भावगीत

आज अचानक गाठ पडे

आज अचानक गांठ पडे ॥ धृ ॥

भलत्या वेळी, भलत्या मेळी
असतां मन भलतीचकडे ॥ १ ॥

नयन वळवितां, सहज कुठे तरि
एकाएकी तूच पूढे ॥ २ ॥

दचकुनि जागत, जीव निजेंतच
क्षणभर अंतरपाट उघडे ॥ ३ ॥

नसतां मनिंमानसी अशी ही
अवचित दॄष्टीस दॄष्टी भिडे ॥ ४ ॥

गूढ खूण तव कळुन नाकळुन
भांबावुन मागें मुरडे ॥ ५ ॥

निसटुनि जाई संधीचा क्षण
सदा असा संकोच नडे ॥ ६ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

आला पाऊस

आला पाऊस मातीच्या वासांत ग
मोती गुंफ़ित मोकळ्या केसांत ग ॥ धॄ ॥

आभाळात आले, काळे काळे ढग
धारा कोसळल्या, निवे तगमग
धुंद दरवळ, धरणीच्या श्वासात ग ॥ १ ॥

कोसळल्या कश्या, सरीवर सरी
थेंब थेंब करी नाच पाण्यावरी
लाल ओहळ वाहती जोसांत ग ॥ २ ॥

लिबोळ्यांची रास कडूनिंबाखाली
वारा दंगा करी, जुइ शहारली,
चाफा झुरतो, फुलांच्या भासात ग ॥ ३ ॥

झाडांवरी मुके, पाखरांचे थवे
वीज लालनिळी, कशी नाचे लवे
तेजाळते उभ्या अवकाशांत ग ॥ ४ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

ज्ञानदेव बाळ माझा

ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता
लक्ष द्या हो विनवीते, मराठी मी त्याची माता ॥ धॄ ॥

गोड माझ्या सोनुल्याचा, लळा लागे बालपणा
बांधुनीया घुंगुरवाळे, अंगी नाचे थोरपणा
निरुपण सांगायाला, तुम्ही द्या हो शहाणपणा
बाळमुखी मोठा घास, भरवा हो जगन्नाथा ॥ १ ॥

निरक्षर लोकांसाठी, प्राणांचेहि देउन मोल
अमृताते जिंकुन पैजा, धांवे मराठाची बोल
ज्ञानदीप डोळिंयांचे, तेजाळतां तेजोगोल
देवगुरु खाली आले, जोडोनिया दोन्ही हाता ॥ २ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

भय इथले संपत नाही

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते

ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणु अंगी राघव शेला

स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

सारेच हे उमाळे आधीच योजलेले

सारेच हे उमाळे आधीच योजलेले
सारेच हे जिव्हाळे आधीच बेतलेले !

सांभाळतात सारे आपापली दुकाने;
माझेच हे दिवाळे काढून लोक गेले !

मी हा भिकारडा अन्‌ माझी भिकार दु:खे;
त्यांचे हुशार अश्रू आधीच गाजलेले !

माझी जगायची आहे कुठे तयारी ?
त्यांच्या नकोत युक्त्या जे जन्मताच मेले !

माझ्या शिळ्या भुकेची उष्टी कशास चर्चा ?
जे घालतात भिक्षा तेही उभे भुकेले !

आता कुणाकुणाचे मी घाव आठवावे ?
येतात जे दिलासे तेही उगाळलेले !

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

वाट इथे स्वप्नातिल

वाट इथे स्वप्नातिल संपली जणू
थांबवितो धारांनी सावळा घनू, ग बाई

आजूबाजूच्या पानांनी, वेढली ही निळाई
चिंतनात बैसली ग, मंत्रमुग्ध राई
फुलूनिया आली गडे, बावरी तनू

दऱ्यांतुनी आनंदला, पाणओघ नाचरा
आसमंत भारीतो ग, गानसूर हासरा
माथ्यावरी दिसले ग, इंद्राचे धनू

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

पाखरा जा

पाखरा जा दूर देशी
सांग माझा निरोप माझ्या साजणा

चैत्राचे चांदणे मला आज बोलावे
बोलण्यात त्याचिया भान पार मालवे
मी आज एकली साथ ना कुणाची
म्हणूनिच लाडक्या जा सांग ना, पाखरा जा

मैनेचे बोलणे मला आज आठवे
आठवात होई ग मन फार हळवे
प्रित आज हसली साथ ना मनाची
म्हणूनिच लाडक्या जा सांग ना, पाखरा जा

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

घन रानी साजणा

घन रानी घन रानी साजणा
मी कशी तुझ्यासवे चुकले वाट रे
सांग ना... ||धॄ||

भिरभिर वार्‍याची, थरथर पाण्याची
अवखळ सजणी मी, मनभर गाण्याची
तरी बाई सूर नव नवे
सुखद मधुर वाटतात हवे
या मना... ||१||

मधुमय समय असा, बहरुन कुंज हसे
तरळत गंध नवा, वय ते लावी पिसे
इथे तिथे गोड निळेपण
बावरते मन साद घाली कोण
यौवना... ||२||

किती अधीर, अधीर भाषा प्रीतीची
मन माझे, मन माझे, मन बोलत नाही गं माझे
किती लाजे, किती लाजे, वेडे लाजरे मन गं माझे
एक शपथ, शपथ त्याला भितीची
हृदया रे, अदया रे
बोल ना... ||३||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

एका तळ्यात होती

एका तळ्यात होती बदकें पिलें सुरेख
होतें कुरुप वेडें पिल्लूं तयांत एक

कोणी न त्यास घेई खेळावयास संगे
सर्वांहूनी निराळें तें वेगळें तरंगे
दावूनी बोट त्याला, म्हणती हंसून लोक
आहे कुरुप वेडे पिल्लू तयांत एक

पिल्लास दु:ख भारी, भोळें रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी
जें तें तयास टोंची दावी उगाच धाक
होतें कुरुप वेडें पिल्लू तयांत एक

एके दिनी परंतू पिल्लास त्या कळालें
भय वेड पार त्याचें वार्‍यासवे पळालें
पाण्यात पाहतांना चोरुनियां क्षणैक
त्याचेच त्या कळालें, तो राजहंस एक

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

एक वेस ओलांडली

एक वेस ओलांडली, गाव एक दूर राहिले
एकट्याच वाटेस ह्या, दिशांनीच सांभाळले ||धृ||

इथेच मध्येच क्षणैक उगाच का मी थांबलो?
सावलीत माझिया एकटा विसावलो, पुन्हा उन्हात चाललो
एक वेस ओलांडली, गाव एक दूर चालले...

उसासे फुलांचे, खुलासे सलांचे का मी ऐकतो?
मातीच्या उरातल्या स्पंदनात गुंगतो, पुन्हा मनात भंगतो
पावलास स्पर्श सांगतो, गाव दूर दूर थांबले...

संपल्या जुन्या खुणा जरी, नवा ठसा दिसे
प्रवासी पुन्हा हाच खेळ संचिती असे
एक वेस ओलांडता, गाव नवे दिसू लागले...

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: