तू देवळात आलीस काय किंवा मी तुझ्या संकटांच्या वेळी धावून आलो काय? काय फरक पडतो? आपण एकमेकांना हवे आहोत. आणि नसलो भेटत तरी फरक नाही पडत. हो ना? आपण 'आपण' आहोत हे कमी आहे का?
१७ मे १०:३०
--------------
--------------
आहेस?
म्हणजे काय? आहेच . . .
नक्की?
हो गं. आहेच. म्हणजे आहे.
बघ हं.
अरे? आहेच गं बहुतेक.
ब हु ते क?
प्रयत्न करतो असायचा.
हं . . .
हे बघ मला खूप अवघड आहे त्या दिवशी तिथं असणं. तरीही मी जमवतो काहीतरी. असं तिरकस हसू का माझ्या पदरात प्रत्येक वेळी?
नाही रे. तुझं हे असं प्रत्येक वेळी टप्प्याटप्प्यांनी कमी कमी आश्वासक होत जाणं . . .
ठीक आहे. मग कशाला विचारतेस? का वाट पाहतेस?
बरं पुढच्या वेळी नाही विचारत.
ठीक.
-------------------------------------------------------
३ जून १०:५०
सॉरी. म्हणजे मला माहितीय रे तू खूप व्यस्त आहेस आणि मी या फडतूस गोष्टींसाठी तुला गृहित धरतेय ते.
बरं. हे मी तुला सांगितलंय का?
काय?
की मी व्यस्त आहे आणि तू मला गृहित धरतेयस वगैरे. तुझं तूच गृहित धरतेयस हे . . .
अरे हो पण तू काही बोलतच नाहीयेस ना. मग मला काही पर्याय आहे का?
बरं एक आठव. सुरुवातीचं.
हं.
पहिल्यांदा असंच तुझं काहीतरी होतं. तू सहज मला मेसेज केलास. इतरांना केलास तसाच. तुला वाटलंही नव्हतं मी येईन. तरीही मी आलो होतो की नाही?
हो, म्हणजे ते अनपेक्षितच होतं. पण त्यामुळे तू प्रत्येक वेळी असावंस अशी अपेक्षा निर्माण झाली ना . . .
हे बरोबर नाहीये. मी येत नव्हतो तेव्हा 'आलास तरी खूप झालं' अशी परिस्थिती होती. आणि आता असलंच पाहिजे असा अट्टाहास.
हं . . . झालंय खरं असं. विचार करेन.
------------------------------------------------------------------
१२ जुलै ११:१५
एक मिनिट.
हं . . .
तू काय उपकार करतोयस माझ्यावर? मलाच गरज आहे तुझी?
हे काय नवीन?
सांग ना.
अगं गरज हा शब्द नको ना वापरूस.
आता मला वाटायला लागलंय की तू एकूण माझ्याशी कसलंही कम्युनिकेशन मला इन्डेंट करण्यासाठी करतोयस. मलाही गरज नाहीये तुझी. I can manage on my own.
खूपच छान. मला खात्री आहे की तुला माझी गरज नाहीये. आणि ते तसंच असायला हवं. आणि खरंच मी असतोच. तू न बोलवताही येतो. तुझ्या जिद्दीचं कौतुक करायला. अगं तुझी प्रगती बघणं हे फ़ार महत्वाचं आहे माझ्यासाठी.
बस एवढंच? म्हणजे माझा जसा जीव अडकतो तुझ्यात तसं काही नाही होत तुला?
अगं माझे राणी. माझ्या जिवाचा तुकडा आहेस तू. माझा जीव आहेच तुझ्यात.
हं. आहे म्हणजे एकदाच तो पहिल्यांदा ठेवून दिलायस एक तुकडा तेवढाच ना. पुन्हा काही गरज नाही बघायची माझ्याकडे. हो ना?
अगं बघत असतोच मी तुझ्याकडे. आणि तू तरी सारखी काय माझा विचार करतेस का? तुला तुझीही इतर हजार कामं आहेत की नाही?
हं . . . आहेत.
मग?
तरीही मी तुला देते तितकं महत्व तू मला देत नाहीस असा मला संशय आहे.
तू मला दिलंस काय आणि मी तुला दिलं काय . . . एकच ते शेवटी.
हे असं बोलून तू बांधून ठेवतोस मला आणि मग अदृष्य होतोस. मग मी फिरायचं तुला शोधत. आरत्यांची आळवणी करायची. नवस बोलायचे. कौल लावायचे. रानावनात, चकव्यात फिरत रहायचं.
तू देवळात आलीस काय किंवा मी तुझ्या संकटांच्या वेळी धावून आलो काय? काय फरक पडतो? आपण एकमेकांना हवे आहोत. आणि नसलो भेटत तरी फरक नाही पडत. हो ना? आपण 'आपण' आहोत हे कमी आहे का? आणि आपण एकमेकांचं अस्तित्व स्वीकारलंय हे? तू काही टप्प्यांवर ते नाकारलं आहेसही. तरीही मी पुन्हापुन्हा येत राहिलोच ना. आरत्या, नवस, कौल, यात्रा, उपासतापास असलं काहीही केलंस ना की मी कंटाळतो गं. तू तरी नको करूस. मी आहे. तुझाच आहे . . . निर्वातात, नीरवात, निरंजनात, निराकारात तर जास्तच . . .
बरं.
हं . . .
------------------------------------------------------------------------------
३ सप्टें १०:२२
आहेस?
म्हणजे काय? आहेच . . .
वाटलंच होतं . . . पण तरीही . . .
......
......
-----------------------------------------------------------------------------------
१२ डिसें ११:०७
हॅलो . . .
......
कुणी आहे का?
.......
रुसलीयस ना राणी? उत्तर दिलं नाहीस तरी मला माहितीय तू आहेस. तुझा माझ्या अस्तित्वावर डळमळता असला तरी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे . . .
........
बरं बोलूच पुन्हा . . .
........
- संघमित्रा