चित्रपटगीत

अहो सजना, दूर व्हा

असेल कोठे रुतला काटा माझ्या तळपायात
लाडी गोडीत तुम्ही फिरवता पाठीवरती हात

याचा बोभाट होईल उद्या
मला लौकर घराकडे जाऊ द्या
अहो सजना, दूर व्हा, दूर व्हा ना
जाऊ द्या, सोडा, जाऊ द्या !

अर्ध्या वाटेत काटा मला लागला
कसे कोठुन तुम्ही इथं धावला
आहे तस्साच काटा तिथं राहू द्या
मला लंगडत घराकडं जाऊ द्या !

तिन्ही सांजची वेळ अशी वाकडी
इथं शेजारी नणंदेची झोपडी
आहे तस्संच येणं जाणं राहू द्या
आता अब्रूनं घराकडे जाऊ द्या !

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

अश्विनी ये ना !

अश्विनी ये ना !

प्रिये, जगु कसा तुझ्याविना मी राणी ग
कशी ही जिंदगीत आणिबाणी ग
ये ना प्रिये !
मी तर प्रेम दिवाणा रसिला
दे प्यार जरासा नशिला

प्रिया, उगाच संशयात मी बुडाले रे
तुला छळून मी जळून गेले रे
ये साजणा !
विसर झाले गेले सख्या रे
शरण आले राया तुला रे

मंद धुंद ही गुलाबी हवा
प्रीत गंध हा शराबी नवा
हात हा तुझाच हाती हवा
झोंबतो तनुस हा गारवा
तुझी माझी प्रीती अशी फुले मधुराणी
फुलातूनी उमलती जशी गोड गाणी
तू ये ना, तू ये ना
ना ना ना !

ये अशी मिठीत ये साजणी
पावसात प्रीतीच्या न्हाऊनी
स्वप्न आज जागले लोचनी
अंग अंग मोहरे लाजूनी
जाऊ नको दूर आता मन फुलवूनी
तूच माझा राजा अन्‌ मीच तुझी राणी
तू ये ना, तू ये ना

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

अरे खोप्यामधी खोपा

अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाला टांगला

पिलं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखरांची कारागिरी
जरा देख रे मानसा

तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान

दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया
बालपाणी गेलासी तू सूर्याला धराया
हादरली ही धरणी, थरथरले आसमान

लक्ष्मणा आली मुर्च्छा लागुनिया बाण
द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण
तळहातावर आला घेऊनी पंचप्राण

सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका
तिथे रामनामाचा तू वाजविला डंका
दैत्य खवळले सारे परि हसले बिभिषण

हार तुला नवरत्नांचा जानकीने घातला
पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला
उघडुनी आपली छाती दविले प्रभु भगवान

आले किती गेले किती संपले भरारा
तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा
धावत ये लवकरी आम्ही झालो हैराण

धन्य तुझे रामराज्य धन्य तुझी सेवा
तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा
घे बोलावून आता कंठाशी आले प्राण

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

मज नकोत अश्रू घाम हवा

मज नकोत अश्रू, घाम हवा, घाम हवा
हा नव्या युगाचा मंत्र नवा, मंत्र नवा

होते तैसी अजुन असे मी
सधन अन्नदा सुवर्णभुमी
खंडतुल्य या माझ्या धामी
का बुभुक्षितांचा रडे थवा?

अपार लक्ष्मी माझ्या पोटी
का फिरसी मग माझ्या पाठी?
एक मूठभर अन्नासाठी
जगतोस तरी का भ्याड जीवा?

काय लाविसी हात कपाळी?
फेकून दे ती दुबळी झोळी
जाळ आळसाची पेटव होळी
तू जिंक बळाने पराभवा

मोल श्रमाचे तुला कळू दे
हात मळू दे, घाम गळू दे
सुखासिनता पूर्ण जळू दे
दैन्यास तुझ्या हा एक दवा

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

तुझ्या कांतिसम रक्तपताका

तुझ्या कांतिसम रक्तपताका, पूर्वदिशी फडकती
अरुण उगवला प्रभात झाली, ऊठ महागणपति ॥ ध्रु ॥

सूर्याआधी दर्शन घ्यावे, तुझे मूषकध्वजा
शुभद सुमंगल सर्वाआधी तुझी पाद्यपूजा
छेडिनि वीणा जागवते तुज, सरस्वती भगवती ॥ १ ॥

आवडती तुज म्हणुन आणिली रक्तवर्ण कमळे
पाचुमण्यांच्या किरणासम हि हिरवी दुर्वादळे
उभ्या ठाकल्या चवदा विद्या घेउनिया आरती ॥ २ ॥

शूर्पकर्णका, ऊठ गजमुखा, उठी रे मोरेश्वरा
तिन्ही जगांचा तूंच नियंता, विश्वासी आसरा
तूझ्या दर्शना अधीर देवा, हर, ब्रम्हा, श्रीपती ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

त्या तिथे पलिकडे

त्या तिथे पलिकडे, माझिया प्रियेचे झोपडे ॥ ध्रु ॥

गवत उंच दाट दाट, वळत जाइ पायवाट
वळणावर अंब्याचे, झाड एक वाकडे ॥ १ ॥

कौलावर गारवेल, वार्‍यावर हळू डुलेल
गुलमोहर डोलता, स्वागत हे केवढे ॥ २ ॥

तिथेच वृत्ति रंगल्या, चांदराति रंगल्या
कल्पनेत स्वर्ग तो, तिथे मनास सापडे ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

ही कुणी छेडिली तार

आशा: ही कुणी छेडिली तार
प्राजक्ताच्या मधुगंधासम
कुठुनी ये केदार

वसंतराव: तूच छेड ती, तूच ऐक ती
आर्त सुरावट तुझ्याच हाती (२)
स्पर्शावाचून तूच छेडिसी
माझी हृदयसतार
आशा: ही कुणी छेडिली तार
प्राजक्ताच्या मधुगंधासम
कुठुनी ये केदार
ही कुणी छेडिली तार...

जागृत मी का, आहे स्वप्नी
श्रवण पडे पण दिसे न नयनी (२)
स्वप्नातच का मजसी बोलले
माझे राजकुमार
ही कुणी छेडिली तार...

वसंतराव: स्वप्नासम मज झाले जीवन
स्वप्नही नीरस सखी तुझ्याविण (२)
अर्ध्या रात्री शोधीत आलो
तुझे प्रियतमे दार
आशा: ही कुणी छेडिली तार...

वेलीवर त्या, नका, चढू नका
वसंतराव: चढा सूर नच लवे गायका (२)
तूच चढविला तारस्वर हा
तूच तोड ही तार
आशा: ही कुणी छेडिली तार...
दोघे: ही कुणी छेडिली तार

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

कबीराचे विणतो शेले

कबीराचे विणतो शेले
कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम
भाबड्या या भक्तासाठी
देव करी काम ||धॄ||

एक एकतारी हाती, भक्त गाई गीत
एक एक धागा जोडी जानकीचा नाथ
राजा घनःश्याम
कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम ||१||

दास रामनामी रंगे, राम होइ दास
एक एक धागा गुंते, रूप ये पटांस
राजा घनःश्याम
कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम ||२||

विणून सर्व झाला शेला, पूर्ण होइ काम
ठाई ठाई शेल्यावरती, दिसे रामनाम
गुप्त होई राम
कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम ||३||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती

सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती
ओवाळीते भाऊराया रे
वेड्या बहिणीची रे वेडी माया ||धृ||

माया माहेराची पृथ्वीमोलाची
साक्ष याला बाई चंद्र सूर्याची
कृष्ण द्रौपदीला सखा रे भेटला
पाठीशी राहू दे छाया रे
तशी पाठीशी राहू दे छाया रे ||१||

नवलाख दिवे हे निळ्या अभाळी
वसुंधरा अशी चंद्रा ओवाळी
नक्षत्रांच्या सर येई भूमिवर
पसरी पदर भेट घ्याया
चंद्र वसुधेला सखा रे भेटला
पाठीशी राहू दे छाया रे
तशी पाठीशी राहू दे छाया रे ||२||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: