चित्रपटगीत

प्रिया तुज काय दिसे स्वप्नात

प्रिया तुज काय दिसे स्वप्नात?
आनंदाचे पाझर फुटले, मिटलेल्या नयनांत

मनासारखी मिळे सहचरी
फुलुन दरवळे सुख संसारी
नकळे केव्हा येती जाती, दिवस आणखी रात

तुला न उरली तुझी आठवण
मी तर झाले तुला समर्पण
दुजेपणाचे नाव न उरले दोघांच्या जगतात

मोहरलेल्या या ऐक्यावर
एक होतसे नवखी थरथर
दिसल्यावाचून जाणवते मज, नवल आतल्या आत

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

सोनसकाळी सरजा सजला

सोनसकाळी सरजा सजला, हसलं हिरवं रान
राघुमैना रानपाखरं गाउ लागली गान

झुळुझुळु आला पहाटवारा
हळुच जागवी उभ्या शिवारा
झाडं वेली नीज सांडती नाचनाचतं पान
राघुमैना रानपाखरं गाउ लागली गान

पिढ्यापिढ्यांचं पातक सरलं
शिवनेरीला शिव अवतरलं
शिवरायांच्या मंगल चरणी
पावन झाली अवघी धरणी
जय भवानी बोल गर्जती आज पाचही प्राण
राघुमैना रानपाखरं गाउ लागली गान

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

प्रीतीच्या पूजेस जाता

प्रीतीच्या पूजेस जाता मी अशी का थांबले?
दाटते भीती उरी का? थबकती का पाऊले?

दर्शनाची ओढ जीवा, दार उघडे स्वागता
अर्पणाचे तबक हाती आडवी ये भीरुता
स्त्रीपणाच्या जाणिवेने शेवटी का गाठिले?
थबकती का पाऊले?

चढून जाता पायर्‍या या मानीनि होते सती
देवता येथून गेल्या, पद्मजा वा पार्वती
पुण्यपंथी चालता या, मीच का भांबावले?
थबकती का पाऊले?

दूर हो लज्जे जराशी, मजसी आता जाऊ दे
साजरे सौभाग्य माझे मजसी पुरते पाहू दे
दोन जीवा जोडणारे, जोडवे हे वाजले
थबकती का पाऊले?

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

देवा दया तुझी की...

देवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला
लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला

भाळावरी वसे या निष्ठूर जी कुठार
घावांतुनी उडावे कैसे सुधा तुषार
निर्जीव जन्म माझा त्या अमृतात न्हाला

माझ्या मुलास लाभे सुखछत्र रे पित्याचे
ही प्रीतीची कमाई की भाग्य नेणत्याचे
उध्वस्त मांडवाच्या दारी वसंत आला

सौख्यात नांदताना का दुःख आठवावे?
जे नामशेष झाले ते काय साठवावे?
हास्यात आजच्या या कळ कालची कशाला?

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

नवल वर्तले गे माये

नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु
मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ||

हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी
रातिचिये स्वप्नी आला कोवळा दिनेशु ||१||

पहाटली आशा नगरी डुले पताका गोपुरी
निजेतुनी जागा झाला राउळी रमेशु ||२||

चैत वार्‍याची वाहणी आली देहाची अंगणी
अंग मोहरुनी आले जसा का पलाशु ||३||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

रूपास भाळलो मी

सुधीर: हंऽऽऽ हंऽऽऽ हंऽऽऽ
आशा: आऽऽऽ आऽऽऽ

सुधीर: रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला
मज वेड लाविले तू, सांगू नको कुणाला

आशा: आऽऽऽ
एकांत पाहुनीया जे तू मला म्हणाला
ऐकून लाजले मी, सांगू नको कुणाला
रूपास भाळले मी...

सुधीर: चंद्रा ढगातुनी तू हसलास का उगा रे? (२)
आशा: आऽऽऽ
सुधीर: वाकून खालती अन्‌ का ऐकलेस सारे?
जे ऐकले तुवा ते, सांगू नको कुणाला
रूपास भाळलो मी...

आशा: वार्‍या तुझी कशानी चाहूल मंद झाली? (२)
सुधीर: आऽऽऽ
फुलत्या फुला कशानी तू हासलास गाली ?
जे पाहिले तुवा ते, सांगू नको कुणाला
रूपास भाळले मी...

सुधीर: हे गोड रूप ऐसे निरखीन मी दुरून (२)
आशा: आऽऽऽ
पाण्या अशीच ठेवी छाया उरी धरून
धरिलेस जे उरी ते, सांगू नको कुणाला
रूपास भाळलो मी...

आशा: हा लाजरा शहारा पाहील काय कोणी? (२)
सुधीर: आऽऽऽ
करतील का चहाडी हे लाल गाल दोन्ही?
गालांत रंगले जे, सांगू नको कुणाला
रूपास भाळले मी...
सुधीर: रूपास भाळलो मी...
दोघे: हंऽऽऽ हंऽऽऽ

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

झाला गडबड घोटाळा

झाला गडबड घोटाळा, सारा गडबड घोटाळा
पायपोस एकाचा दुसया तिसर्‍यावरी डोळा ॥ ध्रु ॥

बदाम गुड्डु हती धरोनी, घेऊन गेला किल्वर राणी
वौकट राजा शीळ घालितो, इस्पिक राणीला ॥ १ ॥

दीड शहाणे अमुचे मेहुणे, हात चोळिती खाती फुटाणे
ताई शहाणी आली सोडुनी आपल्या नवर्‍याला ॥ २ ॥

थापावरती मारुनी थापा, कुणी कुणाला खुशाल कापा
एकाची सुरी बकरा दुसरा मामाचा पडला ॥ ३ ॥

उतावळा नवरा हा असला, गुडघ्याला बाशिंग बांधुनी बसला
नवरी कुणाची कुठला नवरा, कोण उगा सजला ॥ ४ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

या डोळ्यांची दोन पाखरे

या डोळ्यांची दोन पाखरे, फिरतील तुमच्या भवती
पाठलाग ही सदैव करतील, असा कुठेही जगती ॥ ध्रु ॥

दर्शन तुमचे हाच असे हो यापक्ष्यांचा चारा
सहवासाविण नकोच याना अन्य कोठचा वारा
तुमचा परिसर यांसि नभांगण, घरकुल तुमची छाती ॥ १ ॥

सावलीत ही बसतिल वेडी प्रीतीच्या दडुनी
एका अश्रूमाजी तुमच्या जातिल पण बुडुनी
नव्हेत डोळे, नव्हेत पक्षी, हि तर अक्षय नाती ॥ २ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

हा माझा मार्ग एकला

हा माझा मार्ग एकला
शिणलो तरिही चालणे मला
हा माझा मार्ग एकला

दिसले सुख तो लपले फिरुनी
उरले नशिबी झुरणे दुरुनी
बघता, बघता खेळ संपला

सरले रडणे, उरले हसणे
भवती रचितो भलती व्यसने
विझवू बघति जाळ आतला

जगतो अजुनी जगणे म्हणुनी
जपतो जखमा हृदयी हसुनी
छळते अजुनी स्वप्न ते मला

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

माझी न मी राहिले

माझी न मी राहिले, रे
तुजला नाथा सर्व वाहिले

पहिली ती भेट होती
हसले मी गाली ओठी
कळले ना मला वेडीला
वेड लावून गेली प्रीती
कशि फुलापरी उमलले

चांदण्याचे सूर झाले
गाइली मी धुंद गाणी
धुंद होती रातराणी
धुंद होते जीव दोन्ही
रंग रंगातुनि मिसळले

सुख माझे ठेवु कोठे?
मज माझा हेवा वाटे
नच काही उणे संसारी
किति आनंद हृदयी दाटे
जन्मजन्मी तुझी जाहले

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: