चित्रपटगीत

कोन्यात झोपली सतार ( जोगिया )

कोन्यांत झोपली सतार, सरला रंग,
पसरली पैंजणें सैल टाकुनी अंग,
दुमडला गालिचा, तक्के खुकले खालीं
तबकांत राहिले देठ, लवंगा, सालीं.

झुंबरीं निळ्या दीपांत ताठली वीज
कां तुला कंचनी, अजुनी नाहीं नीज?
थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठीं
तें डावलुनी तूं दार दडपिलें पाठी.

हळुवार नखलिशी पुनः मुलायम पान,
निरखिसी कुसर वर कलती करुनि मान
गुणगुणसि काय तें? - गौर नितळ तव कंठी -
स्वरवेल थरथरे, फूल उमलतें ओठी.

साधतां विड्याचा घाट उमटली तान,
वर लवंग ठसतां होसि कशी बेभान?
चित्रांत रेखितां चित्र बोलले ऐने,
"कां नीर लोचनीं आज तुझ्या गे मैने?"

त्या अधरफुलांचे ओले मृदुल पराग-
हालले, साधला भावस्वरांचा योग,
घमघमे, जोगिया दंवांत भिजुनी गातां
पाण्यांत तरंगे अभंग वेडी गाथा.

"मी देह विकुनियां मागुन घेतें मोल,
जगवितें प्राण हे ओपुनिया 'अनमोल',
रक्तांत रुजविल्या भांगेच्या मीं बागा,
ना पवित्र देहीं तिळाएवढी जागा.

शोधीत एकदां घटकेचा विश्राम
भांगेंत पेरुनी तुळस परतला श्याम,
सांवळा तरुण तो खराच ग वनमाली
लावितें पान.... तों निघून गेला खालीं.

अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव,
पुसलेहि नाहिं मीं मंगल त्याचें नांव;
बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी
'मम प्रीती आहे जडली तुजवर राणी !'

नीतिचा उघडला खुला जिथें व्यापार
बावळा तिथें हा इष्कां गणितो प्यार ;
हांसून म्हणाल्ये, 'दाम वाढवा थोडा...
या पुन्हां, पान घ्या...', निघून गेला वेडा!

राहिलें चुन्याचें बोट, थांबला हात,
जाणिली नाही मी थोर तयाची प्रीत,
पुन:पुन्हां धुंडितें अंतर आतां त्याला
तो कशास येइल भलत्या व्यापाराला?

तो हाच दिवस हो, हीच तिथी, ही रात
ही अशीच होत्यें बसलें परि रतिक्लांत,
वळुनी न पाहतां, कापित अंधाराला
तो तारा तुटतो - तसा खालती गेला.

हा विडा घडवुनी करितें त्याचें ध्यान,
त्या खुळ्या प्रीतिचा खुळाच हा सन्मान;
ही तिथी पाळितें व्रतस्थ राहुनि अंगे
वर्षांत एकदा असा 'जोगिया' रंगे."

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

आज कुणीतरी यावे

आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे

जशी अचानक या धरणीवर,
गरजत आली वळवाची सर
तसेच यावे त्याने

विचारल्यावीण हेतू कळावा
त्याचा माझा सूर जुळावा
हाती हात धरावे

सोडूनीया जन्माची नाती
निघून जावे, तया संगती
कूठे, तेही ना ठावे

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

एकाच या जन्मी जणू

एकाच या जन्मी जणू
फिरुनी नवी जन्मेन मी

स्वप्नाप्रमाणे भासेल सारे,
जातील सार्‍या लयाला प्रथा
भवती सुखाचे स्वर्गीय वारे,
नाही उदासी ना व्यथा
ना बंधने नाही गुलामी,
भीती अनामी विसरेन मी
हरवेन मी, हरपेन मी
तरीही मला लाभेन मी

आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या,
फुलतील कोमेजल्या वाचुनी
माझ्या मनीचे गूज घ्या जाणूनी,
या वाहणार्‍या गाण्यातूनी
लहरेन मी, बहरेन मी
क्षितीजातूनी उगवेन मी

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

एक लाजरा न्‌ साजरा मुखडा

एक लाजरा न्‌ साजरा मुखडा, चंद्रावानी खुलला गं
राजा मदन हसतोय कसा, की जीव माझा भुलला गं
ह्या एकांताचा तुला इशारा कळला गं
लाज आडवी येती मला, की जिव माझा भुलला गं

नको रानी नको लाजू, लाजंमदी नको भिजू
हितं नको तितं जाऊ, आडोशाला उबं र्‍हाऊ
का? ... बघत्यात !

रेशीम विळखा, घालुन सजना, नका हो कवळून धरू
लुकलुक डोळं, करुन भोळं, बगतंय फुलपाखरू
कसा मिळावा पुन्हा साजनी मोका असला गं

डोळं रोखून, थोडं वाकून, झुकू नका हो फुडं
गटर्गुम गटर्गुम करून कबूतर बघतंय माज्याकडं
लई दिसानं सखे, आज ह्यो धागा जुळला गं

बेजार झाले सोडा सजणा, शिरशिरी आली अंगा
मधाचा ठेवा लुटता लुटता, बघतोय चावट भुंगा
मनात राणी तुझ्या कशाचा झोका झुलला गं ?

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

एक धागा सुखाचा

एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे
जरतारी हे वस्त्र माणसा, तुझिया आयुष्याचे

पांघरसी जरी असला कपडा
येसी उघडा, जासी उघडा
कपड्यासाठी करीसी नाटक, तीन प्रवेशांचे

मुकी अंगडी बालपणाची
रंगीत वसने तारुण्याची
जीर्ण शाल मग उरे शेवटी, लेणे वार्धक्याचे

या वस्त्रांते विणतो कोण
एकसारखी नसती दोन
कुणा न दिसले त्रिखंडात त्या, हात विणकर्‍याचे

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

मन उधाण वार्‍याचे

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
मन उधाण वार्‍याचे गूज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवरते ||धृ||

आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुलते
सावरते बावरते झडते अडखळते का पडते
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते
अन् क्षणात फिरुनी आभाळाला भिडते
मन उधाण वार्‍याचे... ||१||

रुणझुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते
कधी गहिर्‍या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते
जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते
भाबडे तरी भासांच्या मागून पळते
मन उधाण वार्‍याचे... ||२||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

हुरहुर असते तीच उरी

हुरहुर असते तीच उरी
दिवस बरा की रात्र बरी

कुठला रस्ता सांग खरा
वळणाचा की सरळ बरा

जगणे मरणे काय बरे
सुख खरे की दु:ख खरे

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

एक फुलले फूल

एक फुलले फूल आणि फुलून नुसते राहिले
त्या कुणी ना पाहिले, त्या कुणी ना पाहिले

मंद अगदी गंध त्याचा, मंद इवले डोलणे
साधले ना, मुळीच त्याला नटुनथटुनी लाजणे
कोवळे काळिज त्याचे परि कुणासी मोहिले

त्या ’कुणा’ला काय ठावे, या फुलाची आवडी
तो न आला या दिशेला, वाट करुनी वाकडी
या फुलाला मात्र दिसली, दुरुन त्याची पाऊले

एक दुसरे फूल त्याने, खुडुन हाती घेतले
या फुलाचे जळून गेले, भाव अगदी आतले
करपली वेडी अबोली, दुःख देठी राहिले

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

देव जरी मज कधी भेटला

देव जरी मज कधी भेटला
"माग हवे ते माग" म्हणाला
म्हणेन "प्रभु रे, माझे सारे
जीवन देई, मम बाळाला ॥ ध्रु ॥

कॄष्णा गोदा स्नान घालु दे
रखुमाबाई तीट लावु दे
ज्ञानेशाची गाउन ओवी
मुक्ताई निजवू दे तुजला ॥ १ ॥

शिवरायांच्या मागिन शौर्या
कर्णाच्या घेइन औदार्या
ध्रुव-चिलयाच्या अभंग प्रेमा
लाभु दे चिमण्या बाळाला ॥ २ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

आळविते केदार

फुले स्वरांची उधळित भवती,
गीत होय साकार
आज मी आळविते केदार

गोड काहि तरि मना वाटले
अनोळखीसे सौख्य भेटले
अबोध सुंदर भाव दाटले
कंपित होता तार

फिरत अंगुली वीणेवरती
मौनातुन संवाद उमलती
स्वरास्वरांवर लहरत जाती
भावफुले सुकुमार

जे शब्दांच्या अतीत झाले
स्वरातुनी या ते पाझरते
एक अनामिक अर्थ घेतसे
गीतातुन आकार

गाण्याचे आद्याक्षर: