भावगीत

तुला पाहिले मी नदीच्या किनारी

तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठिवरी मोकळे
इथे दाट छायातुनी रंग गळतात
या वृक्ष-माळेतले सावळे

तुझी पावले गे धुक्याच्या महालात
ना वाजली ना कधी नादली
निळा गर्द भासे नभाचा किनारा
न माझी मला अन्‌ तुला सावली

मना वेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे
पुढे का उभी तू तुझे दुःख झरते
जसे संचिताचे ऋतु कोवळे

अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
तमातूनही मंद ताऱ्याप्रमाणे
दिसे की तुझ्या बिलवरांचा चुडा

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

पाऊस कधीचा पडतो

पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली, दु:खाच्या मंद सुराने.

डोळ्यात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती
रक्ताचा उडला पारा, या नितळ उतरणीवरती.

पेटून कशी उजळेना, ही शुभ्र फुलांची ज्वाला
ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला.

संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा.

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

वा-याने हलते रान

वाऱ्याने हलते रान, तुझे सुनसान, हृदय गहिवरले
गाईचे डोळे, करूण उभे की, सांज निळाईतले

डोळ्यात शीण, हातात वीण, देहात फुलांच्या वेगी
अंधार चुकावा म्हणून, निघे बैरागी

वाळूत पाय, सजतेस काय, लाटांध समुद्राकाठी
चरणात हरवला गंध, तुझ्या की ओठी

शून्यात गरगरे झाड, तशी ओढाळ, दिव्यांची नगरी
वक्षात तिथीचा चांद, तुझा की वैरी

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

अंतरीच्या गूढगर्भी एकदा जे वाटले

अंतरीच्या गूढगर्भी एकदा जे वाटले
एकदा जे वाटले ते प्रेम आता आटले,
सखी प्रेम आता आटले

दूर सोनेरी सुखाचे पाहिले आभास मी तू
रंगले आभाळ पूर्वी, तेच आता फाटले
सखी प्रेम आता आटले, सखी प्रेम आता आटले

एकदा ज्यांतून मागे सूर संवादी निघाले
वंचनेने तोडले ते स्नेह-तंतू आतले
सखी प्रेम आता आटले, सखी प्रेम आता आटले

शेवटी मंदावलेल्या वादळी वार्‍याप्रमाणे
राहणे झाले दीवाणे, गीत गाणे कोठले
ते गीत गाणे कोठले, सखी प्रेम आता आटले

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

सावर रे

सावर रे सावर रे सावर रे उंच उंच झुला
सुख मला भिवविते सांगू कसे तुला ?

आता आभाळ भेटले रे
अंग फुलांनी पेटले रे
पहा कसे ऐकू येती श्वास माझे मला

फांदी झोक्याने हालते रे
वाटे स्वप्नी मी चालते रे
मिटले मी माझे डोळे, हात हाती दिला

जुने आधार सुटले रे
तुझ्या मिठीत मिटले रे
सांभाळ तू बावरल्या वेड्या तुझ्या फुला

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

सजणा पुन्हा स्मरशील ना

सजणा पुन्हा स्मरशील ना
साऱ्या खुणा, सजणा पुन्हा स्मरशील ना !

चकवून कुणा आले कोण
दिधले प्रिया चुंबनदान
कोणी कुणा, सजणा पुन्हा स्मरशील ना !

प्रीतीतले लाख बहाणे
तू मी नवे खेळ पुराणे
मनमोहना, सजणा पुन्हा स्मरशील ना !

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

सजणा, कशासी अबोला ?

सजणा, कशासी अबोला ?
घडला, असा रे माझा काय गुन्हा ?

छळितो मजसी हा दुरावा
ध्यास तुझा जुलमी !
मोहरली वसुधा तरी का
सावन हा विरही ?
नवरंगी पुकारि माझि साद तुला
नवरंगी पुकारी साद तुला !

भास तुझा फुलवी सुखाचा
पारिजात हृदयी
आस मनी झुरते अनोखी
व्याकुळल्या समयी
रतिरंगि बुडालि अशि चंद्रकला
रतिरंगि बुडाली चंद्रकला !

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

माझिया माहेरा जा

माझिया माहेरा जा, पाखरां, माझिया माहेरा जा ॥ ध्रु ॥

देतें तुझ्या सोबतीला, आतुरले माझे मन.
वाट दाखवाया नीट माझी वेडी आठवण
मायेची माउली, सांजेची साउली, माझा गं भाईराजा ॥ १ ॥

माझ्या रे भावाची, उंच हवेली, वहिनी माझी नवी-नवेली
भोळ्या रे सांबाची, भोळी गिरिजा ॥ २ ॥

अंगणांत पारिजात, तिथे घ्या हो, घ्या विसावा
दरवळे बाई गंध. चोहिकडे गांवोगांवा ॥ ३ ॥

हळूच उतरा खाली, फुलं नाजुक मोलाची
माझ्या मायमाऊलीच्या, काळजाच्या कीं तोलाची ॥ ४ ॥

तूझी ग साळुंकी, आहे बाई सुखी
सांगा पाखरानो, एवढा निरोप माझा ॥ ५ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

दिल्या घेतल्या वचनांची

दिल्या घेतल्या वचनांची, शपथ तुला आहे
मनांतल्या मोरपिसाची, शपथ तुला आहे ॥ ध्रु ॥

बकुळीच्या झाडाखाली, निळ्या चांदण्यांत
ह्रुदयाची ओळख पटली, सुगंधी क्षणांत
त्या सगळ्या बकुळफुलांची, शपथ तुला आहे ॥ १ ॥

शुभ्र फुले रेखित रचिला, चांद तू जुईचा
म्हणालीस, " चंद्रोत्सव हा, सावळ्या भुईचा"
फुलांतल्या त्या चंद्राची, शपथ तुला आहे ॥ २ ॥

भुरभुरता पाउस होता, सोनिया उन्हांत
गवतातुंन चालत होतो, मोहुनी मनांत
चुकलेल्या त्या वाटेची, शपथ तुला आहे ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

गेले द्यायचे राहुनी

गेले द्यायचे राहुनी तुझे नक्षत्रांचे देणे
आता माझ्या पास कळ्या आणि थोडी ओली पाने

आलो होतो हासत मी काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे ओझे आता रात्र रात्र शोषी रक्त

आता मनाचा दगड घेतो कण्हत उशाला
झाले कळ्यांचे निर्माल्य आणि पानांच पाचोळा

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: