व्हीलचेअर

दोस्त है मेरा. बिजनेस पार्टनर भी. अच्छा आदमी है. ही नीड्स समवन टू टेक केअर ऑफ हिम. अ‍ॅक्सिडेंट के बाद काफी बुरे दिन रहे उसके. कर्जा लिया है उसने और व्हीलचेअरपर है अभी. शायद फॉर रेस्ट ऑफ लाइफ, उसकी अमरिकन गर्लफ्रेंड छोड गयी उसे. प्रॉबेबली ही इज ऑफ नो यूज . . . तुम्हे कुछ फरक नही पडेगा . . . जितना चाहे उतना रह सकती हो. उसे या तुम्हे पसंत नही है तो फिर वही काम है मोटल, रेस्टोरंट वगैरा . . ."

borderpng.png

सु

खविंदरसिंग सोधी! - हे नाव माहिती असलेले तसेही त्या गावात फारच कमी लोक होते. अनेक वर्षे तो एकटाच त्या गावात असणारा भारतीय. सगळे गावच त्याला 'व्हीलचेअरवरचा' माणूस म्हणायचे. तोसुद्धा आपले नाव विसरला होता इतके ते रूळले होते. तितकेच व्हीलचेअरवर असणे हेही त्याने मान्य केले होते. सुखविंदरला म्हणजेच व्हीलचेअरवरच्या माणसाला घराचे रिनोव्हेशन करायचे होते. त्याच्या मित्राने, सुप्रितने, पाठवलेली माणसे येतील म्हणून तो वाट बघत होता. दोघा भावांना पाहून त्याला आनंद झाला होता. त्याचे खरे कारण ते दोघे भारतीय होते हे होते.

व्हीलचेअरवरच्या माणसाने घराच्या उजवीकडे आणि मागच्या दिशेने हातवारे केले. मोठ्या आवाजात त्याने कामाबद्दल सांगितले.

"व्हॉट इज युवर प्राईस फॉर रिपेअर अ‍ॅन्ड पेंटिंग?"

wheelchair01.jpgदोघांना कुठे दुरुस्ती करायची असेल त्याची कल्पना आली होती. त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले. त्यांच्यापैकी मोठा जरा उंच आणि तगडा होता; त्याने मजुरीचा दर सांगितला.

" धिस इस टू मच" व्हीलचेअरवरच्या माणसाने त्याला उडवून लावले.
"आम्ही लागणारा माल आणू. त्याचे पैसे तुम्ही देऊ नका" असे त्या दोघांपैकी लहान भाऊ म्हणाला तरी त्या माणसाला पटले नव्हते. थोडा वेळ कुणीच काही बोलले नाही.

"सुप्रितने कहा था इसलिए यहा तक आए"
"सुप्रितने भेजा है इसलिए हम आपको यह काम देने के लिए राजी है " व्हीलचेअरवरच्या माणसाचा हट्ट कायम होता.

मोठा भाऊ शर्टाच्या बाह्यांशी खेळत होता. त्याला बिलकूलच घाई नसावी असे वाटत होते.

"प्राईस डिफरन्स है उसे दोनो बराबर आधा आधा करते है, इससे कम नही "

व्हीलचेअरवरच्या माणसाला काम करून हवे होते हे त्या दोघांनी एव्हाना ताडले होते. त्याचे हे वाक्य ऐकूनही ते दोघे जागेवरून बाजूला झाले नाहीत. दोघांचा बांधा, डोळे , चेहर्‍याची ठेवण यामुळे काही अमेरिकन माणसांना ते स्पॅनिश वाटायचे. समोर कोण आहे ते बघून स्पॅनिश की भारतीय व्हायचे ते हे दोघे ठरवायचे! अमेरिकन माणूस असो की भारतीय त्यांनी अनेकदा मौन स्वीकारले होते. त्यात त्यांचा फायदाच होता. बरीच भारतीय माणसे त्यांना विचारायची "कुठून आलात? पंजाब, गुजरात? बंगाल? की इथेच जन्म झाला आहे तुमचा?" प्रश्न कुठलाही असो ते एकतर गप्प बसायचे किंवा तोंडातल्या तोंडात काही तरी पुटपुटायचे . थोडक्यात त्यांचे भारतीय असणे भारतीय गिर्‍हाईक मिळवण्यास पुरेसे होते.

"दो कोट की बात पक्की है ना? एकसे काम नही होगा" व्हीलचेअरवरचा माणूस म्हणाला. त्यांना ऐकू यावे अशा उद्देशाने त्याने आवाज वाढवला होता. अजूनही दोघे त्याच्याकडे बघत होते. धाकट्याचा चेहरा उभट होता. उंची पाच सात - पाच आठ असावी, डोक्यावर कुरळे केस, पण चष्म्याआड असणार्‍या काळ्याभोर बोलक्या डोळ्यांमुळे लोकांचे लक्ष त्याच्याकडे जात असे. त्याने विटलेली निळ्या रंगाची जीन्स घातली होती. त्या जिन्सवर ऑइल, सिमेंट, पेंट सगळ्याचे ठिकठिकाणी डाग पडले होते. वाळले होते. त्याने पुन्हा एकदा त्यांची फायनल प्राइस सांगितली. त्यावर व्हीलचेअरवरचा माणूस काहितरी बोलेल असे त्याला वाटले. वाट बघत तो पोपडे निघालेल्या किचनमधल्या लिनोलियमवर पाय घासत उभा राहिला. एक काळीकुट्ट मांजर तिथे काही खायला मिळत आहे का ते शोधायला आली. आपले हिरवे डोळे फिरवत तिने जमिनीवर पडलेले छोटे तुकडे, काही कण उचलले आणि गुरगुरत ती बाहेर गेली. जाता जाता तिच्या शेपटीने टेबलावरचा एक कप आडवा पडला. त्या आवाजाने व्हीलचेअरवरच्या माणसाच्या कपाळावरच्या आठ्या वाढल्या. किमतीबद्दल तो आपल्या म्हणण्यावरच पक्का होता. व्हीलचेअरवरच्या या माणसाने घराची डागडुजी किंवा रंगकाम केले होते त्याला बरीच वर्षे झाली होती. आताचे भाव विचारात न घेताच त्याने आपली किंमत सांगितली होती, या दोघा भावांनी सांगितलेली किंमत खरे तर कमीच होती. शेवटी त्या व्हीलचेअरवाल्या माणसाने सौदा मान्य केला. त्याच्या समोर काही पत्रे, काही कागद पडले होते. त्यातला एक कागद पुढे ओढून त्याने त्यावर काहीतरी खरडले. तेवढ्यात लहान भाऊ आम्ही रविवारीसुद्धा कामाला येऊ, असे त्याला म्हणाला.

"डोंट वरी अबाऊट लंच. चायपानी मिलेगा?" मोठ्याने विचारले.

या भारतीय घरात कुणी स्त्री दिसते का याचा दोघे कानोसा घेत होते. व्हीलचेअरवरचा माणूस साठीचा तरी नक्कीच असावा. तो उठून काही करत असेल अशी अपेक्षा नव्हती. त्याच्याकडे बघून तो फार दिवस जगणार नाही असे कुणालाही वाटल असते.

"हां, मिलेगा क्यों नही! " त्याने हसून उत्तर दिले. यावेळी त्याच्यासमोर अमिताचा चेहरा होता. ही भारतीय मुले येणार, आपण त्यांचे कौतुक करणार, त्याने ती कदाचित चिडेल, आदळआपट करेल पण शेवटी त्याचे म्हणणे मान्य करेल याची त्याला खात्री होती. अमिताचा विचार मनात आला आणि त्याचा व्हीलचेअरवरचा हात घट्ट झाला. आधी या खुर्चीचीच सोबत होती. ती आली आणि तिच्यामुळे एकटेपणा दूर झाला. पण ती दिसली की आपण ह्या खुर्चीवर आहोत याचे शल्य अधिकच बोचते. पण दुसर्‍याच क्षणी त्याच्या घरात जागोजागी असणार्‍या अमिताच्या अस्तित्वाच्या खुणांनी, त्याच्याभोवती, त्याच्याकरताच ती इथे राहते आहे या जाणीवेने त्याचे मन भरून आले. दोघे भाऊ तिथे आहेत याचा त्याला विसर पडला होता.

"पेमेंट केश चाहिए, और अभी कुछ एडव्हांस " मोठा भाऊ त्याला म्हणाला. पण सुखविंदर त्याच्याच विचारात होता. म्हणूनच मोठ्या भावाला आपण जे सांगितले ते या माणसाला कळले की नाही असा भाव उमटला होता. भानावर येत व्हीलचेअरवरच्या माणसाने एका ड्रॉवरकडे बोट दाखवले. त्यांना किती पैसे घ्यायचे ते सांगितले.

मोठ्या भावाने तिथे जाऊन तो ड्रॉवर उघडला. पैसे काढून त्याने ते व्हीलचेअरवरच्या माणसाला दिले. हे सर्व करत असतांना त्याला चेहर्‍यावरचे आश्चर्य लपवता आले नव्हते. व्हीलचेअरवरच्या माणसाने पैसे मोजले आणि मोठ्या भावाच्या हातावर ठेवले.

"लेट्स सेलेब्रेट" व्हीलचेअरवरच्या माणसाने दोघांना ग्लास आणि व्हिस्की कुठे आहे ते सांगितले.

पिण्याच्या उर्मीबरोबरच अनेक विचारांचा प्रवाह त्यांच्या मनात वाहू लागला. व्हिस्कीला नाही म्हणायचे? याच्याबरोबर प्यायचे? याने शब्द फिरवला आणि काम दिलेच नाही तर? फारशी ओळख नसताना हा आत बोलावतो आहे तेव्हा जायच की नाही. 'अमरिका है, लडका लडकी दोनोंकी किमत लगती है!’ मोठ्याला त्याच्या एका मित्राचे बोलणे आठवले आणि त्याच्या अंगावर काटा उभा राहिला.

"काम कलसे चालू होगा. आज फ्रायडे है, इट्स ओके टू ड्रिंक. मै घर मे अकेला हूं, बोतल वहा है" त्याने त्यांच्या मनातला विचार नेमका ओळखला होता.

त्याच्या चेहर्‍यावरचा आनंद आणि आपलेपणा बघून दोघा भावांच्या मनातली भिती कमी झाली. त्यांनी पटापट हालचाली केल्या. दोन चार घोट पोटात जाताच व्हिलचेअरवरचा माणूस खूष झाला होता. तो पंजाबातून मुंबईला आणि मुंबईहून इथे केव्हा आणि कसा काही न ठरवता आला, त्याने काय काय काम केले, काय हालअपेष्टा सहन केल्या, त्याला अ‍ॅक्सिडेंट झाला मग त्याचे आयुष्य कसे बदलले याची कहाणी संपेपर्यंत बाटली संपत आली होती. मोठ्याने अगदी तळाला उरलेली व्हिस्की त्या माणसाच्या ग्लासात ओतली. भावाचा आणि त्याचा ग्लास त्याने विसळून ठेवला. त्याशेजारी रिकामी बाटली ठेवली. त्या माणसाचा निरोप घेऊन दोघे बाहेर पडले.

----------

दोघा भावांनी त्यांची हिरवी व्हॅन फाटकातून बाहेर काढली त्याच वेळी एक डॉज रॅम विरुद्ध दिशेने आत शिरली. ती गाडी इतकी हळू जात होती की कुठल्याही क्षणाला बंद पडेल असे वाटावे. लहान भावाने त्याला गाडीत एक स्त्री दिसली असे मोठ्याला सांगितल. मोठयाने त्याकडे थोडेसे दूर्लक्षच केले. खर तर लहान भावाप्रमाणे त्यालाही त्या गाडीत एक स्त्री होती असच वाटले हो्ते पण तो त्याविषयी काही बोलला नाही. एका दुकानात थांबून त्यांनी दोन मोठे लॅडर भाड्याने घेतले. रंग आणि इतर साहित्य कुठे मिळेल हे दुकानदाराला विचारले. दुकानदाराने एक दोन पत्ते सांगितले होते त्यादिशेने त्यांनी गाडी वळवली. त्यांचे निरीक्षण सुरुच होते. ते ज्या रस्त्यावर होते त्याच्या दोन्ही बाजूला विस्तीर्ण शेतजमीन होती. तसेच पुढे गेले की कोपर्‍यात जरा आडवाटेलाच व्हीलचेअरवाल्या माणसाचे घर होते. ही दोघे माणसे न्यू जर्सीच्या दक्षिण भागातून त्याच्याकडे काम मागायला आली होती. डोंगरदर्‍यातून वर खाली जाणारा वळणावळणाचा रस्ता, वाटेत लागणारी अद्ययावत सुखसोयींची वस्ती पार करून ते शेजारच्या राज्यात म्हणजेच पेन्सिल्वेनियात आले होते. पेन्सिल्वेनियाचा तो भाग आधुनिक होता. पण जेव्हा एक एक्झिट घेऊन ते छोट्या रस्त्याला लागले होते , त्यावर अचानक नवी वस्ती सोडून शेतजमीन लागली होती. टॅटमी पोस्टऑफिसच्या एका भागात नवी घरे, जरा आधुनिक वस्ती आणि त्याच्या दुसर्‍या बाजूला शेतकर्‍यांची घरे, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने , पेट्रोल पंप इत्यादी होते. पण सगळ्यावर एक जुनाट कळा होती. सगळा भागच तीसचाळीस वर्षांपूर्वी बांधलेला असेल असे वाटत होते. मुद्दाम शोधल्या तरच आधुनिकतेच्या खुणा दिसत होत्या, त्याही दूरवर. त्या दोघा भावांना दोन आठवडे खूप भटकंती करून काम मिळाले नव्हते. सुप्रितमुळे त्यांना कामे मिळायची. पण गेल्या दोन महिन्यात सुप्रितकडे बांधकामाची कोणतीही कॉन्ट्रॅक्ट्स नव्हती. मिळेल तसे किरकोळ काम करत ते दिवस ढकलत होते. तशा वरवर निर्मनुष्य वाटणार्‍या भागात कुणी रहात असावे अस दुरून वाटलेच नसते, पण सुप्रितने पत्ता दिला होता म्हणून ते निघाले होते. सुप्रितने नकाशा काढून त्यांना माहिती दिली होती, सगळ्या ओळखीच्या खुणा सांगितल्या होत्या. त्यामुळे दोघेही निर्धास्तपणे पोचले होते. सुप्रितला तीन चार दिवसाचे काम असेल असे वाटले होते. पण त्या दोघांनी मात्र व्हीलचेअरवरच्या माणसाला किमान दहा दिवसाचा अंदाज दिला होता.

----------

रायनच्या दुकानातून सामान घेऊन अमिता बाहेर निघाली तेव्हा रायनने नेहमीप्रमाणे हसून तिची चौकशी केली. तिने नाही म्हटले तरी बळेच त्याने तिला एक नोट काढून दिली. अमिताला हसू आले. रायनकडून परत मिळालेले पैसे म्हणजे फक्त तिचे पैसे! सुरुवातीला त्याचा आनंद काही वेगळाच होता. ते दिवस, ते वर्ष कधीच इतिहासजमा झाले होते पण त्याची आठवण मात्र कायम होती. त्या दुकानात येणारी अनेक गिर्‍हाईके दुसरीकडे गेली होती. अमिता तिथेच खरेदी करायची. का ?कशाला? इत्यादी प्रश्न न विचारता ती इथेच येत होती. अमिता गाडीत बसली . तिथे उभे राहणारी तरूण मुले, त्यांची मस्ती याकडे तिने बघूनही न बघितल्यासारखे केले. रायनच्या मुलाचे ऑटो रिपेअर शॉप त्या दुकानाशेजारी होते. तिची डॉज बघितल्यावर त्याने ही एखाद्या पुराणवस्तू संग्रहालयात ठेवायला पाहीजे असे तिला पुन्हा एकदा सांगितले. ती हसली. "माझ्यासारखीच माझी गाडी. दोघी एकाच परिस्थितीत आहोत. जमेल तशी दुरुस्ती कर" एवढे त्याला सांगून ती आजूबाजूला बघू लागली.

काही मुले गाडीच्या बाजूला खेळत होती. तिने गाडी सुरु केल्यावर गाडीमागे मुले किती तरी वेळ गाडीच्या मागे पळत आली. मिरर मधे तिला ती गाडीमागे धावणारी मुले दिसत होती. आपल्याला मुले असती तर?असा विचार मनात यावा याचेच तिला आश्चर्य वाटले. विचार नुसता आला नाही तर मनातल्या मनात तिने सगळ्या शक्यता तपासून बघितल्या. मुलांना वाढवणे म्हणजे खूप धावपळ झाली असती. आपले कष्ट, आपली गरीबी त्यांना वारसाहक्काने मिळाली असती. याने कदाचित मुलांकरता म्हणून जास्त पैसा मिळवायचा आणि त्यांच्याकरता खर्च करायचाही प्रयत्न केला असता. आयुष्याला वेगळे वळण लागले असते हा विचारही तिच्या मनात डोकावला. वाटेत टॅटमी पोस्ट ऑफिस लागले. तिने एक मोठा श्वास घेतला आणि आता या सगळ्या जर तरच्या गोष्टी म्हणत तिने शेजारची पत्रे उचलून पेटीत टाकली आणि ती पुढे निघाली. तिच्या सगळ्या आकांक्षा सहा सात महिने असणा-या थंडीत गोठल्या होत्या असे तिला वाटायचे. पण प्रत्यक्षात तसे झाले नव्हते.

त्या रस्त्यावर विस्तीर्ण शेते, शेतात असणारी मक्याची कणसे, चार्‍यासाठी म्हणून मुद्दाम वाढवलेली काही शेते आणि दोन्ही बाजूला हिरवळ होती. तिचे मन हे सर्व पाहून प्रसन्न झाले. त्यांच्याकडे बघून तिला जाणवल की एका महिन्याने कापणी करतील तेव्हा हातात पैसा येईल पण सगळी शेते ओकीबोकी दिसू लागतील. तिथे असणारी फार्मर्स मार्केटे बंद होतील, शेतीची कामे संपली की वर्दळ संपेल. आधुनिक भागापासून हा भाग अधिकच तुटल्यासारखा होईल. या रस्त्यावर बराच काळ शुकशुकाट असेल.

अगदी आताही तिचे घर असेच एकाकी होते.. त्या रस्त्यावर येता जाताना तिला कधी दुसरी गाडी दिसली नव्हती. कधी तिला दुसरी गाडी येते आहे असे भासही व्हायचे. सुरुवातीला एकटे आहोत याची तिला भीती वाटायची, मग सवय झाली होती. एवढ्या वर्षांनंतर तर गाडी असली काय नसली काय सगळेच सारखे होते.

----------

अमिताने बाहेर जाणारी गाडी बघितली होती. हातात सामान घेऊन अमिता आत आली तेव्हा तिच्या चेहर्‍यावर कोण आले होते हा प्रश्न होता. ती काही विचारणार त्याआधी तिला ओट्यावर विसळून ठेवलेले ग्लास, व्हिस्कीची रिकामी बाटली दिसली. अमिता त्याचा हात पोचणार नाही अशा जागी व्हिस्कीची बाटली ठेवायची. त्याच्या हातातला रिकामा ग्लास पाहून तिच्या चेहर्‍यावरची उत्सुकता रागात बदलली होती. त्याला तिचा राग कळला नव्हता अथवा दिसला नव्हता असे नाही, पण नेहमीच्याच सहजतेने त्याने त्याकडे लक्ष दिले नाही.

"सामान ले आयी अमिता? कहा है लिस्ट और रिसीट?"

सामान म्हणजे चिकन, फिश, बियर आणि व्हिस्की एवढेच त्याला विचारायचे असते. बाकी घरात लागणारे इतर सामान याच्याशी त्याचे देणघेणे नाही. वरून तो या गोष्टी एवढ्या किमतीला का तेवढ्या किमतीला का असा वाद घालतो. रायनकडे गेले की भाव करता येतो म्हणूनच याला नक्की किती पैसे दिले ते विचारता येते, नुसत्या रिसिटने समाधान होत नाही. त्यापेक्षा सुपरमार्केटमधे जावे आणि याच्या हातावर वस्तू आणि बिलाची रिसीट ठेवावी असे तिला अनेकदा वाटे. कुठल्याच गोष्टींबद्दल त्याच्याशी वाद घालून काही फायदा नसतो. त्याच्याशी वाद घालण्याचे समाधान मिळायचे त्यालाही आता बराच काळ लोटला. पण वाद घातला की आपण जिवंत आहोत, आपल्याला सोबत आहे अस वाटते. आपल्या आणि त्याच्या एकत्र असण्याचा वादाशिवाय इतर कुठलाच पुरावा नाही. हा विचार झाला तो मनातल्या मनातच. काही न बोलता तिने वस्तूंची यादी आणि बिलाचा कागद त्याच्या हातात दिला.

"ग्रीन कार . . . हमारे यहा कोई आया था?" तिने विचारले.
"पता नही गाडी का रंग, इंडियन लडके आये थे. बडे अच्छे है, सुप्रितने भेजे है" व्हीलचेअरवरच्या माणसाने उत्तर दिले.
"काम कितने दिनो मे होगा? व्हॉट अबाऊट मनी?" तिने बाहेर जातांना विचारले. गाडीतल्या सर्व गोष्टी अजून घरात आणायच्या होत्या.

"दस दिन , आय गेव्ह अ‍ॅडव्हान्स"
"आर यू गॉन मॅड?" राग याने पैसे दिले याचा नव्हता. सुप्रितचे नाव ऐकल्यावर तिची हीच प्रतिक्रिया असण स्वाभाविक होते.

वीस बावीस वर्षे तरी झाली असतील सुप्रितला पहिल्यांदा भेटलो त्याला . . . बाहेरून सामान आणता आणता तिच्या मनातून खोलवर दडलेला एक एक विचार वर येत होता.

----------

अमिताचा प्रेमविवाह होता पण हळूहळू तिचे आणि तिच्या नवर्‍याचे बिनसत गेले; अमिताचा भाऊही मुंबईत राहायचा. त्याने पंजाबी मुलीशी लग्न केले हो्ते. त्या पंजाबी मुलीचा दूरचा भाऊ म्हणजे सु्प्रित! भावाचे लग्न झाल होते त्यानंतर पुढच्या तीन एक महिन्यातच अमिता माहेरी आली होती. भावाचा संसार आनंदात सुरु होता. दोन तीन वर्षे अमिता त्यांच्याकडेच होती. पण तिचे तिथे राहणे तिला आणि भावजयीलाही पसंत नव्ह्ते. भांडणे, वाद वाढत होते. एकदा सुप्रित अमेरिकेहून आला होता तेव्हा त्याने अमेरिकेत तो करत असलेल्या कामाची माहिती दिली. भावजयीने अमिताला तिथे काय काम करता येईल अशी चौकशी केली. अमिताचे सुप्रितशी बोलणे झाले तेव्हा आपले शिक्षण, आपली कुवत ओळखून अमेरिकेत आया, स्वयंपाकी, नोकर अशा धर्तीचेच काहीतरी काम करता येईल याची तिला कल्पना आली होती. मुंबईत भावाकडे राहून तरी काय वेगळ करत होती ती! अमेरिकेत गेल्याने किमान ती भावाच्या संसारापासून दूर राहणार होती.
भावजयीला नकोसे झालो होतो आणि आपल्या मनातसुद्धा काय वेगळे होते. त्यावेळी एक एजन्सी गाठून दिली होती सुप्रितने. पासपोर्ट व्हिसा सगळे करण्यात त्यांनीच मदत केली. त्या एजन्सीत अनेक गुजराथी, पंजाबी, तेलगू स्त्रीपुरुष तिला भेटले. त्यापैकी काही गेली अनेक वर्षे अमेरिका वारी करणारे, तर काही तिथेच स्थायिक झाले होते. मोटेल, इंडियन रेस्टॉरन्ट, ग्रोसरी स्टोअर जिथे मिळेल तिथे नोकरीची सुरूवात करून ही मंडळी आयुष्य घालवत होती. त्यांच्याशी बोलतांना तिचे नवखेपण, भीती, उत्सुकता लपत नव्हती.

त्यापैकी एकीने तेव्हाच तिला स्पष्ट सांगितले "नथिंग इज फ्री, याद रखना, हर एक चीज की किमत है. तुम्हारा कामकाज, साफसफाई, जो भी है! सबकुछ बिकता है वहा . . . उन चिजो जैसी . . . यू आर वन ऑफ देम." ती त्यावेळी घाबरली होती. पण तिने हा मार्ग स्वीकारायचा ठरवला होता. इतर पर्यायांचा तिने विचार केला नव्हता असे नाही, तो करून हाती काही वेगळे लागेल असेही तिला वाटले नव्हते. तिला वाटायचे आपल्यात हिंमतच नव्हती तरी असे एकदम दूर जायला तरी कशी तयार झाली ती? दुसर्‍याचे सुख एवढे बोचते आपल्याला? एवढे एकच कारण? की कटू अनुभव आला म्हणून सगळ सोडून द्यायचे ठरवले होते? एवढी वर्षे झाली तरी भूतकाळ विसरता आला नव्हता.

----------

"ये लो, पैसे रख दो. जब भी बाहर से आती हो किसी खयाल मे खो जाती हो." व्हीलचेअरवरचा माणूस म्हणाला. ती भानावर आली. तिने पैसे घेतले. ते ठेवायला ड्रॉवर उघडला. ड्रॉवरमधले पैसे कमी झालेले पाहून तिला काय घडले असावे ते लक्षात आले.

"एरवी पैशाचा हिशोब हवा असतो तुला - त्यांनी हे सर्व पैसे नेले असते म्हणजे? तुला मारले बिरले असते तर? इतनी जल्दी भी क्या थी? उन्हे ड्रॉवर क्यो दिखाए?"

सुप्रितचे नाव ऐकताच तिला काही सुचले नव्हत म्हणूनच त्यावेळी ड्रॉवरमधले पैसे याने कसे दिले हा विचार तिच्या मनात आला नव्हता. आता मात्र त्या विचाराने ती भांबावली.

तिच्या चेहर्‍यावर ते दिसले असावे. व्हीलचेअरवरच्या माणसाच्या चेहर्‍यावर हसू होते. मान हलवत तो म्हणाला "इंडियन बॉइज वोंट डू दॅट, सुप्रितने भेजे थे वो भी! तुम्हे भी सुप्रितने भेजा था . . . बीस साल हो गए . . . ".

बाटलीकडे खूण करून आणखी व्हिस्की मागितली.
"संपली आहे. " तिने रागानेच उत्तर दिले.

----------

सुप्रित! दॅट सन ऑफ अ बीच! तिने मनातल्या मनात किमान लाखवेळा हा शब्द त्याच्यासाठी उच्चारला होता.

तुला मी इथे आणले, इथे काम मिळवून दिले, म्हणून त्याचा वेगळा मोबदला मागितला होता सुप्रितने. अमिताने त्याला नकार दिला होता. 'धंद्याला लावले नाही तुला' असे म्हणून शेवटी एकदा ते ओरबाडून घेतले होते सुप्रितने. आपणच होतो का एकट्या? नाही. इतरजणींनी अखेर ते मान्य केले होते. मग आपण का करू शकलो नाही? फक्त तेवढेच असते तर कदाचित मान्य केल असतेही. पण सुप्रित तेवढ्यावर थांबला नव्हता. "आधे घंटे की बात थी, ड्रामा देखो तुम्हारा . . . एनि वे यू डिडंट मेक मी हॅपी . . . नो वंडर तुम्हारे आदमी ने छोड दिया" . . . डोक्यात घण घातल्यासारखे पुन्हा पुन्हा तिला सुप्रितचे वाक्य आठवत होते.

----------

तिन ब्रेड, फिश, दूध सर्व टेबलावर काढून ठेवले. दोन चार फेर्‍यात गाडीतले सर्व सामान आत आणले. जागेवर लावले. फिश करी करता करता तिच्या मनात संताप आणि दु:खाचे कढ येत होते.

अमिताने एका तव्यावर भाज्या फ्राय केल्या. उकडलेली अंडी सोलून ठेवली. काकडी किसून दह्यात घातली.
हाच सुप्रित आपल्याला या माणसाकडे घेऊन आला. सुप्रितशी जोडलेल्या सगळ्याचा तिरस्कार वाटायचा तिला. इथे येण्याची सुरुवातच अशी झाली होती.

"दोस्त है मेरा. बिजनेस पार्टनर भी. अच्छा आदमी है. ही नीड्स समवन टू टेक केअर ऑफ हिम. अ‍ॅक्सिडेंट के बाद काफी बुरे दिन रहे उसके. कर्जा लिया है उसने और व्हीलचेअरपर है अभी. शायद फॉर रेस्ट ऑफ लाइफ, उसकी अमरिकन गर्लफ्रेंड छोड गयी उसे. प्रॉबेबली ही इज ऑफ नो यूज . . . तुम्हे कुछ फरक नही पडेगा . . . जितना चाहे उतना रह सकती हो. उसे या तुम्हे पसंत नही है तो फिर वही काम है मोटल, रेस्टोरंट वगैरा . . ."

----------

तिने भात लावला. त्यादरम्यान त्याने आलेले टपाल पाहिले. नेहमीप्रमाणे कोर्‍या कागदांवर, वह्यांमध्ये तो काहीतरी खरडत होता.

"क्या लिखते हो ?" एकदा अमिताने त्याला विचारले होते.
"युवर फ्युचर" त्याने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिले होते.

ती चिडली होती. "स्वत:चे पहा आधी !" असे म्हणून तिने चहाचा कप त्याच्या पुढे जवळजवळ आदळला होता. त्या कागदांवर हा नक्की काय लिहितो याची तिला सुरुवातीला उत्सुकता असे. तो झोपला की ती त्या कागदांवर एक नजर टाकायची. नांगरणी, पेरणी, गवताचे भाव इत्यादी आकडेमोडी असलेले कागद तिला वारंवार दिसायचे. त्यातून तिला फार काही कळायचे नाही. हळूहळू तिने त्या कागदांकडे बघणे सोडून दिले. त्याने लिहिणे मात्र थांबवले नव्हते.

आताही त्याच्या हातात पेन बघून तिला पुन्हा जुना संवाद आठवला. त्याच्याकडे पाठ करून ती आपले काम करत राहिली. सर्व वेळ तो माणूस व्हीलचेअरवर बसून वस्तू, यादी, किंमत, पैसे, त्याचे पेन्शन यावर बडबडत होता. तिने दोनचार डॉलर इकडे तिकडे केले तरी त्याला कधी कळले नव्हते. रायनकडून मिळायचे ते पैसे ती कुठे लपवायची, कसे खर्च करायची तेही त्याला कधीच कळणार नव्हते. व्हिस्की पोटात गेली की तो पदार्थांच्या चवीविषयी तक्रार करायचा. पण नावे ठेवली म्हणून तो कधी कमी जेवला नव्हता.

----------

काम करता करता अमिताचे लक्ष बाहेर होते. त्या दोघांची गाडी आली. त्या दोघांनी लागणारे सामान बाहेर काढले. दोन्ही लॅडर बाहेर काढले, भिंतीलगत ठेवले. बांधकामाच्या सामानाव्यतिरिक्त गाडीत दोन कप, दोन डिशेस, चमचे, काटे, हॅण्डटॉवेल, दोन उशा, चादरी, पांघरुणे असे सगळे सामान नीट रचलेले होते. गाडी जुनीच होती. ठिकठिकाणी पोचे आलेली. रंग गेला होता तिथे नवा रंग दिला आहे हे कळत होते. त्या दोघांजवळ इन्शुरन्स असेल? आणि व्हेईकल टॅक्स तरी भरला असेल का? गाडीवर रजिस्ट्रेशन आणि इन्स्पेक्शनची स्टिकर्स मात्र दिसत होती. बहुधा ती जुनी आणि मुदत संपलेली असतील असे अमिताच्या मनात आले.

"चाय शरबत का देखो , लडके पूछ रहे थे" त्याने आपला चहा घेता घेता तिला सांगितले.

अमिता किचनमधे गेली. व्हीलचेअरवरच्या माणसाने टीव्ही लावला. बाहेर वारा सुटला होता, अ‍ॅन्टेनाला हिसके बसत होते. चित्र हेलकावे घेत होते.

"कहकर ठीक करा लो अ‍ॅन्टेना," तो तंद्रीतच बोलला. केबल आणि डिश नेटवर्कच्या जमान्यात त्याला अ‍ॅन्टेनाची फिकीर होती.

काम करणाऱ्या मुलांनी बाहेर जोरात रेडिओ लावला होता. अमिताने रेडिओ लावला की त्याला ती कटकट वाटे. अमिताला त्या दोघांसमोर जायचे नव्हते. बोलणे, चौकशा आजकाल तिला सगळेच नकोसे वाटायचे. ते कामात गर्क आहेत असे पाहून तिने चटकन चहा आणि कुकीजचा ट्रे बाहेर नेऊन ठेवला. दुपारी साडेतीनला सरबताचे दोन ग्लास बाहेर ठेवले. त्यांच्यात गुंतायचे नाही असे तिने स्वत:ला बजावले . पण ती मुले भारतीय आहेत एवढेच व्हीलचेअरवाल्या माणसाप्रमाणे तिलाही त्यांच्याविषयी जिव्हाळा वाटण्याकरता पुरेसे होते.

----------

"रायन था शॉप मे?"
"हा"
"अकेला था . . . या . . ."
"आज फ्रायडे, भीड होती है."

ती पहिल्यांदा शॉपिंगला गेली तेव्हा त्याने सांगितले होते. "रायन वस्तू स्वस्त विकतो पण तोही तसाच आहे ! . . . एकटीच असशील तर दुकानात जास्त वेळ थांबू नकोस. माणसे आहेत तोवर घरी परत ये, फ्रायडे इज अ गुड डे टू गो"

ती बाहेरून आली की पैशाच्या हिशेबाप्रमाणेच तिचे कपडे, तिचे हावभाव, तिच्या हालचाली याचाही हिशेब लावायचा त्याचा प्रयत्न तिला कळत नसे असे नाही. आता तिची पन्नाशी जवळ आली होती. कुणाला तिच्याविषयी काही वाटेल असे तिच्यात उरले नव्हते असे अमिताला वाटे. तिलाही कुणाविषयी काही वाटण्यात शक्यता नव्हती. पण ह्या व्हीलचेअरवाल्या माणसाच मन ते मान्य करत नव्हते. त्याची सवय जाणार नव्हती. तिला ती बदलताही येणार नव्हती.

----------

स्वयंपाकघरातली कामे आटोपून ती तिच्या खोलीत आली. रायनने दिलेली नोट तिने कालच काढून ठेवली होती. काय गरज आहे रायनला? आपल्याला त्याच्याशी कुठलेही संबंध वाढवायचे नाहीत हे तिने सांगूनही गेली अनेक वर्षे भेट झाली की तो हसून तिला पैसे परत करायचा. नेहमीच नव्या महागड्या दुकानात जाणे परवडणार नाही पण अगदीच अशक्य आहे असेही नाही. मोठ्या दुकानांचा लॉयल्टी प्रोग्राम असतो तसा रायनचा आहे. कदाचित फक्त माझ्याकरता असावा. मी नकार दिल्यानंतर त्याचे माझ्याशी वागणे बदलले होते पण इतर मुलींशी नाही. बारा वर्षाच्या मुलाला सोडून त्याची बायको निघून गेली. तेव्हा फक्त म्हणाला होता- "वुई आर चीटर्स, बट यू आर लॉयल. व्हॉट डिड यू अचिव्ह? आर यू हॅपी?"

रायनच्या मते सुख म्हणजे तरी काय होते? काय असते सुख म्हणजे नक्की?

ती खिडकीच्या काचा पुसता पुसता विचार करत होती. काच स्वच्छ झाली ; भूतकाळ अधिकच लख्ख होऊन तिच्यासमोर उभा ठाकला.

तिन रायनला वेगवेगळया मुलींशी फ्लर्ट करतांना पाहिल होते. मुद्दाम तो मुलींना रेफ्रिजेरेटर आणि स्टोरेज सेक्शनमध्ये न्यायचा. स्टोरेजमधे इतर कुणीच नसे. कधी मुली तिथे स्वत:हून जात. रायनच्या अंगाला येणारा सिगारेटचा वास, त्याचे कमावलेले शरीर, त्याचा अ‍ॅटिट्यूड याचे अमिताला आकर्षण वाटे. त्याशिवाय तो मुलींना खास डिस्काउंट द्यायचा असे तिच्या लक्षात आले होते. अगदी सुरुवातीला सहा सात महिने दर शुक्रवारी ती त्याच्या दुकानात जायची तेव्हा रायन तिच्याशी धड बोलत नसे, बघत नसे. घेतलेल्या वस्तू , पैसे, हिशेब या पलिकडे दोघांमधे संवाद नव्हता. त्याउलट घरी व्हीलचेअरवरून हा तिला बघत राही. रात्री तिच्या खोलीचे दार वाजवी. काय हवे म्हटले की कधी पाणी, कधी काही नाही असे उत्तर देई. कधीतरी पेनकिलर, एखाद्या दिवशी व्हिस्की . . .

व्हिस्की दिली की बडबडत बसे. एका दिवशी व्हिस्की दिली तेव्हा तो तिला 'जवळ ये, किप मी वॉर्म' असे काही म्हणाला होता.

अमिताला तो असे काहीतरी म्हणेल अशी अपेक्षा होतीच. त्यावेळी 'झोप उशीर झाला आह असे म्हणून ती निघून गेली होती. त्यानंतर अनेक दिवस त्याची धुसफूस सुरु होती. गेले काही दिवस तू माझी नीट काळजी घेत नाहीस. कोण आहेस तू माझी? असे बरेच काही तो बडबडत होता. हा का वेड्यासारखे वागतो हे न कळण्याइतकी अमिता मूर्ख नव्हती.

त्यावेळी तिला या वस्तीत येऊन येऊन साधारण वर्ष झाले असावे. शुक्रवारी रायनच्या दुकानात अमिता एकटीच होती. इतर मुली गेल्यावर ती मुद्दाम रेंगाळली. तिने पैसे दिले आणि सामान गाडीत ठेवले. परत निघायच्या ऐवजी स्टोरेजमधले फिश दे असे तिने रायनला सांगितले. ती सरळ स्टोरेजमधे गेली. तिची नजर, तिचे बोलणे, तिचे चोरटे स्पर्श . . . काही क्षणातच रायनचे हात तिच्या शरीरावर फिरू लागले होते.
तिच्या अंगावर सगळे कपडे तसेच होते तरी रायनच्या बोटांची जादू तिला जाणवत होती. दहा एक मिनिटे अशी गेली असतील तोच गिर्‍हाईकाने रायनला हाक मारली. बाहेर जाता जाता रायनने खिशातून तिला पैसे काढून दिले. थोडाही विचार न करता ते घेऊन ती गाडीत बसली. तिची छाती धडधडत होती. अमिता घरी आली, काहीतरी सबब करून थेट आपल्या खोलीत गेली. तिने उंचावरच्या पेटीत ते पैसे लपवून ठेवले. तिच्या कपड्यांना, श्वासाला, तिच्या अंगाला रायनच्या घामाचा ,सिगरेटचा, अत्तराचा आणि दुकानतल्या वस्तूंचा वास येत होता. तिने गडबडीने शॉवर घेतला, कपडे बदलून ती खोलीबाहेर आली.

----------

अमिताला आताही तो दिवस आठवला. आता ती त्याच आरशासमोर उभी होती. सगळेच बदलले आहे. दिसायला ती चारचौघींसारखी असली तरी पुरुषाचे लक्ष जाईल असा तिचा बांधा होता. आता शरीर थोडे सुटले आहे. पूर्वी तसे नव्हते. आता डोळ्यांखाली काळी वर्तुळे आहेत. या माणसाच्या याच घरात सगळी उमेदीची वर्षे गेली. सगळ्या इच्छा अपेक्षा . . . ? काय मिळाले? काही शुक्रवार आले, ती रायनचे चोरटे स्पर्श, थोडे पैसे मिळवत गेली. तिची भीड चेपली होती. रायनच्या दुकानातून आली की तेच कपडे घालून ती घरभर वावरायची. काहीतरी खोटे बोलून बहाणे करून व्हीलचेअरवरच्या माणसाला चिडवण्यात तिला आनंद मिळत असे. पण प्रत्यक्षात अमिताची तगमग वाढली होती . रायन जरी तिचा झाला तरी फक्त तिचा होण्याची बिलकूलच खात्री तिला नव्हती. तिच्यासमोरच तो इतर मुलींना इशारे करायचा.

----------

गेल्या वेळी रंगाचे काम सुरु केले होते तेव्हा ती नुकतीच याच्याकडे राहायला आली होती. तेव्हा दोन कोरियन आणि एक मेक्सिकन माणूस होता कामाला. याच्याशी ते फार बोलायचे नाहीत, तिच्याशीसुद्धा फक्त कामापुरत बोलणे होते. नाही म्हणायला दोन माणसांखेरीज कुणाचातरी वावर होता एवढेच. यावेळी दोघेच आहेत, पण भारतीय. हा हिंडू फिरू शकत नाही अस नाही पण मुद्दाम बाहेर जात नाही. सगळे व्यवहार करतो पत्राने. क्वचित कधी फोनवर. गावात आधीच वस्ती कमी. त्यातल्या कित्येकांनी नव्या बांधलेल्या वस्तीत अनेकांनी छोटी घरे घेतली आणि तेही दूर निघून गेले आहेत.

व्हीलचेअरवर बसूनच हा फक्त प्रश्न विचारतो, वाद उकरून काढतो. नुसते याच्याबद्दल म्हणायचे तर याच्याविषयी मनात काहीच वाईट येत नाही, याचे काही बरेवाईट करावे असेसुद्धा वाटत नाही. फक्त अमिताला स्वत:चाच राग आला. सुप्रितमुळे आपण इथे आलो याची तिला चीड यायची आणि तो राग ह्यावर निघायचा.

अमेरिकेतला झगमगाट, श्रीमंती, सुखसोयी हा सर्वांपासून इथे छोट्या गावात, पै पै चा हिशोब लावणार्‍या, या अपंग माणसाबरोबर राहू असे कधी वाटले होते का? गावातले लोक चर्चा करतात, आपल्याकडे बघून, तर कधी आपल्यामागे एकमेकांकडे बघून कुजबूजतात. अनेकांना हा जिवंत आहे हेच माहिती नाही. हा कुणाला तोंड दाखवेल तर शपथ. या गावात इतर भारतीय नाहीत. आपण आलो तेव्हापासूनच या व्हीलचेअरवाल्या माणसाची बायको हीच आपली ओळख.

"तो मिलेनियर असता तरी मी राहणार नाही त्याच्याजवळ" एकदा चिडून तिने रायनला सुनावले होते.

रायन त्यावर हासला होता.

"तू नाही पण दुसर्‍या अनेक बायका राहतीलही!"

पण अमिता आयुष्यभर तिथेच राहणार होती हे तिलाही त्यावेळी मान्य झाले नसते.

----------

'घर पडेल, आता तरी कर दुरुस्ती' अमिताने त्या व्हीलचेअरवरच्या माणसाला अनेकदा सांगितले होते. तो हो म्हणायचा, वेळ आली की करेन म्हणायचा. पण त्याने पुढे काहीच केले नव्हते. अमिताला वाटले आपण काही बोललो तरी व्हीलचेअरवरच्या माणसाने मनावर घ्यायचे नाही हेच ठरवले असावे. आधी दिवसा कुठल्याही गोष्टीबद्दल कशाबद्दलही जराही आपले काही ऐकायची याची तयारी नसे. रात्रीसुद्धा तोच प्रकार होता. पण एकदा त्याने आपल्याला शब्द दिला आणि सगळे चित्र बदलले. बदलले म्हणजे चौकटीत बंद झाले. केले आपण शेवटी. दुसरा पर्याय होता का? तो स्वीकारण्याची तयारी होती का आपली? अमिताला ती रात्र आठवली.

----------

दाराचे लॉक काढण्य़ाच्या आवाजाने एकदा अमिताला मध्यरात्री जाग आली. पाचएक मिनीटात त्याची व्हीलचेअर खोलीत होती. खोलीचे दार तसेच उघडे होते. तिने आरडाओरडा केला असता तर कोणीही आले नसते. तिच्या खोलीत फोनही नव्हता.

"अपाहिज आदमी हूं, अंधा नही. स्टॉप दिज गेम्स. हां, यहीं करना है तो खुलेआम करो, सुप्रितसे कह देता हू. उसे पता है कहा ले जाना है. ले जाएगा."

तिचा चेहरा उतरला. सगळ्या बाजूने कोंडीत सापडल्यासारखे झाले होते.

ती चिडून म्हणाली होती "मला कुणी आवडले तर काय चुकले माझे? मी काय सगळे आयुष्य असेच एकट्याने कुढत काढायचे का? आणि का? पण मी कुठलीही मर्यादा ओलांडली नाही. तुझी केअर टेकर म्हणून आले आहे मी इथे. त्या कामात काही दिरंगाई केली नाही कधी. यापेक्षा जास्त हक्क का दाखवतो आहेस तू माझ्यावर?
"आणि तू कुठल्या वाटेने जाते आहेस? मग सुप्रितकडेच जा. "

त्याला मराठी कळायचे तरी तो सहसा मराठी बोलत नसे. अमिता चमकली. सुप्रितचे नाव ऐकून आणखीनच चिडली.

"सुप्रित काय देणार आहे मला? तो कशाला? "
"मग रायन?" व्हीलचेअरवरून आधार घेत उभा राहत त्याने तिच्या डोळयात पहात विचारले.

"आय लाइक हिम" तिन शांतपणे सांगितले.
"शादीशुदा है रायन, पता है तुम्हे? तुम्हे बीबी बनायेगा वह? उसका घर? या . . ." तो तावातावाने बोलत होता.

तिची नजर खाली झुकली.

"आज रायन अच्छा लगता है, कल रायन को कोई दुसरी लडकी, तुम्हे और कोई . . . तितली की तरह उडते उडते, पर के रंग और जिंदगी बिखर जाएगी."
" व्हाय आर यू वरीड अबाउट इट? तुम्हे क्या फरक पडता है?"

तो काही बोलला नाही. त्याने एका डबीतून अंगठी काढली, तिच्याशेजारी ठेवली.

"आय डोन्ट नीड अ फेवर. यहां रहना है या जाना है, एक बार सोच लो " तो बोलत होता आणि तिने डोळे मिटून घेतले. चिडून, रडून काही फायदा नव्हता. तो काय करतो याची वाट बघत ती गप्प बसून राहिली. तिने डोळे उघडले तर तो खोलीत नव्हता. रात्रभर ती जागी होती. विचार करून थकून शिणून तिने शेवटी ती अंगठी आपल्या बोटात घातली.

अमिताच्या कानात अजूनही त्याचे शब्द तसेच होते, हमारे यहां चार फेरे होते है. आप सोच रही है सात फेरे लेकर भी वह भाग गया, चार फेरोसे क्या फर्क होगा. प्लीज स्टे हिअर, वादा करते है, आपकी मर्जी के खिलाफ कुछ नही होगा."

त्यानंतर रात्री एकही गोष्ट तिच्या मनाविरुद्ध झाली नाही. दिवसाही त्याच्या वागण्याबोलण्यात आवेश कायम होता तरी तिला त्याची भीती वाटली नाही. त्याच्याविषयी कुठले आकर्षणही वाटले नव्हते. तिने कुठलीही इच्छा त्याच्याकडे व्यक्त केली नाही. तिने न सांगता, त्याला जाणवल्या त्या 'बेअर मिनिमम' म्हणू अशाच गोष्टी त्याने तिच्याकरता केल्या. निदान अमिताला तसेच वाटत होते.

अमिताने आपल्या हाताकडे पाहिले, ती अंगठी अजूनही तिने ठेवली होती. त्या अंगठीएवढेच त्याचे आणि स्वत:चे तिथे असणे तिने मान्य केले होते.

----------

दोन भावांमुळे त्यांच्या घराची दुरुस्ती आणि रंगकाम सुरु झाले. त्याने संथ आयुष्यात बदल झाला. गाडी सुरू केल्याचा आवाज, दोघा भावांचे बोलणे, वस्तूंची ने आण, त्यांचा वाजणारा रेडिओ . . . अमिताला, व्हीलचेअरवरच्या माणसाला आयुष्याची नवी जाणीव झाली होती. दोघे भाऊ सकाळी साडेसातलाच हजर होत. अमिता आपली कामे करता करता त्यांच्या हालचालींकडे बघायची. घड्याळ्याच्या काट्यानुसार ती व्हीलचेअरवरच्या माणसाला वाढायची. सर्वांसाठी चहा करायची.

"डिड यू आस्क अबाऊट द ग्रास रेंट?" त्याने अमिताला मोठ्यान विचारल.

नळ सुरू होता. ती भांडी विसळत होती. त्या आवाजातही त्याच बोलणे तिला ऐकू आले होते. पण तिने तसे दाखवले नाही.

त्याने मोठ्यांना ओरडून तोच प्रश्न विचारला.

"हो, सगळी कामे केली आहेत मी कालच."
"यू कूड हॅव टोल्ड मी, आय हॅड टू स्र्कीम"

"बाहेर मुले काम करत आहेत, केवढा आवाज आहे. आता त्यांचा रेडिओ बरा तुला चालतो?"

तिने भराभरा टेबल आणि स्वयंपाकघर पुसून काढले.

"हमारे जैसे ही है वो इंडियन. दे आर नीट अ‍ॅन्ड क्लीन, व्हेरी ऑनेस्ट. यू कूड हॅव सीन देम. दे वोंट बॉदर यू."

तिने उपरोधाने मान हलवली.

"भारतीय आहेत म्हणून मुद्दाम मी त्यांचा राग करत नाही. पण भारतीय आहेत म्हणजे त्यांच्या प्रत्येक वागण्याचे तू समर्थन करण्याची गरज नाही. तिकडचेही सगळे हवामान बदलले आहे आता."

"अच्छा है, कुछ कह रही हो, अदरवाइज यू हॅव स्टॉप्ड टॉकिंग, हर हफ्ते की बजाए महिने मे दो बार ही बाहर जाती हो. कहता हूं लोगोंसे मिला करो तो घरमे रहती हो. दोनो लडके देखो. छोटे की ऑंखे देखी? हमारे बच्चे होते तो . . ."

"त्यांनी अशीच कामे केली असती. कसे जगले असते, वाढले असते कुणास ठाऊक . . ." तिच्या डोक्यात एक तिडीक उठली. रागाने त्याला उत्तर देऊन ती दुसर्‍या खोलीत निघून गेली.

"गुस्सा बडे जल्दी आता है. हमारी तबियत ठीक नही है. इधर आओ."

तिला जाणवले की ती चिडली, रडली किंवा नाराज असली की तो कासावीस व्हायचा. नक्की केव्हापासून? तिला खूप आठवूनही लक्षात येईना. आधीचे आठवत नव्हते पण गेली दोनएक वर्षे तरी नक्की. ती चिडायची, त्याला टोचून बोलायची. पण त्यानंतर तिचेही मन आतल्या आत तुटत राही.

ती त्याच्याशेजारच्या कोचावर बसली. तिचे डोळे रडून, चोळून लाल झाले होते.

"इधर देखो, बुरा मत मानो" त्याने तिचा चेहरा ओंजळीत धरून तिच्याकडे बघत विचारले, "बाहर गयी थी तो जमीन की बात की?"
"नाही, विकायची कशाला जमीन, रहायचे कुठे? खाणार काय? "

तो बराच वेळ तिला समजावत होता. मध्येच मोठ्याने बोलत होता.

बाहेर कामाला आलेली दोन मुले आवाजाकडे लक्ष देत असतील याची अमिताला कल्पना होती. एकतर कुणी जवळपास नसायचे आणि असले तरी असे भारतीय कधीच नव्हते. त्यांचा आरडाओरडा, तिची चिडचिड कशाची दखल कुणी घेतली तरी काय होणार होते? पण या मुलांना सगळ बोलणे समजत आहे या विचाराने अमिताला संकोचल्यासारखे झाले. भारतीय तर भारतीय, काय फरक पडतो? त्यांनी चारचौघांना काही सांगितले तरी . . . काय बिघडेल? पण त्या मुलांचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि ती त्यावर काही बोलली नाही.

"तीन दिन बारीश है, लडके आनेवाले है या नही?" स्वत:शी बोलल्यासारखे त्याने विचारले.

अशा प्रश्नांनंतर काय करायचे ते तिला माहिती होते.

"मी विचारते" असे म्हणून ती बाहेर गेली.

अंधारून आल होत. वारा सुटला होता. दोन्ही भाऊ भिंतीलगत उभे होते. तेवढ्यात अमिता बाहेर आली. तिला बाहेर आलेली पाहून ते तिच्या बोलण्याची वाट पाहू लागले.

"बारीश होनेवाली है, अंदर कुछ काम करना है तो यह दरवाजा खुला है "असे सांगून ती कपडे वाळत घातलेल्या दोरीकडे गेली. तिने कपड्यांचे चिमटे एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरले. वाळलेले कपडे ओढून हातात घेतले.

जेमतेम चारच दिवस ते कामाला आले होते पण छोट्याने लगेचच काम आवडले का असे तिला विचारले होते. तिला हसू आले. इतर सर्व करतात तसेच आहे असे तिने कोरडेपणे उत्तर दिले. अगदी हातचे राखून ती बोलत होती. मोठ्याने आपणहून ते कुठून आले ,कसे आले याची माहिती दिली. इंडियात कुणीच नाही, आम्ही गेली चार वर्षे गेलो नाही इंडियात, इथे येण्यासाठी कर्ज घेतले होते, तेच फेडले नाही अजून, पैसे नाहीत, त्यामुळे किती वर्ष जाता येणार नाही माहिती नाही! असेही तो एकदम बोलून गेला. अमिताने त्यावर काही उत्तर दिले नाही. खरे तर सगळे तिला अगदी परिचित, अगदी नुकतेच घडल्यासारखे आहे असे वाटले. तिला आपला भूतकाळ आठवला. ती थोडी बावरली, पण तिने ते विचार दूर लोटले.

आभाळ भरून आले होते. तिच्या चेहर्‍यावर कुठलेच भाव दिसले नाहीत तरी पावसाला सुरुवात व्हायची ती झालीच. घराची आतून डागडुजी करायला त्या दोघांकडे पुरेसे सामान नव्हते. त्यांना थांबण्याचा, तिथल्या वातावरणाचा कंटाळा आला होता. गावातील दुकानात त्यांनी लागणार्‍या सामानाची चौकशी केली. सतत तीन दिवस तरी पाऊस पडेल असे लोक म्हणत होते. त्यामुळे भाड्याने आणलेले लॅडर त्यांनी परत केले. बोलता बोलता त्यांना दुकानदार म्हणाला की सात मैलावर एका वेअरहाऊसचे बांधकाम सुरु आहे. तिथल्या बिल्डरला खिडक्या, रंगकाम आणि इतर कामे संपवण्याकरता कारागीर हवे होते. काम पंधरा दिवसांचे होते, कदाचित जास्तच. त्याशिवाय दुकानदाराने सांगितलेला मजुरीचा दर या व्हीलचेअरवाल्या माणसापेक्षा जास्त होता. दोघे त्या वेअरहाऊसवर गेले. त्यांना काम मिळाले. नव्या कामाला येण्याआधी जाऊ, काम झाले की त्या व्हीलचेअरवाल्या माणसाकडे जाऊ असे बेत फक्त मनातच राहिले. चार दिवस पाऊस पडत होता. वेअरहाऊस आणि त्या जुन्या वस्तीच्यामधे एक पूल होता. त्या पुलावर पुराचे पाणी आले होते. त्यामुळे गावात जाणारा तो जवळचा रस्ता बंद झाला होता. त्या वेअरहाऊसच्या बिल्डरने यांना नव्या प्रोजेक्टमधेही काम देईन असे सांगितले. ते नवे काम सुरु होईल त्याआधी त्यांनी व्हीलचेअरवरच्या माणसाच्या घराचे काम पूर्ण करायचे ठरवले.

----------

wheelchair02.jpgपावसाने रस्ता अधिकच खराब झाला होता. दोघे भाऊ अंदाज घेत आत आले तेव्हा दारातच त्यांना जुनी डॉज रॅम दिसली. त्यांना हायसे वाटले. आपण आलो नाहीत म्हणून व्हीलचेअरवरचा माणूस रागावला असेल, ती बाई सुद्धा काही बोलेल अशी धाकधूक त्यांच्या मनात होती. त्यांनी रेडिओ लावला नाही.

दिवसभर काम केले. चहा सरबताची वेळ टळून गेली तरी कुणीच बाहेर आले नाही. लहान भावाने दारावर टकटक केले. कुणी उत्तर दिले नाही वा दारही उघडले नाही. घरातून नळाचे, भांड्यांचे आवाज ऐकू आले. पहिल्या चार दिवसांप्रमाणे काही वादविवाद वा भांडण्याचा आवाज मात्र ऐकू आला नाही. शेवटी, अगदी निघायच्या वेळी लहान भावाला एका खिडकीतून घरातली स्त्री दिसली. मोठ्या भावाला एकदाही त्या व्हीलचेअरवरच्या माणसाचा आवाज ऐकू आला नव्हता. नेहमी जिथे त्याची व्हीलचेअर असे तिथे थोडे वाकून बघितल्यावर त्याला कुणीच दिसले नव्हते. काम आटोपून ते निघाले तेव्हा धाकट्याला ती स्त्री टेबलावर डोके ठेवून बसलेली दिसली. ती विचारात गढली होती. काही क्षण त्याची आणि तिची नजरानजर झाली. पण तिने त्याची नोंद घेतली होती असे वाटले नाही.

संध्याकाळी दोघे भाऊ गावातल्या बर्गरप्लेसमधे गेले. तिथे माणसांची ये जा होती. तिथे थोडा वेळ थांबले तरी दिवसभराचा गावाचा वृत्तांत कळायचा. गेल्या आठवड्यात गावात कुणाकडे तरी अ‍ॅम्ब्यूलन्स आली होती हे त्यांच्या कानावर आले. सॅन्डविचचा तुकडा तोंडात तसाच ठेऊन दोघे विचारात गढले. तो व्हीलचेअरवरचा माणूस आजारी होता, नक्की किती आजारी होता, जिवत आहे का अशा सर्व शंका त्यांच्या मनात तरळून गेल्या.

"क्या उस औरत को पैसे के बारे मे पता होगा?" लहान भावाने मोठ्याला विचारले.
"कल देखते है, अगर उसने चायशरबत लाया, तो उससे बात करते है" त्याने लहान भावाला धीर देत म्हटले.

बिल्डरचे मोठे काम मिळणार होते त्यामुळे त्यांनी त्याच गावात रहायचे ठरवले . एक दोन पडकी घरे त्यांनी शोधली होती , त्यापैकी एकाची डागडुजी केली तर त्या घरात राहता येईल असे तिथला मालक म्हणाला होता. दोघे भाऊ ते घर पुन्हा बघायला तिथे जायला निघाले.

"उनके बच्चे कहा है?" लहान भावाने मध्येच मोठ्याला विचारले. अर्थातच त्याचा रोख त्या व्हीलचेअरवाल्या माणसाकडे आणि त्या घरातल्या स्त्रीकडे होता.

"पता नही. होंगे भी तो प्रोपर्टी के लिए आयेंगे" मोठ्याने उत्तर दिले.
"गाववाले कहते है वो औरत अकेली रहा करती थी" छोट्याने माहिती दिली.

"हम मिले है उस आदमी से, गाववाले सबकुछ थोडी जानते है, शायद वह आदमी हॉस्पिटलमे होगा, या किसी ओल्डएजवाले सर्विसेस के साथ, क्या पता"
"अगर ऐसा हमारा मकान, हमारा खेत होता तो बिल्डर को बेचकर हम बडा कॉम्प्लेक्स बनाते, अपना खुद का कोई बिझनेस करते"

"जैसे?"
"रंग दे सकते है हम, ग्रास कट कर सकते है, हाथ मे पैसा होगा तो कुछ हो सकता है"
"हां, पैसा होता तो . . ."

दुसर्‍या दिवशी त्यांनी कामाला सुरुवात केली. जमेल तेवढे लवकर काम करायचे असे त्यांनी ठरवले.

"किचनमे है शायद" छोट्याने कानोसा घेत म्हटले.
"आज अगर चाय ले आयी तो अच्छा होगा. हम बता देंगे की हम काम पूरा करेंगे."

"क्या हमसे डर लगता है उसे? हम उसे कुछ नही करेंगे. "
"अकेली है, डर लगता होगा उसे, दुखी भी है. अगर पुरा नही तो जितना दे सकते हो पैसा उतना दे दो ऐसा कहते है."

त्यांचे लक्ष गेले तेव्हा तिने चहाचा ट्रे ठेवला होता. ती मात्र लगेच घरात गेली असावी. त्यांनी आजूबाजूला पाहिले पण ती कुठे दिसली नाही.

दोघेजण काम करून परत निघाले तेव्हा अंगणात त्यांना एक फुलांचा ताटवा दिसला. फुलझाडे छोटी होती, नुकतीच लावलेली होती.

"कहते है कोई मर जाता है तो अमरिका मे लोग फूल ले आते है, ऐसेही फूल" मोठा फुलांकडे बघत म्हणाला.

जेवण आटोपले. मोठ्याला नव्या बिल्डरचे काम किती काळ चालेल कधी सुरु होईल याची काळजी होती. चंद्रप्रकाशात झाडांच्या शेताच्या सावल्या पडल्या होत्या. वार्‍यासह त्या हेलकावे घेत होत्या. दोघांच्याही मनात त्या स्त्री आणि व्हिलचेअरवरच्या माणसाचा विषय पुन्हा पुन्हा डोकावत होता.

