिवे लावल्यासारखा उजळून निघायचा. मी फक्त बघत रहायचे अशावेळी त्याच्याकडे.

गाडी तोच चालवत होता. त्याच्या शेजारी मी. मागे भाऊ. मीही मागेच बसणार होते सवयीने. खरंतर. आमच्या गाडीत पुढे तर कधी बसलेच नाही. हे चालवायचे आणि आधी सासूबाई आणि त्यानंतर मुलंच बसत. ती जागा ’मालकिणीची’ असते म्हणे. म्हणजे, अर्थातच माझी नाही, हे मला गाडी नवी आली तेव्हाच स्पष्टपणे सांगण्यात आले होते. ’मालकिणीचा नुसता तोरा मिरवायला काय जातंय? योग्यता नसताना एखाद्याला सगळं कसं आयतं मिळतं बघा!’ ह्या शब्दात! प्रयत्न न करूनही एकन् एक शब्द मला स्पष्टपणे आठवत होता.

पण मुकुंदाने ’मी ड्रायव्हर आहे का?’ असा प्रश्न आल्यावर निमूटपणे पुढे बसले. किती दिवसांनी कारमध्ये बसले होते. ह्यांची गाडी अंबर घेऊन गेला होता. त्यानंतर मला गाडीत बसण्याची कधी वेळच आली नाही. मी माझ्याच विचारात होते. मुकुंदानेही मला उगाच प्रश्न विचारले नाहीत. सीडीप्लेयरवर छान गाणी लावली होती. प्रवास शांततेतच झाला.

थेरगाव शहरापासून पन्नासएक किलोमीटरवर होतं. परिसर तसा उजाडच होता. तिथे खूप कारखाने होते छोटे छोटे. इथे शेतीची अवजारं प्रामुख्याने तयार होत. आम्ही तीन कारखान्यांत गेलो. सगळीकडेच मुकुंदाला खूप मान मिळत होता. तोही छोटेखानी ऑफिसात न जाता, थेट शॉपफ्लोअरवरच जात होता. त्या वेळात मी आणि भाऊ आवारात हिंडलो. मी तर नुसतं पहात होते सगळीकडे. मुकुंदामुळे मलाही लोक मान देत होते. चहापाणी विचारत होते. आणि मी अधिकाधिक संकोचत होते. ’साहेबांबरोबर आलात का? आपण साहेबांच्या कोण?’ असे प्रश्न मला कोणी विचारले नाहीत, पण नजरेत दिसले. मी आणलेलं उसनं अवसान हळूहळू ओसरू लागलं. ’हे काय समजत असतील? मुकुंदाला किती मान आहे इथे. माझ्यामुळे त्यावर डाग नको लागायला’ असं वाटायला लागलं. हळूहळू मला थकवाही वाटू लागला. कधी एकदा लोकांपासून दूर, घरी जातोय असं वाटायला लागलं. पण घर कोणाचं? ते, जे मी बंद करून आले होते, ते, की मुकुंदाचं? डोळे बंद केले आणि डोळ्यापुढे ते जुनंच घर आलं. खाडकन डोळे उघडले मी.

"चला, निघूया? दमलेली वाटत आहेस. काय झालं?"
"नाही, काही नाही."
"बरं वाटलं की नाही थोडं बाहेर पडून? पण आज मी जरा बिझीच होतो. दोनचार कामं निघाली. कंटाळलीस का?"
"छे! कंटाळा कसला? तुझ्या अगदी आगेमागे करतात की हे लोक."
"हां. थोडेफार सल्ले देतो ना मी, ते फायदेशीर असतात असं समजलंय त्यांना, म्हणून मानबिन. त्यात काय इतकं? मुलं हुशार आहेत सगळी, स्वत:च्या हिंमतीवर स्वत:च्या पायावर उभी रहात आहेत. आपण जमेल तशी मदत करायची."
"पण घेणार्‍याची झोळीही त्या ताकदीची हवी ना रे."

ह्यावर त्याने फक्त माझ्याकडे बघितलं. काहीच बोलला नाही. भाऊशी काहीतरी बोलत त्याने गाडी परत वळवली.

**********

घरी यायला संध्याकाळ झाली. दिवसभराचा शीण आणि मानसिक थकवा जाणवू लागला. डोकं ठणकायला लागलं होतं. गेल्यागेल्याच मी मुकुंदाला सांगून जरा पडण्यासाठी माझ्या खोलीत आले. अजूनही आमच्या ह्या विलक्षण नात्याबद्दल मनात संभ्रम होता. मुकुंदाइतकी सहज मी का नव्हते? इतक्यात माझा मोबाईल वाजला, तशी मी दचकलेच!

"हॅऽऽ हॅलो."
"हं. मी अंबर. कुठायस तू?"

अंबरचा दरडावल्यासारखा आवाज ऐकून मला प्रचंड भीती वाटली. काय सांगू आता ह्याला?

"अं?"
"चार दिवस म्हणे घर बंद आहे. शैलात्याचा फोन आला होता मला. घर का बंद आहे असं तिने मला विचारलं. आता मला काय माहित का बंद आहे ते? तू कुठे गेलीस घर बंद करून? कुठायस आत्ता?"

"मी . . . मी ना . . . एका मैत्रिणीकडे आलेय रे रहायला."
"कशाला? आणि न सांगता? किती दिवस आहेस अजून? उद्या परत ये. सोनू-दिपूला तुझ्याकडे ठेवून जरा बाहेर जायचंय आम्हाला. इथे हिच्या घरी सोय होत नाहीये. तुझी गरज असली की बरोब्बर नसतेस तू. ये आता, झाले चार दिवस. सकाळीच येतोय आम्ही."

इतकं म्हणून त्याने फोन ठेवलाही!

संतापाची तिडीक गेली डोक्यात! अरे! विचार तरी, की आई तू कशी आहेस? ठीक आहेस ना? का गेलीस अशी अचानक? सरळ ऑर्डरी सोडायच्या समोरच्याचा विचार न करता! गरज लागली की आई, एरवी तिला त्रास नको ह्या नावाखाली तिचे नखही आठवत नाही! काय मुलं ही! आणि ह्यांच्यासाठी मी राबावं? आणि इथे मुकुंदा एक ऊबदार आयुष्य दोन्ही हात पसरून देऊ करत आहे, तर त्याला खुल्या मनानं सामोरं जाण्याचीही कुवत नाही माझी! मी खरी करंटी!

सहनशक्तीच्या पलिकडलं होतं सगळंच. एक माणून म्हणून, एक बाई म्हणून, एक आई म्हणून, सर्व जागी मी कमीच पडले होते. आयुष्याचा गोषवारा मांडला तर नशिबात आलेल्या दु:खातच जगण्याची धन्यता मानली मी, कधी त्याविरुद्ध आवाज उठवला नाही. मग काय हक्क होता मला आजही दु:खी होण्याचा? मी स्फुंदून स्फुंदून कधी रडायला लागले हे मलाच कळलं नाही. संपूर्ण पराभवाची भावना प्रबळ होती. माझ्या आवाजाने आधी भाऊ आणि मग मुकुंदा आत आले असावेत. मला तर भानच नव्हतं.

मुकुंदा एकदम जवळ आला.

"सुलु, सुलु, सुलक्षणा! भानावर ये. काय झालं? इकडे माझ्याकडे बघ. शांत हो, शांत हो. थांब मी पाणी आणतो."

भाऊही अस्वस्थ झाला होता. टक लावून कान उंचावून माझ्याकडे बघत होता. मला स्वत:चीच लाज वाटली. मी पटकन सावरले. मुकुंदाने आणलेलं पाणी प्यायले. चेहरा साडीला पुसला.

"काय झालं सुलु?" त्याने अगदी मृदूपणे विचारले. हा स्वर, ज्याची अपेक्षा मला अंबरकडून होती. परत माझे डोळे भरून यायला लागले. पण निग्रहाने मी ते पुसले.
"काही नाही रे. असंच होतं बघ आजकाल. जुनंजुनं काय काय आठवत बसते आणि मग ते असह्य होतं. मी घाबरवलं ना तुला? सॉरी!"
"सॉरीचा प्रश्न नाही सुलु. पण हे इतक्या आवेगाने रडणं, नक्कीच ही खूप खोल जखम आहे. पण ती उकरून काढू नकोस, त्याने जास्त त्रास होतो. तिच्यावर खपली धरूदे. हळूहळू ती भरेल. सारखं जुनं आठवत बसलं, की येणार्‍या आयुष्याकडेही आपण तसंच बघतो, उदासीनतेनं. हं? असं नको करूस. काय?" त्याचे समजूतीचे शब्द म्हणजे जणू हळूवार फुंकर. ऐकता ऐकताच मला बरं वाटायला लागलं.

**********

ती रात्र वाईटच गेली. अनेक बाजूंनी नुसते विचार करत होते. अखेर मनाशी काहीतरी ठरवून टाकले आणि त्यावर ठाम रहायचा निश्चयही केला. तोवर उजाडलंच.

मुकुंदा आणि भाऊ उठून फिरून यायच्या तयारीत होते. माझे सुजलेले डोळे आणि एकून अवतार पाहून मुकुंदा स्वत:हूनच म्हणाला, ’आज नको येऊस, विश्रांती घे’. ते गेल्यानंतर मी भराभर स्वत:चं आवरलं. थोडंफार सामान जे काही खोलीभर विखुरलं होतं, ते एकत्र केलं. सव्वासातच्या सुमारास मी चहाचं आधण चढवतच होते, इतक्यात हे दोघं आले.

