चित्रपटगीत

अपर्णा तप करते काननी

भस्मविलेपित रूप साजिरे, आणुनिया चिंतनी
अपर्णा तप करते, काननी ॥ ध्रु ॥

वैभवभूषित वैकुंठेश्वर, तिच्या पित्याने योजियला वर
भोळा शंकर परी उमेच्या, भरलासे लोचनी ॥ १ ॥

त्रिशूल डमरु, पिनाकपाणि, चंद्रकला शिरी, सर्प गळ्यातुनि
युगायुगांचा भणंग जोगी, तोच आवडे मनी ॥ २ ॥

कोमल सुंदर हिमनगदुहिता, हिमाचलावर तप आचरिता
आगीमधुनी फूल कोवळे, फुलवी रात्रंदिनी ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

रातिची झोप मज येईना

रातिची झोप मज येईना, कि दिस जाईना
जा जा जा, कुणितरी सांगा हो सजणा ॥ ध्रु ॥

लागली श्रावणझड दारी, जिवाला वाटे जडभारी
अशी मी राघुविण मैना, की झाली दैना ॥ १ ॥

एकली झुरते मी बाई, सुकली गं पाण्याविण जाई
वाटते पाहु मनमोहना, की मन राहिना ॥ २ ॥

कठिण किति काळिज पुरुषाचे, दिवस मज जाती वर्षाचे
जाऊनी झाला एक महिना, की सखा येइना ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

दैव जाणिले कुणी

दैव जाणिले कुणी, हो दैव जाणिले कुणी
लवांकुशाचा हलवी पाळणा, वनी वाल्मिकी मुनी ॥ ध्रु ॥

मृग सोन्याचा जगी असंभव, तरीही त्याला भुलले राघव
श्रीरामाला चकवुन गेल्या, शक्ति मायाविनी ॥ १ ॥

आपदमस्तक विशुद्ध सीता, पतिव्रता ती मूर्त देवता
पतितपावने तिला त्यागिली, तशात ती गर्भिणी ॥ २ ॥

राजपुत्र ते नॄपति उद्याचे, शिशुपण त्यांचे दीनपणाचे
रत्नकंदुकाजागी हाती मातीची खेळणी ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

माझ्या मातीचे गायन

माझ्या मातीचे गायन
तुझ्या आकाश श्रुतीनी
जरा कानोसा देऊन
कधी ऐकशील का रे

माझी धुळीतील चित्रे
तुझ्या प्रकाश नेत्रांनी
जरा पापणी खोलून
कधी पाहशील का रे

माझ्या जहाजाचे पंख
मध्यरात्रीत माखले
तुझ्या किनार्‍यास दिवा
कधी लावशील का रे

माझा रांगडा अंधार
मेघामेघात साचला
तुझ्या उषेच्या कानी
कधी टिपशील का रे

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

वेदमंत्रांहून आम्हां वन्द्य 'वंदे मातरम्'

वेदमंत्रांहून आम्हां वन्द्य 'वंदे मातरम्'

माउलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती
त्यांत लाखो वीर देती जीवितांच्या आहुती
आहुतींनी सिद्ध केला मंत्र 'वंदे मातरम्'

याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले
शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतिवादी झुंजले
शस्त्रहीनां एक लाभे शस्त्र 'वंदे मातरम्'

निर्मिला हा मंत्र ज्यांनी, आचरीला झुंजुनी
ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाऊनी
गा तयांच्या आरतीचे गीत 'वंदे मातरम्'

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

धुंद मधुमती रात रे

धुंद मधुमती रात रे, नाथ रे
तनमन नाचे, यौवन नाचे
उगवला रजनीचा, नाथ रे, नाथ रे ॥ ध्रु ॥

जललहरी या धीट धावती, हरिततटांचे ओठ चुंबिती
येई प्रियकरा, येई मंदिरा, अलि रमले कमलांत रे ॥ १ ॥

ये रे ये कां, मग दूर उभा, हि घटिकाही निसटुन जायची
फुलतील लाखो तारा, हि रात कधि कधि ना यायची
चषक सुधेचा ओठी लावुनि, कटीभवति धरी हात रे ॥ २ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

भरून भरून आभाळ आलंय

भरून भरून आभाळ आलंय
भरल्या वटीनं जड जड झालंय
शकुनाचा आला वारा
माझ्या मनात ओल्या धारा
आला वास ओला मातीचा सोयरा

(तुला चिंचा बोरं देऊ का ही देऊ का ही गं?
काय मनात? कानात सांगून दे तू माझ्या बाई गं)
पान पानाला सांगून जाई
कळी सुखानं भरली बाई
गळूनी फूल आता फळ आलं मोहरा

भर दिसा कशाची चाहूल आली आली बाई गं
जीव उगाच वेडा हसतो, पुसतो काही बाही गं
(सई साजणी साजणी )
कशी इकडचं घेऊ नावं
माझं गुपित मजला ठावं
फिरत्या पावलांचा झाला गं भोवरा

(बीज रुजून झाली लेकूरवाळी, धरती बाई गं
तान्ह्या रुपाला पान्हा पाजत हसते काळी आई गं)
तट तटाला झोका देई
पान सळसळ गाणं गाई
हाती काय येई? जाई की मोगरा?

(टपटप टपटप..)
टपटप टपटप..
लप पोरी लप पोरी घरात लप
जप पोरी जप जीवाला जप
राहू आत जाऊ, कुणी बाई सावरा

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

चंपक गोरा कर कोमल हा

चंपक गोरा कर कोमल हा,
करात तुझिया देते
नेशिल तेथे येते ॥ ध्रु ॥

चैत्रतरुंच्या छायेमधला
गोड गारवा प्रेमे कवळू
फुलाफुलांच्या हृदयामधला
मधुमासाचा सुगंध उधळू
पवनामधुनि सूर गंजता, तुझे गीत मी गाते ॥ १ ॥

निळ्या नभाचे तेज उतरता
मोहक सुंदर वातावरणी
दोन मनांचा संगम बघुनी
हसू लागली ही जलराणी
लाजत लाजत प्रीत देखणी, जिथे मोहुनी बघते ॥ २ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

कशी करू स्वागता

कशी करू स्वागता
एकांताचा आरंभ कैसा
असते कशी सांगता ||

कशी हसू मी कैसी बोलू
किती गतीने कैसी चालू
धीटपणाने मीठी घालू का
कवळू तुजला सांग ||

फुलते कळी की फुलवी वारा
चंद्र हसवी की हसवी तारा
कुठले आधी कुठले नंतर
येईना सांगता ||

कुणी न पुढती कुणी न पाठी
घरात आहे मीच एकटी
प्रथम दर्शनी बोलायाचा
भाव तरी कोणता ||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

या सुखांनो या

या सुखांनो या
एकटी पथ चालले
दोघांस आता हात द्या, साथ द्या

विरहांतीचा एकांत व्हा, अधीर व्हा आलिंगने
गाली ओठी व्हा सुखांनो, भाववेडी चुंबने
हो‌ऊनी स्वर वेळूचे, वाऱ्यासवे दिनरात या, गात या

आमुच्या बागेत व्हा, लडिवाळ तुम्ही पाखरे
शयनघरच्या या छताची, व्हा रुपेरी झुंबरे
होऊ द्या घर नांदते, तुम्हीच त्यांना घास द्या, साथ द्या

अंगणी प्राजक्त व्हा, सौधावरी व्हा चांदणे
जोडप्याचे गूज जुईचे, चिमुकल्यांचे रांगणे
यौवनी सहजीवनी, दोन्ही मनांचे गीत व्हा, प्रीत व्हा

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: