भावगीत

इथेच आणि या बांधावर

इथेच आणि या बांधावर
अशीच श्यामल वेळ
सख्या रे किती रंगला खेळ ||धृ||

शांत धरित्री शांत सरोवर
पवन झुळझुळे शीतल सुंदर
अबोल अस्फुट दोन जीवांचा
अवचित जमला मेळ ||१||

रातराणीचा गंध दरवळे
धुंद काहीसे आतुन उसळे
चंद्र हासला लवली खाली
नक्षत्रांची वेल ||२||

पहाटच्या त्या दवांत भिजुनी
विरली हळूहळू सुंदर रजनी
स्वप्नसुमांवर अजुनी तरंगे
ती सोन्याची वेळ ||३||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

सजल नयन नितधार बरसती

सजल नयन नितधार बरसती
भावगंध त्या जळी मिसळती ||धृ||

वीणेचे स्वर अबोल झाले
गीतामधले काव्यही सरले
मुक्या मनाचे मुकेच आठव
मूक दीपज्योतीसम जळती ||१||

चंद्र चांदणे सरले आता
नीरस जाहली जीवनगाथा
त्या भेटीतील अमृतधारा
तुझ्याविण विषधारा होती ||२||

थकले पैंजण चरणही थकले
वृंदावनीचे मोहन सरले
तुझ्या स्मृतींची फुले प्रेमले
अजून उखाणे मला घालिती ||३||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

सूर मागू तुला मी कसा?

सूर मागू तुला मी कसा?
जीवना तू तसा, मी असा

तू मला, मी तुला पाहिले
एकमेकांस न्याहाळिले
दुःख माझा तुझा आरसा

एकदाही मनासारखा
तू न झालास माझा सखा
खेळलो खेळ झाला जसा

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

घट डोईवर घट कमरेवर

घट डोईवर घट कमरेवर
सोडी पदरा नंदलाला, नंदलाला रे ||धृ||

कुणीतरी येईल अवचित पाहील
जाता जाता आगही लावील
सर्व सुखाच्या संसाराला नंदलाला रे
नंदलाला रेऽऽऽ घट डोईवर... ||१||

हलता सलता घट खिंदळता
लज्जेवरती पाणी उडता
नकोच होईन मीच मला नंदलाला रे
नंदलाला रेऽऽऽ घट डोईवर... ||२||

केलीस खोडी पुरे एवढी
जोवर हसते मनात गोडी
हसूनी तूही हो बाजूला नंदलाला रे
नंदलाला रेऽऽऽ घट डोईवर... ||३||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

एकदाच यावे सखया

एकदाच यावे सखया, तुझे गीत कानी
धुंद हो‍उनी मी जावे, धुंद त्या सुरांनी

असा चंद्र कलता रात्री, रानगंध यावा
सर्व भान विसरुन नाती, स्पर्श तुझा व्हावा
पुन्हा गूज अंतरिचे हे कथावे व्यथांनी

एकदाच वाटेवर या तुला मी पहावा
भाव दग्ध विटला हा रे, पुन्हा फुलुनि यावा
असा शांत असता वारा, रानपक्षि गावा
शब्दरूप प्रतिमा बघुनी जीव विरुनि जावा
स्वप्न हेच हृदयी धरिले खुळ्या आठवांनी

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

मल्मली तारुण्य माझे

मल्मली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या, तू जिवाला गुंतवावे ॥ ध्रु ॥

लागुनी थंडी गुलाबी, शिरशिरी यावी अशी, की
राजसा माझ्यात तू अन मी तूझ्यामाजी भिनावे ॥ १ ॥

गर्द राईतून यावा, भारलेला गार वारा
तू मुक्या ओठात माझ्या, दंशताजे ऊन प्यावे ॥ २ ॥

चांद्ण्याचा श्वास जाईच्या फुलांमाजी विरावा
आपुल्या डोळ्यात साया तारकांनी विरघळावे ॥ ३ ॥

तापल्या माझ्या तनूची, तार झंकारुन जावी
रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे ॥ ४ ॥

रे तूला बाहूत माझ्या, रुपगंधा जाग यावी
मी तूला जागे करावे, तू मला बिलगून जावे ॥ ५ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

मालवून टाक दीप

मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात, लाभला निवांत संग ॥ ध्रु ॥

त्या तिथे फुलांफुलांत, पेंगते अजून रात
हाय तू करु नकोस, एवढ्यात स्वप्नभंग ॥ १ ॥

गारगार या हवेत, घेउनी मला कवेत
मोकळे करुन टाक, एकवार अंतरंग ॥ २ ॥

दूरदूर तारकांत, बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून, एकएक रुपरंग ॥ ३ ॥

हे तूला कसे कळेल, कोण एकटे जळेल
सांग, का कधी जळेल, एकटा जगी पतंग ॥ ४ ॥

काय हा तूझाच श्वास, दरवळे इथे सुवास
बोल रे हळू, उठेल चांदण्यावरी तरंग ॥ ५ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

पाचोळे

काय कुणासी देऊ, कुणाचे घेऊ ?
वणवण भटके वनांतले, पाचोळे आम्ही वादळातले ॥ ध्रु ॥

कधी भरारी अथांग गगनी, न कळे केव्हा येतो अवनी
मोहपाश ना आम्हा कुणाचा, स्वैर आम्ही अपुले ॥ १ ॥

तरलो त्या प्रक्षुब्ध सागरी, आणि उतरलो दरी कपारी
वसुंधरेचे रुप अनामिक, तेहि दुरुन देखिले ॥ २ ॥

इतके असुनी अमुचे काही, वैर कुणाशी कसले नाही
कसेही असो, आम्ही मानतो, जीवन अमुचे भले ॥ ३ ॥

कुठे आमुची असते वसती, आस्थेने ना कोणी पुसती
अंध खलाशापरी आमुचे, जीवन नौकेतले. ॥ ४ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

परिकथेतील राजकुमारा

परीकथेतील राजकुमारा, स्वप्नी माझ्या येशील का ?
भाव दाटले मनी अनामिक, साद तयाना देशील का ॥ ध्रु ॥

या डॊळ्यांचे गूढ इशारे, शब्दावाचुन जाणुन सारे
राणी अपुली मला म्हणोनी, तुझियासंगे नेशील का ॥ १ ॥

मूर्त मनोरम मनी रेखिली, दिवसारात्री नित्य देखिली
त्या रुपाची साक्ष जिवाला, प्रत्याक्षातुन देशिल का ॥ २ ॥

लाजुन डोळे लवविन खाली, नवख्या गाली येईल लाली
फ़ूलापरी ही तनू कापरी, हृदयापाशी घेशील का ॥ ३ ॥

लाजबावरी मिटुन पापणी, साठवीन ते चित्र लोचनी
नवरंगी त्या चित्रामधले, स्वप्नच माझे होशिल का ॥ ४ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

चांदण्यात फिरताना

चांदण्यात फिरताना माझा धरलास हात
सखया रे आवर ही, सावर ही चांदरात

निजलेल्या गावातुन, आले मी एकटीच
दूर दिवे कळलावे, पडले मागे कधीच
ह्या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात

सांग कशी तुजविनाच, पार करु पुनवपूर
तुज वारा छळवादी, अन हे तारे फितूर
श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात

जाऊ चल परत गडे, जागले न घर अजून
पण माझी तुळस तिथे, गेली रे हिरमसून
तुझिया नयनांत चंद्र, माझ्या हृदयी प्रभात

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: