काळजी करता करता सुनंदाची दुपार कलली. उन्हं उतरली. आपली सामानाची व खेळण्यांची छोटीशी सॅक पाठीवर लावून चिनूमामाची वाट पहात गेटपाशी गुलमोहोराखाली समंजसपणे उभी असलेली अर्णवची ती इवलीशी मूर्ती पाहून सुनंदाला अगदी भरून आलं. लांबून असं वाटत होतं की त्याच्या पाठीवर जणू एक छोटं अस्वलाचं पिल्लू त्याला मिठी मारून बसलंय. चिन्मय तयार होऊन आला. "चला, कोण कोण यणार दादाआजोबांकडे?" म्हणत त्याने बाईकला किक मारली. दोघे दिसेनासे होईपर्यंत सुनंदा गेटपाशी उभी होती.
बा
लासनात तिने शरीराला एक मस्त स्ट्रेच दिला आणि क्षणभर तशीच थांबली. मग सावकाश वज्रासनात बसताना तिचं हॉलच्या छताकडे लक्ष गेलं. उगवतीकडून आलेले कोवळे सूर्यकिरण टीपॉयवर ठेवलेल्या टेराकोटा मडक्यावरच्या आरश्यांवर पडून, छतावर परावर्तित झाले होते. वर छोटयाछोटया, गोलगोल, सोनेरी कवडश्यांची उधळण झाली होती. सुनंदा पहात राहिली. मन प्रसन्न झालं. कितीतरी दिवसांनी व्यायामाला अशी निवांत सवड मिळाली होती, कारण अर्णव अजून उठला नव्हता.
"आई, माझ्या चहात उंट नको गं घालू. मला नाही आवडत!" तिच्या बेडरूमधून अर्णवची झोपाळलेल्या आवाजातली आरोळी ऐकू आली. चिन्मयचं ऐकून अर्णवसुद्धा तिला आईच म्हणायचा. तसंही तिला स्वतःला अजूनही आजीपणाचं फ़ीलिंग आलंच नव्हतं!
सकाळी सकाळीच मनासारखा व्यायाम झाल्यावर सगळं कसं मस्त दिसायला लागतं. आता बागेला पाणी घालून होईतो ते इवलेसे फुलचुखे येतील, फ्लाइंग स्पॅरोच्या फांद्यांच्या बेचक्यांतलं पाणी प्यायला! एकमेकांशी त्यांच्या त्यांच्या भाषेत घाईगडबडीत काय वार्तालाप चाललेला असतो कोण जाणे! स्वतःभोवती छोटया छोटया वर्तुळाकार गिरक्या घेत, घेत एकमेकांभोवतीही गिरक्या घेत असतात. ते तर पहायला फारच मजा येते. सुनंदाचं मन शवासनात कुठे कुठे भरारी मारत होतं. ती रोज ठरवायची की शवासनात मन निर्विचार, निर्विकार झालं पाहिजे. एकदम शांत! पण रोज उलटच व्हायचं! मन आपलं इथे तिथे नाचत रहायचं.
"अरे, पिल्लू उठलं का?" तिनं शवासन आवरतं घेतलं, मॅट रॅकमधे ठेवली व घाईघाईत बेडरूममधे घुसली.
अर्णव अजूनही लोळतच होता. त्याचा टेडी तर पांघरुणातूनच बाहेर आलेला नव्हता. सुनंदाने अर्णवला मिठीत घेतलं. त्यानंही आपला पूर्ण भार तिच्यावर टाकला, मान तिच्या खांद्यावर टाकली आणि तिला आपल्या कोवळ्या मिठीत घेतलं. ती सुखावली. पण दोनच क्षणात भानावर आली. सकाळची खूप कामं व्हायची होती.
"अरे उंटाचं काय म्हणालास? आणि हो, मी तुला चहा देणार नाहीये बरं का. तुला काळं काळं व्हायचंय का त्या कावळ्यासारखं?" तिने त्याला खाली जमिनीवर उभा करत विचारलं. एका हाताने त्याचे विस्कटलेले केस सारखे केले. अर्णवबरोबर तिला सकाळी सकाळी असं निरर्थक गोड गोड बोलायला फार आवडायचं!
"अगं, मला चहात उंट पावडर आवडत नाही म्हटलं मी. पण मला चहा हवाय गं!" एकीकडे आजीला चहासाठी मस्का मारत, तोंडाचा चंबू करून, अर्णव आपलं म्हणणं ठासून मांडत होता. इथे आईबापावेगळं पोर म्हणून आजीआजोबांकडे त्याचे जरा जास्तच लाड होत होते. त्या चिन्मयला तर सारखा लागायचा तो तोंडी लावायला. मामाभाचे दिवसभर मस्ती करत रहायचे. सुनंदाला सतत वाटायचं. असं आपण आपलं मूल आपल्या आईकडे ठेवू शकलो असतो का? उत्तर अर्थातच "नाही" असंच यायचं. त्याची कारणं काहीही असोत.
"उंट? चहात? " ती क्षणभर कोड्यात पडली. पण नंतर इतकी हसत सुटली की बाहेर बागेला पाणी घालत असणारा प्रकाशही खिडकीतून डोकावला. म्हणाला, "काय गं, काय चाललंय आजीनातवाचं सकाळी सकाळी?"
"अहो हा सुंठपावडर म्हणायच्या ऐवजी उंट म्हणाला." ती म्हणाली आणि परत हसत सुटली.
गेट वाजलं. सुनंदा घाईघाईनं व्हरांडयात गेली. चिन्मयने बाईक शेडमधे लावली. खालमानेने शांतपणे व्हरांडयाच्या पायर्या चढू लागला. एरवी वादळासारखा यायचा. रोज गेट आपटण्याबद्दल बोलणी खायचा. बाईकचा हॉर्न तर घरापासून एक गल्ली लांब असतानाच वाजवायला सुरुवात करायचा. तोही दाबून धरायचा. अगदी घरात पोचेपर्यंत. गेटमधूनच आग लागल्यासारखा 'अर्णव, अर्णव’ पुकारा चालायचा. आज काय झालंय याला? सुनंदाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
"काय रे, आली होती का श्रुती ऑनलाईन?" सुनंदाने घाबर्याघुबर्या विचारलं. बोलता बोलता घडयाळाकडे नजर टाकली, मनात हिशेब केला. आत्ता इथे सकाळचे आठ, म्हणजे तिकडे साधारण रात्रीचे दहा!
"नाही गं आई. बघ ना गं. तरी ताईला परवाच मेल करून आजची वेळ दिली होती चॅटिंगसाठी. पण तिची मेल आली आहे . . ." चिन्मयनं शेवटचं, खालच्या आवाजात उच्चारलेलं वाक्य अर्धवट सोडलं.
"अरे सांग ना बाबा पटकन काय ते. जीव नको खाऊ. आणि आता लवकर आपलं इंटरनेट कनेक्शन दुरुस्त करून घे रे! हे रोज नेटकॅफेला जाणं नको!" सुनंदा कातावल्यासारखं बोलली.
"आई आता मात्र आपल्याला काही तरी करायला हवं! ताई आणि जिजूचं चांगलंच बिनसलेलं दिसतंय." सुनंदाची नजर चुकवत चिन्मय म्हणाला. खालमानेने त्याने बाईकची किल्ली कोपर्यातल्या टेबलावर भिरकावली.
"वाटलंच होतं मला! फ़ोनही लागत नाहीये, की उचलत नाहीये, कळत नाही. या मुलीच्या नशिबात काय आहे देव जाणे." तिने चिन्मयचा शब्द पडू दिला नाही.
"आणि नको रे ते जिजू जिजू करत जाऊ. चांगलं राहुलदादा म्हणावं नाहीतर आपलं भाऊजी काय वाईट आहे. काही तरी आपलं फिल्मी एकेक." लेकीच्या काळजीनं सुनंदा कुठेतरीच घसरली होती. प्रकाश बागेला पाणी घालून अंघोळीला गेला. बागेत फुलचुखे येऊन मंजूळ वार्तालाप करून, पाणी पिऊन, गिरक्या घेऊन गेले सुद्धा. सुनंदाचं तिकडे लक्षच गेलं नाही.
प्रकाश ब्रेकफास्टला बसलेला असतानाच रहाळकरांचा, व्याह्यांचा, फोन आला. नेहेमीप्रमाणे वीकेन्डला अर्णवला त्यांच्याकडे घेऊन जाण्याबाबत. सुनंदा त्यांच्याशी नेहेमी सारखं मनमोकळं बोलू शकली नाही. कारण लगेचच त्यांच्या सुनेबद्दल आणि पर्यायाने मुलाबद्दलही, अशी बातमी फोनवर द्यायला तिची जीभ धजावली नाही. जुजबी बोलून तिने फोन ठेवला. हॉलमधल्या सोफ्यावर जिग्सॉ पझल खेळत बसलेल्या अर्णवला जवळ घेतले व विचारलं, "अर्णव, बेटा जाशील ना रे आज दादाआजोबांकडे"? अर्णव अगदी गुंग झाला होता पझल सोडवण्यात. तरीही मान हलली. सुनंदाला वाटलं, याच्या आयुष्याचं कोडं कोण आणि कसं सोडवणार? भविष्यकाळ अगदी आ वासून समोर उभा होता.
काळजी करता करता सुनंदाची दुपार कलली. उन्हं उतरली. आपली सामानाची व खेळण्यांची छोटीशी सॅक पाठीवर लावून चिनूमामाची वाट पहात गेटपाशी गुलमोहोराखाली समंजसपणे उभी असलेली अर्णवची ती इवलीशी मूर्ती पाहून सुनंदाला अगदी भरून आलं. लांबून असं वाटत होतं की त्याच्या पाठीवर जणू एक छोटं अस्वलाचं पिल्लू त्याला मिठी मारून बसलंय. चिन्मय तयार होऊन आला. "चला, कोण कोण यणार दादाआजोबांकडे?" म्हणत त्याने बाईकला किक मारली. दोघे दिसेनासे होईपर्यंत सुनंदा गेटपाशी उभी होती.
*****
"आई, काका विचारत होते, 'काय म्हणते बहिणाबाई?’ म्हणून. आई, तुला काय वाटतं? राहुलने त्याच्या आई वडिलांना काही कल्पना दिली नसेल?" चिन्मय अर्णवला रहाळकरांकडे सोडून आला होता.
"अरे तसाही राहुल अबोलच आहे. बरं, लग्नही त्याच्या मर्जीनंच झालंय. त्याने विचार केला असेल, उगीच लांबून आई वडिलांच्या डोक्याला खुराक का द्या? पाहू, हळूहळू सुधारेल परिस्थिती असा विचार तो करत असेल. श्रुतीने अर्णवला इतक्या तडकाफडकी इथे ठेवण्याचा निर्णय घेतला, तेव्हाच त्यांना साधारण कल्पना आली असणार, पण आता त्यांची काय वयं आहेत का रे आघात सोसण्याची?" ती वरवर म्हणाली पण दोन दिवसांनी रहाळकर अर्णवला सोडायला येतील तेंव्हा त्यांना कसं तोंड द्यायचं, याचाच विचार ती करत राहिली.
भर उन्हाळ्यात सुद्धा गुलमोहोर अगदी वणवा पेटल्यासारखा फुलला होता. संध्याकाळ होत आली होती. मालिनी राजूरकरांचा मारवा काळजाचा ठाव घेत संपूर्ण वातावरणात भरून राहिला होता.
"ले चलो नगरमे . . . सूर जन मिला . . . बिछुडे आनंद करे . . ." अंतर्याचा षड्ज चराचराला हुरहूर लावत कातरवेळ आणखीन कातर करत गेला. सुनंदाच्या तनामनात कालवाकालव चालू होती, तरी ती देहभान हरपून ऐकत राहिली.
दोन दिवसांनी अर्णवला सोडायला रहाळकर आणि पद्माताई दोघेही आले. पद्माताईंनी चिनूला आवडतात म्हणून बीटाच्या वडया करून आणल्या होत्या. आज प्रकाशही घरी होता. "या या श्रीधरपंत ! अरे अरे, अर्णव बेटा जरा हळू, पडशील ना." प्रकाशने व्याह्यांचं स्वागत केलं. दुसरीकडे पळत, उडया मारत येणार्या नातवाला एका हाताने ब्रेक लावला. चेहर्यावर उसनं हसू खेळवत सुनंदाही सामोरी आली. तिला खूप अपराधी वाटत होतं. ती त्यांची नजर चुकवत होती. शेवटी तिला हा ताण असह्य होऊन ती चहा करायच्या निमित्ताने उठलीच. "अर्णव, आईला सांग आपण काय काय मज्जा केली ते," पद्माताई म्हणाल्या. त्यांना माहिती होतं की अर्णव चिन्मयचं ऐकून सुनंदाला आईच म्हणायचा. आणि तिकडच्या आजीला, पद्माताईंना मात्र आजी! त्या आजोबांना दादाआजोबा आणि प्रकाशला नुस्तंच आजोबा!
पद्माताईंना सुनंदा अस्वस्थ असल्याचं जाणवत होतं. म्हणूनच त्यांनी सुनंदाला बोलतं करण्यासाठी अर्णवला मध्ये घेऊन प्रश्न टाकला. पण सुनंदाचं मन सैरभैर होतं. तिला प्रश्न ऐकूच गेला नाही. तिचं कशातच चित्त लागत नव्हतं. अर्णव मात्र सुटला. खूप काहीबाही सांगत राहिला.
तसंही श्रुती अर्णवला इतक्या तडकाफडकी, इथे भारतात ठेवून गेली, तेव्हापासूनच त्यांना जरा काळजीच वाटत होती. पण राहुलही कधी फोनवर मनातलं बोलत नसे आणि श्रुतीनंही स्पष्ट काहीच सांगितलं नव्हतं पद्माताईंना! पण या मुक्कामात जरा तुटक वागत होती एवढं त्यांना नक्कीच जाणवलं होतं.
पद्माताईंना लग्नानंतर खूप वाट पहायला लावून मग राहुलचा जन्म झाला होता. त्यामुळे त्यांच्यात नेहेमीच एक अदृश्य अशी दरी असायची. जनरेशन गॅप! शेवटी निघायची वेळ आली तेव्हा पद्माताईंनीच सावधपणे विषयाला तोंड फोडलं. "काय म्हणतात जावई, लेक? अहो गेल्या कित्येक दिवसांत राहुलशी काही बोलणंच झालं नाही. खूपच बिझी दिसतोय तो. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, आम्हाला काय ते इमेल बीमेल काही जमत नाही. आमचं फक्त फोनवरच अवलंबून!" पद्माताईंना पुढे हेही म्हणायचं होतं की, आमचा मुलगा खूप बिझी आहे आणि तुमच्या मुलीशी आम्ही अजूनही फार खोलात जाऊन काही चर्चा नाही करू शकत. हे त्या बोलल्या नाहीत तरी सुनंदाच्या ल़क्षात आलं.
प्रकाशनेच काहीतरी जुजबी उत्तर देऊन वेळ मारून नेली. चहा, खाणं झालं. थोडा वेळ बसून ते निघाले.
"बाय अर्णव. ने़क्स्ट वीकेन्डला आपण पार्कमधे जाऊ हं!" रहाळकर म्हणाले.
"हो दादाआजोबा, आपण नंतर आईसक्रीम पण खाऊया." अर्णवने आपली पुढची मागणी आताच सांगून ठेवली. बिचार्याला आपल्या आयुष्यात काय चाललंय याची तिळमात्र कल्पना नव्हती. गेटपर्यंत त्यांना सोडून प्रकाश आणि सुनंदा घरात आले. अंधार झाकोळून आला होता. सुनंदाने विमनस्क मनाने देवापुढे दिवा लावला.
"महाबले महोत्साहे महाभय विनाशिनीं
त्राहि मां देवी दुष्प्रेक्षे शत्रूणां भयवर्धिनी . . ."
देवाला दिवा लावता लावता यांत्रिकपणे सुरू झालेलं देवीकवच पुढेच सरकत नव्हतं. तिला आईची आठवण झाली. किती निर्मळ नितांत श्रद्धा तिची देवीवर! ती म्हणायची, "तुला कधीही वाटलं तर देवीला हाक मार. ती तुझ्यासाठी धावून येईल बघ, या ना त्या स्वरूपात."
. . . "यं यं चिंतयते कामम् तं तं प्राप्नोति निश्चितम्
परमैश्वर्यमतुलंप्राप्स्यते भूतलेपुमान् . . ."
हळूहळू आठवत गेलं. देवीकवचाचा आधार वाटायला लागला. मनात खात्री वाटायला लागली. खरंच मी मनात जे गार्हाणं देवीला घातलंय, ते देवीपर्यंत नक्की पोचेल.
*****
बरेच दिवस बागेकडे कुणी लक्षच दिलं नव्हतं. पानांनी माना टाकल्या, भुंग्यांच्या ताना थांबल्या. फुलचुख्यांच्या गिरक्या, फुलपाखरांची थरथर सगळंच थांबलं होतं. जणू काळाची गतीच थांबली! सुनंदाला बागेचं ते रूप पहावेना. उद्याच माळ्याला बोलावलं पाहिजे. तिला वाटलं. श्रुतीच्या काळजीमुळे कशातच आनंद वाटेनासा झाला होता.
दिवस सरकत होते. श्रुतीचा फ़ोन लागत नव्हता. मेलला उत्तर मिळत नव्हतं. रहाळकरांनाही निकराचं आणि स्पष्टपणे काही विचारायची हिंमत होत नव्हती. शेवटी मधेच कधीतरी एकदा राहुलची "एव्हरीथिंग इज ओके, प्लीज डोन्ट वरी" अशी शॉर्ट इमेल आली होती. त्यानंतर आठवडयाने श्रुतीचीही मेल आली होती. "मी ठीक आहे. काळजी करू नका. लवकरच सर्व कळवते". तेवढाच सगळ्यांना दिलासा! मग अधूनमधून असेच खुशालीचे काही निरोप येत राहिले. पण ते वरवरचे होते अशी सुनंदाच्या मनात शंका होतीच. घरातल्या दुरुस्त झालेल्या इंटरनेटमुळे सुनंदाला अगदी बुडत्याला काडीचा आधार असावा तसं झालं.
*****
"आई अगं आज शिल्पाकडे या अर्णवने खूप दंगा केलाय बरं का! अगं बेल काय दाबून धरली. दारावर बुक्क्या काय मारल्या. आधीच आम्ही तिकडे पोचेपर्यंत आठ वाजून गेले होते." चिन्मयला भाच्याच्या करामती सांगताना हसू येत होतं.
"का रे इतका उशीर? चांगले सहा साडेसहाला निघाला होता ना? तरी मी म्हणत होते की तिन्हीसांजेचं उगीच अर्णवला घेऊन जाऊ नको म्हणून." सुनंदा म्हणाली.
"अगं हो आई! पण मला शिल्पाच्या सीडीज अगदी अर्जण्ट द्यायच्या होत्या ना. पुढे ऐक आई. अगं . . . शिल्पानं पळत येऊन दार उघडलं कारण यानं बेलवरचं बोटच काढलं नाही."
सुनंदाला हसू आलं. ती म्हणाली, " बरोबर आहे, तुझाच भाचा तो, तू नाही का बेल दाबून धरत!"
"तिनं दार उघडल्याबरोबर यानं तिच्या अंगावरच उडी मारली थेट. याचा गुडघा अस्सा लागलाय म्हणून सांगू तिच्या पोटात. कळवळली बिचारी." चिन्मय अजूनही हसतच होता. त्याला आपल्या मैत्रिणीकडचं दृश्यच दिसत होतं डोळ्यापुढे!
"काय करावं बाई या मुलाचं? दिवसेंदिवस खोडकर होत चाललाय. चिनू मला आता टेन्शन यायला लागलय बाबा. आणि हो, अरे, शिल्पाकडे इतक्या उशिरा कसे काय पोचलात ते सांग आधी. बाईकवरच गेलात ना?" सुनंदाचं टेन्शन तिच्या बोलण्यातही दिसत होते.
"आई, आम्ही बाईकवरच गेलो गं. पण वाटेत भेळवाल्याच्या गाडीसमोर हा बाईकवरून उडीच मारायला निघाला ’मला भेळ, मला भेळ’ करत. मग काय आधी बाईक थांबवली. साहेबांनी यथेच्छ ताव मारला. तिथून पुढे मग शिल्पादिदी!" चिन्मयला हसू आवरत नव्हते. पराक्रमी भाच्याबद्दलचे कौतुक डोळ्यातून ओसंडून वहात होते.
"चिनू, अरे याला भारतात येऊन आता वर्ष होईल रे. आता त्याच्या शाळेबाबत काही विचार करावा का? तुझ्या ताईच्या मनात काय आहे कळतच नाही रे. खूप काळजी वाटते आणि अर्णवही मम्मीची आठवणच काढत नाही रे!" सुनंदा चिन्मयला म्हणाली.
प्रकाशसमोरही एकदा असं म्हणाली तर तो म्हणाला होता, "अगं, मुलं काय जिकडे जातील तिकडचीच होतात. तूच म्हणायचीस ना? आणि आठवण काढतो की कधीमधी, पण तिकडे जायचं म्हणून हट्ट करत नाही हे सध्या तरी आपल्या पथ्यावरच आहे ना! आणि रहाळकरांकडे पण किती छान रहातो!"
तिने अर्णवला मायेने पोटाशी धरलं आणि ती त्याला म्हणाली, "चला, अर्णव आता झोपा लवकर. चिनू याच्या ब्रशवर पेस्ट घाल बरं. आणि अर्णव आज तू शिल्पादिदीला खूप त्रास दिलास म्हणे. ती आता तुला येऊ देणार नाही बरं का! म्हणेल, हा मुलगा मला त्रास देतो, अजिबात कोणाचं ऐकत नाही! "
अर्णवने सुनंदाच्या कुठल्याच सूचना मनावर घेतल्या नाहीत उलट तिचं बोलणं मध्येच तोडून, हातवारे करत, मोठ्या आवाजात सांगू लागला,"आई, मी जाणार शिल्पादिदीकडे. ती मला खूप खूप आवडते. ती माझीच मैत्रीण आहे. चिनूमामाची नाहीच मुळी!"
सुनंदा आणि चिन्मय दोघे त्याचा आविर्भाव पाहून हसू लागले. त्यांना हसताना पाहून अर्णव आणखीनच चेकाळला, माना वेळावत, हातवारे करत म्हणाला," मी उद्या, परवा, तेरवा, रोज जाणार तिच्याकडे. ती मला मांडीवर घेते, कॅडबरी देते. आम्ही खूप खेळतो."
सुनंदाला वाटलं, अर्णव शिल्पामध्ये श्रुतीला तर शोधत नसेल? शेवटी मी किती केले तरी मी त्याची आजीच! त्याला कमीच पडत असणार. छे! आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. काय करावं बरं?
अर्णव पेंगुळला होता. गादीवर टेडीशी खेळता खेळता झोपून गेला. चिन्मय टीव्ही पहात बसला होता. प्रकाश पेपर चाळत होता.
"अरे चिनू, शिल्पा जरी तुझी मैत्रीण असली तरी तू शिल्पाकडे अर्णवला सारखं सारखं नेत नको जाऊ. ते लोक आता चौकश्या करायला लागतील, अजून हा भारतात कसा, वगैरे!" सगळं जरा शांत झाल्यावर प्रकाश चिंतित स्वरात चिन्मयला म्हणाला.
"बाबा, लोकांना घाबरून आपण या मुलाला घरात कोंडून ठेवायचं का? का त्याला आपण टाकून देणार आहोत? आणि शिल्पाच्या घरचे तसले नाहीत. दुसर्यांच्या गोष्टीत नाक खुपसणारे. उलट त्यांना अर्णव इतका आवडतो ना!" चिन्मय त्याच्या वयाला शोभेलसं बोलला.
"अरे, ते बरोबर आहे, पण आपल्यामुळे उगीच लोकाला त्रास नको." सुनंदा म्हणाली.
"आई अगं त्रास कसला? आई, शिल्पाला तुझं तर इतकं कौतुक वाटतं! ती म्हणते काकू किती एफिशिएंटली करतात नातवाचं, आणि आज्जी तर कुठल्याही अँगलने वाटत नाहीत!!! आणि बाबा, काल पहायला हवं होतंत तुम्ही, अमेरिकेहून विमानातून कसा आला त्याच्या ममाबरोबर, एअर होस्टेसने त्याचे कसे लाड केले . . ." चिन्मयला सांगताना हसू फुटत होतं.
"झाली का परत तीच स्टोरी रिपीट?" बाबांनाही हसू आवरत नव्हते. सुनंदाला बोलता बोलता जांभया यायला लागल्या होत्या. विचार करून करून मन श्रांत झालं होतं.
"अर्णवला पाठवू का?" असा श्रुतीचा फ़ोन आला तेव्हा सर्वांच्याच जिवाचं पाणी पाणी झालं होतं. अर्णवला इतकं तडकाफडकी पाठवायला निघाले यावरूनच श्रुती आणि राहुलच्या बिघडलेल्या संबंधांची कल्पना करून सर्वांच्या काळजीत आणखीनच भर पडली होती.
आता सुद्धा सुनंदाला अर्णवचं करायला लागत होतंच. पण त्याबद्दल तिला बिलकुल खंत नव्हती. खरं म्हणजे श्रुतीच्या लग्नानंतर तिने स्वतःचं छान रूटीन लावून घेतलं होतं. सकाळचं फिरणं, वाचन, लेडीज क्लब, मैत्रिणींची भिशी, योगासनांचा, गाण्याचा क्लास!! अर्णव आल्यापासून नाही म्हटलं तरी सगळ्या गोष्टी आता त्याचा विचार करूनच मग ठरवायला लागत होत्या. नवर्याकडेही थोडं दुर्लक्षच होत होतं. पण प्रकाश खूपच समजूतदार होता आणि घरात काय चाललयं हे समजण्याची त्याची कुवत होती. दोघांनाही नातवंड खेळवायला मिळतंय ही एकच मोठी सुखावणारी गोष्ट वाटत होती.
त्याही पुढे जाऊन लेकजावयानी केवढा विश्वास दाखवला आपल्यावर याचाही एक वेगळा आनंद होताच. नातवाला पाठवून दिले भारतात, आपल्यावर सोपवून! जेव्हा राहुल-श्रुती मधल्या बारीकसारीक कुरबुरी श्रुतीकडून सुनंदाच्या कानावर पडत होत्या, तेव्हा तिला वाटलं, चालायचंच, सुरवातीला एकमेकांना समजून घेण्यात जातो वेळ थोडा, त्यात अमेरिकेसारखा नवा देश, घरात कुणी वडिलधारं नाही, कुणी बोलायला नाही!
म्हणूनच जेव्हा अर्णवला अमेरिकेतून भारतात पाठवण्याचं प्रपोजल आलं तेव्हा हाही विचार तिने केला की चला, सांभाळू नातवाला थोडे दिवस. तेवढेच रमतील लेकजावई दोघे एकमेकांत! प्रकाशने जांभई दिली, हात लांब करून लाईट बंद केला.
"शिल्पाकडे अर्णवने जरा धिंगाणा केला तर आपल्याला इतकी का काळजी वाटली अर्णवची? सुनंदा, तुला असं नाही वाटंत, त्याचं वयंच आहे दंगा करण्याचं, नव्या नव्या गोष्टी अनुभवण्याचं, त्याचे आईबाबा नाहीत आत्ता त्याच्या बरोबर, ही काय त्याची चूक आहे का?" प्रकाश बोलत होता. पण दिवसभराची दमलेली सुनंदा केव्हाच झोपून गेली होती.
*****
राहुल, श्रुतीचे लग्नानंतर सुरवातीचे नवलाईचे दिवस भुर्रकन उडून गेले होते. राहुलची लग्नासाठी काढलेली रजा संपली. त्याचे अगदी टाईट शेड्युल सुरू झाले. नंतर श्रुतीने जवळपास जेवढं फिरता येईल तेवढं एकटीनंच फिरून घेतलं, नव्या नवलाईची अमेरिका! सुरवातीला वीकेंड्सला राहुलही असायचा तिच्या बरोबर. कधी शॉपिंगला, कधी फिरायला. पण हळूहळू तो कामात इतका व्यग्र झाला की त्या दोघांची कधीतरी वीकेंडलाच भेट व्हायला लागली. राहुल रोज दिवसभर काम करायचा आणि हळूहळू तो रात्रीचाही घरी काम करू लागला.
श्रुती हळूहळू कंटाळू लागली. व्हिसा स्टेटस् मुळे तिला काम करता येत नव्हते. तशीही तिला नोकरी करण्याची फारशी हौस नव्हतीच. वर तिच्याकडे असलेल्या डिग्रीवर तिला तिथे अमेरिकेत कोणी जॉब दिलाही नसता. काहीतरी शिकावं लागलं असतं, ज्यात तिला आजिबात इंटरेस्ट नव्हता. शिवाय घरातली सगळी कामं हाताने करून ती थकून जायची. आजूबाजूला कोणी मित्रमैत्रिणी नाहीत. खिडकीतून बाहेर पहावे तर अक्षरश: कावळापण दिसायचा नाही. माणसं दिसणं लांबच. सुरवातीला ती एकटीच मोठया हौसेने शॉपिंगला जायची. पण त्याचाही कंटाळा यायला लागला. बरं, खालीच असलेल्या, अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज जिममध्ये किंवा स्वीमिंग पूलमधे थोडातरी वेळ छान गेला असता. पण शेवटी एकटीने काय काय करणार? आणि किती वेळ!
लवकरच तिच्या लक्षात यायला लागले की राहुलला स्वतःच्या कामापुढे कशाचीच तमा नव्हती. तो प्रचंड वर्कोहोलिक होता. आपलं काम बरं की आपण बरे, अशा विचारसरणीचा! बाकी त्याच्यात काही दोष नव्हता. पण दोघांच्या एकूणच विचारसरणीत जमीनअस्मानाचा फरक होता. तरीही वरवर पहाता कुणालाही वाटलं असतं की त्यांचं वैवाहिक जीवन सुरळीत चाललंय.
*****
श्रुती हळूहळू कुरकूर करायला लागली. पण राहुल म्हणायचा,"अगं श्रुती, हेच दिवस आहेत पैसे कमावण्याचे, कष्ट करण्याचे. हळूहळू आपला संसार वाढेल, गरजा वाढतील. तू कर ना एंजॉय, जात जा शॉपिंगला. पिक्चर पहा, घरी टिव्ही पहा. सीडीज आण. तुला आवडतात ना पिक्चर? इथे आता हिंदी मूव्हीज पण मिळतात. आणि वीकेन्डला असतो ना आपण एकत्र? "
श्रुती म्हणायची,"अरे पण आपलं लग्न झालंय ना? मी एकटी काय काय आणि कशी एंजॉय करू?"
"श्रुती, मला थोडं समजून घे. अगं, शेवटी मी पैसा कुणासाठी मिळवतो, सांग ना. आणि काम महत्त्वाचं नाही का? सध्या इथे मार्केट किती डाऊन आहे कल्पना आहे ना तुला? नाहीतर, तू काही तरी शीक ना म्हणजे तुलाही काही तरी करता येईल, तुझाही स्वतःचा असा ग्रूप तयार होईल. तुझा वेळ चांगला जाईल." राहुल तिला समजावण्याचा मनापासून प्रयत्न करायचा.
लग्नानंतर वर्षभरातच अर्णवचा जन्म झाला. रहाळकर पतिपत्नी अमेरिकेला जाऊन आले, सुनेच्या बाळंतपणासाठी. चिन्मयच्या दहावीमुळे आणि इतरही काही कारणांनी सुनंदाच्या, प्रकाशच्या खूप मनात असून सुद्धा ते जाऊ शकले नाहीत. या गोष्टीबद्दलही तिच्या मनात खंत, एक अपराधीपणाची भावना होती. नंतरही काही ना काही कारणानी ते लेकीकडे जाऊच शकले नाहीत. आता अर्णवला सांभाळताना सुनंदाच्या मनातली ती खंत, ती अपराधीपणाची भावना हळूहळू लोप पावत चालली होती. त्यामुळे तिचं तिलाच मनातून खूप समाधानी वाटत होतं. पण भविष्याचा विचार मनात आला की तिच्या मनाला चिंता कुरतडायला लागायची कारण पुढचं चित्र खूप धूसर होतं.
श्रुती आणि राहुलमधील दुरावा अगदी टोकाला पोचलेला आहे हे श्रुतीच्या येणार्या ईमेल्सवरून सुनंदाच्या चांगलंच लक्षात आलं होतं. सुनंदाला काही सुचेनासं झालं.
तिच्या मनात श्रुतीबद्दलच्या सगळ्या आठवणी गर्दी करू लागल्या. आणि तिला वाटायला लागलं की आपण श्रुतीचं लग्न करण्यात फार घाई तर नाही ना केली? का श्रुतीच काही टोकाला जाऊन विचार करत्येय? करावं तेवढं ऍडजस्ट करत नाहीये का ती? कुठे चुकताहेत हिची संसाराची गणितं?
*****
त्या वेळी सगळ्यांचीच मन:स्थिती अशी होती की, प्रकाशच्याच लांबच्या नात्यातल्या रहाळकरांकडून राहुलचं प्रपोजल आल्याबरोबर सगळ्यांना अगदी हायसं वाटलं होतं. कोणी आता या विषयाला फाटे फोडण्याची शक्यताच नव्हती.
कारण श्रुती आणि पर्यायाने सगळेच 'सौरभ' प्रकरणातून नुकतेच बाहेर येत होते. सगळ्यांनाच खूप मन:स्ताप झालेला होता. आता लवकरात लवकर श्रुतीचं लग्न झालं पाहिजे असं सगळ्यांनाच प्रकर्षानं जाणवत होतं. पण सुनंदाला वाटत होतं की तिला जरा सावरायला वेळ दिला पाहिजे. तिच्या मनातली सौरभची जागा रिकामी व्हायला थोडा वेळ लागणार हे सुनंदाला जाणवत होतं!
सौरभ श्रुतीचा क्लासमेट. दोघांची इतकी दाट मैत्री होती की हे दोघे नक्की लग्न करणार असंच आजूबाजूच्या सर्वांना वाटत होतं. अगदी श्रुतीला सुद्धा सौरभच्या हेतूबद्दल तिळमात्र शंका नव्ह्ती. शिक्षण संपल्यावर सुनंदाने तिला एक दिवस सरळसरळ काय तो निर्णय घ्यायला सांगितलं. श्रुतीनेही हळूहळू सौरभजवळ आधी आडूनआडून विषय काढायला सुरवात केली. पण सौरभ काही दादच देत नव्हता. एकदा तिने समक्षच विचारलं तेव्हा त्याने सरळ हात झटकले. तो दुसर्याच एका मुलीत गुंतला होता. श्रुतीवर जणू काही आभाळच कोसळलं होतं!
*****
"अरे अर्णव, आता झोप रे, आणि त्या टेडीलाही झोपू दे. दहा वाजले. आज केव्हाचा उठलायंस, मामाबरोबर टेकडीवर जायचं म्हणून!" सुनंदा टीव्ही बघता बघता अर्णवशी बोलत होती. तोही पेंगुळलेला होता. अगदी झोपेला आलेला होता, तरी अंथरुणावर पडल्या पडल्या टेडीशी कुस्ती चालली होती.
तेवढ्यात सेल वाजला. श्रुतीचा फ़ोन होता.
सुनंदाने झडप घालून तो उचलला. शेजारीच प्रकाश बसला होता. त्यालाही एकदम टेन्शन आलं. चिन्मय कॉम्प्यूटर सोडून त्याच्या खोलीतून धावत आला. त्याने फटकन आधी टीव्ही बंद केला. पटकन खिडक्या लावून घेतल्या.
"अगं काय हे श्रुती? काय चाललंय तुझं? केवढा जिवाला घोर लावून ठेवलायंस?" एवढं बोलेपर्यंत सुनंदाला रडू कोसळलं. इतके दिवस घातलेला बांध फुटला. तशीच मटकन सोफ्यावर बसली. प्रकाशने फोन तिच्या हातातून काढून घेतला.
"हं बोल बेटा, कशी आहेस तू? अगं असे इतके दिवस घेत जाऊ नकोस गं, खुशाली कळवायला." प्रकाशचाही गळा दाटून आला.
"बाबा, मी ठीक आहे. अर्णव कसा आहे हो? त्याला द्या ना जरा फोन" श्रुती कापर्या आवाजात म्हणाली.
"अगं तो झोपलाय." प्रकाश म्हणाला. एका हाताने तो डोळे पुसत होता. पुढे त्याने स्वत:ला सावरायला एक क्षण घेतला, घसा मोकळा केला व म्हणाला,"ओके! हे पहा श्रुती, आता मी तुला सांगतोय की आम्ही सगळे ठीक आहोत, तुझा मुलगा ठीक आहे. पण आता तू जरा आमच्या मनावरचं ओझं कमी कर. पटकन सांग."
श्रुतीला लाउडस्पीकरवर ठेवलं. कारण सगळ्यांनाच फर्स्ट हॅंड इन्फरमेशन हवी होती.
"बाबा, मी फार सहन केलयं हो इथे. राहुलला माझी जराही कदर नाही. मला माहीत आहे की तो कुटुंबासाठीच कष्ट करतोय पण तरी सगळ्याचा काही तरी सुवर्णमध्य नको का शोधायला बाबा? मी त्याच्याबरोबर नाही सुखी राहू शकत! बाबा, तो मला पूर्णपणे इग्नोर करतो. महिनोंमहिने आमच्यात एका वाक्याची सुद्धा देवाणघेवाण नसते..मी काय करू सांगा बाबा. तरी मी माझ्या मनावर दगड ठेऊन अर्णवला तिकडे पाठवलं, जेणे करून मला पूर्णपणे राहुलला वेळ देता येईल." श्रुती रडत होती. प्रकाशचं काळीज पिळवटून निघत होतं.
"श्रुती, अशी कशी गं तू आई? हा काय उपाय होऊ शकतो का गं? इतकं करून काय पदरात पडलं?" सुनंदाचा आवाज थरथरत होता. प्रकाशने तिला हातानेच सामोपचाराने घेण्याची खूण केली.
बापलेक जवळजवळ दोन तास बोलत होते. सुनंदाचा पहिला रडण्याचा भर ओसरल्यावर तीही मध्येच बराच वेळ बोलली.
*****
राहुलचे आईबाबाही अर्णव चार महिन्यांचा झाल्यावर परत भारतात गेले होते.
श्रुतीला दिवस कंठणं अशक्य व्हायला लागलं होतं. त्यातच अर्णवची जबाबदारी. त्याचं करायचं. राहुलचं करायचं, घर सांभाळायचं, बाजारहाट, कपडयांना इस्त्री! या सगळ्यात भर म्हणजे धुणं आणि भांडी! जरी यंत्रांच्या मदतीने असलं तरी प्रत्येक काम स्वत: केलं नाही तर ते तसंच!
तिचा पेशन्स संपत चालला. एकटेपणानं, नकारात्मक विचारांनी मनाला घेरलं. राहुलला ऑफिसचं कामच इतकं होतं की त्याच्याकडून सहवासाचीच अपेक्षा करणं अवास्तव कॅटेगरीतलं होतं. तर घरकामात मदतीची अपेक्षा करणं म्हणजे मूर्खपणा होता.
हळूहळू अर्णव झोपला की ती इंटरनेटवर आपला वेळ घालवायला लागली.
बोलायला कुणीच नव्हतं. तिला नेटवर लोक भेटत गेले. मित्र, मैत्रिणी. मनाला आधार वाटायला लागला. त्यातच ती हळूहळू ब्लॉगिंगकडे वळली. तिचा स्वत:चा ब्लॉग तयार झाला. त्यावरही रोज बरेच व्हिजिटर्स असायचे. अशातच तिची असीमशी ओळख झाली. तो तिच्या ब्लॉगचा फॅन झाला होता.
आतापर्यंत अर्णव दोन वर्षांचा झाला होता. राहुल अणि तिच्यातली दरी दिवसेंदिवस वाढत गेली. इकडे राहुलही रिसेशनच्या भीतीने कामात आणखी बुडत चालला. घरी आल्यावर श्रुतीची कटकट, अर्णवचं रडणं, हट्ट. घरातल्या वातावरणाचा अर्णववरही परिणाम व्हायचा. राहुलही अगदी वैतागून गेला होता. परिस्थिती हाताबाहेर गेली होती. रोजची वादावादी, भांडणं ...! सगळ्याला कंटाळून शेवटी श्रुतीने अर्णवला काही दिवसांसाठी भारतात आईकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. राहुलही कसाबसा तयार झाला. तिला वाटत होतं आपली एक जबाबदारी जर कुणी स्वीकारली तर कदाचित राहुलशी जुळवून घेणं सोपं जाईल! आणि संसारातला तिढा जरा सैल झाला तर कदाचित सारं सुरळीत होईल.
*****
"अगं हो हो! समजलं सगळं. आता फक्त एकच सांगशील? जे ऐकायला आम्ही कानाचे अगदी द्रोण करून तयार आहोत. तुझं आणि राहुलचं प्रेझेंट स्टेटस् काय आहे?" सुनंदाने फ़ोनवर श्रुतीचं बरंचसं ऐकून घेतल्यावर जरा रागातच, अत्यंत तिरकसपणे विचारलं.
"आई, तू त्रास करून घ्यायचा नाहीस. मी सगळं सांगते. अगं, अर्णवची जबाबदारी तू किती आनंदाने घेतलीस पण मी मात्र तुम्हाला सतत काळजीत ठेवलं. अर्णवला तुमच्याकडे पाठवल्यानंतर मी त्याच्या आठवणीने वेडीपिशी व्हायचे गं! वाटायचं, अशी कशी मी निर्दयी आई? पण आई, मला माझ्या पडत्या संसाराला आधार देण्यासाठी जे सुचलं ते मी केलं. असं समज माझ्या फाटक्या संसाराला मी ठिगळं लावण्याचा प्रयत्न करत होते गं, माझ्या बुद्धीनुसार . . ." श्रुती हुंदके देत होती.
"अगं बाई, उपमा, उत्प्रेक्षा नकोत गं आत्ता. नीट सांग ना काय ते." सुनंदा चिडली.
"आई, मी आता राहुलबरोबर नाही रहात." श्रुतीने आईवर बॉम्ब टाकला.
"अगं काय बोलतेस तू ? भानावर आहेस का? तिथे परदेशात एकटी, कसा निभाव लागेल तुझा? आणि उदरनिर्वाह कशावर करणार? काही नोकरी वगैरे करत्येस का तिकडे?" सुनंदा सैरभैर झाली.
"आई, अगं मी आधी एका इन्डियन स्टोअरमधे नोकरी करत होते. थोडे पैसे मिळत होते. आणि मी एकटी रहात नाही." श्रुतीने दुसरा बॉम्ब टाकला होता.
सुनंदा फोन हातात धरून सुन्न बसून राहिली होती.
"आई! आई, तू प्लीज रागवू नको गं माझ्यावर! अगं माझं खूप चुकतंय गं, पण काय करू गं? अर्णवपाठोपाठ तिकडे निघून यावं वाटंत होतं. पण मला आमचे संबंध सुधारण्याची आशा वाटत होती. नव्हे, मला ते सुधारायचे होते गं !"
"श्रुती, थांब! एकटी रहात नाहीस तर कुणाबरोबर राहतेस ते सांग आधी. नसता जिवाला घोर एकेक. देवा, काय चूक झाली आमची या मुलीला वाढवण्यात, कुठे कमी पडले आमचे संस्कार?" सुनंदा चरकली होती. तिला वाटलं, कालच्याच पेपरमधे 'लिव्ह इन रिलेशनशिप'वर केवढं आलं होतं. कोर्टानं अशा संबंधाला कायदेशीर परवानगी दिली तेव्हा आपण विरोधात किती बडबड केली होती. पण आता ही 'लिव्ह इन रिलेशनशिप' आपल्या उंबरठयापाशी येऊन ठेपलीये!
"आई, अगं मी तुला मधे एकदा माझ्या ब्लॉगची लिंक पाठवली होती ना, तू खूप चिडून मला उत्तर पाठवलं होतंस, मला असल्या गोष्टी पाठवू नकोस, वगैरे . . ." श्रुती सांगत होती.
"मग काय? बाकी खुशाली काहीच नाही. सगळ्यांना नुसतं तिष्ठत ठेवलेलं किती दिवसांसाठी. आणि तेव्हा त्या मन:स्थितीत त्या तुझ्या ब्लॉगला काय चाटायचं होतं?" सुनंदाने तिला मधेच तोडलं. सात्विक संतापाने सुनंदा थरथरू लागली होती.
"अगं आई, ऐकून तर घे, तेव्हा खरंच काही सांगण्यासारखं नव्हतं गं, आणि जे चाललं होतं ते तेव्हा मी सांगू शकले नसते गं तुम्हाला! तर आई, या ब्लॉगमुळेच माझी आणि असीमची ओळख झाली." श्रुती चाचरत चाचरत बोलत होती. या वाक्यानंतर तिने एकदम पॉझ घेतला. तिला पूर्ण कल्पना होती की हे सगळं आईला पचायला जड जाणारे. तसंच झालं! क्षणभर सगळीकडे सुन्न शांतता!
"ओक्के! आता कळलं. कळलं गं बाई! म्हणजे तू सध्या हा जो कोणी असीम आहे त्याच्या जवळ राहतेस. छान! वा वा . . . आनंद वाटला ऐकून. लहानपणापासून तुझ्यावर जे चांगले संस्कार करायचा प्रयत्न केला त्याचं चांगलं फ़ळ दिलंस. अहो, ऐकलंत ना, तुमची ही लेक काय म्हणतेय ते? आणि तू रे चिन्मय? इथे नुसता पेंगत बसलायस? ऊठ आधी इथून आणि झोपायला जा!" सुनंदाचा आपल्या मनावरचा ताबा सुटला होता. तिच्या स्वरात उपहास, चीड, अविश्वास शिगोशीग भरला होता. ती सैरभैर झाली. चिन्मयही बावरून गेला.
"आई, अगं ऐकून तरी घे, बाबा...!" श्रुतीला जाणवलं की आपण आईला दुखावलंय. तोपर्यंत प्रकाशने फोन घेतला होता.त्याने सुनंदाला खांद्याला धरून पुन्हा एकदा सोफ्यावर बसवलं होतं. नाही म्हटलं तरी लेक सुखरूप आहे हे समजल्यावर सगळ्यांचच टेन्शन थोडं कमी झालं होतं.
"हं बेटा, बोल आता." प्रकाशने अगदी मृदू आवाजात लेकीला चुचकारलं.
मध्यरात्र केव्हाच उलटून गेली होती. चिन्मय आपल्या खोलीत जाऊन झोपला होता.
*****
श्रुतीचा ब्लॉग वाचून असीमने तिच्याशी ओळख करून घेऊन हळूहळू वाढवली होती. असीम तिथल्या युनिव्हर्सिटीत प्रोफेसर होता. एक प्रथितयश फ्रीलान्स कॉलम रायटर. नोकरी आणि पोस्ट डॉक्टरेटचा अभ्यास यामुळे त्याला हळूहळू लिखाणाला वेळच मिळेनासा झाला होता.
तो घोस्ट रायटरच्या शोधातच होता. त्याला श्रुतीमधे तो घोस्ट रायटर सापडला. हळूहळू श्रुतीने त्याच्यासाठी घोस्ट रायटिंग सुरू केलं. लोकांनी तेही डोक्यावर घेतलं. तिचं तिलाच स्वतःतल्या क्रिएटिव्हिटीचं आश्चर्य वाटत होतं. हे लिखाणाचे कोंब, हे धुमारे आपल्याला कधी आणि कसे फुटले? बहुतेक जीवनातल्या कटु अनुभवांनी आपल्याला व्यक्त व्हायला शिकवलं. की भाग पाडलं? पण ती जसं जसं व्यक्त होत गेली तसं तिला खूप मोकळं वाटत गेलं. सुरवातीला ती हे सगळं राहुलजवळ राहूनच करत होती. तिच्या आणि असीमच्या भेटीगाठी वाढत चालल्या होत्या. नंतर एके दिवशी तिने आपला बाडबिस्तरा असीमच्या घरी हलवला. खूप त्रास झाला तिला हे सगळं करताना!
*****
"चल बेटा, दमलीस बोलून बोलून. आता आपण उद्या बोलू. आम्हीही झोपतो." प्रकाश म्हणाला.
"बाबा, प्लीज आईला सांभाळा. मी उद्या तिच्याशी बोलते. काळजी करू नका. माझं आता ठीक चाललंय. मी करीन हळूहळू अॅड्जस्ट. आणि उद्या मला माझ्या अर्णवशी बोलू द्या हो बाबा!" श्रुतीनं फोन बंद केला तेव्हा तिचा हुंदका प्रकाशला स्पष्ट ऐकू आला.
प्रकाशने सुनंदाला आधार देऊन बेडरूममधे नेले. तिला पाणी दिलं. स्वतः प्यायला. दोघांचीही झोप उडाली होती. पुढच्या गोष्टी डोळ्यासमोर दिसायला लागल्या. मुख्य म्हणजे रहाळकरांना कसं तोंड द्यायचं? आणि पुढे काय?
*****
दुसर्या दिवशी सकाळी सुनंदाला जाग आली तेव्हा आठ वाजून गेले होते. अर्णव अजूनही झोपलेलाच होता. सकाळी सकाळीच ढग आले होते. प्रकाश लवकर उठून विमनस्कपणे टीव्हीसमोर सोफ्यावर बसलेला दिसत होता. बातम्या चालू होत्या, पण प्रकाशची नजर शून्यात होती.
तिने खिडकीतून बाहेर नजर टाकली. चिन्मयची बाईक दिसत नव्हती. बहुतेक तो चहा करून घेऊन, पिऊन कॉलेजला गेला होता कारण स्वयंपाकघरात पसारा पडलेला दिसत होता. ओट्यावर भांडी, चहाची गाळणी, डायनिंग टेबलवर अर्धा खाल्लेला ग्लुकोज बिस्किटांचा पुडा तसाच उघडा! तेवढयात तो सुपरिचित तंबाखूचा दर्प घरात शिरला. शांताबाई कामाला आली होती. सुनंदाला काहीच सुचत नव्हतं. एकटं रहावसं वाटत होतं. या क्षणाला ही शांताबाई सुद्धा नको होती तिला समोर!
"चहा करू का हो?" तिने प्रकाशला विचारलं .
"हं." प्रकाश उत्तरला.
"काय वाटतं तुम्हाला, आता आपण काय करायला हवंय?" चहाचा ट्रे पुढे करीत तिनं विचारलं. शांताबाई मागील दारी भांडी घासतेय याची खात्री करून घेतली.
"एकंदरीत असं वाटतंय की अर्णवला सध्या तरी इथंच ठेवून घेऊ या." प्रकाशने पेपर बाजूला टाकला होता.
"अहो, प्रश्न अर्णवचा नाहीये. तो काय आपल्याला ओझं होणार आहे का? रहाळकरांना काय सांगायचं? आणि पुढे काय, हा प्रश्न आहे." सुनंदा चिंतित स्वरात म्हणाली. चिंता करण्यासारखी असली, तरी परिस्थिती माहिती झाल्यामुळे, नाही म्हटलं तरी सर्वांच्याच मनावरचा ताण थोडा हलका झाला होता.
"अगं, गोष्टी आता इतक्या थराला गेल्यावर राहुल बोलेलच ना आईवडिलांशी कधीतरी. बोललाच असेल आतापर्यंत. पाहू या थोडी वाट. बघू ना रहाळकरांकडून काय निरोप येतोय ते! पण काहीतरी निर्णय घ्यायला लागणार हे नक्की दिसतंय मला." प्रकाश चहाचा कप टेबलवर ठेवून उठला.
शांताबाई घासलेल्या भांडयांचा टब घेऊन मागील दारातून आली. तेवढयात फडफड करीत एक कबुतर व्हरांडयातून हॉलमध्ये घुसलं. त्याच्या बरोबर सुतळीचे तुकडे, पिसं असं काही खाली फरशीवर पडलं. त्याच्या चोचीत काडया होत्या. सुनंदा धावत त्याच्या मागे लागली. शांताबाईला म्हणाली, "शांता, अगं कबुतरं परत जागा शोधतायत बरं का. जरा लक्ष ठेव. त्यांना अजिबात थारा नाही द्यायचा घरात! खुशाल घुसून घाण करतात सगळीकडे."
"व्हय वैनी, काल बी दोन खबुतरं चोचीत काडया घेऊनशान व्हरांडयातल्या वळचनीत जागा शोधत व्हती. म्यां हुसकाऊनच लावलं त्यास्नी. सार्या दुनियेतला पसारा गोळा करून आनत्यात. खराटयाच्या काडया, सुतळ्या, बारीकबारीक तारा काय, बांधकामाचं सामानच जनू! आनी घान तर काय करत्यात पत्र्यानं खरवडून काडली तरी बी निगत न्हाय. बरं वैनी, काम झालं. मी चालले." शांताबाईने मालकिणीला दुजोरा देत तोंड आणि हातातली केरसुणी, दोन्हीचा पट्टा चालवला होता. क्षणभराने खोचलेला पदर सोडला, पदरानेच खसाखसा तोंड पुसलं आणि लगालगा चालू लागली.
*****
ठरल्याप्रमाणे रात्री पुन्हा श्रुतीचा फोन आला. राहुलने त्याच्या घरी सगळी कल्पना दिली हेही श्रुतीकडून समजलं.
मध्यंतरी बरेच दिवस तसेच गेले. खरी परिस्थिती कळल्यामुळे रहाळकरांची परिस्थितीही अवघड झाली. उतारवयात हा धक्का सहन करणं त्यांना फार अवघड गेलं. आता यात सुनंदा, प्रकाशची किंवा रहाळकरांची तशी काहीच चूक नव्हती हे सर्वांनाच माहिती होतं. पण धक्का सहन न झाल्यामुळे पद्माताईंची आजारपणं सुरू झाली. त्यांना हळूहळू अर्णवला नेणंही जमेनासं झालं. सगळ्या जगण्यातली मजाच संपून गेली होती त्यांच्या. एकदाच दोन्ही घरचे भेटले पण काहीच निष्पन्न झालं नाही. अर्णवचंही रहाळकरांच्या घरी जाणं हळूहळू बंद झालं. आता तो त्यांच्याकडे जाण्यासाठी हट्ट करेनासा झाला. सुनंदाला वाटलं, पहा, हे चिमणे जीवही हळूहळू परिस्थितीशी जमवून घेतात आपोआपच! अर्णवच्या विचाराने तिचा जीव कळवळला.
असीमकडे गेल्यावर मध्यंतरीच्या काळात श्रुती राहुलबरोबर भारतात येऊन रीतसर म्युच्युअल कन्सेन्टने डायव्होर्सची प्रक्रिया पूर्ण करून परत अमेरिकेला निघून गेली. अर्णवची कस्टडी श्रुतीला मिळाली. तसाही तो भारतातच रहात होता. या वेळी मात्र राहुल आपल्या आईबाबांना आपल्या बरोबर घेऊन गेला.
*****
एअरपोर्टवरून गाडी भरधाव सुटली. चिन्मयने टॉप गिअर टाकला. चिन्मय शिल्पाची छोटी रिया प्रकाशच्या मांडीवर गाढ झोपली होती. चेकइनसाठी अर्णव सर्वांना बाय करून आत निघाला. त्याची ती सहा फुटी पाठमोरी मूर्ती निरखताना सुनंदाच्या डोळ्यांतलं पाणी थांबायचं नाव घेत नव्हतं. अर्णवने जेव्हा शेवटचं "बाय" म्हटलं तेव्हा रिया, शिल्पाच्या कडेवरून, आपले इवलाले हात पसरून, झेप घेऊन जी अर्णवला चिकटली, ते पाहून सुनंदाला पूर्वीचं आठवून हसूही आलं आणि डोळेही वहायला लागले. अर्णव असाच आपल्या चिनूमामाला चिकटायचा, अगदी हे असंच! शिल्पा आणि चिन्मयच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होण्याआधीपासून शिल्पाने अर्णवला माया लावली होती. किंबहुना अर्णवच्या बाबतीतले बरेचसे निर्णय पॉझिटिव्हली घेताना त्यात शिल्पाचाही सहभाग असायचा.
"आई, आता डोळे पुसा बघू. सगळं अगदी छान होणारे आपल्या अर्णवचं." शिल्पा रुमाल पुढे करत म्हणाली.
"हो गं बाई. अगदी खरंय तुझं, पण इतक्या लहान वयात किती लांब गेला गं, एकटाच!" सुनंदाला अजूनही अश्रू आवरत नव्हते.
"आई, आता तो मोठा झालाय. आणि एकटा कशानं? त्याची मम्मा, त्याचे असीमअंकल सगळे असतील ना त्याच्याबरोबर. आणि तो काय पहिल्यांदाच चाललाय का अमेरिकेला?" शिल्पा लहान मुलाची समजूत काढावी तशी सासूची समजूत काढत होती.
"हो गं शिल्पा, खरंय तुझं. किती हक्काने पोटचा गोळा श्रुतीने मला सोपवला आणि उलट मीच किती बोलले होते तिला! पण आम्ही स्वतः एकदा तिकडे जाऊन सगळं डोळ्यानी पाहिलं, असीमला भेटलो, तेव्हाच माझीही सगळी किल्मिषं नाहीशी झाली बघ. अर्णवशी किती प्रेमाने वागायचा असीम, अगदी वडिलांसारखा! पण शिल्पा, आता लेकराशिवाय कसे दिवस काढायचे गं? लळा लावून गेला गं!" सुनंदाने पुन्हा डोळे टिपले.
"हो गं सुनंदा, आता सावर बरं स्वतःला. तसंही अर्णव दहावीनंतर श्रुतीबरोबर गेलाच होता की तिकडे. सुट्टीत श्रुतीच नाही का घेऊन गेली होती त्याला?" प्रकाश आपल्या परीने सुनंदाला समजावत राहिला.
"होय हो, पण कधीकधी वाटायचं, आपल्या मुलीलाच स्वतःच्या लेकराबदल काही माया आहे की नाही? इतक्या वर्षात अधूनमधून येऊन फक्त भेटून गेली पोटच्या लेकराला!" सुनंदा कातावल्यासारखी बोलत होती.
"आई, आता काहीतरी काढून खंत करत बसू नको गं! अगं सगळं असं घडत गेलं की परिस्थिती कुणाच्याच हातात राहिली नव्हती. आपण सगळे प्रवाहपतित होतो तेव्हा! पण अर्णव किती रमला होता इथल्या शाळेत, वातावरणात! नंतर ताईलाच वाटत होतं त्याला घेऊन जावं पण अर्णव कुठे तयार झाला? आता आनंद मानायचा की असीमचं आणि अर्णवचं छान जमतंय! आई, आठवतं ना? अर्णव दहावी झाल्यावर अमेरिकेत गेला होता तेव्हाचं? किती खूष होते तेव्हा सगळे? आणि आल्यावर सारखं असीमअंकल, असीमअंकल करायचा! तू पहातेस ना दर वीकेन्डला दोघे कसे गप्पा मारतात स्काईपवर ते! आणि लहान कशानं गं? चांगला सहा फूट उंच झालाय! आता त्याला तिकडच्या युनिव्हर्सिटीनं अॅडमिशन दिली म्हणजे तो आता नक्कीच मोठा झालाय, नाही का?" चिन्मयही गाडी चालवता चालवता वातावरणातला ताण हलका करण्याचा प्रयत्न करत होता आणि सुनंदासाठी एकेक मुद्दा जमा करण्याचा प्रयत्न करत होता.
पुन्हा एकदा सुनंदाचा हुंदका ऐकून प्रकाशने तिचा हात आपल्या हातात घेतला.
"अगं सुनंदा असं काय करतेस? तसंही तो रहाणार युनिव्हर्सिटीतच आणि त्याच्या बरोबर आहेत ना त्याचे मित्र संदीप, हर्षद आणि अश्विन. अश्विन तर पहिलीपासूनच त्याच्या बरोबर आहे. आणि सुनंदा, तो त्याच्या जन्मभूमीकडे चाललाय हे विसरू नको." प्रकाश म्हणाला.
प्रकाशला तर अगदी अर्णवचा शाळेचा पहिला दिवसही आठवत होता. अर्णवही परत अमेरिकेला जायला फारसा उत्सुक नव्हता हे लक्षात आल्यावर, सगळ्यांच्या विचाराने अर्णवला भारतातच शाळेत घालायचं ठरलं होतं. पहिल्याच दिवसापासून त्याचं आणि वर्गातल्या अश्विनचं चांगलं सूत जुळलं होतं ते पाहून सगळ्यांचंच टेन्शन जरा कमी झालं होतं. नंतरही अर्णव शाळेत चांगलाच रमला होता.
"हो, सगळं बरोबर आहे हो तुमचं. पण मला पुन्हा कधी दिसणार बाळ माझं, कुणास ठाऊक!" सुनंदाने तुमचं बरोबर आहे म्हणत पुन्हा निराशेचा सूर लावला आणि पुन्हा डोळे टिपले.
तेवढ्यात शिल्पाचा सेल खणखणला. तिने तो झडप घालून उचलला. "मामी चेकइन झालं गं. आता मी आत चाललो." अर्णवचा फोन होता.
"अरे सामानाचं वजन बरोबर भरलं ना? काही प्रॉब्लेम नाही ना आला? अरे थांब, एक मिनिट आईंशी बोल" सुनंदाच्या अस्वस्थ हालचाली बघून शिल्पाने फोन सुनंदाला दिला. शिल्पाचेही डोळे अर्णवचा आवाज ऐकून वहायला लागले होते.
"अर्णव, बाळा जपून रहा रे तिकडे. आणि पोचल्यावर फोन, मेल काय जमेल ते कर लवकर. नीट जाशील ना रे बाळा?" सुनंदाला अजूनही खूप बोलायचं होतं. पण ते शक्य होत नव्हतं.
"हो आई, करतो. आता ठेवतो. तू काळजी घे. माझी काळजी करत बसू नको. मम्मा आणि असीमअंकल येणारेत एअरपोर्टवर. चल बाय." अर्णवने फोन ठेवला होता.
सुनंदाचे अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते.
"सुनंदा अगं असं काय करतेस? किती मोठया मनाने असीमने अर्णवला आपलं म्हटलंय, आपण अनुभवतो आहोत ना! आणि आता तो मोठा झालाय. त्याला या जगाची चांगली समज आलीये. तसेही ते फक्त वीकेंड्सनाच भेटणार हे एका परीने चांगलंच आहे. असं भेटलं की मग कसा, फ्रिक्शनचा काही प्रश्नच येणार नाही. तूच म्हणतेस ना थोडक्यात गोडी? हळूहळू सगळं छान होईल!" प्रकाश तिची समजूत घालत होता.
एअरपोर्टवरून घरी आल्यावर एकदम भकास वाटायला लागलं. प्रकाशने आल्याआल्या हॉलमधेच सोफ्यावर अंग टाकून दिलं. त्याला एकाएकी इतकं रितं वाटायला लागलं की आता पुढच्या क्षणी नक्की काय करायचंय, या विचाराने तो बुचकळ्यात पडल्यासारखा झाला. इतका वेळ धरून ठेवलेला धीर जणू काही संपला.
भकास दिवस समोर हातपाय पसरून पसरला होता. दिवसाला काही अर्थच उरला नसल्यासारखं वाटायला लागलं.
सुनंदा अर्णवच्या खोलीत गेली. खोलीच्या खिडकीबाहेर वळचणीला एक चिमणी चोचीत काडी घेऊन फडफडत होती. सुनंदा तिच्याकडे पहात उभी राहिली. चिमणी घरटं करण्याच्या प्रयत्नात होती.
खोलीत सगळीकडे पसारा होता. वेगवेगळ्या मॉल्सचे, वेगेवेगळ्या ब्रॅन्डसचे टॅग्ज खोलीभर पसरलेले! प्लॅस्टिक पिशव्या, बॅग भरताभरता ऐनवेळी कॅन्सल केलेली काही पॅकेट्स, जी अर्णवच्या प्रायॉरिटी लिस्टवर खूप खालच्या नंबरवर होती, असं खूप काही सगळीकडे पडलेलं! खोलीच्या कोपर्यात अर्णवने टाकून दिलेले त्याचे रोजच्या वापरातले, जुने स्पोर्ट्स शूज पडले होते. बिचारे अगदी केविलवाणे, एकाकी दिसत होते.
दुसर्या दिवशी, सोमवारी सगळ्यांचं नेहेमीचं रूटिन सुरू झालं. सुनंदाला अगदी एकटं पडल्यासारखं झालं. अर्णवच्या आठवणींनी डोळे भरून यायला लागले. मागचं सगळं आठवायला लागलं. अर्णवला इथेच शाळेत घालण्याचा निर्णय घेताना वाटंत होतं, जमेल का आपल्याला सगळं? पण चिनू, शिल्पा, सगळ्यांनीच निभावून नेली ही अर्णवची बारावीपर्यंतची वर्षं. श्रुतीही भारतवारी करून भेटून जायची अधूनमधून. बाकी मायलेकांचा संपर्क स्काइप, इमेल, फोनवरूनच. पण झालं, सगळ्यांनी सांभाळून घेतल्यामुळं इथवर गाडी आली.
एक वेळ अशी आली होती की वाटायला लागलं, सगळे रस्ते जणू बंद झालेत. किती विचित्र वळणावर येऊन ठेपलं होतं आयुष्य! विचार करता करता सुनंदाचं घड्याळाकडे लक्ष गेलं. नऊ वाजून गेले होते. व्हरांडयातल्या उघड्या दारातून शांताबाई लगबगीने घरात घुसली. तिच्याचबरोबर नेहेमीप्रमाणे भस्सकन तंबाखूचा दर्पही घरात घुसला.
सगळं काम झाल्यावर परत कुंचा घेऊन लगालगा अर्णवच्या खोलीत घुसली. "काय गं शांता, झाडून झालं ना? परत कुठे चाललीस कुंचा उगारून?" सुनंदा म्हणाली. पाहिलं तर एक चिमणी चोचीत काडी घेऊन अर्णवच्या खोलीत फिरताना दिसली.
शांताबाई कुंचा उगारून, तोंडाने आवाज करून चिमणीला हाकलायला लागली.
"नको गं शांता. का छळतेस त्या बिचार्या चिमणीला?" सुनंदा स्वयंपाकघरातून धावतच आली होती. आल्याआल्या तिने कुंचाच काढून घेतला शांताबाईच्या हातातला.
"या बया? वैनी, असं वं काय करता आज? येरवी या चिमण्या, खबुतरं आली की अगदी जरा बसू देत नाय तुमी त्यांना, लई घान करतात, घरट्याचा कचरा होतो म्हंता! " शांताबाई आश्चर्यचकित होऊन, कंबरेवर हात ठेऊन सुनंदाकडे पहात उभी राहिली. सुनंदाने शांताबाईच्या हातातून हिसकून घेऊन, कुंचा खाली टाकला होता.
"शांता, अगं बिचारा पक्षी, आलाय आपल्या वळचणीला़, आसर्याला! घरटं करेल, थोडे दिवस राहील, मग जाईल उडून कुठेतरी! तेवढीच त्याची आपली संगत! कशाला परत दिसणारेय तो आपल्याला?" सुनंदा कुठे तरी शून्यात नजर लावून बोलत होती.
शांताबाई कमरेवर हात ठेऊन, डोळे विस्फारून सुनंदाकडे पहातंच राहिली . . .!
- मानुषी