भावगीत

जिवलगा, राहिले दूर घर माझे

जिवलगा, राहिले रे दूर घर माझे
पाउल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे ॥ ध्रु ॥

किर्र बोलते घनवनराई, सांज सभोती दाटून येई
सुखसुमनांची सरली माया, पाचोळा वाजे ॥ १ ॥

गांव मागचा मागे पडला. पायतळी पथ तिमिरी बुडला
ही घटकेची सूटे सराई, मिटले दरवाजे ॥ २ ॥

निराधार मी, मी वनवासी, घेशिल केंव्हा मज हृदयासी
तूंच एकला नाथ, अनाथा, महिमा तव गाजे ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

जेंव्हा तिची नि माझी

जेंव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली
झाली फूले कळ्यांची, झाडे भरात आली ॥ ध्रु ॥

दूरांतल्या दिव्यांचे मणिहार मांडलेले
पाण्यात चांदण्याचे आभाळ सांडलेले
कैफ़ात काजव्यांची, अन पालखी निघाली ॥ १ ॥

केसांतल्या जुईचा तिमिरास गंध होता
श्वासातल्या लयीचा आवेग अंध होता
वेड्या समर्पणाची वेडी मिठी मिळाली ॥ २ ॥

नव्हतेच शब्द तेव्हां, मौनात अर्थ सारे
स्पर्शात चंद्र होता, स्पर्शात लाख तारे
ओथंबला फुलानी, अवकाश भोवताली ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

कधी बहर कधी शिशिर

कधी बहर, कधी शिशिर परंतू, दोन्ही एक बहाणे
डोळ्यामधले आसू पुसती, ओठावरले गाणे ॥ १ ॥

बहर धुंद वेलीवर यावा, हळुच लाजरा पक्षी गावा
आणि अचानक गळुन पडावी, विखरुन सगळी पाने ॥ २ ॥

कातरवेळी मिठी जुळावी, पहाट कधि झाली न कळावी
भिन्न दिशांना झुरत फिरावे, नंतर दोन दिवाणे ॥ ३ ॥

हळुच फुलांच्या बिलगुनि गाली, नाजुक गाणी कुणी गायिली
आता उरली आर्त विराणी, सूरच केविलवाणे ॥ ४ ॥

जुळली हृदये, सूरहि जुळले, तूझे नि माझे गीत तरळले
कातरवेळी व्याकुळ डोळे, स्मरुन आता जाणे ॥ ५ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

ते दूध तुझ्या त्या घटांतले

ते दूध तुझ्या त्या घटांतले, का अधिक गोड लागे, न कळे ॥ ध्रु ॥

साईहुनि मउमउ बोटॆ ती, झरूमुरू झरूमुरू धार काढिती
रूणुझुणु कंकण करिती गीती, का गान मानातिल त्यांत मिळे ॥ १ ॥

अंधुक श्यामल वेळ, टेकडी, झरा, शेत, तरू मधें झोपडी,
त्यांची देवी धारहि काढी, का स्वप्नभूमि बिंबुनि मिसळे ॥ २ ॥

त्या दॄश्याचा मोह अनावर, पाय ओढुनी आणी सत्वर,
जादु येथची पसरे मजवर, का दूध गोडही त्याचमूळे ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

तिन्हीसांजा सखे मिळाल्या

तिन्हीसांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला
आजपासुनी जिवे अधिक तू मला हृदयाला ॥ धृ ॥

कनकगोल हा मरीचिमाली जोडी जो सुयशा,
चक्रवाल हे पवित्र, ये जी शांत गंभीर निशा,
त्रिलोकगामी मारूत, तैशा निर्मल दाहि दिशा
साक्षी ऐसे अमर करूनि तव कर करि धरिला ॥ १ ॥

स्वकरे तरूवर फुले उधळिती, प्रीतिअक्षता या
मंत्रपाठ हा झुळझुळु गातो निर्झर या कार्या,
मंगलाष्टके गाति पाखरे मंजुळ या समया
सहस्त्रकर दिनकर हा स्वकरे उधळि गुलालाला ॥ २ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

अवेळीच केव्हा दाटला अंधार

अवेळीच केव्हा दाटला अंधार
तिच्या गळा जड झाले काळे सर
एकद मी तिच्या डोळ्यात पाहिले
हासताना नभ कलून गेलेले

पुन्हा मी पाहिले तिला अंगभर
तिच्या काचोळीला चांदण्याचा जर
आणि माझा मला पडला विसर
मिठीत थरके भरातील ज्वार

कितीक दिसांनी पुन्हा ती भेटली
तिच्या ओटी कुण्या राव्याची साऊली
तिच्या डोळियात जरा मी पाहिले
काजळात चंद्र बुडून गेले

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

थांबते मी रोज येथे

थांबते मी रोज येथे, जी तुझ्यासाठी
थांबणे ना थांबणे रें, ते तुझ्या हाती ॥ ध्रु ॥

मधुर स्वप्ने मिलनाची, लाविती मज वेड साची
रंगविण्या स्वप्न माझे, पाहिजे मज तूच रे
रंगणे ना रंगणे रे, ते तुझ्या हाती ॥ १ ॥

आळविती मजला तया मी, टाकिते झिडकारुनी
आळविते तुज प्राण भरुनी, याचनेची रागिणी
ऐकणे ना ऐकणे रे, ते तुझ्या हाती ॥ २ ॥

उपवनी सुमने उमलती, अमर जे मधुगंध लूटती
हृदयपुष्प तुला दिले, जे एकदा उमलले
चुंबणे ना चुंबणे रे, ते तुझ्या हाती ॥ २ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

स्वप्नातल्या कळ्यांनो

स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा
गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा

रेखाकृती सुखाच्या चित्ती चितारलेल्या
साशंक कल्पनांनी सहजी विरून गेल्या
कधि सोशिला उन्हाळा कधि लाभला विसावा

नैराश्य कृष्णमेघी, आशा कधी बुडावी
विरहात चिंब भिजुनी प्रीती फुलोनि यावी
काट्याविना न हाती केव्हा गुलाब यावा

सिद्धीस कार्य जाता, येते सुखास जडता
जडतेत चेतनेला उरतो न कोणि त्राता
अतृप्त भावनांनी जीवात जीव यावा

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

सखि मंद झाल्या तारका,

सखि मंद झाल्या तारका, आता तरी येशील का ?

मधुरात्र मंथर देखणी, आली तशी गेली सुनी
हा प्रहर अंतिम राहिला, त्या अर्थ तू देशील का ?

हृदयात आहे प्रीत अन्‌ ओठांत आहे गीतही
ते प्रेमगाणे छेडणारा, सूर तू होशील का ?

जे जे हवेसे जीवनी, ते सर्व आहे लाभले
तरिही उरे काही उणे, तू पूर्तता होशील का ?

बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे
थांबेल तोही पळभरी, पण सांग तू येशील का ?

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

तुझ्या गळां माझ्या गळां

तुझ्या गळां, माझ्या गळां, गुंफ़ू मोत्यांच्या माळा
ताई आणखी कोणाला ? चल रे दादा चहाटळा ॥ १ ॥

तुज कंठी, मज अंगठी, आणखि गोफ कोणाला ?
वेड लागले दादाला, मला कुणाचें, ताईला ॥ २ ॥

तुज पगडी, मग चिरडी, आणखि शेला कोणाला ?
दादा सांगू बाबांला ? सांग तिकडच्या स्वारीला ॥ ३ ॥

खुसू खुसू गालि हसू, वरवर अपुले रुसू रुसू
चल निघ, येथे नको बसू, घर तर माझे तसू तसू ॥ ४ ॥

कशी कशी, आज अशी, गंमत ताईची खाशी
अता कट्टी फू दादाशी, तर मग गट्टी कोणाशी ॥ ५ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: