भावगीत

दिसलीस तू

दिसलीस तू, फुलले ऋतू
उजळीत आशा, हसलीस तू ॥ ध्रु ॥

उरले न आसू, विरल्या व्यथाही
सुख होउनीया, आलीस तू ॥ १ ॥

जाळीत होते, मज चांदणे हे
ते अमृताचे, केलेस तू ॥ २ ॥

मौनातुनी ये, गाणे दिवाणे
त्याचा अनामी, स्वरभास तू ॥ ३ ॥

जन्मांत लाभे, क्षण एकदा हा
ते भाग्य माझे, झालीस तू ॥ ४ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

शब्दावाचून कळले सारे

शब्दावाचून कळले सारे
शब्दांच्या पलिकडले
प्रथम तुला पाहिले आणिक
घडू नये ते घडले ||

अर्थ नवा गीतास मिळाला
छंद नवा अन ताल निराळा
त्या दिवशी का प्रथमच माझे
सूर सांग अवघडले ||

आठवते पुनवेच्या रात्री
लक्षदीप विरघळले गात्री
मिठीत तुझिया या विश्वाचे
रहस्य मज उलगडले ||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

घाल घाल पिंगा

घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात ||

सुखी आहे पोर सांग आईच्या कानात
आई भाऊसाठी परी मन खंतावतं
विसरली का गं भादव्यात वर्ष झालं
माहेरीच्या सुखाला गं मन आचवलं ||

फिरुन फिरुन सय येई जीव वेडावतो
चंद्रकलेचा गं शेव ओलाचिंब होतो
काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार
हुंग हुंगुनिया करी कशी गं बेजार ||

परसात पारिजातकाचा सडा पडे
कधी फुल वेचायला नेशील तू गडे
कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय ||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

पहिलीच भेट झाली

तो: पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची

ती: पहिलीच भेट झाली, जडली अपुर्व बाधा
स्वप्नात गुंग झाली जागेपणात राधा
माझी न राहिले मी किमया अशी कुणाची
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची

तो: डोळे मिटून घेता दिसतेस तू समोर
फुलवून पंख स्वप्नी अन नाचतात मोर
झाली फुले सुगंधी माझ्याही भावनांची
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची

ती: लाजून वाजती या अंगातुनी सतारी
ऐश्वर्य घेऊनी हे ये दैव आज दारी
मी लागले बघाया स्वप्नेही मीलनाची
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची

तो: वार्‍यात ऐकतो मी आता तुझीच गाणी
वार्‍यात वाचतो अन या प्रीतीचे कहाणी
दोघे: पहिलीच भेट झाली पण ओढ ही युगांची
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

रिमझिम झरती श्रावणधारा

रिमझिम झरती श्रावणधारा
धरतीच्या कलशात
प्रियावीण उदास वाटे रात ||

बरस बरस तू मेघा रिमझिम
आज यायचे माझे प्रियतम
आतुरलेले लोचन माझे
बघती अंधारात ||

प्रासादी या जिवलग येता
कमल मीठीमध्ये भृंग भेटता
बरस असा की प्रिय न जाईल
माघारी दारात ||

मेघा असशी तू आकाशी
वर्षातून तू कधी वर्षसी
वर्षामागून वर्षती येणे
करसी नित बरसात ||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

मी चंचल होऊनी आले

मी चंचल होऊनी आले
धरतीच्या लाटांपरी उधळित
जीवन स्वैर निघाले ||

फुलवुनी गात्री इंद्रधनुष्ये
क्षितिज विंधुनी धुंद कटाक्षे
विरघळलेले नवथर उन्मद
चंद्रकिरण मी प्याले ||

श्रावणाचिया अधरी लपूनी
रिमझिमणार्‍या धारांमधुनी
पानावरचे पुसुन आसु
उर्वशीस मी हसले ||

नजराणे घेऊन ऋतुंचे
हृदयातील गंधीत हेतुंचे
आकाशाची प्रिया कधी मी
होऊन लाजत सजले ||

जन्ममृत्यूचे लंघुनि कुंपण
स्थलकालाच्या अतीत उमलून
प्रवासिनी मी चिरकालाची
अनाघ्रात मी उरले ||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

केतकीच्या वनी तिथे नाचला गं मोर

केतकीच्या वनी तिथे नाचला गं मोर
गहिवरला मेघ नभी सोडला गं घीर ||

पापणीत साचले अंतरात रंगले
प्रेमगीत माझिया मनामनात धुंदले
ओठावरी भिजला गं आसावला सूर ||

भावपुर्ण रात्रीच्या अंतरंगी डोलले
धुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले
डोळियात पाहिले रे कौमुदीत नाचले
स्वप्नरंग स्वप्नीच्या सुरासुरात थांबले
झाडावरी दिसला गं भारला चकोर ||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

अपुरे माझे स्वप्न राहिले

अपुरे माझे स्वप्न राहिले
का नयनांनो जागे केले?

ओळख तुमची सांगुन स्वारी
आली होती माझ्या दारी
कोण हवे हो म्हणता त्यांना
दटावून मज घरात नेले

बोलत बसता वगळून मजला
गुपीत चोरटे ऐकू कशाला?
जाण्याचे ते करुनी बहाणा
गुपचुप माझ्या मनात लपले

नीज सुखाची तुम्हां लागली
मंद पाऊली स्वारी आली
गोड खळीने चहाडी केली
अधरांसी नच बोलू दिले

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

ओळख पहिली गाली हसते

ओळख पहिली गाली हसते
सांग दर्पणा कशी मी दिसते

आषाढीच्या तिन्हीसांजेला
पैलतिरी त्या पाणवठ्याला
बघुनि ज्याला जीव लाजला
आठवण त्याची हृदयी ठसते

नाव जयाचे घुमता कानी
चित्र रंगते मिटल्या नयनी
बाहुपाशी जाता विरुनी
माझ्यावर मी जेव्हा रुसते

करी बांगडी राजवारखी
नथणी बुगडी तुझ्यासारखी
तुझ्यापरी तो रत्नपारखी
म्हणुनी तुजला घडी घडी पुसते

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

सहज सख्या एकटाच येई सांजवेळी

सहज सख्या एकटाच येई सांजवेळी
वाट तुझी पाहीन त्या आम्रतरुखाली

हिरवळीत गीत गात
सांजरंगी न्हात न्हात
स्वप्नांना रंगवुया लेवुनिया लाली

अधरी जे अडत असे
सांगीन तुज गुज असे
प्रीति ही प्रीतिविण अजुनही अबोली

तृणपुष्पे ही मोहक ती
उमलतील एकांती
चांदण्यात उमलवुया प्रीत भावभोळी

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: