अतीत

जुन्या गोष्टी विसरण्याचा इतक्या वर्षांचा प्रयत्न, तन्मयच्या त्या एका वाक्यानं उडवून लावला होता. बॅक टू स्क्वेअर वन! तेव्हा माझं काय चुकलं? मी निर्णय घेताना घाई केली का? मी अजून पेशन्स दाखवायला हवा होता का? मी अक्षयला समजून घेण्यात कमी पडले का? परत प्रयत्न करायला हवा होता का? अनेक प्रश्न परत मनात दाटून आले. सत्त्याऐंशी लाखवेळा विचार केला असेल ह्या गोष्टींचा आणि प्रत्येक वेळी उत्तर एकच येत होतं, जे झालं ते चांगल्यासाठीच. तरीही मन परत त्या गुंत्यात जाऊ पहात होतं.

borderpng.png

का

र्यक्रम छान म्हणजे छानच झाला! नाच संपल्यावर नुसत्या टाळ्या आणि शिट्ट्या! ठराविक गटांकडून वन्स-मोअर!!! मुख्य म्हणजे ह्या टाळ्यांसाठी कसलंही आवाहन नाही, काही नाही. सारं एकदम उत्स्फूर्त, कसल्याही उपचारांविना!

इतक्या वर्षांनी स्टेजवर येणं म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती. त्याचं यथायोग्य टेन्शन वगैरे आलं होतंच, पण अंजली म्हणजे अशा टेन्शनचा चांगल्या प्रकारे उपयोग करून, आपलं काम अजूनच चांगलं करणार्‍यांतली! त्यामुळे सगळं सुरळीत पार पडणं हे तिच्यासाठी अजिबात नवीन नव्हतं. नाचाच्या शेवटी जे घडलं, ते मात्र तिला अनपेक्षित होतं.

Atit.jpg गाणं रंगात आलं होतं. लोकांनी टाळ्या वाजवत ताल धरला होता. आता शेवटची ओळ. ठरल्याप्रमाणे दोघांमध्ये पाच फूट अंतर होतं. तन्मय स्टेजच्या मधोमध उभा, अंजली डावीकडे. आता तन्मय आहे त्या जागेवर पुढे बघत थांबणार आणि अंजली पळत येऊन त्याला मिठी मारणार. जसं मूळ गाण्यात होतं तसंच. ताल आणि शब्दांकडे लक्ष देत अंजली तन्मयजवळ आली, पण तेवढ्यात तन्मय तिच्याकडे वळला आणि त्यानेच तिला मिठी मारली! वेगानं पळत आल्यामुळे ती उचलली गेली. तन्मय तिच्याकडे पहातच राहिला. तिला उचलून आपण काही सेकंद स्वत:भोवती फिरत आहोत, हे तन्मयलाही समजेना. त्यानं असं अंजलीला उचलून घेणं हा त्यांच्या नृत्यातला ठरलेला भागच समजून सगळेजण ओरडू लागले. नाचाच्या तालमी पाहिलेल्यांना ते एक 'रोमँटिक इम्प्रूव्हायजेशन' वाटलं, जे त्यांनाही आवडलं. मग नुसत्या शिट्ट्या! त्या गोंधळात तन्मयनं अंजलीला "मॅरी मी अंजू! " म्हटल्याचं तन्मय आणि अंजली सोडून तिसर्‍या कोणालाही ऐकू आलं नाही.

अर्थात वन्स-मोअर मिळाला! परत शेवटचं कडवं वाजवलं गेलं. लोकांनी टाळ्या वाजवत ताल धरला होता. आता शेवटची ओळ. ठरल्याप्रमाणे दोघांमधे पाच फूट अंतर होतं. तन्मय स्टेजच्या मधोमध उभा, अंजली डावीकडे. आता तन्मय आहे त्या जागेवर पुढे बघत थांबणार आणि अंजली पळत येऊन त्याला मिठी मारणार. अंजली तन्मयजवळ आली, पण मिठी न मारता हातात हात घेऊन त्याच्याकडे बघत राहिली. 'वन्स-मोअर' मागणार्‍या समूहामधून 'उडी', 'उडी', 'ओ उडी कधीऽ' वगैरे हाका येत राहिल्या. परत 'वन्स-मोअर' पण आलं, पण नाही. बराच वेळ टाळ्या वाजत राहिल्या आणि शेवटी पडदा पडला.

अंजलीचं हे एकच गाणं असल्यानं ती बॅकस्टेजलाच थांबली. तन्मय लगेचच कपडे बदलून इतर 'स्वयंसेवक'गिरी कामांसाठी तिथून बाहेर पडला. नंतर बरीच गाणी झाली, एक विनोदी एकपात्री प्रयोगदेखील झाला. विंगेत थांबलेल्या अंजलीला मात्र त्यातलं काहीच दिसत नव्हतं. कानातून 'घूंऽऽ' असा आवाज येत होता. स्टेज वगैरे तिच्यासाठी अजिबात नवीन नव्हतं. नाचाच्या शेवटी जे घडलं, ते मात्र अनपेक्षितच!

कार्यक्रम संपला तेव्हा बराच उशीर झाला होता. तन्मयचा फोन आला, "कुठे आहेस? मी खाली थांबलो आहे पार्किंगजवळ. लवकर ये, आधीच उशीर झाला आहे. "

अंजली लगेचच खाली उतरून गाडीत जाऊन बसली. आता घरी पोहोचायला एक तास. येतानासुद्धा तो तिला घ्यायला आला होता. तेव्हा चालू असलेली सीडी आताही चालू झाली. सिलेक्टेड जुन्या गाण्यांचा संग्रह! त्याला शेकडो गाणी तोंडपाठ होती. येताना त्याचं जोरजोरानं गाणं चालू होतं. आता मात्र शांतता. तन्मयनं आपल्या स्वभावाप्रमाणे, मनात आलेली गोष्ट उत्स्फूर्तपणे सांगून टाकली होती. अंजली मात्र काहीच प्रतिक्रिया न देता शांत-शांत होऊन गेली होती. पाच वर्षांपूर्वी झालेल्या अनेक गोष्टी तिला आठवत होत्या. तेव्हाही तिला हाच प्रश्न विचारला गेला होता आणि ती हसून मनापासून हो म्हटली होती. आजच्या ह्या प्रसंगामुळं काही जुन्या आठवणी चाळवल्या गेल्या. विसरू पाहत असलेलं अतीत, पुन्हा एकदा आठवू लागलं होतं.

* * * * * * * * * * *

सहा वर्षांपूर्वीची गोष्ट. अंजलीचं शिक्षण पूर्ण झालं आणि लगेचच नोकरी लागली होती. मग ट्रेनिंग्स, टाईमपास करण्यात पहिले काही दिवस गेले, पण नंतर प्रचंड काम आलं. ऑक्टोबर महिना कधी आला ते समजलंही नव्हतं. ह्या सगळ्या गडबडीत १ ऑक्टोबरला कंपनीकडून ईमेल आलं, "दर वर्षीप्रमाणे यंदाही 'संस्कृती' चे आयोजन करण्यात येणार आहे. 'गायन', 'वादन', 'नृत्य', 'अभिनय' इत्यादी सर्व कलाप्रकारांसाठी प्रवेशिका मागवल्या जात आहे. गरज पडल्यास शक्य तेवढे मार्गदर्शन केले जाईल. 'संस्कृती'मध्ये सहभागी होण्यासाठी इथे संपर्क साधा . . ." अंजलीने लगेचच आपलं नाव नोंदवलं होतं.

"कलाप्रकारः - नृत्य (शास्त्रीय व लाईट).
यापूर्वी अनुभव:- दहा वर्षे (शाळा, कॉलेजमधे ग्रुप/सोलो/पेअर डान्स ) "

ईमेल पाठवल्या पाठवल्या अंजलीला बोलावणं आलं होतं, "लगेच येऊन भेटा!" खाली फोन नंबर लिहिला होता.

कामात दिवस निघून गेला आणि अंजलीला संयोजकांना भेटायला जाता आलं नाही. घरी जाण्यासाठी निघताना आठवण झाली आणि तिनं फोन केला. "आता आलीस तरी चालेल" असं उत्तर आलं. "पाचदहा मिनिटांचाच तर प्रश्न आहे . . ." म्हणत अंजली तिकडे निघाली. मिटींग रूममधे अक्षय तिची वाट बघत होता. त्यानं हसून तिचं स्वागत केलं. अक्षय मागच्या तीन वर्षांपासून इथे नोकरी करत होता. तो स्वतःदेखील उत्तम डान्स करत असे. यंदाच्या संयोजनाची जबाबदारी त्याने स्वतःवर घेतली होती.
"तू चांगलीच तयारीची दिसतेस, तुला ऑडिशन-सॉर्ट ऑफ द्यायला लावणार नाही, पण जस्ट एक झलक म्हणून . . ." अक्षय बोलला होता. अंजलीला याची कल्पना होतीच. अक्षयनं गाणं सुरु केलं. एका कडव्याच्या बोलीवर सुरु झालेलं ते गाणं सुरु तर झालं, पण एका कडव्यानंतर ते बंद करण्याचं अक्षय विसरूनच गेला! अंजलीचं नृत्यही नुसतं बघत बसण्यासारखंच खरं. गाणं संपल्यावर अंजली थांबली. तिच्या हातात पाण्याची बाटली देत अक्षय उठून उभा राहिला. "टू गूड! एक्सलंट!!!" कितीतरी वेळ तो तिच्याकडे बघत फक्त एवढंच बोलत राहिला होता.

* * * * * * * * * * *

"हॅलोऽ! ओ मॅडम!!! माहितीये खूप टाळ्या पडल्या आज, म्हणून काय . . ." तन्मयच्या बोलण्यानं अंजली एकदम भानावर आली.
"अं? काय??" अंजली हसून त्याला म्हंटली.
"काय?" हिचं अजिबात लक्ष नव्हतं, हे तन्मयच्या लक्षात आलं. "आजचा परफॉर्मन्स एक्सलंट होता. टू गूड!!!" तन्मय बोलला.
"थँक्स!"
"थँक्स कसलं म्हणतेस, फॉर्मल . . ." तन्मय बोलत होता.
"तसं नाही, गाणी किती छान लावली आहेस. तिथेच लक्ष होतं. जरा आवाज मोठा कर ना . . ."
"बरं," म्हणत तन्मयनं आवाज मोठा केला आणि तो गाडी चालवू लागला.

ही काहीच न घडल्यासारखं का वागते आहे? तन्मयला कळत नव्हतं. म्हणजे 'हो'च म्हण असंही नाही. नाही म्हटलं तरी एक वेळ ठीक. मी समजण्याचा प्रयत्न करेन. पण काहीच उत्तर नाही? की तिला ऐकूच आलं नसेल एवढ्या गोंधळात? नाही. ऐकू गेलंच असावं. गोंधळ वगैरे सगळं नंतर झालं. आपण त्याच्या आधीच बोलून गेलो होतो. का मी चूक केली विचारून? सॉरी म्हणावं काय? छ्या . . . त्यानं सॉरी म्हणायचं पक्कं करत तिच्याकडे पाहिलं पण त्याला सॉरी म्हणवेना. कदाचित विचार करत असेल. तिला थोडा वेळ द्यायला हवा. आपण थांबावंच! पुढे काहीही न बोलता तन्मय गाडी चालवत राहिला.

पण गाण्यांकडे अंजलीचं मुळीच लक्ष नव्हतं. ती त्याला "आवाज थोडा मोठा कर!" म्हणत असताना तन्मयनं चुकून जर का, "कुठलं गाणं? " असं म्हटलं असतं, तर अवघड झालं असतं, हे तिलाही माहीत होतं.

तन्मय. एकदम हुशार. कुठल्याही विषयावर बोलायला आणि मुख्य म्हणजे ऐकायला नेहेमी तयार, कधीही, कितीही वेळ. तसा थोडा चिडका होता खरा, पण जे असेल ते तोंडावर बोलून मोकळा होत असे. बोलताना एक आणि करताना तिसरंच काही असला प्रकार नक्कीच नव्हता. गेली दोन वर्षं दोघं एकत्र काम करत होते. तन्मय तिच्यानंतर जॉईन झाला होता. वयानं तिच्यापेक्षा एक वर्ष लहान होता. त्याच्या स्वभावामुळे असेल, मॅच्युरिटीमुळे कदाचित, काही दिवसांतच त्याच्याबरोबर मोकळेपणानं बोलणं होऊ लागलं होतं. पण आज तो जे काही बोलला, तसं काही बोलेल असं तिला कधीच वाटलं नव्हतं.

तन्मयला काय उत्तर द्यावं हे तिला समजेना. अजून पाऊण तास तरी प्रवास आहे. नुसतं गप्प बसलं तर त्याला अवघडल्यासारखं होईल. काय बोलावं? ती विचार करायला लागली. पण नाही. हे शक्य नाही! ती मनात म्हटली. ह्याला कसं समजवावं की हे शक्य नाही? त्याला माहीतही नसेल की माझं लग्न झालंय. मी एक डिवोर्सी आहे!

जुन्या गोष्टी विसरण्याचा इतक्या वर्षांचा प्रयत्न, तन्मयच्या त्या एका वाक्यानं उडवून लावला होता. बॅक टू स्क्वेअर वन! तेव्हा माझं काय चुकलं? मी निर्णय घेताना घाई केली का? मी अजून पेशन्स दाखवायला हवा होता का? मी अक्षयला समजून घेण्यात कमी पडले का? परत प्रयत्न करायला हवा होता का? अनेक प्रश्न परत मनात दाटून आले. सत्त्याऐंशी लाखवेळा विचार केला असेल ह्या गोष्टींचा आणि प्रत्येक वेळी उत्तर एकच येत होतं, जे झालं ते चांगल्यासाठीच. तरीही मन परत त्या गुंत्यात जाऊ पहात होतं.

"बास! विचार बंद!" मनात म्हणत तिनं तन्मयकडे पाहिलं. तन्मय समोर पाहून गाडी चालवत होता. काय बोलावं हे तिला अजिबात समजेना. ती काहीही बोलली असती तरी तन्मयनं पुढे पुराण चालू केलं असतं. फक्त विषय काढायची खोटी! पण तिला तेही सुचत नव्हतं. ती परत बाहेर बघायला लागली. परत मनात विचार सुरू झाले.

चार वर्षं झाली ह्या सगळ्याला. त्यानंतर जॉब बदलला, ऑर्कुटवरचं ते प्रोफाईल उडवलं. मित्रांनीही जणू काही घडलंच नाही असं वागणं चालू केलं. दोनेक वर्षांनंतर आईनं "पुढे काय?" असं विचारलंही होतं. "काका विचारत होते . . ." म्हणत होती. "झालं ते झालं, नशीब म्हणायचं" वगैरे समजावण्याचा प्रयत्नही केला तिनं. "बघू" म्हणून आपण वेळ मारून नेली होती. आता तिने विचारणंही बंद केलंय. अशा वेळी एक चांगला मुलगा आपल्याशी असे बोलण्याचे धाडस करतो, ही नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट खरी, पण . . ."

तन्मयबद्दल विचार करण्याचा प्रयत्न केला तरी मनात परत एकदा अक्षयबद्दलच विचार येऊ लागले. "तोही समजूतदार होताच, तरीही असं घडलं होतं! पण घडलं त्याच्यामधे त्याचा तरी काय दोष होता? त्यानं "आम्ही नास्तिक आहोत," अशी पूर्वकल्पना दिली होती! आपणच त्याची खोली समजू शकलो नव्हतो. पण नास्तिक म्हणजे इतकं नास्तिक तरी का असावं त्यानं? घरात देवघर नाही, एक फोटोही नाही. तुम्ही नको, मी माझ्या मनासाठी ठेवते, मी त्याचं सारं बघेन म्हटलं तर ते मात्र त्यांनी समजून घ्यायला हवं होतं. दागिने नाहीत ठीक, पण एक मंगळसूत्र?? तेही नाही. नॉनव्हेजचंही तसेच! मी खात नाही म्हणून तू सोड असं काही मी म्हटलं नव्हतं, पण म्हणून कधीही बघावं तर घरी नॉनव्हेज? मीच खरी मूर्ख. समजू शकले नाही. मी अ‍ॅड्जस्ट करेन म्हणत एवढी मोठी रिस्क घेतली आणि आता काय होऊन बसलं आहे. आपल्यामुळे दोघांचंही नुकसान होऊन बसलं होतं. अंजली निराश झाली होती. नेहेमीप्रमाणे गाडी निराशेच्या स्टेशनवर येऊन थांबली. इथून बाहेर पडणं मोठं मुश्किल!

* * * * * * * * *

"हॅलोऽ! ओ मॅडम!!! " तन्मयच्या बोलण्यानं अंजली भानावर आली. "चल एकेक कॉफी घेऊन मग घरी सोडतो," तो बोलला. अंजली खाली उतरली. बाहेर छान वारं होतं, फ्रेश वाटलं. "आत नको, तू इथेच थांब, मी बाहेरच घेऊन येतो," म्हणून तो आत गेला. कुठली कॉफी घेणार, याबद्दल त्यानं तिला विचारलं नाही आणि तिनंही काही सांगितलं नाही. अंजलीच्या मनातलं विचारचक्र चालूच होतं.

तन्मय कॉफी घेऊन परतला. तिच्या हातात पेपरग्लास देत म्हटला, "लाते".

"तू प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस, पण मला थोडं बोलू दे . . ." अंजलीकडे न पाहता तो बोलू लागला. कॉफी शॉपमधे जागा असूनही आपल्यासोबत असं बाहेर उभं राहण्याचं कारण आत्ता कुठे अंजलीला समजलं. शॉपमधे समोरासमोर बसावं लागलं असतं, एकमेकांकडे बघत बोलावं लागलं असतं.
"मला माहितीये अक्षयबद्दल. " तिच्याकडे पाहून तन्मय बोलला,"अ‍ॅण्ड आय डोंट केअर."
अंजलीनं त्याच्या डोळ्यात बघितलं. आता रडू फुटणार. ती काहीच न बोलता परत वर आकाशाकडे पाहू लागली.

"लिसन अंजली, मी तुला कसलाही फोर्स करत नाहीये. करू शकणारही नाही. पण मला मनापासून वाटलं म्हणून मी बोललो. तू खूप चांगली मुलगी आहेस. जे काही घडलं त्यात कोणाची चूक होती, काय घडलं असतं तर असं झालं नसतं वगैरे गोष्टींच्या पलीकडे आता तू उभी आहेस. इथे उभे राहून परत तिथला विचार करणे म्हणजे तू स्वतःवर अन्याय करुन घेते आहेस, माझ्या मते."

अंजली शांतपणे तन्मयकडे बघत राहिली.

"मी तुझ्या घरच्यांशी बोललो आहे. त्यांनाही धक्का बसला. मी नेहेमी घरी येतजात असलो, तरी हा विषय नेहेमीचा नाही. पण त्यांनी मला विश्वासानं हे सगळं सांगितलं. मला काहीच कल्पना नव्हती, माझ्यासाठी हे नवीनच. बट अ‍ॅज आय सेड, आय डोंट केअर. माझं तुला इतकंच सांगणं आहे की, तुझ्यासमोर अजून उभं आयुष्य पडलं आहे. सगळं चांगलं आहे, केवळ एक चूक! त्या एका चुकीची शिक्षा एवढी मोठी असू शकत नाही. तू स्वतःवर अन्याय करते आहेस, जे मला पटत नाही. अजून एकच गोष्ट. तू माझी आणि अक्षयची तुलना करत असशील तर तसं करु नकोस! परत त्याच गर्तेत अडकशील. भूतकाळाबरोबर राहून नुकसान करून घेण्यापेक्षा भविष्याचा विचार करणं जास्त शहाणपणाचं असं म्हणतात." तन्मय बोलत होता, पण अंजली चालू लागली. थोडंसं पुढे जाऊन तिनं रुमालाने डोळे पुसले. तन्मय आपल्या जागेवर थांबला होता.

डोळे पुसून अंजली परत आली. "थँक्स तन्मय. तू माझ्याबद्दल एवढा विचार करतो आहेस. तुझ्यासारखे फार कमी भेटतात. माझ्याबद्दल समजल्यावर पूर्वीपेक्षा वेगळ्याच दृष्टीने पाहणारेच अधिक. ऑफिसमध्येही काही आहेत. जाता येता बघत असतात. त्यामुळे कशातही मन लागेनासं झालं होतं. हे लोक कधी भेटू नयेत असं वाटतं, पण इलाज नाही. यंदा बर्‍याच वर्षांनी ह्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला. याचं कारण तूच! तू नसतास तर मी कधीच ह्यामध्ये भाग घेतला नसता. "

"तुझा विचार मला पटतो तन्मय. कदाचित मी स्वत:वर अन्याय करुन घेते आहे. स्वत:वर आणि आईवडिलांवरही. ह्याबद्दल विचार करायचं सोडणं अवघडच आहे, पण मी प्रयत्न करेन. माझं अतीत असं आहे, जे मी नाकारू शकत नाही. पण भूतकाळाबद्दल चिंता करण्यापेक्षा, आता मी चांगल्या भविष्याचा विचार करेन. आज मी तुला एवढंच प्रॉमिस करते, की तुझ्या प्रस्तावाचा मी मोकळ्या मनाने, कुठलेही पूर्वग्रह न ठेवता विचार करेन. "

कॉफी संपली. दोघे गाडीकडे निघाले. तन्मयनं वर आकाशाकडे पाहिलं, तर आकाश निरभ्र होऊ लागलं होतं. तिथे फक्त चंद्र आणि त्याचा मंद प्रकाश. हा प्रकाश सार्‍या आसमंताला शांत शांत करत होता!

- ऋयाम