भावगीत

त्या तरूतळी विसरले गीत

त्या तरुतळी विसरले गीत,
हृदय रिकामे घेउनि फिरतो, इथे तिथे टेकीत ॥ ध्रु ॥

मुक्या मना मग भार भावना, स्वरातुनी चमकते वेदना
तप्त रणे तुडवीत हिंडतो, ती छाया आठवीत ॥ १ ॥

विशाल तरु तरि फांदी लवली, थंडगार घनगर्द साउली
मनिची अस्फुट स्मिते झळकती, तसे कवडसे तीत ॥ २ ॥

हिरवळ तृप्तिच जशी पसरली, फुले अनामिक त्यात विकसली
निळेभोर अव्याज गगन, वर हसते ढग पिंजीत ॥ ३ ॥

जवळ टेकडित झरा झाकला, कसातरी वाहतो खळखळा
निकट जीवाची पुरति न कळली, जशी संभ्रमित प्रीत ॥ ४ ॥

मदालसा तरूवरी रेलुनी, वाट बघे सखि अधीर लोचनी
पानजाळि सळसळे, वळे ती मथित हृदय कवळीत ॥ ५ ॥

पदर ढळे कचपाश भुरभुरे, नव्या उभारित ऊर थरथरे
अधरी अमृत उतू जाय परि, पदरी हृदय व्यथीत ॥ ६ ॥

उभी उभी ती तरुतळि शिणली, भ्रमणी मम तनु थकली गळली
एक गीत परि, चरण विखुरले, द्विधा हृदय संगीत ॥ ७ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

तोच चंद्रमा नभात

तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी
एकांति मजसमीप, तीच तूहि कामिनी ॥ ध्रु ॥

नीरवता ती तशीच, धुंद तेच चांदणे
जाईचा कुंज तोच, तीच गंधमोहिनी ॥ १ ॥

सारे जरी ते तसेच, धुंदि आज ती कुठे
मीही तोच, तीच तूही, प्रीति आज ती कुठे ॥ २ ॥

त्या पहिल्या प्रीतीच्या, आज लोपल्या खुणा
वाळल्या फुलात व्यर्थ, गंध शोधितो पुन्हा
गीत ये न तॆ जुळून, भंगल्या सुरांतुनी ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

पाण्याहून सांजवेळी जात होते घरी

पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
अडवून वाट माझी, उभा राहे हरी ॥ ध्रु ॥

मनांत मी बावरले, कशीबशी सावरले
अचानक तोच हाय, कोसळल्या सरी ॥ १ ॥

आभाळात ओले रंग, चिंबचिंब माझे अंग
काय उपयोग आता, सावरून तरी ॥ २ ॥

पडे अनोळखी भूल, फुलले मी जसे फूल
बांसरीचे सूर माझ्या झाले प्राणभरी ॥ ३ ॥

काही बोलले मी नाही, वितळल्या दिशा दाही
चांदण्याचा राजहंस, धरिला मी उरी ॥ ४ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

अशी पाखरे येति

अशी पाखरे येती, आणिक स्मृति ठेवुनी जाती
दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती ॥ ध्रु ॥

चंद्र कोवळा, पहिला वहिला, झाडामागे उभा राहिला
जरा लाजुनि, जाय उजळुनी, काळोखाच्या राती ॥ १ ॥

फुलून येता फुल बोलले, मी मरणावर हृदय तोलले
नव्हते नंतर, परी निरंतर, गंधित झाली माती ॥ २ ॥

हात एक तो हळु थरथरला, पाठीवर मायेने फिरला
देवघरातिल समईमधुनी, अजून जळती वाती ॥ ३ ॥

कुठे कुणाच्या घडल्या भेटी, गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या हृदयांची गाथा, सूर अजुनही गाती ॥ ४ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

मधुघट

मधु मागशि माझ्या सख्या परी
मधुघटचि रिकामे पडति घरी ॥ ध्रु ॥

आजवरी कमळाच्या द्रोणी, मधु पाजिला तुला भरोनी
सेवा ही पूर्वीची स्मरोनी, करी रोष न सखया, दया करी ॥ १ ॥

नैवेद्याची एकच वाटी, अता दुधाची माझ्या गाठी
देवपुजेस्तव ही कोरांटी, बाळगी अंगणी कशी तरी ॥ २ ॥

तरुण तरुणिंची सलज्ज कुजबुज, वृक्षझर्‍यांचे गुढ मधुर गुज
संसाराचे मर्म हवे तुज, मधु पिळण्या परि बळ न करी ॥ ३ ॥

ढळला रे ढळला दिन सखया, संध्याछाया भिवविती हृदया
अता मधुचे नाव कासया, लागले नेत्र रे पैलतीरी ॥ ४ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

दे मला गे चंद्रिके

दे मला गे चंद्रिके, प्रीती तुझी
रानहरिणी, दे गडे भीती तुझी ॥ ध्रु ॥

मोहगंधा पारिजाता रे सख्या
हासशी कोमेजता रीती तुझी ॥ १ ॥

रे कळंका छेदिता तुज जीवनी
सुस्वरे जन भारिते गीती तुझी ॥ २ ॥

सोशितोसी झीज कैसी चंदना
अपकारिता उपकार ही नीती तुझी ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

चांदण्यात या धरणी हसते

चांदण्यात या धरणी हसते, चंद्र हसे गगनी
चांदणे फुलले माझ्या मनी ॥ ध्रु ॥

आभाळाची धरणीवरती, अशीच आहे अखंड प्रीती
त्या प्रीतीच्या शीतलतेने, सुखावली रजनी ॥ १ ॥

ओली वाळू अशी रुपेरी, नाचनाचती सागरजलहरी
माडांमधुनी लबाड वारा, आळवितो गाणी ॥ २ ॥

या चंद्राच्या अनंत लीला, उपमा नाही अवखळतेला
अर्थासाठी आतुरली, हि शब्दमय वाणी ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

निळासावळा नाथ

निळासावळा नाथ, तशी ही
निळीसावळी रात
कोडे पडते तुला शोधिता
कृष्णा अंधारात ॥ ध्रु ॥

तुडवुनि वन धुंडुनि नंदनवन
शोधुनि आले अवघे त्रिभुवन
एक न उरले गोपींचे घर
हाकेच्या टप्प्यात ॥ १ ॥

नील जली यमुनेच्या साची
होडि सोडिली मी देहाची
गवसलाच ना परि तू कान्हा
लाटांच्या रासात ॥ २ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

प्रेम केले

प्रेम केले, काय हा झाला गुन्हा ?
अंतरीची भावना सांगू कुणा ॥ ध्रु ॥

भोगिली शिक्षा पुरी मी प्रितीची
साहवेना ती सुखाची वेदना
साक्ष द्याया बोलके झाले मुके
जीभ चावूनी टळे का वंचना ॥ १ ॥

रंगवीते चित्रलेखा प्रेमला
अनिरुद्ध स्वप्नी ये उषेच्या मिलना
बोलुनी केलीस ही जाहीर चोरी
हासशी का, रे गुन्हेगारा, पुन्हा ॥ २ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

अजुनी रुसुनी आहे

अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ, की पापणी हले ना ॥ ध्रु ॥

मी हास सांगताच, रडताही तू हसावे
ते आज का नसावे, समजावणी पटेना
धरिला असा अबोला, की बोल बोलवेना ॥ १ ॥

का भावली मिठाची, अश्रूत होत आहे
विरणार सागरी ह्या, जाणून दूर राहे ?
चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना
मिटवील अंतराला, ऐसी मिठी जुटे ना ॥ २ ॥

की गूढ काहि डाव, वरचा न हा तरंग
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ?
रुसवा असा कसा हा, ज्या आपुले कळेना ?
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: