वर्तुळ

शेवटी एक दिवस त्याने हिय्या केला. फॅक्टरीतून आल्यावर अनुराधाने त्याचा चहा आणला तेव्हा त्याने बोलायला तोंड उघडलं. "तु . . . तुम्ही दोघे . . ." इतकं तोंडून फुटेस्तोवर चहा ठेवून ती वळलीसुद्धा होती. अशीच तडक वळून निघून जायची आताशा. तिला कसं थांबवावं त्याला समजेना. त्याने गडबडीत तिचा हात धरला. ती ताड्‌कन वळली. क्षणात थक्क झाली, पुढच्या क्षणी संतापली. मग त्यानंतर तिने हात हिसकावून घेतला की त्याची पकड आपोआप सुटली हे त्यालाही समजलं नाही.

borderpng.png

"क्‌

.. काय क्करत होतास? बोल?!.. ब्‌.. बोल ना स्साल्या! आ.. आ.. आता का ग्‌ ग्‌ गप्प? ब्बोल!"
मोहन इतक्या जोरात ओरडला की सगळी चाळ काय झालं ते बघायला गॅलरीत लोटली.

दृश्य नवलाचं होतं. सुबोध विशीतला उंचनिंच मुलगा. त्याची कॉलर पकडायची तरी मोहनला टाचा उचलाव्या लागल्या असत्या. पण आता बहुतेक त्याचा तो अनपेक्षित आवेश आणि त्याचं वय यामुळे सुबोध एकदम भांबावून उभा होता. शेजारी उभी मीरा, "अहो काका, आम्ही फक्त बोलत होतो . . ." असं काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती, पण तिकडे मोहनचं लक्षच नव्हतं.

"क्काय क्‌.. काय करणार होतास तिला? श्‌.. शरम नाही वाटत? थ्‌.. थोबाड फ्फोडून ठेवीन!"

"काय झालं? सुबोऽध, अरे काय रे करून ठेवलंस आणखीन आताऽ?!" सुबोधची आई लगबगीने पायर्‍या उतरून आली. "मीरे, जा बघू घरी आधी!"
" आई! काहीच नाही गं झालेलं!" सुबोधला आता शब्द सापडले. "मी आणि ही मीरा सहज बोलत होतो कालच्या कार्यक्रमाबद्दल! एवढ्यात हे आले आणि एकदम ओरडायलाच लागले! तू नको पडूस यात!"

" नको पडूस म्हणजे काय बाबा? हे उद्या परत आले की मला विचारतील! काय हो मोहनराव? तुम्ही तरी सांगा! नेमकं झालं तरी काय? मोहनराव . . . ?"

मोहन एकदम चपापला. क्षण दोन क्षण त्याची नजर अगदीच हरवल्यागत भिरभिरली. जणू तो एखाद्या दु:स्वप्नातून जागा होत होता. आणि मग एकदम त्याला हुंदकाच फुटला.

"न्.. नाही ना! क्काहीच.. क्.. काहीच नाही झालं! क्काही झालंच न् न् नाही हो!".

ऐकणारे अवाक् झाले.

" म्‌.. माहीत नाही.. म्माहीत नाही क्काय.. क्.. कोणी ब्.. बोलतच नाही . . ." असलं काहीतरी पुटपुटत खालमानेने तो त्याच्या खोलीकडे चालता झाला. चाळकरीही नवल करत पांगले.

"सुधे, लक्ष देऊ नकोस, आणि उगाच लेकाला धारेवर धरू नकोस. मोहनचं डोकं ताळ्यावर दिसत नाही! आधीच म्हणतात तसं . . . त्यात अजून पुरते पंधरा दिवस नाही झाले आई जाऊन त्याची. गरीब आहे खरं तसा. अध्यातमध्यात नसतो हो कोणाच्या एरवी!" ओगलेआजी जाता जाता सुबोधच्या आईची समजूत काढत होत्या.

***

vartul1_color.jpgदार धाड्‌कन बंद करून मोहन आत आला. समोर पलंगावर टेकला न टेकला तोच चटका बसल्यासारखा उठला. आता परवापर्यंत आईचं मुटकुळं पडून असायचं तिथे. तो पलंग डोळ्यांसमोर नको झाला होता त्याला आता! आणि त्याच्या शेजारचं ते जुनंपुराणं टेबल! कपांचे आणि आता औषधांच्या बाटल्यांचे गोल गोल डाग पडलेलं! त्या औषधांचा वास अजून चिकटून होता त्याला! त्या वासांच्या कल्पनेनेच मोहनला मळमळून आलं!

लाथेने त्याने कोपर्‍यातल्या गादीची वळकटी उलगडली आणि पलंगाकडे पाठ करून त्यावर आडवा झाला. गेली दोन वर्षं याच जागी असाच झोपत आला होता तो. आई रात्रभर कण्हल्याचे आवाज करायची. त्या आवाजांकडे दुर्लक्ष करण्याच्या प्रयत्नांत सलग झोप अशी लागायचीच नाही त्याला.

नाही, खरंतर झोप त्या आधीच कायमची उडाली होती.

तो स्वत:शीच दचकला. एकदम श्वास जड झाला त्याचा. उठावं, बाहेर पडावं, मोकळा श्वास घ्यावा अशी उर्मी दाटून आली. पण तसंच कारण असल्याशिवाय घराबाहेर पडायचं धैर्य कधीच नव्हतं त्याच्यात. आणि मघाच्या प्रसंगानंतर तर आता ते अशक्यच वाटत होतं.

खरंतर मघाशी नक्की काय झालं हे त्याला आता आठवतच नव्हतं. त्याने पुन्हा पुन्हा प्रयत्न केला. तो घरी येत होता. कुठून? हो, फॅक्टरीतून. आजच नव्हता का रुजू झाला तो. तिथून आला. चाळीत शिरला. चौकापर्यंत आला . . . आणि मग? मग काय झालं नेमकं? त्यानंतर एकदम कोंडाळ्यात हरवल्यागत उभं असल्याचंच आठवत होतं त्याला.

घाबरून त्याने पाय पोटाशी ओढून घेतले. अंग रसरसल्यासारखं वाटत होतं. कानांतून वाफा येतील की काय इतकं डोकं गरम गरम झालं होतं. असं झालं की काय करावं हे त्याला कधीच कळत नसे. कोणाला सांगून समजेल असं वाटायचं नाही, आणि ऐकणारं होतंच कोण? मग तो असाच नुसता पडून रहायचा मुटकुळं करून. पण इतके दिवस निदान आईमुळे कशी का असेना सोबत असायची. आता त्याला अगदीच एकटं वाटायला लागलं.

दार वाजलं तसा तो दचकून उठला. डोळा लागला असावा. चांगला अंधार झालेला दिसत होता. त्याने गडबडीने उठून दिवा लावला. एवढ्यात पुन्हा दार वाजलं. बाहेरून ओगलेआजी हाका मारत होत्या. त्याने अनिच्छेने दार उघडलं.

"जेवायचं काही केलं नसशील ना? हा एवढा पिठलंभात घे खाऊन."

त्यांनी मघाच्या प्रकाराबद्दल शब्दसुद्धा न काढल्याचं त्याला हायसं वाटलं.

"तु.. तुम्हाला उ.. उगीच त् त्रास र्रोज.. मी.. "
"असू दे रे. करशील उद्यापासून आपलं आपलं. ते काय चुकलंय कोणाला?"

त्याने खालमानेने त्यांच्या हातांतून ताट घेतलं. आजींची शोधक नजर घरावरून फिरली.

"मुकुंदा गेला ना?”
"हं."
"तुला सोबत चल म्हणाला नाही?"
"म्.. मला क्कशाला आणि!"
"तुलाही हवापालट झाला असता की थोडे दिवस! आयशीचं करायला आलाच नाही कधी! पण निदान थोरल्या भावाची काळजी नको? आणि हे म्हणे सख्खे! दिवस करायला आला हेच खूप म्हणायचं!"

तो नुसताच मान खाली घालून उभा राहिला.

"याच आयशीच्या पदराला धरून असायचा कायम लहानपणी! आणि तिलाही, म्हणू नये, पण त्याचं कवतिक जरा जास्तीच होतं हो तुझ्यापरीस! तोच काय तो हुशार, तो देखणा, मोठा हपिसर! आम्हांला काय दिसत नव्हतं? आता बघ म्हणावं! कोणी केलं शेवटी? सगळं अंथरुणातच करावं लागायचं ना आताशा! फार कष्ट काढलेस हो! घरात बाईमाणूस असतं तरी . . . मुकुंदाची बायको येऊन गेली ना काल?"

त्याने चमकून वर पाहिलं.

"मी विचारच करत होते आधी कशी नाही आली म्हणून. काल पाहिल्यावर लक्षात आलं!" आजी गालांत हसत म्हणाल्या.

लक्षात आलं? काय लक्षात आलं यांच्या? त्याला तो विषय आणि ते सगळं संभाषणच असह्य व्हायला लागलं. हातालाही ताट धरून रग लागायला लागली. त्याने ते तसंच झाकलेलं औषधांच्या टेबलावर ठेवलं.

"ग्.. गरम आहे.."
"हो हो. गरम गरमच जेवून घे हो. मी येते."

त्याने दार लावून घेतलं. थकून पुन्हा अंथरुणावर येऊन बसला. जेवायची इच्छाच मेली होती.
मुकुंदा आणि मुकुंदाची बायको! यांना काय करायच्यात चौकशा? काय वाटलं? चार वेळा जेवायला घातलं म्हणून वाट्टेल ते विचारतील आणि तो सांगेल?

मुकुंदाची बायको! आली होती की! त्याला भेटायला नव्हे! चाळीला दाखवायला आली होती!

काहीसं आठवून तो हळूच उठला. कपाटापाशी गेला. आतून नीट घडी करून ठेवलेला छोटासा रुमाल काढला. काल तिचा पडलेला. कसलासा मंद वास होता त्याला. त्याने घडीवरून अलगद हात फिरवला. एकदम छातीचे ठोके वाढले त्याच्या. इतके की कोणाला ऐकू जातील अशी भीतीच वाटली त्याला!

एक शब्दसुद्धा बोलली नाही काल. बोलली काय, नजरेला नजरसुद्धा दिली नाही. मुकुंदाच्या शेजारी जेमतेम पाच मिनिटं बसली आणि मग सगळा वेळ बाहेर शेजारपाजारच्या बायकांशी बोलत राहिली.

हीच अनुराधा प्रथम घरी आली तेव्हा वेडावलाच होता तो. त्यांचं ते अंधारं, कायम उदासवाणं वाटणारं मेणचट घर एकदम उजळून निघाल्यासारखं वाटलं होतं त्याला. त्याच्या आठवणीत इतकं प्रसन्न, इतकं ताजं काही घडलंच नव्हतं त्या घरात!

"हिच्याशी लग्न करणार आहे मी, आई" थेट म्हणाला होता मुकुंदा. आईची एक मिनिटभर चलबिचल झाली होती. मोहनला स्थळं सांगून येणं केव्हाच बंद झालं होतं. रूप, शिक्षण, नोकरी सगळंच बेताचं, त्यात तोतरेपणा, घरात आई आणि तेव्हा अजून शिकत असलेला धाकटा भाऊ. अवघडच होतं ते. आणि आता वय उलटलं होतं. आई त्याचा अंदाज घेत होती. त्याच्या चेहर्‍यावर काही नाराजी दिसली नाही तशी सुटका झाल्यागत तिने मुकुंदाला मान डोलावली होती.

चाळीतल्या एवढ्याशा जागेत जुळवून घेणं सगळ्यांनाच अवघड गेलं असणार. आईला तर फारच. इतकी वर्षं तिला मुकुंदा आणि मुकुंदाला ती! ती म्हणेल ती पूर्व असायची मुकुंदासाठी! आता अनुराधा मालकीण झाली होती!

मोहनला या कशाचा पत्ताच नव्हता. तो अनुराधेच्या नुसत्या घरात वावरण्यात खूश होता. तिचं ते किणकिण बोलणं, मंजूळ हसणं, मुकुंदाशी बोलतांना हळूच लाजणं . . . तो अधाशासारखं नुसतं बघत रहायचा. घरभर खुणा असायच्या तिच्या . . . कधीतरी खुर्चीच्या पाठीवर टाकलेली ओढणी . . . टेबलावरची उचलायची राहिलेली केसांची पिन . . . आरशापाशी किंचितशी सांडलेली मंद वासाची पावडर . . . इतकंच काय, दाराशी इतरांच्या रुक्ष वहाणाबुटांपुढे उठून दिसणार्‍या तिच्या त्या नाजुक नक्षीदार चपलासुद्धा . . . सगळंच अप्रुपाचं वाटायचं त्याला. कधीतरी त्याने हळूच हातसुद्धा लावून पाहिला होता ओढणीला. तलम . . . रेशमी . . .!

सुरुवातीला ती त्याच्याशीही मोकळेपणाने बोलत असे. मग हळू हळू काय झालं काय माहीत . . . तो घरात असला की अवघडून लांब लांब रहायला लागली ती. पण त्याची त्याबद्दलही तक्रार नव्हती.

आईचं वागणं मात्र दिवसेंदिवस विचित्र होत चाललं होतं! उगाच काहीतरी कुरापती आणि धुसफूस! त्यातून व्हायचं तेच झालं. मुकुंदा निराळी जागा बघत असल्याची कुणकुण मोहनला कुठूनशी लागली.

अनुराधा घरातून जाणार या कल्पनेने तो वेडापिसाच झाला. जायचंच होतं तर ती आलीच कशाला होती त्याच्या आयुष्यात! चाललं होतं ते काय वाईट होतं! नाही नाही, तिला थांबवायला हवं होतं. मुकुंदाला थांबवायला हवं होतं. पण आताशा मुकुंदासमोर बोलायचा त्याला धीरच व्हायचा नाही. एक तर तो उशीरा यायचा. मग सतत काहीतरी कामात असायचा. अधिकाराची एक जाणीव असायची त्याच्या सगळ्याच वावरण्यात. वयाने मोठा असूनही त्याच्यासमोर दडपूनच जायचा मोहन. मग त्याला नुसताच राग राग यायचा.

हाच मुकुंदा लहानपणी एकुलता मित्र होता त्याचा! त्याचं ते कष्टांनी कसंबसं फुटणारं तुटक बोलणं ऐकण्याइतकी उसंतच नसायची कोणाला. लहानगा मुकुंदा मात्र तासन्‌तास त्याला काहीबाही सांगत विचारत बसे. ते कधी बंद झालं कोण जाणे. आता हा मुकुंदा जणू कोणी निराळाच माणूस झाला होता. अनोळखी.

पण लवकर बोलायला हवं होतं. मुकुंदाने आईला सांगायच्या आत काहीतरी करायला हवं होतं. कारण त्यानंतरच्या आकांडतांडवात संधीही मिळणार नव्हती आणि तिचा उपयोगही असणार नव्हता.

शेवटी एक दिवस त्याने हिय्या केला. फॅक्टरीतून आल्यावर अनुराधाने त्याचा चहा आणला तेव्हा त्याने बोलायला तोंड उघडलं. "तु . . . तुम्ही दोघे . . ." इतकं तोंडून फुटेस्तोवर चहा ठेवून ती वळलीसुद्धा होती. अशीच तडक वळून निघून जायची आताशा. तिला कसं थांबवावं त्याला समजेना. त्याने गडबडीत तिचा हात धरला. ती ताड्‌कन वळली. क्षणात थक्क झाली, पुढच्या क्षणी संतापली. मग त्यानंतर तिने हात हिसकावून घेतला की त्याची पकड आपोआप सुटली हे त्यालाही समजलं नाही. बहुतेक तेव्हाच मुकुंदा घरात शिरत होता. बहुतेक. म्हणजे त्याला नंतर कधीच ते नीट आठवलं नाही.

त्याला आठवतं ते एवढंच की त्याच्याशी त्याबद्दल कोणी कधी काही बोललंच नाही. खरंतर त्यानंतर घरातली बोलाचालीच संपल्यासारखी झाली.

मुकुंदा महिन्याने जायचा तो आठवड्याभरातच बाहेर पडला. कसं जमवलं कोण जाणे. आणि नंतर तर परगावीच जाऊन स्थायिक झाला. सुरुवातीचे काही दिवस सुतकासारखे गेले. आपण फुटून जाऊ, आपल्याला वेड लागेल असं मोहनला वाटायचं. संध्याकाळी घरी आला की नुसताच भिरभिरल्यागत करायचा. रात्र रात्र झोप यायची नाही. डोळे मिटले की सतत तो अनुराधेचा संतापाने फुललेला चेहरा आणि विस्फारलेले डोळेच दिसायचे.

असं काय केलं होतं त्याने? तिला काय वाटलं, काय करणार होता तो?! म्हणजे . . . त्याने हात धरला होता तिचा, पण ते तिला थांबवायला . . . नाही का? त्याच्या मनात तसं काही नव्हतं! कधीच नव्हतं!! . . . हो ना?

की . . .? मग . . . आणखी काही झालं तेव्हा? कोणी . . . त्याच्याशी बोललं का नाही? कोणी जाब का विचारला नाही? कशाला घाबरले नक्की? असं काय बोलणार होता तो विचारलं असतं तर?! . . . बाप रे! काय बोलणार होता तो विचारलं असतं तर?!

मुकुंदा . . . त्याच्याशी नाही बोलला म्हणजे कोणाशीच नसेल ना बोलला? मग येताजाता चाळीतले लोक असे रोखून का बघायला लागले होते त्याच्याकडे आताशा? कोणीतरी सतत पाळतीवर असावं तसं वाटायचं त्याला! कोणीतरी एकदम हटकेल, काहीतरी विचारून बसेल असं वाटायचं. मान खाली घालून नजरा चुकवत घाईघाईत चालत सुटायचा मग तो. मागून हसल्याचे आवाज यायचे कधीतरी. भीती वाटायची.

आणि आई? आईला बोलला असेल मुकुंदा? म्हणून आजारी पडली ती? की फक्त मुकुंदा लांब गेला म्हणून? पण तिचीच चूक होती! तीच वाईट वागली होती अनुराधेशी! म्हणून गेला होता तो! तिच्यामुळे! तिच्यामुळे गेली होती अनुराधा!

अनुराधा! काही फरक पडलेला नाही तिच्यात! तशीच टवटवीत! तशीच लखलखीत!
पण बोलली नाही! एक शब्द बोलली नाही! काल रात्रभर तळमळला होता तो! तडफड तडफड झाली होती जिवाची! का नाही काल तरी विचारलं तिने? का नाही काल तरी त्याने सांगायचा प्रयत्न केला? एकदाच काय तो सोक्षमोक्ष लागला असता! काय कोणाच्या मनात होतं ते एकदाच . . . साला हांडगा! हांडगा होता तो! उगाच नाही लोक हसायचे!

घरी रहायची भीती वाटली म्हणून गेला होता फॅक्टरीत आज. अंगात त्राण नव्हते. तिथे दिवसभर काय केलं कोण जाणे! घरी यायला निघाला . . . चौकापाशी आला.. तिथे ती दोघं उभी होती . . . रमली होती बोलण्यात . . . जसं काही आजूबाजूला दुसरं जगच नव्हतं! अरे लोक येत जात असतात! बघत असतात!

त्या मुलाने बोलता बोलता टाळीसाठी हात पुढे केला . . . आणि तिने दिली की टाळी . . . बघता बघता त्याचं डोकं तापलं होतं.

हात धरतो! हात धरतो साला! अरे ती एवढी निष्पाप मुलगी! शरम वाटत नाही! संतापाने भोवळ येणार असं वाटलं त्याला क्षणभर. दुसर्‍याच क्षणी त्याचं त्यालाच काही कळायच्या आत तो त्या पोरावर धावून गेला होता . . .

"क्‌.. काय क्करत होतास? बोल?!.. ब्‌. बोल ना स्साल्या! क्काय क्‌.. काय करणार होतास तिला? आँ? आ.. आ.. आता का ग्‌.. ग्‌.. गप्प? ब्बोल? बोल ना!!"

****

- स्वाती आंबोळे