नाट्यगीत

युवतिमना दारूण

युवतिमना दारूण रण रुचिर प्रेमसे झाले
रणभजना संसारी असे अमर मी केले

रमणीमनहंसा नर साहस सरसी रमवी
शूर तोचि विजय तोचि
हे शुभ यश मज आले

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

स्मरशील गोकुळ सारे

स्मरशील राधा, स्मरशील यमुना
स्मरशील गोकुळ सारे,
स्मरेल का पण, कुरुप गौळण
तूज ही बन्सीधरा रे ॥ ध्रु ॥

रास रंगता नदीकिनारी, उभी राहिले मी अंधारी
नकळत तुजला तव अधरावर, झाले मी मुरली रे ॥ १ ॥

ऐन दुपारी, जमीन जळतां, तू डोहावर शिणून येता
कालिंदीच्या जळात मिळुनी, धुतले पाय तुझे रे ॥ २ ॥

मथुरेच्या त्या राजघरातुन, कुंजवनी परतता तूझे मन
उपहासास्तव तरी कधी तू, आठव करशील का रे ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

आई तुझी आठवण येते

आई तुझी आठवण येते
सुखद स्मृतीच्या कल्लॊळांनी काळिज काजळते ॥ ध्रु ॥

वात्सल्याचा कुठे उमाळा, तव हातांचा नसे जिव्हाळा
हृदयाचे मम होउन पाणी, नयनी दाटुन येते ॥ १ ॥

तुजविण आई जगी एकटा, पोरकाच मज म्हणति करंटा
व्यथा मनीची कुणास सांगू, कळिज तिळतिळ तुटते ॥ २ ॥

हाक मारतो आई आई, चुके लेकरु, सुन्या दिशाही
तव बाळाची हाक माउली, का नच कानी येते ॥ ३ ॥

सुजल्या नयनी नुरले पाणी, सुकल्या कंठी उमटे वाणी
मुके पाखरु पहा मनाचे, जागी तडफड करते ॥ ४ ॥

नको जीव हा नकोच जगणे, आईवाचुन जीवन मरणे
एकदाच मज घेई जवळी, पुसुनी लोचने माते ॥ ५ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

घेई छंद मकरंद

घेई छंद मकरंद
प्रिय हा मिलिंद
मधु सेवनानंद
स्वच्छंद हा धुंद ||

मिटता कमलदल
होई बंदी हा भृंग
तरी सोडी ना ध्यास
गुंजनात हा दंग ||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

उगवला चंद्र पुनवेचा

उगवला चंद्र पुनवेचा
मम हृदयी दरिया उसळला प्रीतीचा ||

दाही दिशा कशा खुलल्या
वनीवनी कुमुदिनी फुलल्या
नववधू अधीर मनी जाहल्या
प्रणयरस हा चहुकडे वितळला स्वर्गीचा ||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

अर्थशून्य भासे मज हा

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा
धर्म, न्याय, नीती सारा खेळ कल्पनेचा ||

द्यास एक हृदयी धरुनी स्वप्नं रंगवावे
वीज त्यावरी पडुनी शिल्प कोसळावे
सर्वनाश एकच दिसतो नियम हा जगाचा ||

दैव ज्यास लाभे त्याला लाभ वैभवाचा
दैवकोप येता भाळी सर्वनाश त्याचा
वाहणे प्रवाहावरती धर्म एक याचा ||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

काटा रुते कुणाला

काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी
मज फूलही रुतावे, हा दैवयोग आहे!
रुते कुणाला...

सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची?
चिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे
रुते कुणाला...

काही करू पहातो, रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही विपरित होत आहे
रुते कुणाला...

हा स्नेह, वंचना ती, काहीच आकळेना
आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे
रुते कुणाला...

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

हे बंध रेशमाचे

पथ जात धर्म किंवा नातेही ज्या न ठांवे
ते जाणतात एक प्रेमास प्रेम द्यावे
हृदयात जागणार्‍या अतिगूढ संभ्रमाचे
तुटतील ना कधीही, हे बंध रेशमाचे

विसरुन जाय जेव्हा माणूस माणसाला
जाळीत ये जगाला विक्राळ एक ज्वाला
पुसतात डाग तेही धर्मांध आक्रमांचे

हे बंध रेशमाचे ठेवि जपून जीवा
धागा अतूट हाच प्राणात गुंतवावा
बळ हेच दुर्बळांना देती पराक्रमाचे

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

प्रिये पहा

प्रिये पहा, रात्रीचा समय सरुनि
येत उष:काल हा ॥ ध्रु ॥

थंडगार वात सुटत, दीपतेज मंद होत
दिग्वदने स्वच्छ करित, अरूण पसरि निज महा ॥ १ ॥

पक्षी मधुर शब्द करिति, गुंजारव मधुप वरिति
विरलपर्ण शाखि होति, विकसन ये जलरुहा ॥ २ ॥

सुखदु:खा विसरुनिया, गेले जे विश्व लया
स्थिति निज ती सेवाया, उठले की तेचि अहा ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

गुलजार नार ही मधुबाला

गुलजार नार ही मधुबाला

तनुलतेवर गेंद फुलांचे
यौवन ये बहराला
गुलजार नार ही मधुबाला

गोड गोड बोलूनी खोडकर
ओढ लावी हृदयाला
भृधनुवरती सज्ज करोनी
नयनांची शरमाला
चंचल नयना सहज विंधिते
चंचल हृदयाला
गुलजार नार ही मधुबाला

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: