चित्रपटगीत

लळा जिव्हाळा शब्दच खोटे

लळा जिव्हाळा शब्दच खोटे, माशा मासा खाई
कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही

पिसे, तनसडी, काड्या जमवी, चिमणे बांधी कोटे
दाणा दाणा आणून जगवी जीव कोवळे छोटे
बळावता बळ पंखामधले, पिल्लू उडुनि जाई

रक्तही जेथे सूड साधते, तेथे कसली माया
कोण कुणाची बहीण, भाऊ, पती, पुत्र वा जाया
सांगायाची नाती सगळी, जो तो अपुले पाही

माणुस करतो प्रेम स्वतःवर, विसरुन जातो देवा
कोण ओळखी उपकाराते, प्रेमा अन् सद्भावा
कोण कुणाचा कशास होतो या जगती उतराई

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

घन घन माला नभी दाटल्या

घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा
केकारव करी मोर काननी उभवुन उंच पिसारा

कालिंदीच्या तटी श्रीहरी
तशांत घुमवी धुंद बांसरी
एक अनामिक सुगंध येतो ओल्या अंधारा

वर्षाकालीन सायंकाली
लुकलुक करिती दिवे गोकुळी
उगाच त्यांच्या पाठीस लागे, भिरभिरता वारा

कृष्णविरहिणी कोणी गवळण
तिला अडविते कवाड, अंगण
अंगणी अवघ्या तळे साचले, भिडले जल दारा

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना

धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना
शब्दरूप आले मुक्या भावनांना

तुझ्या जीवनी नीतिची जाग आली
माळरानी या प्रीतिची बाग आली
सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा

तुझा शब्द की, थेंब हा अमृताचा
तुझा स्पर्श की, हात हा चांदण्याचा
उगा लाजण्याचा किती हा बहाणा

चिरंजीव होई कथा मिलनाची
तृषा वाढते तृप्त या लोचनांची
युगांचे मिळावे रूप या क्षणांना

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

धुंद एकांत हा

धुंद एकांत हा प्रीत आकारली
सहज मी छेडिता तार झंकारली
जाण नाही मला प्रीत आकारली
सहज तू छेडिता तार झंकारली

गंधवेडी कुणी लाजरे बावरी
चांदणे शिंपिते चैत्रवेलीपरी
यौवनाने तिला आज शृंगारिली
सहज मी छेडिता तार झंकारली

गोड संवेदना अंतरी या उठे
फूल होता कळी पाकळी मी मिटे
लोचनी चिंतनी मूर्त साकारली
सहज मी छेडिता तार झंकारली

रोमरोमांतुनी गीत मी गायिले
दाट होता धुके स्वप्न मी पाहिले
पाहता पाहता रात्र अंधारली
आज बाहूंत या लाज आधारली
सहज तू छेडिता तार झंकारली

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

देश हा देव असे माझा

देश हा देव असे माझा
अशी घडावी माझ्याहातून तेजोमय पूजा

चंदन व्हावा देहच केवळ
भाव फुलांची करुनि ओंजळ
प्राणज्योतीने ओवाळीन मी देवांचा राजा

धन्य अशा या समर्पणाने
या जन्माचे होईल सोने
मर्द मावळ्या रक्ताची मी मर्दानी तनुजा

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

प्रथम तुज पाहता

प्रथम तुज पाहता, जीव वेडावला
उचलुनी घेतले नीजरथी मी तुला

स्पर्श होता तुझा विसरलो भान मी
धुंद श्वासातला प्राशिला गंध मी
नयन का देहही मिटुनी तू घेतला

जाग धुंदीतुनी मजसि ये जेधवा
कवळुनि तुजसि मी चुंबिले तेधवा
धावता रथ पथी पळभरी थांबला

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

चल सोडून हा देश पक्षिणी

आईलाही विसरुन जाती या देशातील पिले अडाणी
चल सोडून हा देश पक्षिणी

विराण झाले अरण्य सारे
भणभण करते भीषण वारे
दिसे न कोठे कण अन्नाचा, कुठे दिसे ना पाणी

मोडुन पडली घरटी कोठी
कशी राहशील इथे एकटी
इथे न नांदे कोणी जीवलग, नसे आप्तही कोणी

उडुन उंच जा, ऊर्ध्व दिशेला
मार्ग मानिनी अन्य न तुजला
स्वार्थाविण ना धर्म जाणिती खुळे येथले प्राणी

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

ढग दाटुनी येतात

ढग दाटुनी येतात, मन वाहुनी नेतात
ऋतू पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात
(झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची)
सर येते माझ्यात

माती लेऊनिया गंध होत जाते धुंद धुंद
तिच्या अंतरात खोल अंकुरतो एक बंध
मुळे हरखुनि जातात, झाडे पाऊस होतात
ऋतू पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात
(झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची)
सर येते माझ्यात

(सुंबरान गाऊया रं, सुंबरान गाऊया
झिलरी झिलरी आम्ही तुम्ही सुंबरान गाऊया
सुंबरान गाऊया रं, सुंबरान गाऊया)

जीव होतो ओलाचिंब, घेतो पाखराचे पंख
सार्‍या आभाळाला देतो एक ओलसर रंग
शब्द भिजुनी जातात, अर्थ थेंबांना येतात
ऋतू पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात
(झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची)
सर येते माझ्यात

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

दिस चार झाले मन पांखरु होऊन

दिस चार झाले मन, हो, पांखरु होऊन
पान पान आर्त आणि झाड बांवरून

सांजवेळी जेव्हा येई आठव आठव
दूर कुठे मंदिरात होई घंटारव
उभा अंगावर राही काटा सरसरून

नकळत आठवणी जसे विसरले
वाटेवर इथे तसे ठसे उमटले
दूर वेडेपिसे सूर सनई भरून

झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा
आता जरी आला इथे ऋतु वसंताचा
ऋतु हा सुखाचा इथला गेला ओसरून

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

नाच रे मोरा ......

नाच रे मोरा अंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच.... IIधृII

ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच....
नाच रे मोरा नाच.... II१II

झरझर धार झरली रे, झाडांची भिजली इरली रे
पावसात न्हाऊं, काहीतरी गाऊ
करून पुकारा नाच....
नाच रे मोरा नाच.... II२II

थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत खेळ खेळू दोघात
निळ्या सौंगड्या (सवंगड्या) नाच....
नाच रे मोरा नाच.... II३II

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: