भावगीत

राधा ही बावरी

रंगात रंग तो श्यामरंग, पाहण्या नजर भिरभिरते
ऐकून तान, विसरुन भान, ही वाट कुणाची बघते
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनि होई
राधा ही बावरी, हरीची, राधा ही बावरी

हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना
चिंब चिंब देहावरुनी श्रावणधारा झरताना
हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगुन जाई
हा उनाड वारा गूज प्रीतिचे कानी सांगुन जाई
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनि होई
राधा ही बावरी, हरीची, राधा ही बावरी

आज इथे या तरुतळी सूर वेणूचे खुणावती
तुज सामोरी जाताना उगा पाऊले घुटमळती
हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरखून जाई
हा चंद्र चांदणे ढगांआडुनि प्रेम तयांचे पाही
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनि होई
राधा ही बावरी, हरीची, राधा ही बावरी

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

हेच ते गं, तेच हे ते

हेच ते गं, तेच हे ते, स्वप्नी येती सारखे
मूर्त केले स्वप्न तू हे, चित्ररेखे लाडके

हेच डोळे ते टपोरे, हीच कांती सावळी
नासिकेखालील रेषा हीच काळी कोवळी
हेच हसरे ओठ बाई, मुक तरीही बोलके

हीच छाती रुंद जेथे मीच माथे टेकिले
लाजुनिया चूर झाले धीट डोळे झाकिले
ओळखिली माळ मीही, हीच मोत्ये माणिके

गूज करिती हे कधी गं धरुन माझी हनुवटी
प्रश्न पुसिती धीट जेव्हा मूठ पडते मनगटी
ओठ ओले करुन जाती काय सांगू कौतुके

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

धरिला वृथा छंद

धरिला वृथा छंद
नव्हतेच जर फूल, कोठून मकरंद?

जरि जीव हो श्रांत
नाही तृषा शांत
जलशून्य आभास शोधित मृग अंध

झाले तुझे भास
मी रोधिले श्वास
माझीच मज आस घाली असा बंध

पथ सर्व वैराण
पायी नुरे त्राण
माझेच घर आज झाले मला बंद

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

विसरशील तू सारे

हे हात असे जुळलेले
हे नेत्र असे खिळलेले
विसरशील तू सारे

हे सांध्यरंग विरतील
तारका नभी झुरतील
हे उदास होतील वारे

मधुगंध धुंद उडताना
तिमिरात चंद्र बुडताना
मी स्मरेन सर्व इशारे

तू जिथे कुठे असशील
स्वप्नात मला दिसशील
तुज कळेल पण हे का रे?

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

मुक्या हुंदक्यांचे गाणे

मुक्या हुंदक्यांचे गाणे कुणाला कळावे?
छळावे स्वतःला निखारे क्षणांचेच व्हावे
जडे जीव ज्याचा, त्याच्याच का रे
नशीबी असे घाव यावे?

इथे खिन्न तारा देई इशारा
अता साऊलीचा उरे ना निवारा
मला मीच आता शोधित जावे

कळू लागला अर्थ ह्या जीवनाचा
आभास होता वेड्या सुखाचा
मनपाखराने कुठे रे उडावे?

उरी जागलेली ज्योती विझेना
नियती कुणाची कुणाला टळेना
कळीचे इथे का निर्माल्य व्हावे?

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

अंगणी माझ्या मनाच्या

अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले
दाटुनि आभाळ आले मेघ बरसू लागले
अशा चिंब ओल्या क्षणी
पुकारे तुझी साजणी

चांदीची ही थेंबफुले या माळुनि येती सरी
आणि मातीच्या गंधाने भरते सरसर घागरी
धुंद नाचते उन्मनी
पुकारे तुझी साजणी

(सा रे म प, रे म प नि सा
सा नि प म रे, नि रे सा)

गार वारा मनभरारा शिरशिरी देही उठे
हा असा पाऊस आणि मी तुला शोधु कुठे
खोड ही तुझी रे जुनी
पुकारे तुझी साजणी

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

विसरशील खास मला

विसरशील खास मला दृष्टिआड होता
वचनें ही गोड गोड देशि जरी आता

दृष्टिआड झाल्यावर सृष्टिही निराळी
व्यवसायही विविध, विविध विषय भोवताली
गुंतता तयात कुठे वचन आठवीता?

स्वैर तू विहंग अंबरात विहरणारा
वशही वशीकरण तुला सहज जादुगारा
लाभशील माझा मज केवि जसा होता

अंतरीची आग तुला जाणवू कशाने
बोलवे न वेदनाच वचन दु:ख नेणे
यापरता दृष्टिआड होऊ नको नाथा

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

काल पाहिले मी स्वप्न गडे

काल पाहिले मी स्वप्न गडे
नयनी मोहरली गं आशा
बाळ चिमुकले खुदकन हसले
मी ही हसले, हसली आशा

भाग्यवतीचे भाग्य उजळले
कुणीतरी गं मला छेडिले
आणि लाजले, हळूच वदले
रंग सावळा तो कृष्ण गडे

इवली जिवणी इवले डोळे
भुरुभुरु उडती केसही कुरळे
रुणुझुणु रुणुझुणु वाजती वाळे
स्वप्नी ऐकते तो नाद गडे

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

ती गेली तेव्हा रिमझिम

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता

तशि सांजहि अमुच्या दारी, येऊन थबकली होती
शब्दांत अर्थ उगवावा, अर्थांतुन शब्द वगळता

ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता

हे रक्त वाढतानाही, मज आता गहिंवर नाही
वस्त्रांत द्रौपदीच्याही, तो कृष्ण नागडा होता

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

धुंद येथ मी स्वैर झोकितो

धुंद येथ मी स्वैर झोकितो मद्याचे प्याले
याचवेळि तू असशील तेथे बाळा पाजविले

येथ विजेचे दिवे फेकिती उघड्यावर पाप
ज्योत पणतिची असेल उजळित तव मुख निष्पाप
माझ्या कानी घुमती गाणी मादक मायावी
ओठांवरती असेल तुझिया अमृतमय ओवी

माझ्यावरती खिळली येथे बिषयाची दृष्टी
मत्पूजेस्तव असशिल शोधित सखे स्वप्नसृष्टी
कनकांगीच्या मत्त चुंबने जाग मला आली
विरहाश्रू तव असेल झरला सुकलेल्या गाली

तुझे नि माझे अंतर व्हावे कसे एकरूप
शीलवती तू पतिव्रते, मी मूर्तीमंत पाप

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: