रीतीप्रमाणे लग्न, दोन मुली; दृष्ट लागेल असा संसार होता तिचा. संजयची बदलीची नोकरी तशी थोडी पथ्यावरच पडली होती. लांब राहून सगळ्यांशी चांगले संबंध ठेऊन होते ते. संजयचा स्वभाव थट्टेखोर, तर मनीषा मस्करीपासून चार हात लांब. कुणावर कॉमेंट्स करणे, खेचणे हे तिच्या पचनी पडत नसे. कुठेतरी खटके उडायचे दोघांमधे. पण मुलींमुळे प्रकरण फार वेळ ताणले जायचे नाही. तरीसुद्धा आत कुठेतरी धुसफूस, असमाधान मूळ धरत होते. कुणाचीतरी दृष्ट लागत होती. कळत नव्हते, जाणवत नव्हते इतकेच! तिला वाचनाची आवड, त्याला वावडे. त्याला पिक्चर्स पहाणे, भटकणे यांचे वेड; तर ती नवर्याबरोबर करायच्या म्हणून या गोष्टी करणारी. मुलींसाठी बाबा आयडियल आणि आई सारखी शिस्त लावणारी.
वे
ळ सकाळी ७:१३. अंबरनाथकडून व्हिक्टोरिया टर्मिनसला जाणारी जलद लोकल दिवा आणि डोंबिवलीच्या दरम्यान आकस्मिकपणे थांबली. नोकरदार मंडळींची चिडचिड चेहर्यावर आल्याशिवाय राहिली नाही. सकाळचे सगळे कसेबसे आवरून धावतपळत पकडलेल्या ट्रेनला आणि पर्यायाने ऑफिसला कुठल्यातरी फालतू कारणाने उशीर होणे त्यांना अर्थातच परवडणारे नव्हते. ट्रेन थांबल्यापासून उजव्या बाजूला शंकराच्या निळ्या देवळापाशीही लोक जमा झालेले दिसत होते.
"ट्रॅकवर पडलंय कुणीतरी." कुणीतरी माहिती पुरवली.
"साला! ऑफिसच्या वेळेत काय सुचलंय याला?" लोकांचा वैताग वाढायला लागला होता.
"मरायला हाच ट्रॅक मिळाला का? आता पोलिस येईपर्यंत सडा इथेच च्यायला!".
"शी! आज पण लेट मस्टर. आत्ताच कुठे तडमडला?" बायकांच्या डब्यातूनही पेशन्स संपत आल्याचा आवाज येऊ लागला.
देवळाजवळ लोकांची धावपळ दिसू लागली होती. ट्रेनच्या ड्रायव्हरला रेल्वे पोलिसांशी कॉन्टॅक्ट करण्यात यश मिळाले होते. स्थानिक लोकांच्या मदतीने बॉडी ट्रॅकवरून हलवण्यात आली आणि एकदाची ट्रेन मार्गाला लागली. लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. प्रकरण थोडक्यात उरकले होते. निदान त्यांच्यापुरते तरी!
पोलिसांनी गर्दी पांगवली. मध्यात प्रेत पडले होते. इन्स्पेक्टरसाहेबांचा चेहराही कसानुसा झाला. अनेक दिवसांत इतक्या वाईट अवस्थेतले प्रेत पाहण्यात आले नव्हते.
"अरे, कुणी ओळखतं का याला?"
"............."
"इथलाच आहे का? या गावातला?"
"सायेब, ते कसं कळायचं? चेहरा पार नाहीसाच झालाय बघा!"
"काही सामान वगैरे दिसलं का आजूबाजूला?"
"नाय सायेब."
पोलिसांनी पंचनामा, जबान्या वगैरे फॉर्मॅलिटिज पूर्ण करून प्रेत ताब्यात घेतले आणि सरकारी शवागारात दाखल करून 'बेवारस' शिक्का मारला.
_______________________________________
तिने खिडकीबाहेर पाहिले. पूर्ण अंधारून आले होते. कुठल्याही क्षणी पाऊस कोसळणार अशी परिस्थिती होती. खरेतर तिच्या मनातल्या अंधारापुढे तिला कशाचेच काही वाटेनासे झाले होते. गेल्या दीड महिन्यातल्या घटनांनी तिचे मन झाकोळून गेले होते. आत्तासुद्धा तिला बाहेर पडायचा खूप कंटाळा आला होता पण वकिलांकडे जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. हीच वेळ होती. मुली शाळेत गेल्या होत्या तेवढ्यातच हे काम उरकणे गरजेचे होते. विषण्ण मनाने ती वकिलाच्या ऑफिसात पोचली. तिच्या नणंदेचे मिस्टर मधुकरराव तिची वाट पहात कॉरिडॉरमधेच उभे होते.
"मला वाटलं, येताय की नाही? चला, वकीलसाहेब आहेत आत. मी अॅफिडेविट तयार करून घेतलंय आधीच. तुम्हाला फक्त सही करायची आहे."
तिने काही न बोलता मानेनेच हो म्हटले. ते आत गेले.
"या. एकदा हे अॅफिडेविट वाचून घ्या आणि सही करा म्हणजे लगेच पुढच्या गोष्टी सुरू होतील." वकीलसाहेबांनी घड्याळाकडे पहात सांगितले.
तिने यांत्रिकपणे वकिलांनी दिलेल्या अॅफिडेविट वरून नजर फिरवली. वाचण्यासारखे फारसे काही नव्हतेच त्यात. इतर सगळ्या सरकारी भाषेतल्या फापटपसार्यात एकच वाक्य तिच्या डोळ्यासमोर फिरत राहिले..
''मी, मनीषा सहस्रबुद्धे, मयत श्री. संजय भास्कर सहस्रबुद्धे यांची धर्माने पत्नी आहे.''
काळजावर चरे पडत थरथरत्या हाताने तिने त्या मरण पावलेल्या नवर्याचीच पत्नी असण्याच्या प्रूफवर सही केली. असे कधी करावे लागेल असे स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते.
रीतीप्रमाणे लग्न, दोन मुली; दृष्ट लागेल असा संसार होता तिचा. संजयची बदलीची नोकरी तशी थोडी पथ्यावरच पडली होती. लांब राहून सगळ्यांशी चांगले संबंध ठेऊन होते ते. संजयचा स्वभाव थट्टेखोर, तर मनीषा मस्करीपासून चार हात लांब. कुणावर कॉमेंट्स करणे, खेचणे हे तिच्या पचनी पडत नसे. कुठेतरी खटके उडायचे दोघांमधे. पण मुलींमुळे प्रकरण फार वेळ ताणले जायचे नाही. तरीसुद्धा आत कुठेतरी धुसफूस, असमाधान मूळ धरत होते. कुणाचीतरी दृष्ट लागत होती. कळत नव्हते, जाणवत नव्हते इतकेच! तिला वाचनाची आवड, त्याला वावडे. त्याला पिक्चर्स पहाणे, भटकणे यांचे वेड; तर ती नवर्याबरोबर करायच्या म्हणून या गोष्टी करणारी. मुलींसाठी बाबा आयडियल आणि आई सारखी शिस्त लावणारी.
दर चार वर्षांनी पाठीवरचे विंचवाचे बिर्हाड घेऊन मिळेल त्या शहरात जावे लागायचे; त्यामुळे सामान फारसे वाढवलेच नव्हते. पण काळानुसार मोजक्या आधुनिक गोष्टी संजयने हौसेने घेतल्या होत्या. मनीषा तिच्या कुवतीनुसार घरपण जपत होती. तिला नोकरी करायची नव्हती मुलींमुळे. त्यात परत संजयची ही अशी बदलीची नोकरी. त्यामुळे तिचा हा निर्णय गरजेचा होता. पण का कोण जाणे, ती आतून उमलत नव्हती. हक्काने, प्रेमाने, हट्टाने वागणे तिला जमत नव्हते. संजयने अनेक गोष्टी स्वतःहून जाणून कराव्यात अशी तिची अपेक्षा. पण हक्काने नवर्याला सांगायला कदाचित काहीतरी कमी पडत होते. दोघांमधे एक अनामिक भिंत तयार होत होती, जिला दोन मुलींमुळेच काय ती छिद्र पडत होती - प्रिया आणि मीनाक्षी. दोघीही अभ्यासात हुशार, खेळकर, घरात, शाळेत सगळीकडे अगदी बिनधास्त. प्रिया मोठी. दहावीत गेल्यावर थोडी जास्त आईला अॅटॅच होत होती. तिला आईबाबांमधली धुसफूस कदाचित जाणवत असावी त्यामुळे शक्य असेल तेव्हा ती आईची बाजू घेई.
या उलट मीनाक्षी, छोटी मिनू. बाबावेडी. सगळे बाबाला सांगणारी. पण घरातल्या ताणाची जाणीव होण्याइतके वय नसलेली. आईबाबांच्या धुसफुशीत मनातल्या मनात बाबाची कड घेणारी.
ठाण्यात येऊन त्यांना आता आठ वर्षे होत आली होती. नोकरीत बढती मिळाल्यामुळे बदलीचा ससेमिरा गेला होता. इथेच स्थिरावण्याचा निर्णय घेण्यापर्यंत घरात चर्चा सुरू झाल्या होत्या. प्रियाही मुंबईच्या कॉलेजलाईफची वाट पहात होती. मिनू शाळेत, मैत्रिणींत रमत होती. आता एक स्वतःचे कायमचे घर घेऊन स्थायिक होण्याचे स्वप्न मूळ धरू लागले होते . . .
_______________________________________
"हॅलो..."
"हॅलो, अगं मनीषा, तुम्हाला निरोप मिळाला नाहीये का?"
"म्हणजे?"
"नानांची तब्येत खूपच खालावलीये अगं."
"हो, मिळाला ना निरोप शुक्रवारीच."
"मग संजयचं काय आहे येण्याचं? सारखे त्याच्या नावाचा जप करतायत नाना!"
"म्हणजे? असं काय म्हणताय? निरोप मिळाल्या मिळाल्या शनिवारी पहाटेच तर निघाला तो तिकडे यायला घरातून, अजून पोचला नाही?"
"अगं इकडे आला असता, तर मी असा फोन केला असता का तुला?"
"................"
"हॅलो, हॅलो मनीषा, आहेस का? बोल ना काहीतरी..."
"..............."
बराच वेळ होऊन गेला. दारावरच्या बेलने ती भानावर आली. हातातून गळून पडून रिसिव्हर तसाच लोंबकळत होता. किती वेळ आपण असे बसलो, तिचे तिलाच कळेना. बेल पुन्हा पुन्हा वाजत होती. तिने दार उघडले तशी मिनू करवादत आत आली.
"आई, किती वेळ दार उघडायला?" असं म्हणून अजून काहीतरी बोलण्यासाठी तिने आईकडे पाहिले आणि तिचा चेहरा पाहून चरकली.
_______________________________________
"सॉरी मॅडम, तुम्हाला लगेच पैसे मिळू शकत नाहीत. तुमचे क्लेम्स सेटल व्हायला प्रॉब्लेम येतोय. एकतर तुमचं आणि तुमच्या मिस्टरांचं जॉइंट अकाउंट नाहीये, शिवाय नॉमिनेशनही केलेलं नाहीये, सडन डेथच्या केस मधे सगळं असूनही वेळ लागतो, इथे तर तुमचं मॅरेज सर्टिफिकेटही नाही!"
मनीषा कोर्या चेहर्याने एकदा बँकेतल्या क्लार्ककडे आणि एकदा मधुकररावांकडे पहात राहिली.
"तुम्हाला अॅफिडेविट करून घ्यावं लागेल, त्यानंतर बघू."
"अॅफिडेविट आहे आमच्याकडे" मधुकररावांनी बॅगेतले अॅफिडेविट काढून क्लार्कला निरुत्तर केले.
"ठीक आहे, फॉर्मॅलिटिज पूर्ण झाल्या की कळवतो आम्ही, तरी ८-१० दिवस लागतीलच."
'आज मधुकरराव पाठीशी उभे राहिले नसते तर हे सगळे मी एकटीने करू शकले असते?' बँकेच्या पायर्या उतरता उतरता मनीषाच्या मनात विचार आला.
'मोठ्या भावाप्रमाणे करतायत मधुकरराव. कशी व्यक्त करायची कृतज्ञता?'
"चला, आपल्याला आत्ता लगेच संजयच्या ऑफिसमधे त्याच्या बॉसना भेटायचं आहे" मधुकररावांच्या वाक्याने ती विचारातून बाहेर आली.
"आजच पी.एफ., ग्रॅच्युइटीचं काय होतंय ते बघायला हवं. दिवस फार थोडे राहिलेत; मुलींच्या शाळा संपून सुट्टी सुरू व्हायच्या आत ही कार्यालयीन कामं उरकलेली बरी" मधुकरराव रिक्षाला हात करत म्हणाले.
ती मुकाट्याने संजयच्या ऑफिसकडे निघाली होती . . . अनिश्चित भविष्याकडे, निर्विकारपणे!
_______________________________________
"हे बघ मनीषा, आपल्याला ताबडतोब पोलिसात तक्रार करावी लागणार आहे अगं.."
"पंधरा दिवस झाले, संजयचा काही पत्ता नाहीये, कसं काही कळायला मार्ग आहे का?"
मनीषाच्या कानात नातेवाईकांचे शब्द शिरतच नव्हते की शिरून विरत होते ते तिचे तिलाच कळत नव्हते. किती गप्पा मारल्या होत्या आपण आदल्या रात्री जेवताना, किती दंगा घातला होता संजयने मुलींबरोबर, किती हसलो होतो आपण! संजयने स्वतःहून सांगितले होते बोलता बोलता की आपल्यात आता आपण नव्याने संवाद सुरू करूया; मागचे गैरसमज गेले सगळे गंगेत वाहून.
पहाटे नाना अत्यवस्थ असल्याचा फोन आला काय आणि तडकाफडकी संजय नाशिकला निघाला काय! पंधरा दिवस होऊन गेले या गोष्टीला? किती फोनाफोनी, किती वाट पहाणं, किती शोधाशोध... तिकडे नानाही हा धक्का झेलू शकले नाहीत . . .
"मनीषा, अगं बोल काहीतरी" विद्या तिला गदागदा हालवून विचारत राहिली. बातमी कळल्यापासून मनीषाचा भाऊ विजय आणि वहिनी विद्या तिच्या सोबतीला म्हणून येऊन राहिले होते.
"आता हिला विचारत बसण्यात अर्थ नाही" असे म्हणत विजयने तडक पोलिस स्टेशन गाठले.
"नाव?"
"संजय भास्कर सहस्रबुद्धे"
"कुठे रहायला?"
"ईस्टला"
"काय झालं?"
"पंधरा दिवसांपूर्वी वडिलांना बरं नाही म्हणून घरातून निघालेत, अजून त्यांचा काही पत्ता नाही"
"कुठे?"
"नाशिक"
"त्यांचा एक क्लोजअप फोटो आणि वर्णन आणून द्या"
"उद्या देतो लगेच"
"आम्हाला काही कळलं तर कळवतो, तुमचा पोस्टल अॅड्रेस लिहून जा."
पोलिस घरी येणे आता सवयीचे झाले होते. प्रिया-मिनू समजूतदारपणे उठून आतल्या खोलीत निघून जात, एकमेकींचे हात घट्ट धरून बसत. प्रियाला थोडेफार तरी काही कळायचे. मिनूला फक्त एवढेच कळत होते, आपला बाबा कुठेतरी गेलाय. का येत नाहीये तो परत? चिडलाय का आपल्यावर? त्या दिवसापासून आपण दिदीशी भांडलोच नाही आहोत. ती सांगेल ते ऐकतोय. तिने सांगितलेय, 'कुणाला काही विचारायला जायचं नाही, आईला तर नाहीच नाही.' उगाचच भीती का वाटते आपल्याला? येईल नक्की बाबा परत . . . आई उगाच घाबरतेय. हेच सगळे दिदीला सांगावे म्हणून तिने दिदीशी बोलायला तोंड उघडले. पण प्रियाने तिला ओठांवर बोट ठेऊन चूप केले कारण तिला बाहेरच्या खोलीत पोलिस आईला काय काय प्रश्न विचारत आहेत त्याचा कानोसा घ्यायचा होता.
"काय सांगून गेले घरातून?"
"नाशिकला जातो म्हणून."
"तुम्हाला नक्की खात्री आहे ते नाशिकलाच जायला निघाले?"
"हो."
"त्यांच्या वडिलांची तब्येत कशी आहे?"
"ते गेले धक्क्याने."
"त्यांचं ऑफिसमधे किंवा साइटवर कुणाशी काही भांडण, वैर, खुन्नस वगैरे?"
"माहिती नाही, माझ्यामते तरी तसे काही नसावे."
"दुसर्या बाईची भानगड वगैरे?"
".................."
"हे बघा सहस्रबुद्धे बाई, आम्हाला सगळ्या बाजूने चौकशी करावी लागते. सगळ्या शक्यता गृहित धराव्या लागतात . . . तुम्हाला आहे का असा काही संशय?"
"नाही, असं काहीच नव्हतं."
"एवढी खात्री देताय नवर्याची?"
"हो."
"पेपरात, टीव्हीवर जाहिरात दिलीच आहे हरवल्याची, काही असेल तर कळवतो."
"ठीक आहे."
"मनीषा, अगं मी काय म्हणते, आपण एखाद्या ज्योतिष्याकडे जाऊया का संजयची पत्रिका घेऊन? काहीतरी मार्ग तरी मिळेल." विद्याचे शब्द मनीषाच्या कानापर्यंत पोचलेच नाहीत.
इकडे आतल्या खोलीत मिनू विचारत होती,
"दिदी, दुसरी बाई म्हणजे काय विचारत होते ग पोलिस? आणि विद्यामामी ज्योतिषाकडे का जायचं म्हणतेय?"
"माहीत नाही ग मला पण. तू गप्प बस. प्रश्न नको विचारत बसू मला."
_______________________________________
"येस मिसेस सहस्रबुद्धे, आपल्या ऑफिसमधे आहे तशी व्यवस्था. डिसिज्ड पर्सनच्या पत्नीला जॉब मिळू शकतो. तुम्ही मि.संजयचं डेथ सर्टिफिकेट आणि आत्ताचं हे अॅफिडेविट घेऊन सोमवारी या. आपण लगेचच पुढच्या प्रोसिजर्स पूर्ण करू. तुम्ही नेक्स्ट मन्थ जॉईन करू शकता."
मनीषाने हायसे हासत मधुकररावांकडे पाहिले... 'आता मी जगू शकते' . . . तिच्या मनात आले.
"पी.एफ., ग्रॅच्युइटीचे चेक्स तुम्हाला १-२ महिन्यात मिळतील." संजयच्या बॉसनी दिलेल्या दिलाशाने तिच्या जिवात जीव आला होता.
मधुकररावांकडून सोमवारी किती वाजता यायचेय ते एकदा कन्फर्म करून तिने रिक्षा पकडली. पुढे कसे नी काय करायचे या विचारांनी आता तिला ग्रासले होते. मुलींच्या परीक्षा संपायला आता दहाच दिवस उरले होते. प्रियाची बारावी. एवीतेवी आपल्याला पुण्याच्या ऑफिसला जॉईन करावे लागणार आहे, तर दोघींच्याही अॅडमिशन्स तिकडे घेऊन टाकाव्यात का? नाशिकला जाऊन न राहण्याचा आपला निर्णय योग्य आहे ना? की ठेवावे दोघींना नाशिकला? तिकडे आपले स्वत:चे घर, सासूबाई आहेत. काळजीचे कारणच नाही काही. नाही नाही! आता जे होईल ते! पण मुलींना आपल्यापासून वेगळे करायचे नाही. जसे जमेल तसे आपणच मॅनेज करायचे सगळे. आत कुठेतरी अतीव दु:खाबरोबरच एक स्वत्वाची जाणीव प्रकर्षाने होत होती तिला. भविष्यातल्या अनिश्चिततेबरोबरच एक प्रकारचा आत्मविश्वास तिच्यात मूळ धरत होता. आता आपण जगायचं ते फक्त प्रियू-मिनू साठी.
तो दिवस आजही तिच्या डोळ्यासमोर अगदी आत्ताच घडल्यासारखा उभा होता.
_______________________________________
विजय आणि मधुकरराव आपापल्या परीने शोध घेतच होते. कुठे काही माहितीसाधर्म्य आढळले की पळत होते. विद्या नाही म्हटले तरी एकंदर प्रकाराला वैतागली होती.
'अजून किती दिवस रहायचं इथे? कशाचाच कशाला पायपोस नाहीये . . . संजय आहे तरी की नाही कोण जाणे! मनीषाला काय समजावणार आपण? विजय आणि मधुकरराव तर शंभरवेळा ठिकठिकाणच्या शवागारांत जाऊन आलेत आत्तापर्यंत. तसेच काही असते तर कळले नसते का आत्तापर्यंत? शिवाय इथे खर्च किती होतोय! पण बोललं तर आपण वाईट. मनीषाशी काही बोलायचं धाडसच होत नाही.'
तिची ही विचारशृंखला बेलच्या आवाजाने भंगली. तिने जाऊन दार उघडले आणि मनीषाला सांगितले,
"मनीषा, पोलिस आलेत परत."
"परत? दोन दिवसांपूर्वीच तर आले होते." मनीषा निर्विकारपणे म्हणाली.
"...................."
बाहेरच्या खोलीत पोलिस इन्स्पेक्टर आणि एक हवालदार उभे होते. हवालदाराच्या हातात एक गाठोडे होते. मनीषाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
"मॅडम, एका बॉडीचे कपडे आलेत आमच्याकडे. ओळख पटते का बघा"
"................."
"हा माणूस डिसेंबरमधेच गेलाय. दिवा रेल्वे पोलिसांनी इतके दिवस ठेवली होती बॉडी. गेल्या आठवड्यात जाळून टाकली. तुम्ही हरवल्याची तक्रार नोंदवली होती; त्यामुळे त्यांनी ओळख पटवायला हे कपडे पाठवून दिलेत."
ती गाठोड्याजवळ गेली. धडधडत्या अंतःकरणाने तिने पाहिले आणि . . . . आणि ते कपडे संजयचे होते. एक अर्धवट जळका, फाटलेला स्वेटर... आईनेच तर विणून दिला होता त्याच्या वाढदिवसाला ४ महिन्यांपूर्वी. पँटचे फाटलेले तुकडे, त्यादिवशी घातलेला शर्ट छिन्नविछिन्न अवस्थेतला. रक्ताने डागाळलेल्या, जळक्या, मळलेल्या त्या फाटक्या कपड्यांतल्या अदृष्य संजयकडे मनीषा विषण्ण मनाने पहात राहिली.
"दिवा पोलिसांच्या माहितीप्रमाणे ही बॉडी त्यांना रेल्वे ट्रॅकवर सापडली, डोंबिवली आणि दिव्याच्या मध्यात. चेहरा पार नाहीसा झाला होता. पण अंगावर हे कपडे होते. एक कान शाबूत होता तो टोचलेला दिसला त्यामुळे हिंदू पद्धतीने दहन तरी केले." इन्स्पेक्टर सहज सांगत होता.
इकडे आतल्या खोलीत अभ्यासाची पुस्तके कपाटात ठेवता ठेवता प्रिया मिनूच्या कानात पुटपुटली, "काहीतरी वाईट घडलंय खूप, बाबाचं काहीतरी झालंय नक्कीच."
मिनूच्या मेंदूत हे वाक्य शिरायला वेळ लागला. पण जेव्हा शिरले तेव्हा शंभर दगडांनी ठेचल्यासारखे झाले तिचे डोके. गरगरायला लागले तिला. 'हे काय सांगतेय दिदी? असं कसं होऊ शकतं? आपला एवढा चांगला बाबा असा कसा जाऊ शकतो आपल्याला सोडून? आपण कुणाचं काय वाईट केलंय? का देवाने आपल्याला ही शिक्षा दिली?'
तिला रडावेसे वाटत होते जोरजोरात. पण रडूच येत नव्हते. उलट राग येत होता त्या पोलिसांचा, सगळ्या जगाचाच, खूप. जोरात ओरडावे, आदळआपट करावीशी वाटत होती तिला. पण ती नुसतीच दिदीच्या चेहर्याकडे पहात बसली. शांतच होऊन गेली, गप्पच बसून राहिली.
`कुणाला दाखवू मी माझे जमवलेले दगड? कोण म्हणेल मला आता की, 'कशाला अभ्यास करतेस, खेळ मस्तपैकी?' कोण गोष्टी सांगेल छानछान रचूनरचून? कोण पिक्चर मधली गाणी जोरजोरात म्हणेल माझ्या आणि दिदीबरोबर? कोण घेऊन जाईल आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी सुट्टीत? कोण घेईल माझ्यासारखीच भांडण झालेल्या मैत्रिणीशी कट्टी? मैत्रिणींमधली फक्त बाबालाच माहिती असलेली सिक्रेटस आता कुणाला सांगू?' हे सगळे तिच्या मनात एका क्षणात वादळासारखे येऊन घोंघावून निघून गेले. मिनू एकदम चुपचाप होऊन गेली. कुणालाच कळले नाही. समोर बसलेल्या प्रियाला सुद्धा कळला नाही हा मिनूत क्षणार्धात झालेला बदल. कळायला ती तरी कुठे भानावर होती?
सवयीप्रमाणे त्या शाळेत-कॉलेजात जात होत्या, घरी येत होत्या. परीक्षा ऐन तोंडावर आल्या होत्या. प्रिया मॅच्युअर होती, समजूतदार होती, लवकर सावरली असेल कदाचित. आपल्या मित्रमैत्रिणींना सगळे सांगून तिने आपले दु:ख हलके केले असावे कदाचित. मिनूने मात्र ही घटना अॅक्सेप्ट केली नव्हती. शाळेत, मैत्रिणींमधे कुणालाच ती काहीच बोलली नव्हती. अचानक निर्माण झालेल्या पोकळीने ती सैरभैर झाली होती मनातून. सगळे नॉर्मल चाललेय असे भासवत होती. स्वतःलाच फसवत होती. आंघोळीला गेल्यावर बाथरूममध्ये एकटीच पोटभर रडून घेत होती. बाहेर येताना चेहरा कोरा ठेवणे जमायला लागले होते तिला. घरात एकमेकींशी संवाद असा काही शिल्लकच राहिला नव्हता. येईल त्या दिवसाला त्या तिघीजणी आपापल्या परीने सामोर्या जात होत्या. लोकांच्या नजरा, पाठीमागे होणारी कुजबूज झेलत होत्या. पहिलीपासून जमलेल्या मैत्रिणी सोडून आता जावे लागणार होते . . . नवीन शहरात, अनोळखी लोकांत, एका अनिश्चित जगात. जिथे 'का?' हा प्रश्न विचारायचा नसतो.
_______________________________________
शाळेला सुट्ट्या लागल्या. मनीषाच्या हातात आता तुटपुंज्या पगाराची का होईना, नोकरी होती. २०-२५ दिवसांत नवीन ऑफिस जॉईन करायचे होते. तत्पूर्वी अनेक गोष्टी हातावेगळ्या करायला हव्या होत्या, अनेक कामे मार्गी लावणे गरजेचे होते. मुलींची मनःस्थिती बघायला वेळ नव्हता. शोक करत बसायला फुरसत नव्हती. दु:ख विसरणे भाग होते. एका वेगळ्याच मनःस्थितीने तिला भारून टाकले होते. आकस्मिकपणे समोर आलेले हे वैयक्तिक, आर्थिक स्वातंत्र्य तिला हवेहवेसे वाटायला लागले होते. संजय काही कमी करत नव्हता कधीच. पण तिचे हक्काचे स्वातंत्र्य तिला आता मिळाल्यासारखे वाटत होते. तिचे खर्या अर्थाने उमलणे आत्ता सुरू झाले होते. एक स्त्री म्हणून, एक व्यक्ती म्हणून. तिच्या स्वतःच्या, स्वतःसाठी, स्वतःच्या आवडीच्या अशा खास गोष्टी; ज्या तिने बंद पेटीत विनाकारण, कदाचित संजयच्या अनामिक किंवा तिच्याच मनाने घेतलेल्या दडपणाने, दडपून ठेवल्या होत्या; त्या सगळ्या सगळ्या करायला आता तिला मोकळीक होती. कसलेच बंधन नव्हते. जोखड नव्हते. प्रश्न विचारणारे कुणीच नव्हते.
ती घरात एकटीच होती. मुलींच्या शाळा-कॉलेजातून लीव्हिंग सर्टिफिकेटच्या वगैरे प्रक्रिया नुकत्याच पार पडल्या होत्या. प्रियाची बारावीची व्हेकेशन बॅच लगेचच सुरू झाली असल्यामुळे तिला पुण्यात हॉस्टेललाच ठेवले होते. मिनूला विजय-विद्या येऊन घेऊन गेले होते ते थेट शाळा सुरू व्हायच्या वेळीच पुण्यात सोडणार होते. का, कशाला असे प्रश्न मनात येऊन सुद्धा ते विचारण्याची मुभा नियतीनेच ठेवली नव्हती. मायलेकी तीन दिशेला विखुरल्या गेल्या होत्या.
पंधरा दिवसात तिला सगळे घर आवरून, सामानासकट पुण्याला निघायला हवे होते. ठेवलेल्या अनेक अनावश्यक गोष्टी, बांधाबांध करताना टाकून देताना डोळे पुन्हा पुन्हा भरून येत होते. संजयचा आणि तिचा संसार, एकेक करून जमवलेल्या वस्तू . . . सगळेच धूसर होत होते.
_______________________________________
प्रिय दिदी,
कशी आहेस? तुझी खूप खूप आठवण येते. मी इकडे मामाकडे, तू पुण्यात. आईला आता ऑफिसला जायला दोनच दिवस उरलेत म्हणे. तू भेटलीस का ग तिला पुण्यात? मला यायचंय तिकडे तुमच्या दोघींजवळ. कधी आपण परत एकत्र रहाणार?
बाकी इथे मामा-मामी कडे मजा येतेय. पण बाबाची सारखी आठवण येते. मला नक्की उत्तर पाठव हं. तुझा क्लास कसा चालू आहे?
तुझीच,
मिनी
_____________________________________________
प्रिय मिने,
आत्ताच तुझं पत्र मिळालं. लगेच तुला उत्तर लिहायला बसले. माझा क्लास आता थोडे दिवसच राहिला आहे. क्लासमुळे मला खूप मैत्रिणी मिळाल्या आहेत. आई येऊन भेटून गेली मला. ती सध्या रश्मीताईकडे आहे. आठवते का तुला रश्मीताई? आईची खूप लांबची मावशी. पण खूप जवळची आहे ती आईला, अगदी जिवाभावाची. तिच्या खालच्या घरातच तिने आपल्याला रहायला दोन खोल्या दिल्यात, आपलं घर होईपर्यंत आपण तिथेच रहायचंय.
मला पण लवकरात लवकर तुला भेटायचंय, एकत्र रहायचंय. तुझीपण मला खूप आठवण येते, किती मजा करायचो आपण ठाण्यात. आता आपण प्रत्यक्ष भेटेपर्यंत अशीच पत्र पाठवत राहू, चालेल ना?
तुझी,
दिदी.
_______________________________________
प्रिय विजय आणि विद्या,
इथे पुण्यात रुटीन आता नीट बसलंय. विस्कटलेली घडी बसायला एवढा वेळ जायचाच. माझं ऑफिसही नीट सुरू आहे. मुली रुळतायत हळूहळू. नवीन वातावरणाशी जुळवून घेणं, तेही अशा अर्धवट वयात, दोघींनाही अवघड आहे. पण समजूतदार आहेत हो मुली. बाबा होता तेव्हाच्या आणि आत्ताच्या परिस्थितीत जमीनअस्मानाची तफावत आहे पण एका शब्दाने त्या तक्रार करत नाहीत. फार फार वाईट वाटतं हो कधीकधी. मनात असून सुद्धा त्यांना वेळ देता येत नाही, तेही त्यांना माझी सर्वात जास्त गरज आहे अशावेळी. त्या दोघींचं एक वेगळं जग तयार झालंय. पुण्याने आम्हाला आपलंसं केलंय असं वाटतं. प्रियू त्यामानाने लवकर सावरलीय. पण मिनूचं काही कळत नाही हो! घुसमटतेय आतल्या आत की काय असं वाटतं. असो.
तुम्ही दोघं पाठीशी उभे राहिलात म्हणून आजचा दिवस दिसतोय. मधुकररावांनी सगळे आर्थिक आणि तुम्ही सगळे प्रापंचिक व्यवहार बिनबोभाट सांभाळलेत म्हणूनच हे सर्व सुरळीत झालं आहे. संजयचे मिळालेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवून ठेवलेत म्हणून आज काही अडचणी नाहीयेत. तुम्हीही सलग तीन वर्ष न मागता, न सांगता गरजेच्या सगळ्या वस्तू भरून देताय; त्याचे ऋण मी कसे फेडू? तुम्ही म्हणाल, भावाचे कसले ऋण मानतेस परक्यासारखे? पण दादा स्वाभिमानाने जगणारी बहीण तुला जास्त आवडणारी आहे, माहितेय मला.
आणखी काय लिहू? पत्रोत्तर पाठवावे.
तुमचीच,
मनीषा.
_______________________________________
"आई, मी शिल्पाकडे चालले आहे, तिथून परस्परच कॉलेजला जाईन. आमचं प्रॉजेक्ट आज एकदाचं सबमिट केलं की डोक्याचा ताप गेला. मग आमची पार्टी आहे, शेवटचा दिवस म्हणून. मधूसाठी गिफ्टचं पण चाल्लंय काहीतरी."
"बघू, उशीर झाला तर रात्री शिल्पाकडेच राहीन, वाट पाहू नकोस."
"मी उद्या संध्याकाळी नाशिकला चाल्लेय, आहे का लक्षात?" मनीषाने एक कटाक्ष टाकत मिनूला विचारले.
"हो, तू तुझ्या वेळेत नीघ. माझ्याकडे किल्ली आहे, उशीर झाला तरी. डोन्ट वरी" मिनू घाईघाईने जिना उतरत म्हणाली.
मनीषा क्षणभर दारात तशीच उभी राहिली आणि स्वतःशीच हसत घरात आली. ऑफिसमधे ती कालच रजेचा अर्ज देऊन आली होती. उद्या संध्याकाळी निघायचे होते. सासुबाईंची तब्येतही बरी नव्हती, त्यांनाही भेटल्यासारखे होणार होते. खरेतर तिला चेंज हवा होता. मिनू आता उद्याच येणार म्हणजे पूर्ण दीड दिवस तिचा एकटीचा होता. दुसर्या दिवशी निघायची तयारी करता करता तिच्या डोक्यात विचारांचे आवर्त सुरू झाले. अलीकडे हीच सवय लागली होती तिला. स्वतःच्या विचारांमधे स्वतःशीच संवाद साधायची.
'कशी गेली ही नंतरची बारा वर्षे, कळलंच नाही. किती प्रसंग आले, किती घटना घडल्या मधल्या काळात. मनाचा कस लागला. निग्रह ठेवण्याचे किती क्षण आले....... प्रियू-मिनू कशा आणि कधी मोठ्या झाल्या जाणवलंच नाही आपलं आपल्याला........ अनुभवताच आलं नाही त्यांचं उमलणं...... कधी कधी स्वप्नवत भासतं सगळं........ संजय आजही आहे आपल्या आजुबाजूला असंच वाटतं अजून...... काही काही अघटित घटनांमधे त्याने आपलं अस्तित्व ही दाखवून दिलेलं आहे........या गोष्टीवर कधी विश्वास बसला आपला?........ ते नाही आठवत पण बसला खरा............ लोक हसोत हसायचे तर......... त्यांची तमा बाळगणं तर कधीचंच सोडून दिलंय..... कशी काढली ही मधली वर्षे..... मुलींनी कशी काढली असतील....... त्या आपल्यापासून दूर तर नसतील ना गेल्या मनातून..... कधी हवा तेवढा, हवा तसा वेळच नाही देता आलाय त्यांना........... एक दोन वर्षात मिनूपण निघून जाईल सासरी, प्रियूसारखी......... प्रियाच्या लग्नानंतर जरा अलूफच झालीये का ती? फारसा संवादच होत नाही का आपला आणि तिचा? असंच काही नाही अगदी.......मांडीवर डोकं ठेऊन लोळते काय..... 'आई, आज मला तूच भरव' म्हणून हट्ट काय करते....... संजय गेल्यानंतर अचानक हरवलेलं बाल्य तर जगत नसेल ती अशी अधूनमधून? असेलही..... प्रियाच्या लग्नानंतर पोकळी जाणवली खरी पण मिनू होती....... आता तीही निघून गेल्यावर कोण आपल्याला....... तसं एकटीनेच तर काढलंय आयुष्य म्हणा........ कधी कुणावर अवलंबून नाही राहिलो आपण........किती लोक भेटले, किती जोडले गेले, किती विनाकारण तुटले...... हुरहूर लागून राहते कधीकधी...... वाटतं, चुकीचं वागलो का आपण...... त्या परिस्थितीत योग्य तेच निर्णय घेत आलो....... संजयच्या आकस्मिक जाण्याने आपलं मनच होरपळून जायचं खरतर...'
..... पण आश्चर्यकारकरित्या वाचलेल्या महत्त्वाच्या गोष्टी पाहून संजयच्या आपल्या भोवतीच्या अस्तित्वावर विश्वास बसला आपला..........मनाला उभारी मिळाली, हुरूप आला....... आपलीच का एवढी सत्त्वपरीक्षा?.......... आता काही वाईट होणार नाही......... काही वाईट व्हायचं शिल्लकच राहिलं नाहीये........आता फक्त चांगलंच घडणार आहे........ फक्त चांगलंच......... स्वतःचा विचारच केला नाही इतक्या वर्षांत........ स्वतःच्या गरजा, हौसमौज, काही काही शिवलं नाही मनाला......... अजून बरंच काही करायचंय आपल्याला.........बरंच काही राहून गेलंय........मिनूशी खूप खूप बोलायचंय....... बर्याच गोष्टी तिला विचारायच्यात...... सांगायच्यात........ तिची, प्रियाची मैत्रिण बनायचंय......... उशीर झालाय खरा पण वेळ निघून गेली नाहीये........ खूपसं शिकायचंय, हिंडायचंय, फिरायचंय....... थकून जाऊन कसं चालेल......... कंटाळून कसं चालेल......... अजून प्रियाला आपली गरज आहे....... मिनूचं तर सगळंच व्हायचंय अजून......... माझ्या होणार्या नातवंडांना खेळवायचंय........ विचार करायला फुरसत कुठे आहे आपल्याकडे.........'
नव्या जोमाने तिने कामाला सुरूवात केली. विसरलेला गॉगल घ्यायला परत वर आलेली मिनू आईच्या नव्या उमेदीने चमकणार्या डोळ्यांकडे आश्चर्याने पहातच राहिली . . . तिचा चेहरा न्याहाळत राहिली.
- मंजिरी सोमण