----------

तिने घराचे मागचे दार उघडे ठेवले होते. स्वयंपाकघर आणि त्याला लागून असणारी एक खोली सोडली तर सगळ्या खोल्यांचे काम झाले होते. त्या खोल्या मात्र बंद होत्या. दोन भावांचे अमिताशी बोलणे मात्र झाले नव्हते. पाचव्या दिवशी घाईघाईने ती बाहेर निघाली होती तेव्हा दोघे भाऊ तिथे आले. तिची डॉज काही केल्या पुढे सरकत नव्हती. मागच्या दोन्ही चाकात अगदी कमी हवा होती. एक भलामोठा दगड चाक अडवत होता. मोठ्याने तिला तसा इशारा केला पण तिला काही कळले नव्हते. छोटा भाऊ त्यांच्या गाडीतून चटकन खाली उतरला. अमिताच्या चेहर्‍यावरचे भाव बदलले. पण त्या भावाच्या हातात हवा भरायचा पंप दिसला आणि तिने नि:श्वास टाकला. दोन्ही चाकात हवा भरली. दगड उचलून दूर केला. चाक पंक्चर असेल तर काढून आणेन असेही तिला सांगितले.

"कैसी है आप?" मोठ्याने विचारले.
तिने 'ठीक आहे' एवढेच उत्तर दिले.

अमिताला आपली गाडी सुरु झाली नाही तर काय करायचे याची चिंता होती. पण सुदैवाने तसे झाले नाही. काही कामे आहेत ती करुन येते असे म्हणून ती निघाली.

"ही वॉन्टेड यू टु फिनिश द वर्क, फिनिश कलरिंग" तिने त्यांना सांगितले.

दुपार होत आली तरी ती परत आली नव्हती. इतर सर्व खोल्या बंद होत्या. त्यांना घरात कोणी आहे असे बिलकूल जाणवले नाही.

"आज उसने रिंग नही पेहनी थी. कैसे लगता होगा उसे? रंग देने को कह गयी है"
"उसका चेहरा भी देखो, कितनी बदल गयी है"

"वो कही चली गयी तो?"
"उसने हमे काम दिया है, उसकी वजह से हमे बिल्डर का काम मिला, मानो आगे अब सब अच्छा होगा"

"हम उसे पैसा नही मागेंगे, उस के लिए फूल ले आयेंगे" दोघांचे एकमत झाले होते. या कामाचे पैसे मिळाले नाही तरी चालेल असेच मनात ठेवून त्यांनी काम चालू ठेवले.

----------

अमिता घरी आली. तिने सगळीकडे बघितले. दुरुस्ती जवळजवळ पूर्ण होत आली होती. रंग, ब्रश, लॅडर सगळा पसारा मुलांनी आवरला होता. घरातली प्रत्येक वस्तू जिथल्या तिथे होती. कोणतेही दार, कपाट तोडलेले नव्हते. सवयीने तिने दोन डिशेस वाढल्या. ती थबकली. कितीतरी वेळ तशीच उभी राहिली. हमारे बच्चे . . . तिला ते मनातून ते दूर सारता येईना. त्याची खोली आवरतानाचा प्रसंग तिच्या डोळ्यापुढे पुन्हा पुन्हा येत होता. जेव्हा अप्रूप होते, हौस होती, तेव्हा पैसा नव्हता. जेव्हा थोडा पैसा होता तेव्हा सुख नव्हते म्हणून चिडचिड व्हायची. अमिता बसून होती. तिच्या सभोवताली त्याच्या कपाटातले कागद विखुरले होते. ती त्याला आवडायची असे त्याने अनेक पत्रात लिहिले होते. पण कधी स्वत:हून म्हणाला नव्हता तसे. त्याच्या नजरेतून जे दिसायचे त्याचा वेगळा अर्थ लावला होता अमिताने.

एकदा त्याने विचारले होते "क्यों आयी हो यहा? अमरिकामे क्या है यहा?"

अमेरिका आणि पैसा एवढेच समीकरण होते का माझ्या मनात? अमेरिका आणि स्वतंत्र आयुष्य हेच गणित होते का? हा भेटला नसता तर आयुष्य भरकटत गेले असते. मी कधीच त्याच्यासमोर ते मान्य केले नाही. याच्या आयुष्यात आपल्यानंतर कुणी आले नाही. मला वाटायचे कुणी येणारच नाही. माझाच गैरसमज होता तो. माझ्यासारख्या अनेक स्त्रिया इथे सहज येऊ शकल्या असत्या, याच्या इस्टेटीची कल्पना आली असती तर हसत हसत कित्येकजणी त्याकरता आल्या असत्या. सुप्रितकडे यायच्या, गावात इतरांकडे यायच्या.

तिच्या डोळ्यातली श्रीमंतीची लालसा, अमेरिकेतली व्यक्तिस्वातंत्र्याची ओढ त्याला दिसली नव्हती असे नाही. एकदा तो तिला म्हणाला होता, "गलत समझ रही हो आप. यह कामयाबी नही. कामयाबी का झूठा अहसास है. पूरे गाव मे, शहर मे, दुनिया मे तुम्हारा अपना कोई नही है, ना अपनोंकी यादे, ना राह देखनेवाले कुत्ता बिल्ली भी. तो जिंदगी कैसी होगी इसके बारेमे सोचा है कभी?" त्याने तिला मोठाल्या घरातली एकटी माणसे दाखवली होती. भारतीय, अमेरिकन वेगवेगळ्या वंशाची. तरूण, म्हातारी . . . एकाकी.

"यह है अमरिका. इसे देख लो."

तिला पुन्हा आठवले. "आप चाहती तो हमारे बच्चे होते." तो अचानक असेच एकदा तिला म्हणाला होता. तेव्हाही ती उसळली होती. कशासाठी हवीत मुले? दाखवायला? लग्न, घर, मूल, संसार एवढेच असते का आयुष्य? पण माझ्यासारख्या सामान्य स्त्रीसाठी कधी काळी तेच सर्वस्व होते. माहेरी आले तेव्हा नवर्‍याने आपली फसवणूक केली, अपमान केला असे वाटले होते. आपल्याला जे मिळाले नाही ते भावजयीला मिळतेय याची असूया होती मनात. सुप्रितच्या वागण्याचा रागही होता. पण मग मला जे हवे होते तेच सगळे याने द्यायचा प्रयत्न केला तर का मान्य झाले नाही? हाच जबाबदार होता त्याला. ह्याचे वागणेच.
मी सामान्य होते, माझ्या अपेक्षाही सामान्यच. जिवंतपणी पै पै चा हिशोब मागितला त्याने. मरतानाही पैशाची व्यवस्था लावून गेला. राहते घर आणि शेजारचा एक प्लॉट अमिताच्या नावावर . . . बाकी सर्वकाही सुप्रितच्या हवाली. तिला आठवले की मला मारलेस तरी काही मिळणार नाही तुला अशी व्यवस्था केली आहे असे तो मुद्दाम तिला चिडवत असे.

एकदा ती रागाने म्हणाली होती,"काय आहे तुझ्याकडे द्यायला" तर गप्प झाला होता. भिकार्‍यापुढे चार तुकडे टाकावे तशी आली म्हणून राहायला घर दिले होते त्याने . . .

खोलीत रिकामी व्हीलचेअर अजूनही तशीच होती. प्रयत्नपूर्वक तिने बाहेर नजर टाकली. बाहेर ताटव्यात फुले बहरली होती. निर्मनुष्य शेते, अंगण, तिची गाडी यावर संधिप्रकाश पसरत होता. वार्‍याची दिशा, पानांचे रंग, ऋतुमान बदलत होते.

खिडकीतून तिला दोघे भाऊ दिसले. ते त्यांच्या कामावर शेवटचा हात फिरवत होते. तीन वाजून गेले होते. तिने चहाचे कप बाहेर नेले. वेअरहाऊसवाल्या बिल्डरचे काम झाले की मग कुठले काम करणार असे तिने त्यांना विचारले तेव्हा दोघांकडे चटकन देता येईल असे उत्तर नव्हते.

"यहा से निकाल देंगे तो चले जायेंगे इंडिया!" लहान्याने उत्तर दिले. त्याच्या चेहर्‍यावरची भीती त्याला लपवता आली नाही.

"कुछ ना कुछ काम मिल जाएगा वही कर लेंगे. हमारे पास क्या है ऐसा जो कोई अमरिकन हमसे शादी करे!" मोठा म्हणाला.

"यह ग्रास काटना हम भी कर सकते है. क्या आप देंगी हमे वह कॉन्ट्रॅक्ट?" लहान भावाने तिला प्रश्न केला.

ती हसली. घरात शिरता शिरता त्यांना म्हणाली, "कल सुबह आ जाओ."

कमर्शियल ग्रेडचा लॉन मोव्हर, ग्रासच्या गुंडाळ्या कुठे ठेवायच्या, त्याचा भाव किती असतो, कुणाला विकायच्या अशी बरीच माहिती तिला त्यांना सांगायची होती. पण लहान भावाच्या डोळ्यातला आत्मविश्वास, आनंद आणि त्याच्या डोळ्यात जी चमक तिला दिसत होती त्यापुढे हे सगळे क्षुल्लक होते.

----------

- सुवर्णमयी