"या, गरम चहा तयार आहे. भाऊ, दमलास का रे? दूध देते हां." मी त्याचा डोक्यावर हात ठेवत म्हणाले. मुकुंदा चकित झाला.
"मूड वेगळाच दिसतोय. क्या बात है?"

एक मोठा श्वास घेतला मी.

"काल अंबरचा फोन आला होता. मला परत जावं लागेल." इतकंच बोलून मी गप्प बसले.

मुकुंदाचे मोठे डोळे माझ्यावर स्थिरावले. आधी प्रश्नचिन्ह आणि मग सगळी उत्तरं मिळाल्याचे भाव त्याच्या डोळ्यात उतरले.
"अच्छा. समजलं." तो दुखावला गेला होता, हे निश्चित.

"ऐक मुकुंदा. माझीही बाजू ऐकून घेशील? तू मला एका अशा आयुष्याचं चित्र दाखवत आहेस, जे मी कधी स्वप्नात देखील पाहिलेलं नाही. त्या आयुष्याला संपूर्णपणे सामोरं जायला तेवढं बळही हवं आणि तितकं माझ्याकडे नाही, हे मान्य करायलाच हवं. जे काही तीन चार दिवस मी इथे राहिलेय, असं वाटतेय की मी इथलीच आहे. तू, भाऊ, ह्या घराने किती सहजपणे माझा स्वीकार केला. मला खात्री आहे, की उद्या मी आजारी पडले, अगदी अंथरूणाला खिळले तरी तो आजारही तू तितक्याच प्रेमाने स्वीकारशील आणि माझी मुलं माझी काळजी घेणार नाहीत इतकी तू माझी काळजी घेशील. तुझ्याबद्दल माझ्या मनात यत्किंचितही शंका नाही. मला शंका आहे ती माझ्याबद्दलच. तू देऊ केलेल्या आयुष्याचा कितीही मोह पडत असला तरी त्यात नि:संकोचपणे सामावून तर जाता यायला हवं. तेच जमतंय की नाही हे बघण्यासाठी मला थोडा वेळ दे. बाई ही कधीच विनापाश नसते रे! संसार केलेली बाई तर नाहीच. अंबर आहे, अंबरिश आहे. किमान ह्या दोघांना तरी मी बांधील आहे अजूनतरी. ह्या दोघांनी माझी विचारपूस केली नाही, तरी आई म्हणून मी त्यांना असंच सोडू नाही शकत. मला परत जाऊदे. मी पूर्ण विचार करते. आणि जो काही निर्णय घेईन त्यावर ठाम राहू शकेन, इतका विश्वास मला माझ्या स्वत:वरच मिळवू दे. सहजीवनाची लज्जत मला घ्यायची आहे, पण त्यासाठी मी सक्षम आहे का, हे मला तपासू दे. कदाचित ह्या नवीन दानाचा मी नाही स्वीकार करू शकले, तरी तोही निर्णय मला विचारांती घेऊ दे. आणि मला खात्री आहे, की बाकी काही नाही, तरी आपल्याकडे एक उत्तम मैत्री तर कायमच राहू शकते. उतारवयात हेदेखील किती दुर्मिळ आहे! आज वयाच्या ह्या टप्प्यावर आयुष्यच बदलून जाईल असे निर्णय घ्यायची वेळ आली आहे, तो मला पूर्ण विचारांती घ्यायचा आहे."

मी बोलत असता मुकुंदाची नजरही बदलत होती. माझं बोलून झालं, तसं त्याचे डोळे एकदम ऊबदार हसले आणि ते हास्य पूर्ण चेहराभर पसरलं.

"सुलु, I am proud of you. मी तुझा, तुझ्या विचारांचा पूर्ण आदर करतो. पाहिजे तेवढा वेळ घे. फक्त अतीविचार करू नकोस. मी आणि भाऊ तुझी वाट पाहू." असं म्हणून तो क्षणभर थांबला, आणि मग म्हणाला, "तसंही, तू नाही आलीस, तर आम्हीच तुझ्या घरी येऊ, काय? तुला भेटायला गं!" आणि नेहेमीप्रमाणे डोळे मिचकावत हसला.

त्याचं बोलणं ऐकून परत डोळेही भरले, तरी मला हसूही आलं! मूड हलका झालेला पाहून भाऊ लाडाने माझ्याजवळ आला.

"ह्याला काय पोत्यावर झोपवतोस रे. मी माझी एक जुनी मऊ साडी ठेवून जातेय भाऊसाठी. भाऊ, रात्री त्याच्यावर झोपत जा रे."
"ओऽऽके! अजून काय सूचना? चल, सोडायला येतो तुला."
"मुकुंदा. आज नको. मला माझी जाऊदे. लोक काय म्हणतील म्हणून नाही. माझ्यासाठीच."

त्याने हसून फक्त मान डोलावली.

- पूनम छत्रे